सुहृद - भाग २

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

************ आज प्रत्यक्ष भेट होणार होती......

ठीक साडेचार वाजता, अप्पा आणि सुनिता दिक्षितांकडे आले.अनिकेत आणि त्याचे आई वडिल येणार, तेह्वा दोन्ही कुटुंबाना ओळखणारे म्हणून अप्पांनी आपल्या घरी त्यावेळी हजर रहाव, अशी दिक्षितांनी विनंती केली होती, त्याप्रमाणे अप्पा आले होते. काही हाताखाली मदत लागली तर, म्हणून सुनिताही आली होती.

"येऊ का सर?? वैनी?? झाली का तयारी सगळी?? सुनिता बेटा, तू जा जाई काय करतेय बघ बर..." अप्पांनी सुनिताला जाईकडे पिटाळल.... "सर, वैनी, कसलीही काळजी नको!! सगळ छान होणार बघा..."

"तस झाल ना भावोजी, तर तुम्ही काय म्हणाल ते गोडधोड करुन घालेन हो मी तुम्हांला... गजाननच बोलूदे तुमच्या तोंडून!!"

"अप्पा, या, या, बसा, पहा सगळ आहे ना व्यवस्थित? ठीकठाक वाटतय ना??"

"छान आहे हो सर, उगाच काऴजी का करता? सगळ उत्तम आहे, अन मुख्य म्हणजे आपली जाई म्हणजे शंभर नंबरी सोन आहे!! पसंत पडणारच! मी सांगतो ना..."

अश्या गप्पा सुरु असतानाच अचानक मिश्किल हसर्‍या स्वरात एक प्रश्न आला, "नमस्कार, याव का आम्ही??" सगळ्यांनीच आवाजाच्या दिशेने पाहिल. अनिकेत अन त्याचे आई वडिल दरवाज्यात उभे होते, आणि अनिकेतच्या वडिलांनीच प्रश्न केला होता. तिघांना पाहताना, त्यांच्या चेहर्‍यांवरचे हसरे, शांत, मैत्रीपूर्ण भाव निरखता निरखता, दिक्षित मास्तरांना आणि त्यांच्या पत्नीला हायस वाटल.

"अरे, या, या, याsss दादासाहेब, या वैनी... कसा आहेस रे अनिकेत?" अप्पा स्वागताला उठून उभे राहत म्हणाले, पाठोपाठ दिक्षितांनीही सर्वांच स्वागत केल. सारे आपापल्या जागेवर स्थिरस्थावर झाल्यावर, अप्पांनी सर्वांची एकमेकांशी रीतसर ओळख करून दिली. अनिकेतचे आई वडिल, अप्पांनी म्हटल्याप्रमाणे, बोलायला अन वागायला मोकळे ढाकळे होते, मुलाकडची बाजू वगैरे असला कसल्याही प्रकारचा अभिनिवेश त्यांच्या बोलण्या वागण्यात नव्हता. दादासाहेब तर विलक्षण बोलघेवडे होते, आणि त्यांनी लगेच गप्पांची बैठकही जमवून टाकली होती!! अनिकेतचही वागण, बोलण मास्तरांना आणि त्यांच्या पत्नीला आवडल होत. पंधरा एक मिनिटं गप्पांमधे गेल्यावर दादासाहेब एकदम आठवल्यासारखे म्हणाले, "अरे हो, पण आधी उत्सव मूर्तीला बोलवा आजच्या! आमच काय, आम्ही आपल सावकाश बघू होsss गप्पा, चहा झाला की निवांत!! आता आमच्या सुनिताची मैत्रीण म्हणजे छानच असणार!! पण आमच्या हिला धीर निघत नसेल जाईला बघायचा!! काय रे अनिकेत? खर की नाही??"

"अहो, काय उगीच जिथे, तिथे थट्टा तुमची!!" अनिकेतची आई हसत उद्गारली. अनिकेतच्या चेहर्‍यावरही हसू उमटल होत. वातावरण सैल झाल, आणि अप्पांनी सुनिताला हाक मारुन जाईला घेऊन यायला सांगितल. सुनिता आणि जाई चहा आणि खाण्याच घेऊन आल्या.

"कशी आहेस ग सुनिता?" दादासाहेबांनी लगेच सुनिताकडे मोहरा वळवला, "आणि ही जाई ना?? ये बेटा, बैस इथे. अग, लिस्ट काढ ग ती प्रश्नांची, परीक्षेला सुरुवात करूयात!! काय ग जाई, करु का सुरुवात?" सगळ्यांच्याच चेहर्‍यांवर एक मिश्किल हसू होत.

"अं...??" आधीच जराशी घाबरलेली जाई अजूनच बावचळली आणि तश्याच गोंधळलेल्या चेहर्‍याने तिने आळीपाळीने दादासाहेबांकडे आणि आपल्या आई वडिलांकडे पाहिल! तिचा गोंधळ बघून, सगळेच हसायला लागले, तस काही सेकंदांनी तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि एक प्रसन्न हसू तिच्या चेहर्‍यावर उमटल! प्रसन्नपणे हसणारे अनिकेतचे आई वडिल बघता बघता, त्यांच्या डोळ्यामधली, चेहर्‍यावरची आपुलकी पाहता पाहता ती निर्धास्त झाली. आपल्या आई बाबांसारखेच दिसताहेत की... तिच्याही मनात एक आपुलकीची भावना रुजू झाली, अन अनिकेत? हसता हसता झालेली निमिषार्धातली नजर भेट एकमेकांना खूप काही सांगून गेली होती.... जाईच मन सुखावल होत... सुनिताने खरच सांगितल होत तर....

"सर, आम्हांला तुमची लेक एकदम पसंत बघा!! काय ग, तुला आहे ना पसंत?? का नको म्हणतेस?? का रे अनिकेत? आवडेल का आईला??"

"अहो, काय हे परत!! कशाला छळता त्याला?" अनिकेतची आई हसतच म्हणाली... "पसंत आहे हो मला!"

"चला, एक काम झाल!!" दादासाहेब म्हणाले, "आता आपण बसू गप्पा मारत, सुनिता ताई, आता तुम्ही एक काम करा, अनिकेतला जरा सरांची बाग दाखवा, अन जाईला माहीत असेल बागेची, तेह्वा तिलाही घ्या बरोबर, कस??"

सुनिता या संधीची वाटच पाहत होती, लग्गेच तिने दोघांना घेऊन बाग गाठली.

आत बैठकीमधे सरांनी दादासाहेबांना विचारल, "दादासाहेब, मुलगी पसंत आहे म्हणालात, आनंद वाटला, पण आपण पत्रिका वगैरे मागितली नाही, तसच आपल्या काय अपे़क्षा आहेत, याचा जरा अंदाज आला असता तर....."

अपूर्ण*****

विषय: 
प्रकार: 

छानच लिहितेयस ग शैलजा! पटापट पुढचे भाग टाक!! वाचायची खूप उत्सुकता लागली आहे!!
~ पन्ना ~

छान लिहिलं आहेस गं. आता उगाचच इकडे तिकडे TP न करता कथा पुर्ण कर बघू ........ Happy
--
अरूण

आयला शैले, सॉलीड उत्सुकता लागून राहिलीये गं. तू पण अगदी एकता कपूर सारखा एपिसोड संपवतेस. लवकर टाक पुढचा भाग. Happy

पन्ना, धन्स ग Happy
अरुण, तू खूप कठीण काम सांगतोयस!! टीपी करायचा नाही म्हंजे काय रे?? ऐ. ते. न.!! Happy असो. आवर्जून अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद. कळत तरी कोण कोण वाचत आहे ते Happy छान वाटत.
मोने, तू जरा टी.व्ही बघण कमी कर आता!! Proud जिथे तिथे एकता कपूर दिसते तुला!!