चिऊताई चिऊताई दार उघड

Submitted by निंबुडा on 6 July, 2010 - 06:30

लहानपणी ऐकलेली एक काऊ-चिऊची गोष्ट आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++
एक असतो काऊ. एक असते चिऊ. काऊचं घर असतं शेणाचं. चिऊचं घर असतं मेणाचं.

एकदा काय होतं? एका वर्षी खूप मोठ्ठा पाऊस येतो आणि काऊचं घर जातं वाहून. चिऊचं घर तसंच राहतं. मग काऊ काय करतो? तो येतो आपल्या चिऊताईकडे. दारावर टकटक करतो आणि म्हणतो:
काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाचं आंग पुसू दे

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाची टिटी पावडर करू दे

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाला अंगा घालू दे

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाला गाई करू दे

असं सगळं करून मग एकदाची चिऊताई दार उघडते. कावळ्याला घरात घेऊन त्याला काय हवं-नको ते बघते. खायला-प्यायला देते.* खाऊन झाल्यानंतर काऊदादा काहितरी चघळायला लागतो. तर चिऊताई म्हणते
चिऊ - कडाम कुडुम कडाम कुडुम काय खातोस रे
काऊ - लग्नाची सुपारी मी खातो रे

चिऊ - मला दे मला दे मला दे जरा
काऊ - संपली संपली जातो मी घरा

*काऊ ला घरात घेतल्यानंतरचे डीटेल्स नीट आठवत नाहीयेत. शेवटचा तो "संपली संपली जातो मी घर" वाला संवाद मात्र लक्षात आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++

राजसला खाऊ भरवायला घेतला की ही गोष्ट हमखास आठवते. सुरुवातीला २-४ वेळा अशीच्या अशी सांगितली ही गोष्ट त्याला. पण मग विचार करु जाता काही प्रश्न पडले:
१) आपण दाराशी आलेल्या पाहुण्याला दार उघडून आधी घरात घ्यायचं की "थांब मला हे करू दे, ते करू दे" असं म्हणत ताटकळत ठेवायचं? Uhoh
२) हा काऊ तरी असा कृतघ्न कसा? चिऊने सुपारी मागितली तर सरळ "संपली" सांगून "जातो मी घरा" असे म्हणून मोकळा. म्हणजे "गरज सरो वैद्य मरो" तशातली गत म्हणायची की ही. निदानपक्षी "धन्यवाद", "Thank you" तरी. पण छ्छ्या! ते ही नाही.

आपल्या पिल्लांना एकीकडे "इतरांना मदत करा.", "कुणी आपल्यासाठी काही केलं, तर Thank you म्हणायचं" असं शिकवायचं आणि दुसरीकडे वरची गोष्ट सांगून त्यांना बुचकळ्यात पाडायचं Uhoh
उद्या मला पडलेले प्रश्न राजसने मोठा झाल्यावर मला विचारले तर?

जसे इसापनीतीच्या सर्व गोष्टींना काही ना काही तरी तात्पर्य असते तसे या गोष्टीत काहीच नाही. मग माझ्या परीने डोकं लढवून मी या गोष्टीत बरेचसे फेरफार केलेत. मी आता राजसला खाऊ भरवताना हीच गोष्ट अशी सांगते (निंबुडा वर्जन) Happy

++++++++++++++++++++++++++++++++++
एक असतो काऊ. एक असते चिऊ. काऊचं घर असतं शेणाचं. चिऊचं घर असतं मेणाचं.

एकदा काय होतं? एका वर्षी खूप मोठ्ठा पाऊस येतो आणि काऊचं घर जातं वाहून. काऊ आपला बिचारा भिजून जातो पावसाच्या पाण्यात आणि कुडकुडायला लागतो थंडीने.

चिऊचं घर तसंच राहतं कारण ते मेणाचं असतं ना! मग काऊ काय करतो? तो येतो आपल्या चिऊताईकडे. दारावर टकटक करतो आणि म्हणतो

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - कोण आलं आहे?

काऊ - अगं चिऊताई, मी काऊ. माझं घर की नई पावसात गेलंय गं वाहून. मला खूप थंडी वाजतेय. मला तुझ्या घरात घेतेस का?
चिऊ - थांब हं, काऊ दादा. आलेच मी.

आणि असं म्हणून चिऊताई तिच्या बाळाला कडेवर घेऊन येते आणि दरवाजा उघडते. तर काऊ आपला बिचारा ओलाचिंब होऊन गारठून उभा असतो. चिऊताई त्याला घरात घेते आणि म्हणते,

चिऊ - अरे बापरे, काऊदादा, तू तर चांगलाच भिजलायंस. मी एक काम करते. तुला घराच्या कोपर्‍यात मस्त शेकोटी** पेटवून देते. तू मस्त हात-पाय घे शेकून. तो पर्यंत मी माझ्या बाळाचं आवरून घेते.

मग चिऊ काय करते? तिच्या बाळाला भूक लागली असते की नै? मग ती आपल्या बाळाला मऊ मऊ गरम खिचडी*** भरवते. बाळाला आंघोळ (तोतो/नाऊ नाऊ) घालून घेते. त्याची टिटी-पावडर करते. छान छान कपडे घालते त्याला. मग मांडीवर जो जो करतं तिचं बाळ. तू माझ्या मांडीवर गाई गाई करतोस की नै? अगदी तसंच! मग बाळाला मस्तपैकी मऊ मऊ दुपट्याच्या अंथरुणावर ठेवते. त्याच्यावर त्याच्या आजीच्या साडीचं मऊ मऊ पांघरुण घालते आणि मग काऊसाठी मस्त पैकी आलं घालून गरम गरम चहा घेऊन येते.

चिऊ - काऊदादा काऊदादा, तुझं आंग शेकून झालं का?
काऊ - हो चिऊताई.

चिऊ - मग हा घे मस्त आल्याचा गरम गरम चहा. तो पिऊन झाला की मी मस्त गरम गरम उकड खाऊ घालते तुला तांदळाची (इथे वेळेनुसार पोहे/उपमा/वरीचे तिखटा-मीठाचे तांदूळ असं काहीही असू शकतं Wink थोडक्यात मला त्या त्या वेळी जे जे खावंसं वाटत असेल ते ते काहीही Wink ). मग बघ तुझी थंडी कशी दूर पळून जाईल. Happy

मग काऊ तो चिऊने दिलेला चहा पितो. उकड खातो. आणि चिऊला म्हणतो.
काऊ - चिऊताई, तुझ्या या आदरातिथ्याबद्दल thanks हं! आता मला चांगली हुशारी आलीये. आणि आता पाऊसही थांबलाय. तर मी आता निघतो. चिमण्याला माझा नमस्कार सांग. यापुढे आता मी ही तुमच्या सारखंच मेणाचं घर बांधेन. मग ते पावसापाण्यात सुरक्षित राहील. Happy

मग काऊ आपल्या शर्ट च्या खिशातून सुपारीचं पाकीट** बाहेर काढतो आणि टाकतो थोडीशी तोंडात. चिऊ त्याला विचारते:

चिऊ - कडाम कुडुम कडाम कुडुम काय खातोस रे
काऊ - लग्नाची सुपारी मी खातो रे

चिऊ - मला दे मला दे मला दे जरा
काऊ - तू पण घे, तू पण घे , आता जातो मी घरा

असे म्हणून तो थोडीशी सुपारी चिऊलाही देतो आणि मग काऊ आपल्या घरी निघून जातो.

**आता इथे "मेणाच्या घरात चिऊ शेकोटी का पेटवते?", "तिचे घर वितळून नाही का जाणार?" आणि "काऊचं सुपारीचं पाकीट पावसात भिजत कसं नाही?" असे प्रश्न नका विचारू हं का Happy इतरांच्या उपयोगी पडण्यासाठी जे आणि जसे शक्य होईल ते करावे हे आमच्या राजसला समजावण्याच्या उद्देशाने हा बदल केलाय मी मूळ कथेत Happy

***इथे त्या त्या वेळी आमचा राजस जे काही खात असेल त्या त्या पदार्थाचा उल्लेख करते. उदा. नेस्टम, नाचणीची खीर, गव्हाचे सत्व, गुरगुट्या भात (खिमट), सेरिलॅक etc. जेणे करून त्या त्या पदार्थांची ओळख ही होईल Happy
++++++++++++++++++++++++++++++++++

गुलमोहर: 

(निंबुडा वर्जन) Lol
शहाणी आई ती......
पण पटलं निंबुडा... काहीकाही गोष्टी अश्या असतात की त्यामुळे मुलांपर्यंत भलताच संदेश पोहोचतो मग त्यात थोडा बदल केला आणि हिताच्या गोष्टी त्यात सामाविष्ट करणे ही झाली कृष्णनिती.......हो पण मेणाच्या घराबद्दल जपुन नाहीतर राजसच उदया विचारेल .......तिचे घर वितळून नाही का जाणार?"

हो पण मेणाच्या घराबद्दल जपुन नाहीतर राजसच उदया विचारेल .......तिचे घर वितळून नाही का जाणार?">>>
मग मेणाऐवजी काय सांगू? Uhoh

शेण आणि मेण हे २ शब्द र्‍हाईम करतात ना!

वा छान बद्ल केलास गोश्ती मध्ये... लहान मुलाना गोश्त सागताना सुध्दा इतका विचार करावा लागतो.

काऊच घर छोटसं आणि चिऊचं मोठ्ठसं असं सांग हवं तर >>
काऊचं घर असतं शेणाचं आणि चिऊचं घर असतं दगड-माती-वीटांचं असं सांगावं काय? आजच्या काळाला सुसंगत असं???

Happy

मी पण मला खटकणारे तपशील बदलून नाही तर वजा करुन सांगते लेकाला. पण हे ललितमध्ये का लिहिलं आहेस ?

सेकंड थॉट, काऊ चिऊच्या गोष्टी नावाचा धागा काढला तर सगळेच आपापली व्हर्जन्स इथे सांगु शकतील.

छान आहे..
आमच्या लहानपणी असले भलते सलते प्रश्ण विचारायची मुभा नव्हती. गप गुमान तोंडात पडेल ते गिळायचं.. शिवाय आई सांगते ते बरोबरच असेल असं साधं लॉजिक होतं. नाही तर पाठीत दोन धपाटे घालून आई ते लॉजिक पटवून देत असे Happy

आजकालची पिल्ली आपलं बारसं जेवून येतात अन मग ह्या असल्या मॉडिफिकेशन्स कराव्या लागतात. Happy

खूप छान लिहीले आहे, निंबुडा!

योग,
अगदी खरे आहे <<आजकालची पिल्ली आपलं बारसं जेवून येतात अन मग ह्या असल्या मॉडिफिकेशन्स कराव्या लागतात >> ...

छान आहे तुझं वर्जन!

मी पण मोठ्या लेकीला ही गोष्ट सांगताना उशीरा दार उघडल्याबद्द्ल चिऊ काऊला सॉरी सॉरी म्हणते आणी मग काऊ ला अंग पुसायला टॉवेल देते, गरमागरम चहा/दुध्/सुप देते आणि मग ते पावसाची गाणी म्हणत पाऊस बघत बसतात. पाऊस थांबल्यावर चिऊ काऊला नवीन पक्क घर बांधायला मदत करते वगैरे वगैरे सांगायची.

तसेच, ते गाणं आहे ना - चिव चिव चिमणी गाते गाणी - त्यात गार्गी (मुळ निलु) पिला हात लावते, पिलु चावते. मग आई गार्गीला लाडु देते आणि ती हसायला लागते आसे आहे. मला पहिल्यांदा ते गाणे म्हणताना चुकल्यासारखे वाटले. मग मी थोडा बदल करुन असे म्हणायला लागले -

पडले पिलु, पहाते गार्गी
गार्गीने बोट लावल, पिलुने बोट चावलं
गार्गी लागली रडायला, आई समजुत घालायला
लाडु दिला खायला, कोणाला कोणाला?
गार्गीला आणी पिल्लाला
गार्गी लागली हसायला
पिलु लागले उडायला भुर्र्

रच्याकने,
परवा हे गाण राधासाठी म्हणताना गार्गी म्हणाली की, पण छकुली बाळ (राधासाठीचे तिचे संबोधन) आपण आसा पिलाला हात नाही लावायचा, त्याला त्रास होतो, ते रडत! हे ऐकुन गार्गी मोठी झाल्याचे एकदम जाणवले. आणी अजुन एक नवीन वर्जन निर्माण करावे अस वाटतयं!

फारच मस्त बदल केलास गं गोष्टीत..पारंपारिक गाण्यांतही खटकणारं असतं! असंच एक गाणं.
लवलव साळुबाई मामा येतो
हाती खोब-याची वाटी देतो.
मामी येते हिसकावून घेते
धपाटा मारून पळून जाते!!!
हे एकदाही म्हणायला फार भयंकर वाटलं. मग मी असं बदललं...
लवलव साळुबाई मामा येतो
हाती खोब-याची वाटी देतो
मामी येते गूळ देते
पापा घेऊन पळून जाते. Happy

छान अनिताताई!

आम्ही असं म्हणतो हे गाणं

बुडु बुडु गंगे
पांडुरंगे
राधाचा मामा येतो
राधाला खाऊ देतो
राधाची मामी येते
राधाची पापी घेते

सध्याच्या काळात- मामा भारतात आम्ही ईथे असं आहे. त्यामुळे गार्गीने (स्वतःच्या आंघोळीच्यावेळी म्हणते ती) आता असे बदलले आहे -

बुडु बुडु गंगे
पांडुरंगे

गार्गीचा मामा फोन करतो
गार्गीसाठी जेम्स पाठवतो
गार्गीची मामी फोन करते
गार्गीसाठी फ्रॉक पाठवते

माझ्या लहानपणी आणखी एकदोन वाक्यं होती यात. म्हणजे घर शेणाचं / मेणाचं त्यानंतर असा भाग झाला कि, कावळा म्हणायचा देवा खुप ऊन पडू दे आणि चिऊताईचं घर वितळून जाऊ दे. आणि चिमणी म्हणायची, देवा खुप पाऊस पडू दे आणि कावळ्याचं घर वाहून जाऊ दे.

अशीच पण चांगला आशय असणारी एक गोष्ट (बहुतेक गोनीदांच्या तोंडून ) ऐकली होती. एका मातीच्या ढेकळाची आणि सुकलेल्या पानाची. ढेकूळ म्हणते वारा आला तर ते पानावर बसून राहील आणि त्याला वार्‍याने ऊडू देणार नाही. आणि पान म्हणते, खुप पाऊस आला, तर ते ढेकळावर बसून त्याला विरघळू देणार नाही. ही कथा त्यांच्या तोंडून ऐकण्यातच जास्त मजा होती.

निंबुडा, छान बदल आहेत Happy
तुझ्या गोष्टिवरुन मला बरेच महिने माझ्या मनात असलेले काही प्रश्न परत टोचायला लागले. मुलांचे संगोपन मधे एक लेखनाचा धागा टाकलाय तेच विचारायला.

प्रतिसाद दिलेल्यांचे मनापासून धन्यवाद Happy

टिपीकल महाराष्ट्रियन दिसतोय काऊ..em> >>> Biggrin

पण हे ललितमध्ये का लिहिलं आहेस ? >> मग कुठे लिहू? Uhoh मनीचं गूज ललित मध्येच टाकायचं ना? एखाद्या विषयावर मनात उठलेले विचारतरंग ललित मध्येच मांडायचे ना? आधी मी गुलमोहरात बालसाहित्य मध्ये टाकणार होते, पण ही काही माझी स्वतःची बालकथा नाहिये. तिथे फक्त स्वनिर्मित साहित्य टाकतात ना!

काऊ चिऊच्या गोष्टी नावाचा धागा काढला तर सगळेच आपापली व्हर्जन्स इथे सांगु शकतील.em> >> सिंडी, तुझ्या या प्रतिसादानंतर आलेल्या काहिजणांच्या प्रतिसादात प्रत्येकाने बडबडगीतांची आणि काऊ-चिऊच्या कथेची आपापली वर्जन्स सांगितलेलीच आहेत की. तसेच कंटिन्यु झाले तरी हरकत नाही ना!

आपण आसा पिलाला हात नाही लावायचा, त्याला त्रास होतो, ते रडत! हे ऐकुन गार्गी मोठी झाल्याचे एकदम जाणवले. >>
वत्सला, गार्गीला माझ्याकडून एक गोड पापा. Happy खरंच हल्लीची मुले फार स्मार्ट आहेत. तुमच्या त्या पिलु आणि निलु च्या मूळ गाण्यात आई फक्त निलु ला लाडू देते असा उल्लेख आहे का? मूळ गाणं टाका ना. तुमचं मॉडिफाईड वर्जन छान आहे पण! Happy

लवलव साळुबाई मामा येतो>>>
अनिताताई, मला पण यातला मामीचा दुष्ट असा केलेला उल्लेख खटकतो. तुम्ही केलेला बदल स्तुत्य आहे. Happy

घर शेणाचं / मेणाचं त्यानंतर असा भाग झाला कि, कावळा म्हणायचा देवा खुप ऊन पडू दे आणि चिऊताईचं घर वितळून जाऊ दे. आणि चिमणी म्हणायची, देवा खुप पाऊस पडू दे आणि कावळ्याचं घर वाहून जाऊ दे. >>>
नाही हो, दिनेशदा, हे तर मी कधीच ऐकलं नाहिये Uhoh बाकी ती ढेकुळ आणि पानाची छोटुशी गोष्ट छानै ! Happy

मी आजोबा होईल तेव्हा हिच गोष्ट सांगेन हो नातवंडाना >>> सुकि, direct आजोबा??? Uhoh त्याच्या आधी बाबा बनण्याची पायरी असते रे! Wink Light 1

निंबे.. बापाला एवढ्या गोष्टी सांगायला वेळ मिळत नाही गं, मग उगाच कशाला आश्वासनं देवून ठेवायची.

पायर्‍या चूकलो नाहीये मी अजिबात..

इथे इथे बैस रे मोरा
राजस देतो चारा
चारा खा, पाणी पी
आणि राजसच्या डोक्यावरून भुर्रर्र उडून जा Happy

आमच्या राजसचं ते फेवरीट आहे. Happy डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने इथे इथे असं दाखवतो तेव्हा खूप गोड वाटतं Happy

मी ऐकलेल्या चिउ-काउच्या व्हर्जनमध्ये काउ पक्का व्हिलन होता. चिउच्या घरात लाडीगोडी लावून येतो आणि मग तीच्या वेगवेगळ्या पोत्यातले सगळे धान्य(पावसाळ्याची रसद) कडम कडूम खातो. मग चिउ शेवटी त्याला उलातणे गरम करुन चटका देते टींबटींबला ..आणि घरातून पळवून लावते! Proud
लहान मुलांसाठी सीखः गोड बोलणार्‍या अनोळख्यांवर विश्वास ठेवू नये.

अरे बाबांनो.. तुम्ही "चर्चासत्रात गुदमरलेली म्हातारी"च्या चालीने का बरे चिरफाड करताय? बाळ पोटात असताना सगळे वेगवेगळ्या संतांचे चमत्कार असलेले पुस्तक वाचतोच ना आपण? की तेंव्हा विचार करतो का हे विज्ञानाच्या कसोटीवर अशक्य चमत्कार आहेत, वै.

तुम्ही तुमच्या गोष्टी सांगा, पोरं त्यातनं त्यांना हवा तो बोध घेतील.

निंबे निमोच वर्जन जुने जसे आहे तसेच आहे. बघू त्यातनं ती काय बोध घेते ते! सध्या ससा आणि कासवचे जुने वर्जन सांगतेय तिला.. काही दिवसांनी V2, V3 and V4 सांगेन. तोपर्यंत रमू दे तिला कासवही धावण्यात जिंकू शकतं ह्या कल्पनेत. Happy

Pages