अवघी विठाई माझी (१५) - चायनीज कॅबेज- पाक चोई

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

Pak Choi.JPG

अरेबिक भाषेत प आणि ब चा गोंधळ आहे (माझ्या माहितीप्रमाणे तो तामिळ
लिपीत पण आहे) म्हणजे अरेबिक भाषेत प हे अक्षरच नाही. प च्या जागी ब
वापरतात (पार्किंगचे होते बार्किंग आणि पेप्सी चे होते बेब्सी ) तसाच चिनी
लिपित पण हा गोंधळ आहे कि का न कळे. कारण हि भाजी पाक चोई आणि
बाक चोई या दोन्ही नावाने ओळखली जाते. शिवाय चायनीज कॅबेज, असे
सबगोलंकार नावही आहेच.

भाजीचा आकार कमंडलू सारखा. पानांचा आकार चमच्यासारखा, (म्हणून याला
घोड्याचे कान, घोड्याचे शेपूट, अशी पण नावे आहेत.) हि अगदी कोवळी म्हणजे
जेमतेम चारपाच इंच लांबीची पण मिळते तर जरा जून म्हणजे आठ दहा इंच
लांबीची पण मिळते.

Pak Choi cut.JPG

याची पाने आणि देठ यांना शिजायला वेगवेगळा वेळ लागतो. म्हणून पाने आणि
देठ वेगवेगळे कापावे लागतात. अगदी कोवळी असतात, ती पाने वेगळी कापायची
गरज नसते. मी पहिल्यांदा हि भाजी, बॅंकॉक मधल्या हॉटेलात खाल्ली होती. तिथे
ती नुसतीच उकडलेली होती. त्यावेळी अजिबात आवडली नव्हती, पण हिची आपल्या
पद्धतीने भाजी होऊ शकेल असे, वाटत राहिले.

Pak Choi cooked.JPG

या वरच्या प्रकारासाठी मी साजूक तूपावर (पालेभाजीत साजूक तूप वापरुन बघाच,
मस्त स्वाद येतो. ) लसूण परतून घेतला. मग त्यावर हिंग, जिरे टाकून, मिरचीचे
हिरवे लोणचे टाकले (लाल वा हिरव्या मिरच्या वापरता येतील. पण लोणच्याने
चांगला स्वाद येतो.) त्यावर आधी कापलेले देठ परतून घेतले. मग कापलेली पाने
परतली. पालेभाजीचा रंग छान राहिला. (हळद वापरलेली नाही.) मग शेंगदाणे व मीठ
टाकले. अर्धा चमचा साखर घातली.
या भाजीचा स्वाद साधारण पांढऱ्या मूळ्यासारखा लागतो. पण तेवढा तिखटपणा नसतो.
वरणभात किंवा भाकरीबरोबर हि भाजी खाता येईल. नूसतीही खाता येईल. इतर प्रकारेही
करता येईल.
हिचे शास्त्रीय नाव Brassica rapa. म्हणजे कूळ तेच. चीन, जपान व कोरिया, इथे
हि भाजी लोकप्रिय आहे. चीनमधे १४ व्या शतकापासून हिची लागवड होतेय. या भाजीला
छान पिवळी फ़ूले येतात.
माफक प्रमाणात खाल्ल्यास, यातील ग्लुकोसिनोलेट्स, कॅन्सरला प्रतिबंध करतात, पण जास्त
प्रमाणात (दिवसाला एक ते दिड किलो, कच्ची) खाल्ल्यास, घातक ठरू शकते, हि भाजी.
यात क जीवनसत्व, कॅल्शियम, सोडीयम, मॅग्नेशियम असते.

विषय: 
प्रकार: 

दिनेश.. नवीन भाजी देताना या आधी देलेल्या भाजीची Link टाक.. म्हणजे एकातून दुसरीकडे सहज जाऊन शोधत बसावे लागणार नाही. बाकी मस्त लिहितोय्स. शेजारच्या चिन्याकडे जाऊन मुद्दाम भाजी आणून करून बघेन म्हणतो.. Happy

परदेसाई,

आधीच्या भागाचा दुवा लेखात देण्याची आवश्यकता नाही. या मालिकेतील सर्व लेख तुम्हाला वरच्या लेखमालिका या दुव्यावर गेलात तर दिसतील.
http://www.maayboli.com/node/17869

राम राम दिनेशदा!
ये सब्जी भी जबरदस्त लग री! मानलं हां तुम्हाला बाकी. भाजी(कच्ची) तर आहेच वेगळी पण रेसिपी पण वेगळी वाटते. Happy
बाकी, माझा नेहमीचा ऐकिव माहिती वर आधारित प्रश्न आहेच. पाक चॉय की बाक चॉय? Happy

मस्त माहिती दिनेशदा. इथे दिसते हि भाजि पण कधिच केली नव्हती. काय करायच तेच माहित नव्हत. आता एकदा करुन बघेन. तुपाचि फोडणी कधि दिली नाहिये पालेभाजीला आता तुम्हि सांगितल्यावर नक्कि देउन बघणार.

आता नावाबद्दल
जपान मधे हिला हाकुसाई (白菜, उच्चार हाकसाइ) म्हणतात.
白 हाकु (हाक) - पांढरा 菜 - साइ - भाजी / पाने इ
जपानी लिपि हि चिनि कडुन घेतली असल्याने या कांजि चिनीमधे पण आहेत.
एकाच कांजिचे उच्चार शब्दाप्रमाणे/ वाक्याप्रमाणे बदलतात. या 白 कांजीचे अजुन्हि काहि उच्चार आहेत. त्यामुळे "हाकु" ला कधि कधि "बाकु" म्हटले जाउ शकते (जपान मधे या भाजीला बाकु म्हणत नाहित).
उदा: १०० ला ह्याकु आणी ब्याकु दोन्हि म्हणतात. शब्द कसा वाप्रला आहे त्यावरुन हे ठरत.

त्यामुळे पाक आणी बाक दोन्हि बरोबर .

वैद्यबुवा,
ह्या बाबतीत मी धाडसी हां, कुठलीही भाजी (ती व्हेजेटरीयन असेल तर ) खातो, आणि करुनही बघतो.
एका भाषेतले उच्चार दुसर्‍या लिपीत लिहिण्यात अशी गफलत होतेच. (देवनागरीचा अभिमान थोडा डळमळतोय.) कदाचित सावली किंवा वर्षू सांगू शकतील. सावली, मनापासून आभार, हे असे बारकावे, मला कळलेच नसते कधी. एकाच अक्षरांचे वेगवेगळे उच्चार आपल्याकडे पण होतात. (हाडी हारी छे, हाहूए आपी, हाहू हवारे हवारे आवी हथी ने. असे एखादी सूरती ललना बोलते, त्यावेळी फक्त शेवटचा, ह तो ह, बाकि सगळे स )

अ‍ॅडमिन, हि अशी सोय आपल्याकडे आहे, हे विनयप्रमाणे मलाही माहीत नव्हते. खुपच छान सोय आहे ही !!!

दिनेशदा, छान रेसिपी ! नेहेमीप्रमाणेच.

मी ही भाजी पहिल्यांदा वांद्रयाच्या Otters Club मध्ये खाल्ली. तुम्ही म्हणता तशी उकडून केली होती. पण काहिशी चिंडियन पध्द्तीनं. त्यामुळे आवडली. म्हणून मी नाव विचारले, तर त्याने सांगितले ... पी के चॉय!

मला वाटले की त्याला माझा प्रश्न नीट न कळल्यामुळे त्यानी शेफ चे नाव सांगितले की काय!

दिनेशदा नेहेमी प्रमाणेच मस्त माहिती.
ही जपान मधे हाकुसाइ (白菜)म्हणून नाही तर चिनगेनसाई (青梗菜)म्हणून ओळखली जाते.
हाकुसाइ (白菜)म्हणजे नापा कॅबेज.

एम्बी आत्ता मी इंटरनेटवर नुसत इमेजेस शोधल तर बहुतेक तु म्हणतेयस ते बरोबर आहे अस वाटत.
पण मी इथल्या दुकानामधे हिच भाजी हाकुसाई या नावाने पाहिली होती. आणी एकदा एका भाजिवालीला विचारल होत तर तीनेही हेच हाकुसाई नाव आणी कांजी देखील सांगितली होत.
आणी विकिपेडीया मधे बघितल तरही अस आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Chinese_cabbage

त्यामुळे जरा कन्फ्युजन झालय माझच.

तरि वरची नावाची पोस्ट काढु की नको??