श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ३

Submitted by बेफ़िकीर on 21 June, 2010 - 05:17

गट्टू हे एक विलक्षण बाळ होतं! ते हसायचं जास्त अन रडायचं कमी! मात्र अगदीच लहान चेहरा असल्यामुळे पहिल्यांदा हसण्यातला अन रडण्यातला फरक फारसा समजायचाच नाही. आणि त्याहून विलक्षण यासाठी की पवार मावशींच्या तोफखान्याच्या सरांउंडिगमधे ते निवांत पहुडलेले असायचे.

पंधरा दिवसात दास्ताने वाड्याला पवार मावशी ही बाई अत्यंत कर्तबगार असल्याचा साक्षात्कार झालेला होता. जो गट्टू तिच्याकडे गेला तो मुळी घरीच यायचा नाही. आणि पवार मावशींचे दारही बंद व्हायचे नाही की श्रीनिवासचेही! श्रीनिवास आता पवार मावशींकडे बर्‍याचदा आत बाहेर करायचा. कारण वाड्यातली सगळी मंडळीच तिथे येऊन जाऊन असायची अन गट्टू तिथेच वास्तव्य करायचा.

आजवर पवार मावशींच्या तोंडी हल्ल्यापुढे जाऊ न शकलेल्या लोकांना तिचे घर ही एक अद्भुत चीज आहे हे समजले. एका कोपर्‍यात हिंदू धर्मातील जितके देव एकत्र व मतभेद न होता नांदणे शक्य आहे तितके नांदत होते. हनुमान, काळूबाई आणि शंख हे एकाच छोट्या तबकात होते. शंकर आपली वहिनी म्हणजे साक्षात लक्ष्मी माता हिच्याशी बहुधा पार्वतीने घर म्हणजे कैलास पर्वत नीट न ठेवण्याच्या तक्रारी करत असावा. आणि त्याबद्दल पार्वती किंवा विष्णू यांना कोणतीही हरकत नसावी. गणपती मात्र राम आणि सीता यांच्यासमोर होता. नंदी, एक गाय, कासव आणि गरूड असे चालणारे सस्तन प्राणी व सरपटणारे व उडणारे पशू पक्षी एका वेगळ्या तबकात सर्व देवतांचा एकत्रित वाहनतळ या स्वरूपात उभे होते. एक विठोबा होता हे त्या फोटोतील शेजारी कंबरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या रखुमाईवरून सिद्ध करणे शक्य होते. एक स्वतंत्र स्वामी होते जे मानवाला ज्ञात असलेल्या स्वामींपेक्षा भिन्न रुपात होते. ते झाडातून उगवलेले होते एका फांदीसारखे व त्यांच्या फोटोत वाक्य होते की 'पेराल ते उगवेल'!

समीर आणि राजश्री या देव्हार्‍यासमोरून हलायचेच नाहीत. कारण ८५ लाख योनींपैकी बहुतांशी तिथे दिसायच्याच!

दुसर्‍या कोपर्‍यात त्यांचे स्वयंपाक घर होते जेथील टापटीप पाहून एखाद्याने किचन मेंटेनन्सचा कोर्स करावा! एक माणूस इथपर्यंत पोचू द्यायच्या नाहीत पवार मावशी! हिम्मतच नव्हती कुणाची त्या कोपर्‍यापर्यंत पोचायची! तिसर्‍या कोपर्‍यात एक पलंग होता ज्यावरील चादरीला पडलेली सुरुकुती दास्ताने वाड्याच्या भिंती हादरवायला पुरेशी ठरायची. कुणाहीमुळे ती पडो! त्याच्या किमान अडीच पिढ्यांचा उल्लेख तरी व्हायचाच! आणि हा उल्लेख असा असायचा की आपण या वंशात जन्माला आलो नसतो तर बरे असे त्या व्यक्तीला वाटावे.

चवथा कोपरा म्हणजे अर्थातच दार होते. नाझींसाठी असलेल्या गॅस चेंबरमधे पाय टाकावा तसे लोक त्या दारातून आत पाय टाकायचे! आणि आत गेल्यावर मात्र तासनतास बाहेरच यायचे नाहीत.

पलंग आणि देव्हारा यातील भिंतीलगत आता गट्टूचा पाळणा होता. तेथे झुंबड असायची! समोरच्या भिंतीपाशी खाली बसून पवार मावशी समोर जो दिसेल त्याला आत्महत्या करावीशी वाटेल असे उद्गार चोवीस तास ऐकवायच्या! त्या भिंतीलगत त्या एकट्याच बसायच्या! स्वयंपाकघर आणि देव्हारा यातील भिंतीलगत समीर, राजश्री आणि त्या वयोगटातून नुकतेच पुढे गेलेली काही दिव्य कार्टी स्वयंपाकघराकडे आणि मावशींकडे आशाळभून नजरेने बघत मधून मधून देव्हार्‍यातील देवांची संख्या अचूकपणे मोजायचा प्रयत्न करायची.

अत्यंत जहाल उद्गार काढत काढत मावशी येईल त्याला काही ना काही खायला द्यायच्या. मोठा माणूस आला तर त्याला शिव्या देतच का होईना पण चहा टाकायच्या. तो माणूस शिव्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून चहा प्यायचा आणि गट्टूशीचार शब्द बोलून निघून जायचा. सकाळी सात वाजताच समीर आणि राजश्री यांचे स्थलांतर पवार मावशींकडे केले जायचे. त्यानंतर नुसती रीघ लागायची. सायंकाळी सहा ते साडे आठ हा वेळ सर्व बालगोपाळ हे फक्त चितळे आजोबांच्या आजूबाजूला बसून मोठमोठ्या कथा ऐकायचे. कधी इसापनीती, कधी शिवाजी महाराज, कधी वासुदेव बळवंत फडके तर कधी कोण्या शास्त्रज्ञाची कथा! मग चितळे आजोबा त्यांचे बोलणे शांतपणे ऐकल्याच्या आनंदात श्रीखंडाच्या गोळ्यांचे वाटप करायचे. त्यानंतर शुभंकरोती आणि पाढे व्हायचे. त्यामुळे अचानक दास्ताने वाड्याच्या दृष्टीने पवार मावशी या अत्यंत महान त्यागी स्त्री व चितळे आजोबा हे अत्यंत महान शिक्षक ठरलेले होते. जो येईल तो आपल्या मुलाला या फुकटच्या संस्कार वर्गाला घालायचा. या कालावधीत प्रमिला, निगडे काकू किंवा स्वतः श्री तिथे बसून गट्टूकडे बघायचे. श्री सकाळि आठ वाजता ऑफीसला जायचा तो सायंकाळी सहाला परत यायचा. सहा ते दहा तो तिथेच थांबायचा. पवार मावशींचे तोंड अव्याहत चालू असायचे. पण ती एक सतत घडणारी घटना असल्याने 'ती होणारच' या पलीकडे कुणी लक्षच द्यायचे नाही त्यांच्याकडे! त्या अजूनही श्रीनिवासलाही वाट्टेल ते बोलायच्या. दहा वाजता श्री आपल्या खोलीत येऊन दार उघडेच ठेवून झोपायचा. उषा ताई आता आईजवळच राहणार होती कारण गट्टूची काही काळजीच नव्हती. तारा आता तिच्या लग्नाच्या गडबडीत होती. आणि..

गट्टू उर्फ महेश श्रीनिवास पेंढारकर हे आता मावशींकडे स्थिरावलेले होते..

चितळे आजोबा - तर बर का मुलांनो.. हा असा हाकलून दिला नापास झालेल्या न्युटनला त्याच्या मास्तरांनी.. बिचारा चिमुरडा न्युटन... करणार काय त्या वयात? तुमच्यासारखा थोडीच खेळायचा दास्ताने वाड्यात??

वामन - आजोबा, न्युटन कोणत्या वाड्यात होता?

आजोबा - (आवंढा गिळून) सर आयझॅक वाडा.. तिकडे परदेशात..

चिमणी - पचका.. आजोबा हा म्हणतो न्युटन फळं डोक्यावर पडतात म्हणून झाडावर राहायचा..

आजोबा - अरे छ्यॅट.. तर ऐका पुढे... शाळेतून हिरमुसलेला न्युटन बाहेर पडला अत्यंत जड पावलांनी.. अन समोर बघतो तर काय??

संजय - (उभा राहून तलवार काढण्याची अ‍ॅक्शन करत ) समोर शाहिस्तेखान..

चितळे - शाहिस्तेखान? शाहिस्तेखान कुठनं आला??

चिमणी - पचका.. पचका.. पचका.. पचका..

चितळे - समोर चक्क एक सफरचंदाचे झाड..

पवार मावशी - त्यात काय चक्क! आं?? त्यात काय चक्क? सफरचंदाचे झाड म्हणजे आठ वर्षाचा मुंजा आहे का शनिपाराशी भर दुपारी दिसायला..

चितळे - ताई.. तुम्ही फक्त बाळाला सांभाळा.. गोष्ट मी सांगतो..

चिमणी - मुंजा म्हणजे काय?

चितळे - मुंजा म्हणजे मुंज लागल्यावर लग्न व्हायच्या आधी जो मुलगा मरून भूत बनतो त्याला मुंजा असे म्हणतात..

चिमणी - तुमची झालीय मुंज?

पवार मावशी - न होईल तर काय? दहा मुंजी लागल्या असतील.. तेव्हा कुठे जरा मोह कमी झाला असेल..

संजय - कसला मोह??

गणेश - मुंजा बनण्याचा..

चितळे - अरे काय बोलता काय? गप्प बसा जरा.. ताई.. तुम्ही वाट्टेल ते बोलताय मुलांसमोर..

पवार मावशी - आले माझ्या घरात अन माझीच काढली वरात? चल.. ऊठ.. ए उठा..

त्या आविर्भावामुळे सगळे जण दचकून बाहेर येऊन दाराबाहेरच कॉमन कॉरिडॉरमधे बसतात.

चितळे - तर.. समोर चक्क सफरचंदाचे झाड..

चिमणी - अय्या हो??

चितळे - हो! पण न्युटन अय्या नाही म्हणाला...

संजय - चिमणी अय्या म्हणाली..

चितळे - चिमणी नव्हतीच तेव्हा..

गणेश - तुम्ही होतात?

चितळे - होय.. मी त्याला म्हणालो नाराज होऊ नकोस बाळ न्युटन.. तू मोठा संशोधक होणार आहेस..

नितीन - तुम्हाला कसे माहीत?

वैशाली - गप रे.. ऐकूदेत ना जरा..

चितळे - मी म्हंटलं निरीक्षण शक्ती वाढव... आजूबाजूला जरा लक्ष दे.. बघ.. बघ समोर काय आहे..

संजय - मग?

चितळे - तर म्हणे आकाश.. मी त्याची वर वळलेली मान खाली करून त्याला समोर बघायला लावले.. म्हंटले बघ.. समोर काय आहे??

चिमणी - आकाश..

चितळे - आता आकाश गेले होते वर.. आता समोर होते एक सफरचंदाचे झाड..

गणेश - अ‍ॅन अ‍ॅप्पल अ डे.. कीप्स डॉक्टर अवे..

वैशाली - माहित्ताय इंग्लिश मिडियमला आहात.. इथे नका भाव खाऊ..

चितळे - न्युटन म्हणतो कसा?? हे तर साधे सफरचंदाचे झाड..

समीर - खीक खीक खीक खीक..

चितळे - काय झाले?

समीर - गट्टूला शू झाली.. पवार आजींनी उचलल्यावर..

चितळे - शू झाली तरी बेहत्त.. आपले.. शाळेतून काढले तरी बेहत्तर.. सांग... ते सफरचंद पाडले की खालीच का पडते??

गणेश - मग कुठे पडणार??

चितळे - हेच.. अगदी हेच न्युटनने मला विचारले..

किरण - मंग?

चितळे - मंग नाही म्हणायचे.. मग म्हणायचे मग

किरण - मग?

चितळे - मग मी बाणेदारपणे म्हणालो..

संजय - ही भुईमुगाची साले मी टाकलेली नाहीत आणि त्यामुळे मी ती उचलणार नाही..

चितळे - अरे न्युटनच चाललंय.. लोकमान्यांचं नाही..

चिमणी - पचका पचका पचका..

चितळे - हवे तितके वर फेकून बघ ते सफरचंद.. पण ते खालीच येईल पुन्हा.. या धरित्रीकडे..

वैशाली - मग त्याचं काय म्हणणं होतं..

चितळे - तो काय म्हणणार माझ्यापुढे?? बसला फेकत ते आभाळात दमेस्तोवर.. मग मी म्हणालो.. सांग.. खालीच का पडते सफरचंद??

संजय - पण ते खाल्लं की नाही शेवटी??

चितळे - थांब जरा.. तर न्युटन म्हणाला.. नक्कीच काहीतरी भुताटकी दिसतीय

वैशाली - मग? गुरुत्वाकर्षण नाहीच शोधलं का शेवटी?

चितळे - शोधलं तर?? मी असा सोडेन थोडाच त्याला??

चिमणी - पचका.. पचका.. पचका..

चितळे - मी म्हणालो भुताटकी नव्हे.. पृथ्वी आपल्यावरील सर्व गोष्टींना जवळ खेचते.. याला गुरुत्वाकर्षण म्हणतात .. उडी मारून पाहा... आपण वर उडू शकत नाही.. लगेच खाली येतो जमीनीवर...

एकच धुमाकूळ झाला. सगळे दाणदाण आवाज पवार मावशींना ऐकू गेल्यावर त्या संतापून दारात आल्या..

मावशी - ब्बाआआस.. ब्बाआआस झाल्या गोष्टी.. हे शिकवणार गुरुत्वाकर्षण अन दास्ताने वाड्याचे जमीनीशी घर्षण.. चल्ल.. चल्ल उठ ग ए चिमणीचे.. ए किरण.. आशेचा किरण दाखव जरा आईबापांना.. चितळे.. उद्या सांगायची बाकीची गोष्ट.. म्हणे न्युटन... तुमचे पणजोबा गेलेवतेका परदेशात तुम्ही त्याला सफरचंद दाखवायला.. हे ढापणार संशोधन अन कार्टी देणार अनुमोदन.. चल्ल उठ.. ए प्रमिलडे.. मोठी अबोली माळतीय एवड्याश्या वेणीत.. हा समीर काढणार माझ्याकडे दिवस.. अन यांचा विचार चालणार दुसर्‍या बाळाचा.. आला माझा मधूसूदन.. सुरू आता अमुचे कूजन.. पवार मावशी आहेतच पुढचे बघायला.. हे झोपणार दुपारी.. रात्री कातरणार सुपारी.. नऊवारी नेसता येत नाही अन ठुमकतीय..

एवढे बोलणे होईपर्यंत बिचारी प्रमिलडी वर पोचून समीरला उचलून नेऊही लागलेली होती. जरा दिसायला वाड्यात सगळ्यात तीच बरी असल्याने तिच्यावर तर भयंकरच राग होता पवार मावशींचा!

भयानक सन्नाटा पसरलेला असतानाच माने नावाचे एक पन्नाशीचे गृहस्थ आले. हे वाड्यातलेच होते. पण गेले चार महिने ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे इस्लामपूरला राहात होते. कारण तिथे काहीतरी शेतीची भानगड झालेली होती. ते सामानासकट प्रवेशल्यावर मात्र दास्ताने वाड्याला अक्षरशः घाम फुटला. पवार मावशींना टफ देऊ शकणारी ती एकमेव व्यक्ती होती! माने काका! आणि ते राहायचेही बरोबर समोरच्याच खोलीत मावशींच्या! आजवर या दोघांनी केलेला एकत्रित आवाज हा पुण्यातील अनंतचतुर्दशीच्या मिरवणूकीतही झालेला नव्हता. अविवाहीत होते माने काका! सत्तत भांडायचे! इस्टेट, शेती, पैसे, दागिने हे त्यांचे आवडीचे विषय! दुसरा कसा नालायक असूनही श्रीमंत आहे हे सांगण्यात त्यांचे दोन दोन तास जाऊ शकायचे. त्यांचे अन पवार मावशींचे पटणे शक्यच नव्हते. मात्र दोघेही एकमेकांना मात्र वचकून होते. माने अजिबात कंजुष नव्हते. मात्र इस्लामपूरला असलेल्या आपल्या सख्ख्या मोठ्या भावाने आपल्याला कपर्दीक मिळू दिली नाही हे त्यांच्या उरलेल्या जगण्याचे एकमेव कारण होते. त्या भावाचे कुटुंब आपल्या शापाने नेस्तनाबूत झालेले बघणे या एकाच मोटिव्हने ते जगत होते. त्यांना आलेले पाहून मात्र मावशी गेल्या चार महिन्यात संतापलेल्या नव्हत्या इतक्या संतापल्या.

मावशी - आला.. आला हमणढोळ.. मुडदा पाडून आला भावाचा.. आता समोर थयाथया नाचेल वाड्यात.. सामान बघा सामान.. नारळ आणलेत नारळ.. डोळ्यात हजार पिढ्यांची भिकारीगिरी नाचतीय बघा त्याच्या.. आला वाड्यात सापासारखा सरपटायला.. अजगर आहे अजगर... साप कसला?? बसेल आता खोलीत चार महिने.. ढिम्म.. माझं नशीब फुटकं.. उजाडत्या सूर्याचे दर्शन घ्यावे म्हंटले की यांच तुळतुळीत टक्कल आधी दिसणार.. हाकललेला दिसतोय भावानी.. कोण ठेवणार ही ब्याद घरात.. तोंड आहे का कर्णा.. आईला नव्हता वेळ अन बापाला सुचला खेळ.. .. अमावास्येचाय हा अमावास्येचा.. टिटव्या कर्कश्श ओरडल्या हे पधारले तेव्हा.. घुबडांनी रिंगण धरलवतं.. कावळे केविलवाणे झाले होते तेव्हा.. आले दास्ताने वाड्यात..

येथपर्यंत मानेकाकांनी सामान खाली ठेवून नळाचे पाणी पिऊन वर बघितले होते.. आता ते सुरू झाले..

माने - ए हडळ.. तिन्हीसांजेची अभद्र थयथयाट करू नकोस.. काय हो चितळे.. कानाखाली आवाज काढा तिथे तिच्या.. बघता काय?? माझा भाऊ काय हाकलेल मला?? माझ्या बापाचं घर आहे ते.. जनावराच्या चार्‍याचाही अर्धा वाटा करून आलोय मी.. दोन करडं झालीवती त्यातलं एक घातलंय गाडीत.. उद्या पोचेल वाड्यात.. इथे बांधणार आहे ते इथे... तुझ्या नाकासमोर... आता आरसा बघायची गरज नाही तुला.. आणलीय भन तुझी.. मी तिथे असताना मी आणलेल्या चार कोंबड्या होत्या.. आता सोळा आहेत... प्रो रेटा बेसिसवर अकरा उचलल्या मी आणि घातल्या गाडीत.. उद्या पोचेल गाडी इथे.. तुझ्या घरासमोरच दाणे टाकणार आहे त्यांना... अन त्यातला एक दाणा जरी तू चोरलास तर याद राख.. भूत बनेन भूत अन दारात बसीन तुझ्या.. ए प्रमिला.. काय हसतेस?? तुझ्या लग्नात सव्वा पाच आहेर केलावता मी.. चहा टाक..

दास्ताने वाड्यात कुणाचाही कुणावरही काहीही हक्क असू शकायचा अन तो दुसर्‍या व्यक्तीला मान्यही असायचा. मानेंनी मधूसूदन समोर प्रमिलाला जोरात चहा टाक म्हणणे यात मधूसूदनला लक्षही घालावेसे वाटत नव्हते.

तेवढ्यात आत गेलेल्या मावशींनी गट्टूला उचलून बाहेर आणले. तो किंचित रडत असल्यामुळे त्या त्याला जोजवत राहिल्या उभ्या उभ्याच.. माने ओलावलेल्या आवाजात म्हणाले..

माने - त्या श्रीनिवासचा ना हां.. पवार मावशी.. तेवढं मात्र वाईट झालं हो.. रमा.. रमा नको होती जायला..

ज्यांना या वाक्याचा अर्थ कळू शकत होता.. म्हणजे वय वर्षे दहाच्या पुढचे.. त्या सगळ्यांच्याच डोळ्यातून एक तरी थेंब आलाच... अगदी मावशींच्याही..

मधूसूदन मानेकाकांची एक बॅग घेऊन वर त्यांची खोली उघडायला जाऊ लागला. किल्ली त्याच्याचकडे ठेवलेली होती.

माने - मध्या.. ती बॅग कसली वर नेतोस.. अरे या पवार मावशीला लाजलज्जा नसली तरी मला आहे.. काय काय आणलंय सगळ्यांसाठी ते तरी बघ.. ते सगळं त्याच बॅगेत आहे...

प्रमिलाने आधण टाकायच्या आत बॅग उघडली गेली आणि सगळ्या पोरांनी एकच गलका केला.

गोळ्या काय, कॅडबरीज काय, चॉकलेट्स काय, टोप्या काय, पट्टे काय, पेनं काय.. पोरं नुसती नाचायला लागली. मला हे आणलं, तुला ते आणलं करू लागली..

मानेकाकांनी चहा घेता घेता चितळे मास्तरांना एक खाकी कापड भेट दिलं! घाटे कुटुंबियांना काही ना काही आणलंच होतं! प्रमिला आत्तापर्यंत जराशी हिरमुसली होती. तेवढ्यात मानेकाकांनी मधूसूदनला एक कापड दिलं! समीरला खाऊ आधीच मिळाला होता. मधूला दिलेले कापड पाहून प्रमिला जरा कुठे खुलतीय तोच मानेकाकांनी तिला खास इस्लामपूरच्या एका साधे दागिनेवाल्याने हाताने बनवलेले खोटे गळ्यातले दिले. मग मात्र ती खूपच खुष झाली. तेवढ्यात कुठेतरी गेलेला श्रीनिवास आला. त्याने मानेकाकांना नमस्कार करेपर्यंत्र मानेकाकांनी त्याला जवळ घेतलं! दोघेही रडले. श्रीनिवास वर आपल्या मुलाला बघायलाही गेला नव्हता. रडण्याचा आवेग संपल्यानंतर मानेकाका म्हणाले..

माने - श्री.. तुला काही आणणे योग्य ठरले नसते अशा परिस्थितीत.. पण.. रमाला आवडायचा म्हणून.. निळ्या रंगाचा एक शर्ट तेवढा आणलाय मी.. रमाचीच आठवण म्हणून घाल हो..

सगळेच गंभीर झाले होते..

माने - फार लाघवी होती रे ती.. सगळ्या वाड्याला आवडायची.. मला म्हातार्‍याला तरी न्यायचं देवाने... एवढंस मूल ते.. ओ मावशी.. खाली तरी आणा की बाळाला.. त्याला दुपटी आणलीयत अर्धा डझन... बघू तरी देत कसा दिसतो आमचा नातू..

मावशी खिन्न पावलांनी खाली उतरल्या.. काहीही न बोलता श्रीनिवासच्या हातात त्याचे बाळ देऊन मागे फिरल्या.. मानेंनी बाळाचे कौतूक चालू केले.. सगळेच बाळाकडे बघत होते.. मात्र.. पवार मावशी वर जाऊन आपल्या घराचे दार आतून लावून घेणार त्या आधीच माने काका गरजले..

माने - का ग ए दुर्मुखी.. तुला पात्तळ आणलं नसेल का मी?? आं?? एवढसं तोंड करून आत जातेस ती?? लाज नाही वाटत?? धाकटी बहीण आहेस ना???

पवार मावशी पुन्हा मागे फिरून अन डोळ्यात न खळणारं पाणी घेऊन वेगात जिन्याच्या पायर्‍या उतरत असताना वाड्यातील लहान मुले सोडून एक आणि एक माणूस गलबलून रडत होता..

गुलमोहर: 

बेफिकिर,
आता काय रोजच रडवायचं ठरवलात का?
असं असेल तर मी नाय वाचत ब्वा....... ( हापिसात)

शेजारचे विचित्र नजरेनी बघतायेत माझ्याकडे.

काय हे बेफिकिरजी हसवताही आणि रडवताही...

<<उजाडत्या सूर्याचे दर्शन घ्यावे म्हंटले की यांच तुळतुळीत टक्कल आधी दिसणार..>> Lol

सर्वांचे मनापासून आभार!

मधुकरराव, आपण लक्षात आणून दिलेला बदल केलेला आहे. खरच आभारी आहे. कृपया लक्ष ठेवावेत. मी लिहिताना एखादा संदर्भ चुकीचा लिहितो.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

काय हे बेफिकिरजी हसवताही आणि रडवताही...>> हे बेफिकीरजींनाच एवढ्या कुशलतेनं जमु शकतं Happy

पवार मावशींची प्रत्येक म्हण, यमके अगदी जबरदस्त !! Rofl आता माने काकांमुळे अजुन मजा येईल Happy

befikir,

ajun thodi Jugalbandi hoyla pahije hoti, evade mothe don khande player aahet manlyawar(mane kaka ani pawar mavashi).

tumhi great lihile aahe, sagale agdi dolya samor ghadtay ase watate.

ani kharach hooooo, office wale chitra vichtra najare ne pahatat aaj kal(manje Solapur *** suru jhalya pasun)

Happy

आता काय रोजच रडवायचं ठरवलात का?
असं असेल तर मी नाय वाचत ब्वा....... ( हापिसात)

शेजारचे विचित्र नजरेनी बघतायेत माझ्याकडे.
>> अगदी अगदी... हापसातल्या शेजारच्या डेस्कावरची विचारतेय मला जिजूंची आठवण येतेय का गं... (म्हणजे माझ्या नवर्‍याची)

आज खरंच खुप रडायला आलं... ही पण कथा मनात घर करून राहणार... लिहीत राहा बेफिकीर... पु.ले.शु...

रडणं हे आपण जिवंत असल्याचं लक्षण आहे........ आजूबाजूच्या धबडग्यात कुंठित होऊन आपल्यातलं मानवत्व अशा ''बेफिकिर'' मुळे जिवंत रहतं..... पुलेशु.

डॉ.कैलास

खरंच...केवढी हसले आणि शेवटी रडले ही... 'अप्रतिम' पे़क्षा वरच्या दर्जाचा काही शब्द असेल तर मला सांगा... तुमच्या शैलीचे कौतुक करतांना शब्द कमी पडतायत... चितळे आजोबांमधे मला दिलिप प्रभावळकर, आणि मानेंमधे किशोर कदम दिसतो आहे... कोणीतरी प्लिज सिनेमा नाहीतर सिरियल काढा हो ह्या बेफिकीरांच्या कादंबर्‍यांवर!!! त्या एकता कपूरने मराठीमधे येऊन सगळा मराठीचा सत्यानाश चालवला आहे...एवढे दर्जेदार साहित्य रोज मराठीत फुलत असतांना टिव्हीवर मात्र मराठी चॅनेल्सवर हिंदी सिनेमांची खिचडी असलेल्या मालिका पाहाव्या लागत आहेत हे केवढं दूर्दैव आपलं.....

आता आरसा बघायची गरज नाही तुला.. आणलीय भन तुझी....हेहेहेह्हे :)......पण रडवत जाउ नका ना......डोळे पुसायचे पण सुचत नाही...की बोर्ड भिजला हो माझा!

आजवर या दोघांनी केलेला एकत्रित आवाज हा पुण्यातील अनंतचतुर्दशीच्या मिरवणूकीतही झालेला नव्हता. Rofl

पवार मावशी रॉक्स.... Proud