ओंजळी

Submitted by सुमेधा आदवडे on 22 June, 2010 - 23:22

कोसळणार्‍या पावसात, छत्रीच्या इवल्याश्या जीवावर
देहाचा एकेक इंच सावरत चालत असताना,
त्याची नजर तिच्यावर पडली.
तिनेही अगदी अलगद रस्त्यावरच्या पाण्यावर पावलं
सावरताना त्याच्याकडे हळुच पाहिले.
दोघांचीही मनं उगाचच वाहवत गेली पावसात...

खरंतर हा पाऊस जितका ओळखीचा,
तितकीच ’ही’ अनोळखी.
तरीही मन का सांगड घालतंय दोघांची?

हा पाऊस जितका छळवादी,
तितकीच ’ह्या’ची नजर..
तरीही का काहीतरी आपलंसं वाटतंय?

विचार करता करता,चालत वळणावर
येईपर्यंत पाऊस थांबलाही होता.
त्याच्या आठवणींच्या ओंजळी रित्या
झाल्याही होत्या.
पण दोघं विरुद्ध दिशांना वळताना,
मनाच्या ओंजळी एकत्र येऊन त्यांना
पाऊस कधी भरु लागला..
हे कुणालाच कळले नाही..अगदी पावसालाही नाही!

आता मात्र काही रितं होणार नव्हतं.
आता मात्र काही रितं राहणार नव्हतं.
पाऊस थांबला तरीसुद्धा!

-सुमेधा पुनकर

गुलमोहर: 

सुमा...
हा पाऊस... ना असाच असतो...
अगदी त्याच्यासारखा .....
येतो येतो म्हणताना अलगद हुलकावणी देतो..
गेला गेला म्हणताना अचानक समोर येतो ...
खरे तर तो मुळी गेलेलाच नसतो...
तो रुजतो...
मनाच्या खोलवर गेलेल्या मुळांमधून...
गात्रा गात्रांच्या हळुवार स्पंदनांतून...
एकदा का तो आला ...
किं रिकामी झोळी शिगोशिग भरुन टाकतो...
इतकी की रितेपणाची जाणिवच संपून जाते...! Happy

धन्यवाद मंडळी..सर्वांचे मनापासुन आभार.. Happy
सु.की..बर्‍याच दिवसांनी सुचलीये कविता..मलाही आश्चर्य वाटत होतं..पाऊस आला तरी काही सुचलं कसं नाही Happy

विशाल दादा..मस्त कविता Happy

सुमेधा ,

कविता अतिशय हळुवार आणि सुंदर आहे. खूप आवडली. मस्त. अभिनंदन. खरी उत्स्फूर्त अगदी सहज आतल्या मनातून आलीय. Happy

....................अज्ञात

क्या बात है!!
छान कविता, वेगळा विषय....
मला ही माझी एक अशीच "पावसाळी" आठवण आली... Happy

क्या बात है सुमेधा... खुप दिवसांनी तुमची कविता वाचली अन दिल खुश हो गया... माझी पण ओंजळ भरली !!! Happy