चिऊताई चिऊताई दार उघड

Submitted by निंबुडा on 6 July, 2010 - 06:30

लहानपणी ऐकलेली एक काऊ-चिऊची गोष्ट आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++
एक असतो काऊ. एक असते चिऊ. काऊचं घर असतं शेणाचं. चिऊचं घर असतं मेणाचं.

एकदा काय होतं? एका वर्षी खूप मोठ्ठा पाऊस येतो आणि काऊचं घर जातं वाहून. चिऊचं घर तसंच राहतं. मग काऊ काय करतो? तो येतो आपल्या चिऊताईकडे. दारावर टकटक करतो आणि म्हणतो:
काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाचं आंग पुसू दे

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाची टिटी पावडर करू दे

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाला अंगा घालू दे

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - थांब माझ्या बाळाला गाई करू दे

असं सगळं करून मग एकदाची चिऊताई दार उघडते. कावळ्याला घरात घेऊन त्याला काय हवं-नको ते बघते. खायला-प्यायला देते.* खाऊन झाल्यानंतर काऊदादा काहितरी चघळायला लागतो. तर चिऊताई म्हणते
चिऊ - कडाम कुडुम कडाम कुडुम काय खातोस रे
काऊ - लग्नाची सुपारी मी खातो रे

चिऊ - मला दे मला दे मला दे जरा
काऊ - संपली संपली जातो मी घरा

*काऊ ला घरात घेतल्यानंतरचे डीटेल्स नीट आठवत नाहीयेत. शेवटचा तो "संपली संपली जातो मी घर" वाला संवाद मात्र लक्षात आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++

राजसला खाऊ भरवायला घेतला की ही गोष्ट हमखास आठवते. सुरुवातीला २-४ वेळा अशीच्या अशी सांगितली ही गोष्ट त्याला. पण मग विचार करु जाता काही प्रश्न पडले:
१) आपण दाराशी आलेल्या पाहुण्याला दार उघडून आधी घरात घ्यायचं की "थांब मला हे करू दे, ते करू दे" असं म्हणत ताटकळत ठेवायचं? Uhoh
२) हा काऊ तरी असा कृतघ्न कसा? चिऊने सुपारी मागितली तर सरळ "संपली" सांगून "जातो मी घरा" असे म्हणून मोकळा. म्हणजे "गरज सरो वैद्य मरो" तशातली गत म्हणायची की ही. निदानपक्षी "धन्यवाद", "Thank you" तरी. पण छ्छ्या! ते ही नाही.

आपल्या पिल्लांना एकीकडे "इतरांना मदत करा.", "कुणी आपल्यासाठी काही केलं, तर Thank you म्हणायचं" असं शिकवायचं आणि दुसरीकडे वरची गोष्ट सांगून त्यांना बुचकळ्यात पाडायचं Uhoh
उद्या मला पडलेले प्रश्न राजसने मोठा झाल्यावर मला विचारले तर?

जसे इसापनीतीच्या सर्व गोष्टींना काही ना काही तरी तात्पर्य असते तसे या गोष्टीत काहीच नाही. मग माझ्या परीने डोकं लढवून मी या गोष्टीत बरेचसे फेरफार केलेत. मी आता राजसला खाऊ भरवताना हीच गोष्ट अशी सांगते (निंबुडा वर्जन) Happy

++++++++++++++++++++++++++++++++++
एक असतो काऊ. एक असते चिऊ. काऊचं घर असतं शेणाचं. चिऊचं घर असतं मेणाचं.

एकदा काय होतं? एका वर्षी खूप मोठ्ठा पाऊस येतो आणि काऊचं घर जातं वाहून. काऊ आपला बिचारा भिजून जातो पावसाच्या पाण्यात आणि कुडकुडायला लागतो थंडीने.

चिऊचं घर तसंच राहतं कारण ते मेणाचं असतं ना! मग काऊ काय करतो? तो येतो आपल्या चिऊताईकडे. दारावर टकटक करतो आणि म्हणतो

काऊ - चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ - कोण आलं आहे?

काऊ - अगं चिऊताई, मी काऊ. माझं घर की नई पावसात गेलंय गं वाहून. मला खूप थंडी वाजतेय. मला तुझ्या घरात घेतेस का?
चिऊ - थांब हं, काऊ दादा. आलेच मी.

आणि असं म्हणून चिऊताई तिच्या बाळाला कडेवर घेऊन येते आणि दरवाजा उघडते. तर काऊ आपला बिचारा ओलाचिंब होऊन गारठून उभा असतो. चिऊताई त्याला घरात घेते आणि म्हणते,

चिऊ - अरे बापरे, काऊदादा, तू तर चांगलाच भिजलायंस. मी एक काम करते. तुला घराच्या कोपर्‍यात मस्त शेकोटी** पेटवून देते. तू मस्त हात-पाय घे शेकून. तो पर्यंत मी माझ्या बाळाचं आवरून घेते.

मग चिऊ काय करते? तिच्या बाळाला भूक लागली असते की नै? मग ती आपल्या बाळाला मऊ मऊ गरम खिचडी*** भरवते. बाळाला आंघोळ (तोतो/नाऊ नाऊ) घालून घेते. त्याची टिटी-पावडर करते. छान छान कपडे घालते त्याला. मग मांडीवर जो जो करतं तिचं बाळ. तू माझ्या मांडीवर गाई गाई करतोस की नै? अगदी तसंच! मग बाळाला मस्तपैकी मऊ मऊ दुपट्याच्या अंथरुणावर ठेवते. त्याच्यावर त्याच्या आजीच्या साडीचं मऊ मऊ पांघरुण घालते आणि मग काऊसाठी मस्त पैकी आलं घालून गरम गरम चहा घेऊन येते.

चिऊ - काऊदादा काऊदादा, तुझं आंग शेकून झालं का?
काऊ - हो चिऊताई.

चिऊ - मग हा घे मस्त आल्याचा गरम गरम चहा. तो पिऊन झाला की मी मस्त गरम गरम उकड खाऊ घालते तुला तांदळाची (इथे वेळेनुसार पोहे/उपमा/वरीचे तिखटा-मीठाचे तांदूळ असं काहीही असू शकतं Wink थोडक्यात मला त्या त्या वेळी जे जे खावंसं वाटत असेल ते ते काहीही Wink ). मग बघ तुझी थंडी कशी दूर पळून जाईल. Happy

मग काऊ तो चिऊने दिलेला चहा पितो. उकड खातो. आणि चिऊला म्हणतो.
काऊ - चिऊताई, तुझ्या या आदरातिथ्याबद्दल thanks हं! आता मला चांगली हुशारी आलीये. आणि आता पाऊसही थांबलाय. तर मी आता निघतो. चिमण्याला माझा नमस्कार सांग. यापुढे आता मी ही तुमच्या सारखंच मेणाचं घर बांधेन. मग ते पावसापाण्यात सुरक्षित राहील. Happy

मग काऊ आपल्या शर्ट च्या खिशातून सुपारीचं पाकीट** बाहेर काढतो आणि टाकतो थोडीशी तोंडात. चिऊ त्याला विचारते:

चिऊ - कडाम कुडुम कडाम कुडुम काय खातोस रे
काऊ - लग्नाची सुपारी मी खातो रे

चिऊ - मला दे मला दे मला दे जरा
काऊ - तू पण घे, तू पण घे , आता जातो मी घरा

असे म्हणून तो थोडीशी सुपारी चिऊलाही देतो आणि मग काऊ आपल्या घरी निघून जातो.

**आता इथे "मेणाच्या घरात चिऊ शेकोटी का पेटवते?", "तिचे घर वितळून नाही का जाणार?" आणि "काऊचं सुपारीचं पाकीट पावसात भिजत कसं नाही?" असे प्रश्न नका विचारू हं का Happy इतरांच्या उपयोगी पडण्यासाठी जे आणि जसे शक्य होईल ते करावे हे आमच्या राजसला समजावण्याच्या उद्देशाने हा बदल केलाय मी मूळ कथेत Happy

***इथे त्या त्या वेळी आमचा राजस जे काही खात असेल त्या त्या पदार्थाचा उल्लेख करते. उदा. नेस्टम, नाचणीची खीर, गव्हाचे सत्व, गुरगुट्या भात (खिमट), सेरिलॅक etc. जेणे करून त्या त्या पदार्थांची ओळख ही होईल Happy
++++++++++++++++++++++++++++++++++

गुलमोहर: 

प्राची आणि तेज शी काही प्रमाणात सहमत असेल तरीही समजायला लागल्यावर हीच मुले उलट्सुलट शंका काढून हैराण करण्याएवढी स्मार्ट होतात हेही तितकेच खरे त्यामुळे सोयीस्कर बदल करणे स्वागतार्ह!
उदा. रियाने केलेले चिऊ काऊच्या गोष्टीचे नवीन व्हर्जन अप्रतिम!
जुन्या गोष्टीतला कावळा हरभर्‍याची डाळ खातो>> होय! मी ऐकलेल्या गोष्टीतही काऊ हरभर्‍याची डाळच चोरून खातो; सुपारी नव्हे. (चिऊताईने केलेले उपकार विसरून!)
चिऊ त्याला विचारते, "कुडूम कुडूम कुडूम कुडूम काय खातोस रे"
काऊ उत्तरतो, "मुंजेची सुपारी मी खातो रे..." (तो खोटंच सांगतो, डाळ शेअर करायला लागू नये म्हणून)
चिऊ म्हणते,"मला दे मला दे मला दे जरा..."
काऊ,"संपली संपली जातो मी घरा..."

चिऊताई चिऊताई दार उघड आणि कुडूम कुडूम या गाण्यांमुळे गोष्ट श्रवणीय होते...

चिऊताई दार उघडच्या गाण्यात थांब माझ्या बाळाला शंभो घालते, पुसून काढते, पाऊ लावते, पासून कित्तीही वाढवता येण्यासारखी लिस्ट आहे, तोपर्यंत काऊला बिचार्‍याला बाहेर उभे राहावे लागते!

पण मुलाच्या सहा महीन्यांपर्यंत गोष्टी श्रवणीय असाव्यात; मग त्यातील काही चूका नजरंदाज झाल्या तरी चालतील असे माझे प्रामाणिक मत आहे!

Pages