श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १०

Submitted by बेफ़िकीर on 15 July, 2010 - 03:16

पंधरा दिवसांनंतरच्या सकाळी पावणेआठ वाजता बसस्टॉपवर आलेल्या श्रीला कित्येक दिवसांनी स्वाती पुन्हा जॉईन होण्यासाठी स्टॉपवर आलेली दिसली. त्या प्रसंगानंतर तो तिच्याकडे गेलाच नव्हता. तीही कुणातर्फे निरोप वगैरे पाठवून त्याला बोलावणे अप्रशस्त मानत होती. त्यामुळे स्वातीच्या मनात खूप चलबिचल, अस्वस्थता आणि कधी एकदा श्रीनिवास भेटतोय अशा भावनांचे मिश्रण तर श्रीनिवासच्या मनात 'या बाईशी मी काय बोलून बसलो आणि आता कसे निस्तरूनही मैत्री तशीच ठेवायची' हे प्रश्न होते.

अचानक समोरासमोर आल्यावर स्वातीची कळी खुलली. आयुष्यात पहिल्यांदाच तिला तिच्या मनात लज्जेचे आणि आवडते माणूस भेटल्याचे तुषार उडण्याचा अनुभव येत होता. गाल काही नेहमीच्या रंगाचे होईनात! लाल झाले ते लालच राहिले. श्रीच्या शेजारी तीन एक फुटांवर उभी राहून ती इकडे तिकडे बघत बोटांचा चाळा करू लागली. कुजबुजल्यासारखी, मात्र त्याला ऐकू जाईल अशा आवाजात त्याच्याकडे न पाहताच ती म्हणाली...

स्वाती - आलाच नाहीत पुन्हा?
श्रीनिवास - होना.. हेच शाळा वगैरे.. गट्टूची.. अभ्यासबिभ्यास..
स्वाती - वाट पाहात होते.
श्री - सॉरी!
स्वाती - नाही नाही! तसं नाही..

नाही म्हंटले तरी त्या दिवसानंतरच हा दिवसाआड येणारा माणूस एकदम पंधरा दिवस आलाच का नसावा हा प्रश्न तिला खुटखुटत होताच! आता सरळ त्याच्याकडे पाहात तिने विचारले.

स्वाती - सगळं ठीक आहे ना?
श्री - होय..
स्वाती - गट्टू?
श्री - मजेत आहे..

संवाद पुढे जात नव्हता. 'तुम्ही इतक्या दिवसात का आला नाहीत' हा प्रश्न थेटपणे विचारणे अजूनही तिला अप्रशस्त वाटत होते.

स्वाती - आई रोज आठवण काढायची..

बायकाही भारी असतात. कोणत्या विधानावर कोणता पुरुष कसे बोलेल हे बहुधा त्यांना आधीच ठाऊक असते. आता जिला लग्नाचे विचारलेले आहे त्या पुरुषाला जर 'माझी आई तुमची रोज आठवण काढत होती' असे मुलीने सांगीतले तर तो थट्टेत 'आई की तू, की तुला यायचीच नाही आठवण' असे विचारणारच ना? याच अपेक्षेने स्वातीने तो प्रश्न विचारला होता. पण हे बायकांना आपोआप जमते. उगाच मुत्सद्दीपणाचा कोर्स वगैरे करावा लागत नाही.

श्री - बर्‍या आहेत ना आई?
स्वाती - हं!

संवादाला हवे ते वळण का येत नसावे याची किंचित हुरहूर वाटू लागली स्वातीला! आणि श्रीला माहीत होते, की या प्रसंगाला तोंड द्यावे लागणारच आहे कधीतरी, पण कसे द्यायचे हेच त्याला समजत नव्हते. आणि मुख्य म्हणजे, या कारणासाठी आपण गेले पंधरा दिवस हिला भेटायलाही गेलो नाही ही आपली चूक आहे हेही त्याला समजत नव्हते. पण.. पण आज तिच्याशी बोलायलाच लागणार होते. बसमधे आणि कंपनीत बोलणे शक्यच नव्हते. मग कुठे, कसे आणि... केव्हा???

श्री - हाफ डे.. का... काढूयात?

ज्याच्यासाठी आयुष्यच काढायचे आहे त्याच्यासाठी हाफ डे आणि तोही इतकी रजा आधीच झालेली असताना.. काय प्रॉब्लेम आहे??

स्वाती - .... आ... आणि??
श्री - बोलू..
स्वाती - कुठे??
श्री - .. कुठेही.. .. पर्वती..
स्वाती - मला कशी चढता येईल पर्वती??
श्री - सारसबाग..
स्वाती - पाहिले कुणी .. तर??

हा आपला प्रश्नच चुकीचा आहे हे स्वातीला तो प्रश्न विचारून झाल्यावर समजले. ज्याच्याशी लग्नच करायचे आहे त्याच्याबरोबर कुणी पाहिले तर काय होणार आहे? आणि आपल्याला कुठे चोरट्यासारखे एखाद्या झुडपात बसायचे आहे? फक्त बोलायचे तर आहे..

श्री - पेशवाई..
स्वाती - सगळे जेन्ट्स असतात..
श्री - शनिवारवाडा..
स्वाती - इतक्या सकाळी?
श्री - मग?... मग कुठे??
स्वाती - ... हरिहरेश्वराच्या.. देवळात बसूयात?
श्री - ठीक आहे..

'आपण केवढा धाडसी प्रश्न विचारू शकलो' या विचाराने स्वाती स्वतःच मनात लाजली होती. पण आता प्रश्न विचारून तर झालेला होता आणि प्रस्ताव श्रीने मान्यही केला होता. आता 'तुम्हीच म्हणालात म्हणून, नाहीतर मी काही इतक्या सकाळी या देवळात वगैरे आले नसते' असा चेहरा करून ती त्याच्याबरोबर देवळात चालत चालत पोचली!

दोघेही दर्शन घेऊन मग आवारात येऊन बसले. काही नऊवारी नेसणार्‍या जुन्या बायका, काही वृद्ध अन एखाद दोन मध्यमवयीन माणसे त्याहीवेळी देवळात होती. त्या कुणाचेच यांच्याकडे लक्ष नव्हते. खरे तर पाव किलोमीटरवर श्रीचे अन अर्ध्या किलोमीटरवर स्वातीचे घर! पण देवळात आलेले असल्याने त्यांच्याकडे तसल्या नजरा कुणाच्याच पोचत नव्हत्या.

एकमेकांमधे व्यवस्थित अंतर ठेवून बसल्यानंतर मात्र स्वातीला टेन्शन आले आणि त्या टेन्शनच्या तिप्पट टेन्शन श्रीला! एकदम 'आपल्याला लग्न करणे शक्य नाही' असे एका वाक्यात सांगून टाकून मग कारणमीमांसा दिली तर मनावरचे प्रेशर तरी जाईल असाही एक निर्णय घेण्याच्या मनस्थितीत तो आलेला होता. पण त्याला हेही समजत होते की तिचे कसेबसे उभे राहिलेले भावविश्व, तेही आपल्याचमुळे उभे राहिलेले, आपणच असे तुडवणे माणूसकीहीन ठरेल!

श्री - चांगलं चालता येतंय आता.. नाही?
स्वाती - हं! पण खूप चालले तर दुखतोच पाय..
श्री - होणारच, केवढं झालं होतं ते..
स्वाती - कंपनीत.. कळवायला.. पाहिजे ना?
श्री - तुमचा.. म्हणजे.. तुझा प्रॉब्लेमच नाहीये.. मलाच कळवायला पाहिजे.. पण.. आता .. जाउदेत..

या उत्तराने स्वाती हरखली. आपल्याबरोबर बोलण्यापुढे सप्रेंच्या शिव्या याला तुच्छ व सोसणेबल वाटतात ही भावना सुखावणारी होती. तिने वेणी पुढे घेऊन चाळा सुरू केला.

श्री - प्रसन्न वाटतं नाही? सकाळी.. इथे?
स्वाती - खूपच.. तुम्ही येता नेहमी?
श्री - नाही! कसलं जमतंय रोजचं? गट्टूला सोडायचं असतं..
स्वाती - पण घरी पूजा करता ना रोज?
श्री - हं!
स्वाती - आई सारखी विचारत होती.. पेंढारकर नाही आले.. पेंढारकर नाही आले..

विषय 'आईला असलेल्या इंतजारच्या' पुढे जातच नव्हता. स्वातीला वाटत होते आता श्री तरी म्हणेल की 'तुला नाही का वाटले की मी कसा काय आलो नाही' म्हणून! पण तो त्यावर बोलतच नव्हता.

मात्र! त्याचक्षणी एक गोष्ट झाली. श्री यावर काहीच का बोलत नसावा म्हणून डोळ्यांच्या कोपर्‍यातून स्वातीने त्याच्या चेहर्‍याकडे 'त्याला समजणार नाही' असे पाहिले तेव्हा त्याचा चेहरा पाहून मात्र तिला..

.. किंचित शंका आली.. की.. काहीतरी खूप महत्वाचे बोलायचे असावे..

स्वाती - काय झाले?
श्री - अं? नाही.. काही नाही..
स्वाती - तुमचं काही.. बोलण वगैरे झालं का.... तुमच्या ताईंशी वगैरे??
श्री - छे छे! तिला काहीच सांगीतलेले नाहीये मी..
स्वाती - मग?
श्री - ... स्वाती..

श्रीचा आवाज, खाली गेलेली मान, चेहर्‍यावरील अपराधी भाव.. तो क्षण तिने.. कसा सोसला असेल तिलाच माहीत..

स्वाती - ...क.. .. काय??

स्वातीचा आवाज अतिशय खोल गेलेला होता.

कदाचित, कदाचित तिला.. कदाचितच.. पण.. अंदाज आलेला होता... जे याला सांगायचंय ते.. सांगणंही त्याला शक्य नाही आहे..

अजून एकच.. एकच आशा होती तिच्या मनात.. कदाचित तो म्हणेल की आपण मूल होऊ द्यायचं नाही, तू नोकरी करायची नाहीस, लग्न साधं करायचं...

सगळं मान्य होतं तिला.. यातलं सगळं!

गेले पंधरा दिवस ती श्रीच्या विचारात, श्रीचे होण्याच्या विचारात अक्षरशः डुंबलेली होती. त्यात तो घरीच आलेला नव्हता. त्यामुळे तर अधिकच तडफड झालेली होती. श्रीची खोली, गट्टू, हे सगळं सगळं आता आपलं होणार या कल्पनेने ती मोहरलेली होती. तिला गट्टूला परका मानायची भावना निर्माणच करता येत नव्हती. अपराधी भावनाही मनात नव्हती की रमाताई गेल्यामुळे आपण असे करतोय! कित्येकदा आईने ' काय गं? कसला विचार करतीयस?' म्हंटल्यावर ती मनातच लाजायची. आईला अजून सांगणे योग्य नव्हतेच! श्रीबरोबर सगळे व्यवस्थित ठरवायला हवे होते. आज तेच बोलायचे असणार हा तिचा अंदाज होता. तिच्या दृष्टीने तिचे अख्खे आयुष्यच आमुलाग्र बदलणार होते आता! आणि ते आयुष्य रंगीबेरंगी, तिचे स्वतःचे, तिला पत्नीपद, आईपद मिळवून देणारे, 'खास आपली' अशी नवी माणसे देणारे असणार होते. ती नुसत्या स्वप्नरंजनातच रात्र रात्र जागत होती. आणि श्रीला निरोप पाठवून घरी बोलावून घ्यायची तिला आता लाज वाटत होती. एरवी हेच कृत्य तिने अगदी मोकळेपणाने केलेही असते.

मात्र.. गेल्या काही मिनिटांमधील श्रीच्या वर्तनातून तिच्या मनात भयाण शंका डोकावायला लागल्या.. तिला ते.. ते अजिबातच ऐकायचे नव्हते.. आणि.. लागलेच ऐकायला..

श्री - ... स्वाती.. मला वाटते की..
स्वाती - ....
श्री - .....
स्वाती - ... खरं सांगू श्रीनिवास??
श्री - ... काय?
स्वाती - मीही खूप विचार केला.. .. मलाही.. तसंच वाटतंय..

श्री अक्षरशः हबकून तिच्याकडे बघायला लागला. आपण काय बोलणार आहोत हेच माहीत नसताना ही कुठल्या युगात वावरतीय कोणास ठाऊक असे त्याला वाटले.

श्री - ... काय... काय वाटतंय..
स्वाती - .. की.. ..
श्री - .. बो..बोल ना..
स्वाती - .. की.. आपलं लग्न होणं.. .. योग्य नाही..

बुडता बुडता कुणीतरी वर ओढून घ्यावं.. तसं वाटलं श्रीला.. तो एखाद्या पुतळ्यासारखा निश्चलपणे स्वातीकडे बघू लागला..

दोघांच्याही उरावरचा दगड बाजूला गेल्यावर मात्र स्वाती घडघडा दोन मिनिटे बोलत होती. समाजात आपल्याला एक स्थान आहे, गट्टू मला आई मानू शकणार नाही, लोक आपले लग्न स्वीकारणार नाहीत.. काय काय .. आणि काय काय..

आता श्रीमधील सामान्य पुरुष जागा झाला. अगदीच सामान्य पुरुष!

श्री - खरे तर.. लोकांशी आपल्याला काय करायचंय म्हणा? गट्टूलाही तू आवडतेस.. पण माझ्या मनात असा विचार आला की.. कंपनीत, वाड्यात.. कदाचित सगळे जण थट्टाही करतील.. म्हणजे..

स्वाती - इट्स ओके पेंढारकर.. .. निघुयात??
श्री - हं.. स्वाती.. कोणतेही..
स्वाती - छे.. नो मिसअंडरस्टँडिन्ग अ‍ॅट ऑल..
श्री - आय अ‍ॅम..
स्वाती - छे छे! मीच हो म्हणायला नको होतं.. बहुधा.. भावनेच्या भरात..

स्वाती पुढे चालयाला लागली तसा श्री तिच्या त्या 'अचानक आलेल्या चालण्याच्या झपाट्याचा' अर्थ शोधू लागला. त्याच्या सामान्य बुद्धीने त्याला पुन्हा कन्व्हिन्स केले की तिला हा संवाद वाढवायचा नसल्यानेच ती पुढे चालली आहे. मंदिराच्या दारात जाऊन मागे वळून पाहात ती म्हणाली..

स्वाती - मी कंपनीत चाललेय..
श्री - हो.. मीही येतोच आहे..
स्वाती - तुम्ही तरी आधी जा किंवा मी तरी आधी जाते.. कुणाला डाउट नको..
श्री - खरंय.. मग.. मग.. मी जाऊ?? .. ते सप्रे..तुझी आधीच आजारपणाची रजा..
स्वाती - जा!

श्री पडत्या फळाची आज्ञा घेऊन हरिहरेश्वरातून बाहेर पडला. आणि शहरात काही वेडे कसे अंगाला टायर, चिंध्या वगैरे बांधून निरुद्देश फिरत असतात तशा गतीने.. मागून स्वाती!

तिच्या मनात विचार येत होता. फक्त एकदा जरी.. फक्त एकदा जरी श्रीनिवासने मागे वळून पाहिले तर आपण त्याला पुन्हा मंदिरात बसवून सगळे व्यवस्थित पटवून सांगू.. तो तयार होईल..

पण हसबनीस बखळीत वळतानाही.. श्रीने एकदाही मागे पाहिले नाही..

एक स्त्री मनाने कोसळली होती.. ढासळली होती.. पुरुषांबद्दलचे त्या स्त्रीचे आधीचे मत आता अधिक दृढ झालेले होते..

आणि त्याच वेळेस.. हसबनीस बखळीत वळल्या वळल्या उजवीकडच्या भिंतीवर तोंड दाबून श्री हमसाहमशी रडत होता... फक्त तो वळलेला असल्यामुळे तिला दिसत नव्हता एवढेच...

काहीच साध्य झाले नव्हते.. कुणालाच! फक्त... गट्टूच्या आईच्या फोटोची फ्रेम तेवढी उगीचच फुटली होती.. जी आज संध्याकाळी नवीन काचेसह घरी येणार होती..

सप्रेंनी दिलेल्या तिप्पट पगाराच्या नोकरीचा मोह केवळ गट्टूच्या भवितव्यासाठी सोडणार्‍या श्रीनिवास पेंढारकरांनी आज स्वतःच्या आयुष्यातील येऊ शकणारा वसंतमासही गट्टूसाठीच त्यागला होता..

एक बाप! श्रीनिवास पेंढारकर!

चालत होते बिचारे मेहुणपुर्‍यातून! कुठलीतरी एक बस पकडून कंपनीत पोचले. सप्रेंनी एक शब्दही विचारला नाही. का विचारला नाही देव जांणे!

कोपरकर, देशमाने आणि चिटणीस मात्र गंभीर चेहर्‍याने श्रीकडे पाहात होते.. या गोष्टीकडे श्रीचे लक्षच नव्हते..

दोन तासांनी स्वाती कंपनीत आली. तिचे डिपार्टमेंटला जोरदार हसून स्वागत झाले. सप्रेंनीही येऊन चौकशी केली.

आणि सेल्स डिपार्टमेंटच्या चौगुलेंकडून तासाभरातच इंटर डिपार्टमेंटल मेमो आला..

एस्कॉर्टला तीन महिन्यांपुर्वी गेलेल्या मालाच्या कागदांवर चुकीची एक्साईज ड्युटी लागलेली होती.. एक्साईज डिपार्टमेंटने ही पैसे खाण्याची एक सुवर्णसंधी मानून उद्याच्या उद्या ऑडिट करायचे ठरवले होते. ही चूक फरिदाबादच्या एक्साईज डिपार्टमेंटने पुण्याच्या एक्साईजला कळवली होती. यात काही प्रमाणात एस्कॉर्टही इन्व्हॉल्व्ह्ड झाले होते. अर्थात त्यांची चूक इतकीच होती की इनपुट मटेरिअलची ड्युटी तपासली नाही. कस्टमर नाराज झाल्याने चौगुलेंकडे कस्टमरचे खरमरीत पत्र आले होते आणि चौगुलेंनी सप्रेंच्या डिपार्टमेंटला जबाबदार धरणे यात काहीच वावगे नव्हते. कोणतीही संगणकीय सिस्टीम नसलेल्या त्या काळात सर्व गोष्टी मॅन्युअलीच व्हायच्या.

आणि जवळपास दोन महिन्यांच्या आजारपणाच्या प्रदीर्घ रजेनंतर सकाळीच एक प्रचंड मोठा मानसिक आघात सहन करून ऑफीसला आलेल्या स्वातीला आल्याच्या केवळ एकाच तासात सप्रेंनी तिची मनस्थितीही लक्षात न घेता सर्वांसमक्ष भयानक फायरिंग दिले. सगळे डिपार्टमेंटच हादरलेल्या अवस्थेत होते.

स्वातीकडे ते काम असल्याने ते फायरिंग तिला मिळालेले होते. आणि कंपनीची बेअब्रू होऊ नये यासाठी आजच्या एकाच दिवसात उद्याच्या ऑडिटसाठी केवळ सगळीच रेकॉर्ड्स अपडेट करावी लागणार होती असे नाही तर कंपनीला एक्साईजवाल्यांना जवळपास पंचवीस एक हजार रुपये टेबलाखालून द्यावे लागणार होते आणि हे केवळ एका चुकीमुळे झालेले होते.

स्वातीच्या त्या चुकीमुळे आज सगळे स्टोअर्स आणि फायनान्स डिपार्टमेंट बहुधा रात्रभर कंपनीतच थांबणार होते. सप्रे अक्षरशः प्रत्येक रेकॉर्ड स्वतः तपासायला बसले होते. त्यांना इ.डी. कडून मेमो आलेला होता. तो मेमो त्यांनी स्वातीला पुन्हा सगळ्यांसमोर दाखवून आणखीन झापले होते.

स्वाती ही एक लाघवी स्वभावाची स्त्री होती. तिची सगळ्यांशीच चांगली मैत्रीपूर्ण रिलेशन्स होती. देशमाने, कोपरकर, चिटणीस आणि श्री त्या क्षणापासून तिच्यासाठी राबायला लागले. त्यात दुसराही हेतू होताच! उद्याच्या ऑडिटमधे आपल्या कामातील एखादा पॉईंट निघू नये हीपण काळजी होतीच!

स्वातीच्या डोळ्यांमधील हताशपणाचे भाव लोपत नव्हते. देशमानेंनी वडिलधार्‍या माणसाप्रमाणे तिला समजावून सांगीतले होते, आधार दिला होता. मात्र श्री तिच्याशी बोलायलाच धजत नव्हता.

फायनान्स डिपार्टमेंटचा चार वाजता एक मेमो आला. 'ऑल क्लीअर'! फायनान्समधे निघू शकणारे सर्व पॉईंट्स कव्हर झालेले होते. तिथे आता ऑडिटर्सना संधी मिळणारच नव्हती. आता फक्त स्टोअर्सचा प्रश्न उरलेला होता. सेल्स डिपार्टमेंटचे दोन अनुभवी क्लर्क स्टोअरमधे येऊन बसले होते. तेही मदत करत होते. कंपनीच्या अब्रूचा प्रश्न होता.

सहा कधी वाजले तेही समजले नाही. आत्तापर्यंत एकट्या सप्रेंनीच बारा मेजर पॉईंट्स आणि सव्वीस किरकोळ डिस्क्रीपन्सीज दाखवल्या होत्या. सेल्सच्या क्लर्कना आणखीन काही किरकोळ गफलती आढळल्या होत्या. स्वाती समोर येईल त्या डिस्क्रीपन्सीवर अ‍ॅक्शन घेत होती. देशमाने अन चिटणीस त्या दिवशीचा डिस्पॅच धाब्यावर बसवून जुनी रेकॉर्ड्स तपासत होते. श्री जॉबवर्कसाठी पाठवलेल्या मटेरिअल्सची डिटेल्स तपासत होता. कोपरकर सप्रेंबरोबर बसून चाळणी करत होते कागदपत्रांची!

आज कुणी डबाही खाल्ला नव्हता. सप्रेंनंतर देशमाने सगळ्यात सिनियर होते. त्यांनी सप्रेंना अजिबात न विचारता चहा मागवला. सप्रेही काही बोलले नाहीत. त्यांना समोर सगळे दिसतच होते. मधून मधून ते येऊन उचकल्यासारखे आविर्भाव करून काही ना काही बोलून जात होते. एकदा तर त्यांनी 'ऑडिटमधे उद्या ज्याचा पॉईंट निघेल त्याने रिझाईन करावे' असेही म्हंटले. सगळेच घाबरलेले होते. स्वातीला तर ते येता जाता बोलत होते. स्वातीचे येते इन्क्रीमेंट रद्द झाल्याची घोषणाही त्यांनी केलेली होती.

सगळ्या कंपनीसाठी स्टोअर्स हे खाते म्हणजे विनोद ठरलेला होता. नवीन कागदपत्रे बनवली जात होती. जुनी चुकीची डिस्ट्रॉय होत होती.

सात वाजता काही चर्चेसाठी सगळेच सप्रेंकडे गेलेले असताना फक्त श्री आणि स्वातीच उरले ऑफीसमधे!

श्री - मला खूप वाईट वाटले स्वाती.. आजच्या या प्रकारामुळे.. आत्ताच तू आजारातून उठलेली.. आणि..
स्वाती - पेंढारकर.. इट्स ओके.. माझा आजचा दिवस वाइट आहे.. तो मी विसरणार आहे..

रात्री दहा वाजता काम आटोपत आले. उद्या सगळ्यांनी सकाळी सहालाच, कसेही करून ऑफीसला पोचले पाहिजे असा सज्जड दम सप्रेंनी दिला.

सप्रे त्यांच्या कारमधून निघून गेले आणि श्री उठला. श्रीने गट्टूच्या ओढीने आवराआवर चालू केली. देशमाने टक लावून श्रीकडे बघत होते. बाकी सगळ्यांनाही श्रीचे आश्चर्यच वाटत होते. निदान सगळ्यांचे होईपर्यंत तरी त्याने थांबायला हवे होते.

श्री - स्वाती.. चल निघू.. मी तुला सोडतो अन..
स्वाती - नाही.. तुम्ही जा! मला अजून अर्धा तास लागेल.
श्री - मग.. मी.. थांबू का??
स्वाती - अंहं! निघा तुम्ही.. मला चिटणीस सोडतील..
चिटणीस - हो हो, सोडीन मी..
श्री - थांबलो असतो.. पण..

अचानक देशमाने उसळले. सप्रे गेल्यानंतर देशमाने जे सांगतील ते ऐकायचे हे सगळ्यांनाच माहीत होते. देशमानेंचा आवाज तीव्र आणि निर्भत्सना करणारा होता.

देशमाने - थांबलो असतो.. पण.. पण माझा मुलगा एकटा असेल.. हो की नाही?? सगळ्यांनी समजून घ्यायचं तुम्हाला! हो की नाही? तुम्ही कुणालाही कधीही समजून घेणार नाही.. आं?? का राबतोय आपण माहितीय तुम्हाला?? दुपारी तीन वाजताच हा शोध लागला होता मला.. तुमच चेहरा सकाळी आलात तेव्हा रडवेला दिसला म्हणून मी तीन वाजता तो शोध लागूनही साहेबांना काहीही बोललो नाही.. कारण स्वातीने शिव्या आधीच खाल्लेल्याच होत्या..

श्रीनिवासचा चेहरा रडवेला होता हा स्वातीसाठी धक्काच होता. तिने खाडकन श्रीकडे बघितले आणि श्रीने तिच्याकडे! दोघांचेही डोळे क्षणभर एकमेकांमधे गुंतले.. स्वातीने नजर हटवली. श्रीने देशमानेंना विचारले.

श्री - काय .. झालंय?? कसला शोध??
देशमाने - त्या दिवशीची एस्कॉर्ट्सची डॉक्युमेंट्स कुणी केलीवती माहितीय?? तुम्ही! तुम्ही केली होतीत ती डॉक्युमेंट्स! ही त्या दिवशी हाफ डे काढून गेलेली होती. तुमची सही आहे त्याच्या कॉपीवर! स्वातीने आधीच त्या शिव्या खाल्ल्यामुळे मी पुन्हा ते उकरून काढले नाही. कारण काय? आम्ही सगळ्यांनी तुम्हाला समजून घ्यायचा ठेका घेतलाय ना? फक्त तुम्हालाच त्याचे काही नाही. सकाळी का रडलेला होतात मला माहीत नाही. पण ही बिचारी मुलगी आज तुमच्यामुळे रडूही शकली नाही इतके खरे आहे पेंढारकर! जा तुम्ही! सांभाळा आपल्या मुलाला! आम्ही बघतो स्टोअर्स! कारण तुम्ही कधीही दुसर्‍याला समजून घेऊ शकत नाही.

अक्षरशः नष्ट व्हावेसे वाटत होते श्रीला त्याक्षणी! नष्ट! तो नि:स्तब्धपणे उभा होता. तसाच! जवळपास पंधरा मिनिटे! कुणी त्याच्याकडे बघतही नव्हते अन त्याला काही कामही सांगत नव्हते.

अकरा वाजता सगळे निघाले तेव्हा चिटणीस स्वातीला 'चल, तुला सोडतो' म्हणाले! त्यावर स्वाती म्हणाली की पेंढारकर थांबलेलेच आहेत. मग त्यांच्याबरोबरच जाते आता.

आपले पाय आपल्यालाच ओढत न्यावे लागावेत तसा श्री रस्त्याने चालत होता. इतका प्रचंड कालावधी चालावे लागणार होते, जर एखादी बस किंवा रिक्षा नाही मिळाली तर! पार खडकीपासून शनिवार पेठ! सव्वा अकरा वाजलेले! बरोबर एक बाई! पण श्रीनिवासला आत्ता स्वतःलाही आधार देता येत नव्हता.

रिक्षा अन बस! काहीच मिळाले नाही. रस्त्यातील गावठी कुत्री, एखाद दोन ट्रक्स आणि एखाद दोन कार्स सोडल्या तर पार शनिवारवाड्यापर्यंत त्यांना वाहन मिळाले नाही. स्वातीला वेगात चालणे शक्य नव्हते. ती दर दोन मिनिटांनी थांबत होती. आणि श्रीला चालणेच शक्य होत नव्हते. तो खुरडल्यासारखा चालत होता. दोघेही एकमेकांशी एक शब्दही बोलत नव्हते. लग्नाचे नक्की झाले असते तर अशा थंड हवेतील ही पायी रपेट दोघांनी प्रचंड एन्जॉय केली असती. पण आता ते शक्य नव्हते. सगळा दिवस वाईट गेलेला होता. हा दिवस आयुष्यातून रद्द करावासा वाटत होता.

तिला तिच्या घरापाशी सोडायच्या आधीच स्वातीला कल्पना आलेली होती. की आशा नावाच्या तिच्या कंपनीतील एका बाईने जरी घरी तिच्या आईला निरोप सांगीतलेला असला की 'स्वाती आज उशीरा येणार आहे' तरीही आई खाली येऊन उभीच असणार! तब्बल पन्नास मिनिटांमधे श्रेनिवासशी एकही शब्द न बोललेल्या स्वातीने काहीच अंतरावर म्हातारी आई दिसल्यावर तोंड उघडले.

स्वाती - इथून गेलात तरी हरकत नाही.. आई उभीय..
श्री - मी.. हात.. हात जोडून माफी मागतो स्वाती..

स्वातीने पटकन श्रीनिवासचे दोन्ही हात आपल्या हाताने वेगळे केले. दोघांच्याही डोळ्यात अश्रू साठलेले होते. श्रीने नेमकी कसली माफी मागीतली हे श्रीला अन स्वातीला दोघांनाही समजेनासे झालेले होते.

स्वाती - माफी कसली मागताय पेंढारकर.. काम करताना चुका.. गैरसमज व्हायचेच..

स्वातीला 'आपण कामासंदर्भात माफी मागतोय' असे वाटत आहे हे श्रीनिवासला समजले. सकाळच्या प्रसंगाची माफी 'सुद्धा' मागतोय हे तिला कसे समजणार या विचारात एखाद्या बावळट लहान मुलासारखा तिच्याकडे पाहात तो उभा असतानाच ... स्वातीने एक वाक्य उच्चारले आणि ती वेगात निघून गेली...

स्वाती - आणि.. हसबनीस बखळीपासून कंपनीपर्यंत... रडत गेलात ना?? हो ना?? त्यातच सगळे आले श्रीनिवास! आय.. आय कॅन अंडर्स्टँड युवर पोझिशन.. गुड नाईट अ‍ॅन्ड बाय!

एक अयशस्वी नोकरदार, एक अयशस्वी बीजवर होऊ पाहणारा सामान्य माणूस...

पण एक चांगला बाप.. श्रीनिवास पेंढारकर.. वीराच्या मारुतीच्या रस्त्याला लागला होता..

आता त्याला ओढ होती झोपलेल्या मावशींचे दार वाजवून त्यांच्याकडे झोपलेल्या आपल्या बाळाला तसेच उचलून आपल्या खोलीत आणण्याची..

आणि तो घरी पोचला तेव्हा त्याला दोनपैकी कुठलेच काम करावे लागले नाही.. गट्टूला उचलून आपल्या खोलीत आणण्याचेही.. किंवा झोपलेल्या मावशींचे दार वाजवायचेही.....

कारण मावशी त्याची वाट पाहात कॉमन गॅलरीतच बसलेल्या होत्या.. आणि.. त्या एकट्याच नव्हत्या. मानेकाका, चितळे आजोबा, बेरी कुटुंबीय, निगडे अन घाटे कुटुंबीय, मधूसूदन आणि प्रमिला.. सगळेच जागे होते..

श्री - मावशी??? अहो.. तुम्ही कशाला जाग्या राहिलात?? अन.. तुम्ही सगळे तरी .. कशाला??
मावशी - गट्टूला दोन ताप आला होता.. मानेकाकांनी वर्तकांकडे नेलं होतं त्याला... आता जरा बरंय.. त्याला इकडेच झोपूदेत...
श्री - ताप???

श्री आत धावला. झोपलेल्या गट्टूला आता घाम आलेला होता. ताप गेलेला होता. तोवर प्रमिलाने श्रीला ग्लासमधून पाणी आणून दिले. ती मावशींकडेच झोपणार होती आज!

श्री - पण.. कशामुळे ताप आलाय म्हणाले??
मावशी - बर्फाचा गोळा खाल्ल्यामुळे बहुतेक!
श्री - बर्फाचा गोळा?? बर्फाचा गोळा कधी खाल्ला याने??
मावशी - संध्याकाळी.. बाहेर गाडी आली होती.. माझ्या मागे लागला.. हट्ट केला म्हणून.. मी दिला..

श्री संतापातिरेकाने मावशींकडे बघत होता. दिवसभराच्या मनस्तापामुळे भडका उडाला.

श्री - सांगायला काही वाटत नाही? त्याला एवढंस खरचटलं तर माझा जीव जातो इथे.. कंपनीत राब राब राबतोय मी.. जेवायलाही मिळालं नाही आज.. आणि तुम्ही याला सरळ बर्फाचा गोळा घेऊन दिलात?? काय केलंत तुम्ही?? काही समजतंय तुम्हाला?? आजारी पाडलंत गट्टूला? विश्वासाने ठेवतो मी इथे.. अन तुम्ही..

"श्रीनिवास"

दास्ताने वाड्याच्या भिंती हादरवणारी हाक मागून ऐकू आली श्रीला.. चितळे आजोबा संतापाने थरथरत उभे होते आणि डोळ्यांत प्रचंड क्रोध सामावून श्रीकडे बघत होते..

चितळे आजोबा - कुणाला काय बोलतोस अक्कल आहे का तुला?? निगड्यांचा मुलगा कंपनीत धावला तुला बोलवायला मगाशी.. या बाईला बोलतोस?? या बाईला?? तुझ्या मुलासाठी सगळ्या वाड्याशी उभा दावा धरणार्‍या या बाईने तर माझ्यासारख्याशी.. ज्याचे तोंडही तिला पाहायचे नसायचे त्याच्याशीही मनमिळवणी केली?? तुझ्या मुलासाठी?? कुणाला बोलतोस तू?? माफी माग! माफी माग त्या माउलीची सगळ्यांसमोर! आत्ताच्या आत्ता माफी माग..

आजचा दिवस का होता कुंडलीत काही समजतच नव्हते श्रीला.. त्याने चितळे आजोबांचे बोल ऐकले आणि..

मग त्याने मावशींकडे पाहिले.. नुसत्या मावशीच नाहीत तर वाड्यातले सगळेच हर्ट झालेले होते.. मावशींच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर मात्र त्याच्या मनाचा बांध फुटला..

अक्षरशः मावशींच्या पायांवर कोसळत त्याने त्यांची पाउले आपल्या अश्रूंनी भिजवली..

सगळेच ते दृष्य बघताना हेलावलेले असतानाच रडत रडत अन त्याच अवस्थेत श्री बोलत होता..

"मला.. मला आई होता येणारच नाही हो मावशी.. पण.. पण मला एक बापही होता येत नाहीये.. एक बाप"

मावशींनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला उठवलं! प्रमिला स्फुंदत रडत होती.

मावशी - श्री.. दोन घास खाऊन घे.. तुझ्या घरात मी पोळी भाजी ठेवलीय.. अन नीज जरा वेळ.. मी यापुढे नाही हं घेणार त्याला असलं काहीही? चल गं प्रमिले.. मला मेलीला काही कळतच नाही..

आणि मग.. दोन पावले आपल्या घराच्या दाराने जात म्हणाल्या..

"आईपण म्हणजे काय तेच माहीत नाही ना मला?? मग.. कधीतरी अशी चूक होणारच की.. मी.. मीपण माफी मागते हं चितळे आजोबा"

मावशींच्या घराचे दार खाडकन आपटले तेव्हा श्री खूप वर्षांपुर्वी त्याने हट्ट केल्यामुळे त्याच्या आईने त्याला चिक्की घेऊन दिली होती याची आठवण मनात काढत होता..

रमाच्या फोटोसमोर येऊन तो म्हणाला..

"अगदी.. जायलाच हवे होते का गं तुला?? अगदी जायलाच हवे होते?? मला एकटे टाकून???"

गुलमोहर: 

...............

मधुकर व रोहित,

माफ करावेत, मला आपल्या दोघांचेही प्रतिसाद समजले नाहीत. हा भाग चांगला झाला आहे का? मला तरी तसा विश्वास वाटत आहे. कळल्यास बरे वाटेल.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

निव्वळ अप्रतिम....खर म्हणजे शब्द सुचत नव्हते...म्हणुन....
ओठातील शब्द आसवांच्या ओघात वाहुन गेले.

धन्यवाद मधुकर,

आपला आधीचा प्रतिसाद ब्लँक असल्यामुळे मी तो प्रश्न विचारला.

सर्वांचेच मनापासून अनेक आभार!

रोहितला अनुमोदन... कधि कधि एखादा भाग इतका टची आसतो की त्याला काय अभिप्राय द्यावा हेच कळत नाही.. मन हेलावुन गेले हा भाग वाचताना...डोळे कधी भरले हेच कळल नाही.. खुप सुंदर..

befikir,

kai bolawe ani kai lihawe, tumche likhan wachlya nantar, mendu sunna houn jato.

khupach manje khupach apratim. faqt Swati ani Shri wegale nako hoyla, please tyana wegale naka karu.

kendre_paresh ना मोदक!!! अर्थात तुम्ही जे लिहाल ते योग्यच. पण फार गुंतायला झालंय या कथेत.
पु. ले. शु.

बापरे!!!! खुप त्रास झाला आजचा भाग वाचून!!! Sad आमच्यापण कुंडलीत अशी प्रचंड दु:खी कथा वाचण्याचे का आले???? असा प्रश्न पडतोय आता...

बेफिकीर राव.... सुरेख. छानच लिहिता तुम्ही. काहीवेळा अबोलाच खूप काही सांगून जातो असं म्हणतात. मी देखील त्यासाठीच अबोल राहणे पसंद करतो.

बेफिकीर , मुळात तर तुमच्या सर्व कादंबर्‍या छान आहेत आणि प्रत्येक भाग आपण उत्त्तम प्रकारे लिह्ता त्यामुळे त्या वाचताना आम्हाला वेगळ्या जगात गेल्यासारखे वाटते आणि स्व:तालाही विसरुन जातो.................खरच तुमच्या लिखाणात जादु आहे जो वाचण्याचा मोह वाढवतो व प्रतिक्षा करायला लावतो डोळ्यात पाणी आणतो..................आपल्या माझा मानाचा मुजरा....................पण तरीही काही भागांमध्ये प्रतिसाद न देऊ शकल्यामुळे आपला क्षमस्व..........

बेफीजी मी सहसा कदंबर्‍या कधी वाचत नाही मला "कादंबरी" असं नुसतं म्हटल्यावरच बोअर होतं
.................
.................
.................
पण आज का कुणास ठावुक वाचावं म्हटलं अन् .........अक्षरशः रडलो.....

______________________________________________________
आता तुमच्या मिळतील त्या कदंबर्‍या वाचीन मायबोलीवरच्या
तुम्ही पुस्तकरूपात प्रकाशित केलेल्या माझ्याकडच्या कादंबर्‍या पंढरपुरातच राहिल्यात ; गेल्यावर वाचीन
क्षमस्व !! ; की आजवर तुम्ही दिलेलं साहित्य जवळ असूनही कधी वाचलं नाही मी (.......बेफिकीरी अन् मणिहार सोडून )
_______________________________________________________
शेवट जरा असा वाचला (या भागा पूर्वीचे कथानक माहीत नाही. सहज बदल सुचला म्हणून कळवतो आहे )

"अगदी.. जायलाच हवे होते का गं तुला?? अगदी जायलाच हवे होते?? मला आणि बिट्टूला एकटे टाकून???"
_______________________________________________________
सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही ओळी वाचून तुमचे काही शेर एकसारखे मनात रुंजी घालत होते ...........

धन्यवाद बेफीजी !!!

-वैवकु