कलात्म

Submitted by चिनूक्स on 9 August, 2010 - 02:06

कोणे एके काळी 'कला' या शब्दाला काही एक अर्थ होता. मान होता. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला यांना सरकारदरबारी आश्रय होता. कालांतरानं परिस्थिती बदलली. अभिजात कलांना कोणी विचारेनासे झाले. एखाद्या कलेची साधना करणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं, असा विचार केला जाऊ लागला.

त्यातच शिक्षणपद्धती बदलली. मळलेल्या वाटेवरून जाणं श्रेयस्कर ठरू लागलं. चाकोरीबद्ध आयुष्य जगण्यातच धन्यता मानणारा समाज निर्माण झाला आणि कलेचा आनंद घेणं म्हणजे काय, हेच आपण विसरून गेलो. कलेमुळे जीवन समृद्ध होतं, ही कल्पनाच मागे पडली.

महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार श्री. संजय आवटे यांच्या माइंड अ‍ॅन्ड मीडियानं 'कलात्म' या अंकाची निर्मिती केली आहे. कला-संस्कृती-शिक्षण यांचा वेध घेणार्‍या या अंकाचे दोन भाग आहेत. अतिथी संपादक आहेत डॉ. श्रीराम लागू. संजय आवटे यांनी अंकाचं संपादन केलं आहे.

'ऐल' आणि 'पैल' अशी या दोन भागांची नावं आहेत. चुकीच्या वाटेनं गेलेली भारतीय चित्रकला आणि त्याचे भोगावे लागणारे परिणाम, या विषयावर ज्येष्ठ चित्रकार श्री. रवी परांजपे यांचा लेख 'ऐल'मध्ये आहे. महाराष्ट्रातील एकूण सांस्कृतिक घडामोडींचा आढावा डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी घेतला आहे. 'महाराष्ट्रातील संगीतकलेचा रागरंग' हा राजेंद्र मणेरीकर यांचा लेख महाराष्ट्रातील सांगीतिक वातावरणात बदल कसे घडवून आणता येतील, याचा वेध घेतो. तरुण संगीत अभ्यासक चैतन्य कुंटे यानं महाराष्ट्रातील सांगीतिक परंपरेचा आढावा घेतला आहे. उदयन इंदूरकर यांचा 'इथे दगडही झाला जिवंत' हा अप्रतिम लेख महाराष्ट्रातील लेणी व त्यांतील शिल्पकला यांच्याबद्दल सुरेख माहिती देतो. सुधीर नांदगावकर व अरुणा अन्तरकर यांनी महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीचा आढावा घेतला आहे. श्यामला वनारसे यांनी चित्रपटकलेच्या शिक्षणाबद्दल मतं मांडली आहेत. जे. जे. कला महाविद्यालयाच्या डीन डॉ. मनीषा पाटील यांची मुलाखतही लक्षवेधी आहे. गुरु-शिष्य परंपरेविषयी प्रियदर्शिनी कुलकर्णी, नृत्यशिक्षणाविषयी शमा भाटे, नाट्यप्रशिक्षणाविषयी प्रवीण भोळे यांनी मांडलेली मतंही या अंकात वाचायला मिळतात. याशिवाय अभिराम भडकमकर, माधव वझे, कमलेश वालावलकर यांचेही लेख या भागात समाविष्ट केलेले आहेत.

'कलात्म'च्या दुसर्‍या भागात डॉ. प्रभा अत्रे, नाट्यदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, वामन केंद्रे, चित्रकार प्रभाकर कोलते, साहित्यिक रंगनाथ पाठारे, लक्ष्मीकांत देशमुख, महावीर जोंधळे, राजन खान, समीक्षक मुकेश माचकर यांनी त्यांच्या कलाप्रवासाबद्दल मतं मांडली आहेत. पं. सुरेश तळवलकर (तबल्याचं भवितव्य), शांता गोखले (नाटक आणि सेन्सॉरशिप), मीना कर्णिक (मराठी समीक्षक), बाबू मोशाय (मराठी चित्रपटांचं भवितव्य), शाहू पाटोळे (लोककला), डॉ. मंदार परांजपे (बालनाट्य चळवळ), राजश्री पुरंदरे (कलेचे मानसशास्त्र), शाहीर विठ्ठल उमप (लोककला), नीरजा पटवर्धन (वेशभूषा) यांच्या लेखांतून कलेच्या सद्यस्थितीची खरी जाणीव होते. एका वेगळ्या विभागात नीलेश चव्हाण, मंगेश हाडवळे, नागराज मंजूळे, समीर विद्वांस या तरुण कलोपासकांनी आपली मतं मांडली आहेत. 'कलाकारण' या विभागात सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, रामदास आठवले, गोपीनाथ मुंढे, उल्हास पवार, कृष्णकुमार गोयल यांची मतं व निरीक्षणं वाचायला मिळतात.

'कलात्म'च्या दोन अंकांबरोबरच संपादक श्री. संजय आवटे यांचा 'कला कल्पतरूंचे आरव' हा लेखसंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. कला व शिक्षण यांचा उहापोह करणारे हे लेख प्रत्येकानं वाचलेच पाहिजेत असे आहेत.

'कलात्म' व 'कला कल्पतरूंचे आरव' मायबोलीच्या खरेदी विभागात एकत्रित उपलब्ध आहेत
- http://kharedi.maayboli.com/shop/Kalatma.html

'कलात्म'च्या दोन भागांना डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिलेली प्रस्तावना, 'कला कल्पतरूंचे आरव'मधील श्री. संजय आवटे यांचा एक लेख व तरुण चित्रपटदिग्दर्शक मंगेश हाडवळे यांचा हा लेख...

kalatma.jpg

जगण्यासोबत कलाही बदलते

संस्कृती, शिक्षण आणि कलेचा संबंध अतूट आहे. कला जोपासण्यासाठी आर्थिक समृद्धी गरजेची, पण ती आर्थिक समृद्धी कशी मिळवावी, याचे शि़क्षण आपल्याला संस्कृतीमधून मिळत असते.

कलाकारांनी सामाजिक बांधीलकी जपावी, पण कलाकाराची बांधीलकी प्रथम कलेशी असावी. कलेशी अतूट बांधीलकी असेल, तर समाजाशी आपोआपच बांधीलकी निर्माण होईल. कलाकार समाजाला समृद्ध करण्याचे काम करत असतात. जागतिकीकरणाच्या काळात सर्व संदर्भ बदलत असताना तर कलेच्या समोर अनेक नवी आव्हाने आहेत; पण कलांना मरण मात्र नक्कीच नाही. भारतीय चित्रपटांची तुलना जागतिक चित्रपटांशी होऊ शकेल; मात्र भारतीय संगीताची तुलना जगातील कोणत्याही संगीताबरोबर करता येणार नाही. दुसरीकडे, ज्या लोककला आहेत त्या लोककला म्हणून जिवंत राहतील का याविषयी शंका वाटणे स्वाभाविक आहे. कारण लोककलेचा पाया आर्थिक आहे. खेड्यातील लोकांना आर्थिकदृष्ट्या तमाशा, लावण्या पाहणे शक्य आहे. मात्र, त्यांना महागडे चित्रपट, नाटकं, गाण्याच्या मैफिली पाहणे शक्य नाही. त्यासाठी त्यांचे जीवनमान उंचावणे गरजेचे आहे. शिवाय भारतीय संस्कृती कप्पेबंद आहे. उच्च वर्णाची, खेड्यांची संस्कृती वेगळी आहे. भारतीय संस्कृतीत एकसारखेपणा नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात आपल्या प्रथा, परंपरा यांना चिकटून न राहता आपल्याला नवे शिकावे लागेल. जगाच्या बरोबर बदलावेच लागेल. त्यातून कला खर्‍या अर्थाने समृद्ध होईल. भारतीय कलांपुढे भौतिक आव्हाने आहेत. समाजाची सर्वांगीण प्रगती कलांना पोषक ठरणारी आहे. बुद्धिमान, वैभवशाली समाजच कलांची योग्य जोपासना करू शकतो. जो समाज सुसंस्कृत आहे, त्या समाजात अनेक कलांचा संगम झालेला आढळतो.

आपला समाज सर्व जातीधर्मांचा आहे. या समाजाच्या गरजा, मागण्या वेगळ्या आहेत. त्यांची संस्कृती, मनोरंजनाची साधनेही वेगळी आहेत. महाराष्ट्र सरकार जे सांस्कृतिक धोरण ठरवते, त्यात या वस्तुस्थितीचा विचार होणे गरजेचे आहे. त्याशिवाय असे धोरण यशस्वी होऊ शकत नाही.

सध्या अभिव्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आले आहे. संत तुकारामांसारख्या महान संताला किती आणि काय सोसावे लागले, हे आपण जाणतो. ज्ञानेश्वरांसारख्या संताला भूसमाधी घ्यावी लागली, तर काही संतांना जलसमाधी घेण्यास या समाजाने भाग पाडले. अभिव्यक्तीवर होणारे हल्ले आजचे नाहीत. मात्र, याबाबत आपण आता गंभीरपणे विचार करायला हवा. कारण कलाच समाजाला सुसंस्कृत बनवेल. कलेचेही ध्येय हेच असायला हवे. हा ध्यास घेऊन कलेच्या आकलनाचा प्रयत्न करणारे कलावंत, अभ्यासक, कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आपल्याला हवे आहेत. कलेला समाजाशी जोडण्याचा प्रयत्न झाल्याशिवाय कलेला आपले ध्येय गाठता येणार नाही.

- डॉ. श्रीराम लागू

कलासक्त समाजाची जबाबदारी

मराठी नाटकांचा जन्म झाला १८८३ मध्ये. या नाटकांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व जपलं. काही नाटकांनी स्वतंत्र अस्तित्व जपत असतानाच चित्रपटांचं अनुकरण केलं. कोणत्याही कलेवर समकालीन घटनांचा- अन्य माध्यमांचा प्रभाव असतोच. तसा नाटक, चित्रपट, संगीत, साहित्य, चित्रकला या सर्व कलांवरही समाजातील समकालीन घडामोडींचा प्रभाव पडला आहे, असे आपल्या लक्षात येते.

कलेची प्रगती सुरुवातीला वेगाने व चौफेर दिशेने होत असते, पण हा वेग आणि वैविध्य कायम राहत नाही. त्याला अनेक कारणे सांगता येतील. चित्रपटनिर्मितीला मोठ्या प्रमाणावर तांत्रिक सामग्री लागते. किंबहुना तांत्रिक प्रगतीवर चित्रपटांचा दर्जा अवलंबून असतो. शिवाय अनेक प्रकारच्या कलाकारांचा तो समूह असल्यामुळे सर्वांकडून उच्च प्रतिभेचे काम होईलच, असे नाही. याच्या उलट नाटकाचं आहे. नाटक एखाद्या खोलीत बसून लिहिता येते. मोजक्या लोकांचा समूह नाटकाला पूर्णत्व देऊ शकतो. असेच संगीत कलेचे आहे. गायक आपले गायन कोणत्याही ठिकाणी करू शकतो. स्वत:ची उच्च प्रतिभा कायम ठेवून गायन करण्यात फारशा अडचणी येत नाहीत. त्यामुळेच संगीत या कलेची विशेष प्रगती झाली आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळाच दर्जा आहे. कुमार गंधर्वांसारख्या कलाकाराने भारतीय संगीताला फार मोठे योगदान दिले. त्यामुळे कुमार गंधर्वकालीन संगीत आणि कुमार गंधर्व यांच्यानंतरचे संगीत असे दोन फरक किंवा सीमारेषा भारतीय संगीताच्या संदर्भात करता येतील. भारतीय चित्रपट क्षेत्राचा विकास लक्षणीय आहे, पण कुमार गंधर्वांनी जसा संगीत क्षेत्राला मोठा दणका दिला, तसा दणका चित्रपट क्षेत्रात कोणी देऊ शकले नाही. तरीही सत्यजित रे यांचे योगदान कोणत्याही अंगाने कमी नाही, पण संगीत कलेची जशी प्रगती झाली, तशी प्रगती चित्रपट, चित्रकला, साहित्याची झाली नाही, हे मान्य करायलाच हवे.

कलेची प्रगती ही एकटी असत नाही. त्यासाठी समाजाला स्थिरता मिळायला हवी. स्वातंत्र्यानंतर आपला समाज स्थिरस्थावर झाला, तरीही हा काळ पुरेसा नाही. कलेच्या विकासाला समाजाची आर्थिक, सामाजिक, वैचारिक प्रगतीही कारणीभूत असते. मुळात आर्थिक प्रगती ही कलेच्या विकासासाठीची पूर्वअट आहे. पाश्चात्य कलाकारांचे यश तुम्हाला दिसते, पण त्यांच्यामागील आर्थिक पाठबळ दिसत नाही. पं. भीमसेन जोशींना सुरुवातीला बर्‍याच हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. एवढ्या हालअपेष्टा सोसून गायन चालू ठेवणे हे खरेच अवघड काम आहे.

आणखी एक! साहित्याने काहीतरी संदेश दिला पाहिजे, असे काहींचे म्हणणे असते. हे चुकीचे आहे. संदेश देणे, समाज सुधारणा करणे हे साहित्य, नाटक, कादंबरी यांचे काम नाही. माणसाला, समाजाला सुसंस्कृत, संवेदनशील, विचारप्रवण बनविणे हे कलेचे काम आहे आणि कलेने ते केले पाहिजे. कलेचा विकास जसा समाजावर अवलंबून आहे, त्याचप्रमाणे गुणप्रवर्तक कलाकारांची संख्या समाजात किती आहे, यावर त्या समाजाची पात्रता अवलंबून आहे. किंबहुना, हेच समाजाचे वैभव असते. हे वैभव जपण्याचे काम कलासक्त समाजाने करावे, असे मला वाटते.

- डॉ. श्रीराम लागू

Kala-kalptru.jpg


कशासाठी बोलतो आहोत आपण?

पौगंडावस्थेतली पोरं अचानक माना टाकू लागली आणि आत्महत्येच्या दिशेने तरुणाई निघाली. एखादा संसर्गजन्य आजार आहे, अशी वर्णनं आत्महत्येबाबत होऊ लागली. मी कमालीचा बैचेन झालो. या सगळ्याच्या मुळाशी जावं या निर्णयाप्रत आलो.

ज्या वयात फुलावं- उमलावं त्या काळात कोवळ्या कळ्यांनी कोमेजून का जावं, हा प्रश्न छळू लागला. ज्याचं उत्तर आपल्याकडे नाही, ते असल्याचा आव आणण्याचा अप्रामाणिकपणा कधी करू नये. त्यापेक्षा प्रश्नाचा आवाका पहावा. प्रमेयाची व्याप्ती पहावी.

या कोवळ्या पोरांना हवा भरणं फार कठीण नाही, त्यांच्या आई-बापांना बोल लावण्याएवढं सोपं तर काहीच नाही; पण अशानं काही उत्तर गवसत नाही. ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागलो.

योगायोगानं त्याच वेळी 'कलात्म' ची कल्पना पुढे आली. सामाजिक संदर्भांत कलेच्या आकलनाचा प्रयत्न अभावानेच होताना दिसतो. कलावंत वा समीक्षकांच्या नव्हे, तर समाजाच्या दृष्टीने 'कला' या विषयाकडे पहायला हवे, असे वाटल्याने 'कलात्म' या विशेषांकाची आवश्यकता अधोरेखित झाली. या संदर्भात विचार करताना कधीतरी लक्षात आलं की, जगण्याच्या कक्षा विस्तारत असताना आपण आनंदाच्या शक्यता मात्र कमी-कमी करत चाललो आहोत. घटनांची गुंतागुंत वाढू लागली असताना आपण अन्वयाच्या शक्यता किमान करत चाललो आहोत.

अशी एक व्यवस्थाच आपण स्वत:भोवती गुंफून घेतली आहे. आपल्या सोयीसाठी आणि रक्षणासाठी म्हणून या रेषा मारल्या गेल्या खर्‍या; पण त्या रेषांचेच आता आपण गुलाम झालो आहोत. त्यामुळे सगळे पर्याय खोडत-खोडत अशा जागी येऊन स्थिरावलो आहोत, की 'जगावं की मरावं' असा सवाल उपस्थित व्हावा. एकीकडे आपली परीक्षापध्दती बहुपर्यायी होत असताना जगण्याच्या या परीक्षेत मात्र आपल्याकडे पुरेसे पर्याय नाहीत. या एकारलेल्या जगण्याला 'फोकस्ड' असंही म्हणण्याची पध्दत असली तरी एकारलेपणातून नाकारलेपण येतं, हे अजून आपल्याला नीटसं उमगलेलं नाही. जिथं आपण आपलं आयुष्यच जगत नाही तिथं आयुष्याविषयी काय नि कसं बोलणार? आनंदाची एकेक शक्यता हद्दपार करीत प्रवासाला निघाल्यावर ती आनंदयात्रा होण्याची भाषा कशी आणि कोणत्या शब्दात बोलणार? आनंद नावाच्या ज्या गोष्टीसाठी सारे अट्टहास करतो आपण, ते अट्टहास यथास्थित पूर्ण होतात. सारे सुरळीतपणे सुरु असते. फक्त या धबडग्यात लक्षात येते की , बाकी तसं छान चाललंय ; पण ज्यासाठी आहे हा अट्टहास तो आनंदच आपल्याला सोडून गेलाय.

'शॅडो फ्रॉम लडाख' नावाची एक उत्तम कादंबरी आहे, डॉ. भवानी भट्टाचार्यांची. 'साहित्य अकादमी' पारितोषिकविजेती कादंबरी. टागोर आणि गांधींच्या वाटेने खेडयापाडयातील भारताला धुंडाळणार्‍या भट्टाचार्यांनी विलक्षण नाट्य फुलवले आहे या कादंबरीत. या कादंबरीतील गोष्ट आठवली अचानक. एका राजबिंड्या तरूणाला ऐन तारुण्यात नैराश्य येते. ( मुळात नैराश्य ही प्रामुख्याने तारुण्यात भेटणारीच गोष्ट! ती तशी वाईटही नाही. असलीच तर सृजनशील आहे. नाहक उत्साहाने रटरटणारे सो कॉल्ड 'सक्सेस फ्रेंडली' स्मार्ट चॅम्प्स पाहिल्यावर तर हे अगदी पटते. मुद्दा असतो त्या नैराश्याला भिडण्याचा. पण तो सोडा!) तर, हा निराश राजपुत्र असतो प्रेमाच्या शोधात. खरे प्रेम काही गवसत नाही. जे मिळते, ते राजघराण्याचा वारसा असल्यामुळे किंवा देखणे रूप असल्यामुळे. तो कातावतो. दुखावतो. कमालीचा अस्वस्थ होतो. आयुष्यावर रागावून तो सगळे सोडतो. अंगच्या साध्या कपड्यानिशी येतो जंगलात आणि बसतो थेट तपश्चर्येला. काही झाले तरी तपश्चर्याभंग होऊ द्यायचा नाही.

मोठ्या निग्रहाने बसतो. डोळे मिटून घेतो. जंगलातील आल्हाददायक हवा त्याला खुणावत नाही की वाघसिंहाच्या डरकाळ्यांनी त्याची गाळण उडत नाही. तो तपश्चर्येला बसतो. दिवसांमागून दिवस जातात. त्या जंगलात काटक्या वेचण्यासाठी एक गरिबाघरची एक पोर येत असते. ती याला पाहते. याच्यासाठी दररोज पाणी आणते. कंदमुळे आणते. आजूबाजूची जागा कायम साफसूफ ठेवते. अगदी प्रेमाने करत असते सगळे. 'संवाद' शून्य. पण असे सगळे सुरू असते. दिवसामागून दिवस जातात. वर्षांमागून वर्षे. सगळे तसेच सुरू असते. राजपुत्र तपश्चर्येत मग्न असतो; पण त्याच्या मनाच्या एका कोपर्‍यात आता त्या मुलीने जागा केलेली असते. अर्थात, अशा कोणत्याही अडथळ्यांनी व्यत्यय यावा, असा तो लेचापेचा नसतो. त्यामुळे त्याची तपश्चर्या सुरु असते. नंतर काहीतरी होते आणि मुलीच्या बापाची नोकरी बदलल्यामुळे किंवा आणखी कशाने, ते कुटुंब आपले बिर्‍हाड हलवते. त्यामुळे ती मुलगी अदृश्य होते. योगायोग असा की, त्यानंतर लगेच याच्या तपश्चर्येला यश मिळते. प्रसन्न झालेला देव त्याला विचारतो, '' वत्सा, तुला काय हवे ते माग.'' गोंधळलेला तरूण नकळत उत्कटपणे म्हणतो,'' देवा, मला काही नको आणखी; पण एकच दे. ती इथे येणारी मुलगी मला हवी. असे प्रेम कोणाच्या डोळ्यात मी यापूर्वी पाहिले नाही!''

आनंद आणि यशाची खरी गंमत अशी असते. ही गोष्ट मी वाचली, त्याला बरेच दिवस उलटले. व्यंकटेश माडगूळकरांनी या कादंबरीचा केलेला अनुवाद वाचला, त्यालाही बरेच दिवस होऊन गेले.त्यामुळे तपशिलांविषयी मला खात्री नाही. तपशिलांपेक्षा तपश्चर्या महत्वाची, आशय महत्वाचा. मला वाटतं, मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल.

काहीतरी ग्रेट मिळवण्याच्या नादात आजूबाजूचे आनंदाचे क्षण हरवणे, हे आपले रोजचे जगणे झाले आहे. मी इथे मोहाच्या तत्कालिक क्षणांविषयी बोलत नाही. आपले जगणे समृध्द करणारे आनंदाचे कैक क्षण येतात आपल्या मुठीत आणि आपण ते गमावून बसतो. कारण आपल्या लेखी आनंद नावाचा काहीतरी मुक्काम असतो. ती यात्रा नसते. अशी फसगत सुरू होते, ती अगदी आपल्या जन्मापासूनच. नंतर अशा फसवणुकींची इतकी सवय होते की, आपणही सराईतपणे ती खरी मानू लागतो. त्या खोट्या जगण्याला आपले खरे जगणे मानू लागतो. आणि मग या फुटपट्टीने अवघ्या जगाचे जगणे जोखू लागतो. व्यक्तिगत जीवनापासून सामुहिक जगण्यापर्यंत अशा फूटपट्ट्या तयार होत जातात. त्या जगण्याला चिकटतात. अशा पट्ट्या फेकून देण्याचे धाडस कधी होत नाही, कारण त्या फेकल्या की आपले पोकळपण प्रकर्षाने जाणवू लागते.

या फसवणुकीची सुरुवात होते अगदी जन्मल्यापासून. म्हणजे पु. ल. म्हणतात त्याप्रमाणे, ('पुलं'ना 'योग्य' कारणासाठी कोट करण्याची आपल्याला अजिबात सवय नाही. त्यामुळं हे जरा अनपेक्षित वाटेल) प्रत्येक बाबतीतलं 'कुतूहल' हे बालपणाचं लक्षण; आणि अवघं बालपण ज्या शाळेत घालवायचं, त्या शाळा नावाच्या इमारतीत मुख्य काम चालतं ते, हे कुतूहल नाहीसं करण्याचं. मूल जन्माला आल्यापासून त्याच्या इच्छेविरुद्ध जसं त्याला नाड्या आवळून-आवळून आणि बटणं लावून-लावून कपड्यांच्या बंधनात कोंबण्यात येतं; तसंच मानसिक आणि बौध्दिक वाढीच्या नाड्याही आवळल्या जात असतात.

आनंदाच्या शक्यता आक्रसून टाकण्यावरच आपली अवघी अवस्था उभी आहे. 'तुम्हाला जे मनापासून वाटतं, ते न करणं म्हणजे सभ्यता', अशी साधी व्याख्या आहे. आनंदासाठीची नैसर्गिक साधनं संपली की, माणसं आनंदाच्या अनैसर्गिक साधनांकडे वळतात, हे कोणत्याही उदाहरणांवरून आपल्याला पटायला हरकत नाही. पण तरी ज्यामध्ये सहजपणे नैसर्गिक आनंद मिळतो, असे काहीही आपल्याला नको असते. आनंदी झाली की, माणसं नाचतात, गुणगुणतात, उड्या मारतात. देश कोणताही असो आणि भाषा कुठलीही असो; सर्वत्र हे असेच घडते. पण तरीही शाळा नावाच्या इमारतीत नाच नाही, गाणं नाही!

व्यवस्था अशी आहे की, जे सिरियसली या नाचगाण्याच्या फंदात पडतात, तेही नंतर तिकडं त्या क्षेत्रात अशा पद्धतीनं जगायला लागतात की वाटावं, नाच-गाण्यानं यांचं असं होणार असेल, तर त्यापेक्षा कॉर्पोरेट जगतातल्या मारामार्‍या काय वाईट? कारण आपण आनंदासाठी इकडं वळलोय, हे तेही हळूहळू विसरून जातात. त्यात नाव कमवायचं म्हणजे 'रॅट-रेस' अटळ आणि ती एवढी वाढते पुढे की, अवघी साधना संपल्यावर किंवा एखाद्या वळणावर या 'उंदरांना' जाणवते, अरे सारे मिळाले; पण आपल्याला जे हवे होते यातून, ते तर कधीचेच निसटले हातातून.

एक तर गंमत अशी आहे, लोकांच्या लेखी कला नावाचं काहीतरी वेगळं जग आहे. म्हणजे हे समांतर जग आहे आणि हे ग्रेट वगैरे पण आहे. मात्र, या जगाचा आपल्याशी काही संबंध नाही. शिवाय त्या जगाशी आपला संबंध न आल्यामुळे आपलं काही अडत नाही. आणि समजा आला संबंध, तरी त्यातून काही आपण घडत नाही! त्यामुळे या कला वगैरे प्रकाराच्या नादी कोणी लागत नाही. एखाद्या गाण्याच्या मैफलीला जाऊन बसल्यामुळे प्रतिष्ठा वगैरे मिळत असेल, तर जायला हरकत नाही; पण न गेल्यामुळे काही बिघडत नाही, अशीच धारणा दिसते. त्यातून मग आयकॉन्स उदयाला येतात. कारण मूळ कलाप्रकारात काही रस नसतो. तो कळण्याची शक्यता नसते. गरज वाटत नसते; पण जुजबी माहिती असावी, अशी इच्छा असते. मग 'बिरजूमहाराज म्हणजे कथ्थक' अशा काही प्रतिमा तयार झाल्या की प्रश्न सुटतो. त्यातून कलेच्या क्षेत्रात 'आयकॉन्स' तयार होतात; पण कला आणि समाज यातील द्वैत उत्तरोत्तर वाढत जाते. कलावंतांना तर ते अनेकदा हवे असतेच. कारण त्याशिवाय त्यांच्यातील व्यवच्छेदक वेगळेपण कसे जाणवणार? त्यामुळे 'मास'साठी आपण नाही, हे सिद्ध करण्यातच अभिजात कलांच्या अनेक साधकांचे आयुष्य खर्ची पडते. माणूस जन्मल्यावर ज्या सहजपणे आणि अलगदपणे भाषा शिकतो; त्यच अलगदपणे त्याला नृत्य भेटते, साहित्य सापडते, संगीत ऐकू येते, चित्र दिसते. प्रत्येक मूल भाषा शिकते म्हणजे ते भाषाप्रभूच होईल असे नाही. भाषेत ते करिअर करील, असे नाही. पण भाषा त्याचे आयुष्य घडवते. तसेच अगदी, गायन-संगीत-नृत्य-चित्रात कोणी फार मोठा तीर मारेल, असे नाही; मात्र हे सगळे त्याच्यापाशी असते. त्याच्या आवाक्यात असते. हळूहळू हे सारे त्याच्या पोतडीतून काढून टाकले जाते. मग चक्क दोन थेट वर्ग पडतात. एक - 'कला' प्रांतात हुंदडणार्‍यांचा आणि दुसरा - कलेशी देणे-घेणे नसणार्‍यांचा. त्यातील पहिला वर्ग अर्थातच मूठभरांचा.

साक्षर झालेला प्रत्येक जण मोठा साहित्यिक होईल, अशी अपेक्षा नसते किंवा साक्षर असणारा प्रत्येक जण आरती प्रभू, ग्रेस, दि. पु. चित्रे, भालचंद्र नेमाडे वाचत सुटेल, अशीही अपेक्षा नसते. पण किमान तो वाचू शकतो. (अगदी तांत्रिक अंगाने तरी आशयाच्या अंगाने इथेही गोंधळ आहेच.) बाकीच्या कलांच्या बाबतीत तर आनंदीआनंद. म्हणजे नृत्य पाहूही शकत नाही आणि गाणे ऐकू शकत नाही. कारण हे प्रकार त्याला शाळेत कधी आडवे यत नाहीत. चुकूनमाकून कुठे आवड विकसित झालीच, तर त्याला अपघात म्हणावे लागेल. मात्र, तसे अपघात शाळेच्या 'निर्धोक' प्रांगणात घडण्याची शक्यता कमी. कारण आपण सारे अक्षरप्रामाण्यवादी. त्यामुळे पुस्तके सर्व काही सांगतील, अशी श्रद्धा. चित्रकलेविषयी मुलांना माहिती हवी, असे वाटले तर एखाद्या चित्रकाराचा धडा; अजिंठा-वेरूळ लेण्यांवर एखादा पाठ. बास! बरं, एवढं करून ज्या अक्षरप्रामाण्यवादावर आपली व्यवस्था उभी आहे, त्या अक्षरांचे तरी काय? म्हणजे लहाणपणापासून ज्या कवी-लेखकांचे बोट धरून आपण सगळे शालेय शिक्षण संपवतो, ते कवी-लेखक पुन्हा हाती घ्यावेत, असे तरी किती जणांना वाटते? उलटपक्षी, 'कवी इथे काय म्हणतो?' आणि 'लेखकाला इथे काय म्हणायचे आहे?' असल्या प्रश्नांच्या जचातून सुटका झाल्याचाच काय तो आनंद!

आणि म्हणे, जगण्याच्या कक्षा साहित्य रुंद करते; कला तुमच्या अस्तित्वाच्या कक्षा वाढवते! रुंद करते म्हणजे, कोणाच्या कक्षा रुंद करते? त्यांच्या कक्षेतच कला नसेल, तर अशी कला असली काय आणि नसली काय! एखाद्या नव्या संशोधनामुळे हृदयावर सहजपणे शस्त्रक्रिया होऊ शकते, हे भलेही खरे असेल; पण ती शस्त्रक्रिया नव्वद टक्के लोकांच्या आवाक्यातच नसेल, तर त्या संशोधनाची उपयुक्ततता ती किती? शिवाय, ज्या लोकांच्या आवाक्यात कला आहे, त्यापैकी निम्मे त्यावर अवलंबून आहेत. म्हणजे कलावंत म्हणून, समीक्षक म्हणून, संयोजक म्हणून किंवा आणखी वेगवेगळ्या जोड उद्योगांच्या निमित्ताने. उरलेले जे आहेत, त्यांना किशोरीबाईंच्या गाण्यातून आनंद घेण्यापेक्षा त्या गाण्यावर चर्चा करण्यात आणि त्यातून आपले पांडित्य सांगण्यातच अधिक रस. त्यांना कलेचे वेगळे आयाम कळावेत ते कसे? ज्याला दि. पु. चित्रे फडताळात ठेवण्यात अधिक स्वारस्य, त्याला 'बुडते हे जन, न देखवी डोळा'चा तुकोबाचा कळवळा दिपुंच्या मांडणीतून तरी कसा कळणार! 'वळू' बघून लंब्याचौड्या गप्पा मारणार्‍या माणसाला खेड्यापाड्यांतील जगण्याची चव कळत नसेल तर काय उपयोग होणार किंवा वेश्येचे जगणे समजून घेणार्‍या 'आर्ट फिल्म'वाल्या माणसाला घरातील त्याच्या वयोवृद्ध मावशीच्या जगण्याला असणार्‍या कंगोर्‍यांविषयी सहानुभूती नसेल, तर आर्ट फिल्म त्याला काय देणार? मग काही मूठभरांचे 'इगो' कुरवाळणे; मर्यादित अर्थाने का असेना, पण अर्थकारणाला गती मिळणे आणि काही जणांना करिअर ऑप्शन देणे, एवढेच कलेचे प्रयोजन आहे का? तसे असेल तर हरकत नाही. पण मग आपण सगळ्यांनी सामूहिक स्तरावर त्याचा एवढा उदो-उदो करायचे कारण काय? चित्रपट-नाटक हे 'पॉप्युलर कल्चर'शी संबंधित प्रकार वगळले, तर संगीत-नृत्य-चित्रकला-शिल्पकला या कलांच्या अभिजाततेची चिंता उगाच सर्वांनी करण्याचे काय कारण? त्यापेक्षा 'आयपील' सारखे अधिक रजक खेळ आपल्याकडे आहेत ना मग!

डॉक्टरांची हॉस्पिटल्स बरी चालावीत, या अंगाने आरोग्याचं भलं व्हावं, असं नाही ना म्हणात आपण; मग कलेचं काय? कलेविषयी का बोलतो आहोत आपण?

कारण कला खरोखरच रुंद करते तुमच्या जगण्याच्या कक्षा. कला वाढवते आनंदाच्या शक्यता. कला सूचित करते वाटा अन्वयाच्या. आजवर कधी नव्हे एवढी कला महत्त्वाची ठरू शकणार आहे नव्या काळात. अवघे जग बदलत आहे. झपाट्याने बदलत आहे. हा झपाटा केवळ 'इन्फर्मेशन'ने समजणार नाही. उलटपक्षी त्यामुळे गोंधळ वाढण्याची भीती आहे. या झपाट्याला अनुकूल अशी ज्ञान, विज्ञान आणि कला यांची बैठक आपण निर्माण करू शकलो नाही, तर सगळेच कोसळेल. आज तरी या घडीला तशी बैठक आपल्याकडे नाही. ज्ञानाच्या नावाने आपण माहितीविषयी बोलतो. विज्ञानाच्या नावाने तंत्रज्ञानाविषयी बोलतो आणि कलेच्या नावाने कलवंतांविषयी, कलेच्या शास्त्राविषयी किंवा त्यापेक्षा वाईट म्हणजे त्या क्षेत्रातील सेलिब्रिटी, स्टारडम आणि गॉसिपिंगविषयी बोलतो. मग कलेचा खरा उपयोग कसा व्हावा? कलेचे खरे प्रयोजन तरी कसे समजावे? अशा समाजात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळाच घोटला गेला किंवा अस्मितांच्या पायदळी कला-साहित्य तुडवले गेले, तर त्यात अस्वाभाविक असे काय?

- श्री. संजय आवटे

***

सिनेमा माझा विठोबा !

सिनेमा या कलाप्रकाराचं लहानपणापासून माझ्यावर गारुड होतं. कथा सांगण्याच्या या कलेचं मला फार पूर्वीपासून अप्रूप वाटत आलंय. मानवी मनाच्या सार्‍या पैलूंना सिनेमा स्पर्श करत आलाय. मानवाचं यशापयश, सुखदुःखं सिनेमा एखाद्या टीपकागदाप्रमाणं टिपत आलाय. सिनेमा वैश्विक कलाप्रकार आहे. सिनेमाकडे पाहण्याची दृष्टीही व्यक्तीसापेक्ष आहे. सिनेमा हे फार प्रभावशाली माध्यम आहे, असं मी मानतो. सिनेमा हा खर्चिक प्रकार असला तरीही सिनेमाच्या माध्यमातून एखादा विषय एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचवता येतो. त्यादृष्टीने सिनेमा हे दुधारी शस्त्र आहे, असं मला वाटतं. त्यामुळंच मनोरंजनाच्या पलीकडेही सिनेमाचं कालमाध्यम म्हणून मोलाचं योगदान आहे.

पुण्याच्या ललित कला केंद्रातून कलेचं शिक्षण घेतल्यानंतर मी जेव्हा पहिला सिनेमा करायचं ठरवलं तेव्हा हेच सारं डोक्यात होतं. सिनेमा जागतिक कलाप्रकार असल्यानं माझ्या मातीतला विषय जगभर पोहोचवायचाय याच विचाराने मी 'टिंग्या' हा पहिला चित्रपट बनविला. ग्रामीण भागातील कथा वैश्विक पद्धतीनं मांडली. चित्रपट म्हणजे केवळ तंत्राचा खेळ नाही तर मानवी भाव भावनांचा एक कोलाज आहे. 'टिंग्या'ची कथा घेऊन मी अडीच वर्षं सुमारे चाळीस निर्मात्यांना भेटलो. मात्र या विषयावर चित्रपट बनवायला कोणी तयार नव्हतं. या कथेत हिरो कुठे आहे ? गाणी कुठे आहे ? अशा प्रश्नांचा भडीमार माझ्यावर झाला. मात्र मी माझ्या अंतर्मनाशी प्रामाणिक होतो. 'टिंग्या'तलं लहानग्या मुलाचं भावविश्व असो की हिंदू मुस्लिम समाजातलं भाष्य असो, मी संवेदनशील पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलाय.

सिनेमा म्हणजे मला निर्गुण, निराकार परेश्वराप्रमाणे वाटतो. भक्त जसा परमेश्वराशी तादात्म्य पावतो, तसा दिग्दर्शक जोपर्यंत त्याच्या कथेशी एकरुप होत नाही तोपर्यंत एक सुंदर कलाकृती आकार घेत नाही. त्यादृष्टीनं सिनेमाशी निगडीत असणारी प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते. महाराष्ट्रातल्या गावागावातला वारकरी दरवर्षी न चुकता पंढरपूरला वारीला जातो. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. वारीतल्या वारकर्‍याची विठोबावर भक्ती असते. त्यामुळं दरवर्षी वारीत जाणार्‍या वारकर्‍यामध्ये पहिल्यांदा विठ्ठलाचं दर्शन घेताना असलेली विठोबाची आस प्रत्येक वारीत कायम असते. त्या वारकर्‍यामध्ये पहिल्या वारीची उर्जा असते. वर्षानुवर्षं वारीला गेल्यानंतरही ही दर्शनाची आस कमी होत नाही. पंढरपूरमध्ये आल्यानंतर तो 'त्या' विठ्ठलाचं सावळं सोजरं रुप साठवून ठेवतो. त्या वारकर्‍याप्रमाणं फिल्ममेकर्ससाठी सिनेमा हाच विठोबा असतो. दिग्दर्शकासाठी प्रत्येक सिनेमा म्हणजे वारीचा प्रवास असतो. आणि सिनेमा पूर्ण झाल्यानंतर फिल्ममेकरला वारकर्‍याप्रमाणचं विठोबाच्या दर्शनाचं सुख मिळतं.

पिकासोचं 'गेर्निका' हे चित्र जसं शांततेचं प्रतीक आहे, तसंच युद्धावरचा एखादा सिनेमाही शांततेचा संदेशच देतो. ललित कला केंद्राचे सतीश आळेकर यांनी म्हटल्याप्रमाणे शेतकरी जसं पेरण्याचं नैसर्गिक काम करतो तसाच एक कलावंत त्याची कलाकृती निर्माण करण्यात रममाण होत असतो. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. मौखिक पद्धतीनं महाराष्ट्रात वर्षानुवर्षं भक्तीचा प्रवाह एका पिढीकडून दुस-या पिढीकडे चालत आलाय. तुकारामांचे अभंग असो, बहिणीबाईंच्या ओव्या असोत, यांतून शेकडो वर्षांपासून लोकशिक्षण मिळत आलंय. सर्वसामान्यांना त्यांच्या साहित्यातून अर्थबोध होतो. त्यांचं साहित्य बहुजनांपर्यंत पोहोचलंय. सिनेमा हा एका अर्थानं असाच कलाप्रकार आहे. सिनेमाच्या माध्यमातून सामाजिक विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायला हवा. कलात्मक सिनेमा म्हणजे निर्बोध नव्हे. संतांनी लौकिक अर्थानं कोणत्याही शाळेत शिक्षण घेतलेलं नव्हतं. मात्र त्यांनी जीवनाच्या शाळेत घेतलेल्या शिक्षणाचं प्रतिबिंबच संतांच्या साहित्यात पाहायला मिळतं. तसंच सिनेमाचंही समाजाशी नातं असायला हवं.

सिनेमा म्हणजे दिग्दर्शकाचं संचित असतं. त्यात दिग्दर्शकाचं स्वतःचं स्टेटमेंट असतं. त्यादृष्टीने दिग्दर्शक हा तत्त्वज्ञच असतो. त्यामुळे दिग्दर्शकाचं चौफेर वाचन असावं. फिल्ममेकरचा माणूस म्हणून कसा विकास होतो, हेही महत्त्वाचं ठरतं. त्याने निर्मिलेली कलाकृती त्याला काय देते हेही त्यानं पाहिलं पाहिजे. सिनेमा कलाभाव निर्माण करतो, आणि त्यामुळे रसिकांमध्ये रस निर्माण होतो. कला हे जीवनाचे प्रतिबिंब आहे. कवी ज्याप्रमाणे त्याचे अनुभव शब्दबद्ध करीत असतो, त्याचप्रमाणे दिग्दर्शक प्रतिमांच्या माध्यमातून त्याच्या कल्पना पडद्यावर साकारत असतात. आपली कल्पना फक्त सिनेमाच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकते, असा फिल्ममेकर्रला विश्वास असतो.

गेल्या पन्नास वर्षांमध्ये मराठीत फारच थोडे जागतिक दर्जाचे सिनेमे निर्माण झाले. सिनेमा ही कला मराठी माणसाने नाटकाइतकी मनापासून स्वीकरली नाही, हेही त्यामागचं एक कारण असावं. मराठीत काही फिल्ममेकर्सनी वैश्विक दर्जाचे सिनेमे तयार केले. मात्र इतर भारतीय भाषांच्या मानाने मराठी सिनेमा ठळकपणे पुढं आला नाही. तर ऐंशीच्या दशकानंतर वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक कारणांनी मराठी सिनेमाचा पट व्यापक न झाल्यामुळं मराठी दिग्दर्शकांची मोठी फळीही निर्माण होऊ शकली नाही.

महाराष्ट्राच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मात्र मराठी सिनेमा नवं क्षितीज गाठण्यासाठी सज्ज झालाय. आगामी काळ मराठी सिनेमासाठी आशादायक आहे. मराठी सिनेमा आता इंडस्ट्रीचं रुप घेतोय. केवळ सिनेमाची फॅक्टरी या अर्थानं नव्हे, तर मराठी सिनेमात विषयाचं वैविध्य आलंय. जागतिकीकरणाचंही प्रतिबिंब मराठीत उमटतंय. आजच्या तरुण फिल्ममेकर्सना त्यांच्या सिनेमामातून त्यांना काय द्यायचं आहे, हे चांगलं माहीत आहे. त्यांचे कथाविषय पूर्णतः नवे आहेत. सिनेमा या कलेचा आनंद ते घेताहेत. सिनेमाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले दिग्दर्शक आज सिनेमा बनवताहेत. उमेश कुलकर्णी, राजीव पाटील, निशिकांत कामत, सचिन कुंडलकर यांच्याकडे स्वतःचे कथाविषय आहेत. कुणाची भ्रष्ट नक्कल करण्याची आमची इच्छा नाहीये.

जागतिकीकऱणामुळे अपरिहार्य झालेला वैयक्तिक पातळीवरचा संघर्ष मांडण्याचीही आमची तयारी आहे. त्यात आम्हांला कोणतीही व्यावसायिक रिस्क वाटत नाही. कारण आता मराठी सिनेमा रसिकही सिनेमाकडे एक जागतिक कलाप्रकार म्हणून पाहतोय. अर्थात यात फिल्म सोसायटी चळवळींचंही योगदान असणार आहे.

तरुण वयात मिळणारं यश टिकून ठेवण्यासाठी संघर्ष करण्याची आम्हां सर्वांची तयारी आहे. तंत्राच्या बाबतीत पिछाडीवर असलेला सिनेमा आता आशयाबरोबरच तंत्रातही समृद्ध होतोय. चांगलं काम करण्यासाठी आम्ही सर्व उत्सुक आहोत.

आजचा सिनेमा शब्दांक़डून प्रतिमांकडे सरकलाय. आम्ही सिनेमाची भाषा समजून घेतोय. सिनेमाचं व्याकरण माहिती करुन घेतोय. सिनेमा हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे, याचीही आम्हाला जाण आहे. त्यामुळंच उद्याचा सिनेमा आजच्या दिग्दर्शकांच्या गर्भात वाढतोय. सिनेमात कोणालाही आदर्श मानल्यास नवीन कलाकृती निर्माण होत नाही. त्या कलाकृतीला मर्यादा येतात. त्यामुळंच न्यूटनने म्हल्याप्रमाणे आधीच्या पिढीच्या खांद्यावरुन नव्या पिढीनं जग पाहिलं पाहिजे. आम्ही फिल्ममेकर्स जगातल्या उत्तम दिग्दर्शकांच्या सिनेमातून हेच शिकतोय. त्यामुळं आम्हाला नव जग अधिक सुस्पष्ट दिसतंय.

गेल्या पन्नास वर्षांचा पट पाहताना पुढची पन्नास वर्षे आशादायक वाटताहेत. आता सिनेमा या माध्यमाला न्याय देणारे दिग्दर्शक आहेत. संवेदनशील फिल्ममेकर्सची फळी उभी राहतेय. त्यामुळं पुढच्या काळात सिनेमा या माध्यमाला न्याय देणारे दिग्दर्शक मराठी मातीत दिसतील. माणसाला माणूस म्हणून काही जाणीव करुन देणारा, त्याला विचार करायला लावणारा तो सिनेमा. मनोरंजनाच्याही पलीकडे जाणारा तो सिनेमा. सिनेमा या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळते. अनेकांपर्यंत पोहोचण्याची त्यांच्या जाणिवा जागृत करण्याची संधी मिळते. हे माध्यम ज्याप्रकारे मानवी मनापाशी पोहोचतं, त्याप्रमाणे दुसरे माध्यम पोहोचत नाही. सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून या सर्व गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. त्यामुळंच सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून मी एक भाग्यवान माणूस आहे.

- श्री. मंगेश हाडवळे

*****

कलात्म (२ अंक)
- अतिथी संपा. - डॉ. श्रीराम लागू
संपा. श्री. संजय आवटे

+

कला कल्पतरूंचे आरव
(आनंदाचे झरे जपायचे कसे?)

- ले. - श्री. संजय आवटे

प्रकाशक - माइंड अ‍ॅन्ड मीडिया

तीन पुस्तकांच्या संचाची किंमत - रुपये पाचशे
सवलतीची किंमत - रुपये तीनशे

***

टंकलेखनसाहाय्य - श्रद्धा, साजिरा, अनीशा

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका राजबिंड्या तरूणाला ऐन तारुण्यात नैराश्य येते. ( मुळात नैराश्य ही प्रामुख्याने तारुण्यात भेटणारीच गोष्ट! ती तशी वाईटही नाही. असलीच तर सृजनशील आहे. नाहक उत्साहाने रटरटणारे सो कॉल्ड 'सक्सेस फ्रेंडली' स्मार्ट चॅम्प्स पाहिल्यावर तर हे अगदी पटते>>>>>
एक तर गंमत अशी आहे, लोकांच्या लेखी कला नावाचं काहीतरी वेगळं जग आहे. म्हणजे हे समांतर जग आहे आणि हे ग्रेट वगैरे पण आहे. मात्र, या जगाचा आपल्याशी काही संबंध नाही. शिवाय त्या जगाशी आपला संबंध न आल्यामुळे आपलं काही अडत नाही. आणि समजा आला संबंध, तरी त्यातून काही आपण घडत नाही! त्यामुळे या कला वगैरे प्रकाराच्या नादी कोणी लागत नाही.>>>> जबरदस्त, एकदम पटेश

त्यातून कलेच्या क्षेत्रात 'आयकॉन्स' तयार होतात; पण कला आणि समाज यातील द्वैत उत्तरोत्तर वाढत जाते. कलावंतांना तर ते अनेकदा हवे असतेच. कारण त्याशिवाय त्यांच्यातील व्यवच्छेदक वेगळेपण कसे जाणवणार? त्यामुळे 'मास'साठी आपण नाही, हे सिद्ध करण्यातच अभिजात कलांच्या अनेक साधकांचे आयुष्य खर्ची पडते. >> मार्मिक.

संजय आवटेंचा लेख भारीये. Happy
अंक वाचायला हवा. इथे माहित करुन दिल्याबद्दल धन्यवाद चिन्मय, श्रद्धा, साजिरा, अनीशा.

एकसे एक लेख आहेत सगळे.
आणि उगाच कुणाला सुखवण्यासाठी शर्करावगुंठीत नाहीयेत. नक्की वाचण्यासारखं आहे.

मला हवाय कलात्म ..
सुन्दर
संजय आवटेंचा लेख बेस्ट
'सिनेमा माझा विठोबा' उत्तम.

kuthe milel ?