श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग २

Submitted by बेफ़िकीर on 19 June, 2010 - 06:12

रमासारखी गरीब अन गोड स्वभावाची बाई धक्कादायक पद्धतीने निवर्तल्याची बातमी वाड्यात पोचली अन दास्ताने वाडा शोकात बुडाला. पवार मावशी पहिल्यांदा दार आतून लावून ज्या आत जाऊन बसल्या त्या तब्बल तीन दिवसांनी बाहेर आल्या तेही श्रीनिवास कधी येणार याबद्दल लोक काही चर्चा करत आहेत की नाही हे समजून घ्यायला. कारण त्यांच्याशी बोलणार कुणीच नव्हते. त्यांना फक्त इतरांच्या बोलण्यातून समजून घ्यावे लागणार होते. आणि समजले. श्रीनिवास तेरावा वगैरे करून मगच येणार आहे.

ते दहा बारा दिवस जरी नेहमीप्रमाणेच दिनचर्येचे गेले असले तरी प्रत्येक जण वाट पाहात होता की कधी श्रीनिवास येतो आणि आपण कधी त्याला भेटतो. वाड्यातील चितळे आणि निगडे हे दोघे औरंगाबादला जाऊनही आले होते. त्यांनी सांगीतलेल्या वृत्तांताने सगळ्याचजणांच्या डोळ्यात पाणी आले. रमाची आई आणि धाकटी बहीण आक्रोश करत होत्या. श्रीनिवासची आई आणि बहीण तातडीने पोचल्या आणि त्याही विलाप करू लागल्या. श्रीनिवासच्या डोळ्यांचे पाणी थांबत नव्हते. त्यातच मुलाकडे पाहावे लागत होते. औरंगाबादच्या त्यांच्या सगळ्या शेजार्‍यांनी खूप सांत्वन केले होते.

किर्लोस्कर कंपनीतील देशमाने तर बातमी कळल्यावर श्रीनिवासच्या बरोबरच औरंगाबादला तसेच गेले होते. नंतरही कोपरकर आणि स्वाती जाऊन आले.

आणि बारा दिवसांनी आपली सख्खी बहीण उषा आणि मेहुणी तारा यांना घेऊन आपल्या बाळासकट श्रीनिवासने जेव्हा वाड्यात प्रवेश केला तेव्हा दास्ताने वाड्यात सर्वत्र सुतकी कळा पसरली. मुलाचा ताबा ताबडतोब प्रमिलाने घेतला. माझ्या समीर बरोबर याचेही सगळे बघेन असे आश्वासन तिने तिथेच सगळ्यांच्या समोर दिले.

घाटेंनी श्रीनिवासच्या पाठ्वरून हात फिरवला. निगडेंनी सगळ्यांना चहा करून आणला. वय वर्षे दोन ते वय वर्षे नव्वद या वयोगटातील वाड्यातील प्रत्येक माणूस दु:खी चेहरा करून अवतीभवती उभा होता. उषाताई आणि तारा दोघीही रडत होत्या. श्रीनिवास त्या दोघींना घेऊन आपल्या घरात गेला तसे सगळे आपापल्या घरी गेले आणि पुन्हा हळूहळू भेटायला यायला लागले. वाड्याबाहेर असलेल्या वाण्याने न सांगताच सामान आणून दिले. भाजीवालीने भाजी आणून दिली. कुणीतरी घरातले पाणी भरून ठेवले.

संध्याकाळी पुण्यातील बाकीचे ओळखीचे आणि लांबचे नातेवाईक येऊन गेले. कंपनीतील चिटणीसांबरोबरच सप्रेसाहेबही येऊन गेले. सप्रेंनी कामाची काळजी करू नका, मुलगा चांगला दोन महिन्याचा होईस्तोवर घरी थांबलात तरी चालेल असे सांगीतले.

'महेश श्रीनिवास पेंढारकर'

पंधरा दिवसाच्या या बालकाचे कोणत्याही समारंभाशिवाय नामकरण झाले दुसर्‍या दिवशी! श्रीनिवास मात्र त्याला लाडाने गट्टू म्हणू लागला. ज्याला जे हवे ते त्याने नाव ठेवले. कुणी पिल्लू, कुणी बाळ, कुणी चिंगू.. वगैरे वगैरे!

दास्ताने वाडा वजा रमा या समीकरणात गट्टूने केवळ तीनच दिवसात महत्वाचा बदल घडवला.

दास्ताने वाडा वजा रमा अधिक गट्टू!

रमासारखाच गोरापान, भरपूर जावळ असलेला आणि वजनाने जन्मतःच आठ पौंड असलेला गट्टू दास्ताने वाड्याचा जीव की प्राण झाला. लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच श्रीनिवासच्या घराचे दार रात्रभर उघडे राहायला लागले. निगडेकाकू, ज्या पन्नास वर्षांच्या होत्या आणि ज्यांची स्वतःची आठ बाळंतपणे झालेली होती त्यांच्या निगराणीत नवी नवीच आई बनलेली प्रमिला जणू काही तिथेच राहून गट्टूकडे बघत होती. समीर या दोन वर्षाच्या मुलाला आता एक नवीन भाऊ आणि जणू एक मन रमवायचा उपायच मिळालेला होता. उषाताई आणि तारा यांना खरे तर बाळाला सांभाळण्यासाठी श्रीनिवासने आणलेले होते. पण त्यांना त्याला मुळी हातात घ्यायचीच संधी मिळत नव्हती. त्यामुळे त्या रुसत होत्या.

गट्टूच्या औषधपाण्याची काळजी उषाताई आणि घाटेंच्या पत्नी बघत होत्या. तारा घरातील सारे काम बघत होती. चितळे आजोबांनी एका केमिस्टला सांगून 'यांना हवे ते द्यायचे आणि आत्ता पैसे मागायचे नाहीत, पुढे बघू' असे सांग्न ठेवले होते. तोही आर्.एस्.एस्.चा असल्यामुळे त्याने एक प्रश्नही विचारला नव्हता.

रमाचा फोटो भिंतीवर लावताना मात्र श्रीनिवास कधी नव्हे इतका रडला. इतका रडला की उषाताई आणि तारालाच त्याची समजूत काढावी लागली.

चिमण्या जीवाला मांडीवर घेऊन खेळवताना श्रीनिवासचा वेळ झर्रकन जायचा.

समीरचा पाळणा आता गट्टूला मिळाला होता. दिवसातून वीस तास मधून मधून रडवणारी झोप आणि उरलेल्या चार तासात साधारण पाच वेळा रडणे व एरवी डोळे उघडण्याचा प्रयत्न करून दास्ताने वाड्याचा अंदाज घेणे अशी राजेशाही दिनचर्या होती गट्टूची! चिमणाळी भेट मिळाली होती. झबली भेट मिळाली होती. दोन स्वेटरही आले होते. दुपटी आलेली होती. रमा नसणे हे फार मोठे दु:ख गट्टू पेलण्यासारखे दु:ख करून दाखवत होता. श्रीनिवास बाळाकडे अद्भुत नजरेने पाहायचा.

श्री - कसा दिसतो नाही हा?
उषाताई - रमावर गेलाय, मातृमुखी आहे
श्री - नाक? नाक जरा..
उषा - नाक तुझ्यावर गेलंय.. किंचित वाकडं..
श्री - काय ताई.. अजून थट्टा करतेस तू माझी..
उषा - बहिणीला लहान भाऊ लहानच राहतो..

प्रमिलाचा समीर आणि त्याच्याहून एक वर्षांनी लहान असलेली बेरी कुटुंबियांची मुलगी राजश्री उर्फ राजू या दोघांचा बराचसा मुक्काम आता पेंढारकरांकडेच असायचा. खरोखरच घराचे पाळणाघर व्हायची वेळ आली होती. वय वर्षे एक पासून वय वर्षे नऊ पर्यंतची सगळी मुले अन मुली दिवसातून किमान पाच वेळा तरी बाळ बघून जायची. समीर आणि राजू तिथेच पडीक असायचे. पेंढारकर पाळणाघर! येथे आई नसल्यामुळे सगळ्याच बायका आया आहेत. खुशाल आपली मुले इथे ठेवा! पाळणाघर!

एवढे होऊन पवार मावशी का गुप्त आहेत हे महिना होत आला तरी श्रीनिवासला समजत नव्हते. एक महिना ही बाई दिवसातून फक्त गंगीच्या येण्याजाण्यापुरते दार उघडून राहू कशी शकते? हा रेडिओ थांबला की काय कायमचा??

एक महिना! तो एक महिना श्रीनिवासला रमाच्या जाण्याचे दु:ख व्यक्त करायची संधीसुद्धा मिळत नव्हती. प्रत्येक क्षणी गट्टूला पाहिले की असे वाटायचे की रमा आहेच, ती गेलेलीच नाहीये! तारा मात्र तिच्या फोटोकडे बघून डोळ्यात पाणी आणायची! अजूनही नातेवाईक, ओळखीचे आणि कंपनीतले सतत येऊन जात होते. आता मात्र ती फ्रिक्वेन्सी जरा जरा कमी व्हायला लागली होती.

आणि एक दिवस ताराला स्थळ आल्याचा फोन आला. तिला औरंगाबादला जाणे भाग होते. श्रीनिवासने तिला रिक्षेत बसवून देताना तारा घळाघळा रडली होती. आपले लग्न झाले तर गट्टूकडे, ताईच्या मुलाकडे कोण पाहणार हा तिचा सालस प्रश्न होता. काय एकेक दिवस दाखवते दैवही! रमा गेली आणि जाताना हा गोंडस मुलगा ठेवून गेली.

उषाताई एकट्या पडल्याच नाहीत. प्रमिला आता गट्टूला घेऊन आपल्या घरी जाऊ लागली. दोन दोन तास तो तिच्याकडे राहायचा. प्रमिलाचा पती मधूसुदन कर्वे हा बँकेत होता. तो घरी आला की गट्टूला ती सोडायला निघाली की उलट तोच जाऊ द्यायचा नाही. तो काही वेळ गट्टूशी खेळून मगच गट्टूला सोडायचा.

आता चितळे आजोबा दिवसातून संध्याकाळचे एकेक तास श्रीनिवासच्या घरी येऊ लागले. कारण सगळी लहान मुले तिथेच भेटायची. मग ते प्रत्येकाला दोन दोन श्रीखंडाच्या गोळ्या द्यायचे. आजोबा कधी येणार हा त्यातील काही मुलांचा वयाप्रमाणे सुलभ असा एकमेव प्रश्न असायचा.

एक मात्र झाले, चितळे आजोबा आता येऊन बसूच लागल्यामुळे आणि सगळी मुले त्यांच्याभोवती बसू लागल्यामुळे श्रीनिवासच्या घरातील आवाज फारच वाढला आणि इतरांच्या घरातील आणि दास्ताने वाड्याच्या आतल्या कॉमन चौकातील आवाज घटला. ही घटना अनेक घरांना सुखद वाटली. पण...

पण पवार मावशी? त्यांना कशी काय सुखद वाटेल??

असाच एक दिवस संध्याकाळी साडे सात वाजता श्रीनिवासच्या घरी अभूतपुर्व दंगा चाललेला असताना पवार मावशींचे दार खाडकन उघडले अन त्या श्रीनिवासच्या दारात येऊन कडाडल्या..

मावशी - अरे मंडई वाटली का मंडई?? आं? एक नंगा म्हातारा अन सत्शीलतेचा पोबारा??? उधाण आलंय का अंगात आलंय इथे सगळ्यांच्या?? आं? आई बापांना अक्कल नाही म्हणून आपल्याला नसलीच पाहिजे का काय? मेंढरं अन गुरं बरी असले ओरडतायत! पातेली पडली फडताळावरची माझ्या! का तेच हव होतं तुम्हाला ?? मावशीने शेवटचा श्वास घेतला की मोकळे नंगे नाचायला! फाशीच्या कैद्याची शिक्षा बदलून जन्मठेप जाहीर झाली तरी तो इतका नाचणार नाही. खायला काय घोड्याचा हरभरा घालतात का रोज आया? या सोडणार माझ्याशेजारी पोरे अन नटायला मोकळ्या! काय रे ए म्हातार्‍या? तुला तुझ्या घरी ही दिवटी नाही का चालत आलेली?? आं? यांचे घर स्वच्छ अन आम्हाला लेखतात तुच्छ! का ग ए उषे का निषे! उषाताई, उषाताई म्हणून मिरवतीयस ती कधीची?? आली आपली कर्‍हाडहून इथे! पुणं म्हणजे दिल्लीय का हवी तेव्हा लुटायला? आं?? का तू अब्दालीकडची लागतेस?? नादिरशहा होता तुझा आजा?? सोडलं कर्‍हाड अन मिळालं घबाड! त्या प्रमिलडीला तर घर दार काही नाहीच्चे! आला माझा श्रीनिवास अन मुरका मारून हास! इथेच मुरड अन नट म्हणाव आता! त्या निगडेची बायको आपलंच नववं बाळंतपण झाल्यासारखी उंडारतीय इथे! मुलं नाही मोजली अन उगाचच लाजली! ही दोन घरांची समान भिंत आहे. इकडून जी तुला वाटते ना ही पेंढ्या, तिकडून ती माझीय! या भिंतीवर तुझ्या मिशीचा केस पडला तरी आगीचा बंब आणीन मी! खराखुरा पेंढा भरीन मी अंगात! मग लाव नाव पेंढारकर! काय आवाज आहे का काय आहे? रॉकेट सुटलं तरी शांत वाटतं! आं? घर आहे का कलकत्याचा कत्तलखाना? कोयनेचा भूकंप बरा! माणसं मेली तरी! इथे नुसतीच तडफडतायत! ए चितळे.. उद्यापासून लुंगी नेसून येत जा इथे.. बाया बापड्या असतात! मोतीबागेतला कॅब्रे इथे करायचा नाही. शेजारी एकटी बाई राहते म्हणून वाटेल तसा बसतोस इथे?? रामरक्षा तरी शिकवलीस का इतके दिवस ही मुलं येतायत तर?? ए पेंढ्या, तुझ्या कंपनीतल्या लोकांना सांग दास्ताने वाडा म्हणजे पाणपोई नाही. कोणीही केव्हाही येतो. माझं घर आहे शेजारी.. खबरदार पुन्हा आवाज झाला तर..

सुनसान शांतता निर्माण झाली होती. एकटी उषाताई अवाक झालेली होती. मात्र दास्ताने वाड्याच्या भिंतींनाही आज खूप खूप बरे वाटले होते. रमा गेल्याच्या दु:खावर पवार मावशी शांत होणे हा आणखीन एक दु:खद धक्का होता. आता कसे मस्त वाटत होते. चैतन्य सळसळले होते. आणि...

... पवार मावशी आपली भयानक धमकी संपवून वळणार तोच..

गेल्या महिन्यात जो प्रकार झालेला कुणी पाहिला नव्हता तो प्रकार झाला..

केवळ दिड महिन्याचे वय असलेल्या गट्टू यांनी पहिल्यांदाच मुखातून 'ही' असा उद्गार मोठ्यांदा काढून 'मला हसता येते' हे सिद्ध केले....

आणि ते पाहून पुन्हा पवार मावशींनी जे दार लावले ते पंधरा दिवसांसाठीच....

कारण गट्टूचे ते हसणे बघून उषाताई, श्रीनिवास आणि चितळे आजोबाच काय, एक वर्षाची राजश्रीसुद्धा खदाखदा हसली होती...

दोन दिवसांनी समजले की तारा पसंत पडली त्या स्थळाला! काय दिवस होते ते! १९७० नंतरचा काळ तो! मुली दाखवायच्या कसल्या? त्या काय वस्तू आहेत? गाणे म्हणून दाखव, चालून दाखव, दहा जणांच्या घरात आनंदाने राहील ना मुलगी? शिकलीय कुठपर्यंत? आमच्या घरात देवाचं फार आहे. आणि थेरं चालत नाहीत पिक्चर वगैरे! साधा रेडिओ नाही ठेवलेला आम्ही! आमचा मुलगा देखणा, रुबाबदार आणि तुमच्यासारख्यांच्या कुटुंबाची अतोनात दया येऊन तुमच्या मुलीशी लग्न करायला तयार झालेला आहे. आमची दिडशे पाने आणि रिसेप्शनला अडीचशे! आमच्याकडच्या बारा जणांचे मानपान तुम्ही करायचेत!

अरे अरे अरे! हा काय बाजार आहे? नालायकपणा आहे झालं!

त्यात लग्नात रुसवे, फुगवे अन भांडणे! हुंडा! सासरी छळ! माणसे म्हणवण्याच्या लायकीची नसतात ही माणसे! मागे शेपूट लावले की झाले यांचे कुत्रे!

ताराचे पुढच्या महिन्यात लग्न होणार होते औरंगाबादला! बिचारी तारा! चांगली दिसायला, एफ वाय पर्यंत शिकलेली! पण जमेचना कुठे! आणि आता जमलंय तर आईकडे कोण बघणार ही काळजी! ताईचा मृत्यू झालेला! खरे तर तिला खरोखरच आपण कुणाला तरी पसंत आहोत याचा आनंदच झालेला नव्हता. पण आईने शपथ घातलेली होती. तिच्या डोळ्यांसमोर तिने लग्न केलेच पाहिजे.

आज पहिल्यांदाच, रमाच्या मृत्यूनंतर, श्रीनिवास तब्बल पन्नास दिवसांनी ऑफीसला गेला. घरातील रूटीन आता हळूहळू लागत होतेच! उषाताई आणि आई नाही म्हंटले तरी आता इथेच राहणार हे जवळपास ठरलेच होते. आईला आणायला जावे लागणार होते दोन, चार दिवसात! प्रमिलावहिनी आणि कल्पनाताई या दोघी समवयस्क स्त्रिया सतततच गट्टूकडे बघतच होत्या. सगळी वाड्यातली मुलेही असायचीच! खरोखरच, इतके लोक असून फक्त.. एकच व्यक्ती नव्हती गट्टूला.. आई... आई नव्हती त्याला..

श्रीनिवासला पाहून स्वाती रडायला लागली. उलट श्रीनिवासनेच तिचे सांत्वन केले. देशमाने आणि चिटणीसांनी श्रीनिवासला थोपटले आणि त्याच्या सीटवर बसवले. कोपरकरांनी चहा मागवला. यांच्या शिवाय अनेक लोक येऊन श्रीनिवासला भेटून गेले. अकरा वाजता आलेल्या सप्रेसाहेबांना श्रीनिवास आल्याचे कळल्यावर आपल्या केबीनमधे जायच्या आधी ते त्याच्याकडे आले. त्याचे सांत्वन करून मगच ते आपल्या जागेवर गेले.

रोजचेच काम! पण आज किती निराळे वाटत होते. आज घरी गेल्यावर आपण आल्याचा आनंद होणारी रमा नसणार होती. 'एक कड्डक चाय' असे म्हणत हसतमुखाने आपल्या समोर येऊन 'काय, स्वातीने कोणती साडी नेसलीवती आज? आवडली का?' असे खट्याळपणे विचारणार नव्हती. मनात तिलाही माहीत होते की स्वाती आणि आपला नवरा एकमेकांना भाऊबहीणच मानतात. पण एक आपला विरंगु़ळा म्हणून थट्टा करायची एवढेच!

रात्री नऊ नंतर विविधभारती आणि बिनाका गीतमालेची गाणी ऐकत ऐकत तिच्या धुंद सहवासात संसाराची स्वप्ने रमवत झोपून जाता येणार नव्हते. आता होते एक बाळ! गुटगुटीत, हसरे आणि सगळ्या दु:खांचा विसर पाडणारे आणि ... तरीही... रमाचा विसर न पाडू शकणारे एक बाळ..

या गॅपमधे चिटणीसने आपले सगळे काम सांभाळले म्हणून लंचच्या वेळेस सगळे एकत्र डबा खात असताना श्रीनिवास म्हणाला..

श्री - चिटणीस.. सॉरी हं..
चिटणीस - का??
श्री - अरे.. हे सगळं झालं त्यात.. तुला.. सगळंच बघाव लागलं ऑफीसमधलं..
चिटणीस - पेंढारकर.. टचवूड.. पण.. माझी... माझी बायको गेली असती तर.. तू.. हेच..माझ्यासाठी..

'चिटणीस' म्हणून जोरात ओरडलेल्या श्रीनिवासने डोळ्यातून पाणी काढत खरकट्याच हातांनी चिटणीसला मिठी मारली. सगळेच पाणावले. केबीनच्या अर्ध्या काचेच्यावरून सप्रेंना हे दृष्य दिसत होते. आज ते "हाऊ कॅन यू डू थिन्ग्ज लाईक धिस इन द ऑफीस.. आय फेल टू अन्डरस्टँड' म्हणणार नव्हते. चिटणीसने रात्रीचा दिवस करून पेंढारकरचे काम केलेले सगळ्यांनाच माहीत होते, अगदी चिटणीसच्या बायकोलाही!

श्री - असे नको म्हणूस रे.. हे दु:ख.. फार फार.. वाईत असतं चिटणीस..

चिटणीसने 'आय नो, आय नो' म्हणत श्रीला थोपटून खाली बसवले.

कुणालाच डब्यातील एक घासही जात नव्हता.

स्वाती - बाळाकडे .. अजून त्या.. कर्वेबाईच
श्री - हो.. त्याच बघतात, ताई पण आहे.. आता आईलाही आणायचंय..

अचानक सप्रेसाहेब आत आले. जेवतानाच सगळे उठून उभे राहिले.

सप्रे - सिटडाऊन फ्रेन्ड्स... पेंढारकर.. पुरुषांना मॅटर्निटी लीव्ह मिळत नाही.. पण.. आय हॅव रेकमेंडेड अ‍ॅन्ड गॉट अ‍ॅप्रूव्ह्ड अनादर टू मन्थ्स लीव्ह फॉर यू धिस मॉर्निन्ग.. इफ यू वॉन्ट यू कूड अ‍ॅव्हेल इट्..ऑफकोर्स.. चिटणीस.. यू वोन्ट हॅव टू डू एव्हरीथिंग नाऊ.. वी वुईल हॅव अनादर गाय फ्रॉम पर्चेस टू लूक आफ्टर पेंढारकर्स वर्क टेंपररीली..

खाडकन दरवाजा ढकलून तिरकस बोलणारे सप्रे निघून गेले तेव्हा कुठे त्यांच्या बोलण्याचा अर्थ उमगला सगळ्यांना..

स्वाती - मला वाटतं.. तुम्ही रजा घ्या पेंढारकर.. नाही का देशमाने??
देशमाने - हं..
श्रीनिवास - खरं म्हणजे.. घरी बसून तरी काय.. सारखी रमाच..
कोपरकर - अरे बरोबर आहे... पण साहेबांनी एवढं केलंय तर निदान त्याचा फायदा तरी..
चिटणीस - मला वाटतं तू थांब अजून दोन महिने घरी पेंढारकर..
श्रीनिवास - नको.. मला वाटतं तुमच्यामधे माझे निदान हे काही तास तरी... रमाच्या आठवणीशिवाय जातील..

हे मात्र फारच खर होतं आणि सगळ्यांनाच पटलं! नि:शब्द जेवणे उरकल्यावर श्रीचे म्हणणे नीट शब्दात देशमानेंनी सप्रेंपर्यंत पोचवले अन सप्रेंनाही पटलं!

आणि श्री घरी येतो तो...

निगडे बाई धावत आल्या..

निगडेकाकू - अरे श्री.. तुला फोन केलावता आत्ता
श्री - मी कंपनीतून निघून पाऊण तास झाला ...का??
निगडेकाकू - अरे.. तुझ्या आईला किंचित बरे नाहीये.. उषा गेलीय कर्‍हाडला आत्ताच ..
श्री - आईला?? काय झाले?
निगडेकाकू - दोन ताप आलाय.. पण काळजीचं नाहीये .. डॉक्टरच बोलले फोनवर..
श्री - पण.. मग.. मीही निघतो..
निगडेकाकू - नाही... आत्ता गट्टूला प्रवासात नेणे योग्य नाही.. हवा विचित्र आहे.. तू इथेच थांब..
श्री - पण.. .. बघणार कोण त्याच्याकडे??
निगडेकाकू - वेडायस का??? मी अन प्रमिला नाही आहोत का??
श्री - अहो काकू.. रात्री..

निगडेकाकूंच्या तोंडातून अक्षर बाहेर पडायच्या आधीच घणाघाती आवाज आला..

"रात्री काय अन दिवसा काय.. पवार मावशी मेलीय कारे कांद्याच्या.. आं.. हात लावायचा नाही आता बाळाला कुणी... अन त्याला भेटायचे असेल तर माझ्याकडेच येऊन भेटायचे या पुढे.. आईविना बाळ ते बिचारं.. लाजा वाटत नाहीत गावाला जायला?? आत्या गेली गावाला अन मावशी नुसती नावाला???"

डोळे हे एवढाल्ले करून वरूनच पवार मावशी कर्कश आवाजात घशाच्या शिरा ताणून ओरडत होत्या..

अख्खा दास्ताने वाडा त्या अभूतपुर्व रुपाकडे पाहात होता त्यांच्या..

गुलमोहर: 

मस्त बेफिकिर राव...
ही पवार मावशी म्हणजे ललिता पवारसारखी वाटली.पण हि मावशी म्हणजे फणसासारखी आहे.बाहेरुन कठीन.....आतुन नरम..

मस्त ...
<<ही पवार मावशी म्हणजे ललिता पवारसारखी वाटली.पण हि मावशी म्हणजे फणसासारखी आहे.बाहेरुन कठीन.....आतुन नरम... >> रोहित यांना अनुमोदन..

आता ह्या कादंबरिच्या नव्या भागाची रोज उत्सुकता लागते बुवा......अप्रतिम पकड..... लगे रहो '' बेफिकिर''भाय.

डॉ.कैलास

me manalo hoto na ata balala pawar mavashich sambhalnar,
ata bal nakki Charoli lihinar Happy

baki pawar mavachi che yamak manje numste bomb, great

पवार मावशी भारी प्रकरण आहे ब्वा!.........बाकी ऑफिसमधील प्रसन्ग अगदी डोळ्यासमोर आला आणि वाचताना स्क्रीन अन्धुक दिसायला लागली..........