फोटोग्राफी : फिल्टर्स

Submitted by सावली on 25 July, 2010 - 19:59

मी SLR फोटोग्राफी सुरु केली तेव्हा फिल्टर म्हणजे काय ते माहीतच नव्हतं. एकदा भावाने रंगीत फिल्टर आणून दिले मला. दोघानाही हे कसे वापरायचे ते माहीत नाही पण उत्साह दांडगा होता. त्या फिल्टर किट मध्ये निळा, पिवळा, लाल, हिरवा आणि केशरी असे रंग होते. आता ते तसेच लेन्स पुढे लावून काढले कि त्याच रंगात न्हालेला फोटो यायचा. आम्ही तसेच काही रंगीत फोटो काढले आणि नंतर तो फिल्टर किट फारसा वापरेनासा झाला. मग पुढे बऱ्याच दिवसानी आम्हाला कळल कि ते रंगीत फिल्टर कृष्णधवल फोटोग्राफी साठी असतात. पण आम्ही कधीहि त्याने कृष्णधवल फोटोग्राफी केली नव्हती!

एकदा कुठूनतरी आम्हाला एक फिल्टरच ब्रोशर मिळालं. त्यातले तऱ्हेतऱ्हे फिल्टर पाहून तर मला अस झालेलं कधी एकदा हे मिळतायेत आपल्याला. पण त्यांच्या किमतीही अफाट होत्या डॉलर मध्ये लिहिलेल्या. आणि आमच्या माहितीप्रमाणे ते सगळे फिल्टर मुंबईमध्ये मिळतही नव्हते. बाबांच्या एका मित्राने सर्क्युलर पोलरायाझर फिल्टर घ्यायला सांगितला तो हि वापरायचे पण तसे फारसे फायदे घेतेवेळी माहीत नव्हतेच.

मग जस जस वाचन वाढलं आणि फोटोग्राफी वाढली तसतस बऱ्याच गोष्टी नीट कळायला लागल्या. पुढे जपानला आल्यावर तर मी कॅमेऱ्याच्या दुकानात तासंतास असायचे नुसत बघत. तेव्हा जपानी वाचता येत नव्हतं तरी नुसत बघायचं काय आहे ते. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे कुठल्याही कॅमेऱ्याचे मॉडेल हाताळून बघता यायचे. अजूनही ती दुकान माझी आवडती वेळ घालवायची जागा आहेत.

तुम्हीही कधी दिव्यांच्या जागी ताऱ्यांप्रमाणे दिसणारे, मधेच इंद्रधनुष्य असणारे, एकाच फोटोमध्ये एकच व्यक्ती अनेकवेळा दिसणारे (मल्टीपल एक्स्पोजर), कधी नुसते निगेटिव्ह प्रमाणे दिसणारे फोटो बघितले असतील ना. किंवा अगदी उठावदार इंद्रधनुष्य, गडद निळ आकाश, सुंदर मोरपिशी समुद्र असलेले फोटोही बघितले असतील. हि सगळी बहुतेकवेळा फिल्टरची कमाल. बहुतेकवेळा अशासाठी कि फोटो एडीट करूनही असे काही इफेक्ट मिळवता येतात.

फिल्टर म्हणजे काय बर? तर कॅमेऱ्याचा चष्माच. जसा चष्मा लावाल तस चित्र दिसेल. हे फिल्टर कॅमेऱ्याच्या लेन्सच्या समोर लावायचे कि हवा तो इफेक्ट मिळतो. आतापर्यंत ज्याना फिल्टरबद्दल माहीती नाही त्यांची उत्सुकता फारच ताणली असेल ना? मग चला तर फिल्टरच्या दुनियेत एक छोटासा फेरफटका मारुयात.

फिल्टरमध्ये वापरण्याच्या पद्धतीप्रमाणे दोन मुख्य प्रकार असतात. स्क्र्यु इन आणि स्क्वेअर.

स्क्र्यु इन फिल्टर :

हे गोल फिल्टर असतात. कॅमेऱ्याच्या लेन्सचा सगळ्यात बाहेरचा भागाला स्क्र्यु सारखे थ्रेड असतात. त्यावर हे फिल्टर बाटलीच्या झाकणासारखे फिरवून बसवता येतात. म्हणजे लेन्सचा जितका व्यास (डायमीटर) असतो तीतकाच फिल्टरचापण व्यास असावा लागतो. मग तुमच्या कडे जास्त लेन्स असतील तर प्रत्येक लेन्स साठी एक फिल्टर घ्यावा लागतो.
सगळे फिल्टर प्रत्येक उपलब्ध लेन्सच्या व्यासाच्या मापाचे फिल्टर विकत मिळतात. त्यामुळे तुमच्या लेन्स चा व्यास बघुन त्यानुसार फिल्टर घ्यावा. लेन्स समोरून बघितली तर तिच्या कडेवर व्यास लिहिलेला असतो.

फोटो कोकीन च्या साईट वरून  http://www.cokin.com/ico7-p1.html

स्क्वेअर फिल्टर:

हे फिल्टर नावाप्रमाणे चौरस असतात. या फिल्टरसाठी एक फिल्टर होल्डर मिळतो. तो कॅमेऱ्याच्या लेन्स वर बसवायचा. आणि त्यात हे फिल्टर बसवायचे. याचा फायदा असा कि फिल्टर महाग असतात. प्रत्येक लेन्स साठी एक फिल्टर घेणे फार महागात पडते. त्याऐवजी एकच चौरस फिल्टर घेऊन तो सगळ्या लेन्स साठी वापरता येतो. यात फक्त प्रत्येक लेन्स साठी एक अडाप्टर रिंग घ्यावि लागते आणी ती फारच स्वस्त असते. ती वेगवेगळ्या साइज मधे उपलब्ध असते.

फोटो कोकीन च्या साईट वरून http://www.cokin.fr/ico15-A.html

तर आता हे फिल्टर नक्कि काय करतात आणि कुठल्या प्रकारचे फिल्टर असतात हा हि प्रश्न येणारच ना मनात. चला तर मग बघुयात.

एन डी फिल्टर (न्युट्रल डेन्सिटी फिल्टर):

तुम्ही कधी कधी सकाळपासून प्रवास करून भर दुपारी तुमच्या इप्सित स्थळी एखाद्या धबधब्याजवळ पोहोचता. तिथे तुम्हाला फोटोग्राफी करायची असते. पण बाहेर बघाव तर भगभगीत दुपार. धबधब्यामधल पाणी अगदी प्रकाशाने न्हाऊन निघालेलं असतं. अशावेळी तसेच फोटो काढलेत तर काय होत बर? धबधबा नुसता पांढराफेक (ओव्हर एक्सपोज) येतो. किंवा तुम्हाला पाण्याच्या मृदू धारा दाखवायच्या असतात पण प्रकाशामुळे शटरस्पीड (याबद्दल मी नंतर पुढच्या लेखात लिहीन) कमी करता येत नाही आणि फोटोत पाण्याचे शिंतोडे दिसत रहातात. अशावेळी कामी येतो तो एन डी फिल्टर.

हा फिल्टर कॅमेऱ्या येणारा प्रकाश कमी करतो पण रंग मात्र बदलत नाही. हा फिल्टर वापरून तुम्हाला भगभगीत दुपारी सुध्दा चांगले फोटो काढता येतील.

यात तीन शेड असतात. एन डी फिल्टर २ (१ स्टॉप ), एन डी फिल्टर ४(२ स्टॉप) आणि एन डी फिल्टर ८ (३ स्टॉप). एन डी फिल्टर ८. हा सगळ्यात जास्त गडद असतो.

एन डी फिल्टर वापरून दुपारी काढलेला हां धबधब्याचा फोटो (अकिकावा )

ग्रॅजुएटेड एन डी फिल्टर:

कधी कधी काय होत कि आकाश तेवढ खूप पांढर असतं पण खालचा भाग जस जमीन डोंगर इ. कमी प्रकाशात असतं यावेळी पूर्ण एन डी फिल्टर वापरला तर खालचा भाग गडद काळा (अंडर एक्सपोज) होण्याची शक्यता असते. अशा वेळी हे फिल्टर वापरता येतात. यात फिल्टर वरती गडद असून खालपर्यंत फिकट होत जातात. सूर्यास्त सूर्योदय असे फोटो काढायला असे फिल्टर उपयोगी ठरतात.

यु व्ही फिल्टर:

कॅमेऱ्यामध्ये वापरण्यात येणारी फिल्म यु व्ही रेज सेन्सिटिव्ह (अतिनील किरणे) असते. म्हणजे या किरणांमुळे फोटोवर परिणाम होऊ शकतो. जेव्हा वातावरणात यु व्ही रेज (अतिनील किरणे) जास्त असतात. तेव्हा काढलेले फोटो निळसर येतात. म्हणून हे फिल्टर वापरण्यात आले. या फिल्टर मुळे यु व्ही किरणे थांबवली जाऊन फोटो मध्ये निळसर झाक येत नाही.

पण डिजीटल कॅमेऱ्या मध्ये हि भिती नाही. कारण डिजीटल कॅमेऱ्यामधला सेन्सर यु व्ही रेज सेन्सिटिव्ह नसतो. त्यामुळे डिजीटल कॅमेरा वापरणाऱ्यानी हां फिल्टर घेण्याची गरज नाही.

बरेचजण लेन्सचा धुळीपासून आणि चरे पडण्यापासून बचाव करायला यु व्ही फिल्टर वापरतात. अगदी वापरायचाच असेल तर डिजीटल कॅमेरा वापरणाऱ्यानी नुसता प्रोटेक्तीव्ह फिल्टर वापरला तरी चालतो.

रंगीत फिल्टर:

वर म्हटल्याप्रमाणे हे रंगीत फिल्टर कृष्णधवल फोटोग्राफी मध्ये वापरले जातात. फोटोचा गडदपणा (Contrast ), वैगरेचा योग्य परिणाम साधण्यासाठी वापरतात.
हे हि आता डिजीटल कॅमेऱ्यामध्येच कृष्णधवल फोटोग्राफीची सुविधा असल्याने डिजीटल फोटोग्राफी मध्ये वेगळे फिल्टर असण्याची गरज नाहीये.

पोलारायझर फिल्टर (CPL): किमयागार

फोटोमध्ये दिसणार गडद नीळ आकाश, अगदी पारदर्शक मोरपिशी रंगाचा समुद्र, सुंदर रंगीत इंद्रधनुष्य, अगदी उठावदार रंग अस काही असलं कि फोटो अगदी मनात घर करतो कि नाही? हि सगळी किमया बऱ्याच वेळा या फिल्टरची असते बर. हे फिल्टर निळ्या आकाशाला अधिकच गडद बनवतात. पांढरे ढग आणि आकाशातल contrast वाढवतात त्यामुळे ढग अगदी उठावदार दिसतात. आकाशातल्या इंद्रधनुष्याचे रंग देखील हां फिल्टर अगदी उठावदार दाखवतो. तलाव समुद्र याचा फोटो काढताना पाण्यावर प्रकाश परावर्तीत होऊन पाणी चमकत आणि फोटोच एक्स्पोजर चुकवतो. पण हा फिल्टर असेल तर मात्र या चमकणाऱ्या पाण्याला थांबवता येते.
एवढच काय पण अगदी काचेच्या खिडकीतून काढलेल्या फोटोमध्ये सुद्धा मधली काच न् दाखवण्याची जादुगिरी हां फिल्टर करू शकतो. अस नक्की काय बर असतं याट जरा माहिती करून घेऊयात.

या फिल्टरमध्ये पोलराइज्ड प्रकाश फिल्टर करण्याची किंवा हवा असल्यास जाऊ देण्याची क्षमता असते. म्हणजे नेमक काय तर. पाणी किंवा धातूच्या वस्तूवर प्रकाश पडल्यावर जो प्रकाश परावर्तीत होतो तो जशाच्या तसा कॅमेऱ्याच्या लेन्स मधून जाऊ देण्यासाठी किंवा गरज पडल्यास थांबवण्यासाठी हां फिल्टर वापरतात.
फार कठीण वाटतय का हे वाचायला? म्हणजे बघा तुम्ही एखाद्या तलावाचा फोटो काढताय आणि त्या तलावाच पाणी प्रकाशामुळे खुपच चमकतंय. अशा वेळी हां फिल्टर नीट वापरला तर त्या पाण्याची चमक घालवून फोटो काढता येतो.
आपल्या ऑटोफोकस कॅमेर्यामध्ये शक्यतो सर्क्युलर पोलारायझर फिल्टर (CPL) वापरतात. तो स्क्र्यु इन प्रकारचा असतो.

या सर्क्युलर पोलारायझर फिल्टर मध्ये एक गोल फिरणारी रिंग असते. फिल्टर लेन्सला पुढे घट्ट लावल्यावर हि रिंग फिरवता येते आणि या रिंग ने पोलराइज्ड प्रकाश फिल्टर करता (थांबवता) येतो किंवा हवा तेव्हा जाऊ देता येतो.
जेव्हा सूर्य किंवा प्रकाश स्त्रोत आपल्या लेन्स च्या ९० अंशामध्ये असतो तेव्हा या फिल्टर च काम जास्तीत जास्त क्षमतेने होत. म्हणजे जर आपण फोटो काढताना सूर्य आपल्या उजवी किंवा डावीकडे असेल तर जास्तीत जास्त पोलारायझिंग इफेक्ट मिळतो.

हे डिजीटल किंवा फिल्म दोन्हीमध्ये अगदी उपयुक्त प्रकारचे फिल्टर आहेत. या फिल्टरने कॅमेऱ्यात पोचणारा प्रकाश कमी होतो ( १ ते २ स्टॉप ) त्यामुले कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी वापरता येत नाही.


बसच्या काचेच्या खिडकीतून काढलेला फोटो. काच आहे अस अजिबात वाटत नाहिये. (माउन्ट फूजी )


फिल्टर शिवाय काढलेला फोटो. पानी आणि झाडांचे रंग कसे आहेत ते बघा (कावागुची को )


हाच फिल्टर लावून काढलेला फोटो. रंग किती ताजेतवाने आणि पाण्यात प्रकाश परावर्तन नाहीच. (कावागुची को )


फिल्टर शिवाय काढलेला फोटो. पानि आकाश आणि झाडांचे रंग कसे आहेत ते बघा (कावागुची को )


हाच फिल्टर लावून काढलेला फोटो. रंग किती ताजेतवाने आणि आकाशातले ढग अगदी उठावदार. (कावागुची को )


इन्द्र धनुष्याचे रंग कसे खुललेत ना. (पोर्ट)

डीफ्युझींग फिल्टर:

स्व्प्नामधले असल्यासारखे देखावे, चमकणार उबदार दिसणार उन , चेहेऱ्याभोवती असणारी आभा, आणि चमकदार चेहेरा या आणि अशा इफेक्टचा जनक आहे हां फिल्टर. हां फिल्टर लेन्स मध्ये जाणारा प्रकाश डीफ्युझ करतो. त्यामुळे चेहेऱ्याला एक प्रकारची आभा दिसते. किंवा पानातून सांडणार उन अगदी चांदण्या प्रमाणे मंद चमकत. स्वप्नाचा फिल्टर म्हणाना याला.
फक्त एक लक्षात ठेवायचं म्हणजे या फिल्टरने फोटोचा शार्पनेस जातो.


गूढ़ रम्य जंगल फिल्टर सोबत (विंड केव्ह्स )


चांदण्याची पाने. (विंड केव्ह्स )


फुलाभोवतिची आभा, अशीच चहर्याभोवातिही येते. (अजिसाई फुले )

क्लोजअप फिल्टर:

या फिल्टरने अगदी छोट्या वस्तूचे खूप जवळून फोटो काढता येतात. macroफोटोग्राफी करण्यासाठी हे वापरतात. यात तीन नंबरचे फिल्टर असतात आणि सहसा ते किट मध्ये उपलब्ध असतात.


क्लोजअप फिल्टर ने घेतलेली चेरिची फुले.

ट्रिक फोटोग्राफीचे फिल्टर्स:

नसलेलं इंद्रधनुष्य दाखवायला, एकाच फोटोत एकाच व्यक्तीची अनेक रूप दाखवायला, रस्त्यांवरचे दिवे चांदण्याप्रमाणे चमकवायला, जुने असावे असे दिसणारे सेपिया फोटो काढायला, धुक्याचा भास आणायला असे अनेक फिल्टर मिळतात. डिजीटल कॅमेऱ्यामध्ये या सगळ्याची गरज फारशी नाही आता. कारण हवे असलेले सगळे इफेक्ट नंतर प्रोसेसिंग करून मिळवता येतात.

हे फिल्टर वापरताना लक्षात ठेवायची सगळ्यात महत्वाची गोष्ट.

-बरेच वेळा काही जण महागड्या लेन्स कॅमेरे खरेदी करतात. मग त्या महागड्या लेन्सना प्रोटेक्शन म्हणून एखादा स्वस्त यूव्ही / प्रोटेक्टर फिल्टर लावतात. पण लक्षात घ्या फिल्टर हां प्रकाश फिल्टर करण्यासाठी असतो. हे स्वस्त फिल्टर चांगल्या प्रकारे प्रकाश फिल्टर करत नाहीत (डीफ्राक्शन् इ. जास्त असते,सूक्ष्म चरे असतात). आणि जर तुमच्या महागड्या लेन्स पर्यंत पोचणारा प्रकाश आधीच खराब असेल तर चांगले फोटो येण्याची शक्यता कमीच नाहीका?
म्हणून फिल्टर वापरताना तडजोड करू नका.
-चांगल्या कंपनीचे (होया, केंको, कोकीन इ.) फिल्टर घ्या.
-आणि फिल्टर नीट तपासून घ्या. मला एकदा अगदी चांगल्या आणि नवीन फिल्टर मध्ये असा त्रास झालेला आहे. आधी तो फिल्टर लावल्यावर फोकसिंग ला त्रास होत होता. आणि एक दिवस चक्क फिल्टर ची काच त्याच्या रिंग मधून खाली पडली. ती काच त्या रिंग मध्ये हलत असल्याने फोकसिंग पण चुकत होत. तर अशा गोष्टी बघून फिल्टर घ्या.
-दोन तीन फिल्टर एकावर एक लावून शक्यतो वापरू नका, त्यामुळे प्रकाशाची क्वालिटी खराब होते. म्हणजे तुमचा आधी प्रोटेक्टर फिल्टर लावला असेल तर शक्यतो त्यावरच एन डी फिल्टर पण लावून् फोटो काढू नका, आधीचा फिल्टर काढून मग दुसरा लावा.

चला तर मग तुमच्या लेंसला कुठला चष्मा हवाय ते ठरवा बर.

आधिचे लेखः
फोटोग्राफी: जादूचा मंत्र (फोटोसह)
फोटोग्राफी : कॅमेरा खरेदी
फोटोग्राफी: कॅमेर्‍याची काळजी भाग २
फोटोग्राफी: कॅमेर्‍याची काळजी

हे सगळे लेख इथेहि (प्रकाशरान - http://prakashraan.blogspot.com/) आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्नाली, नेहमीप्रमाणेच सुंदर. तुझ्या कदाचित हे गावीही नसेल की तू आम्हांला सगळ्यांनाच किती महत्वाची माहिती देतेयस. Happy

धन्यवाद स्वप्नाली Happy
तुझ्या कदाचित हे गावीही नसेल की तू आम्हांला सगळ्यांनाच किती महत्वाची माहिती देतेयस>>>>अगदी अगदी

अतिशय उपयुक्त माहिती!
नॅचरल की न्युट्रल डेन्सिटी फिल्टर ? http://en.wikipedia.org/wiki/Neutral_density_filter
पोलारायझर फिल्टरच न्युट्रल डेन्सिटी २ म्हणुन वापराता येते का?

तुम्हा सगळ्याना अावडले हे वाचुन अजुन लिहायचा हुरुप अाला.
अरे बापरे दिनेशदा पुस्तक वगरे नााहि हो. हि फक्त थोडीशी मााहिती अाहे , माबोकरासाठी शेअर करते इतकच.
माबोकरानि अजुन छान फोटो काढावेत Happy

स्वप्नाली, मस्त सोप्या भाषेत माहिती देते आहेस. फिल्टर लावून आणि न लावता काढलेले फोटो टाकलेस हे बरं झालं. दोन्ही फोटोंमधला फरक कळला.

माहितीपूर्ण लेखाबद्दल आभारी आहे. पुन्हा एकदा, निवडक दहात ! Happy
शटरस्पीडबद्दल वाचण्यास उत्सुक आहे !

(भावी फोटोग्राफर)
-ज्ञानेश.

छान माहिती. कुठल्या फिल्टरसाठी कुठल्या कंपन्या प्रसिद्ध आहेत हे पण जरूर सांगा.

२ लेख वाचले आज. सुंदर माहिती.. Happy

शेअर केल्याबद्दल धन्यवाद, पुढचे पण भाग नक्किच वाचीन. डिजीटल कॅमेर्‍याला पण हे फिल्टर बसवता येतात?

सायो , ज्ञानेश, dhruva, जागू , sameer_ranade
प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy
sameer_ranade डिजीकॅमचे फिल्टर माझ्यातरि बघण्यात नाही आलेत. त्यामुळे नक्की माहीत नाही.
पण एस एल आर लाइक कॅमेर्यासाठि मिळतात.

मस्त माहिती. सहजतेने समजावण्याची शैली आवडली.
एका नव्याच विषयाची (माझ्यासाठी) ओळख झाली. धन्यवाद!

सावली अतिशय उपयुक्त माहिती, फिल्टर या जास्त माहिती नसलेल्या मुद्यावर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद!!!

सावली... मस्त लेख... डोक्यात पहिला SLR घ्यायचे विचार सुरु आहेत.. तेंव्हा आपला लेख नक्कीच उपयुक्त ठरणार... Happy

अनिता , गौतम, भटक्या,प्रकाश,मन-कवडा प्रतिसादाबद्दल आभार. Happy

फारच उपयुक्त माहिती... धन्यवाद.
फक्त एक सुचना...
ते "नॅचरल डेन्सिटी फिल्टर" नसुन "न्युट्रल डेन्सिटी फिल्टर" असे आहे.

समीर,
डिजीटल कॅमेर्‍याला पण हे फिल्टर बसवता येतात?>>>
होय, अ‍ॅडॉप्टर ट्युब लावुन डिजीकॅम ला पण फिल्टर लावता येतात. फक्त तुमच्या कॅमेर्‍यात अ‍ॅडॉप्टर ट्युब लावायची सोय असली पाहिजे.

सावली खरच इतकि उपयुक्त माहितीची खरच आम्हाला गरज होती...तुम्हि अजुन अशी अजुन माहिती इथे प्रदर्शित करा आमच्या सारखे वाचक खरेच त्या साठि मनापासुन उत्सुक आहोत. Happy

चंदन मी आपली माहितीसाठी म्हणुन विचारलं. बाकि आपले सल्ले घेइनच आणि.
कारण माझ्यासाठी हे प्रकार फार पुढचे आहेत आधी चांगले फोटो कढायला तरी जमुदे..:p
मदत लागली तर तुम्हि जाणकार आहातच. Happy

Pages