गानभुली - जय जय राम कृष्णं हरी

Submitted by दाद on 14 July, 2010 - 17:50

'जय जय राम कृष्ण हरी’
ह्या मंत्राची भूल तर सगळ्या वारकरी संप्रदायाला पडली होती. पण माझ्यासाठीतरी ह्याचा गानमंत्र केला पंडितजींनी, पं. भीमसेन जोशींनी.

फार पूर्वीची गोष्टं आहे. गावात पंडितजींचा अभंगवाणीचा कार्यक्रम होता. किती किती ऐकून होते ह्या कार्यक्रमाबद्दल. क्लासमधे गुरूजीसुद्धा खूप बोलले पंडितजींबद्दल, किराणा घराण्याबद्दल... गोष्टी, किस्से... काही दिवस आयुष्यं नुस्तं पंडितजी आणि त्यांचा अभंगवाणीचा होणारा कार्यक्रम ह्याभोवतीच घोटाळलं.
पंडितजी, त्यांचं गाणं, त्यांचे अभंग, ह्याच्यावर बोल बोल बोलत होतो... आम्ही सगळेच...

घरातल्या मोठ्यांनी शेवटी, ’तिथे जाऊन तरी गप्पं बसेल’ एव्हढ्या एकाच आशेवर घरून लवकर निघायला कबुली दिली.
तरी आम्ही कार्यक्रमास्थळी पोचेपर्यंत सूर्य मावळून गेला होता. पण कार्यक्रमातला पहिला ’सा’ तरी ऐकून जा‌ऊया असल्या चुकार प्रयत्नात काही ओढाळ किरणं अजून मैदानावर रेंगाळत होती. इतरवेळीचं ते मैदान आता वेगळंच दिसत होतं. प्रवेशदाराची कमान, त्यावरची झेंडूच्या माळांची झालर, आंब्याच्या पानांची तोरणं, इथे तिथे वावरणार्‍या कार्यकर्त्यांची लगबग, आता ये‌ऊ लागलेल्या प्रेक्षकांचे घोळके, अत्तरांचे, गजर्‍यांचे वास.... ह्यामुळे इतरवेळी त्याच्या व्याप्तीमुळे अंगावर येणारं मैदान एकदम घरच्या अंगणासारखं मवाळ, ओळखीचं अन तरीही वेगळं वाटू लागलं.

माझं लक्ष प्रकाशाचे झोत सोडलेला भल्या थोरल्या मंचाकडे गेलं. स्टेजवरच एका बाजूला एका छोट्या लहान उंचावलेल्या स्थानावर पखवाज आणि तबला दोन्ही होते. दुसया बाजूला एक ऑर्गन म्हणजे पायपेटी होती. बर्रोब्बर मधे एका मंचावर चार तानपुरे उभे करून ठेवले होते आणि एका बाजूला साधी हार्मोनियम. त्याहूनही कहर म्हणजे समोर दोन ओळीत दहा दहा टाळांचे जोड. हे नुस्तं बघुनच मला भिरभिरल्यासारखं झालं.
मागे सजावटीत लावलेला, कर कटी घे‌ऊन विटेवरी उभा वैकुंठीचा राणा, हे कौतुक जवळून न्याहाळायला पा‌ऊल टाकतो की काय अस्सं वाटलं.

सगळ्या ओळखीच्यांना हात कर, हाका मार, बोलावून घेऊन बोल, न आले तर तिथे जाऊन बोल, ह्या सगळ्यातून कधीतरी स्टेजवरचा ऑर्गन आणि त्या नंतर तानपुरे वाजू लागल्याचं कानांनी टिपलं. तबला, पखवाज लागल्याचंही जाणवलं... आणि आपसूकच अवधान स्टेजकडे वळलं.
भगवे फेटे घालून वीस टाळकरी जेव्हा स्टेजवर आले आणि मागे, कोनात मिळणार्‍या दोन तिरक्या ओळीत बसले.... तेव्हा त्या भल्या थोरल्या मैदानातली हजाराची गर्दी नि:शब्द झाली.

मग ह्या सोहोळ्याचे आनंद निधान पंडितजी शाल सावरीत मंचावर आले आणि ’नाभी नाभी’ म्हणणार्‍या त्या राजस सुकुमाराच्या आकृतीला मागे वळून नमस्कार करीत स्थानापन्न झाले. पुन्हा एकदा तानपुरे हातात घेऊन पंडितजींचं सूर-जवारी तपासून होईपर्यंत, त्याला स्वत:लाच ओझं झालेलं निवेदन निवेदकाने उरकलं होतं.

...पंडितजींनी खूण करताच साधी उठान घेत पखवाज भजनी ठेका बोलू लागला... धीरगंभीर सागराच्या गाजेसारखा.. संथ तरी वाहता, स्थिर तरी सजीव.
पखवाजाला एक गंभीर नाद आहे.... मुग्ध करणारा. आपल्याच मनाच्या तळाशी बुडी मारून बसावं असं वाटू लावणारा... एखाद्या अंतर्नादासारखा....
दोन-तीनच आवर्तनात त्याला तबल्याचा निर्झरू ये‌ऊन मिळला. स्वराच्या तबल्याने निर्माण झालेला खळाळ, तितकाच काय तो दोन प्रवाहातला खंड म्हणायचा... परत दोन्ही वाजू लागताच एकच एक भजनीचा प्रवाह वाहू लागला.

इतका वेधक असतो भजनी ठेका? तर होय. असतो.... त्याचं काय असेल ते कारण, डोक्याच्या, मनाच्या तळी बुडी मारून शोधू जाण्या‌आधीच एक अकल्पित घडलं....
एकाचवेळी चाळीस हात उठले, एका स्वरातल्या वीसच्या वीस टाळांनी उठान घेतली... आणि वीस आघातांचा एकच आवाज, एकाच लयीत वाहू लागला.

अंगावरचा रोम न रोम तरारून उठला, डोळ्यात पाणी आलं, समोरचं दृश्य दिसेनासं झालं, फक्तं भजनी ठेक्याची ती धारा आणि त्याचाच एक भाग बनून वाहणारं हे जग... आपल्यासहं.
अजून शब्दाचाच काय पण, स्वराचाही स्पर्श न झालेल्या, नादाच्या ह्या प्रवाहाला इतकं आगळं वेगळं वेधक रूप कोण देतंय? अशी कोणती ही शक्ती?

आत्ता इतकं मोठं झाल्यावर लक्षात येतय....साध्या पाण्याचं ’तीर्थं’ करणारी जी कोणती शक्ती आहे ना, तीच ती!

...... अन ह्या सार्‍याहूनही साजिरं दिसत होतं पंडितजींचं डोलणं. लहान लहान चुटक्या वाजवीत जागच्या जागी डोलणारी ती मूर्त. त्यांच्या मिटल्या डोळ्यांना ’हाल कारे कृष्णा डोल कारे कॄष्णा’चं रुपडं आपला सकंकण बाहू हालवीत, त्याच तालात डोलत असलेलं दिसत असणार बहुतेक...
सारं अस्तित्वं कानात ये‌ऊन उभं रहाणं म्हणजे काय ते त्याक्षणी तन-मनाने तिथेच असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाने नक्की अनुभवलं असणार. त्यांच्याकडे बघता बघताना जाणवलंच की, ओंकाराचं ’सा’रूप छातीत कोंदून आत्ता हुंकार फुटणार....

....हात उंचावत, आकाशाकडे डोळे लावत पंडितजींनी आपल्या गुण-गंभीर आकारात, वरच्या ’सा’ पासून धबधब्यासारखी कोसळणारी एक तान घेतली आणि सूर शब्दावले....
’जय जय राम कृष्ण हरी’!

समोर बसलेल्यांत ज्यांच्या मुखातून काही उमटू शकलं, ते होतं, ’अहाहा’, किंवा काळजाच्या चुकलेल्या ठोक्यासाठी ’च्च च्च’..... उरलेले सगळे नि:शब्दी फक्तं विनम्र अन हतबलही हो‌ऊन मान हलवते झाले.

त्यानंतर सुरू झाला यमन रागात नुसता ’जय जय राम कृष्ण हरी’चा जप. एकतर यमन राग हाच मुळी एखाद्या प्रचंड सागरासारखा... त्या संथ लयीशी खेळत पंडितजी गात होते.... दुसरं काssही नाही.... हा तेरा अक्षरी मंत्र फक्त...

आधी-व्याधींच्या स्पर्शातून मुक्तं करणारा, सुख-दु:खाची पुटं झटकून मोकळा झालेला असा निव्वळ भक्तिरसाचा झळाळ अगदी काहीच क्षणांसाठी का होईना पण.... पडेल का कधी आमच्यासारख्या सर्वसामान्य मनांच्या उमाठ्यावर?.... त्याक्षणी तेच झालं... अगदी तेच झालं!
त्या यमन रागाच्या अथांग सागरात ’राम कृष्ण हरी’ची पताका दे‌ऊन लोटून दिलं पंडितजींनी आम्हाला.... जणू एकच भरवसा.... एकच भाव... ’भक्ती’!

काही आवर्तनांनंतर त्यांनी लय वाढवली. फक्त पाच शब्द, सात स्वर, एक ठेका... एव्हढ्या जुजबी सामनासहीत ह्या गानसम्राटाने निर्माण केलेलं भक्ती रसाचं राज्यं... राम आणि कृष्णाच्या सत्-चिताचं, आनंदाचं साम्राज्य....

हे असं किती वेळ?... माहीत नाही, आठवत नाही...
त्यानंतर पंडितजी उरलेल्या कार्यक्रमात काय गायले, आठवत नाही...
एक मात्रं लख्खं आठवतंय..... की त्या गजराच्या वेळी स्थळ, काळाचं माझंतरी भान नुरलं होतं....

अजूनही कधीतरी यमन रागात ’जय जय राम कृष्ण हरी’ चा जप मनाच्याच कुठल्यातरी अंतर्कोनातून लहरत मन:पटलावर येतो.
त्याला अगदी आता आता पर्यंत त्या कार्यक्रमाचा, आमच्या त्या दिवसाच्या तयारीचा, त्या सजावटीचा, वातावरणाचा संदर्भ होता....
आता हळू हळू ती आवरणं गळून पडलीयेत आणि उरलाय तो फक्त नादाचा, सुराचा रस. पंडितजींचा आवाज, पखवाज-तबल्याचा, वीस टाळांचा नाद, ऑर्गनचा सूर ह्यात गुंथला.... निव्वळ भक्तिभाव!

समाप्त

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अप्रतिम. असा अनुभव इतका सुंदर शब्दबद्ध करता येणं म्हणजे ग्रेटच. माझे आजोबा वारकरी पंथाचे. आजोळी दिवाळीत नरकचतुर्दशीला सकाळी भजनाचा कार्यक्रम असे. जेव्हा सर्वजण सामुहिक रीतीने टाळ वाजवायला लागत तेव्हा अंगावर शहारा यायचा.काहीतरी विलक्षण वाटायचं.
आणि भक्तीरसाबद्दल काय बोलणार? सगळ्या नद्या शेवटी सागराला मिळतात तसंच सर्व रसांचं.

दाद ला काय दाद द्यावी? शब्दच खुंटतात Happy

सर्व प्रत्यक्ष अनुभवल्यासारख वाटलं. अंगावर रोमांच आलेत. कानात टाळांचा गजर घुमतोय Happy

भिमण्णा डोळ्यासमोर आले. माझे गानदैवत आहेत ते Happy

धन्यवाद दाद... खुप सुंदर वाटतय Happy

दाद, हे वाचून मला पटकन् असं वाटलं की नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळि उठून चुलीवरच्या पाण्याने उटणं लावून आंघोळीची तयारी करतोय....

ह्या सगळ्या गोष्टींशी कुठेतरी नाळ जोडली गेलीये मग दिवाळीचं अभ्यंगस्नान म्हणजे नुस्त शुचिर्भूत होणं रहात नाही आणि टाळांची किणकिण नुस्ता ताल बनू शकत नाही. हे उतरतं आपल्यात खोल खोल आतमध्ये. पण असला अनुभव शब्दबद्ध करण हे अतिशय ताकदीचं काम आणि तू ते समर्थ पणे पेलल्याच जाणवतय प्रत्येक वाक्यातून....

जय जय रामकृष्णं हरी

धन्यवाद (काय पण औपचारिक शब्द आहे... 'आभारी आहे' सुद्धा तीच गत).
अशी भरभरून दाद आल्यावर काय बोलायचं ते कळतच नाही.

हे लिहिताना मला स्वतःला अत्यंत समाधान लाभलं. का कुणास ठाऊक काही काही गोष्टी इतक्या "हिट द स्पॉट" होतात की, त्याचे डिटेल्स गायब झाले तरीही त्याच्या समाधानाचं, परिपूर्णतेची पातळी किंचितही कमी होत नाही... नाही का?
हे त्यातलच एक.
असो....

पुण्यात जन्म झाला तरी पंडीतजींना ऐकण्याचा योग कधी आला नाही. पण भक्तीगीतांबद्दल म्हणायचं झालं तर खरोखर, टाळ, मृदूंग , पखवाज, विणा , अन कपाळी नाम ओढलेले ते तल्लीन वारकरी, किंवा भजनी मंडळी पाहण्याचा योग, दरवर्षी तूकाराम बीजेला देहू येथील गाथा मंदिरात हमखास येतो. कुणास ठाऊक का पण त्यांना अगदी त्यांच्या डोळ्यासमोर देव दिसत असावा तेव्हाच ते इतर सारे काही विसरून त्याच्या भक्तीभावात अक्षरशः स्वतःचे अस्तित्व विसरून जातात.

आजही, पं. भिमसेन जोशी यांची दोन गाणी मला ऐकायला आवडतात. ती म्हणजे...

टाळ बोले चिपळीला,नाच माझ्यासंग
देवाजीच्या दारी आज, रंगला अभंग..

आणि...

बिजलीचा टाळ नभाचा मृदूंग,
तुझ्या किर्तनाला देवा धरती होईल दंग..

एकाचवेळी चाळीस हात उठले, एका स्वरातल्या वीसच्या वीस टाळांनी उठान घेतली... आणि वीस आघातांचा एकच आवाज, एकाच लयीत वाहू लागला.>>
हे वाचत असतानाच माझ्या अंगावर रोमांच आले.

अजून शब्दाचाच काय पण, स्वराचाही स्पर्श न झालेल्या, नादाच्या ह्या प्रवाहाला इतकं आगळं वेगळं वेधक रूप कोण देतंय? अशी कोणती ही शक्ती?>> काय अनुभूती आहे!

तीच शक्ती दादच्या लिखाणात आहे. अन्यथा शब्दातून ही अनुभूती आमच्यापर्यंत पोचवणे कसे जमले असते?
खूप छान, तो अनुभव आणि हे लिखाण दोन्ही.

दाद तुझ्या दृष्टीकोनातून पंडितजी अनुभवायला मिळाले. धन्यवाद.
मला एकही पंडितजींची चांगली मैफल प्रत्यक्ष ऐकायला मिळाली नाही. सवाई गंधर्वच्या सांगता समारोहातही नुसता उपचार उरल्यासारखा वाटायचा. पण अभंगवाणीच्या रेकॉर्डस ऐकुन बर्‍यापैकी समाधान वाटले.
अगदी अलिकडे चतुरंग रंगसंगीताच्या कार्यक्रमाची ध्वनीफीत मिळाली आणि त्यातली साध्या नमननटवरा तील दणदणीत तान ऐकली आणि जाणवले आपण किती मिस केले ते.

एकाचवेळी चाळीस हात उठले, एका स्वरातल्या वीसच्या वीस टाळांनी उठान घेतली... आणि वीस आघातांचा एकच आवाज, एकाच लयीत वाहू लागला.>>
हे वाचत असतानाच माझ्या अंगावर रोमांच आले>>>>>>>>

माझ्याही!!

सुरेख!!

व्वा! रोमांचक अनुभव तितक्याच ताकदीने शब्दबद्ध केलाय तुम्ही. असा सुंदर अनुभव इतक्या सुंदर शैलीत आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल खरच, अगदी मनापासून धन्यवाद.

दाद, खूप सुरेख लिहीलंय!!!
त्या वातावरणात घेउन गेलात. क्षणभर आपणही तिथेच बसुन हे सारे स्वतः अनुभवतो आहे अशी भावना झाली.

साध्या पाण्याचं ’तीर्थं’ करणारी जी कोणती शक्ती आहे ना, तीच ती!<<<<

हे आणि असं काही... फक्त तूच लिहावंस बायो. सलाम तुला.

आणि सूर शब्दावले >> अप्रतीम!!!!

पंडितजींची एक मैफील ऐकायचे सौभाग्य माझ्या नावावर जमा आहे. खूप दिवस झाले फारसे काही आठवत नाहिये पण एक गोष्ट नाही विसरली - तेच ते पाच शब्द आणि ते ऐकून डोळ्यात आलेले पाणी. अगदी आईला वगैरे रडवणार्‍या एखाद्या चित्रपटातील प्रसंगाची हसत हसत मजा घेणारा मी, माहीत नाही कसा फशी पडलो त्या शब्दांना.

Pages