टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा नियम

Submitted by संयोजक on 22 August, 2010 - 06:27

TakaooTunTikaoo_Poster_2010.jpg

ग्लोबल वॉर्मिंग, रिसायकल - रिड्युस - रियुज, कॉम्पोस्टींग हे शब्द सतत कानावर पडतात. आपण नक्की काय करावे हे समजत नाही. काहीतरी करावेसे मात्र वाटते. नुसते हातावर हात ठेवून बसून चालणार नाही असे वाटते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण एक नवीन संकल्प सोडूया की जे जे शक्य आहे ते ते सर्व मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुनःपुन्हा वापरणार. म्हणूनच -

गेल्या ४ वर्षातल्या कित्येक ड्रेसेसच्या बाह्या पिशवीत पडून आहेत?
गेल्या कित्येक वर्षांत आलेल्या पत्रिका, भेटकार्डं साठवून ठेवलीत?
जॅम, सॉसच्या बाटल्या साठवल्या आहेत?
रिमॉडेलिंगच्या वेळच्या टाईल्स शिल्लक आहेत?
जुने कपडे वापरावेसे वाटत नाहीत आणि टाकून द्यावेसे वाटत नाहीत?

काय करावे सुचतेय का? बघुया कल्पकतेने आपण हे सामान वापरून एखादी वस्तू बनवता येते का? अरे वा! काहीतरी सुचले? मग चला तर मायबोलीच्या 'टाकाऊतून टिकाऊ' या स्पर्धेमध्ये भाग घेऊयात!!!!

'टाकाऊतून टिकाऊ' या स्पर्धेसाठी नियम -
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. या स्पर्धेसाठी तयार केलेल्या वस्तू स्वतः तयार केलेल्या असाव्यात.
३. तयार झालेल्या कलाकृतीचा फोटो येथे देणे बंधनकारक आहे.
४. कलाकृतीसाठी लागणार्‍या साहित्यात अर्ध्याहून अधिक वस्तू वापरल्या नसत्या तर टाकून दिल्या असत्या अशा प्रकारच्या असाव्यात.
५. टाकाऊ वस्तू कशी वापरली गेली हे लिहिणे आवश्यक आहे.
६. तयार झालेली कलाकृती वापरली जाईल, कोणाला भेट देता येईल अशी असावी.
७. या स्पर्धेला विषयाचे बंधन नाही. एखाद्या पदार्थापासून ते बागेतल्या कचर्‍याचे व्यवस्थापन ते घरातल्या बाटल्यांना रंगवून पुनर्वापरापर्यंत कोणतीही कलाकृती यामध्ये समाविष्ट करता येईल.
८. शक्य असेल तर फोटोसहित टप्प्या-टप्प्याने वस्तू कशी तयार केली (फोटो दिलेत तर उत्तम), हे लिहीले तर ज्यांना तुमची कलाकृती तयार करावी असे वाटेल त्यांना समजण्यासाठी सोपे पडेल.
९. या स्पर्धेचा निकाल परीक्षकांमार्फत लावला जाईल आणि तो बंधनकारक असेल.

प्रवेशिका कशा पाठवाल?
१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ-मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इ-मेल पाठवताना Taakaautun Tikaau असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र विनंती : स्पेलिंगमधल्या चुका टाळण्यासाठी इथूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. संयोजकांना इ-मेल पाठवताना, छायाचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb पेक्षा जास्त नसावे.
४. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठवताना इ-मेल मधे छायाचित्राची प्रत जोडावी. त्याच बरोबर मायबोली आयडी लिहावा.
५. प्रवेशिकेमध्ये ४ पेक्षा जास्त छायाचित्रं नसावीत. प्रत्येक पायरीचे छायाचित्र अपेक्षित नाही, परंतू जोडत असलेले छायाचित्र कोणत्या पायरीचे (स्टेप) आहे हे त्या पायरीचा क्रमांक देऊन व्यवस्थित नमूद केलेले असावे. महत्त्वाच्या व आवश्यक अशाच पायरीचे छायाचित्र जोडावे.
६. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर ती प्रवेशिका स्पर्धेच्या धाग्यावर प्रकाशित होण्यास २४ तासाची मुदत द्यावी. २४ तासानंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.

प्रवेशिका स्वीकारण्यास गणेश चतुर्थीला सुरूवात होईल व अनंत चतुर्दशीपर्यंत स्वीकारल्या जातील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पना मस्त आहे! प्रवेशिकांची अंतिम तारीख काय? नुकतेच माबो सदस्य झालेली मंडळीही भाग घेऊ शकतात ना? (त्या निमित्ताने अशा कलाकृती करणारे मित्र-मैत्रिणी माबो सदस्यत्व घेतील असे वाटते! :फिदी:)

स्पर्धा व कार्यक्रमांना गणेश चतुर्थीला (११ सप्टेंबर) सुरुवात होईल व प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिवस अनंत चतुर्दशी (२२ सप्टेंबर) हा असेल.

ही स्पर्धा मायबोलीकरांसाठीच आहे.

मस्तच. स्पर्धेच्या निमित्ताने अडगळीची खोली आवरायला काढता येईल. Happy
अर्थात मी टिकाऊतून टाकाऊ मध्ये जास्त पटाईत आहे, तरीही नक्कीच प्रयत्न करणार. Happy

आशूलिका,
स्पर्धा ११ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीमधे होणार आहेत. स्पर्धा संपल्यानंतर परिक्षकांनी कलाकृती पाहून त्यांना विजेता घोषीत करायला किती वेळ लागेल त्यावर स्पर्धेचा निकाल कधी लावला जाईल हे ठरेल त्यामुळे नक्की तारिख देऊ शकत नाही पण लवकरात लवकर विजेत्या स्पर्धकांची घोषणा केली जाईल.

चला मंडळी लागा कामाला!!!

मोरया!!!!

दीपांजली,

या स्पर्धेसाठी एक आयडी कितीही प्रवेशिका पाठवू शकतो. पण शक्यतो त्या सगळ्या प्रवेशिका वेगवेगळ्या प्रकारच्या असाव्यात.

कल्पना छानच आहे.
यात (जरा मोठ्या) मुलांनी भाग घेतला तर चालेल का? अर्थात सगळे एकाच गटात असतील..

अनकॅनी,

तुम्हाला उत्तर द्यायला उशीर झाल्याबद्दल दिलगीर आहोत. तुमचा मुलगा/मुलगी जर १५ वर्षांपेक्षा लहान असेल तर त्यांची कलाकृती किलबीलमधे देऊन त्यावर हे टाकाऊतून टिकाऊ आहे हे मधल्या काही पायर्‍यांचे फोटो देऊन लिहीता येईल.

धन्यवाद.

'टाकाऊतून टिकाऊ' या स्पर्धेसाठी एकापेक्षा जास्त कलाकृती पाठविल्या तर चालेल का? आणि एकावेळी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता येईल का?

आशुलिका,

वरती दीपांजली यांच्या याच प्रश्नाला आम्ही हो असे उत्तर दिलेले आहे Happy टाकाऊतून टिकाऊसाठी कितीही प्रवेशिका पाठवू शकता पण त्या एकाच प्रकारच्या असू नयेत.

एकावेळी तुम्ही सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकता. त्या त्या स्पर्धेचे नियम लागू होतील.

संयोजक.

सॉरी संयोजक, आपण दीपांजली यांच्या प्रश्नाला दिलेले उत्तर मी उशीरा पाहीले - तसदीबद्दल क्षमस्व Sad आणि पुन्हा उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद Happy

वर्षा,
तुमच्या आईंना मायबोलीचे सदस्यत्व घेण्यास सांगून त्यांनी स्वतःची प्रवेशिका टाकण्यास हरकत नाही.

संयोजक.

अरे वा हि पण स्पर्धा आहे काय? ह्म्म.. आठवले ते दिवस...9th grade मध्ये असताना ह्या प्रकाराने आईचे डोके उठवले होते.. घरात पसारा करून सगळे न्युज पेपर गोळा करून भिजवून कांजी टाकून (ह्याचा वेगळाच वास येतो तसा) पेस्ट बनवून आकार देवून, रंगवून त्याचे मग मस्त बोल नी काय काय बनवलेले..(आता इथेच आयडिया देत नाही सर्व) Happy

पुन्हा करायला संधी मिळणार... धन्यावाद संयोजक.

संयोजक मंडळी, प्रवेशिका - वर्ड डॉक्युमेंट फॉर्मॅट मधे पाठवली तर चालेल का? प्रकाशचित्र त्यतच एम्बेड केली तर चालतिल का?

Pages