अवघी विठाई माझी (१७) - स्विस चार्ड

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

swiss chard.jpg

स्विस चार्ड तशी रुळलेली भाजी. मायबोलीवरपण याच्या अनेक पाककृति आहेत. खूप मोठी पाने (अगदी फूटभर लांब ) आणि पांढरा जाड देठ, असे हिचे स्वरुप.
वेगवेगळ्या जातीनुसार याचे देठ पांढरे, पिवळे, केशरी वा लाल असू शकतात. पण पांढरे देठ शिजवायला सर्वात सोपे असतात.
ही भाजी कोवळ्या रुपात, (म्हणजे पाक चोई सारख्या गड्ड्याच्या रुपात ) मिळते. ती तशी कच्चीच सलाद मधे वापरता येते. मोठी पाने शिजवावी लागतात. याचाही देठ वेगळा करून, वेगळा शिजवावा लागतो. (अनेक जण तो खात नाहीत.)
ही भाजी पालकाच्या कूळातलीच असली तरी, चवीत बराच फरक आहे. पालक (मला तरी) बेचव वाटते, त्यामानाने चार्ड चवदार लागते. याच्या चवीची तूलना कदाचित मेथीच्या पानांशी होऊ शकेल, पण कडवटपणा बराच कमी असतो.

swiss chard cooked.jpg

या अश्या चवीमूळे मी मेथी मलाई मटार, प्रमाणे हि भाजी शिजवली आहे. (कृति मायबोलीवर आहे.) काही पानांचे मोठे तूकडे करून, बटरवर किंचीत परतून, सजावटीसाठी वापरली आहेत.

swiss chard dish.jpg

पूर्ण डिशमधे, सोबतीला कॉलीफ्लॉवरचे ताजे लोणचे आहे आणि रोट्या आहेत. नेहमीच्या मैद्याच्या रोटीपेक्षा या थोड्या वेगळ्या आहेत. अर्धा कप कणीक, अर्धा कप तांदळाचे पिठ व त्यात एक टेबलस्पून पीनट बटर वापरले आहे. या रोट्या खुसखुशीत होतात.

स्विस चार्ड अनेक नावाने ओळखले जाते.सिल्व्हर बीट, पर्पेच्यूअल स्पिनॅच, स्पिनॅच बीट, क्रॅब बीट, सीकेल बीट, मॅनगोल्ड इत्यादी.
स्विस चार्ड, हा के जीवनस्त्वाचा उत्तम स्त्रोत आहे. तसेच अ आणि क जीवनसत्व पण भरपूर असते यात.
फायबर तर आहेच, पण तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह इत्यादी खनिजे यात असतात.
याच्या सेवनाने होणारे फायदे, या घटकांमूळेच आहेत. जसे की सर्दीखोकल्यापासून सुटका, आतड्याच्या कर्करोगापासून बचाव, हाडांच्या वाढीसाठी फायदा, पॅसिव्ह स्मोकर्सना आराम इत्यादी.
ई जीवनसत्व, रिबोफ्लेवीन... यातल्या फायदेशीर घटकांची यादी मोठी आहे. तसेच पाणी भरपूर असेल, तर या भाजीची वाढ व्यवस्थित होते. आणि याची खुडणी बर्‍याच वेळा करता येते. (म्हणजे खुडणी करताना, पूर्ण झाडच उपटावे लागत नाही.) पालकापेक्षा या भाजीची लागवड आपल्याकडे व्हावी असे मला वाटते.

विषय: 
प्रकार: 

सिंडरेला. करडईची येस, तीच चव. एकदम आठवलीच नाही.
स्नेहा, त्या लोणच्यासाठी फ्लॉवरचे छोटे तूकडे करून, त्याला चवीप्रमाणे तिखट, मीठ लावायचे. मग मोहरी, हळद व हिंगाची फोडणी द्यायची. आणि वरुन लिंबूरस टाकायचा. (शिजवायचे नाही) एखाद दिवस बाहेर ठेऊन, पाणी सुटले कि मग फ्रीजमधे ठेवायचे. आठवडाभर टिकते.

दिनेशदा, तुम्ही आणि लोणची या विषयावर एक प्रबंध लिहिता येईल. मला वाटायचं की तुम्ही लोणची विविध पदार्थात घालण्यासाठीच बनवता... निदान एक लोणचं तुम्ही लोणचं म्हणूनच वापरलयं हे बघून बरं वाटलं. Happy Happy Happy

Lol Lol Lol

येस येस, आचारी एकदम योग्य लेबल आहे.

जो आचार बनवतो ....
आजन्म दुसर्‍याला आचार चारतो .....
आणि त्यामुळे ज्याच्याकडे आजूबाजूची चार लोकं आ वासून बघत बसतात....

असा तो!

तुमचे ते आफ़्रिका बास्स झाले बरं आता! गुपचूप पुण्यात येऊन नोकरी शोधा नाहीतर हाटेल काढा.(मी बिल देणार नाहीच)

बारीक तिखट मिरच्यांचे बिनतेलाचे गोड लोणचे कसे करतात ते लिहा आता!