गानभुली - झाकीर आणि तबला, एक अद्वैत

Submitted by दाद on 27 August, 2010 - 03:02

झाकीर हुसेन हा नुस्ता ’जिव्हा’ळ्याचा विषय नाही तर तो खरच जिव्हाळ्याचा विषय. झाकीरला अहो-बिहो म्हटलं की, त्याचे-माझे त्याला माहीत नसलेले धागे कुठेतरी अकारण ताणले जातात असं मला (अजूनही) वाटतं Happy

झाकीर हे माझ्या उमलत्या वयातलं पहिलं आणि शेवटचं "वेड".... ज्याला क्रश म्हणत असावेत. एकमेव एव्हढयासाठी म्हणायचं कारण की, ते वेड होतं तोवर इतर काही दिसलंच नाही आणि ते संपलं तेव्हा मी मोठी झाले होत्ये.
तबला रीतसर शिकायला सुरूवात करायच्याही आधी हा आयुष्यात आला. कार्यक्रमांत, झाकीर साथीला असेल तर तिथे झाडलोटीची कामं करूनसुद्धा कार्यक्रम बघण्याची तयारी असायची. कधी कधी एकाचवेळी दोन कार्यक्रम असतील तर साथीला कोणय ह्यावर ठरायचं, ह्या कार्यक्रमाला जायचं की त्या.

’अगं, त्या ह्याचं ऐकून तर बघ.....’ ह्या सूचनेचा जेव्हा राग यायला लागला, तेव्हाच कधीतरी झाकीर माझ्यासाठी एक निव्वळ तबला वादक न रहाता, अजून काहीतरी बनायच्या गतीत होता. व्यक्तीपूजा ही न कळत्या वयात होतेच होते..... अन ती व्हावीही.
माझ्याकडे फोटो लावून पूजा नव्हती इतकच काय ते. पण फोटो होताच. म्हणजे, होते. माझ्या एका सख्य्ख्या मित्राला फोर्टमध्ये हिंडताना झाकीरवर फ़ीचर केलेलं एक पुस्तक सापडलं होतं. त्यानं मला एका वाढदिवसाला भेट दिलं. तेव्हढ्याचसाठी त्याचे लाख अपराध माफ आहेत त्याला...... अजून.

दयानिता सिंग नावाच्या एका बयेनं त्याचे कृष्णं-धवल फोटो काढून ते पुस्तक केलं होतं. अनेक मोठ्या कलाकारांचे झाकीरविषयक मनोगतं, झाकीरचे स्वत:चे काही ’बोल’, त्याच्या कुटुंबाचे, बछड्यांचे फोटो असं ते पुस्तक. साहजीकच काही विशिष्टं पानांवर मी (जरा) जास्तं खोळंबत असे Happy
ते फोटो फीचर हाती येण्याच्या कितीतरी पूर्वीच हा वेगळा कलाकार ध्यानी येऊ लागला होता. त्याचं कलाकारांच्या सभेत इतर लहान-मोठ्या सगळ्याच कलाकारांना मान देणं, स्वत:चे तबले स्वत: उचलून स्टेजवर येणं, पाय समोर जुळवून, आपली वाद्यं हातात घेतलेल्या अवस्थेत, कमरेत पूर्ण वाकून समोरच्या श्रोतृवर्गाला नम्र अभिवादन करणं, त्याच्या विषयी न ऐकलेल्या व्यसनाच्या गोष्टी, वारंवार फोटो काढून कलाकारांच्या समाधीत व्यत्यय आणणार्‍या फोटोग्राफर्सना त्यानं तंबी देणं, संगीताच्या दरबारात बुजुर्ग कलाकाराला योग्य तो मान देण्याची जबाबदारी श्रोतृवर्गाचीही आहे हे त्याच्या एंट्रीला पडणार्‍या जादा टाळ्यांसाठी त्याचं प्रेक्षकांना समजावणं, एकदा साऊंड चेक केल्यावर कोणत्याच बारिक-सारिक सेटिंग्जना साऊंड टेक्निशियनने हातही न लावण्याविषयी त्याचा आग्रह, हे सगळं सगळं आत आत झिरपत होतं.

एक चांगला कलाकार होणं म्हणजे काय, ते कळत होतं असं तेव्हा वाटत होतं, हे आत्ता कळतय. आत्ता हे ही कळतय की एका चांगल्या कलाकाराची बाह्य स्वरूपातली वर्तणूक कशी असावी ह्याचा तो एक आदर्श म्हणून मला मनोमन पटला होता.

झाकीरचा प्रत्येक ना आणि प्रत्येक धा... किंबहूना प्रत्येक बोल हा एकमेव बोल आपण ह्या आयुष्यात तोही एकदाच वाजवणार आहोत अशा भक्तीने प्रत्येक वेळी कसा काय वाजतो? ठाय आणि मध्यम लयीत तब्येतीत वाजलेला बोल जितका स्वच्छ आणि मधूर तितकाच अतिद्रुत गतीतही... तिथेही तेच खणखणीत बोलणारं लखलखीत नाणं. ही किमया, असाधारण रियाजाची.
आपण ज्याला "प्रॅक्टीस" म्हणतो ना, ती नाही. डोळे बंद करून केलेला चक्कूताड्या-घोटाताड्या नाही. हा समजून केलेला योग आहे. अभ्यासपूर्णं अथक परिश्रम.

झाकीर तबला वाजवतो तेव्हा "झाकीर" "तबला" "वाजवत" नाही. झाकीर आणि तबला मिळून काहीतरी एकच वाजत असतं. ह्यालाच मला त्याचं आणि तबल्याचं अद्वैत म्हणायचय. तबला हे एक वाद्य न रहाता, त्याच्याच शरिराचा, मनाचा एक भाग असल्यासारखी एकरसता, एकतानता. गाणार्‍याचा कंठ जसा, तसंच. तो ’धा’ वाजवतो तेव्हा त्याच्या शरिराचा आणि मनाचा कणनकण ’धा’ बनून वाजतो....

zakir hussain.jpg

अगदी काहीच मोजके अपवाद सोडल्यास त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात, रेकॉर्डिंगमध्ये, काहीतरी, ’सध्या प्रचलित आहे’ त्याच्या पल्याडचं तो वाजवून गेल्याचं जाणवतं.
एक वेगळा विचार! तालाचा, तालाच्या वजनाचा, एखाद्या पारंपारिक तुकड्याचाही... पण वेगळ्या अंगाने केलेला विचार त्याच्या वादनात कुठेनाकुठेतरी सारखा डोकावत रहातो. मग ती गायनाला, वादनाला केलेली साथ असो किंवा त्याच्या स्वत:चा सोलो असो.
मग कधीतरी एखादाच कार्यक्रम त्यानं ’टाळ्यांसाठी’ वाजवल्यासारखं मला जाणवलं की, उगीच जीवाची तडफड होते. नवनवीन क्षितीजं रंगवू शकणार्‍या ताकदीची हुनर आज कित्ती गिरवण्यात खर्ची पडली..... असलं काहीतरी यडचापसारखं वाटत रहतं. त्याला कळलं तर तो ही म्हणेल, ’काहितरीच... रोज उठून कोण कसं रंगवेल नवीन क्षितीज?’

कॉलेजच्या अशाच एका चक्रम दिवशी कुणी एक म्हणाला, चल तुला झाकीर आणि वसंतरावांची एक ठुमरी कुणाकडेतरी ऐकवतो. ही फार जुनी गोष्टं आहे. तेव्हा ’सावरे अय जैयो’ चं रेकॉर्डिंग सर्वत्र आजच्या सारखं उपलब्ध नव्हतं. कुणीतरी लपवून केलेल्या रेकॉर्डिंगची ती कॉपी होती. ऐकायला त्यांच्याच घरी जाणं आवश्यक होतं. ’झाकीर’ ह्या शब्दांची आणि त्याच्या वादनाची भुरळ अशी की, मी त्या माहीत नसलेल्या घरी गेले. वेड्यासारखी ती टेप आम्ही परत परत ऐकली. अख्ख्या ठुमरीत कोणताही ठेका दोन आवर्तनापेक्षा जास्तं वेळा वाजवला नाहीये. वसंतरावांच्या चालीप्रमाणे ह्याचे ठेके बदललेयेत.
’दुप्पट लयीत लग्गी’, हा साथीच्या वादनाचा अविभाज्य भाग. पारंपारिक लग्ग्यांचे काही बोल आहेत, जे सगळेच वाजवतात. त्यालाही हटकून वेगळ्या बाजात लग्ग्या अजून काही जण वाजवतातही.
पण त्या ठुमरीत मी पहिल्यांदा असे बोल लग्गी म्हणून वाजवलेले ऐकले की जे बोल कुणी मला ’हं, हा घे लग्गीचा बोल’ म्हणून दिला असता तर मी कदाचित काय भंकस करतोय म्हणून एखादी ’चाट’ वाजवली असती, देणार्‍याच्याच पाठीवर....

त्याहुनही झेपल्या नाहीत त्या, त्याच्या उठान आणि पडण. उठान म्हणजे सरळ चाललेला ठेका सोडून लग्गी लावायला सुरूवात करण्याच्या जssरा आधी, नांदी म्हणून जो छोटा तुकडा वाजतो ना तो. हा ठेक्याच्या जमिनीला आणि लग्गीच्या आसमानाला जोडणारा ’टेक ऑफ’ आहे असं म्हणूया. आणि तेच पडणलाही लागू. तिनदा वाजणारा एक तुकडा घेऊन लग्गी सोडून तालावर यायचं.... ह्याला लॅंडिंग म्हणूया.
फुरशासारखी चाललेला लग्गी जेव्हा झाकीरने पडण घेऊन तालावर आणून सोडलीये तेव्हा ती अजगरासारखी सुस्तं न होता फडा काढलेल्या पिवळ्या आकड्यासारखी सळसळणारी, लुब्ध करणारी, जिवंत... होते.

छ्छ्या! ह्यांना काय लग्ग्या म्हणायचं? आयला, हा लग्गीतही "विचार" मांडतो..., हा वेगळा विचार मांडतो, असा विचार या पूर्वी कुणी केला नाहीये,.... असलेच विचार करीत घरी आले. हुरळून जाऊन आईला सांगितल्यावर तिनं अनोळखी घरी गेल्याबद्दल माझी ’जातीने ’विचार’पूस’ केल्याचं अजून आठवतं.

’झाकीर’ म्हटल्यावर मग जरा कान देऊन ऐकणं व्हायला लागलं. प्रत्येक कलाकार कलेची नवीन क्षितिजं आपल्यापरीने उघडायचा प्रयत्नं करतो, अत्त्युच्च शिखराचं टोक गाठायचा प्रयत्नं करतो, आणि जमलं तर त्यावरही अजून एक मचाण "आपल्यापरीने" तयार करतो. जेणेकरून पुढल्यांसाठी एक नवीन आव्हान तयार होतं.
हे प्रयत्नं तोकडे पडले तर, कुठल्यातरी खालच्याच शिखरावर पडाव पडतो आणि आयुष्यं नुस्तं त्या आधीच्यांनी बांधलेल्या शिखराच्या दिशेने प्रवासाचा प्रयत्नं करण्यात जातं.

झाकीरने नुस्ती नवीन क्षितिजं उघडली नाहीत तर प्रत्येक क्षितिजावर एकेक आपलं म्हणून शिखर रोवलय, असं माझं प्रामाणिक मत आहे.... हे, त्याच्यावरची माझी वेडी भक्ती शहाणी झाल्यानंतरचं मत!
त्याच्या काळापर्यंत घराण्याचे पेशकार, तोडे, कायदे, खास चीजा जशाच्या तशा साथीला वाजवण्याची परंपरा होती.
पण मुख्य गायक-वादक वाजवीत असलेला बाज, डौल, नोक-झोक, वजन उचलून त्यानुसार पारंपारिक, घराण्याच्या बंदिशींमधे योग्य तो बदल करून ते तोडे, तुकडे वाजवण्याची चाल त्यानं सुरू केली. हे माझं म्हणणं प्रमाण देऊन सिद्ध करता येण्यासारखं नाही.... त्यामुळे चूकही असेल. मी असं म्हणेन की माझ्या ऐकण्यानुसार..... ही आत्ता सर्वत्र दिसणारी साथीची विशिष्टं पद्धत ही त्याची देन आहे.

झाकीरचे कार्यक्रम किती बघितले ह्याची गणती नाही. लक्षात राहिलेला एक कार्यक्रम जो.... बघितलाच नाही. ’शक्ती’ ग्रूपचा एक कार्यक्रम ओपनएअर थिएटर मध्ये आहे, हे फार उशिरा कळलं. त्या दिवशी माझाच एका ठिकाणी कार्यक्रम होता. आधी कळूनही तसाही फायदा नव्हता कारण तिकिट परवडलं नसतं. पण योगायोगाने त्याचं साऊंड इंजिनियरिग करणार्‍या कुणा पारशी गहस्थाचा मुलगा, मी ज्याच्याबरोबर वाजवणार होते, त्याच्या वर्गात होता.
आणि आम्हाला अनुभवायाला मिळाला तो एक अविस्मरणीय साऊंड टेस्टिंगचा भाग. जो सर्वसाधारण प्रेक्षकांना कधी दिसतच नाही.
त्या ओपन एअर थिएटर मध्ये झाकीर, विक्कू विनायकराम (घटम), एल शंकर (व्हायोलीन), जॉन मॅक्लोफिन (१२ स्ट्रिंग गिटार) सगळे दुपारी दोनच्या लख्ख उन्हात साउंड टेस्टिंग करीत होते. ’हाताची घडी तोंडावर बोट’ ह्या अटीवर आम्हाला तिथे चार तास उभं राहून तो प्रकार बघायला मिळाला. रंगमंच फिरता होता त्यामुळे वर टांगलेले सोळा माईक्स, रंगमंचावरचे असेच आठ दहा माईक्स, झाकीर आणि विक्कूना दिलेले कॉलर माईक्स... ह्या सगळ्या सगळ्याचं सेटिंग करून ही मंडळी साडेसहाला परत आपापल्या मुक्कामी गेली. झाकीरने स्वत: येऊन साऊंड पॅनेल बंद केलय ना, ते बघितलं. ते लॉक करून फक्तं मास्टर वॉल्यूम वर खाली करता येणारे नॉब्स बाहेर ठेवले होते. म्हणूनच साऊंड टेक्निशियननी, कार्यक्रम चालू असताना कुणाच्याही सांगण्यावरून बटणं फिरवण्याचा त्याला किती मनस्ताप होत असेल ह्याची कल्पना आली.

संपूर्ण घामाने भिजलेला, पांढरा सुती झब्बा, जीन्समधला, डोळ्यावरचा काळा गॉगल आपल्या झुल्फांवर चढवून समाधानाने त्या साऊंड इंजिनियरच्या पाठीवर थाप मारणारा.. असा चार फुटांवर उभा झाकीर अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. कोपर्‍यात हाताची घडी, तोंडावर बोट अवस्थेतच अजून डोळे विस्फारून त्याच्याकडे बघणारी टकरी मुलगी त्याला दिसलीही नसेल, कदाचित.

तबल्याची टोनल क्वालिटी म्हणजे प्रत्येक बोलाची आस, नाद शुद्ध ठेवत वाजवणं ह्यावरची त्याची हुकुमत इतकी आहे की. तो एक "बेन्चमार्क".... एक प्रमाण मानतात. एका कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशींबरोबर ’जो भजे हरीको सदा’ वर वाजवलेला साधा भजनी ठेका आणि मधूर पारंपारिक लग्ग्याही जतन करून ठेवण्यासारख्या आहेत. त्याने वाजवलेले अनेक प्रचलित आणि अनवट तालातले सोलो मी जमा केलेत.

एका कार्यक्रमात एका पंधरा-सतरा वर्षाच्या बासरीवादक मुलाबरोबर झाकीरने इतक्या गंभीरपणे अष्टरूपक वाजवलाय की विचारू नका. रूपक हा सात मात्रांचा प्रचलित ताल आहे. रूपकचाच नोक-झोक ठेऊन एक जास्तीची मात्रा लागणारा हा आठ मात्रांचा ताल चकवा देतो.
मी प्रत्यक्ष पाहिलेल्या ह्या मैफिलीत, पहिल्या दहा मिनिटात त्या मुलाने एकदाही झाकीरना पेशकार, मुखडे-तोडे वाजवण्याचा इशारा केला नाही. झाकीरसारखं दैवत तबला वाजवतंय ह्याचं जराही टेंन्शन न घेता वाजवणारा तो वीर... झाकीर अपार कौतुकाने एकटक त्याच्याकडे बघत फक्तं ताल धरून बसला होता. त्याचा इशारा होईपर्यंत झाकीरने ताल सोडल्यास एकही जादा बोल वाजवला नाही. अन जेव्हा त्यानं परत गतीवर येऊन हसून त्यांच्याकडे बघितलं तेव्हा.... एखाद्या बुजुर्ग कलाकाराची परवानगी मिळाल्यावर नवखा तरूण तबलावादक ज्या विनयाने मान तुकवेल... तितक्या लीनतेनं झाकीरने तो इशारा उचलला होता.
त्या लहानग्याची झेप ओळखून झाकीर त्यानंतर नुस्ता ’सुटला’ होता. अतिशय लक्ष देऊन झाकीरच्या सगळ्या कोलांट्या होईपर्यंत एकाग्रचित्ताने त्याला गतीची साथ करीत हा मुलगा डोळे मिटून वाजवीत होता.

शेवटी प्रचंड चक्रीवादळासारखा घोंघावणारा झाकीर जेव्हा समेवर आला, तेव्हा आपल्या गतीच्या हिंदोळ्यावर त्याला अलगद झेलत त्या मुलानं गतीचं ते आवर्तन पूर्ण केलं. मगच बासरी खाली ठेऊन स्टेजला दोन्ही हात लावीत बसल्या जागेवरून झाकीरला वाकून नमस्कार केला. झाकीरही कमीचा नव्हता... त्यानं एक नजाकतदार "आदाब" त्याला परतभेटीत दिला, तिथ्थे स्टेजवर...
प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला... दोघांच्यातल्या कलाकाराला, माणसाला, सहस्त्रं मनांची दाद होती ती.

अशाच एका कार्यक्रमात उ. अमजद अली खानसाहेबांबरोबर सरोदला साथ करताना, अतिद्रुत गतीत झाल्याला, सरोदची तार तुटली. ती लय सुटू नये म्हणून खानसाहेबांची तार लावून होईपर्यंत झाकीर कमी आवाजात त्या मॅड लयीत तीनतालाचे नुस्ते ठेके वाजवीत होता. एकही ठेका, तोडा त्याने परत वाजवला नाही, लय जराही हलली नाही, कोणत्याच तुकड्याचे बोल जराही अस्पष्ट किंवा बोबडे वाजले नाहीत, तबल्याचा आवाजही इतकाच होता की, तार लावून झाल्यावर खा साहेबांना ती परत स्वरात लावताना त्यांचा तानपुरा ऐकू यावा.
इतकी व्यवधानं संभाळीत वाजवणार्‍या झाकीर नामक देहाचे, डोळे मिटलेले... तो आत्ममग्नं चेहरा, वाजवणारे हात, समोरचा तबला, त्यातून निघणारे बोल... हे सारं सारं एकरस, एकसंध, संततधार बनून वहात होतं.
धुंदीत तो जे काही वाजवीत होत, ते इतकं वेधक होतं की, .... क्षणमात्रं विचार मनात येऊन गेला.... तार लागूच नये, ना!
एकामागेएक निघाल्या ठेक्यांची, तोड्यांची, बोलांची ती सळसळणारी जिवंत धारा बघून वाटलं.... आपण ह्या वेगळं असू नये.... ह्यातलाच एखादा तोडा बनून वाहून जावं....

लक्ष्मण झुल्यापासची गंगेची अधीर धारा बघून असंच वाटलं होतं, मला.... ह्या असल्या जळावर्ताला, ह्या ओघाला, ह्या चैतन्याला, कशाला हवा तीर? होऊन जाऊदे ना, जळ-मळ... एक!
समाप्तं
तळटीपः हे छायाचित्रं माझं सगळ्यात आवडीचं आणि दयानिता सिंगच्या त्या फीचमधून घेतलय.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अप्रतिम, मी अजून त्यांचा एकही कार्यक्रम पाहिलेला नाही परंतू तबलावादन तुकड्यात ऐकले आहे आणि त्यांचा पंखा झालो आहे.

दाद...लकी आहेस .. सुंदर लिहीलयस Happy

'शक्ती' तर केवळ जबरदस्त... आणि नंतर आलेली 'रिमेंबरींग शक्ती' - पं हरीप्रसाद चौरसियांबरोबर... शब्दच नाहीत.

सगळी फॅमिलीच ताल आणि सुर यांचा एक अथांग सागर Happy

वडिल उस्ताद अल्ला रक्खा यांच्या स्मरणार्थ फेब्रुवारीत खास कार्यक्रम असतात. यात झाकिरभाई, त्यांचे भाऊ फैजल कुरेशी आणि तौफिक कुरेशी, तौफिक ची पत्नी गीतिका वर्दे आणि मुलगा शिखरनाद.. सगळ्यांचा सहभाग असतो.

शेअर्ड मोमेम्ट्स, टुगेदर, रिधुन... कित्येक जुगलबंद्या... कित्येक सोलोज... कित्येक अल्बम्स .. कितीही ऐकल तरी अवीट Happy

देवकृपेने झाकिरभाईंचे ३ -४ कार्यक्रम आणि एक खाजगी मैफिल अटेंड करायला मिळालिये. खरच स्वर्गिय अनुभव. सदैव आठवणीत रहातिल असे Happy

मी झाकीरांना अनेकदा रविशंकर, हरिप्रसाद आणि शिवकुमार ह्यांचासोबत प्रत्यक्ष ऐकले आहे. दरवेळी तिच मजा. अन तेही ह्या कलाकारांसोबत केलेल्या अतिद्रुत आणि संथ लयीमधील जुगलबंद्या. त्यातील एक मिल्वॉकीची केवळ अप्रतिम! शिवकुमार आणि झाकीर. आणखी एक सोलो त्यांचा पुणे विद्यापिठात ऐकला होता. अफाट कार्यक्रम होता तो. त्यांच्या रविशंकर बरोबरचा अनेक मैफिली, मग ती रविशंकरांची चंचर मधिल एक धुन अन त्याला झाकीरांचा तिनताल असो की बैरागीची तोडी, झाकीर सोबत असले की बास!

शलाका, ग्रेट लेख.

अशा आठवणी बाहेर पडायला पाहिजेत.

मी झकीरला दोन तीन वेळा ऐकलंय. प्रत्येक वेळी वेगळीच नशा आली. तो महान आहे. मला तबल्यातलं फारसं कळत नाही; पण जे ऐकलं होतं ते अत्यंत सुंदर होतं. विशेषत: तो जेव्हा अगदी हळू वाजवतो तेव्हा तर त्याचं एकच बोट तबल्यावर असतं ते हलल्याच जाणवत सुद्धा नाही, सगळीकडे पिनड्रॉप सायलेन्स असतो आणि तबला आपोआप बोलत असतो. दुसरं कुणीही हे करू शकत नाही.

झाकीर तबला वाजवतो तेव्हा "झाकीर" "तबला" "वाजवत" नाही. झाकीर आणि तबला मिळून काहीतरी एकच वाजत असतं. >> या वाक्यातच सर्व काही आले.

अप्रतिम .. लेखाचा विषय आणि लेख त्याहून अप्रतिम!!

रिमेंबरिंग शक्ती, जॉर्ज ब्रुक्स बरोबरचा कार्यक्रम २ वेळा आणि अजुन २ मैफिली ऐकण्याचे भाग्य लाभले Happy

प्रत्येक प्रेक्षक स्पेशल आहे असे वाजवतो. अगदी लहान मुले असतील तर मग त्यांच्यासाठी पण. अप्रतीम कलाकार.

अप्रतिम लेख, दाद.
झाकिरच्या व्यक्तीमत्वाची जादू इतकी, कि त्याच्या वादनातले असे बारकावे कधी आमच्या लक्षातच येत नाहीत.

उत्तम लेख. कालचा रविवार झाकीर व रविशंकर हरिप्रसाद यांनाच समर्पित होता त्यामुळे आज सकाळी हे वाचून अगदी उत्तरपूजा झाल्यासारखे वाट्त आहे. केदारच्या पोस्टीस अनुमोदन. शिवकुमारजी, रविशंकरजी, हरिप्रसादजी व झाकीरजी एकत्र असले कि अगदी स्वर्ग. आपण पामराने नुसते ऐकायचे.

अप्रतिम लेख दाद ..

झाकीर तबला वाजवतो तेव्हा "झाकीर" "तबला" "वाजवत" नाही. झाकीर आणि तबला मिळून काहीतरी एकच वाजत असतं. >> या वाक्यातच सर्व काही आले..... >>> अगदी अगदी....

धन्यवाद दर्दीज....
"पुरे.... आता जीभेचे तुकडे पडतील...." असं झाकीरबद्दल बोलायला लागले की घरचे म्हणायचे.
इथे आला होता गेल्याच वर्षी, जगभराचे रिदमिस्ट घेऊन. लेकाला घेऊन गेले होते. ऑपेरा हाऊस मधे जो काही धुमाकूळ घातलाय.... तो केवळ अप्रतिम. तरीही त्या सगळ्यात "झाकीर" फारसा "भेटला" नाही. नुस्ता रस्त्याच्या पलिकडून हात करून निघून जावं तसं वाजवलन Sad
"कडकडून भेटावा" असा फक्तं भारतात आणि अमेरिकेत वाजवतो का काय हल्ली?
असो...
काळ मागे नेऊन काही क्षणांची साक्षी होण्याचं वरदान मिळालंच तर.... ह्या पठ्ठ्याला त्याला, स्वतःलाच "ना" गवसतानाचा क्षण मी निवडून ठेवलाय....

दाद,

माझा नवरा आला होता त्या कार्यक्रमाला ऑपेर हाऊस मधे Happy त्याने रीव्ह्यु दिला होतान सगळा Happy अजुन आठवण काढतो तो त्या कार्यक्रमाची Happy

मागच्या वर्षी १५ ऑगस्ट ला फ्रिडम कॉन्सर्ट साठी उस्ताद अमजद अली खान आणि या वर्षी १५ ऑगस्ट ला सिडनी युनी मधे पं शिवकुमार शर्मा आणि पं हरीप्रसाद यांच्या कॉन्सर्टसना पण तो आला होता Happy

मी लेक अजुन लहान आहे म्हणुन येऊ नाही शकत सध्या Sad

अप्रतिम Happy

झाकीर तबला वाजवतो तेव्हा "झाकीर" "तबला" "वाजवत" नाही. झाकीर आणि तबला मिळून काहीतरी एकच वाजत असतं. >>> वा!

१५-१६ वर्षांच्या त्या बासरीवादक मुलासोबतचा किस्सा वाचून रोमांच उभे राहीले.

सुरेख लेख, दाद! शनिवारवाड्याला त्यांचा एक संपूर्ण कार्यक्रम मी बॅकस्टेजला उभं राहून अनुभवला होता..... विलक्षण! नंतर कितीतरी वेळ मी पार नि:शब्द झाले होते.....

दाद,
ज्या उत्कटतेने, आणि समरसून हा लेख लिहिला आहे, त्याची खरोखरच 'दाद' द्यायला हवी.अशी उत्कटता आणि पॅशन खूप कमी लिखाणात दिसून येते.( आता तू माझी ’धा-धा’गिरी असे पुस्तेक लिहावेस, असे सुचवतो Happy ) .लिहीत रहा.
-मानस६

Pages