श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ९

Submitted by बेफ़िकीर on 9 July, 2010 - 05:27

तारा निघून गेल्यानंतर पुन्हा बाबांबरोबर गट्टू शाळेला जायला लागला. तारामावशीच्या स्टे मधे अनेक चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या. पुण्यातही तिने काही कपडे, मिठाई, इतर खाद्यपदार्थ व श्रीसाठी एक शर्ट विकत घेतला. ताराची परिस्थिती चांगली असल्यामुळे ती हे करू शकत होती. रमा गेल्यानंतरही संबंध व्यवस्थित टिकवून होती तारा! पण श्रीचे लक्ष जरासे कमीच होते घरात! कारण तो जवळजवळ रोज संध्याकाळी जहागीरला जाऊन येत होता. स्वातीच्या घरीही जाऊन येऊन होता. त्यांना जी मदत लागेल ती त्याच्या परीने करत होता. स्वाती आठ दिवसांनी घरी आली होती. महिनाभर घरी राहावे लागणार होते. उजव्या गुडघ्याला दुखापत झालेली होती. आणि स्वाती आपल्या घरी यायच्या चार दिवस आधी, म्हणजे पुण्यातून निघायच्या दिवशी ताराने...

जाताना आपल्या मेहुण्याला एक विचार ऐकवला... जो ऐकून श्री ती गेल्यानंतरही खूप वेळ विचार करत बसण्यासारखा होता.

ताराच्या मते गट्टूसाठी आईच्या जागी कुणीतरी असणे आवश्यक होते व ती जबाबदारी स्वाती घेईल का हे श्रीनिवासने स्वातीला विचारले तर बरे होईल!

हा प्रस्ताव श्रीला अजिबात मान्य नव्हता. पण तारा बरीच पुढारलेल्या विचारांची होती.

"माणसाचा मृत्यू ही एक न टाळता येण्याजोगी बाब आहे. रमाताई गेलेली आहे हे सत्य आहे. तिच्यावर तुमचे निरतिशय प्रेम होते हेही तितकेच सत्य आहे. दुर्दैवाने उलटे झाले असते तर रमाने असा निर्णय कधीच घेतला नसता. पण गट्टू लहान आहे. हे संस्कारांचे वय आहे. या वयात आईच्या सहवासाची गरज असते. तुम्ही दिवसभर कंपनीत असता. तो इथे एकटाच पवार आजींकडे खेळत असतो.

स्वातीला मान्य असेल तर तुम्ही एकदा गंभीरपणे विचार का करत नाही?? "

ताराचे हे बोलणे अस्पष्टपणे ऐकू आलेल्या पवार मावशीही तिथे पोचल्या. आज पहिल्यांदाच अतिशय शांतपणे त्यांना बोलताना पाहिले श्री व ताराने!

पवार मावशी - आई ती आई अन दाई ती दाई! मी कितीही केले तरी त्याच्यात आईपण नसते श्री! त्यात सहवासाने आलेली माया असते. पोटच्या गोळ्यावर जो जीव असतो तो मी गट्टूचे करण्यात नसतोच. अजून तुझे वय आहे. ती मुलगीही ठीकठाकच आहे. आणि हे सगळे गट्टूसाठी आहे. तुझ्यासाठी नाही. त्या मुलीलाही पुढे एक साथीदार लागणारच! तुलाही म्हातारपणात एक साथीदार लागणार! बर! यात काही वावगेही नाही सांगत मी! लग्नच करायला सांगतीय! काय? आता त्या मुलीला तू विधूर म्हणून वगैरे चालणार नसलास तर गोष्ट वेगळी! मग तिचेही काही चूक नाही. पण तुम्ही रोज ऑफिसात एकत्र असता, जेवता, गप्पा मारता! तू माणूस कसा आहेस हे ती जाणून असणारच की! त्यामुळे विधूर असण्याचा फारसा प्रश्नही येणार नाही.

श्री - पण.. मला तरी यात काही आवश्यक असे वाटत नाही. गट्टूच्या एकंदर वागण्यातून त्याच्या आयुष्यातील एक मोठा आनंद मिसिंग आहे असे जाणवत नाही. तुमच्यावर तर त्याचा आईपेक्षा जास्त जीव आहे. सगळे व्यवस्थित चाललेले आहे. रमानंतर कसेबसे सेटल झालेल्या या आयुष्यात एक नवीन... वादळ..

तारा - वादळ कसं म्हणता श्री दादा? उलट एक स्थैर्यच म्हणा! माझ्या बहिणीच्या खरे तर मी विरोधात बोलतीय यावर माझाच विश्वास बसत नाही. पण खरं सांगू? बाईशिवाय घरपण नाही घराला! बघा! किती धावपळ होतीय तुमची! कशा का होईना, पण पोळ्या कराव्या लागतात. डबे भरावे लागतात. गट्टूला सोडून या, आणा! त्याच्या शाळेच्या सगळ्या गोष्टी आणा! हळूहळू त्याचा अभ्यास वाढायला लागेल. हळूहळू तुमचीही चाळिशी येईल. मग इतकी धावपळ जमायची नाही. आणि मुख्य म्हणजे.. कायम आपल्या बरोबर असणारा एक साथीदार हवाच आयुष्यात! मुलं काय? नोकरी, लग्न वगैरे झालं की वेगळीही होऊ शकतात.

श्री - तारा, रमाच्या फोटोला नजर तरी मिळवू शकेन का मी? माझ्या मनाचा विचार करा जरा दोघी!

मावशी - वेड्या, खरे सांगायचे तर आम्हालाच हे बोलवत नाहीये. पण तुझ्या मनाचा नसला तरी एकंदर भविष्याचा विचार मात्र आम्ही बोलतोय त्यात आहे.

श्री - तुम्ही अजून हे लक्षात घेत नाही आहात की स्वातीलाही एक मत आहे. त्यात तिने ठरवलेलेच आहे की लग्न करायचे नाही म्हणून! आणि.. माझी जरूर म्हणून मी तिला विचारायचे, तेही तुम्ही म्हणताय म्हणून.. आणि तिच्या आयुष्याचा का म्हणून प्रॉब्लेम करून ठेवायचा? का तिने परकीच्या मुलाला आपले मानायचे? का एका विधुराशी लग्न करायचे? का? सांगा ना???

तारा - श्रीदादा, माझे ऐका.. बायका हळव्या असतात. मी स्वातीला भेटलेली आहे. तिचे तुमच्याबद्दलचे एकंदर मत मी जाणलेले आहे. तिला तुमच्याबद्दल आदर वाटतो. जवळीक वाटते. तुम्ही तिचे इतके करताय हे पाहून तिलाही नवलच वाटत आहे. तिच्या आईलाही बहुधा! तुम्ही एकटेच तुमच्या अन गट्टूच्या सुखासाठी किती धडपडत असता याबाबत ती माझ्याशी बोललेली आहे.

मावशी - ए ठमाक्के, चुरूचुरू बोलतीयस की आता? आं? हा काय एकटा धडपडतोय? मी काय पतंग उडवत बसते का?

तारा - काहीतरी काय मावशी? हे एकटे म्हणजे आमच्या कुटुंबातील हे एकटे..

मावशींनी सटकन मान फिरवली. अर्ध्या क्षणात त्यांच्या डोळ्यांमधे पाणी आले होते. इकडे तिकडे बघत एक एक पाऊल मागे सरकत त्या खोलीतून बाहेर जायला निघाल्या. तारा अजून आपल्याच वेगात मावशींकडे लक्ष न देता श्रीशी बोलत होती. श्रीचेही लक्ष सगळे त्याच विषयात होते.

मावशी बाहेर पडल्या अन समोर मानेकाका आले. गट्टू आणि ताराचा मुलगा खाली खेळत होते. मावशी गट्टूकडे त्रयस्थासारख्या पाहात असताना मानेकाका आले अन त्यांच्या स्वभावाप्रमाणे खोचक बोलले.

मानेकाका - तोंड का बंदय आज? भकास वाटतं तुमचा तणतणाट ऐकला नाही की!

झालं! एकतर आधी बोलणारे मानेकाका! त्यात ते ज्यांना बोलले त्या पवार मावशी! दास्ताने वाड्यातील एक महाभयंकर भांडण झाले त्यादिवशी! आपला विषय सोडून श्री अन ताराच काय तर मुलाबाळांसकट अख्खा वाडा त्या अभूतपुर्व संवादाकडे निश्चलपणे बघत बसला होता.

मावशी - काय रे ए मान्या, बापाने दळलं दळण अन अवलादीला नाही वळण? थोबाडात बत्तीशी अन ती पालीसारखी जीभ आहे म्हणून कुठेही उंडारल्यासारखा बोलत सुटतोस? लाजलज्जा नाही तुला? परक्या बाईशी कसे बोलतात याची? माझ्या दारात मी उभी अन हे आले मवाली शिट्या मारायला! तुझ्या घरी आई, बहीण कुणी नाही का? दिवस गेले म्हशीला अन मानेचा लागला वशीला? सरळ जाता येत नाही वाड्याच्या बाहेर? माझ्याच घरासमोरून जातोस ते? जयश्री गडकर आहे का मी? ओठ मुडपून नाचू किती लाजू किती वर नाचायला?

मानेकाका - ए जांबुवंताची बहीण! थोबाड बंद कर! काय भोंगाय का काय दहाचा? सकाळी सहा वाजल्यापासून तिच्याईला वाडा डोक्यावर घेऊन नाचते साली शूर्पणखा? एक त्या गट्ट्याला काय सांभाळतीय, देश सांभाळल्याच्या थाटात बोलतेस? तू ओठ मुडपून नाचू किती लाजू किती वर नाचलीस ना?? तर तो दास्ताने हा वाडा पुण्यातील अ‍ॅडिशनल हिंदू दफनभूमी म्हणून जाहीर करेल. परवाच तुझा आवाज ऐकून समोरून जाणार्‍या एका प्रेतयात्रेतील प्रेत उठलं अन पळून गेलं! लोक नुसतीच तिरडी घेऊन धावले स्मशानात! नीट विचारतोय 'आज गप्प का' तर म्हणे लाईन मारतो? तुझ्यावर लाईन मारायला मी घटोत्कच आहे का?

मावशी - अरे ज्जा? घटोत्कच नाजूक होता! यांना आली शेपूट अन नाचले बघा बेछूट? तुझा समंध होणार आहे मेल्यावर! अन त्या सख्ख्या भावाच्या घराच्या छप्परावर बसणार आहे. अख्खा जन्म त्या दिडकीसाठी वेचला कोर्टात! खिशात नाही दमडी अन खायला हवी कोंबडी! म्हणे प्रेत उठून गेलं! जाईल नाही तर काय? शेवटची चक्कर अन तीही तुझ्या घरावरून! मेल्यावरही भोग संपत नाहीत म्हणून गेलं ते उठून पळून! म्हणे करडं आणणार आहे गावाकडून! भाऊ शेळीच्या अंगाला तरी हात लावू देईल का तुला? अन वाड्यात करडू वगैरे आणलस तर मी लांडगाच आणीन बागेतून भाड्याने! दर सहा महिन्यांनी जातो अन भावाशी भांडून येतो. कपर्दीक टिकवत नाही भाऊ हातावर!

मानेकाका - अगं माझ्या बापाची मालमत्ताय ती! काय म्हणून त्याच्या घशात जाऊ देईन? तू करशील का तुझी इस्टेट त्या गट्ट्याच्या नावाने? मेलीस तरी याच वाड्यात फिरशील! काय माहिती? मेलेलीही असशील तू आधीच! मेरिलिन मुन्रो समजतेस का स्वतःला? तुझ्यावर कोण लाईन मारणार? तुझ्यावर लाईन मारायला आलेला भीतीने वितळून जाईल तुला बघून! माझ्या इस्टेटीचा उल्लेख पुन्हा केलास तर वाडा पेटवून देईन मी! तुझा नवरा जाताना दौलती सोडून गेलाय म्हणून बाकीचेही श्रीमंत असतात का? आं?

मावशी - ए मान्या! माझ्या.. (आवंढा गिळत व आवाज अचानक कमी करत) माझ्या.. कुटुंबाबद्दल ... बोलायचं नाही हां??

मानेकाका चमकले. काहीतरी चुकत होतं! आपल्याला किमान अर्धा तास बेजार करणार्‍या म्हणी ऐकवल्याशिवाय ही बाई थांबणार नाही असा अंदाज असताना अचानक ही मलूल का झाली. अख्खा दास्ताने वाडा हे एक कुटुंब आहे हे वय वर्षे एक ते वय वर्षे शहाण्णव या सर्व वयोगटाने मान्य केलेले असताना ही अशी काय बोलतीय?

मानेकाका - काय झालं गं ए भवाने? तुझं कुटुंब म्हणजे काय? माझा नव्हता का कुणी तो?
मावशी - (डोळ्यात पाणी अन स्वरात घायाळपण) तू पाहिलं तरी आहेस का त्यांना?? भुता??
मानेकाका - रडायला काय झालं? काय अभद्र बोललोय का मी?

मावशी पटकन आत निघून गेल्या. मावशींना काय झालं याची इतर कुणालाही तितकी काळजी नसली तरी प्रमिला, चितळे आजोबा, मानेकाका अन श्रीला होतीच! सगळे धावले.

मावशी रडत होत्या. धावलेले चौघे त्यांच्या खोलीत गेले. बाकीचे दारात उभे राहिले. त्यात मुले अन ताराही होती.

प्रमिला - काय झालं मावशी? आज का रडताय अशा??
चितळे - अहो ताई.. रडू नका.. झालं काय ते सांगा आम्हाला? कुणी मनस्ताप दिला का?
श्री - मानेकाका, तुम्ही कशाला बोलता हो यांना? आधीच त्या एकट्या...!!!

खाडकन श्रीकडे भयानक रागाने बघत चवताळून बोलत मावशी त्याला म्हणाल्या...

मावशी - एकटी, एकटी एकटी??? मी एकटी? मी जर एकटी आहे तर आलायस कशाला तू इथे?? थोबाड फोडायचं होतंस ती चिमणी चुरूचुरू बोलली तेव्हा.. म्हणे 'आमच्या कुटुंबामधे हे एकटे आहेत'! हो क्का गं भवाने? तुमचं कुटुंब काय? आं? चार शर्ट आणले अन मिठाई आणली की जबाबदारी संपली! एवढं वाटत होत तर तू कशाला लग्न केलंस? सांभाळायचं महेशलाच?? वर्षातून दोन दिवस येणार अन आमचं कुटुंब म्हणणार? तू असायचीस का रात्री बेरात्री बाळ रडायचं तेव्हा?? असायचीस??

श्रीला अन ताराला मुद्दा कळला होता. श्रीची मान खाली गेली होती. ताराला अपमानाने रडू येत होतं! ही बाई आपल्याला इतकं बोलतीय अन श्रीदादा किंवा कुणीच मधे कसे बोलत नाहीयेत?

कुणीच बोलणार नव्हते. कुणी बोलूच शकणार नव्हते. 'रमा' हा शब्दही वाड्यात निघणार नाही इतकं जीव लावून मावशींनी गट्टूचं केलेलं एका एका माणसाने पाहिलेलं होतं!

आता हळूहळू मुद्दा सगळ्यांनाच समजला. मानेकाकांवर आज मावशी इतक्या का भडकल्या याचे कारण सर्व प्रौढांच्या लक्षात आले. आता सगळ्यांनाच ताराच्या त्या बोलण्यात चूक होती हे पटत होते. मानेकाका सर्वात पहिल्यांदा पुढे झाले.

मानेकाकांनी सरळ मावशींचे दोन्ही खांदे धरले. मावशी अजूनही तावातावाने बोलत होत्या. मानेकाकांनी आपल्याला धरलेले आहे हे जाणवल्यावर त्यांना समजले. आपण इतका वेळ नुसतेच बोलतोय.

मानेकाका - का गं टिटवे? तुझ्या कुटुंबाबद्दल मी बोलायचं नाही का? आं? मी कुणी नाही तुझा? मग दर राखी पोर्णिमेला काय ओवाळणी घेण्यापुरती राखी बांधतेस मला??

अख्खा वाडाच आपला आहे ही जाणीव पुन्हा एकदा मानेकाकांच्या सांत्वनाने झाल्यामुळे मात्र मावशी हमसाहमशी रडत मानेकाकांना बिलगल्या. मानेकाका गरजले.

मानेकाका - माझ्या बहिणीला पुन्हा कुणी काही अद्वातद्वा बोललं तर याद राखा..

दारातून मुलांचा कोरस ऐकू आला...

"दास्ताने वाडा पेटवून देईन"...

सगळे क्षणात हसायला लागले. अगदी ताराही .. आणि मावशी?

त्यांच्या ओठांवर त्या कोरसमुळे आलेलं हसू होतं, गालांवर नुकत्याच वाळलेल्या सरी, डोळ्यात पाणी आणि..

तोंडात एकच वाक्य..

मावशी - श्री.. तारा म्हणतीय त्यावर विचार कर हो?? माझी पन्नाशी उलटली आता..

जवळपास आठ दिवस श्री एकटाच विचार करत होता. खरे तर दिशाहीनच विचार करत होता. सर्वप्रथम म्हणजे त्याला मनातून हा प्रस्ताव अजिबात मंजूर नव्हता. लोक काय म्हणतील हा प्रश्नच नंतरचा होता. मुळात गट्टू आणि स्वातीचे जमेल का नाही हेच लक्षात येत नव्हते. समजा ते जमले.. तरीही आपल्या मनातून रमा कधीही जाणार नाही इतके त्याला नक्की माहीत होते. आणि या एकाच खोलीत स्वाती आपली पत्नी म्हणून आल्यावर आपण रमाचा फोटो लावणे कदाचित योग्यही होणार नव्हते आणि स्वातीबरोबर त्या नात्याने राहणेही! त्याला सहज आठवले. रमा त्याची कशी स्वातीवरून थट्टा करायची ते! मग तोही कधीकधी थट्टेत म्हणायचा. आज मी तिच्यासाठी फुलेच नेणार आहे वगैरे! पण रमालाही मनात माहीत होते की स्वाती अन श्री यांचे नाते तसे अजिबातच नाही. आता जर स्वाती खरच आली अन इथे राहायला लागली तर आपण जगाला कसे तोंड दाखवणार, विशेषता: कपनीत कसे तोंड दाखवणार हेच त्याला समजत नव्हते.

सर्वात, किंवा याहूनही महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळे मनातलेच मांडे होते. स्वातीला विचारण्याचे धाडस तरी होईल की नाही याबद्दल त्याला स्वतःचीच खात्री नव्हती. आणि ते धाडस पाहून स्वातीने जर धक्का बसून आपली निर्भत्सना वगैरे केली तर नवेच संकट येणार होते. कारण ती कपनीतील तिच्या मैत्रिणींना हे कदाचित पुढेमागे बोललीही असती अन आपली उलट बदनामीच झाली असती. स्वातीने आपल्याला नीट भाषेत जरी नकार दिला तरीही तेही आपली किंमत केल्यासारखेच होणार होते. यातही सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोणत्याही कारणास्तव जरी स्वाती नाही म्हणाली तरीही त्यानंतर त्याचे अन तिचे नाते तितकेच स्वच्छ राहील का नाही या शंकेने तो काळजीत होता. रोज आठ, आठ तास ऑफीसमधे असल्यावर नजरेला नजर देता येणार नसेल तर? आणि मुख्य म्हणजे, आपल्या वैयक्तिक गरजेसाठी तिला काय म्हणून तिचे आयुष्य नासवायला लावायचे? लग्नच करायचे असेल तर स्वातीच का? एखादी विधवा, परित्यक्ता का नाही? एखादी चांगल्या घरातील गरजू पण गरीब विधवा असली तरी चालेल की? स्वातीच कशाला? की... .. की ताराला... स्वातीच्या नजरेत काही.. तसे वाटले असावे का?? की.. मावशींना जाणवले असावे?? की.. आपल्याच.. आपल्याच वागण्यात त्यांना आपला स्वातीबद्दल काही सॉफ्ट कॉर्नर आहे असे तर जाणवले नसेल??

वैयक्तिक गरज? काय वैयक्तिक गरज आहे नक्की? आपली गरज बायको ही नाहीच आहे मुळी! आपली एकमेव गरज आहे 'रमा'! आणि 'रमा' ही आपली गरज कधीच भागणे शक्य नाही आहे इतकेच कटू सत्य आहे. मग? गट्टूला काय गरज आहे? आपल्याला.. .. हो.. खरय.. आपण स्वतःच्या लहानपणचा विचार केला तरी त्यात 'आपले लहानपण वजा आई' हे समीकरण आपल्या बुद्धीत बसूच शकत नाही. आई नसती तर... तर आपण काय असतो?? ज्यांना लहानपणी आई आणि वडील दोघेही नसतात.. त्यांचे काय होत असेल??

गट्टूला ही गरज कधी जाणवणारच नाही कारण त्याने 'आई' बघितलेलीच नाही. पण.. त्याची ती गरज आहे हे आई झालेली तारा, गट्टूला कायम सांभाळणार्‍या मावशी आणि आईच्या सावलीत वाढलेलो आपण या तिघांनाही समजत आहे व मान्य आहे. मग?? मग गट्टूसाठी.. गट्टूसाठी हे धाडस.. रमाला अर्थातच नाही आवडणार.. पण आपले मन निष्पाप आहे हे ती जाणत असेल जिथे कुठे असेल तिथून..

मग?? द्यावी का जाहिरात? लोक काय म्हणतील? पोस्ट बॉक्स नंबर द्यावा! म्हणजे जाहिरात कुणी दिलीय ते समजायलाच नको.. की मग?? ... की मग.. खरच एकदा... स्वातीलाच विचारावे.. कारण निदान.. ती आपल्याला जाणते तरी.. आपल्या सुखदु:खात सहभागी तरी होते.. ती 'हो' म्हणणार असेल तर.. पुढचे पुढे! दोघांनी नोकरी करायची की नाही, येथेच राहायचे की दुसरी जागा घ्यायची? वगैरे वगैरे! पण.. आपण तिच्याकडे याचनाच करणे योग्य आहे. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी! आपल्या मुलाला स्वतःची अशी एक सख्खी आई असायलाच हवी. सहा वर्षे झाली तो आईविना राहतोय.. आपण राहिलो असतो एक दिवस तरी त्या वयात???

तेवढ्यात गट्टू खेळून वर आला.

श्री - गट्टू महाराज.. काय म्हणताय?
गट्टू - काही नाही.. जयंतने आज अतुलला उचलले अन आपटले..
श्री - अरे?? असलं नाही हं करायचं काहीही शाळेत? लागतं जोरात..
गट्टू - त्याच्या अंगात ताकद आहे..
श्री - ते जाउदे.. मला सांग.. ऐक नं.. ए.. इथे बस...
गट्टू - ...काय??
श्री - आपण जर तुला.. एखादी नवीन आई .. आणली तर.... आवडेल??
गट्टू - हो? ... पण मग .. या आईचे काय करायचे?

गट्टूच्या निरागस प्रश्नाने क्षणभर श्रीलाही समजेना काय बोलावे!

श्री - आपली आई आहेच रे इथे? आणखीन एक..
गट्टू- का?
श्री - तुझ्यासाठी..
गट्टू - चालेल.. कधी आणायची??

श्री हासला. 'बघू' म्हणून कामाला लागला. मधेच म्हणाला..

श्री - कुण्णाकुण्णाला असलं काहीही बोलायचं नाही बर का?? नवीन आई वगैरे..
गट्टू - का?
श्री - अंहं! मी सांगतोय म्हणून.. नाही न बोलणार??
गट्टू - नाही.. पण म्हणजे.. असाच फोटो आणायचा का आणखीन एक??
श्री - छे! खरी आई ..
गट्टू - मग .. ही खोटीय??
श्री - नाही रे.. पण आता ही आई देवाघरी गेली की नाही?? मग तुला सांभाळायला हवी की नाही एक आई?
गट्टू - पण कधी आणायचीय?
श्री - ठरलं नाही आहे काहीच अजून..
गट्टू - म्हणजे लग्न करणार तुम्ही??

श्री थबकला. मुलाशी जरा जास्तच बोललं गेल्याचं भान त्याला आलं!

श्री - छे छे! काहीतरी काय? मी आपली तुझी गंमत करत होतो... चला.. शुभंकरोती कल्याणम...

आणि.. बरोब्बर पंधरा दिवसांनंतरच्या शनिवारच्या संध्याकाळी पाच वाजता स्वातीची आई देवळात गेलेली असताना श्री स्वातीसमोर तिच्या घरी बसला होता. ती सोफ्यावर बसली होती. आता तिला हळूहळू चालता येत होतं! पण ऑफीसला जायला अजून पंधरा दिवस लागणारच होते. आजारपण डॉक्टरांनी सांगीतले त्याहून लांबलेले होते. सुरुवातीची चौकशी झाल्यानंतर आता विषय काढावा या विचारात असलेल्या श्रीच्या तोंडून शब्द फुटेना. स्वातीनेच विचारले. 'महेशला नाही आणलेत का' म्हणून!

श्री - नाही.. खेळतोय..
स्वाती - क्रिकेट?
श्री - हं!
स्वाती - मुलं बरीच आहेत नाही वाड्यात मला वाटतं?
श्री - हं! आहेत भरपूर..
स्वाती - अजून स्वैपाक तुम्हीच करता?
श्री - हो मग काय तर?
स्वाती - अन त्या मावशी शेजारच्या?
श्री - त्याही बघतात सगळं!
स्वाती - बापरे! काय बोलतात नाही त्या?
श्री - प्रेमळ आहेत पण तशा..
स्वाती - हो ना.. रमाताई गेल्यावर त्यांनीच केलं नाही सगळं?
श्री - हो.. पण.. आता त्यांच्यानेही होत नाही..

विषय हवा तिकडे वळल्यामुळे श्री मनातच खुष झाला होता. हा प्रसंग आपण केवळ आपल्या मुलाच्या संगोपनासाठी सहन करतो आहोत हे त्याला मनात जाणवतच होतं!

श्री - अ‍ॅक्च्युअली.. तारा.. म्हणजे रमाची बहीण .. म्हणत होती..
स्वाती - काय?
श्री - हेच.. की.. म्हणजे. त्या मावशीही म्हणत होत्या म्हणा..
स्वाती - काय पण?
श्री - की.. गट्टूला आता.. म्हणजे मीही सारखा ऑफीसला वगैरेच असतो ना..
स्वाती - मग?
श्री - मावशींनाही होत नाही आताशा.. त्यामुळे..
स्वाती - मग कोण बघतं त्याच्याकडे??
श्री - नाही.. म्हणजे करतात मावशी सगळं.. पण आपण तरी.. परक्या माणसावर किती..
स्वाती - हो ना..
श्री - त्यामुळे मग.. ही मागे लागलीय तारा..
स्वाती - काय?
श्री - म्हणे दुसरं लग्न करा... म्हंटलं काहीतरीच काय??

स्वाती क्षणभर गंभीर झाली. हा विषय आपल्यावर घसरणार आहे याची तिला यत्किंचितही जाणीव नव्हती. केवळ रमा अन श्रीचे प्रेम माहीत असल्यामुळे श्री दुसर्‍या लग्नात अडकेल असे वाटत नसल्यामुळे ती गंभीर झाली.

स्वाती - खरं तर..
श्री - ...... काय?
स्वाती - एक प्रकारे ते.. तसं बरोबर आहे.. पण..
श्री - ... काय?
स्वाती - आता तसा मोठा झालाय तो.. म्हणजे.. खर तर.. या आधीच्या वयात कास्त गरज होती..
श्री - होती .. बरोबर आहे... पण आता तर.. मावशीही बघू शकत नाहीत फारसं..
स्वाती - मग.. तुम्ही काही... ठरवलयंत??
श्री - खरं सांगायचं तर.. मला काहीच समजत नाहीये..
स्वाती - गट्टूला.. एकटे एकटे वगैरे वाटते का?
श्री - खरे तर.. मला.. म्हणजे याच दोघी म्हणतायत की..
स्वाती - मलाही पटतं! तुम्ही विचार करायला हरकत नाही असं माझं मत आहे..
श्री - पण.. अडचण.. जरा वेगळीच आहे..
स्वाती - काय??
श्री - माझ्याशी.. या परिस्थितीत.. कोण
स्वाती - असं काही नाही.. मनाने चांगली असली बाई की झालं.. बाकी काय बघायचंय??
श्री - बरोबर आहे.. पण.. विचारायला कसंतरीच वाटतं आता..
स्वाती - विचारायचं कशाला? छोट्या जाहिरातीत कॉलम द्यायचा एक..
श्री - स्वाती.. एक विचारू??
स्वाती - ... काय?
श्री - तू लग्न न करण्याचं कारण काय?
स्वाती - मला.. माझा विश्वासच नाहीये लग्न या प्रकारावर.. माहीत नसलेल्या माणसाबरोबर आपलं सगळं आयुष्य जोडायचं! त्याची सगळी माणसं ती आपली समजायची! आपल्या माणसांपासून दूर जायचं! अन मग तो माणूस चांगला नसला की मग स्वतःला छळून घ्यायच! त्याच्या हातातील कठपुतली बनायचं!
श्री - सगळी लग्नं अशीच कुठे असतात???
स्वाती - नसतात.. बरोबर आहे तुमचं! पण.. मला तरी.. जरा तिटकाराच आहे..
श्री - ओके.. चला.. बराच वेळ बसलो.. निघू?
स्वाती - बर... या हं पुन्हा.. तुमच्या मदतीचे आभार मानणे योग्य नाहीच..
श्री - छे! त्यात कसले आभार.. येतो..
स्वाती - अं.. मी आता.. मला उठायला त्रास होतो.. सॉरी.. दारापर्यंत येऊ शकत ना..
श्री - छे छे! काहीतरी काय? नो फॉर्मॅलिटीज..

श्री दारापाशी आला. त्याला काय वाटलं काय माहीत? दार उघडले खरे त्याने! पण दारातूनच अलगद मागे वळत म्हणाला..

श्री - माहीत ... असलेल्या माणसाबरोबर.. आपलं सगळं आयुष्य जोडायला काय हरकत आहे पण??

किमान दहा सेकंद स्वाती अवाक होऊन श्रीकडे पाहात होती. आणि श्री स्वातीकडे.. एखाद्या गांगरलेल्या मुलासारखा... निरागसपणे..

कित्येक युगे वाटले त्याला ते दहा सेकंद! दहा सेकंदांनी स्वाती खाली बघत पुटपुटली..

स्वाती - सहा वर्षं झाली रमाताईंना जाऊन.. वाईट वाटून घेऊ नका... पण.. मला.. या सहा वर्षांत.. खूप वेळा वाटायचं की.. आज तुम्ही विचारलात तो प्रश्न... मला विचारावात.. आय अ‍ॅम रेडी श्रीनिवास!

कित्येकदा कसे होते नाही? दहा दहा वर्षे आपण एखाद्याला जी हाक मारतो.. एखादा प्रसंग असा येतो की.. ती हाक आपण नाही मारत.. जास्त.. अधिक जवळची हाक आपण मारतो..

स्वातीच्या घरातून बाहेर पडतान दोघांनी एकमेकांकडे बघून केलेले रहस्यमय स्मितहास्य श्रीनिवासला पुन्हा एकदा त्याच्या जुन्या जमान्यात, तारुण्याच्या जमान्यात घेऊन गेले..

कदाचित... कदाचित पुन्हा एकदा आयुष्यात बहार येणार असावी... वसंतमास! पण श्रीनिवासला त्याची फिकीर होतीच कुठे? त्याची काळजी एकच होती.. गट्टूला आई मिळावी..

हवेवर चालल्यासारखा तो घरी आला.. . समीर, राजश्री, प्रसाद आणि गट्टू आज घरातच रबरी बॉलने हँड क्रिकेट खेळत होते

श्रीनिवासने रस्त्यात घेतलेल्या कॅडबरीज सगळ्यांना वाटल्या. मावशींना तो आत्ताच जाऊन सांगणार होता की स्वातीकडे काय झाले! पाठोपाठ ताराला फोन करणार होता.. पण.. त्या पुर्वी.. गट्टुला काहीतरी .. निदान काहीतरी तरी सांगावे असे त्याला वाटले.. 'तुला आई आणणार आहे' वगैरे.. पण या मुलांसमोर त्याला तसे काहीही सांगणे योग्य झाले नसते..

आणि त्याहीपुर्वी.. म्हणजे सगळ्यात आधी... रमाच्या फोटोसमोर मान खाली घालून उभे राहणे अत्यावश्यक होते..

श्रीनिवासने गट्टूला कडेवर घेतले.. 'काय, काय' असे गट्टू म्हणेस्तोवर श्री त्याला उचलून रमाच्या फोटोसमोर आला..

मनातच म्हणू लागला..

"आय अ‍ॅम सॉरी रमा.. आपल्या.. फक्त आपल्या बाळासाठी म्हणून.. नाहीतर.. नाहीतर मी असे करेन का गं?? सांग ना?? बोल.. बोल आज रमा"

तिच्या हसर्‍या डोळ्यांकडे बघताना श्री मात्र आक्रंदत होता आणि त्याच वेळेस..

राजश्रीने टाकलेला बॉल प्रसादने हाताने मारला तो थेट..

रमाच्या फोटोवर...

आतला रमाचा फोटो.. जरी तसाच राहिला असला तरी खाली पडून फ्रेमची काच मात्र फुटलेली होती..

रमाला आता त्या काचेत राहून आपल्या संसारावर लक्ष ठेवणे.. योग्य वाटलेले नव्हते...

आणि त्याचवेळेस मावशी दारातून आत येऊन 'काय फुटलं रे?' विचारत असताना गट्टू म्हणत होता की आईचा फोटो..

आणि 'आईचा फोटो फुटला' हे गट्टूचे वाक्य ऐकून आणखीनच आक्रंदणार्‍या श्रीने निर्णय घेऊन टाकलाही होता मनातल्या मनात!

'स्वातीची उद्याच्या उद्या माफी मागायची... गट्टूला आई आहे.. फोटोत आहे... पण.. आहे'

गुलमोहर: 

स्वाती - सहा वर्षं झाली रमाताईंना जाऊन.. वाईट वाटून घेऊ नका... पण.. मला.. या सहा वर्षांत.. खूप वेळा वाटायचं की.. आज तुम्ही विचारलात तो प्रश्न... मला विचारावात.. आय अ‍ॅम रेडी श्रीनिवास! >> आज ठरवलं होतं नो रोना धोना, पण ईथे आल्यावर मात्र बांध फुटलाच.

मला देखील वाटलं नाही स्वाती एवढया लवकर हो म्हणेल .
'स्वातीची उद्याच्या उद्या माफी मागायची... गट्टूला आई आहे.. फोटोत आहे... पण.. आहे' >> श्री ची अवस्था कळली एकदम !
नेहमीच सगळा वाडा डोळ्यापुढे उभा राहतो .

काय बोलायचं? शब्दच नाहीयेत.... नेहमीप्रमाणेच हासू आणि आसूचं मिश्रण झालंय... मानेकाका आणि पवार मावशींच्या मजेशीर भांडणाचे गंभीर संवादात कधी रुपांतर झालं, कळलंच नाही...
श्री आणि स्वातीचा प्रसंग तर एकदम टची झाला.
शेवटी रमाच्या फोटोची फुटलेली काच मनात कळ उठवून गेली. Sad

Happy हा भाग ही मस्त.. तुमचे कथानक स्वस्थ बसूच देत नाही...सार्खं पुढं काय होणार ची उत्सुकता लावून जातो प्रत्येक भाग

मावशी आणि मानेकाकांचा संवेदनाशील भाग छान जमलाय..

शेवटचं वाक्य तुमची खास बेफिकीर स्टाईल....
पण वाईट वाटलं ते वाक्य वाचून... त्याने स्वातीशी लग्न करायला हवं होतं सगळ्याच सावत्र आया कुठे वाईट असतात... पन एकीकडे वाटतं स्वातीला नसतं जमलं तर आगीतून फोफाट्यात... Sad

शेवट तुमच्या मनात फीक्स आहे का ?>> असलातरी माबोकर तो फिरवायला लावतात हो. मागे त्या दिपुच्या बाबतीत बरेच प्रत्येक्ष्/अप्रत्येक्ष दबावांमुळे शेवट गोड करवा लागला होता. काय बेफिकिर.

मनापासून अनेक आभार सगळ्यांचे!

मी मागे नोंदवले होते की 'एका बापाची कथा' ही माझी एक दीर्घ कविता आहे. तीच कथा स्वरुपात येथे लिहीत आहे.

हाफ राईस दाल मारके हीपण एक कविता होती, दीर्घ! मात्र तिचा शेवट मला दबावामुळे बदलावा लागला हे कबूल करतो.

डिस्को २०३ व सोलापूर या थेट आंतरजालावर ऑनलाईन लिहिलेल्या कादंबर्‍या आहेत. (बाप व हाफ राईसही थेट्च लिहीत होतो, मात्र त्या कविता डोक्यात होत्या हे खरे).

बाप या कथेचा शेवट मी बदलणार नाही असे मला आत्ता वाटत आहे.

एस एस एस व डिस्को या दोन्ही कथांचा शेवट मला माहीत नव्हता, खरे तर काय लिहायचे आहे पुढच्या भागात हेही माहीत नव्हते.

(काय लिहायचे पुढच्या भागात हा प्रश्न मला इतर दोन्ही कादंबर्‍यांच्याही बाबतीत पडत आहेच, फ्लोमधे सुचेठरते लिहीत आहे. स्वातीला लग्नाचे विचारणे हा भाग कवितेतही नाही अन ठरवलेलाही नव्हता.)

सर्वांचे पुन्हा आभार!

श्री, आता माघार नको, प्लिज,

स्वाति गट्टू चि आई होनार अस वाट्ल होत, पण इतक्या लव्कर अस न्व्ह्त वाटल.

बाकि बच्चे क॑पनि ग्रेट

दारातून मुलांचा कोरस ऐकू आला...
"दास्ताने वाडा पेटवून देईन"... Happy Happy मस्तच

कित्येकदा कसे होते नाही? दहा दहा वर्षे आपण एखाद्याला जी हाक मारतो.. एखादा प्रसंग असा येतो की.. ती हाक आपण नाही मारत.. जास्त.. अधिक जवळची हाक आपण मारतो.. >> हे बाकि अगदि बरोबर

जबरदस्त लिखाण. सगळे ९ भाग एका दमात वाचले. न वाचून करतो काय? लिहिलयच एवढं भारी Happy कादंबरीतील पवार मावशी, मानेकाका, चितळे आजोबा या सारख्या व्यक्ती वाडा संस्कृती नाहीसी होत चालली तशा विरळ होत चालल्यात. श्रीनिवासच्या रुपात एका बापाची तगमग सुंदररित्या मांडलीय.
पु.ले.शु.

सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे मनःपुर्वक अनेक आभार!

प्रतिसादांच्याविना लिखाण जमले नसते हे कबूल करतो.

-'बेफिकीर'!