श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - अंतीम भाग - भाग ३५

Submitted by बेफ़िकीर on 18 September, 2010 - 02:46

कादंबरीच्या अतीम भागाच्या निमित्ताने -

१. कादंबरी लिहीताना मी कित्येक वेळा अक्षरश: रडलो. मात्र त्याच भावना नेमक्या शब्दात वाचकांपर्यंत पोहोचवू शकलो की नाही हे वाचकांनी ठरवावे.

२. कादंबरी हातावेगळी करताना मेल्यासारखे वाटत आहे. आधीच्या कादंबर्‍यांपैकी हाफ राईसच्या वेळेस अशी भावना थोड्याफार प्रमाणात आलेली होती.

३. मूळ कविता दोन वेळा सादर केली येथे! पण कविता आणि कादंबरी यांच्यात मला स्वतःला तरी कादंबरी अधिक आवडली.

३. मायबोली प्रशासनाने इतके दीर्घ लिखाण प्रकाशित केले याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे व फक्त ॠणीच राहू शकतो.

४. वाचक, प्रतिसादक, प्रोत्साहक, चुका सांगणारे यांच्या पाठिंब्यामुळेच मी हे लिखाण करू शकलो. अन्यथा मी स्वतःच हे लिखाण थांबवलेले असते. या सर्वांचे आभार मानणे कृत्रिम ठरेल.

५. ही कादंबरी प्रकाशित करताना अनेक गोष्टी घडल्या. असामी असामी यांच्याशी झलेल्या वादामुळे मी लिखाण थांबवले. असामी असामी यांची मी माफी अशासाठी मागतो की त्या प्रसंगात ते उगीचच दुखावले गेले. याच कादंबरीच्या दरम्यान मला असे समजले की जुयी या सदस्याने चक्क आवडत्या लेखकांमधे माझे नाव समाविष्ट केलेले आहे. त्याच बरोबर सानी यांनी माझ्यावर एक व मानेकाकांवर एक अशा दोन कविता रचल्या. परेश यांनी मला मोफत ब्लॉग तयार करून देण्याची इच्छा प्रदर्शित केली. या तिघांची नावे घेऊन हे संपू शकत नाही. रोहित, मधुकर, श्वे, प्रसन्न अ, तृष्णा, रंगासेठ, प्रसाद, सुमेधा, अर्चना (माफ करा कुणाचे नाव राहिल्यास) या सर्व नियमीत प्रतिसादकांनी प्रतिसाद देऊन माझे सतत बळ वाढवले. हे सर्व या कादंबरीच्या निमित्ताने झाल्यामुळे मी स्वार्थीपणे अत्यंत समाधानी आहे.

६. काही ठिकाणी अनावश्यक लिखाण, अनावश्यक पात्रे व कंटाळवाणे प्रसंग लिहिले गेले असल्यास किंवा संपूर्ण कादंबरीच उगाच दीर्घ व कंटाळवाणी वाटत असल्यास त्या वाचकांसमोर मी दिलगीर आहे.

७. माझा चुलत भाऊ मनमोहन भालचंद्र कटककर याच्या वर्गातील एक मुलगा असाच होता. त्याला आई नव्हती व एकदा मोहनबरोबर मी त्याच्याकडे गेलेलो असताना त्याचे वडील पोळ्या करत होते. नंतर तो मुलगा बायकोला घेऊन परदेशात राहायला गेला. मुळ कविता मला त्यवरून सुचली होती. कादंबरी त्या कवितेवरून! एक प्रकारे ही एक सत्य कथाच आहे.

८. या कादंबरीत कित्येकदा मी गट्टू होतो तर कित्येकदा श्री! कित्येक प्रसंग सत्य तर काही काल्पनिक!

९. बाप होण्याचा अनुभव नसल्यामुळे व्यक्तीरेखा रेखाटण्यात काही त्रुटी पडल्या असतील तर उदार मनाने माफ करावेत अशी विनंती!

ही कादंबरी माझे वडील श्री. श्रीकृष्ण कटककर यांना समर्पीत!

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - या कादंबरीचा अंतीम भाग आपल्यासमोर ठेवत आहे.

-'बेफिकीर'!

================================================

"एक कॉर्पोरेशन"

गोवित्रीकरांनी ऑफर केलेली जंगली महाराज रोडपर्यंतची लिफ्ट नाकारून श्री विमानतळावरून पी.एम.टी. ने परत निघाला होता. गोवित्रीकरांनी मनापासून विचारले होते सोडू का म्हणून! पण श्रीनेच विचार केला. नाहीतरी घरीच जायचंय! आपण काय? एक निवृत्त माणूस! घाई नाही अन काही नाही. कशाला गोवित्रीकरांना वाट वाकडी करायला लावायची? आणि घरी जाऊन तरी काय करायचंय? निवांत बसने गेलो तर वेळ तरी जाईल आणखीन थोडा! घरी जाऊन कुणाची वाट बघायचीय आता?

"एक कॉर्पोरेशन" असे सांगून तिकीट काढून एका खिडकीत बसून श्रीनिवास बाहेर बघत होता. डोळ्यांमधे आसवांची एकही खुण नव्हती. नजरे जिकडे जाईल तिथे असलेली गोष्ट नजरेच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोचतच नाही अशी अवस्था कधी अनुभवलीयत? तशी अवस्था होती त्याची! इन्कम टॅक्स ऑफीस, जेल... सगळे हळूहळू मागे पडत होते. पण आत्ता काय मागे पडले हे श्रीच्या डोक्यापर्यंत पोचतच नव्हते. मेंदू व्यापलेला होता जीवनपटाच्या विचारांनी! असंख्य विचार, विचारांची तुडुंब गर्दी आणि त्या गर्दीमुळेच कदाचित... जाणवणारी एक.. भयावह पोकळी!

आत्ता त्याला ती पार्टी आठवली. ज्या पार्टीत महेशने जाहीर केले होते की तो आणि अनु कायमचे अमेरिकेला चाललेले होते. हातातला घास हातात, तोंडातला तोंडात अशी दास्ताने वाड्याची अवस्था झाली होती त्या विधानानंतर! एक शब्दही कुणी कुणाशीही न बोलता कसेबसे ताटात आहे तेवढे संपवून उठले होते. एक सुनसान, अभद्र सावट असलेली शांतता! अजूनही मावशी त्यांच्या खोलीतच होत्या. मधूसूदनने श्रीच्या पाठीवर थोपटून सांगीतले होते...

"मुलाचे कल्याण होते आहे श्री.. आणि तसंही... व्हिसा वगैरेची कामे व्हायला दोन महिने तरी जातीलच.. तेवढा सहवास आहेच की? नाही का? आणि हल्ली अमेरिका म्हणजे काय फार लांब नाही.. सगळं जग जवळ आलंय असं म्हणतात... विमानाने फक्त ३६ तास लागतात इकडे यायला.. आणि फोनही करता येतोच.... महेश येऊन जाऊन असेल बघ भारतात.. असं समजू नकोस... गेला की येणारच नाही म्हणून... काय? ... अरे वर्षातून दोन वेळा येईल तो.... आणि मुख्य म्हणजे पुढे मागे जरा परिस्थिती बरी झाली की अर्थातच तुलाही घेऊन जाईल तिकडे.... आणि हे बघ श्री... आम्ही सगळे आहोत की नाही इथे?? आम्ही सगळे तुझेच आहोत की नाही? मग?? अरे जाऊदेत मुलाला... अशी संधी आयुष्यात कधी येत नाही इतकी सहज... शेवटी आपण मुलांना स्वतःच्या पायावर उभे करतो ते... त्यांची भरभराट व्हावी म्हणूनच ना? आणि ती झालेली आपल्याला पाहायला मिळावी म्हणूनच ना? मग?? उदास कसला होतोस?? तू उदास झाल्यावर मला झोप येईल का रात्रभर?? अं??? ...."

असल्या समजावण्याने जर माणसाची मनस्थिती बदलत असती तर मग काय हवे आणखीन? काळजाचा तुकडा काढून देताना कसे वाटेल? साध्या समजावण्याने काय होणार?

दुसर्‍याच दिवशी न्यु टेक मधे राजीनामा देऊन महेश जरा लवकरच घरी आला. एका कन्सल्टन्टकडे जाऊन पुढच्या औपचारिकता समजावून घ्यायच्या होत्या. पण खदखदत असलेल्या श्रीने खोलीतच अनुसमोर विषय काढला.

श्री - काय रे? लवकर आज?

महेश - हं! .. रिझाईन करून आलो..

श्री - .... तू... खरच जाणारेस?

अनु - .... खरच म्हणजे काय?

श्री - महेश... तू.. जाणारेस??

अनु - मी बोलायचंच नाहीये का मधे??

श्री - तसं नाही अनुराधा.. हे आयुष्य तुमचंच आहे...मला सांग.. अमेरिकेला जाताना तुझ्या आईला सोडताना तुला कसं वाटेल? तुझ्या आईला कसं वाटेल? मग तसंच मला नाही का वाटणार?

महेश - बाबा.. ३२०० बेसिक आणि साडे सात हजार टेक होम वर आहे आत्ता मी.. कन्व्हर्जन करून तिकडचा पगार पाहिला तर चाळीस हजार प्लस होतोय.. हा जॉब कित्येकांना हवा होता.. मलाच का मिळाला माहितीय तुम्हाला?? कारण अनुच्या बाबांच्या कंपनीचे तिकडे एक ऑफीस आहे.. त्यांच्या त्या ऑफीसमधल्या एकांचे या कंपनीत एक इन्डियन मित्र आहेत.. त्यांच्यातर्फे माझी शिफारस झाली.. भारतातला माणूसच हवा होता कारण पगाराची अपेक्षा कमी असते... आता.. एवढं सगळं झाल्यावर... मी नाही म्हणू शकेन का?? आणि.. मला सांगा... इतक्या पगाराची नोकरी मिळायला भारतात माझी किती वर्षे जातील?? मग माझं करीयर मी आत्ता दुर्लक्षित करणं योग्य आहे का?

महेश आढ्याकडे बघत पलंगावर लोळून बोलत होता. घराचे दार आतून बंद होते. अनुराधा एका खुर्चीवर बसून ऐकत होती. आणि श्रीनिवास भिंतीला टेकून खाली बसला होता. त्याच्या डोक्याला लावलेल्या खोबरेल तेलाचे डाग भिंतीवर पडण्यावरून अनुराधा मधेमधे बोलायची! पण आज तिला तो विषय बोलण्याची गरजच राहिलेली नव्हती! कारण तिला आता इथे राहायचेच नव्हते. ही चर्चा आज ना उद्या घरात होणारच याची अनुला कल्पना होती. तिने तिचे व महेशचे मुद्दे आधीच तयार करून ठेवले होते. त्या दोघांना याची जाणीवच नव्हती.. की बाप मुलाचे नाते हा एक असा प्रकार असतो.. ज्यात ठरवलेल्या मुद्यांवरून बोलणे होतच नाही.

श्रीनिवासही शुन्यातच बघत महेशचे बोलणे ऐकत होता.

श्री - महेश.. एक अन एक शब्द पटला मला तुझा... एक अन एक शब्द! अगदी खरं बोलतोयस...

एक मोठा पॉझ घेऊन श्रीनिवास शुन्यात बघत म्हणाला...

"जेव्हा तुझा जन्म झालेला नव्हता ना महेश.. तेव्हा रमा मला म्हणायची.. आपण मुंबईला जाऊयात का? तिकडे पगारही जास्त मिळेल.. माझे मामा, म्हणजे रमाचे मामा, सुद्धा आहेत तिथे.. मी हो म्हणायचो.. खूप प्रयत्न केले मी दुसरा जॉब मिळवायचे... सप्रेकाका नुसतेच चिडके होते म्हणून चिडायचे असे नाही.. मी कित्येकदा रजा टाकून .. म्हणजे तू व्हायच्या आधीचं आहे हे.. रजा टाकून दुसर्‍या मुलाखतींना जातो हे त्यांच्या कानावर गेलेले होते.. मी त्यावेळेस त्यांना मुळीच घाबरायचो नाही.. मनात म्हणायचो.. वेळ पडली तर या नोकरीवर लाथ मारेन.. पण सप्रेंचे बोलणे ऐकून घेणार नाही... पण.. एक दिवस... एक दिवस तुझ्या आईने मला सांगीतले.. की तुझे आगमन होणार आहे.. आमच्या संसाराचा सगळा रंगच पालटला.. आता आहे ती नोकरी करणे यात ब्रह्मानंद वाटू लागला.. कारण सगळा.. सगळा फोकस होता तुझ्या जन्माला येण्यावर.. त्यातच डॉक्टर म्हणाले.. मूलाची पोझिशन योग्य नाही आहे... डिलीव्हरी कॉम्प्लिकेटेड होणार आहे.. खूप.. खूपच जपायला हवे आहे...

त्या दिवसापासून महेश.. तुला सांगतो... सगळा रागरंगच वेगळा झाला घरातला.. या शेजारच्या मावशी आहेत ना? त्या भयंकर शिव्या द्यायच्या रमाला.. का कुणास ठाऊक...त्यांना रमाचा चेहराही पाहणे मंजूर नव्हते... त्यातच तिला दिवस गेलेले समजल्यावर तर त्या वाट्टेल तशा बोलू लागल्या... आम्हाला वाटायचे की या नालायक बाईला आपला हेवा वाटतो.. वाड्यात कुणालाही मूल झाले तरी ही बाई अशीच बोलायची.. कोणत्याही शुभ कार्यात विघ्नच आणायची.. आणि त्यात माझा पगार तुटपुंजा.. रमाची अत्यंत काळजी घ्यावी लागत होती.. त्याही जमान्यात आम्ही एक बाई ठेवल्या होत्या कामाला.. कारण रमाला अधिक काम पडून द्यायचे नाही असे सांगीतलेले होते..

महेश... जरा जरी त्रास झाला तरी आम्ही डॉक्टरकडे धावायचो.. पहिलं बाळंतपण होतं.. अर्थातच माझ्या सासूबाईंनी रमाला तिकडे नेलं.. तुझी मावशीही रमाचे सगळे करायला लागली... मी औरंगाबादला जाऊ येऊन होतो... तिकडेही रमाल खूप त्रास सहन करावा लागला.. शेवटी तर अशी अवस्था आली की आठव्या महिन्यापासून तिला कूसही बदलायची परवानगी नाकारली डॉक्टरांनी.. कसे काढले तिने ते दिवस तीच जाणे.. ते दिवस सहन करणे आम्हाला दोघांनाही अशक्य होऊ लागले होते... तिच्या माहेरच्यांनाही ते अशक्य होऊ लागले होते...

तुझ्या जन्माची तारीख सांगीतली होती त्याच्या आदल्या दिवशीच रमाची डिलीव्हरी झाली... मी कंपनीत फोन घेतला आणि स्वाती मावशी, कोपरकरकाका, देशमाने काका.. चिटणीस काका.. एवढंच काय.. सप्रेकाकाही अत्यानंद झाल्यासारखे हुरळले... आणि तेवढ्यात दुसरा फोन आला...

... रमा गेल्याचा.. रमा गेल्याचा फोन होता तो...

तुला माहितीय महेश??? अनुराधा?? तुला असं वाटत असेल की मी... सगळ्या उपकारांचा पाढा वाचतोय तो अशासाठी की तुमचे दोघांचे मन बदलावे... नाही... त्यासाठी मी हे सांगत नाहीये.. लक्षपुर्वक ऐक महेश... त्यासाठी मी हे सांगत नाहीये... खरे तर.. मी जे केले ते उपकार नाहीतच... ते माझे कर्तव्यही होते अन प्रेमही... बापाने मुलाचे करणे याला कुणीच उपकार म्हणू नये.. समजू नये... पण आता सांगतो की हे सगळं मी का सांगत होतो...

.. रमा गेल्याची बातमी मिळाल्यावर औरंगाबादची जी पहिली बस मिळाली त्यात बसून जाताना माझ्या मनात अत्यंत नैसर्गीकपणे काय विचार येत होते माहितीय???

.... मला अशी इच्छा होत होती की माझ्या रमाचा जीव घेणारा हा मुलगा आपण तिथे पोचेपर्यंत मेलेला असावा....

कॅन यू इमॅजिन??? ... मेलेला असावा.... मेलेला...

महेश.. आय अ‍ॅम रिअली सॉरी.. पण... पण त्या क्षणी मला अक्षरशः तसंच वाटत होतं...तुझा काहीच दोष नाही हे स्वतःच स्वतःच्या मनाला हज्जारदा पटवूनही पुन्हा तेच मनात येत होतं... की माझ्या रमाने... ज्याला जन्म देण्यासाठी इतके हाल सोसले... आणि जन्म देताना जीव सोडला स्वतःचा.. तो माझा मुलगा जगून काय दिवे लावणार आहे?? तो गेलेला असला तर बरे होईल... माफ कर महेश.. आयुष्यात एकही बाप असा नसेल पाहिलेला मी की ज्याच्या मनात कधी असा विचार येईल.. पण मला तुझा तीव्र संताप आलेला होता त्या क्षणी!

आणि.. तुला फिडिंग करू नये व मारून टाकावे वगैरे अश्लाघ्य विचार नव्हते माझ्या मनात.. मला फक्त इतकंच वाटत होतं की... तू राहिलेला नसावास मी पोचेपर्यंत... कारण रमाला तूच मारलंस या विचाराने माझ्या मनात मूळ धरलेले होते...

आणि.... मी आणि देशमाने.... तिथे पोचलो... तुला सांगतो महेश.... मी तुला पहिल्यांदा पाहिले आणि... मला वाटले की मीच आत्महत्या करावी... अशा बालकाबाबत, तेही आपल्याच रक्ताच्या मुलाबाबत इतके हीन, इतके घाणेरडे विचार माझ्या मनात आले यामुळे मी कुणाचेही लक्ष नसताना भिंतीवर पश्चात्तापाने डोके आपटून घेतले होते... ज्यांना ते दिसले त्यांना रमाचे दु:ख आहे असे वाटले..

तुला घेऊन आणि रमाला अग्नी देऊन इकडे येताना... माझ्या आयुष्याची दिशा संपूर्णपणे बदललेली होती... शेजारी इतकी भांडखोर बाई... माझी नोकरी... वाड्यातील कुणाला 'बघाल का मुलाकडे' म्हणणे अयोग्य... आणि तू इतका तान्हा! काय करणार मी?? तुझ्या त्या तान्हेपणामुळे, लाघवीपणामुळे.. माझ्यातला बाप जन्माला आलेला होता बाप.. तारा आणि उषाताई अर्थातच आल्याच इथे... कित्येक दिवस राहिल्या.... आणि तारा आहे म्हणून उषाताई निघाली अन ती गेल्यावर नेमके ताराला एक स्थळ आले म्हणून तीही गेली...

... एकटा पडलो मी... इतक्या तान्ह्या मुलाला नेमके कसे वाढवतात, कसे वागवतात याची सुतराम कल्पना नसताना देव पावला मला... मी विसरूनच गेलो होतो की हा दास्ताने वाडा आहे... पवार मावशी या व्यक्तीने तिचे खरे रूप दाखवले.. तुला चोवीस तास फक्त मीच सांभाळणार म्हणाल्या... तुला माहितीय? समीर एक दिड वर्षाचा होता... काही वेळा असे झाले महेश.... आज सांगायला हरकत नाही तुम्हाला... पण.... प्र.. प्रमिला वहिनींनी तुला फीडही केले... अनुराधा... तुला त्या आले किंवा बटाटे आणायला सांगतात हे तुला जड वाटते ना?? ... महेश... प्रमिला काकू समोर उभे राहिल्यावर तुझी मान खालीच जायला पाहिजे... आई आहे ती तुझी आई... तिच्या पायांचे तीर्थ प्यायला पाहिजेस तू... मी कामावर असायचो तो कुणाच्या जीवावर??? चितळे आजोबा होते ना?? त्यांनी त्यांच्या हातात रात्रभर ठेवले होते एकदा तुला... रात्रभर... कारण त्या दिवशी मावशींनाही बरे नव्हते अन वहिनी बाहेरगावी गेलेल्या होत्या.... हा.. हा समोरचा केमिस्ट कित्येकवेळा 'पैसे नंतर द्या' असे आजही का म्हणतो माहितीय??? कारण तू आजारी पडला होतास तेव्हा चितळे आजोबांनी त्याला सांगीतलेले होते... पेंढारकरांना लागतील ती औषधे द्यायची.. एक पैसा मागायचा नाही.. ते देतील तेव्हा देतील..पण.. केव्हापर्यंत असे हेच सांगीतले नव्हते... आजोबा जाऊन दशके लोटली तरी मोतीबागेतल्या त्या संघाच्या साधूचा शब्द प्रमाण मानून आजही कित्येकदा तो केमिस्ट म्हणतो.. जाऊदेहो... नंतर आणून द्या...

स्वाती मावशी! .. तुम्ही केव्हाच मोठे झालेले आहात.. अ‍ॅड्ल्ट्स आहात... आज विषय निघाला आहे.. आता सांगायला काहीच हरकत नाही.. तू शाळेत जायला लागल्यानंतर... सगळ्यांचा आग्रह, माझी आवश्यकता आणि.. सर्वात मुख्य म्हणजे... घरात तुला आई असावी या उद्देशाने.. मी स्वाती मावशीला चक्क लग्नाचे विचारले... आणि... महेश.. ती.. ती होही म्हणाली.. पण.. ती अस्सल आई झाली नसती.. कदाचित... आम्हाला आणखीन मुलगा झाला असता.. बरेच प्रॉब्लेम्स निर्माण झाले असते... शेवटी मीच तिची माफी मागून तिला नकार दिला...

विचार कर महेश.. ज्या बाईने लग्नच केलेले नाही कारण तिला पुरुष या व्यक्तीबद्दल मुळातच काहीतरी आकस आहे... किंवा लग्नसंस्थाच अमान्य आहे.. त्या बाईने.. माझ्यासारख्या विधुराचा प्रस्ताव... तेही .. तू असताना म्हणण्यापेक्षा... चक्क तुला आई पाहिजे या प्रमुख कारणासाठी स्वीकारणे... आणि... नंतर मीच माझा प्रस्ताव मागे घेणे... किती उलथापालथी झाल्या असतील तिच्या मनात... एवढे करूनही चेहर्‍यावर काहीही दाखवू न देणे हे कदाचित... एखादी बाईच करू जाणे... आणि परत... सुंदरममधे माझ्यासाठी शब्द टाकून... तेही माझ्यावर नसते आरोप झालेले असताना... आणि तो जीब मिळवून देणे... हे सगळे उपकार फक्त माझ्यावरचे उपकार नव्हते गट्टू... ते आपल्या घरावरचे उपकार होते...

सगळ्याच गोष्टी तपशीलवार सांगायला बसलो तर कदाचित.. कित्येक प्रसंग असे येतील ज्यात मलाच रडायला येईल... की नुसते तुलाच नाही.. तर या दास्ताने वाड्याने मलाही जगवले एक बाप म्हणून.. एक माणूस म्हणून कदाचित मी जगलोही असतो... पण एक बाप म्हणून केव्हाच संपलो असतो या लोकांशिवाय... तुला शाळेत सोडताना 'मी या मुलाचा बाप' आहे ही प्रौढी... जी माझ्या चेहर्‍यावर असायची... ती केवळ या वाड्यातील माणसांची देणगी होती महेश... केवळ एक देणगी.. एक निरपेक्ष देणगी!

हे सगळं आज सांगायचं कारण काय माहितीय?? कारण इतकंच की भौगोलिकदृष्ट्या तू आज लांब चाललेला आहेस! मनाने आमच्या सर्वांसाठी तू इथेच असशील!

कोणता बाप असे म्हणेल की मुलाची लौकीक प्रगती होऊ नये? मी स्वतःच सांगतो... त्या क्षणी.. तुझा जन्म झाला त्या क्षणी तुला पाहिलेलेही नसताना माझ्या मनात आलेले विचार तुला नुसते पाहून कायमचे नष्ट झाले... आजतागायत मला ते विचार सुचले यावरून मनातल्या मनात मीच मला खूप बोलतो... पण... त्या क्षणानंतर माझ्या आयुष्याचे प्रयोजनच तू होतास... मी जे केले, ज्या क्षणी केले, ज्या परिस्थितीत केले.. ते सगळे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी, तुझ्या दृष्टिकोनातून आणि 'तू' हाच हेतू ठेवून केले. स्वतःसाठी सगळेच करायचे राहिले! अनुराधा, तुला वाटत असेल, मी आज खरे सांगतो... मी निवृत्त झाल्यावर एक फ्लॅट घेऊ शकलो असतो... नाही घेतला... हा वाडा सोडून... केवळ आपली परिस्थिती सुधारली म्हणून इतरत्र जाणे हे मी माणूसकी नावाच्या शब्दाला काळिमा फासण्यासारखे आहे.. माझ्या जबाबदार्‍या आहेत.. मधूकाकाला रस्त्यात चक्कर येते... तुझ्या आजारपणात दिवसाची रात्र अन रात्रीचा दिवस करायचा तो... मावशींना आता सोसत नाही.. पॅरलिसीस आहे.. तुझे अंग पहिल्यांदा थोडे गरम लागले त्या संपूर्ण रात्री मी दोन तीनदा जागा होऊन त्यांना विचारले असेल की आता कसाय हो गट्टू... पण त्या?.. त्या रात्रभर टक्क जाग्या होत्या... दुसर्‍याही दिवशी झोपल्या नाहीत त्या!

वाड्यातील प्रत्येक माणसाच्या प्रती आता माझे कर्तव्य आहे.. तसेच... तसेच तुझेही आहे महेश.. हे तुझ्या लक्षात आणून द्यायला म्हणून मी इतका बोललो...

पमा काकू, मावशी, समीर, घाटे काका, किरण... राजश्री... सगळ्या सगळ्यांच्या प्रती तुझे कर्तव्य आहे.. त्यांचे देणे लागतोस तू.... आणि आज.. तुझी परिस्थिती व्यवस्थित होत आहे या एकाच कारणासाठी तू निघून चालला आहेस... वाड्यातील एक माणूस तुला 'जाऊ नकोस' म्हणणार नाही... कारण त्यांना भीती वाटेल की 'त्यांना ते पाहावत नाही की काय' असे तुला वाटू शकेल.. पण... मी मात्र तुला बाप म्हणून सांगतो... जाऊ नकोस... तो देश आपला नाही... ती भूमी आपली नाही.. तेथे सुबत्ता असेल.. प्रगती असेल... सुखसुविधांची रेलचेल असेल.. पण... तेथे श्रीनिवास पेंढारकर.. तुझा बाप नसेल.. पवार मावशी नसतील... प्रमिला काकू नसेल.. राजू ताई... समीर दादा.. कुणीही नसेल.. रस्ते गुळगुळीत असतील.. पण त्यातला एकही भारतात येणारा नसेल... रस्त्यावरच्या गाड्या आलिशान असतील.. पण दास्ताने वाड्यात त्या कधीच पार्क होणार नाहीत... घरे म्हणजे महाल असतील.. पण त्यात इकडच्या गट्टूचा रडण्याचा आवाज तिकडे गेल्यामुळे रात्रभर जाग्याच राहिलेल्या पवार मावशी दचकून इकडे येणार नाहीत.. चर्चमधे सुटबुट घालून प्रार्थना करणारे लोक पाहून आपण किती प्रगत समजात आलो आहोत याचा अभिमान वाटेल... पण घरी येताना वीराच्या मारुतीला नुसते हात जोडून येण्याचे समाधान तिथे नसेल.. तू गाडीतून रात्री घरी येशील तेव्हा अनुराधा डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहात असेल.. पण थट्टेत तिथे तिला किरणची बायको विचारणार नाही.. 'केवढी वाट पाहतीयस??' आणि..

.... तुला दोन तास उशीर झाला तर डोळ्यात आसवे आणेल ती... आणि तुला तिला थोपटावेसे पण वाटेल...

... पण... पण.. त्याच दोन तासात भयानक विचार मनात आल्यामुळे... प्रचंड मानसिक घालमेल सहन करणारा अन तुला एकदाचा घरी आलेला पाहून... देवाला नमस्कार करणारा....

..... श्रीनिवास..... पेंढारकर नसेल..... गट्टू.......

..... गट्टू.... न.... क... नको की रे जाऊस.... नक... नको... जाऊ...स

पेंढारकरांच्या खोलीत अश्रूंचा पूर आला होता आज!

हमसून हमसून रडणार्‍या श्रीच्या गुडघ्यांमधे डोके खुपसून महेश ओक्साबोक्शी रडत होता... आणि... ते दृष्य आणि आत्तापर्यंतचे श्रीचे बोलणे ऐकून सर्व ताठा विसरलेली आणि विरघळलेली अनुराधा बसल्या जागी रडत होती....

महेश - बाबा.... मला... मला क्षमा करा..... मी.. चुकलो... मी हे ठरवायला नको होते... पण.... चूक झाली बाबा... मी... सगळं ठरवून बसलोय आता...

महेशच्या आसवांमधे भिजलेले शब्द श्रीच्या कानात जात होते.. त्याच क्षणी... आयुष्यात तिसर्‍यांदा तो प्रकार झाला.....

"त्याला जाऊ द्या...... तो... तसलाच आहे.... तुम्हाला.... मी आहे ना???"

रमाचा आवाज.... रमाचा आवाज वितळलेल्या शिशासारखा कानात घुसला श्रीच्या!

============================================

महिन्याभरातच सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या. तिकीटेही बूक झाली. सामानही पॅक झालेले होते.

मृतवत चेहर्‍याने दास्ताने वाड्यातील प्रत्येक जण त्या प्रगतीकडे पाहात होता. खरे तर महेशला वाड्यात मान वर करायची हिम्मतच होत नव्हती. पण अनुराधा मात्र नॉर्मल वागत होती. तिच्या माहेरचे मधून मधून येऊन लागेल ती मदत करतच होते. एवढेच काय? श्री, मधूकाका व समीरही जमेल ते सगळे करत होते.

आणि... नेमका तो प्रसंग घडला... अनुराधा माहेरी गेली होती राहायला दोन दिवस! आणि... ते माहीत झाल्यामुळे...

... नैना वाड्यात आली.... आणि निरोप आला महेशकडे... 'एकदा भेटशील का???'

शरीरातले त्राण जावेत, मेल्यासारखे वाटावे तसे झाले महेशला... भेटायची हिम्मत नको का व्हायला??

पण... भेटायची तीव्र इच्छा मात्र... नालायकाला होत होती... कारण कुठेतरी श्रीचे संस्कार होते... कुठेतरी पुर्वीच्या प्रेमाची किंमत होती.. आणि.. दास्ताने वाड्याला एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला...

महेश शीलाकाकूच्या घरी गेल्यावर चक्क नैनाच्या मुलाला म्हणजे कमलला घेऊन राजाकाका आणि शीलाकाकू बाहेर निघून गेले.. घराचे दार आतून बंद करणे कधीच शोभून दिसले नव्हते... अख्ख्या वाड्याने तो प्रकार पाहूनही त्यातले अक्षरही अनुराधाला समजणार नव्हते...

आणि... ती मिठी???? काय वर्णन करावे त्या मिठीचे?? कोणत्या भाषेतील कोणती अक्षरे अशी असतील जी त्या प्रसंगाचे योग्य वर्णन करायला न्याय्य ठरतील??

कुठल्याही नाही....

'हम छोड चले है मैफिल को ... याद आये कभी तो मत रोना'

हे गीत कदाचित थोडाफार न्याय देऊ शकेल... पण तेही पूर्णपणे नाहीच!

आलिंगनाचा कालावधी जास्तीत जास्त किती असावा?? किती एकांगी आलिंगन असावे ते???

तब्बल सात ते आठ मिनिटे नैनाने महेशला गच्च पकडून ठेवले होते.... आणि महेश... परक्या स्त्रीला थोपटावे तसे ... डावा हात नुसताच खाली सोडून.. उजव्या हाताने तिच्या डोक्यावर थोपटत होता...

त्याच्या स्पर्शामधले ते अनोळखीपण समजायला नैना काही अननुभवी लहान मुलगी नव्हती... ती एक पूर्ण स्त्री होती.... तिला त्या स्पर्शाची जाणीव झाली त्या क्षणी तिने खाडकन मिठी सोडून महेशकडे बघितले...

जणू काही 'तुला मिठी मारण्याची घोर चूक माझ्याकडून झालीच कशी' असे भाव आता तिच्या डोळ्यात होते. महेशला कसलाही पत्ता नव्हता. त्याची मनस्थिती द्विधा झालेली होती. राजाकाका आणि शीलाकाकू अचानक निघून गेल्यामुळे तो एकदम शरमला होता. वाड्यातील सगळ्यांना आपण द्घेच आहोत हे समजले आहे याची त्याला भीती वाटत होती. त्याचवेळेस नैनाला कदाचित शेवटचे पाहात आहोत याची तीव्र दु:खद जाणीव होती.

महेश - ... नैना... आता आपण.... भेटणार नाही याचे... मला.. मला फार दु:

नैना - चहा वगैरे ?? घेणारेस???

सौ. नैना संग्राम कदम... या स्त्रीचे ते कोरडे कोरडे ठण्ण शब्द दाभणासारखे कानात शिरताक्षणीच महेश दचकला. आत्तापर्यंत आपल्याला मिठी मारून रडणार्‍या हिला एकदम काय झाले? सावरली की काय? सावरली असली तर बरंच आहे.. निदान सांत्वन करता करता आपण तरी रडणार नाही...

महेश - .. अंहं.. चहा नको..

नैना - १७ तारखेला जाणार आहेस ना??

महेश - हं!

नैना - किती वाजता निघणार??

महेश - दुपारी तीन... मुंबईहून पहाटे दोनची फ्लाईट आहे...

नैना - ओंकारेश्वरापाशी आपण जिथे पडलो होतो ना तुझ्या सायकलवरून... त्याच स्पॉटला मी तीन वाजल्यापासून उभी असेन.. माझ्याकडे बघ... मीही बघेन ..तीच आपली शेवटची भेट... आणि.... आत्ता.. या क्षणी.... माझ्या घरातून चालता हो......

तोच त्यावेळेसचा सुगंध, तोच मखमली स्पर्श, तोच आवेग... सगळे काही तेच होते... आणि त्या गच्च मिठीमुळे महेशमधील पुरुष अचानक जागा होत असतानाच... नैनाने पार वाभाडे काढले होते त्याचे... चालता हो म्हणाली होती ती...

विष प्यावेसे वाटले महेशला विष! कशामुळे झाले हे सगळे? कुणामुळे? अनुमुळे? कातडी सोलेपर्यंत मारावेसे वाटले त्याला अनुला क्षणभर! पण... मग लक्षात आले.. ती तर स्वतःला कुर्बान करून त्याच्या भल्यासाठी झटत होती.. फक्त दोघांच्याच संसारासाठी....

नैनाकडून परत निघताना महेश 'सॉरी' ही म्हणाला नाही...

नैनाचीही त्याच्याकडे पाठच होती...

जायचा दिवस उजाडला... काल रात्री गट्टू आणि बाबा एकाच खोलीत झोपले होते... अनुराधा आईकडे झोपायला गेली होती...

कित्तीतरी वेळ बाबा महेशला थोपटत होते. त्याला उन्मळून येत होते.. पण स्वर्गीय सुखाची रास असलेली अमेरिका आता फक्त अठ्ठेचाळीस तासांवर होती... ती दिसत होती...

काल रात्रीचा स्वयंपाक श्रीने स्वतःच्या हातांनी केला होता. कालही महेशने मदत केली नव्हती. नुसता बाबांकडे बघत बसला होता. किती थकले होते बिचारे! शारिरीक आणि मानसिकही थकवा!

दोघांनाही माहीत नव्हते की दुसरा जागा आहे... पण.. रात्रभर दोघेही जागेच होते... पहाटे पावणेसहाला श्री उठला आणि देवाला नमस्कार करून..'दूध घेऊन येतो रे' म्हणाला....

महेश जागा असावा असे श्रीला वाटले होते म्हणून म्हणाला तो.... जागाच होता महेश.. आज महेशने आयुष्यात पहिल्यांदा विचारले... "मी आणू का दूध" आणि.... पहिल्यांदाच 'उद्यापासून मलाच आणायचे आहे ना?' असे ओठांवर आलेले कडवट उत्तर टाळून श्री म्हणाला "आण"!

दार उघडले आणि......

... रात्रभर गॅलरीत बसून राहिलेल्या पवार मावशी.... जाग्याच होत्या... गालांवर अश्रूंच्या सरी ओघळून वाळलेल्या होत्या.... तसाच्या तसा चेहरा करून भकास नजरेने त्या महेशकडे पाहात होत्या...

लवकर उठून यायचे म्हणून गोवित्रीकर अनुला घेऊन नेमके त्याचवेळेस वाड्यात आले आणि... अनुराधाला ते दृष्य पाहायला मिळाले..

महेशने अक्षरश: मावशींच्या पायावर लोळण घेतली.

एका आजीच्या मांडीवर 'गट्टू' नावाचा तिचा तान्हा नातू ओसाबोक्शी रडत होता... ओसाबोक्शी!

आणि आजी फक्त त्याच्या पाठीवर हात ठेवून उगवत्या सुर्याला प्रार्थना करत होती मनातल्या मनात...

"आज नको उगवूस सूर्यनारायणा... आजचा दिवस काळाकुट्ट दिवस असेल.. आज नको उगवूस"

मागून रडत रडत श्रीनिवास महेशला थोपटत होता. महेशच्या रडण्यातच त्याची माफी सामावलेली होती.

शेवटी गणेश बेरीनेच दूध आणून दिले. दुपारच्या जेवणाला काही अर्थच नव्हता. एक तास राहिला होता निघायला.

महेश खाली उतरला. पहिल्यांदा प्रमिलाकाकूकडे गेला...

महेश - काकू....बाबांनी मला सांगीतले... तू.... माझी आई आहेस..... पाया पडतो....

हे वाक्य बोलतानाही जड जात होते त्याला! त्या माउलीची पावले महेशच्या अश्रुंनी भिजली. मधूकाकाला पाया पडताना महेशला सगळे आठवत होते. संभाजी पार्कमधे जाणे! सुजातामधे बटाटेवडा खाणे, नवी कोरी बी.एस्.ए. एस्.एल्.आर. सायकल! सगळे!

कर्व्यांचे घर म्हणजे गलबललेली खोली होती केवळ! आणि दारातून बाहेर पडताना समीरदादा आला.

एक घट्ट मिठी! एका नात्याला कायमचे अदृष्य करणारी घट्ट मिठी!

"तुझ्या बाबांनी तुझी गंमत केली... खरी सर्कस अशी नसतेच..."

"हो मग? ... मी जेन्ट्स सायकलच चालवतो...."

"ह्या! हा आत्ताशिक तिसरीलाय..."

"कॅरम आहे हा... तुला नाही खेळता येणार.."

"ई केवढासा मेकॅनो...."

"म्हशा... धर... धर हिला.... आणि जा घेऊन वाड्याच्या बाहेर..."

"हा हा हा हा, कदम नाव आहे त्यांचे... त्यांना सांगून आलो.. तिचे दुसर्‍या एकावर प्रेम आहे.. तिला सून करून आणू नका...."

"जळतो??? तुझ्यात जळण्यासारखे आहे काय?? "

"पाषाणची जागा वादग्रस्त आहे... तिथे फ्लॅट घेऊ नका.. या तुझ्या ... मिसेसना सांग...."

समीरदादा! संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पाडणारे ते व्यक्तीमत्व!

समीरने एक स्वतः काढलेले चित्र महेशला भेट म्हणून दिले. ते चित्र पाहून मात्र महेशचा धीर सुटला. स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहात तो घराबाहेर पडला.

'एक बाप आपल्या छोट्याश्या मुलाला सायकलवर पुढे बसवून शाळेत सोडायला चालला आहे' असे ते चित्र होते!

वाड्यातील प्रत्येक घरात आता महेश गेला की रडारडी सुरू होत होती. प्रत्येक जण त्याला काही ना काही भेट देत होता.

शेवटी.... स्वत:च्या घरातून निघायची वेळ झाली.... आईच्या फोटोला आणि देवाला नमस्कार करून

.... श्रीनिवास पेंढारकर - एक बाप.... या माणसाला गट्टूने मिठी मारली.....

मुठा नदीला लाज वाटेल अशी नदी वाहात होती त्या घरात..

"बाबा... फार दमू नका... मी फोन करेनच रोज... तुम्हाला घेऊन जाईन... वर्षातून दोनदा येईन.."

"गट्टू........ माझा गट्टू.... रमा..... त्याला सांग की... थांबायला.... मावशी... गट्टू निघाला माझा... तुमचा गट्टू निघाला ... पिट्या.... "

तेवढ्यात काहीतरी विसरल्यासारखे अन पुन्हा आठवल्यासारखे राजश्रीताई एक फ्रेम घेऊन आली. नैनाने दिलेली फ्रेम लग्नानंतर बेरींकडे ठेवलेली होती गट्टूने! ती फ्रेम अनुला न दाखवताच कशीबशी एका बॅगेत खुपसली त्याने!

अनुच्या मावशीच्या गाडीत बहुतेक सगळे सामान ठेवले. पण एक रिक्षा करावीच लागणार होती. त्यातून श्रीनिवास एकताच येणार होता. बाबांचा तेवढास सहवास म्हणून महेशही रिक्षेतूनच येतो म्हणाला...

पवार मावशींनी आता पुन्हा घराचे दार आतून लावून टाकले होते.. बेमुदत!!!

आणि रिक्षा चालू होण्यापुर्वी सायकल स्टॅन्डमधल्या मधूकाकाने आणलेल्या आणि बाबांनी आणलेल्या दोन्ही सायकलींवरून महेशने प्रेमाने हात फिरवला. आपल्या हिरो होंडावरूनही एकदा हात फिरवला आणि मग रिक्षेत बसला.

एका प्रदीर्घ, न संपणार्‍या आणि परतीची वाट नसलेल्या प्रवासाला सुरुवात झाली होती. वीराच्या मारुतीला दोघांनी हात जोडले आणि रिक्षा चालू झाली. घाईघाईत महेश विसरूनच गेला होता. उगाचच बाहेर लक्ष होते म्हणून! अचानक...

.... अचानक... त्या स्पॉटपाशी... नैना दिसली....

दोन क्षण जणू हृदयच बंद पडले महेशचे... नैनाने मरणकळा आल्याप्रमाणे हात हालवला.. महेशचा हात कसाबसा हालला...

संपलं होतं आता सगळंच.... तिकडे गाडीत अनु आईच्या मिठीत शिरून रडत होती.. तिचे बाबा तिला थोपटत होते... फक्त... रिक्षेत गट्टूबरोबर बसलेल्या श्रीनिवासच्या डोळ्यात मात्र आसवे नव्हती.. कोरडे ठण्ण होते डोळे.. कसलेच भाव नव्हते...

भाजीराम मंदीर आले...

श्री पुटपुटत होता सवयीने...

"राम लक्ष्मण जानकी... जय बोलो हनुमानकी...."

विजेचा धक्का बसावा तसे ते पुटपुटणे हादरवून गेले महेशला! त्याने डोळ्यांच्य कोपर्‍यातून बाबांकडे पाहिले..

शाळेत सोडतानाचीच सगळी गाणी ते म्हणत होते... पण पुटपुटत... शुन्यात बघत.. केस पांढरे होत असले... चेहरा सुरकुतलेला... शरीर थकलेले.... महेशने तोंडच फिरवले....

"खरा तो एकची धर्म.... जगाला प्रेम अर्पावे..."

लकडी पूल.. ! इथेच अर्चनाचे बाबा तिला सायकलवर बसवून आपल्या बाबांना गाठून पुढे जायचे....

"ज्याचीया स्मरणे पतीत तरती... तो शंभू सोडू नको...."

संपला लकडी पूल... गरवारे शाळा, अभिनव शाळा, गरवारे कॉलेज... सगळे डावीकडेच राहिले.. मागे मागे गेले...

विमानतळावर अतुल्य घाई झाली..

"आतमध्ये येऊन काही उपयोग नाहीये बाबा.. दिसतच नाही काही.. तुम्ही सगळेच निघा.."

बाबांच्या पाया पडून त्यांना मिठी मारताना गट्टू म्हणाला.....श्रीनिवासच्या तोंडातून एकच वाक्य बाहेर पडू शकले...

"गट्टू.... ये हं परत?? यायचंच नाही असं.... नको करूस हं????"

============================================

कॉर्पोरेशनपाशी बसमधून उतरलेल्या श्रीनिवासचे पाय सवयीने वाड्याकडे वळले तरी त्याला क्षणातच वाड्यात जाण्याचा फोलपणा जाणवला...

'कशाला जायचे?? आणखीन आठवणी येणार... मावशी रडणार.. पिट्या रडणार... वहिनी रडणार...त्यापेक्षा... जरा इथेच बसू... पण.. पण.. आता आपण... आता आपण काय करायचे आहे?? काहीच अनाही?? म्हणजे?? माझा अवतार फक्त या मुलासाठीच होता?? बाकी काहीच अर्थ नाही माझ्या जीवनाला??? नाही.. निदान हातपाय हलतायत तोवर मन रमवण्यासाठी नोकरी तरी करूयात...'

चालत चालतच बर्गेंकडे गेला श्री! राजन बर्गेंचा मुलगा आता बिझिनेस सांभाळायचा! लहानपणी पेंढारकरकाकांना अनेकदा पाहिलेल्या सुशांतने श्रीचे खूप चांगले स्वागत केले.

श्री - बाबा कसे आहेत?
सुशांत - मस्त....
श्री - मला...
सुशांत - बोला ना काका.. आज एकदम इथे??
श्री - नाही म्हंटलं... मोकळाच आहे... जॉब...
सुशांत - ... अच्छा अच्छा...
श्री - काही आहे का... मी करू शकेन असं काम??
सुशांत -... खरं सांगू का काका.. तुम्हाला नाही म्हणताच येणार नाही मला.. पण... आता सगळी रेकॉर्ड्स असतात कंप्युटरवर... सगळं फास्ट झालंय आता... आता जुन्या लोकांना काही ते जमत नाही.. पण...

श्री खाली मान घालून निघाला..

'खरंच की... जुने झालो आता आपण... आपल्याला काय कळतंय काँप्युटरमधलं?? .. ऑनसुद्धा करता येणार नाही.. जाउदे चला.. घरीच जाऊ... स्वाती.... तेव्हा जर स्वातीशी... लग्नं केलं असतं तर... जाउदे... आपण रमाशी एकनिष्ठ राहिलो... म्हणून तर ती आपल्या कानात कुबुजते..."

श्री घरी आला. प्रमिला धावली. तिने चहा करून दिला.

त्या रात्री रमाचा फोटो आणि डबलडेकर छातीशी धरून कसाबसा झोपला श्रीनिवास....

================================================

एक वर्षांनी सिनसिन्नाटीच्या एका टुमदार घरातील संवाद...

महेश - यू आर सिंपली इंपॉसिबल.. यू जस्ट वॉन्टेड टू फ्लाय हिअर... तुला काहीही करायला नको असते.. मी आत्ता आलोय्...आणि साधा चहाही करत नाहीयेस तू???

अनु - प्लीज स्टॉप हॅरॅसिन्ग मी... चहाचे मशीन आहे.. आय अ‍ॅम वर्किंग....

महेश - यू... यू आर नॉट वर्किंग... यू आर चॅटिंग विथ दॅट ब्लडी अनुराग... कोण आहे तो?? आहे कोण तो अनुराग??

अनु - अनुराग?? ती स्त्री आहे....इंडियात असते... आम्ही चॅटिंगवर मैत्रिणी झालोयत...

महेश - अनुराधा... आय ... आय कान्ट बिलीव्ह दॅट... हाऊ कॅन ही से... ही लाईक्स यू... नॉट इव्हन सीन यू एव्हर...

अनु - ती बाई आहे.. हजारदा सांगीतलंय मी तुला...

महेश - बाबांचे म्हणणे खरे होते... आय शूड नॉट हॅव फ्लोन ओव्हर हिअर...

अनु - हे डबडं वाजतंय ते उचल..

महेश - तुझ्याजवळ आहे ना फोन??? तूच उचल ना मग???

अनु - उचलला असता... पण त्या नालायक दारुड्याचाय तो नंबर... म्हणून घेत नाहीये...

महेश - समीरदादा?????

महेशने उडी मारून घाईघाईत फोन उचलला...

महेश - हलो...

समीर - म्हशा....

महेश - ... दादा??? .. बोल... काय रे???

समीर - .. म्हशा... तुझे... ..... बाबा....

महेश - .....

समीर - .......

महेश - ........

समीर - .......

महेश - ... गे... गेले??????

समीर- ..... हं......

महेश - ..... क्...कस्...कशाने????

समीर - ..... अ‍ॅटॅक......

महेश - .......

समीर - .... .. हॅलो...

महेश - ... दादा....

समीर - ..... बोल...

महेश - ...... तुम्ही.... उ...उरकून घ्या... मला .. पुढच्या महिन्यात रजा मिळू शकते.....

=========================================

स्मशानात नांव नोंदवताना तिथल्या माणसाने विचारले..

"तुमचे कोण होते हे???"

समीर - होते नाही.... आहेत....

श्रीनिवास पेंढारकर .... एक .... बाप......!!!!!!!

===========================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

एक उत्तम कादंबरी .
Ur Writing skill is very nice...... when I read this I feel it is happening in my front. After every chapter (part) end, I am eagerly waited for new chapter.
Very nice story........

बेफिकिर फारच touching कथा होति. सगळ्या कथा वाचून तुम्हाला सलाम. हि कथा फारच आतुन आल्याने आणी आपल्या जवळपास अशइई उदाहरणे बघित्ल्याने वास्तव्वादि वाट्ली.

परेश केंद्रे - एका प्रतिसादात आपण कादंबरीतील कित्येक प्रसंग रिकलेक्ट करून उल्लेखलेत यावरून आपण ध्यान देऊन हे कथानक वाचत होतात हे लक्षात आले व मूठभर मांस चढले अंगावर! मी आपल्या आवर्जून दिलेल्या सर्व प्रतिसादांसाठी व प्रोत्साहनासाठी आपले आभार मानतो.

मोनालिप - धन्यवाद!

प्रसाद गोडबोले - आपले मनापासून आभार! आपण दोघेही समविचारी आहोत असे मला बरेचदा जाणवते. आपले भेटणे राहिलेच आहे.

अर्चु - धन्यवाद!

तृप्ती - खरेच आहे. महेशसारख्यांना बाप झाल्यावर ते दु:ख काही प्रमाणात तरी भोगायला लागावे असे मलाही वाटते. ज्यामुळे त्यांना निदान स्वतःच्या बापाच्या मानसिक वेदनांची नुसती जाणीव तरी होईल. आपण म्हणालात त्या प्रमाणे खरोखरच मला 'महेश पेंढारकर - एक दुर्दैवी मुलगा' असे कथानक लिहावेसे वाटत आहे.

मनःस्विनी - आपल्याला सर्व भाग बहुधा माझ्या 'पाउलखुणा'मधे मिळावेत. धन्यवाद!

नंदन - आभारी आहे.

सनि १९८२ - मनापासून धन्यवाद! आपल्याला कथानक प्रत्यक्ष जीवनाशी निगडीत असल्याचे जाणवले याचे श्रेय मी स्वार्थीपणाने माझ्याकडे घेतो, पण तरीही आपल्या उदार प्रतिसादांचे ते यश आहे याची जाणीव आहे.

भागवत - आपला प्रतिसाद बहुधा मी प्रथमच पाहिला. मनःपुर्वक आभार आपले.

राधिका - खूप खूप आभार! कथानक आपल्याला आवडले हे पाहून खूप आनंद झाला.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

सॉरी शेवटचे बारा भाग काल आणि आज दोन दिवसांत वाचले.. प्रोजेक्टमध्ये गुंतलेय... त्यातच गणपतीच्या सुट्ट्या... माबोवर कित्येSSSSक दिवसांनी अवतरले...

ही कादंबरी चालू झाल्यावर मागे म्हटल्याप्रमाणे मी तुमच्या इतर कादंबर्‍यांपेक्षा या कादंबरीमध्ये जास्त गुंतले होते. त्यामुळे कादंबरी संपताना तुमच्याइतकंच वाईट वाटत होतं... वाईट वाटलं शेवट वाचून ... पण रिअ‍ॅलिस्टिक होता...

सगळी पात्र तुम्ही ब्लॅक शेड न रंगवता ग्रे रंगवलीत... परिस्थितीमुळे नकळत हार्श वागणारी... (उदा: समीरच्या काळवंडत चाललेल्या पात्रालाही अचानकपणे चांगुलपणाची सुखद पांढरी शेड मिळाली) त्यामुळे कथा जास्त भिडते आणि प्रत्येक पात्राला योग्य न्याय दिल्यामुळे ही फक्त श्री ची गोष्ट वा बापाची गोष्ट राहत नाही.. प्रत्येक पात्र लक्षात राहण्याइतपत ठसठशीत आणि वेगळं झालंय... त्याच्या स्वभाववैशिष्ट्यांसकट!

नातेसंबंध, जिव्हाळा, संस्कार... फार छान वर्णन केला आहे.

तुम्ही स्वतःला डोळ्यासमोर ठेऊन वर्णन केल्यामुळे त्या कथेत जान आली आहे, जिव्हाळ्याचा ओलावा आला आहे...

आपले रूट्स (मूळ संस्कार) विसरून, नातेसंबंधात कर्तव्याचा (कधी कधी तर त्यालाही काट दिली जाते चांगल्या प्रॉस्पेक्टस साठी!) कोरडेपणा आणून आपण राजाराणीचा संसार फुलवण्याच्या नादात धावून येवढे पुढे येतो की 'आपली माणसे' दृष्टीच्या टप्प्यातूनही हरवतात... कदाचित... कायमचीच!

खरंच करियरिस्ट होताना आपल्याला एवढा कोरडेपणा आलाय का की गेलेला माणूस परत येणार नाहीये मग कार्यासारख्या औपचारिकतेसाठी सुट्टी टाकून प्रोजेक्ट्ची वाट का लावा असा व्यवहारी विचार केला जातोय?

ही कादंबरी सर्व मुलामुलींनी वाचणे जरूरी आहे... भूतकाळातील चूका भविष्यात होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी! न जाणो तुमच्यामधील गट्टू कधी महेश श्रीनिवास पेंढारकरमध्ये बदलेल....

बेफिकीर, __/\__

लिहीत राहा...

स्वप्नसुंदरी,

आपला प्रतिसाद अत्यंत सुरेख आहे. खरे तर कादंबरी लिहीताना मीही एवढा विचार केलेला नव्हता. आपल्यालाही नमस्कार!

निंबुडा,

आभारी आहे. मी प्रशासकांना विनंती केली होती तशी! पण कदाचित त्यात काही अडचणी असतील. म्हणून मीच आज सगळे भाग एकत्र करून नवीन धाग्यात प्रकाशित करायचा विचार करत आहे.

आपण दखल घेतलीत याचा खूप आनंद झाला.

-'बेफिकीर'!

पहिले १५ भाग लेखमालिकेत सापडतील. [इथेच वरती आहे लेखमालिकेचा दुवा]
http://www.maayboli.com/node/17839

पुढच्या भागांसाठी :
२५ ते ३५ : इथे पहा.
१९ ते २४: इथे पहा.
१५ ते १८: इथे पहा.

नंदन,

अनेक आभार आपले! पण माझ्या सदस्यत्वाच्या धाग्यावर मी गेल्यावर मला 'लेखन' हा प्रकार सापडतच नाही आहे.

कृपया सांगू शकाल का हाऊ कुड आय रीच देअर?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

श्री निलेश म्हस्के,

http://www.maayboli.com/gulmohar/marathi_kadambari?page=8

या पानापासून ते

http://www.maayboli.com/gulmohar/marathi_kadambari?page=5

या पानापर्यंत सध्या ती संपूर्ण कादंबरी आहे.

धन्यवाद!

श्री नंदन,

आपलाही आभारी आहे.

-'बेफिकीर'!

तुम्ही अशक्य आहात ... म्हणजे चांगल्याच अर्थाने.. या कांदबरीतून शिकण्यासारखं खूप आहे.. महत्वाच म्हणजे आपल्यावर फक्त संस्कार होऊन चालत नाही तर आपल्याला ते संस्कार ल़क्षात ठेऊन ते जपता आले पाहिजेत, तरच आपण माणूस म्हणून जगायला लायक ठरू.

धन्यवाद जान्हवी! लोभ असू द्यावात!

===========================

मीही काहीतरी चांगल्याच अर्थाने लिहीत आहे.

आपण दोन वर्षे मायबोलीवर आहात यासाठी वेगळे धन्यवाद! अन्यथा हा माझा ड्यु आयडी समजला गेला असता.

-'बेफिकीर'!

befikir .....

Tumchya lekhan pratibela manacha mujara lavun SALAMMMM...

Kay apritam kadambari aahe... kharokhar vachtana anekh prasang jasechya tase dolyasamor ubhe rahun dolyat aksharash paani aantat hech tumchya lekhniche samartha...

mi maaybolivar navin sabhasad aahe tyamule mala marathit pratikriya detana avghad jaat tymule kshama aasavi

Baki tumhla manapasun subhachyya...

Sam

प्रिय बेफिकिर,

मी तुमच्या सर्व कथा वाचल्या आहेत.....

तुम्ही खरेच खूप खूप छान लिहिता....

तुमची कथा श्रीनिवास पेंढारकर - एक बाप खूप आवडली....

मनाला स्पर्श करुन आणी चटका लावून गेली....

ऊशीरा प्रतिक्रिया दिल्या बद्दल क्षमस्व...

असेच लिहित राहा...पुढील लिखाणासाठी हार्दिक शुभेछा.....

बेफिकीरजी प्रसिद्ध हस्तरेखा तज्ञ श्री कटककर ( रहाणार प्रभात रोड, पुणे ) हे तुमचे कोण लागतात? सॉरी त्यांचे पूर्ण नाव माझ्या खरच लक्षात नाही. त्यांचे काही अनूभव मी वाचलेत, त्यांचा ज्योतिष्याचा अनूभव दांडगा आहे.

बेफ़िकिरजी,

काय लिहावे कळतच नाही मला. एक तर इतकी सुंदर कादंबरी लिहिली आहात की बोलायची सोय नाही.

नविन ID म्हणुन दुर्लक्ष करु नका. ही एक सोडली तर तुमच्या इतर सर्व कादंबर्‍या मी वाचल्या आहेत. काही कारणास्तव मधे तुमचे लिखाण दिसत नव्हते तेव्हा माझे याचे २ च भाग वाचुन झाले होते. आणि निव्वळ याच कादंबरी मुळे मला सभासदत्व घ्यायला भाग पडले! (चांगलंच झालं म्हणा!) तरीही वाचायला मिळालीच नव्हती. असो! गेल्या ३ दिवसांत वेळ मिळेल तेव्हा अक्षरश: झपाटल्यासारखी वाचुन काढली!

Hats off to you!

खुपच भावली मनाला.
धन्यवाद ही परत वर आणल्याबद्दल!

नमस्कार बेफिकीरजी....!
माझा माबो वरचा हा पहिलाच प्रतिसाद....
फारच अफाट.. अचाट ... भयानक सुंदर म्हणजे काय याचा अनुभव तुमचा लिखाण वाचताना क्षणोक्षणी येतो.....
आपले आत्तापर्यंत चे जवळपास सर्वच लिखाण मी वाचलेले आहे.... !
आयुष्यात पहिल्यांदाच शब्द न सुचणे अनुभवतोय...
बाकी अजून काय बोलू....
"शब्दांचा प्रवास हा असाच चालू द्या.....
आमची अंत:करणे अशीच मुळापासून हलू द्या....
आमच्या दु:खाच्या व्याख्या अगदी बदलून जाऊन...
दुसरयांच्या दु:खाला आमच्या काळजामध्ये सलू द्या.....!"
भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य देवो....!

सखी माउली व विद्यासुत, आभारी आहे. लोभ कायम ठेवा. (खरंच) नवीन असलात तर स्वागत. (खरंच हा शब्द मनाला लावून घेऊ नका, तो माझ्या नसानसातून आपोआप लिहिला जातो)

-'बेफिकीर'!

आई ग!!!
एवढेच शब्द निघाले शेवट्चा भाग वाचुन झाल्यावर...

मनावर परिनाम होनारे लेखन आहे तुमचे...

'कादंबरी हातावेगळी करताना मेल्यासारखे वाटत आहे.. '

खूप मनस्वीपणे केलेले लिखाण! त्यामुळेच आर्ततेच्या पातळ्या गाठणारे.डोळ्यात पाणी आणणारे. पण आज अनेक गट्टू अन त्यांच्या बापांमधला भावबंध ट्रॅजिक असूनही वेगळा असू शकतो,या कथेत न चितारलेल्या त्या मितीही जाणवत राहिल्या. अर्थात विषयच मोठा आहे हा.

तुमचा आवाका अन झपाटाही कमाल आहे. मनोगतातली ती कविता कोणती कळले नाही..शुभेच्छा.

खुप सुन्दर लिहिता तुम्ही ..... अतिशय आवडली ही कादंबरी.....
माझेही डोळे पाणावले.... अतिशय वास्तववादी चित्रण......... प्रत्येक प्रसंग सुन्दर!!!!!

Pages