उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत - एक झलक भाग-१ भारतीय संगीताचा इ.स.११०० पूर्वीचा इतिहास

Submitted by हिम्सकूल on 24 July, 2010 - 07:22

इंजिनीयरींगच्या तिसर्‍या वर्षी कॉलेजमध्ये सेमिनार नावाचा एक टाईमपास करण्यासाठी विषय असतो. आमच्या शाखेत हा विषय कोणताही चालतो. तो तुमच्या शाखेतील पाहिजे असे बंधन मुळीच नाही. त्याचाच फायदा घेत मला सगळ्यात आवडत्या विषयाव मी सेमिनार दिला होता. आणि तोच विषय इथे जमेल तसा मराठीत मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.

काही कथांच्या मते भारतीय संगीत हे कुठल्यातरी दैवी शक्तीतून निर्माण झालेले आहे. असे म्हणतात की ब्रह्मदेवानी संगीत प्रथम शंकराला शिकवले आणि मग शंकरानी देवी सरस्वतीला ते शिकवले. आणि तिथून पुढे मग संगीत नारदमुनी, गंधर्व, किन्नर, भरत आणि मारुती ह्यांनी पृथ्वीतलावर आणले आणि त्याचा प्रसार केला. शंकरानी प्रथम रुद्रविणा निर्माण केली आणि त्याचा पाच मुखातून ’भैरव’, ’हिंडोल’, ’मेघ’, ’दिपक’ आणि ’श्री’ ह्या पाच रागांची निर्मितीही केली. ह्या रागांमध्ये पार्वतीने पण एका रागाची भर घातली आणि तो राग म्हणजे ’कौशिक’.

अजून एका कथेनुसार शंकराने देवी पार्वती समोर नृत्य केले आणि त्यात त्याला बाकीच्या देवांनी सुद्धा साथ केली. सरस्वती देवीने विणावादन केले, तर इंद्रदेवाने बासरी वाजवली आणि ब्रह्मदेवाने करताल वाजवला. तसेच देवी लक्ष्मीने विष्णू देवांनी वाजवलेल्या मृदुंगाच्या तालावर नृत्य केले.

ह्या कथांच्या व्यतिरिक्त संगीताचा पहिला संदर्भ साधारण इ.स.पू. २००० ते १००० मध्य म्हणजेच वैदिक काळात सापडतो तो विविध वाद्यांच्या स्वरुपात. साम वेदामध्ये उदत्त, अनुदत्त आणि स्वरित ह्या तीन स्वरांचा उल्लेख आढळतो, ज्यांच्या पासुन पुढे अजून चार स्वर निर्माण होऊन सप्तकाची निर्मिती झाली, तर ऋग्वेदात वीणा, वंशी(बासरी) आणि डमरुचा उल्लेख आढळतो. साधारण इ.स.पू. १००० ते इ.स. १००० काळात जति संगीत असा शास्त्रीय संगीताचा प्रकार अस्तित्त्वात होता असे मानले जाते. बुद्ध धर्माच्या आणि जैन धर्माच्या भित्तीपत्रकात जति संगीताचा उल्लेख तसेच ढोबळ स्वरुपात विणेची चित्रेही आढळून आलेली आहेत. इ.स. ४०० च्या सुमारास महाकवी कालिदासाने अभिज्ञात शाकुंतलाची निर्मिती केल्याचे सापडते आणि ह्या काव्यात शास्त्रीय संगीताबरोबर घातलेली सांगडही दिसून येते. असे मानले जाते की रामायण आणि महाभारत ही दोन्ही महाकाव्ये साधारण इ.स.पू. ५०० ते इ.स. २०० दरम्यान निर्मिली गेली. महाभारतात सात स्वरांचा उल्लेख आढळतो तर रामायणात लंकेचा राजा रावण हा प्रसिद्ध संगीतकार असल्याचे उल्लेख आहेत. तसेच ह्या दोन्ही महाकाव्यात समरप्रसंगांच्या वर्णनात भेरी, दुंदुभी, मॄदुंग, घट, डमडम, मुद्रका, वीणा अशा विविध वाद्यांचा उल्लेखही आढळतो.

इ.स. ४०० ते ५०० च्या सुमारास भरताने संगीतावर प्रसिद्ध अशा 'नाट्य शास्त्र' ह्या ग्रंथाची निर्मिती केली. हा ग्रंथ भारतीय शास्त्रीय संगीतावरील पहिला आणि प्रमुख ग्रंथ आहे. भरताने सप्तकातील स्वरांना पहिल्यांदा नावे दिली. त्याच्या मते स्वर हे स्वतंत्र नसून सांगितीक तुकडे आहेत. हिंदू तत्त्वज्ञानानुसार नाट्य शास्त्र हे नाट्य आणि शास्त्रीय संगीतावरील महत्त्वाचे पुस्तक मानले जाते. भरताच्या मुलाने म्हणजेच दत्तिलाने 'दत्तिलम' ह्या पुस्तकाची निर्मिती केली. मातंग नावाच्या लेखकाने 'बॄहद्देशी' ह्या त्याच्या ८ व्या शतकात लिहिलेल्या पुस्तकात प्रथमच राग ह्या संकल्पनेचा उल्लेख केलेला आढळतो. ह्याच पुस्तकात तेव्हा प्रचलित असलेल्या सात ग्रामजातींचाही उल्लेख आढळतो.

इ.स. ४०० ते ११०० ह्या काळात संगीताची भरपूर प्रगती झालेली आढळून येते. असेही आढळून येते की कालांतराने जातींचे एकत्रिकरण होऊन ६ प्रमुख मूळ राग तयार झावाले. तसेच ह्या काळात संगीताच्या दोन प्रमुख शाखा निर्माण झाल्या, उत्तर किंवा हिंदुस्थानी शाखा आणि दक्षिण किंवा कर्नाटक शाखा.

भाग २ - http://www.maayboli.com/node/18136

गुलमोहर: 

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात (पूर्वीचे 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम' ) हिंदुस्थानी रागांवर चांगली माहिती आहे. तिकडे जाल तर जरूर पाहा.

पुढील भागाची प्रतिक्षा उत्कंठेने करीत आहे.
छान सुरुवात आणि एक वेगळा प्रॉजेक्ट घेतल्याबाद्दल अभिनंदन.
Happy

धन्यवाद मंडळी... पुढचा भाग लवकरच टाकतो आहे.. मी केलेला मूळ सेमिनार इंग्रजीत असल्याने भाषांतर करुन टंकलेखन करायला जरा वेळ लागतो आहे..

@ रैना... तू जे म्हणते आहेस ते खरे तर सेमिनारच्या प्रस्तावने मध्ये लिहिलेले आहे.. ते आता भाग ० म्हणून
लिहायला लागेल.. day 0 कंपनी असते तसे..

अर्रे.... हे कसं मिसलं....
हिम्सकूल, वाचतेय... आवडतय. पुढले भाग येऊदेत... तब्येतीत.