भाग २ - भारतीय संगीताचा इ.स. ११०० नंतरचा इतिहास

Submitted by हिम्सकूल on 26 July, 2010 - 06:01

भाग - १ http://www.maayboli.com/node/18105

११ व्या शतकात मुघलांच्या आक्रमणाच्या वेळेस शास्त्रीय संगीतावर आधारित बहुतेक पुस्तके संस्कृत भाषेत होती. मुघलांना त्यातील फारच थोडे कळले, तरी कालांतराने त्यांची भारतीय संगीतातील रुची वाढली. आणि त्याचाच परिणाम म्हणून अनेक नवनविन वाद्यांची आणि रागांची निर्मिती मुघल संगीतकारांनी केली. संगीतावरील ठोस आणि शास्त्रीय आधार मानला गेलेला ग्रंथ म्हणजेच 'संगीत रत्नाकर' ह्याच काळात शारंगदेवाने लिहिला.

एक आश्चर्यकारक गोष्ट अशी की, जरी उत्तर भारतीय संगीतात बाह्य जगतातील प्रभावाने बदल होत होते तरी कर्नाटक संगीतावर त्याचा कुठेही परिणाम दिसून आला नाही. आजही कर्नाटक संगीत सादर करणारे गायक शतकांपूर्वी असलेल्या पद्धतीतच सादरीकरण करताना आढळून येतात. दक्षिण भारतातील गायकांनी संगीताच्या शास्त्राकडे जास्त लक्ष दिले तर उत्तर भारतातील गायकांनी संगीताच्या सौंदर्याकडे जास्त लक्ष दिले. त्यामुळेच उत्तरेकडील गायकांनी अनेक उपलब्ध सुरावटींपैकी सौंदर्याच्या दृष्टीने सुरेल अशा सुरावटींकडे जास्त लक्ष दिले आणि त्यातूनच संगीत कलेची निर्मिती केली.

१२ व्या शतकाच्या सुरुवातीला हिंदू आणि मुघल ह्यांच्यातील सततच्या युद्धांमुळे उत्तर भारतीय संगीतावर बर्‍यापैकी परिणाम झाला. ह्याच शतकाच्या शेवटी 'गीत-गोविंद' ह्या प्रसिद्ध संस्कृत पुस्तकाची निर्मिती जयदेव ह्या प्रसिद्ध कवि-संगीतकाराने केली. ह्यातील सुनितांसारखे काव्य हे श्री कृष्ण, राधा आणि गवळणींविषयी आहे. ही काव्ये जती संगीतावर बांधलेली होती आणि त्यांना प्रबंध असे म्हणले जाई. हळूहळू उत्तरेकेडील स्थानिक भाषा - ब्रज भाषा - ही भावना मांडण्यासाठी प्रभावी ठरली. आणि ह्याच्या परिणाम स्वरुप संस्कृत प्रबंधांची जागा ब्रज भाषेने घेतली. आणि ह्या ब्रज भाषेन केलेल्या सादरीकरणाला ध्रुवपद किंवा ध्रुपद अशी ओळख मिळाली.

मुघल भारतात स्थिर झाल्यावर त्यांनी भारतीय कला आणि संस्कृतीकडे लक्ष द्यायला सुरवात केली. जरी त्यांनी असंख्य हिंदूंना मुस्लिम होण्याची जबरदस्ती केली तरी संगीतावर मात्र आक्रमण केले नाही तर भारतीय संगीताला सामावून घेतले आणि त्याला पर्शियन लहेजा दिला.

अल्लाउद्दिन खिलजीच्या (इ.स.१२९६ ते १३१६) काळात संगीताला संजिवनी मिळाली. त्याच्या दरबारात हजरत अमिर खुस्रो हा एक अतिशय प्रतिभावान संगीतकार मंत्री म्हणून कार्यरत होता. त्याने निर्माण केलेल्या अनेक सुरावटी आजही प्रसिद्ध आहेत. त्याने तालाच्या संदर्भात पण बरेच योगदान दिले. पण त्याचा सर्वात मोठे योगदान हे सतार आणि तबला हे होय. अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारात नायक गोपाळ हा अजून एक प्रथितयश संगीतकारही होता.. त्याच्या आणि अमिर खुस्रोच्या सांगितिक युगल बंदीच्या अनेक संदर्भ सापडतात.

१५व्या शतकात लोचन नावच्या लेखकाने 'राग तरंगिणी' ह्या ग्रंथात प्रथमच वर्गवारीचा उल्लेख केला. ह्या वर्गवारीला त्याने 'थाट' असे संबोधले. त्याच्या मते असे १२ थाट होते ज्यातून बाकीच्या रागंची निर्मिती झाली. पंधराव्या शतकाच्या मध्यात जौनपुर (उ.प्र.) संस्थानाचा राजा सुलतान हुसैन शरकी (इ.स. १४५८ - ८८) ह्याने ख्याल गायकीचा प्रारंभ केला तसेच त्याने जौनपुरी तोडी, सिंधु भैरवी, रसिली तोडी, सिंधुरा असे अनेक नविन राग सुद्धा बांधले.

ग्वाल्हेरचा राजा मानसिंग ह्याचेही नाव संगीत क्षेत्रात आदराने घेतले जाते. सध्या प्रसिद्ध असलेल्या ग्वाल्हेर घराण्याचा तो संस्थापक मानला जातो. तो स्वत: ध्रुपद गायकीचा उत्तम सादरकर्ता होता. त्याच्या कारकिर्दीत ध्रुपद गायकी बाकीच्या राज घराण्यात पण प्रसिद्ध झाली. त्याच्या दरबरात नायक बास्कू हा प्रसिद्ध ध्रुपद गायक सुद्धा होता.

१५व्या शतकाच्या शेवटी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भक्ती रस संपूर्ण उत्तर भारतात सामान्या जनतेपर्यंत पोहोचला होता. १६ व्या शतकात सम्राट अकबराच्या काळात(इ.स. १५५६ - १६०५) संगीत सर्वोच्च स्थानावर पोहोचले असे म्हणतात. अकबर शास्त्रीय संगीताचा भोक्ता होता. त्याच्या दरबारात अनेक नावाजलेले संगितकार, गायक नोकरीस होते. तानसेल, बैजु बावरा हे त्यातीलच काही रत्ने. तानसेनाची कीर्ति ऐकून अकबर त्याला दिल्लीला घेऊन गेला आणि त्याला राज गायकच्या पदावर स्थान दिले. ह्याच काळात पं. दामोदरदास आणि पं. व्यंकटमखी ह्या दोन प्रसिद्ध संगीततज्ञांनी अनुक्रमे "संगीत दर्पण" आणि "चतुरदंडी प्रकाशिका" ह्या ग्रंथातून रागांच्या वर्गीकरणा संदर्भात अजून विश्लेषण प्रकाशित केले.

औरंगजेबाच्या कारकिर्दीत लयास जाऊ लागलेल्या शास्त्रीय संगीताला सम्राट मुहम्मद शहाच्या कारकिर्दीत(इ.स. १७१९ - ४८) पुन्हा एकदा संजिवनी मिळाली. त्यानी जीवनाचा ज्या प्रकाराने आनंद घेतला त्यावरून त्याच्या समकालीन लोकांनी त्याला मुअहम्मद शहा रंगिला अशी पदवी देऊ केली. त्याच्या दरबारात सदारंग आणि अदारंग ही बंधूंची जोडी होती. ह्या दोघांनी मिळून सर्वसामांन्याना भुरळ घालतील अशा शेकडो रचना तयार केल्या. त्यानीच ख्याल गायकी स्त्रीया व पुरुषांना तितक्याच ताकदीने विस्तार करता येईल अशा प्रकारे बदलली. नमूद करण्यासारखी एक गोष्ट अशी की जरी त्यांनी ख्याल गायकीत बदल केला तरी ते स्वतः प्रामुख्याने ध्रुपद गायकच राहिले. ध्रुपद गायकीच्या पाठोपाठ आलेली ख्याल गायकी ही शास्त्रीय परंपरेला धरुन आणि त्या काळात पूरक अशीच ठरली.

ब्रिटीशांच्या काळात संगीत जवळपास लोपच पावले होते, पण पं. विष्णू नारायण भातखंडे आणि पं. विष्णू दिगंबर पलुसकर ह्या दोन दिग्गजांनी त्याचे पुनरुज्जीवन केले. पं. भातखंडेंनी हे विद्वान होते. त्यांनी भारतभरातून उपलब्ध असलेल्या सर्व चीजा, सुरावटी एकत्र करुन त्या नोटेशन च्या स्वरुपात प्रकाशित केल्या, ज्याचा संगीतप्रेमींना खूप उपयोग झाला. पं. पलुसकर हे महान कलाकार होते. त्यांनी देशभर प्रवास करुन शहरात आणि मोठ्या गावात संगीत विद्यालयांची स्थापना केली. ह्या दोघांनी तयार केलेली नोटेशन पद्धती सोपेपणा आणि सहजतेमुळे आज देशभर वापरली जाते. ह्या दोन व्यक्तीमत्वांचे नाव त्यांच्या संगीत क्षेत्रातील महान कार्यामुळे भारतीय संगीताच्या परंपरेत नेहमीच आदराने घेतले जाईल.

भाग ३ - http://www.maayboli.com/node/19086

गुलमोहर: 

हिमस्कूल, एक शंका आहे. मुघल भारतात येण्यापूर्वी, त्यांच्याकडे संगीत नव्हते का ?
बहुतेक असावे असे मला वाटतेय.
तसेच पहिल्यांदा ध्रुपद गायकीच, प्रचलित होती, मग ख्याल गायकी आली, हो ना ?
आणि रागभाव, त्यांचे गायनवादनाचे समय, ऋतू हे हिंदुस्थानी गायनपद्धतीतच आहेत,
कर्नाटक पद्धतीत नाहीत, याचा पण उल्लेख येणार आहे ना ?

मुघल भारतात येण्यापूर्वी, त्यांच्याकडे संगीत नव्हते का ? >>> दिनेशदा मुघल भारतात येण्यापूर्वीही त्यांच्याकडे संगीत नक्कीच होते.. मुघलांनी ज्या प्रमाणात मुस्लिम धर्माचा प्रसार केला तेव्हढा संगीताचा केला नाही.. तर त्यांनी इथले संगीत आत्मसात केले आणि त्यात पर्शियन पद्धतीही मिसळली..

तसेच पहिल्यांदा ध्रुपद गायकीच, प्रचलित होती, मग ख्याल गायकी आली, हो ना ?>>> हो हे बरोबर आहे..

आणि रागभाव, त्यांचे गायनवादनाचे समय, ऋतू हे हिंदुस्थानी गायनपद्धतीतच आहेत,
कर्नाटक पद्धतीत नाहीत, याचा पण उल्लेख येणार आहे ना ?>>> माझे जे मूळ सेमिनार आहे त्यात ह्या संदर्भात मी उल्लेख केलेला नाही पण अजून संदर्भ ग्रंथ तपासून ह्या संदर्भात लिहायचा प्रयत्न नक्कीच करीन..

छान माहिती. वाचते आहे. Happy

हिंदुस्थानी शा. संगीतात परकीयांनी जर काही आणलं असेल तर तो 'दर्द' (भावना). संगीत हे अध्यात्मिक पातळीवरून मानवी पातळीवर आणले, आणि थोडी मोकळीक आणली. संगीत प्रवाही झाले. भक्ति रसाहून वेगळ्या रसांचा भावाविष्कार आणला. कर्नाटक संगीतातील सादरीकरण गेल्या तिनेक शतकात तसेच आहे. परंपरा above all असे त्याचे स्वरुप आहे असे म्हणतात.