'बाइकवरचं बिर्‍हाड' - अजित हरिसिंघानी / अनु. सुजाता देशमुख

Submitted by चिनूक्स on 15 July, 2010 - 17:07

जे.आर.डी. टाटा नेहमी म्हणत - 'Live the life a little dangerously. आयुष्यात किंचित धोका पत्करल्यामुळेच त्यातला थरार आणि स्वान्तसुखाय तृप्ती मला मिळवता आली.' जे. आर.डी हे अजित हरिसिंघानींचे आदर्श असल्यानं साहजिकच वेडी धाडसं करणं, किंवा सुरक्षित, बंदिस्त आयुष्य न जगणं, यांत हरिसिंघानींना काही जगावेगळं वाटत नाही. अजित हरिसिंघानी हे वाचोपचारतज्ज्ञ आहेत. पुण्यात राहतात. पुण्यातच प्रॅक्टिसही करतात.

'रॉयल एनफिल्ड' हे अजित हरिसिंघानींचं पहिलं प्रेम. हे प्रेमप्रकरण तीस वर्षं जुनं. एखाद्या मनस्वी स्त्रीनं मोटरसायकलचं रूप घ्यावं, तशी त्यांना एनफिल्ड वाटते. आपल्या लाडक्या एनफिल्डसह अजित हरिसिंघानींनी संपूर्ण अमेरिका पालथी घातली. भुतान, कन्याकुमारीला जाऊन आले. गोव्याच्या असंख्य वार्‍या केल्या.

जेरेमी डिकोस्टा या आपल्या समानधर्मी रुग्णमित्राच्या आग्रहाखातर, खरंतर अंतिम इच्छेखातर, हरिसिंघानींनी पुणे ते लेह व कारगील व श्रीनगर असा प्रवास केला. अर्थातच आपल्या एनफिल्डसह. प्रवासातून परतल्यावर त्यांनी आपल्या अनुभवांवर पुस्तक लिहिलं 'One life to ride'. हा प्रवास तसा काही फार रोमांचक वगैरे नव्हता. हरिसिंघानींना मोठ्या संकटांना किंवा अतर्क्य अनुभवांना सामोरं जावं लागलं नाही. पण तरीही 'One life to ride' हे पुस्तक मात्र अतिशय वाचनीय आहे. कारण ते अतिशय प्रामाणिक आहे. ऐतिहासिक माहिती, किंवा अतिरंजित हकिकती या पुस्तकात नाहीत. या सगळ्या प्रवासाची हकिकत अतिशय निखळ, हलक्याफुलक्या शैलीत हरिसिंघानींनी सांगितली आहे.

'बाइकवरचं बिर्‍हाड' हे सुजाता देशमुखांनी या प्रवासवर्णनाचं केलेलं मराठी भाषांतर. उत्तम प्रवासवर्णनांची मराठीत तशी वानवाच आहे. पण 'बाइकवरचं बिर्‍हाड' मात्र वेगळं ठरतं कारण 'स्वानुभवातून मानवतेकडे नेणारी सकारात्मक भावना' म्हणजे काय, ते या पुस्तकातून कळतं. आपल्या विचारांतला, वागण्यातला ठामपणा जीवनानुभवातून येत असतो आणि स्वानुभूतीतून मिळालेलं शिक्षण आपल्याला उत्तम माणूस बनण्यास मदत करतं.

लेह-लदाखमधली खडतर परिस्थिती, गरिबी, काश्मीरातील दैन्य, तिथल्या सैनिकांची दु:खं, वाटेत भेटलेले ढोंगी फकीर आणि लबाड साधू, धर्माचा जीवनावर असलेला विचित्र पगडा, कन्याकुमारी, गोवा आणि राजस्थानातले धमाल अनुभव या सार्‍यांमुळे हे प्रवासवर्णन अतिशय वाचनीय झालं आहे. जबरदस्त आत्मविश्वास, आणि जोडीला एनफिल्डवरील प्रेम व जे. आर.डींवरील श्रद्धेच्या जोरावर केलेलं हे धाडस 'कसं जगावं' हे अप्रत्यक्षरीत्या आपल्याला शिकवून जातं.

पूर्वी कुठेतरी वाचलं होतं - Respect the person who has seen the dark side of motorcycling and lived. अजित हरिसिंघानींचं प्रवासवर्णन या विधानाची सत्यता पुरेपूर पटवतं.

हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Baikvarach-Birhad.html

'बाईकवरचं बिर्‍हाड' या राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातली ही काही पानं...

bikivarch-birhad.jpg

***

जादुई पर्वत

पहाटे पाचलाच जाग आली. गेले तीन दिवस खाणंपिणं आणि आराम यांमुळे शरीराला तसंच मनालाही तरतरी आलीये. प्रवास करण्याची ऊर्मी परत प्रबळ झालीये. पण आज घाईचं काहीच कारण नाहीये. 'नुब्रा' केवळ १२० कि.मी. वर आहे. रस्ते कितीही वाईट असले, आणि मी अगदी गोगलगाईच्या गतीने गेलो, तरी जास्तीत जास्त सहा तास लागतील पोचायला.

अंड्यांची भुर्जी, परोठे आणि सर्वांत हवाहवासा असा दोन कप चहाचा नाश्ता करून मी उत्तरेच्या दिशेला निघायला तैयार होतो. मी पकडलेल्या रस्त्यावर खाणाखुणा नाहीत आणि म्हणूनच मी योग्य मार्गावर चाललोय, याची मला खातरजमा करून घ्यायचीये. आता जेमतेम उजाडतंय. त्यामुळे दिशादर्शनाला रस्त्यावर कुणीही नाहीये. पर्वतांपलीकडून सूर्याची नुसतीच आभा पसरलीये आणि मी उत्तरेकडे चाललोय याची मला खात्री आहे. जाता-जाता, सुमारे अर्धा कि.मी. आडबाजूला मला एक झोपडी आणि दोन आदिवासी अन् एक मुलगा दिसतात. त्यांच्या शेजारी सिमेंटची एक टाकी असावीशी दिसते. ती उघडी असावी अन् त्यात पाणीही असावंसं वाटतंय. एक आई, तिची कुमारवयीन मुलगी अन् सुमारे १० वर्षांचा मुलगा- तिघंही तोंड धुताहेत. त्यांच्या अंगावर मेंढीच्या कातडीच्या वस्त्रांची आवरणंच्या आवरणं आहेत. त्यामुळे चंगीझखानच्या चित्रपटातल्यासारखी ती दिसताहेत. जवळच्याच विझत्या शेकोटीतून धूर बाहेर पडतोय.

त्यांच्या घराच्या दिशेनं धूळभरल्या रस्त्यावरून मी माझी बाइक वळवतो. अन् तिघंही जागच्याजागी गोठल्यासारखी उभी राहून माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. मी नखशिखांत काळा पहाड आहे. बुटांपासून, ते कपड्यांपासून, ते हेल्मेटपासून ते बाइकपासून, ते माझ्या सगळ्या सामानापर्यंत. सगळंच काळं. मी थांबतो. हेल्मेट काढतो. पण तरीही त्यांच्या चेहर्‍यावरचं आश्चर्य सरत नाही. खार्दुंग खिंडीला हा रस्ता जातो का? मी विचारतो. मी काय विचारतोय हे त्यांच्या लक्षात यायला तीनवेळा मला ते विचारावं लागतं. मग ती आई, आपला उजवा हात उंचावत मी जात असलेली दिशाच दाखवते. मी हसून त्यांना धन्यवाद देतो, हेल्मेट घालतो आणि किक् मारून मार्गस्थ होतो. मला जाताना बघून तिघांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे, हे उघड दिसतं. बाहेरच्या लोकांच्या बाबतीत हे डोंगरातले रहिवासी इतके सावध का असतात, याचं मला आश्चर्य वाटतं. या रस्त्यावरून वास्तविक अनेक मोटरसायकलस्वारांना त्यांनी पाहिलं असेल.

सुरुवाती-सुरुवातीला तुकड्यातुकड्यांत आणि नंतर रस्त्याच्या कडांना सलगपणे बर्फ दिसायला लागतो. सकाळच्या सूर्यप्रकाशात चमकणारा रस्ता फारच चांगला ठेवलाय. एकही खड्डा नाही. खार्दुंग खिंडीच्या पायथ्याशी असलेल्या 'दक्षिण पुली' तपासणी नाक्यापाशी मी तासाभरात पोचतो.

विटांच्या भिंती अन् पत्र्याचं छप्पर असलेल्या खोल्यांची कार्यालयं असलेला हा तपासणी नाका आहे. कागदपत्रं आणि परवाने तपासणारे संत्री आहेत. प्रवाशांनी 'काय करावं आणि काय करू नये' हे सांगायला ते उतावीळ वाटतात. तिथे एक कँटीनसुद्धा आहे आणि आणखी पुढे शौचालयं. मी परवाना दाखवतो, त्यावर छाप मारून घेतो, चहा घेतो आणि निघतो. बघता बघता एकदम चढ सुरू होतो. एनफिल्ड सहजपणे फुरफुरत धावतेय, मजेत धावणार्‍या इंजिनाचा आवाज मला आवडतो. थोड्याच वेळात मी जगातल्या सर्वांत उंच ठिकाणच्या रस्त्यावर आहे.

तर हीच ती प्रसिद्ध खार्दुंग खिंड! (५६०२ मीटर उंचावरची.) वाहनं जाऊ शकतील असा जगातला हा सर्वांत उंच रस्ता असल्याचा काहींचा दावा आहे. मात्र आणखी काहींनी पाहणी केली असता, जवळच्याच मार्समिक खिंडीतल्या रस्त्याला खरं तर हा मान जावा, असं त्यांचं म्हणणं आहे.

बाइक उभी करून मी सभोवार पाहतो. शब्दशः अवर्णनीय दृश्य आहे. दृष्टिक्षेप जाईपर्यंत उत्तरेकडे उंचच उंच पर्वतरांगा दिसतात.

कमी उंचीची पर्वतशिखरं ढगांआडून आमच्याशी लपंडाव खेळतात. हे पांढरे ढग खार्दुंगच्या खाली आहेत. सगळीच शिखरं बर्फानं वेढलेली आहेत. आपल्या उंचीनं खार्दुंग आपल्या शेजार्‍यांना बुटकं करून सोडतं. आजूबाजूच्या दर्‍या फारच खोल आहेत. एका छोट्या पर्वताच्या खडकांवर झेपावणार्‍या दोन गिधाडांकडे माझं लक्ष जातं. कुजणार्‍या मांसावर उपजीविका करणारे पक्षीसुद्धा इथे दिसणं विरळाच. बर्‍याच उंचावरचे ते पक्षी वाटतात. किती उंचीपर्यंत त्यांच्या पंखांची झेप असावी कुणास ठाऊक! माझ्याभोवती निरनिराळ्या रंगांच्या खडकांची मांदियाळी आहे. काळाशार, ते निरनिराळ्या तपकिरी छटांचे, ते हिरव्या रंगांचे, ते निळ्या-पिवळ्या अन् पांढर्‍या रंगांचेही. पण वनस्पतींचा मागमूसही इथे नाही.

इथल्या वार्‍यानं पानं सळसळणार तरी कशी? कारण इथे पानंच नाहीत. मग तो इथल्या खडकांमधल्या आणि बर्फाच्या थरांतल्या भेगांतून धावतो. त्याचा कायम ॐकार ऐकू येतो. या ॐकाराचे माझ्या आजूबाजूला प्रतिध्वनी उमटत राहतात. विस्मयचकित आदरानं मी भारला आहे. नव्या तरुणाईचं वाङ्मय जरा जास्तच वाचत गेलो असल्यामुळे, कदाचित अध्यात्मिक जाणिवेला मानसिकदृष्ट्या मुद्दाम मी जागृत करीत असलो पाहिजे. कारण दुसर्‍या कुणाला वार्‍याचा हा घुत्कार पिशाच्चाच्या कर्णकटू किंकाळीसारखा वाटू शकतो, तर कुणाला मरणाची चाहूल देणारं हडळीचं रुदनही वाटू शकतं. पण मला फक्त ॐकार ऐकू येत राहतो. जितके लोक तितकी जगं आहेत, असं कुणीसं म्हणून गेलंय, नाही का? जो तो आपापल्या परीनं एकाच वास्तवाचा अर्थ विविध प्रकारे लावतोय.

सूर्यकिरणांनी दिपलेले डोळे मी मिटतो, पण मिटल्या पापण्यांतूनही तेजोनिधी तळपतच राहतो. माझ्या डोळ्यांपुढे लाल रंगाचा समुद्र उभा राहतो आणि आता गेलेले वाळूचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण काळे भोवरे तयार करतात. लालद्रव्याच्या त्या ब्रह्मांडामध्ये हे काळे भोवरे फुटतात, उड्या मारतात, इकडून तिकडे वेगानं जात राहतात. अचानक थंड वार्‍याचा एक वेगवान झोत माझे हातमोजे उडवू पाहतो. ते हाताबाहेर जाण्याच्या आत बसल्याजागी मी उडी मारून त्यांना पकडतो.

मला क्षणभरात एकदम प्रेमाचं भरतं येतं. 'तुझे किती आभार मानू?' माझ्या थंडगार इंजिनला थोपटत मी म्हणतो. माझी कृती कुणी पाहिली नाही ना, यासाठी हळूच चोरून इकडेतिकडे नजर टाकतो. तीन लष्करी जवान जवळच ऊन खात बसलेले असतात. त्यांनी माझा मोरटरसायकलबरोबरचा संवाद ऐकावा, अशी माझी मुळीच इच्छा नसते. दाढी न केलेला माझा खप्पड चेहरा पार विस्कटलेला आहे. मी शहाणा माणूस असेन याबद्दल कुणाचीही पहिल्या दृष्टीक्षेपात खात्री पटेलच अशी मला शाश्वती नाही.

मी मजेत आहे. उंचीचा, विरळ हवेचा काहीही त्रास झालेला नाही. पण डॉक्टरांनी सुचवलेल्या दहा मिनिटांपेक्षा अधिक काळ इथे थांबण्याची मला अजिबात इच्छा नाही. काळजी घेतलेली बरी.

खार्दुंगहून मी उत्तरेच्या रस्तानं नुब्रा खोर्‍यात उतरायला सुरुवात करताच रस्ता भलताच धोकादायक व्हायला लागतो. त्यावरचा डांबराचा थर पार धुतला गेला आहे आणि वेगवेगळ्या आकाराचे मोठमोठे धोंडे वाटेत विखुरलेले आहेत. चहुबाजूला पाणी आहे. वास्तविक आताशी कुठे दिवसाची सुरुवात असल्यामुळे बर्फ वितळायला अवकाश आहे. परंतु ही प्रक्रिया सुरु होण्याइतपत हवेत ऊब आली आहे. सुमारे ६ इंच खोलीच्या वाहत्या थंड पाण्यातून मी काळजीपूर्वक मोटरसायकल पुढे नेतो. गाडी घसरण्याची भीती असते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी पावलं सोडून तिचा तोल सांभाळत पुढे जातो. पण मला बूटही पूर्ण भिजू द्यायचे नसतात. त्यामुळे त्या बेतानं ते जमिनीपासून मी वर धरतो. लक्ष पूर्णपणे केंद्रित करून २२ कि.मी.चा पल्ला पार पाडायला मला दीड तास लागतो. त्यामुळे शरीर आणि मन थकून जातात. अखेर डांबरी रस्ता लागताच, आखडलेले हात-पाय मोकळे करण्यासाठी मी आनंदानं थांबतो. हिमालयालाच कवेत घेण्याचा माझा प्रयत्न चाललाय की काय, असा प्रश्न माझ्या हातवार्‍यांनी कुणा बघणार्‍याला पडला असता. मी उभा आहे तिथे शेजारीच एक निमुळतं गडद तपकिरी रंगाचं शिखर दडून बसलंय. दुपार व्हायला आत्ताशी कुठे सुरुवात झालीये हे किती बरंय. आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. मळभ आलेल्या आभाळाखाली हेच निसर्गदृश्य भीतिदायक वाटेल. गेला दीड तास क्लच केबलचा अतिवापर झालाय. ती पुन्हा नीट बसवण्याची गरज आहे. मोटरसायकल दुरुस्तीचं माझं प्रशिक्षण कामी येतं आणि मी पुन्हा रस्त्याला लागतो.

वळणावळणानं जाताना कुठल्यातरी वळणावर 'खाल्सार' लागतं आणि एक धाब्यापाशी जेवायला मी थांबतो. जेवणामध्ये.. तुम्ही बरोबर ओळखलंत.. पण माझ्यापुढे पर्याय नाहीये! आज जर मी मेलो, तर माझ्या अंगात डाळ-भात ठासून भरलेला सापडेल. पण या जेवणाला भरपाई म्हणून की काय, आज मला जेवताना माणसांचा सहवासही आहे. एक तरुण परदेशी जोडपं आत येतं आणि जागा शोधतं. एकच टेबल असल्यानं माझ्यासमोर येऊन बसण्याखेरीज त्यांच्यापुढे फारसा कोणता पर्याय नसतोच.

इतके स्वच्छ, चकाचक कसे काय ते दिसू शकतात? जळक्या ब्रेडला धूळ आणि ग्रिसनं माखावं तसा मी दिसतोय. आम्ही हसून अभिवादन करतो.
"हाय!"
"हाय!"
त्या हॉटेलात जे काही 'खास' पदार्थ असतील, त्याच्या २ थाळ्यांची मागणी ते वेटरपाशी करतात.
तिचं नाव हेलन आणि त्याचं टॉम.
"तुम्ही दोघंही किती स्वच्छ दिसताय!" मला बोलल्यावाचून राहवतच नाही.
जवळच्याच धबधब्याखाली त्यांनी दोन तास घालवले असल्याचं टॉम मला सांगतो. मीही तो अनुभव घ्यावाच असंही मला उद्युक्त करतो. पण हु: हु: हु:!! हिमनदीच्या बर्फाळ पाण्याखाली स्नानाच्या कल्पनेनंच मला हुडहुडी भरते.
"तुला आंघोळीची गरज आहेसं दिसतंय," तो हसत म्हणतो.
"पुण्याहून प्रवास सुरू करताना मी गोरापान होतो." माझ्या दुबळ्या विनोदाला हेलनच्या खळाळ हास्याचा नजराणा मिळतो. ती सुंदर आहे. उन्हानं तांबुसलेला तिचा गौरवर्ण रुपेरी-आत्ता ओल्या केसांनी आणखी खुलून आलाय. आणि कानांतल्या हिर्‍यांमधून सूर्यकिरण अधूनमधून परावर्तित होत माझे डोळे दिपवताहेत. तिच्याबद्दल वाटलेली तीव्र ओढ मनातून प्रयत्नपूर्वक काढून टाकीत, तिच्याकडे मी स्वच्छ नजरेने पाहतो, जेणेकरून डाळभातावर टॉम ताव मारीत असता ती माझ्याशी संभाषण सुरू ठेवेल. तिच्या इंग्लंडमधल्या खेड्यांबद्दल ती सांगतीये. एका ऑस्ट्रेलियन शाळेत ३ वर्षे शिक्षिका म्हणून शिकवल्यानंतर आता ती परत निघालीये. मी काहीतरी फारच विनोदी, किंवा हास्यास्पद विधान केलं असलं पाहिजे, कारण ती पुन्हा ते तिचं कलेजा खलास करणारं हसू हसतीये.. मोगर्‍याने गंधाळलेल्या मादक झुळकीसारखं..

अगदी छोट्या आमिषाला सुद्धा जुन्या खोडांची काळीजं पटकन बळी पडतात हे सर्वज्ञात आहे.

आणि एकदम अकल्पित अशा संकटात आपण सापडलोय याची मला जाणीव होते. गेले २१ दिवस मी प्रवास करतोय आणि तो करताना स्वतःला रिझवत आलोय. स्वतःशीच गप्पा मारत, हेल्मेटच्या घुमटात गाणी गात, आगच्या-मागच्या प्रेयसींना लकेरीतून साद घालत, आत्ता आत्ता तर चक्क देवाशी मी प्रेमालाप सुरू केला होता. पण आता माझा माझ्याबरोबरच्या संवादाचा सगळा साठा संपलाय. जुन्या आठवणींना परत परत उजळा देण्यानं त्यांची मोहिनी कमी-कमी होत जाते. काहीतरी नव्या विचारांना चालना मिळावी यासाठी मी व्याकूळ आहे. दुसर्‍याशी संवाद साधण्याची आंतरिक गरज अनावर होत असतानाच, नेमकी हेलन आणि टॉम भेटलेत. लेहकडे ती दोघं निघून जाताच, त्यांच्याबरोबर तो उत्फुल्लपणाही जातो आणि मला रिता रिता करून टाकतो.

भारताच्या अगदी उत्तरटोकाच्या सीमेनजीक मी आहे. सियाचीनही जवळच आहे. परंतु लडाखच्या आयुक्तांनी मर्यादित परवान्यानं जखडल्यामुळे त्या मोठ्या लोखंडी पुलाकडे मी जातच नाही. तो पूल सियाचीनला जातो. नुब्रातल्या देस्कित आणि हुंडेरमध्ये जाण्याची मला परवानगी अहे. हुंडेरमध्ये रात्रीचा मुक्काम करावा.

गवताची कुरणं, फळझाडं आणि इतर वृक्ष असलेली नुब्रा व्हॅली या प्रदेशातल्या अगदी थोड्या सुपीक जमिनींपैकी एक आहे. एरवीच्या ओसाड लडाखमध्ये आपलं सौंदर्य दिमाखात झळकवणारी. मस्त गडदशा वेगवेगळ्या छटांच्या वाळूच्या एका उथळ त्रिभुज प्रदेशातून एक नदी वळणं घेत धावतीये. पाचूचा हिरवा, सूर्यफुलांचा पिवळा आणि अगदी फिका गुलाबी एकमेकांत मिसळून गेलेत. या जगन्नियंत्याच्या जादूगिरीला ना अंत ना पार!

रस्त्यावरच्या नदीत फसलो

दिवसाचा ताप वाढायला लागला, की बर्फ वितळून इथले रस्ते पार जलमय होऊन जातात. रात्री लेहला मला पोचायचं असेल, तर 'पुली' तपासणी नाक्यापाशी मला दुपारी एकच्या आत गेलं पाहिजे.

दोन्ही बाजूंना बर्फाचे थर असलेल्या रस्त्याचा चढ चढू लागताच, मला जुहीचे शब्द आठवतात. 'लडाखहून तुला काय आणू' या माझ्या प्रश्नाला 'माझ्यासाठी बर्फ आण बाबा' असं उत्तर तिनं दिलं होतं. रामाचा चंद्रासाठीचा हट्ट आणि कौसल्येने पाण्याच्या थाळीमधे त्याचं प्रतिबिंब दाखवून केलेली त्याची पूर्ती मला त्या वेळी आठवली होती.

मी थांबतो. उतरतो. पांढर्‍या शुभ्र बर्फाच्या उभ्या भिंतीवर एका टोकदार दगडानं माझ्या मुलीचं नाव कोरून त्याचं प्रकाशचित्र घेतो... आता ती खूष होईल! मी शहाण्या बाबासारखा वागतोय.

आता मात्र मला घाई केली पाहिजे. येत्या तासात खार्दुंग खिंड पार करायला हवी. आणि संकट समोर उभं ठाकेपर्यंत मी आपला अशा समजुतीत, की काल सकाळी जशी ही खिंड पार केली, तशीच आजही विनासायास पार होणार. पण कालचाच हा रस्ता आज वेगळेच रुपरंग दाखवतोय. खार्दुंगच्या शिखरावरुन काल मी गेलो, तेव्हा सकाळ होती. आत्ता माध्यान्ह उलटली आहे. पर्वतमाथ्यांवरचा बर्फ वितळवण्यासाठी सूर्याला पुरेसा वेळ मिळालेला आहे.

समोरच्या एका वळणावर फेसाळ पाण्याचा प्रपात रस्त्यांवरुन कोसळतोय. खरंतर तिथे रस्ताच नाहीये. पॉलिश केल्यासारख्या पांढर्‍या मोठाल्या खडकांवरुन २ फुटी खोल नदी वाहतेय. माझ्या डावीकडच्या दोन पर्वतांच्या दुबेळक्यातून आणखीनच जोमानं पाणी वाहायला लागलं आहे. ८ फुटांपर्यंत वापरण्याजोगा रस्ता आहे आणि नंतर तो उताराला लागून उजव्या वळणावर एक भलं थोरलं भगदाड पडलं आहे. तिथे वितळलेल्या बर्फाच्या पाण्याचा धबधबा कोसळतो आहे. भगदाड किती खोल असेल? खाली वाकून बघायची मला भीती वाटते आहे. माझी बाइक मी २-३ फूट उजवीकडे ठेवायला हवी होती. तिथले खडक थोडेसे लहान होते. कदाचित त्यावरून पलीकडे जायला मला सोपं झालं असतं, कारण प्रपातापासून थोडासा लांब गेलो असतो. पण कड्यावरून घसरून पडण्याच्या भीतीनं मी डोंगराच्या बाजूनं, म्हणजे जिथे अजस्त्र खडक होते, तिथनं चालवत राहिलो. आणि त्यामुळे सामानानं भरलेल्या बाइकसकट थेट प्रवाहाखालीच झेप घेतली आणि फसलोच.

कुणी ऐकत नसताना शिवी हासडलेली चालते. 'यती'ला शोभेलशी आरोळी मी ठोकतो. पण काहीच उपयोग होत नाही. मी अडकलेलाच राहतो!

फूटभर खोल खड्ड्यात मागचं चाक आणि दोन थोरल्या पांढर्‍या खडकांमध्ये पुढचं चाक अडकलेलं, हे प्रकरण गंभीर वळण घेणार आहे.

जागच्या जागी मी जाम झालोय. बाइक इंचभरसुद्धा हलवू शकत नाहीये. खालचे दगड डळमळीत असल्यानं ती मला स्टॅण्डवर घेणंही शक्य नाहीये आणि त्यामुळे त्यावरुन उतरणंही शक्य नाहीये. मग मी बसून राहतो, माझ्या सद्यःस्थितीवर विचार करीत. दुसरं काय करणार! आतापर्यंतच्या प्रवासभर बूट घालण्याआधी मी मोज्यांवर प्लॅस्टिकच्या पिशव्या चढवीत आलो होतो. याच वेळी नेमकी विसरलो. काही क्षणांत बूट, मोजे अन् पावलं ओलीचिंब होतात.

माझ्या शरीरातली उष्णता कमी-कमी होऊन त्या गारठ्यानं 'हायपोथर्मिया' होण्याची 'शक्यता' 'वास्तवा'त बदलते. बाइक सोडून देऊन त्या गोठवणार्‍या पाण्यातून लवकरच बाहेर पडावं लागेल याची मला जाणीव होते. पण त्यामुळे बाइक आडवी होऊन मौल्यवान पेट्रोल टाकीतून वाहून गेलं असतं. हे संकट आपलं आपण निवारेल याची वाट बघत बसून राहण्याचा मी निर्णय घेतो. तेवढ्यात सुरुवातीला घुर्घुर आणि नंतर धिम्या गतीनं माझ्या दिशेने येणारी ट्रक दिसते. मी वाचलो, असा विचार माझ्या मनात येतो. पण माझ्या बाजूनं जेमतेम ६ इंचावरुन जाणारी, मालानं ठासून भरलेली ती ट्रक माझ्या मदतीसाठी काही थांबत नाही. "थांबलो, तर इंजिन गारठून बंद पडेल म्हणून थांबता येत नाही", असं ओरडून तो ड्रायव्हर तसाच पुढे जातो. पुढच्या वळणावरून घासत जाणारे गियरचे आवाज कमी होत जातात आणि माझी सुटकेची आशाही त्याबरोबरीनं मावळत जाते.

मी काय करू? प्रार्थना? कल्पना सुंदर आहे ! हेल्मेट डोक्यावर ठेवूनच मी डोळे मिटतो आणि माझ्या आध्यात्मिक गुरूंचं - बाबाजींचं स्मरण करत ध्यान लावतो. माझ्या मनःचक्षूंपुढे ते प्राचीन ऋषी अवतरतात आणि सुहास्य मुद्रेनं पुन्हा एकदा मला आशीर्वाद देतात. या वेळी पालीजवळ भेटलेल्या म्हातार्‍या सूफीच्या हिरव्या वेषात ते असतात. ते एक साधा संदेश देतात. 'हेल्मेट काढ'. मी डोळे उघडतो आणि त्यांची आज्ञा पाळतो. हेल्मेट काढल्यानं मला मदत कशी काय मिळणार आहे? आणि हेल्मेटचं काय करायचं? जड बाइकचं वजन पेलण्यासाठी माझे दोन्ही हात हॅण्डल धरण्यासाठी हवे आहेत. डाव्या हातात हॅण्डलचा तोल सावरून धरत मी ३ सेकंदात हेल्मेट फेकून देतो. खण्ण आवाज करीत ते धबधब्यापलीकडे जाऊन पडतं. नशीब ! माझं डोकं त्यात नव्हतं.

आता मात्र खरोखरीचा त्राता अवतरतो.

तो आणखी एका ट्रकनं येतो. मला ओलांडून धबधब्याच्या पलीकडे तो ती उभी करतो. ड्रायव्हरच्या उंच बैठकीवरून उडी मारून माझ्या दिशेनं येतो. ढगळ सलवार, लांब कुडता आणि दाढी. अगदी पक्का काश्मिरी. पंचविशीचा तरुण. नुसतंच हसून, बाइकचं हॅण्डल पकडून तो ती वर खेचतो आणि बाहेर काढतो. मी त्याचे मनापासून आभार मानतो. मी देऊ केलेले पैसेही तो घेत नाही. माझ्या पांढर्‍या केसांमुळे थांबून त्यानं मदत केलेली असते. त्याला जाण्याची घाई असते. मी आणखी काही बोलण्याच्या आत उडी मारुन तो आत बसतो आणि निघून जातो.

चमत्कारासारखा बाबाजींचा सल्ला उपयोगी पडतो. पलीकडे मान मोडून पडलेलं माझं शिरस्त्राण मी पुन्हा चढवतो.

या संकट विमोचनातून मला वेगळाच लाभ झालाय. खार्दुंगच्या त्या हिमनदीत माझी विषण्णता वाहून गेलीये.

दुसर्‍या वेळी खार्दुंगच्या त्या माथ्यावर मी उभा असतो, तेव्हा नुकतीच संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली असते आणि आभाळातले काळे ढग अनिष्टसूचक दिसतात. उंचावरच्या विरळ हवामानातले धोके माझ्या लक्षात आहेत. चक्कर, मळमळ व उलट्या यांचा मला संपूर्ण प्रवासात अद्यापपावेतो त्रास झालेला नाही. पुण्यातून निघण्यापूर्वी मी स्वतःवर जी कठोर बंधनं घालून घेतली होती, ती आतापर्यंत तरी कामी आली आहेत. परंतु मला माझ्या नशिबाची परीक्षा पाहायची नाहिये. ५ मिनिटांपेक्षा जास्त तिथे थांबता कामा नये. ओले बूट आणि त्याहीपेक्षा ओल्या मोज्यांमुळे खरंतर मी जास्त अस्वस्थ आहे. अशा आणीबाणीकरिता माझ्या सामानात ठेवलेले जुने बूट आणि जुने लोकरीचे मोजे मी काधतो. त्यांना वास येतोय, पण किमान उबदार आणि कोरडे तरी आहेत.

एका खडकावर बसून मी बूट्-मोजे बदलतोय, तो लेहच्या दिशेने इकडेच येणार्‍या २ मोटरसायकली दिसतात. त्या अजून तशा दूर आहेत आणि आजूबाजूच्या महाकाय पर्वतांमुळे खेळण्यातल्यासारख्या दिसताहेत. पहाडांतून त्यांचा घुमणारा आवाज हा नक्की एनफिल्डचाच! थोड्याच वेळात त्या तिथे पोचतात अन् त्यावरचे स्वार उतरतात. हेल्मेट काढताच, ते तरुण अन परदेशी असल्याचं लक्षात येतं. कोरड्या मोज्यांमुळे मला एकदम फरक जाणवतोय. मी त्यांच्याजवळ जातो. खार्दुंगमध्ये मला माझं प्रकाशचित्र हवंय. आणि आता तर ही दोघंच फक्त इथे आहेत. आज कुणीही लष्करी जवान दिसत नाहीये.

आम्ही एकमेकांच्या ओळखी करुन घेतो. जॅक अमेरिकन आहे हे उघडच आहे. त्याच्या अनुनासिक उच्चारांमुळे टेक्सासमधल्या लब्बॉक प्रांतातल्या दिवसांची मला आठवण होते. जॉन लंडनचा आहे. ते सामानाविना कसे काय हिंडताहेत याबद्दल मी आश्चर्य व्यक्त करतो. त्यावर जॅक खुलासा करतो. त्याचे सामान, अन्नपदार्थ, इतर लागतील त्या गरजेच्या वस्तू आणि एक मेकॅनिकसुद्धा त्यांच्या मागच्या गाडीतून येतोय. सगळ्या प्रकारच्या अडचणींना तोंड देण्याची तयारी करुन ते निघालेत. सामानानं भरलेल्या माझ्या बाईककडे नजर टाकून, प्रवासात नेहमीच कमी वजन घ्यावं, असं मत ते व्यक्त करतात. पण मी एकटाच प्रवास करतोय आणि अडीअडचणीसाठी माझ्यामागे कोणतंही वाहन नाही, हे मी त्यांना सांगतो. मग आम्ही एकमेकांची प्रकाशचित्रं आपापल्या कॅमेर्‍यात घेतो आणि परस्परांचा निरोपही! माझ्या मनात भावनांचा कल्लोळ दाटून मी पार बधीर झालोय.

इथे कायमच भणाणणार्‍या वार्‍यामुळे जवळच्या देवळाच्या खांबावरच्या भगव्या लाल पताका फडफडताहेत. मला जोरजोरात अच्छा करताहेत. प्रोत्साहित होऊन मी टाच मारतो.

लेहच्या उताराला मी लागतो. खार्दुंग खिंडीनंतरचा सगळा रस्ता उखडलेला आहे. दक्षिण 'पुली' तपासणी नाक्यापाशी मी पुन्हा एकदा जवानांबरोबर चहा घेतो. थोड्याच वेळात गोम्पांचे पांढरे कळस मी लेहच्या जवळ पोचल्याची खूण करतात.

या वेळी मी वायुदलाच्या अधिकार्‍यांसाठीच्या मेसमध्ये राहायला परत जाणार नाहीये. एकतर लेह गावपासून ती फार दूर आहे. आणि दुसरं म्हणजे, सुखसोयी खूप चांगल्या असूनही, या अंतरामुळे स्थानिक जनतेशी माझा अजिबात संपर्क तुटतोय. या लोकांबरोबर मिसळायला आणि त्यांच्याचप्रमाणे वागायला मला आवडेल. लेहच्या अगदी मध्यवर्ती भागात एक अतिथीगृह मी शोधून काढलंय. आणि तिथल्या उत्तम स्वयंपाक्याला 'डाळ-भात' सोडून काहीही बनवता येतं. पुढ्चे दोन दिवस मी पुन्हा माणसांच्या जगात राहतो. सुग्रास अन्न आणि पेयपानानं शरीराचे लाड करतो.

मोटरसायकल नीट रहावी याकडे माझं डोळ्यात तेल घालून लक्ष आहे. वेळाच्या वेळी इंजिन ऑईल बदलणं आणि इतर मूलभूत बाबीएंवर मी कायम नजर ठेवून आहे. अजून ७०० कि.मी. चा मला पल्ला गाठायचाय.
लडाखला काश्मीरपासून विलग करणारी 'झोजीला' (पुन्हा 'झोजी' हे नाव आणि 'ला' ही खिंड) पार करायला अवघड समजली जाते. क्लच, ब्रेक आणि अ‍ॅक्सिलेअरच्या केबल्स, त्याचप्रमाणे कल्च प्लेट्स आणि स्पार्क प्लगसुध्दा बदलण्याची गरज आहे. माझ्याकडे सगळे स्पेअर्स आहेत, पण तज्ज्ञ मेकॅनिककडून एकदा बाईक नीटपणे तपासून घेतलेली बरी. एनफिल्ड जाणणारा म्हणजे फक्त जुमा. लेहमधला प्रत्येकजण त्याचंच नाव घेतो. त्याला शोधणंही अवघड नाही. विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावर त्याची कार्यशाळा आहे. त्याच्या कार्यशाळेभोवती बघ्यांची गर्दी असते. मी जवळ जातो तो मला एक विचित्र दृश्य दिसतं. ग्रीसनं माखलेल्या एका मध्यमवयीन स्थूल माणसाची अन् त्याच्या गिर्‍हाईकाची कामाच्या मोबदल्यावरुन बोलाचाली सुरू असते. ज्यावरून ही बाचाबाची सुरू असते, ती एनफिल्ड शेजारीच उभी असते. माझ्या आयुष्यात एवढी गलिच्छ एनफिल्ड मी पाहिलेली नाही. वास्तविक 'रॉयल एनफिल्ड' म्हणजे खर्‍या पारख्याची गाडी. आणि तिच्या प्रेमातला तो मालक तिला कायम चकचकीतच ठेवणार. आता या गाडीच्या मालकाची न्यारीच कथा आहे.
तो सुमारे २५ वर्षांचा तरुण आहे. खांद्यापर्यंतचे त्याचे केस पिंजारलेले आहेत. शेवटची अंघोळ केल्याला युगं लोटली असावीत. धूळ आणि ग्रीसनं त्याचा चेहरा अन् नखं माखलेली आहेत. जंगलात-बिंगलात एकटाच राहत होता की काय?

त्याची बाइक गंजकी आहे. आणि टायर्स - गोटा! एक गाफी आणि त्यावर जुनाट काळी सुती पिशवी मागच्या बैठकीला दोरीनं बांधलेली आहे.

बघता-बघता शाब्दिक शिवीगाळीचं पर्यवसान ठोसाठोशीत होतं. इथे काम करून घ्यावं की नाही, या विचारात मी पडतो. तेवढ्यात ते गिर्‍हाइक धावतं, बाइक सुरू करतं आणि वेडेवाकडे हिसके खात तिथून निघून जातं. मग तो दुसरा - जुमाच असावा- चेहर्‍यावर गिर्‍हाइकाची सेवा करण्याचं पुरेपूर मार्दव घेऊन माझ्याकडे येतो. 'माझी बाइक बघून देणार का, मी श्रीनगरला निघालोय' असं मी त्याला विचारतो. त्याच्या मानेचा होकार येताच मी उतरतो. पुढचे ब्रेक्स, क्लच आणि एकूण अंदाज घेत सगळं आलबेल असल्याचा तो हवाला देतो. एकदा चालवून बघायची आहे का, याला त्याचा उत्साही सकारात्मक प्रतिसाद मिळतो. दोन मिनिटं चालवल्यानंतर सगळं नीट असल्याची तो ग्वाही देतो. केबल्स, ब्रेक, लाइनिंग्ज् अशा गोष्टींबद्दल नेमके प्रश्न मी विचारताच, 'परमेश्वरावर भरवसा ठेवा', असं तो सांगतो. एका मेकॅनिकनं असं सांगणं जरा विचित्रच वाटतं. तो १०० रुपये मागतो. माझं समाधान झालेलं नसूनही पर्याय नसल्यानं मी त्याचे पैसे देऊन हॉटेलकडे परततो. मला सामानाची बांधाबांध करून उद्या सकाळच्या श्रीनगरच्या प्रयाणाची तयारी करायचीये. लेहमधली आजची शेवटची रात्र.

***

अश्रूंचं खोरं

श्रीनगरमधनं बाहेर पडून मी अनंतनागच्या दिशेनं चाललोय. इथनं १ए हा राष्ट्रीय महामार्ग जातो. श्रीनगर ते जम्मूपर्यंतचा या महामार्गाचा भाग फारच चांगल्या स्थितीत आहे. रस्त्यावर एकही खड्डा दिसत नाही. दर ५०० मीटरवर मैलाचा दगड असावा, तसे शस्त्रधारी बुलेटप्रूफ जवान पहार्‍याला दिसतात. मला पोट रिकामं करण्याची गरज आहे. पण प्रत्येक वेळी लघवीसाठी थांबायचा प्रयत्न करताच जवळचा जवान मला पुढे जायची खूण करतो. कुठे थांबताच येत नाही. शेवटी गोळी खायची किंवा विजार ओली होऊ द्यायची एवढाच पर्याय माझ्यापुढे शिल्लक राहतो. मी थांबतो, उतरतो. हातातली गन तयारीत ठेवून एक जवान माझ्याकडे सावधपणे येतो. त्याच्या दृष्टीनं माझ्या भरलेल्या सामानात स्फोटकं असण्याची शक्यता आहे. अगदी सावकाश मी हात वर उचलून हेल्मेट काढतो. माझे पांढरे केस बघताच तो सैलावतो. जवळच्या देवदारापाशी माझा शरीरधर्म उरकून त्या जवानाशी गप्पा मारायला लागतो. हा तरुण जवान बिहारच्या कुठल्यातरी भागातला आहे आणि इथली बदली त्याला अगदी नकोशी झालीये. रौनक लाल त्याचं नाव. आजूबाजूला संपूर्ण प्रतिकूल वातावरण. जनता शत्रुत्व बाळगणारी. त्यामुळे ज्याच्या राष्ट्रभक्तीवर विनाशंक अवलंबून राहता येईल, अशा माझ्यासारख्या कुणाशीतरी भडाभडा बोलायला तो अगदी उतावळा झालाय. इतर सगळ्यांच्याप्रमाणेच आपल्या वार्षिक रजेकडे तो डोळे लावून आहे. कुठच्याही क्षणी स्फोट होऊन तुकडेतुकडे होण्याची शक्यता असलेल्या या मृत्यूच्या खाईतून बाहेर पडायला आतुर आहे. या जवानांच्या डोळ्यांसमोर कायमच मृत्यूचं थैमान आहे. याच रस्त्यावर केवळ दोनच दिवसांपूर्वी एक ट्रक उडविण्यात आला आणि त्यात २२ जवान ठार झाल्याचं तो मला सांगतो.

त्याच्या थर्मासमध्ये गरम चहा आहे. मोठ्या प्रेमानं तो मला गरमागरम चहा देऊ करतो. सुखानं त्याचे घुटके मी घेत असताना, जवळच्या खेड्यांतून अतिरेकीविरोधी कारवाया कशा चालतात ते मला रौनक लाल सांगतो. ही खेडी म्हणजे अतिरेकी कारवायांची केंद्रं आहेत. कोणत्याही दहशतवादी संशयित अड्ड्याला घेराव घातला, की स्वयंचलित गोळीबारांच्या आतून-बाहेरून फैरी झडल्याच समजा. चहूकडून माणसं मारली जातात.
"कोई भी मारा जा सकता है!" तो सांगतो. अशा प्रकारच्या छाप्यांमध्ये अनेक वेळा नागरिकही मारले जातात. आणि त्यामुळे भारतापासून काश्मिरी जनता आणखी तुटत जाते. काश्मीरसाठी माझा ऊर रडतोय. या खोर्‍याला कुणाचा शाप लागलाय?

मी निघणार, एवढ्यात लष्कराचा एक ट्रक येऊन उभा राहतो. आपल्या जेवणाचा डबा आणायला रौनक धावतो. ४ मोठाल्या पुड्यांच्या त्या डब्यात चांगलं जेवण असणार यात शंकाच नाही. शेजारी एका सैनिकांच्या पहार्‍यात माध्यान्हीला आपण जेवू असं माझा हा नवा मित्र मला सांगतो.
"खाना खाते समय कुछ भी हो सकता है|"
पळा-पळानं ही माणसं आयुष्य जगतात.
बाइक पुन्हा सुरू करीत, मी त्याचा निरोप घेतो. आपल्या घराकडे जाण्यासाठी डोळे लावून बसलेल्या रौनकला तिथे सोडून माझ्या घराकडे कूच करताना मला अपराधी वाटतं.

*
एक धाबा लागतो. भांड्यात खदखदणारा मटणाचा रस्सा असावा अशी आशा आहे. मी थांबतो. खायला काय आहे या माझ्या प्रश्नाला इथेही पुन्हा 'डाळ-भाता'चंच उत्तर आहे. पण भुकेनं मी इतका कावलोय, की तक्रारीलाही जागा नाही. मी बकाबका जेवतो आणि वर चहा घेऊन अनंतनागकडे निघतो. पोट भरल्यामुळे जग पुन्हा एकदा चांगलं वाटायला लागतं. काश्मीर खोर्‍याला वेढून टाकणार्‍या पर्वतराजीतून बाहेर नेणार्‍या रस्त्याकडे जायला बरं वाटतंय.

रस्त्यावरची वर्दळ बहुतेक लष्करी वाहनांचीच आहे. करारी चेहेर्‍याच्या जवानांना श्रीनगर-जम्मू दरम्यान ने-आण करणार्‍या लष्कराच्या खास हिरव्या रंगाच्या बसेस दिसतात. आनंदी दिसणारे जवान खोर्‍यातून बाहेर चाललेत. बहुधा त्यांच्या हव्याशा वार्षिक सुट्टीवर.

माझ्यापुढचा रस्ता एका डोंगराला वळसा घालून जातो. तेवढ्यात डोंगरावरून सुमारे १० तरुणांचा एक गट, मला थांबण्यासाठीचे जोरजोरात हातवारे करत माझ्याकडे धावत येताना दिसतो. बहुतेकांच्या अंगात टी-शर्टस असतात आणि चौघा-पाचजणांचा केसांसकटचा अवतार, ते काहीही करायला धजावतील असा असतो.

रस्त्याच्या वळणाच्या टोकाला मी पोचायच्या आतच दोघंजण पोचतात आणि वाट अडवून उभे राहतात. आत्तापर्यंत आडवं न आलेलं हे संकट असू शकतं. हे अतिरेकीही असू शकतील. माझं अपहरण करतील, किंवा मला तिथल्या तिथे गोळ्या घालतील. या भागात असे प्रकार सर्रास घडतातच. त्यांना चुकवून पळून जावं असा विचार मनात येईतो उशीर झालेला असतो आणि थांबण्याशिवाय माझ्यापुढे पर्यायच नसतो. भीती आणि थरार अशा दोन्ही भावनांचे तरंग माझ्या मनात उमटतात. अखेर काहीतरी घडणार. पुढ्यात काय वाढून ठेवलंय याची मला सुतराम कल्पना नाहीये.

मी माझं हेल्मेट काढेस्तोवर त्या भुतावळीनं मला घेरलेलं असतं. मी महाराष्ट्रातला आहे का, असा त्यातल्या एकानं मला प्रश्न करताच, त्याच्या उत्तरावर माझं भवितव्य अवलंबून असणार की काय, अशी शंका मनाला चाटून जाते. पण रहस्यभेद ताबडतोबच होतो. ते सगळे 'मराठा' तुकडीचे जवान असतात आणि माझी महाराष्ट्रातली 'एमएच' लिहिलेली ठसठशीत नंबरप्लेट दिसल्यावर आपल्या राज्यातल्या माणसाला भेटायला बराकींमधून ते धावत खाली आलेले असतात. तेही सगळेच घरच्या भेटीच्या ओढीनं आसुसलेले. त्यांच्या घराला जोडणारी मी म्हणजे एक नाळ आहे. त्यांच्या बराकीत मी चलावं असा प्रेमाचा आग्रह ते धरतात. संध्याकाळ होईतो मला जम्मूला पोचायचंय आणि आत्ताच दुपार उलटत चाललीये, असं मी त्यांना सांगूनही ते ऐकतच नाहीत. हरखलेल्या लहान मुलांप्रमाणे ते मला त्यांच्या छावणीत घेऊन जातात.

छावणीच्या पुढ्यात खोल दरी असते. जवळूनच महामार्गही गेलेला दिसतो. साच्यातून आधीच तयार करून उभारलेल्या फायबरग्लासच्या दोन खोल्या असतात. लांब नळकांडी उभी कापून समांतर जोडलेली अशा त्या भिंती असतात. ज्या खोलीत मी प्रवेश करतो, तिथे १४ पलंग आणि प्रत्येक पलंगापाशी एक छोटं टेबल ठेवलेलं असतं. जिथे मावेल तिथे ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी विराजमान असते. सध्या त्यांची चलती दिसतीये. मुजर्‍याच्या आविर्भावात 'उमराव जान'मधली रेखाही एका कोपर्‍यात दिसते. डाव्या हाताला एका उंच फळीवर एक टीव्ही सेट आणि डीव्हीडी प्लेयर असतो. 'रात अकेली है' म्हणत 'असाहाय्य' देवानंदला तनुजा मोहात पाडण्याचा प्रयत्न करीत असते. पण त्याकडे कुणाचंही लक्ष नाही. त्यांनी हे आधी अनेकवेळा निश्चित पाहिलेलं असणार.

कुणीतरी मोठ्ठा स्टेनलेस स्टीलचा पेला भरून लस्सी माझ्या हातात देतं. माझं मराठी ऐकायला ते आतुर आहेत.
मला रस्त्यावर रोखून धरणारा, काळा टी-शर्ट, जीन्स घातलेला आणि दाढीचे खुंट वाढलेला शिवनाथ आकुर्डीचा आहे. पुण्यात मी राहतो तिथून २५ कि.मी. अंतरावर. तो मजेत असल्याचा निरोप त्याच्या आई-बहिणीला मी द्यावा अशी त्याची इच्छा आहे. हा खराखुरा शूर निरोप. कारण कुणीच 'मजेत' नाहीये हे उघड दिसतंय. कणाकणानं जगण्याचा ताण त्यांना खाऊन टाकतोय. धैर्याचा खूप आव आणून त्यांनी तो लपवण्याचा प्रयत्न केलाय खरा, पण आपापल्या घरांपासून हजारो मैल दूर, माझ्याभोवती जमलेली ही तरुण माणसं, धोकादायक जगात अडकून पडलेल्या अश्राप पोरांसारखी वाटतात. नांदेडचा दिलावर शीख असूनही मातृभाषा असावी तसं मराठी बोलतो. आम्हां सगळ्यांचा तो एकत्रित फोटो काढतो. त्यात आम्ही सगळेच गुंड दिसतो.

निघण्यासाठी उठताना अपराधीपणाच्या अनोळखी भावनेनं मी जडशीळ होतो. त्यांना त्यांच्या नशिबाच्या हवाली सोडून देऊन मी निघून जातोय असं वाटतं. या प्रतिकूल वातावरणात कितीजण या वर्षात तगतील? अजून एका आठवड्याभरानं माझ्या घरी आरामखुर्चीत सुखेनैव बसून कॉफी पिता-पिता, एखाद्या चकमकीत वा स्फोटात हे जीव मारले गेल्याची बातमी मी वाचत असेन का? शिवनाथचं लग्न होऊन त्याचा संसार फुलेल का? की आघाडीवर लढता-लढता वीरमरण आल्याचा तो संदेशच त्याच्या आई-बहिणीच्या नशिबी आहे?

या भिरभिरत्या विचारांमुळे माझ्या चित्तवृत्ती थार्‍यावर येतच नाहीत. त्यांचा निरोप घेताना, बळजबरीनं हसू ओठांवर आणावं लागतं. रस्त्यावर आल्यानंतर आणि हेल्मेटखाली तोंड लपवल्यानंतरच माझा बांध फुटतो. मी ढसाढसा रडतो. आपल्या देशासाठी सैनिक प्राण पणाला लावतो म्हणजे काय, याचा खरा अर्थ मला आज उमगतो. स्वतःच्या स्वार्थाकरिता राष्ट्रवाद वा धर्माचा वापर करून मानवी दु:खं भडकती ठेवणार्‍यांची जी जमात असते, त्यांच्यासाठी हा सैनिक आपलं आयुष्य धारातीर्थी ठेवत असतो. हे दुर्दैव कोणाकोणाचं म्हणायचं!

*****

बाइकवरचं बिर्‍हाड

लेखक - अजित हरिसिंघानी
अनुवाद - सुजाता देशमुख
प्रकाशक - राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या - १६०
किंमत - रुपये २००

*****

टंकलेखनसाहाय्य - श्रद्धा, साजिरा, आशूडी

*****

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख आहे रे - वाचायला सुरूवात केली आणि वाचतच राहिलो -
धन्यवाद तुम्हा सर्वांना.

नमस्कार चिन्मय,

तुमचे कुठल्याही विषयावरचे लेखन अतिशय उत्स्फुर्त असते. हे ही तसेच. हे पुस्तक फारच छान असणार ह्यात शंकाच नाही. तुम्हाला उत्त्म आणि वैविध्यपूर्ण लेखनासाठी तसेच ह्या सुंदर पुस्तक परिचयासाठी अनेक धन्यवाद.

पुलेशु!

प्रिया

मी माझं हेल्मेट काढेस्तोवर त्या भुतावळीनं मला घेरलेलं असतं << हा भाग कुठेतरी वाचला आहे, कुठल्या तरी पेपर मधल्या परिक्षणात की कुठे आठवत नाही. तेंव्हाही थोड सेन्टी झाल होतं आताही.

एक दिन अपूनभी ऐसा सफर करनेवाला है.

एका सुंदर पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल (परत एकदा ) धन्यवाद !

स्वतःच्या स्वार्थाकरिता राष्ट्रवाद वा धर्माचा वापर करून मानवी दु:खं भडकती ठेवणार्‍यांची जी जमात असते, त्यांच्यासाठी हा सैनिक आपलं आयुष्य धारातीर्थी ठेवत असतो. हे दुर्दैव कोणाकोणाचं म्हणायचं! >>> Sad

सुरेख परिचय करून दिलास चिनूक्स ! परवाच हे पुस्तक विकत घेतले आहे, लवकरच वाचून काढेन.

हा लेख आता ऑफिसात बसून वाचतोय. शेवटचा परिच्छेद वाचल्यावर उठून बाथरूममधे जावे लागले. सकाळी सकाळी सगळ्यांसमोर डोळ्यात पाणी आलेले बरे दिसत नाही.
गेल्याच वर्षी पुण्यापासून लडाखचा प्रवास मीसुद्धा बाईकवर केला आहे. (होंडा युनिकॉर्न.) मी आणि सोबत आणखी दोन मित्र. १८३८० फुटावर असलेला जगातला सर्वात उंच रस्ता- खारदुंग-ला इथे बाईक नेणे काय असते, याचा अनुभव मी घेतला आहे. त्यामुळे लेखकाने लिहिलेल्या अनुभवांशी लगेच एकरूप झालो. ते प्रवासवर्णनही अर्धवट लिहून झाले आहे. भविष्यात कधी पूर्ण झाल्यास मायबोलीवर नक्की टाकेन.

सही! आजच नावाच्या वेगळेपणामुळे लक्ष वेधुन घेतलं या पुस्तकाने आणि मी वाचनालयातुन मागवलयं.. आणि इथे येऊन हे परिक्षण वाचतेय्.. काही दिवसांनंतर कसं वाटलं ते लिहीन. Happy

मस्त शैलीत लिहिलय रे.. मी हे एका प्रदर्शनात बघितले होते.. पण त्या सिंघानीयांचे बाईकबरोबरचे प्रकाशचित्र प्रत्येक पानावर वॉटरमार्कसारखे टाकल्याने माझ्या मनातून एकदम उतरले (हा वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग.. सार्वत्रीकरण करु नये.. मला स्वतःला बिनचित्रांची थेरॉप्रभृती लिहितात तसली प्रवासवर्णेने आवडत असल्याने हे खटकले)..

तरीपण मी हे पुस्तक घेईनच आता..

छानच!
चित्तथरारक आठवणींसाठी पुस्तक मिळवून वाचणारच.
लेख वाचताना सुरुवातीची रोमांचकता शेवटी खिन्नतेत बदलते. आणि आपण काही करू शकत नाही ही षंढ जाणिव खूप टोचत राहते Sad

धन्स रे चिनूक्सा. लिहीता लिहीताच हे इंटरेस्टिंगे असं वाटत होतं. शेवटचा पॅरा अंतर्मुख करतो..

'One life to ride' वाचलेलं. अनुवाद छान वाटतोय. इथे टाकल्याबद्द्ल धन्यवाद.

अफाट !!.....कोणे एके काळी, कॉलेज मधे असताना, कुमार सप्तर्षींचं 'यात्री' हे पुस्तक वाचून प्रचंड भारावून गेले होते. आज परतं तसचं झालयं. नक्की विकत घेणार हे पुस्तकं.

अफाट !!.....कोणे एके काळी, कॉलेज मधे असताना, कुमार सप्तर्षींचं 'यात्री' हे पुस्तक वाचून प्रचंड भारावून गेले होते. आज परतं तसचं झालयं. नक्की विकत घेणार हे पुस्तकं.

क्सा, धन्यवाद ह्या पुस्तकाबद्दल इथे लिहिण्यासाठी.. काल पुस्तक घेतले आणि एका बैठकीत वाचून काढले.. माझ्या काही आवडत्या प्रवासवर्णनांमध्ये हे नक्की (ह्या पुस्तकाला 'हेवन्स लेक' सारखी चव आहे, नाही का?)

Pages