गणेशोत्सव कार्यक्रम २०१० - कथाबीज - ३

Submitted by संयोजक on 4 September, 2010 - 01:27

2010Mb_Kathabij_Poster3.jpgकार्यक्रमाचे नियम :
१. हा कार्यक्रम आहे, स्पर्धा नाही याची कृपया नोंद घ्यावी.
२. हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांसाठीच आहे.
३. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
४. दिलेल्या मुद्यांना कथेत गुंफून लघुकथा लिहिणे अपेक्षित आहे. शब्दमर्यादा ५०० शब्द.
५. प्रत्येक विषयासाठी दिलेले सर्व मुद्दे कथेत ठळकपणे येणे आवश्यक आहे.
६. यात एक व्यक्ती कितीही वेळा मुद्यांना अनुसरून वेगवेगळ्या प्रकारे कथा लिहू शकते. फक्त ते करताना सलग दोन अगर अधिक प्रतिसाद लिहू नयेत.
७. या कार्यक्रमासाठी दर तीन दिवसांनी मुद्यांचा एक संच दिला जाईल.
८. या कार्यक्रमासाठी विषय जाहीर झालेल्या दिवसापासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत लघुकथा लिहु शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

गारेगार लहानपण
-------------

"बाबा किती घाईनं चालातोयास रं? जरा सावकाशीनं चाल कि." डोक्यावर गाठोडं घेऊन घाईघाईत जाणाऱ्या भैरूच्या मागे मागे धावताना सम्या दमून गेला होता.

"आरं, आधीच उशिरा निघालोया घरातनं. लवकर नाय पोचलो तं दुकान पसरायला जागा बी गावायाची न्हाय बघ."

भैरू बाजाराच्या दिवशी आपलं गाठोडं घेऊन जायचा कापडाचं दुकान लावायला. सम्या खरंतर शाळेत ३रीच्या वर्गात जायचा जमेल तेव्हा, पण सुट्टीच्या दिवशी बाबाबरोबर बाजाराला जायला लागायचंच त्याला. मग त्या दिवशी खेळायला मिळायचं नाही म्हणून त्याला अज्जिबात आवडायचं नाही. आजतर तालुक्याचा बाजार होता.

भराभरा चालत दोघे बाजाराच्या ठिकाणी पोचले तर आधीच सगळ्या ठेल्यावाल्यांनी जागा पटकावल्या होत्या. आता उरलेल्या जागेतली बऱ्यापैकी जागा निवडून भैरूने चादर पसरून कापडं नीट मांडून ठेवायला सुरुवात केली. अजून गिऱ्हाईकं यायला वेळ होता म्हणून सम्या इकडे तिकडे बघत बसला. आजची जागा नेहेमीची नसल्याने समोर सगळे नवीन गाठोडीवाले होते. तेवढ्यात सम्याच्या समोरची जागा एका मोठ्या हातगाडीवाल्याने घेतली. हातगाडीवरची आईसक्रीमची चित्र बघून आणि 'थंडगार गारे गार' अशी पाटी वाचून सम्या मनातल्या मनात तो पदार्थ कसा लागतं असेल याचा विचार करायला लागला.

हळूहळू लोकं यायला सुरुवात झाली आणि भैरुने सम्याला कामाला लावलं, सम्याचं काम म्हणजे ओरडून ओरडून बाबाच्या दुकानाची जाहिरात करायची. "कापडं घ्या, कापडं! लई भारी कापडं!!" सम्याने आपलं काम चालू केलं तरी एक डोळा त्या हातगाडीवरच होता. आजूबाजूची पोरं आईबाबा बरोबर येऊन आईसक्रिम खाताना बघून हे लहान मुलांनी खायचं काहीतरी छान आहे हे त्याला कळायला लागलं होतं. येणारा नवीन पोरगा कोणत्या रंगाचं आईसक्रीम खाणार याचा अंदाज त्याच्या मनाने लावायला सुरुवात केली. "गार म्हंजी कसं आसल? सावलीवाणी का हिरीच्या पान्यावानी?" सम्याच्या नकळतच त्याचे मन तिथे जात होतं . मध्येच "कापडं घ्या, कापडं! गारे गार कापडं!!" अस ऐकल्यावर भैरुने झापलाच सम्याला.
"काय रं? काय इकतोयास? गारेगार कापडं आणली व्हय तुज्या बान?"
चमकून आपली चूक दुरुस्त करून सम्या परत एकदा ओरडायला लागला. दुपारी आणलेली भाजी भाकरी खातानाही त्याला ते "आईस्क्रीम भाकरीवानी थंड आसल का?" असा प्रश्न पडला होता जो भैरू पर्यंत पोचलाचं नाही.

संध्याकाळ व्हायला लागली तसं जत्रेतली लोकं कमी झाली आणि आपापली गाठोडी बांधून दुकानदारही घरच्या वाटेला लागायला लागले होते. भैरुनेपण आपली कापडं नीट घड्या घालुन गाठोडं बांधायला सुरुवात केली. आज फारसा धंदा झाला नव्हता. आता दुसऱ्या गावातला पुढचा मोठा बाजार महिन्याभराने होता आणि आजची कमाई जेमतेम वीस दिवस जातील एवढीचं होती म्हणून तो जरा चिंतेतच होता. आणि सम्या अजूनही त्या आईसक्रीमच्या गाडीकडेच बघत होता.

गाठोडं डोक्यावर घेऊन मागन भैरू आला तरी त्याला कळलंच नव्हत.
"काय रे सम्या, काय बगतोयास तिथं?"
लहान असला तरी आपल्याला असलं काही घेता येणार नाही हे सम्या ला माहीत होतं म्हणून तो काहीच उत्तर न देता घराच्या दिशेन निघाला.
तसा भैरू खाली बसला आणि म्हणाला "ते थंडगार खायचं नव्हं तुला? सकाळधरनं बगून रायलोय म्या." आणि मग पुढे होऊन दोन रुपयाचं ते थंडगार विकत घेणाऱ्या आपल्या बाबा कडे सम्या अविश्वासाने बघतच राहिला.

तो छोटासा काडीला लावलेला थंडगार गोळा बाबाच्या हातातून घेताना सम्या हरखून गेला होता. भैरू काहीच न बोलता थंड थंड गोळा चाटणारया आपल्या पोराच्या डोळ्यातला आनंद भान हरपून बघतच राहिला.
तेवढ्यात "बाबा तू बी खा कि थोडं. लई गार वाटतं बघ" अस म्हणत सम्याने तो थंडगार गोळा भैरूपुढे धरला.
आणि पुढच्या महिन्याभराच्या चिंता सोडून भैरूसुद्धा सम्या एवढा तिसरीला पोरगा होऊन लहानपण जगायला लागला.

अशा प्रकारची कथा लिहायचा माझा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे सांभाळुन घ्या. चुका असतील तर दाखवुन द्या. अशी भाषा सुद्धा मला जमली नाहिए पण तरीही कधीतरी पहिला प्रयत्न करायलाच हवा. Happy

हरवले ते गवसले!
---------------------------------------------

''नील, रस्त्याने माझा हात धरूनच चालायचं, इकडे-तिकडे हात लावायचा नाही, कळलं?'' संजनाने पाच वर्षांच्या नीलला समजावून सांगेपर्यंत तो गाडीचा दरवाजा उघडून ''मम्मा, चल ना लवकर!''चा गजर करायला लागला होता.

आज मंगळवार. आजारी मावशीला तिच्या गावी भेटायला जाताना संजनाच्या डोक्यात तो दिवस गावच्या बाजाराचा हे लक्षातच आले नव्हते. पर्यायाने, मावशीच्या घराकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हातगाड्या, फेरीवाले, पथारी पसरून बसलेले विक्रेते, जनावरे आणि खरेदी करायला आलेले ग्राहक यांच्या गर्दीला कंटाळून संजनाने गाडी बरीच अलीकडे उभी केली होती. तिथून आता तंगडतोड करतच मावशीच्या घरी जावे लागणार होते.

छोट्या नीलचे टपोरे डोळे गावातला तो अनोखा बाजार बघताना अजूनच गोल झाले होते. मोठ्या उत्सुकतेने तो कधी हरभरा, रानमेवा, पेरू-बोरं विकायला असलेल्या हातगाड्या न्याहाळत होता, कधी पिपाण्या-फुगे-भिरभिर्‍यांच्या स्टॅन्डकडे मान वळवून वळवून बघत होता, तर कधी रंगीबेरंगी खडे - दगड- काष्ठौषधी विकणार्‍या माणसाच्या लांबच लांब जटांकडे चकित नजरेने एकटक पाहत होता. प्रत्येक पावलाला त्याला एका वेगळ्याच जगाचे दर्शन होत होते. इथल्या वस्तूंच्या आणि परिसराच्या सच्च्या रंगांपुढे, नानाविध गंध व गडद रूपापुढे त्याला अनोळखी गर्दीही ओळखीची वाटू लागली होती. सवयीचे चकचकीत सुगंधी मॉल्स व तेथील अत्याधुनिक खेळण्यांची दुकाने, फास्ट फूड चेन्स विस्मरणात गेले होते. प्रत्येक पावलागणिक त्याला आपल्याबरोबर पुढे खेचून नेताना संजनाचा हात मात्र दुखू लागला होता.

''ऑ, मम्मा, वाट्स दॅट स्मेल?'' नीलने रस्त्यात मधोमध पडलेल्या शेणाच्या सड्याकडे व त्यावर घोंघावणार्‍या माश्यांकडे बघत नाक मुरडून विचारले. लेकाला तळपत्या उन्हात, खांद्यावरच्या जड पर्सचे ओझे सांभाळत, गर्दीतून वाट काढत, धूळ भरल्या रस्त्यावरून नेताना एवढा वेळ वैतागून चालणार्‍या संजनाच्या चेहर्‍यावर तिच्याही नकळत बारीकसे स्मित उमटले.
'' ते गायीचे किंवा म्हशीचे शेण आहे रे बाबा, आणि तो वास त्याचाच आहे! कळलं? आता चला पुढे.... मावशी आजीकडे पोचायचं आहे ना लवकर? आणि आजीकडे कसलाही हट्ट करायचा नाही! ओके?" संजनाच्या सूचनेसरशी नील हळूच ''ओके'' पुटपुटला खरा, पण एव्हाना त्याचे लक्ष समोरच्या आइसक्रीम विकणार्‍या गाडीवर खिळले होते. त्याने विचारलेही, ''मम्मा, आइसक्रीम???'' मानेवरून घामाचे ओहोळ पुसत संजनाने ''नॉट नाऊ! आपण घरी जाताना घेऊ हा तुला आइसक्रीम!'' म्हणून चुचकारल्यावर छोटा नील पुन्हा गप्प झाला. त्याचे लुकलुकते उत्सुक डोळे मात्र त्या आइसक्रीमच्या गाडीवरची रंगीबेरंगी सजावट, टांगलेले कोन, गाडीवरची घंटा, तेथील लहान मुलांची गर्दी आणि हसत-खेळत त्या मुलांना आइसक्रीम देणारा माणूस यांना टकमका न्याहाळत होते.

संजनाची पावले नीलला त्या गाडीपासून दूर न्यायच्या प्रयत्नात एका कपड्याच्या दुकानासमोर थबकली. दुकानाच्या बाहेर चुटुक गुलाबी रंगाचा, झालरी-झालरींचा, फुग्याच्या बाह्यांचा एक फ्रॉक अडकवला होता. त्याच्याकडे पाहिल्यावर तिला नकळत आपले लहानपण आठवले. एका वाढदिवसाला तिला अगदी असाच फ्रॉक हवा होता. घरी बाकी कोणी तिच्या त्या हट्टाला जुमानले नव्हते, पण मावशीने आठवणीने तिच्यासाठी घरीच अगदी तसाच फ्रॉक शिवला होता. संजना तो फ्रॉक घालून इतकी खूश झाली होती की पुढचे चोवीस तास तो फ्रॉक घालून सगळीकडे मिरवत बसली होती.

न राहवून संजनाने दुकानदाराकडे त्या फ्रॉकची चौकशी करायला सुरुवात केली. एव्हाना नीलने अलगदपणे आपला हात तिच्या हातातून सोडवून घेतला होता. दुकानदाराने आपल्याकडे नवा आलेला काही खास कपड्यांचा 'स्टॉक' संजनाला दाखवायला सुरुवात केली.... आणि एरवी ठराविक उंची, महागड्या ब्रँड्सच्या कपड्यांबद्दल आग्रही संजना त्या रंगीबेरंगी, चमचमत्या, तलम-मुलायम वस्त्रजगतात पार हरवून गेली. खणाचे परकर-पोलके, नक्षीचे जाकिट, काठापदराची कल्पना साडी, नाडीचे धोतर.... वस्त्रांच्या एकेक पदरासरशी तिचे बालस्मृतींचे पदर उलगडत होते. नजरेसमोर दोन वेण्या घालून त्यांना रिबीन बांधायचा हट्ट करणारी चिमुकली संजना येत होती. चिमणीच्या दाताने पेरू खाणारी, रस्त्यावर विकायला असलेल्या बांगड्या-टिकल्यांच्या विश्वात तासन् तास रमणारी.... तोंड-हात-पाय चिकट झाले तरी समरसून 'बुढ्ढीके बाल'चा समाचार घेणारी..... कपड्यांच्या तलम पोतावरून हात फिरवताना तिचे मनही मृदू मुलायम आठवणींनी मऊसूत होत होते. शेवटी न राहवून तिने नीलसाठी नाडीचे धोतर आणि एक चिमुकला झब्बा खरेदी केलाच!

अचानक संजनाला बराच वेळ नील आपल्या बाजूला उभा नाही ह्याचे भान आले! क्षणभर तिचा आईचा जीव घाबराघुबरा झाला. पण मग तिची नजर दुकानाबाहेरच्या आइसक्रीमच्या गाडीकडे गेली आणि चिंतेने आक्रसलेला तिचा चेहरा पुन्हा एकदा सैलावला. नील बाहेर त्याच्या नव्या दोस्तांसोबत आइसक्रीमच्या गाडीला लोंबकळत उभा होता. त्याच्या चिमण्या नजरेत तेच ते संजनाच्या बालस्मृतीत दडलेले परिचित औत्सुक्य, नवल दाटले होते. विक्रेत्याने त्याच्या चिमुकल्या हातात आइसक्रीमचा कोन ठेवल्यावर मात्र त्याची नजर आपल्या मम्माच्या चेहर्‍यावर स्थिरावली. त्याच्या मूक प्रश्नावर मान डोलवून त्याला आइसक्रीमसाठी संमती देत संजना पुन्हा एकदा स्वतःशीच हसली आणि तिने उत्स्फूर्तपणे हाक मारली, ''आइसक्रीमवाले दादा, माझ्यासाठीही एक आइसक्रीम कोन बनवा बरं का!'' तिच्या हसर्‍या चेहर्‍यावर हरवले ते गवसल्याचे समाधान झळकत होते!

सावली, कथा आवडली. प्रयत्न चांगला आहे. Happy

समीरने उत्तम प्रकारे केलेल्या जाहिरातीचं बक्षिस म्हणून भैरू प्रपंचाची चिंता भेडसावत असतानाही त्याला आईसक्रिम घेतो असा मुद्दा घालता आला असता हे माझं मत Happy

अकु, कथेचं शीर्षक आणि कथेतल्या पात्रांची नावं वाचून गाडीवरचं आईसक्रिम आणि हायजिन, गर्दीचा निषेध, रांगड्या वातावरणाला विरोध वगैरे मुद्दे येतील असं वाटलं होतं. स्पष्ट लिहितेय, रागवू नकोस पण मुद्दे ओढून ताणून जुळवल्यासारखे वाटले.

हा हा हा, मंजूडी, ही लघुकथा मी इतक्या वेळा उठत-बसत लिहिली आहे की ती पूर्ण झाली हेच नवल! (लिहून झाल्या झाल्या ती पोस्ट केली, न जाणो पुन्हा नवा व्यत्यय आला तर!!) लिहायचा प्रयत्न तरी केलाय! Wink

आशूडी ,आऊटडोअर्स ,हिम्सकूल,चिंगी,मंजिरी धन्यवाद

मंजूडी, तुझी कल्पना चांगली आहे. पण भैरुच्या जगात मुलाने बापाला मदत केली तर त्यात बक्षीस देण्यासारखे काही असेल असं वाटत नाहि. शिवाय बक्षिस जर दिले तर भैरु शेवटी पैशाचा आणि त्याच्या धंद्याचा विचार करतोय , त्याचा धंदा चांगला झालाय म्हणुन मुलाला आइसक्रिम देतो अस काहिस झालं असतं. पण मला "भैरू गरिब असला तरी त्याला मुलाच्या भावना कळताहेत. सम्याची मदत घेणे अपरिहार्य आहेच पण तरी जमतील तसे त्याचे लाड करता यावेत अशीहि भैरुची इच्छा आहे. सम्या तसा शाळेतही जातोय. आणि सर्वात शेवटी ते मुलाचे लाड पुरवलेले आहेत म्हणुनच भैरु सुद्धा सम्याबरोबर तेवढाच लहान होऊन ते एंजॉय करतोय" असं काहीसं दाखवायचं आहे. ते सगळं तसच्या तसं कथेत उतरलं नसेल तर बहुतेक परत लिहायला हवी Happy

अरुंधती छान कथा आहे. हो मलाही ते हाय्जीन मुद्दे येतील असे वाटले होते. पण कथेने वेगेळंच वळण घेतल Happy

सावली कथा आवडली Happy

अकु कमाल आहे तुझी, इतक्या वेळा आळशी पणा न करता कथा परत परत टायपत पुर्ण केलीस Happy मला खरच पुन्हा पुन्हा टायपायचा प्रचंड कंटाळा आहे. बाकी मलाही थोडस सावली आणि मंजुडी सारखच वाटल.

सावली, अरु़ंधती - मस्त कथा. ह्या जत्रेत जायला आपल्याला आवडेल बुवा Happy कल्पना साडीचा उल्लेख किती दिवसांनी आला. Happy

गणेशोत्सव २०१० अंतर्गत घेतलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आभारी आहोत.