चिऊताई चिऊताई दार उघड

Submitted by निंबुडा on 6 July, 2010 - 06:30

लहानपणी ऐकलेली एक काऊ-चिऊची गोष्ट आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++
एक असतो काऊ. एक असते चिऊ. काऊचं घर असतं शेणाचं. चिऊचं घर असतं मेणाचं.

एकदा काय होतं? एका वर्षी खूप मोठ्ठा पाऊस येतो आणि काऊचं घर जातं वाहून. चिऊचं घर तसंच राहतं. मग काऊ काय करतो? तो येतो आपल्या चिऊताईकडे. दारावर टकटक करतो आणि म्हणतो:
काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाचं आंग पुसू दे

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाची टिटी पावडर करू दे

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाला अंगा घालू दे

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाला गाई करू दे

असं सगळं करून मग एकदाची चिऊताई दार उघडते. कावळ्याला घरात घेऊन त्याला काय हवं-नको ते बघते. खायला-प्यायला देते.* खाऊन झाल्यानंतर काऊदादा काहितरी चघळायला लागतो. तर चिऊताई म्हणते
चिऊ - कडाम कुडुम कडाम कुडुम काय खातोस रे
काऊ - लग्नाची सुपारी मी खातो रे

चिऊ - मला दे मला दे मला दे जरा
काऊ - संपली संपली जातो मी घरा

*काऊ ला घरात घेतल्यानंतरचे डीटेल्स नीट आठवत नाहीयेत. शेवटचा तो "संपली संपली जातो मी घर" वाला संवाद मात्र लक्षात आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++

राजसला खाऊ भरवायला घेतला की ही गोष्ट हमखास आठवते. सुरुवातीला २-४ वेळा अशीच्या अशी सांगितली ही गोष्ट त्याला. पण मग विचार करु जाता काही प्रश्न पडले:
१) आपण दाराशी आलेल्या पाहुण्याला दार उघडून आधी घरात घ्यायचं की "थांब मला हे करू दे, ते करू दे" असं म्हणत ताटकळत ठेवायचं? Uhoh
२) हा काऊ तरी असा कृतघ्न कसा? चिऊने सुपारी मागितली तर सरळ "संपली" सांगून "जातो मी घरा" असे म्हणून मोकळा. म्हणजे "गरज सरो वैद्य मरो" तशातली गत म्हणायची की ही. निदानपक्षी "धन्यवाद", "Thank you" तरी. पण छ्छ्या! ते ही नाही.

आपल्या पिल्लांना एकीकडे "इतरांना मदत करा.", "कुणी आपल्यासाठी काही केलं, तर Thank you म्हणायचं" असं शिकवायचं आणि दुसरीकडे वरची गोष्ट सांगून त्यांना बुचकळ्यात पाडायचं Uhoh
उद्या मला पडलेले प्रश्न राजसने मोठा झाल्यावर मला विचारले तर?

जसे इसापनीतीच्या सर्व गोष्टींना काही ना काही तरी तात्पर्य असते तसे या गोष्टीत काहीच नाही. मग माझ्या परीने डोकं लढवून मी या गोष्टीत बरेचसे फेरफार केलेत. मी आता राजसला खाऊ भरवताना हीच गोष्ट अशी सांगते (निंबुडा वर्जन) Happy

++++++++++++++++++++++++++++++++++
एक असतो काऊ. एक असते चिऊ. काऊचं घर असतं शेणाचं. चिऊचं घर असतं मेणाचं.

एकदा काय होतं? एका वर्षी खूप मोठ्ठा पाऊस येतो आणि काऊचं घर जातं वाहून. काऊ आपला बिचारा भिजून जातो पावसाच्या पाण्यात आणि कुडकुडायला लागतो थंडीने.

चिऊचं घर तसंच राहतं कारण ते मेणाचं असतं ना! मग काऊ काय करतो? तो येतो आपल्या चिऊताईकडे. दारावर टकटक करतो आणि म्हणतो

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - कोण आलं आहे?

काऊ - अगं चिऊताई, मी काऊ. माझं घर की नई पावसात गेलंय गं वाहून. मला खूप थंडी वाजतेय. मला तुझ्या घरात घेतेस का?
चिऊ - थांब हं, काऊ दादा. आलेच मी.

आणि असं म्हणून चिऊताई तिच्या बाळाला कडेवर घेऊन येते आणि दरवाजा उघडते. तर काऊ आपला बिचारा ओलाचिंब होऊन गारठून उभा असतो. चिऊताई त्याला घरात घेते आणि म्हणते,

चिऊ - अरे बापरे, काऊदादा, तू तर चांगलाच भिजलायंस. मी एक काम करते. तुला घराच्या कोपर्‍यात मस्त शेकोटी** पेटवून देते. तू मस्त हात-पाय घे शेकून. तो पर्यंत मी माझ्या बाळाचं आवरून घेते.

मग चिऊ काय करते? तिच्या बाळाला भूक लागली असते की नै? मग ती आपल्या बाळाला मऊ मऊ गरम खिचडी*** भरवते. बाळाला आंघोळ (तोतो/नाऊ नाऊ) घालून घेते. त्याची टिटी-पावडर करते. छान छान कपडे घालते त्याला. मग मांडीवर जो जो करतं तिचं बाळ. तू माझ्या मांडीवर गाई गाई करतोस की नै? अगदी तसंच! मग बाळाला मस्तपैकी मऊ मऊ दुपट्याच्या अंथरुणावर ठेवते. त्याच्यावर त्याच्या आजीच्या साडीचं मऊ मऊ पांघरुण घालते आणि मग काऊसाठी मस्त पैकी आलं घालून गरम गरम चहा घेऊन येते.

चिऊ - काऊदादा काऊदादा, तुझं आंग शेकून झालं का?
काऊ - हो चिऊताई.

चिऊ - मग हा घे मस्त आल्याचा गरम गरम चहा. तो पिऊन झाला की मी मस्त गरम गरम उकड खाऊ घालते तुला तांदळाची (इथे वेळेनुसार पोहे/उपमा/वरीचे तिखटा-मीठाचे तांदूळ असं काहीही असू शकतं Wink थोडक्यात मला त्या त्या वेळी जे जे खावंसं वाटत असेल ते ते काहीही Wink ). मग बघ तुझी थंडी कशी दूर पळून जाईल. Happy

मग काऊ तो चिऊने दिलेला चहा पितो. उकड खातो. आणि चिऊला म्हणतो.
काऊ - चिऊताई, तुझ्या या आदरातिथ्याबद्दल thanks हं! आता मला चांगली हुशारी आलीये. आणि आता पाऊसही थांबलाय. तर मी आता निघतो. चिमण्याला माझा नमस्कार सांग. यापुढे आता मी ही तुमच्या सारखंच मेणाचं घर बांधेन. मग ते पावसापाण्यात सुरक्षित राहील. Happy

मग काऊ आपल्या शर्ट च्या खिशातून सुपारीचं पाकीट** बाहेर काढतो आणि टाकतो थोडीशी तोंडात. चिऊ त्याला विचारते:

चिऊ - कडाम कुडुम कडाम कुडुम काय खातोस रे
काऊ - लग्नाची सुपारी मी खातो रे

चिऊ - मला दे मला दे मला दे जरा
काऊ - तू पण घे, तू पण घे , आता जातो मी घरा

असे म्हणून तो थोडीशी सुपारी चिऊलाही देतो आणि मग काऊ आपल्या घरी निघून जातो.

**आता इथे "मेणाच्या घरात चिऊ शेकोटी का पेटवते?", "तिचे घर वितळून नाही का जाणार?" आणि "काऊचं सुपारीचं पाकीट पावसात भिजत कसं नाही?" असे प्रश्न नका विचारू हं का Happy इतरांच्या उपयोगी पडण्यासाठी जे आणि जसे शक्य होईल ते करावे हे आमच्या राजसला समजावण्याच्या उद्देशाने हा बदल केलाय मी मूळ कथेत Happy

***इथे त्या त्या वेळी आमचा राजस जे काही खात असेल त्या त्या पदार्थाचा उल्लेख करते. उदा. नेस्टम, नाचणीची खीर, गव्हाचे सत्व, गुरगुट्या भात (खिमट), सेरिलॅक etc. जेणे करून त्या त्या पदार्थांची ओळख ही होईल Happy
++++++++++++++++++++++++++++++++++

गुलमोहर: 

धन्स गं!

हो त्या मुळ गाण्यात आई फक्त नीलुला लाडु देते आणि नीलु हसायला लागते.

मुळ गाणं असे आहे -

चिव चिव चिमणी
गाते गाणी
बांधले घरटे
झाले उलटे
पडले पिलु
पहाते निलु
निलुने बोट लावल पिलुने बोट चावलं
निलु लागली रडायला
आई समजुत घालायला
लाडु दिला खायला
निलु लागली हसायला

पण त्या बिचार्‍या पिलाचे काय? ते पण तर पडले आहे ना घरट्यातुन? म्हणुन मी बदलले.

जुन्या गोष्टीतला कावळा हरबर्‍याची डाळ खातो >>
नाही गं. मला तरी माझ्या आईने सुपारीच सांगितली होती. लग्नाची सुपारी असते ती. कुणाच्या ते माहीत नाही Happy

मरणासन्न अवस्थेत सापडलेल्या पॉसम ला घरी आणल्यानंतर >> वत्सला, पॉसम म्हणजे काय? Uhoh

ओके, वत्सला. मी गूगलून पाहिल्या त्याच्या इमेजेस. थोडासा उंदरासारखा दिसतोय हा possum .

अरे हे अजून चालूच आहे का? मुलांच्या आकलनशक्ती अन जाणिवेच्या अनुशंगाने ईथे पालकांची वैचारीक चिरफाड जास्त दिसते आहे.. कशाला ईतका गुंता करायचा? सर्वांनीच लहान्पणी याच गोष्टी ऐकल्या आहेत म्हणून कधी कुणाला त्याचे अनुकरण वा त्यानुसार टोकाचे काही विचार करताना त्या लहान वयात पाहिलय का?
ऊद्या एखादा पावसात भिजलेला कावळा आलाच तुमच्या खिडकीवर तर मुलाने/मुलीने त्याला टॉवेल ने पुसायचा हट्ट धरला तर त्याला आत घेणार आहात का? Happy

जाईजुई आणि योग यांना अनुमोदन Happy
मला वाटतं, चिऊकाऊची मूळ गोष्ट आहे ती त्यातला लयीमुळे (काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब मी माझ्या बाळाला.......) लहान मुलांना अपील होते. अगदी लहान मुले, जी नीट बोलूही शकत नाहीत, त्यांच्यासाठी अश्या लय असलेल्या गोष्टी सांगितल्या जातात, जेणेकरून त्या लयीमुळे तरी ती नवे शब्द शिकतील. एक-दीड वर्षाची मुलं ती.... त्यांना 'कसं वागायचं, कसं नाही' शिकवायची काय गरज आहे? जरा मुलांच्या विश्वात राहू दे त्यांना एक-दोन वर्षं... मग आहेतच की आयुष्यभर मॅनर्स आणि एटीकेटस्.
असं म्ह्टलं तर बडबडगीतांना तरी काय अर्थ असतो? केवळ मुलांना शब्द कळत जावेत, भाषा कळत जावी यासाठी लयीत बांधलेले शब्द असतात ते, त्यातही अर्थ शोधू लागलो तर अवघड होईल.
जरा तीन-चार वर्षांची झाली मुलं की त्यांच्यासाठीच्या गोष्टीही वेगळ्या होतात, जसे इसापनिती,पंचतंत्र.... तोपर्यंत अश्याच निरर्थक गोष्ती सांगाव्या त्यांना, त्यात अर्थ/तात्पर्य शोधायचा बोजा नका टाकू त्या लहानग्यांवर Happy

मी लहानपणी ऐकलेली ही गोष्ट फारच छोटी आहे.
..............................................

एक होती चिऊ.
एक होता काऊ.
काऊचं घर होतं शेणाचं.
चिऊचं घर होतं मेणाचं.

एकदा काय झालं?
धो - धो पाऊस आला
काऊचं घर वाहून गेलं.
चिऊचं घर राहून गेलं.

मग काऊ गेला चिऊकडे
म्हणाला, चिऊताई-चिऊताई
थोडीशी राहायला जागा देता काय?
चिऊ म्हणाली मलाच पुरत नाही तर
तुला कुठून देऊ?
.......................................

मला वाटतं मुळ गोष्ट पहिल्या दोन कडव्यापुरतीच असावी.
आणि सांगतांना छोटी वाटते म्हणुन कुणीतरी इतरांनी तिला वाढवली असावी.
......................................

मुळ कथाकाराने एवढीच बोधकथा लिहिली असावी.

एक होती चिऊ.
एक होता काऊ.
काऊचं घर होतं शेणाचं.
चिऊचं घर होतं मेणाचं.
..
एकदा काय झालं?
धो - धो पाऊस आला
काऊचं घर वाहून गेलं.
चिऊचं घर राहून गेलं.

एवढीशी गोष्ट लहानशी असली तरी फार मोठा संदेश देवून जाते.

अर्थात हे माझे मत आहे जर-तरवर आधारीत. Happy

प्राचीला अनुमोदन.
चिऊताई शहाणी असते म्हणून ती मेणाचं घर बांधते.
मेणाचं म्हणजे भक्कम,मजबूत. या गोष्टीत चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू दाखवायच्या आहेत.
' थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते ' पासूनच्या संपूर्ण वर्णनात आई बाळाकरिता काय करते...... म्हणजे आंघोळ घालणं, आंग पुसणं, पावडर लावणं, तीट लावणं, अंगा घालणं इ... ती प्रोसेस सांगायची आहे. ....... आणि शेवटच्या दोन ओळींमधे कावळा लबाड आहे, पण आपण असं वागायचं नसतं असं सूचित केलं आहे.
हे सगळं सांगूनही मी म्हणेन की प्राचीने जे लिहिलंय तेच खरं आहे.

प्राचीशी सहमत!
अति विचार करुन आपण पालकच आपले ताण वाढवून घेतोय. माझ्या ६ वर्षाच्या मुलाला तो लहान असताना मी जुनीच गोष्ट सांगितली होती, आणि आता २ वर्षाच्या मुलालाही तीच गोष्ट सांगते. "काहीतरी गंमत " या पलिकडे त्याला काही विशेष अर्थ आहे असे नाही. मुले ३-४ वर्षाची झाली की आपण त्याना ही गोष्ट नक्कीच सांगणार नाहियोत.

मुलांच्या आकलनशक्ती अन जाणिवेच्या अनुशंगाने ईथे पालकांची वैचारीक चिरफाड जास्त दिसते आहे.. कशाला ईतका गुंता करायचा? >>>
एक-दीड वर्षाची मुलं ती.... त्यांना 'कसं वागायचं, कसं नाही' शिकवायची काय गरज आहे? जरा मुलांच्या विश्वात राहू दे त्यांना एक-दोन वर्षं... मग आहेतच की आयुष्यभर मॅनर्स आणि एटीकेटस्.
>>>
अति विचार करुन आपण पालकच आपले ताण वाढवून घेतोय. माझ्या ६ वर्षाच्या मुलाला तो लहान असताना मी जुनीच गोष्ट सांगितली होती, आणि आता २ वर्षाच्या मुलालाही तीच गोष्ट सांगते. >>>

या पोस्ट्स वर उत्तरे देण्यासाठी गेले २ दिवस मनात विचारमंथन चालू आहे. नीट व नेमक्या शब्दांत कसे मांडता येईल याचा विचार करीत उत्तर द्यायचे थांबले होते. आत्ताच "मुलांचे संगोपन" या गृपमधला "मुलांबरोबर चर्चा करताना" हा बीबी वाचनात आला. त्याच्या हेडपोस्ट मध्ये मेधा यांनी लिहिलेला एक पॅरा इथे देतेय. मला उत्तरादाखल exactly हेच म्हणायचं आहे.

मायबोलीच्या वाचक/ लेखकांपैकी अनेकांची परिस्थिती अशी आहे की ' माझ्या आई बाबांनी असं केलं होतं' हा विचार मुलांच्या संगोपनात पुरत नाही. जिथे आपण लहानाचे मोठे झालो तिथे सुद्धा परस्थिती झपाट्याने बदलते आहे. जे मायबोलीकर आपल्या गावा/ शहरापासून दूर आहेत त्यांची अवस्था आणखीन बिकट. आपले संस्कार, आपल्या श्रद्धा , मूल्यं, नातेसंबंध मुलांपर्यंत जसेच्या तसे पोचवणं कठीण तर आहेच, शिवाय या बदलत्या परिस्थितीत त्यात बदल करणं देखील अपरिहार्य आहे.

मला वाटतं, चिऊकाऊची मूळ गोष्ट आहे ती त्यातला लयीमुळे (काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब मी माझ्या बाळाला.......) लहान मुलांना अपील होते. अगदी लहान मुले, जी नीट बोलूही शकत नाहीत, त्यांच्यासाठी अश्या लय असलेल्या गोष्टी सांगितल्या जातात, जेणेकरून त्या लयीमुळे तरी ती नवे शब्द शिकतील.
>>> येस्स. हे पटलं. पण अशा तालात नि ठेक्यात्/ठसक्यात म्हणता येऊ शकतील अशा इतरही कितीतरी कविता/गाणी असतीलच ना. मी उदाहरण दिलेल्या चिऊताईच्या कथेत किंवा वत्सला ने उदाहरण दिलेल्या नीलु च्या गाण्यात काळाला अनुसरून बदल केल्याने मला नाही वाटत की आपण कुठे वैचारीक चिरफाड वै. करतोय. आणि हे गाणे घालायचेच असेल तर माझ्या वरच्या वर्जन मध्ये मी ते कावळ्याला घरात घेतल्यानंतरच्या कथेत कुठेतरी घालेन जेणेकरून कथेचा आणि त्या शब्दांच्या लयीचा मूळ उद्देश साध्य होईलच पण मला जी गोष्ट राजस पर्यंत पोचवायची आहे ती ही पोचेल. Happy

मी स्वत्: माझ्या चुलत नणंदेला असे कथेत तिच्या सोयीने बदल करून तिच्या मुलाला त्या कथा सांगितल्याचे पाहिले/ऐकले आहे. ती तर नोकरी न करणारी आणि घर व मूल या पलीकडे न जाणारी स्त्री आहे. मला नाही वाटत की तिने खूप विचार वगैरे करून असा कथेत बदल करण्याचा निर्णय वै. घेतला. तिच्या कृष्णबाप्पाच्या कथेत कालिया मर्दन ऐवजी "मोठ्ठी काळी पाल" येते. यमुनेच्या डोहाऐवजी "विहीर" येते. काय हरकत आहे? तिच्या मुलाला पाल आणि विहीर या माहीत असलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे पालीसारख्या प्राण्याला कृष्णबाप्पा हरवतो आणि चेंडू परत मिळवतो हे ऐकून तो खुश होऊन टाळ्या पिटतो.

परिस्थिती बदलत आहे, त्यानुसार बालसंगोपनाच्या व्याख्येतही बदल करणे आवश्यक आहे, ही मान्य आहे.
पण मला एवढंच म्हणायचं होतं, की राजस खूपच लहान आहे अजून. त्याने प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकले, समजले पाहिजे असा अट्टाहास का? प्रत्येक गोष्टीत नीतीमुल्यं कशाला लावायची? त्याला जरा मोठा होऊ दे. सध्या त्याला शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, अजून बोजा नको टाकू त्याच्यावर. निरागसता हरवू नका त्याची. Happy

त्याने प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकले, समजले पाहिजे असा अट्टाहास का? प्रत्येक गोष्टीत नीतीमुल्यं कशाला लावायची? >>>
नाही गं ('अगं' म्हटलं तर चालेल नं? Uhoh ) अट्टाहास कुठेय? पण जिथे शनि-रवि सोडून पिल्लूला जास्त वेळ देणे जमत नाही, तिथे नंतरही मोठा झाल्यावर नीतिमूल्य शिकविणासाठी स्पेशल क्लास घ्यायला वेळ कधी मिळणार आहे? आणि आपले संस्कार्/नीतीमूल्ये ही अशी "रोज सकाळी १ तास" असे पाढे शिकवल्यासारखी शिकविता येत नाहीत. शिवाय नक्की किती वर्षे वयाचा झाला म्हणजे मॅनर्स/ एटिकेट्स शिकवायला लागायचे यासंदर्भात पण मतमतांतरे आहेतच की. त्यामुळे जसे जमेल तसे आपल्या कथेतून आणि कृतीतून हे शिक्षण द्यायची सवय आपणच अंगात बाणवली तर पुढे त्रास होणार नाही असे आपले माझे स्वतःपुरते मत. Happy आत्ता त्याला काहीच कळत नाहीये. पण पुढे बोलायला लागेल तसतसे कळत जाईल हळूहळू. घाई नाहिये. कळायचे तेव्हा कळू देत. लगेच शीक आणि implement कर असाअट्टाहास मुळीच नाहीये. Happy

आता राजस फारच लहान आहे. मला नाही वाटत आता जसे आहे तसे सांगितले तर त्याच्या ते फार लक्षात राहिल किंवा तो ते पुढे जाऊन आमलात आणेल (बालमानसशास्त्र काय सांगते ते मला माहिती नाही).
काही वर्षानी शाळेत गेल्यावर इंग्रजी र्‍हाईम्स शिकवतिल त्या तर आपण नाही बदलू शकत ना? jack and jill पडतात, rock a by baby मधले बाळ झाडावरुन पडते आणि बर्‍याच गाण्यात बरेच काही वाईट होते.
मला असे वाटते की मुलं इतके लहान असल्यापासून आपण प्रत्येक गाण्याचा/गोष्टीचा काय परिणाम होईल वगैरे विचार करत बसू नये.

मी बर्‍याच दिवसांपुर्वी ह्या बीबीवर आले होते, पण प्रतिक्रीया देयची टाळले. पण आज न रहावून देत आहे.

मला वाटतं ह्या कथेची अनेक versions आहेत, आणि मी ऐकलेली गोष्ट अशी कि ह्या गोष्टीतला कावळा लबाड असतो म्हणुन चिमणी त्याला धडा शिकविते वैगरे..

माझ्या मते हि गोष्ट आपण अगदी लहान बाळांना म्हणजे ६ महिने ते १ वर्ष इतक्या वयातील मुलांना सांगतो. त्या वयात गोष्टीचा अर्थ समजुन त्यामुळे वाईट संस्कार होउन कोणी बिघडेन असे मला अजिबातच वाटत नाही.

लहान बाळ, अथवा मुलेच कशाला पण कोणीही गोष्ट वाचुन त्यामुळे बिघडला असे अतर्क्य होवु शकते ह्या मताची मी नाही.

लहान मुलांवर संस्कार हे आपण आपल्या आचरणातुन करतो. मुलांवर संस्कार हे भोवतालचे surrounding च करते. आई-वडिल जसे वागतात मुले त्यांचेच अनुकरण करतात. त्यामुळे असं करु नये बरं का, असं वाईट, तसं चांगलं असे उपदेश करुन कोणी घडत नसतं. उपदेश दिल्याने मुले फारतर फार पुढच्या पिढीला उपदेश देयला शिकतील. Happy
पण आई-वडिलांनी स्वतःचे वर्तन जर चांगले ठेवले तर मुलांवर चांगुलपणाचे नकळत संस्कार होतात. म्हणजे आई-वडीलांनी मुलांना चांगले वाईर्ट शिकवुच नये असे मी म्हणत नाही आहे.

म्हणतात ना यथा राजा तथा प्रजा. जसा बॉस तसेच कर्मचारी आणि जसे आई-वडील अथवा surrounding तसेच मुलंही घडतात.

तेव्हा १ वर्षाच्या मुलाला चिउ काउची गोष्ट सांगतांना खुप जास्त विचार करु नये. हि पिढ्यानपिढ्या चालत आलेली गोष्ट आहे, आणि त्यात काहीतरी नक्कीच आहे म्हणुन ती इतक्या पिढ्या चालुच आहे आणि राहील. Happy
पण एक curiosity म्हणुन हि नक्की original गोष्ट काय आहे हे जाणुन घेयची मलाही खुप दिवसांपसुनची इच्छा आहे. तेव्हा आपल्या तज्ञ मंडळींनी सांगावं मुळ गोष्ट काय आहे ते. Happy

हे सर्व वाचुन , 'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ' गोष्टीतल्या म्हातारीवरचे चर्चासत्र असा काहीतरी विनोदी धडा आम्हाला होता त्याची आठवण झाली Happy सगळे आठवत नाहीये, पण म्हातारी तुप ऱोटीच का खाते गरीबाच्या मुलाला साधा भाकर तुकडा पण दृष्टीस पडत नाही ( सामाजिक कार्यकर्ते ) , तुप ऱोटी म्हातारीच्या तब्बेतीला मानवणार नाही ( आरोग्यतज्ञ ) . ई . वेग्वेगळ्या दृष्टीकोनातुन गोष्टीचे विश्लेषण तज्ञ करत असतात. आणि अशा गोष्टी मुलांना सांगुन आपण कसे अयोग्य गोष्टी शिकवतोय ई.

(शिळ्या कढीला ऊत आणण्याचा दोष पत्करून. Proud )

एवढा विचार नाही हो करायचा. सगळं सांगायचं लहान मुलांना. विचार करायचं वय झालं, की विचारही करू द्यायचा. आपण मुळ गोष्टीचा, व्हर्जनचा जास्त विचार करायचा नाही. पाहिजे तितकी व्हर्जन्स पाडायची. इतकंच नाही, तर 'सांग बघू, आता चिऊताई काय करेल ते?' असं आपणच वेळोवेळी विचारून त्यांना त्यांची स्वतःची व्हर्जन्स पाडू द्यायची. तात्पर्य वगैरे सांगायच्या भानगडीत प्रत्येक वेळेस पडायचं नाही, पडू द्यायचं नाही, याला अनुमोदन. खूप वर्षे चालत आलं आहे, म्हणून तसंच करा नि सांगा- याला माझा विरोध. हिरो, व्हिलन्स असले तरी त्यांत ब्लॅक-ग्रे-व्हाईट शेड्स असं सारं सारं असतं, हे मुलांना कळू देत. मुलांनी अनावश्यक भाबडे, स्वप्नाळू, झापडबंद असण्याचे दिवस संपले आहेत.

आता विषय निघाला आहे, तर हे घ्या माझं व्हर्जन. Proud
http://www.maayboli.com/node/2102

आजच कविता नवरे (सध्याचा माबो आयडी कविन) हिचा मेल आला आहे. त्यातून कळलेल्या माहितीनुसार पोदार जंबो किड्स या शाळेतर्फे एक आविष्कार नामक उपक्रम हल्ली हल्लीच राबविण्यात आला. शालेय अभ्यासक्रमात शिकविल्या जाणार्‍या बर्‍याचशा नर्सरी र्‍हाईम्स लहान लहान मुलांकडूनच या उपक्रमांतर्गत नव्याने लिहून घेतल्या गेल्या.

फेसबुक वर ही लिंक बघता येईल : http://www.facebook.com/avishkarproject

तसेच www.podarjumbokidsplus.com या वेब साईट वर आविष्कार या नावाने चित्ररुप लिंक दिली आहे. तिथे क्लिक करूनही माहिती मिळेल.

मी या ललितात मांडलेल्या विचारांशी साधर्म्य दाखवणारा उपक्रम वाटला म्हणून इथे ही लिंक पोस्टत आहे. या recreated and revisited नर्सरी र्‍हाईम्स सर्वमान्य होतील/ नाही होतील कल्पना नाही. पण अशा पद्धतीचा सकारात्मक बदल जुन्या बडबडगीतांमध्ये/ बालगीतांमध्ये करावा / व्हावा यासाठी शालेय पातळीवरही प्रयत्न राबविले जाताहेत हे ही नसे थोडके. Happy

मुंबई मिरर मध्ये या संदर्भात एक लेख आला होता. त्याची लिंक खाली देते. यात एका घटनेचा उल्लेख सुरुवातीलाच केला आहे. तीतून शिक्षकांना जे प्रश्न पडले त्यातून या उपक्रमाच्या कल्पनेचा (लहान मुलांच्या कवितांमध्ये अशा प्रकारचा बदल करणे) उगम झाला.

Where Humpty Dumpty doesn’t have a great fall

निंबुडा,
छान बदल केलेत गोष्टीत. मलाही काऊ-चिऊची गोष्ट खटकली होती. मी ऐकलेल्या वर्जनमध्ये - चिऊ काऊला घरात घेते तेव्हा पावसात भिजल्यामुळे तो कुडकुडत असतो आणि चिऊताईला शेकोटी मागतो. चिऊताई त्याला तापलेला तवा देते :-O आणि काऊ त्यावर बसल्यामुळे त्याचं अंग पोळतं :-O
इतकी क्रूर चिऊताई गोष्टींमधून लहानमुलांना सांगितली तर त्यात वर्णभेद, लिंगभेद इ. अनेक अहितकर संस्कार आपण कळत-नकळत बाळांवर करतो ही बाब फारच खटकते. तुमचं (निंबुडा)वर्जन खरोखरच फार उपयुक्त आहे.
आता तुमच्या चिऊताईचं ते मेणाचं घर वितळू नये म्हणून त्या घरात काही बदल करता येतात का, यावर विचार करतो आणि आयडियाची कल्पना सुचली की इथेच कळवतो.

धन्यवाद.
-प्रशांत

उस्फ़ूर्तपणे सापडलेले चिऊच्या घरबांधणीतले उपाय

घर शेणाचं बांधायचं आणि मेणाचं त्याला कोटिंग करायचं.

किंवा मेणाचं घर बनवून आतल्याबाजूने शेणाने सारवायचं.

निंबु : मला माझी आई ही गोष्ट सांगायची आणि अजुन पुढे एक गोष्ट सांगायची

पावसाळा निघुन जातो
हिवाळाही जातो
आता येतो उन्हाळा. चिऊच मेणाचं घर वितळुन जातं
आता चिऊला मुळ्ळीच कळत नाही आपण काय करावं
ती जाते कावळ्याकडे. पहाते तर त्याने छानस घर बांधलयं
बाहेरुन काट्याकुट्याचं आत मात्र मऊ मऊ कापुस....
ती दार वाजवते : कावळ्या कावळ्या दार उघडं
आतुन आवाज येतो : कोण ते आलय बाहेर?"
"मी चिऊ, माझं घर वितळलं रे"
"थांब थांब आलोच मी."
कावळा येतो आणि पटकन दार उघडतो... चिऊ पहाते कावळा त्याच्या बाळाला जेवण देत असतो.
"बस गं ताई! आणि हे घे.. हा खाऊ तुझ्या बाळांना पण खाऊ घाल!"
चिऊला वाटतं मी तर दार पण उघडलं नव्हतं आणि हा आपल्या बाळाचा खाऊ माझ्या बाळांना देतोय.
"चिऊताई तू रहा हो इथेच ! उन्हाळा संपला की जा तुझ्या घरी!"
चिऊला आनंद होतो
रोज कावळा लवकर उठुन बाहेर जायचा आणि रात्री परत यायचा
चिऊही दोघांच्या बाळांना खाऊ खायला घालायची.
एके दिवशी कावळा येतो आणि म्हणतो
"आजपासुन तु माझ्या घरी रहायचं नाहीस!"
चिऊला खुप वाईट वाटतं
"दादा मी कुठे रे जाऊ आता?"
"चल माझ्या बरोबर"
चिऊ त्याच्या मागे निघते. बघते तर कावळ्याने तिच्यासाठीही एक घर बांधलेलं असतं
ते पाहुन चिऊला खुप आनंद होतो.ती रडायला लागते. कावळा म्हणतो
"मला माझ्या कठिण प्रसंगांमध्ये तू मदत केलीस. मी तुझे उपकार कसे विसरेन? ही माझ्याकडुन तुझ्यासाठी एक भेट समज!"
चिऊ आनंदाने त्या घरात रहायला लागते आणि काऊ आनंदाने आपल्या पिल्लाला घेऊन उडुन जातो"

अशी काहीशी होती
म्हणजे आईची शैली आणि कथा मला नीट नाहीच सांगता येणार पण ती तेंव्हा बरच काही सांगायची.
त्याने तिला कशी मदत केली आणि तिच्या मदतीची जाणिव ठेवली वैगेरे वैगेरे Happy

फारच मोठ्ठी पोस्ट झाली Happy

Pages