तिथे तटावर लाटा

Submitted by जया एम on 21 August, 2010 - 12:04

लाटा कुरळ्या बटांच्या पोरी अवखळ भारी
झिम्मा फुगड्यांचा दंगा रोज घुमे घरी दारी

असा धरुनिया फेर त्यांनी हादगा मांडला
जीव ऐलमा पैलमा, जीव पाण्यात सांडला

लाटा भरतीच्या सख्या, त्यांना ओहोटीचे काय
खेळ तळ्यात मळ्यात पोरी भिजविती पाय

समुद्राच्या तटावरी धुंद उसळती लाटा
शुभ्र अभ्रकी ओढीने जाती फेसाळत वाटा

त्यांची खळाळ भरारी खडकाला धडकली
तेव्हा त्याच्या कपारीत काही स्वप्ने अडकली

थेंबभर ओले सुख जन्म भरून वाहिले
शिंपल्याच्या मनी कोण मोती बनून राहिले

तिथे तटावर लाटा इथे जीव झाला पाणी
मनी वारा गात गेला काही मन्त्रमुग्ध गाणी

अशा सोज्वळ दुपारी सूर्य आर्द्र मऊ झाला
आणि दिवसाला कैवल्याचा स्पर्श होऊ आला

थोडी खुपणारी वाळू थोडे मखमली ऊन
माये आयुष्य उसळे आज लाटालाटातून

गुलमोहर: 

!

क्या बात है! जया तुमच्या कविता फारच सुंदर असतात.

यमकांशी व व्याकरणाशी कुस्ती खेळून इथे पद्य लिहणार्‍यांनी त्या वाचून, त्यातून नक्कीच शिकावे.

!!!!

अजूनही मला कविता पूर्ण कळाली असे म्हणता येत नाही, पण केवळ शब्दरचनेसाठी सुद्धा तुमच्या कविता वाचायला अतिशय आवडतात. ही पण अतिशय सुंदर आहे!

फारेंडाला अनुमोदन...
पण तुमच्या कविता वाचताना मनाला एक वेगलाच आनंद मिळतो, समाधान मिळते हे नि:संशय !

क्या बात है... ही पण खुप आवडली...
-- अशा सोज्वळ दुपारी सूर्य आर्द्र मऊ झाला------ अहाहा :-)...

अशा सोज्वळ दुपारी सूर्य आर्द्र मऊ झाला
आणि दिवसाला कैवल्याचा स्पर्श होऊ आला

थोडी खुपणारी वाळू थोडे मखमली ऊन
माये आयुष्य उसळे आज लाटालाटातून

या ओळी लाटांसारख्या मनात हिंदोळे घेतात.

आज परत वाचली , परत परत वाचाविशी वाटते .
जर ह्या कवितेला स्वरतालात गुंफलं तर काय मस्त होईल. ( जर कवयत्रीची हरकत नसेल तर ).

मस्त मस्तच..

यमकांशी व व्याकरणाशी कुस्ती खेळून इथे पद्य लिहणार्‍यांनी त्या वाचून, त्यातून नक्कीच शिकावे.<<<
याला +१०००००००००००००००००००००००००

Pages