२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग १

Submitted by बेफ़िकीर on 1 June, 2010 - 05:20

साहू या वेश्येच्या मुलाची कहाणी लिहायला घेत आहे. एक अत्यंत टाळला गेलेला विषय, ज्यावर लोक एक तर नाक मुरडतात किंवा हसतात!

आणि... त्यातलेच काही जण जगाची नजर चुकवून तिथे जातात...

'हाफ राईस दाल मारके'च्या दिपूमधे अन '२०३ डिस्को, बुधवार पेठ'च्या साहूमधे एक साम्य आहे व एक फरक! साम्य हे की दोघेही जन्मतःच दुर्दैवी होते. फरक हा की दिपू विलक्षण बुद्धीमत्तेचा व कर्तृत्ववान माणूस होता. साहू तसा नाही. साहू स्वभावाने अत्यंत गरीब आहे व 'परिस्थितीवर मात करण्याची इच्छा' ही एकमेव पॉझिटिव्ह गोष्ट सोडली तर त्याच्याकडे इतर कोणीही किंवा काहीही साथ देणारे नाही. एका निरागस मुलामधून एक विदारक स्फोटक कसे तयार होते हे कथानक आहे.

या कादंबरीचा उद्देश उगाचच उदात्त वगैरे आहे असा माझा मुळीच दावा नाही. समाजातील शोषित घटकांवर लिखाण करणे, त्यांच्या प्रश्नांना समाजापुढे मांडणे वगैरे असले काहीही या कादंबरीचे हेतू नाहीत.

हे फक्त एक वास्तव आहे. जे आपल्यापासून काही किलोमीटरवर किंवा कदाचित शेजारच्या गल्लीतही घडत असते. आपण स्वतःला पांढरपेशे समजून या बाबींपासून दूर राहतो. मात्र, हे वास्तव तिथे घडत असते म्हणूनच आपल्याकडे घडत नाही हे विसरले जाते.

जर साहूचे कथानक वाचून मन द्रवले तर हेतू सफल झाला म्हणता येईल.

पुण्यातील बुधवार पेठ देशात शरीर विक्रयाचा मोठा बाजार म्हणून प्रसिद्ध आहे हे सर्वज्ञात आहे. त्याचे अंतरंग मी सांगणे हा निव्वळ कल्पनाविलास नाही.

कॉलेजमधे असताना, म्हणजे १९८६ ते १९९१ च्या काळात मित्रांबरोबर श्रीकृष्ण, श्रीनाथ किंवा विजयानंद टॉकीजला 'फक्त प्रौढांसाठी'वाले पिक्चर बघायला जाणे, गणेशोत्सवात काही व्रात्य वरिष्ठ मुलांबरोबर रात्र रात्र भर फिरताना त्या एरियातून फिरणे वगैरे गोष्टी मी केलेल्या आहेत. मुद्दाम आलो असूनही चुकून आलो असे ती मुले म्हणायची अन मलाही उत्सुकतेमुळे त्यांचे नाटक आवडायचे, अपेक्षित असायचे. हजारो माणसे त्यावेळेस तेथून जात असल्यामुळे भीती वाटण्याचे कारण नसायचे. मात्र, अत्यंत किळसवाणा परिसर, त्याहून किळसवाणी माणसे.. अन त्याहून किळसवाण्या बायका बघून सुरुवातीला उत्सुकता, मग भीती व शेवटी घृणा वाटायची. सोसायटीत परत आले की मग एकमेकांची थट्टा मस्करी सुरू व्हायची. त्या परिसरात डिस्को, तोहफा व वेलकम या इमारती अधिक प्रसिद्ध आहेत ही मूल्यवान माहिती त्या काळी मिळालेली होती.

पण लिहायला लागल्यावर माझ्या 'मुमताझ' या कवितासंग्रहात 'वारांगना' ही एक कविता रचून समाविष्ट केली. मध्यंतरी एका दुसर्‍या संकेतस्थळावर याच विषयाशी निगडीत अशी एक छोटी कथाही लिहीली होती. पण एस्.एस. एस. किंवा हाफ राईस यातील विषय जसे डिटेल्ड लिहिल्याशिवाय मला मुक्त झाल्यासारखे वाटत नाही तसेच हाही विषय लिहावासा वाटला.

याही कथेमधे काही अनुल्लेखनीय उल्लेख वास्तव प्रामाणिकपणे मांडता यावे याचसाठी आलेले आहेत.

मायबोलीच्या प्रशासनाने तेवढी परवानगी द्यावी अशी विनंती!

-'बेफिकीर'!
=============================================

"साहू.. रेश्मा.. थापा.. "

"बाप नही है क्या? या बहोत है?"

".........."

"काय रे ***?"

"....."

"पत्ता बोल"

"२०३, डिस्को... बुधवार पेठ.. पुणे २"

आजही रात्री पंचवीस वर्षाचा साहू फरासखान्यात हजर झाला होता. आळीत काही झाले की ज्या तीन चार टाळक्यांना पकडायचे त्यात साहू सगळ्यात सोपा! त्यात आणखीन हा यादवाड सबइन्स्पेक्टर नवीन होता. साहू आईचेच नाव लावतो ही माहिती त्याला असिस्टंटने दिली. बराच वेळ चौकशी करून अन शिवीगाळ करून काही साध्य झाले नाही पाहिल्यावर साहूला सोडले, बाकीचे दोघे तिथेच थांबले.

काही नाही.. कुठल्यातरी गिर्‍हाईकाचा रेखाबरोबर वाद झाला होता अन झालेल्या भांडणाचे पर्यवसान किरकोळ मारामारीत होऊन शेवटी त्या गिर्‍हाईकाने तक्रार नोंदवली होती. त्याचे म्हणे आदल्या रात्री घड्याळ तिथेच राहिले होते. साहूला माहीत होते. रेखा प्रामाणिक होती. पण त्या माणसाला काही पटेना! त्याने शिवीगाळ केला, मग काही पोरींनी त्याला शिव्या दिल्या.. मग झाली मारामारी! आजूबाजूच्या बघ्यांपैकी साहू, नवीन अन गोपी या तिघांना आत घेतले.

यादवाडला कुणीतरी त्या गिर्‍हाईकाचे आजवरचे अनुभव लक्षात घेता तो घड्याळाबद्दल खोटे बोलत असणार हे सांगीतल्यावर त्या गिर्‍हाईकालाच झाप पडली अन साहूला सोडून देण्यात आले. नवीन अन गोपी यांना पुढच्या कागदपत्रांपुरते थांबवले. साहूला माहीत होते, शेवटी त्या गिर्‍हाईकाकडूनच शे पाचशे घेणार अन कागद फाडून टाकणार!

पासोड्या विठोबापाशी नवी कोरी ब्रिस्टॉल घेऊन एक कचकचीत झुरका मारल्यावर साहूचे लक्ष गेले श्रीकृष्ण टॉकीजकडे! आज जरा वातावरण मंद मंदच वाटत होते.

रात्रीचे साडे दहा वाजले होते. एका बंद दुकानाच्या पायरीवर साहू बसला. त्या पायरीवर बसले की खाली रस्त्यात एक नाणे कुणीतरी ठोकून ठेवले होते ते नेहमी दिसायचे साहूला. आता ते नाणे किती पैशांचे होते हे जरी दिसत नसले तरीही....

पाच वर्षांचा असताना .... ते नाणे पाच पैशांचे आहे.... हे साहूने व्यवस्थित पाहिले होते...

नाण्याकडे बघता बघता अलगदच साहूचे मन पोचले... भूतकाळात...

=================================================

आपला बाप कसा मेला, का मेला, कधी मेला अन मेला म्हणजे आता पुन्हा कधीच दिसणार नाही का.. या अनेक प्रश्नांवर विचार करण्याचे साहूचे वय नव्हते. तेव्हा दोन वर्षाचा होता तो. ओरिसातील राउरकेला स्टील प्लँटवर मजूर म्हणून कामाला असलेला बाप स्क्रॅप अंगावर पडून मेला होता. काँट्रॅक्च्युअल लेबर असल्याने प्लँटकडून भरपाई न मिळता मिस्त्रीकडून मिळाली होती. दोन हजार रुपये! आणि प्रेमाने काही लोकांनी पाचशे जमवले होते अन अंत्यविधीचा भार उचलला होता.

आणि ललिता आक्रोश करून रडत असताना आजूबाजूच्या स्त्रिया तिला धीर देत होत्या. तिचे तरी काय? अठरा वय होते फक्त! लवकर लग्न झाल्यामुळे सोळाव्याच वर्षी साहूचा जन्म झाला होता. नवरा मेला तेव्हा तो सव्वीस वर्षांचा होता आणि ललिता अठरा!

हळूहळू साहूकडे बघून दु:ख बाजूला ठेवून ललिताही स्टील प्लँटच्या एका छोट्या कंत्राटदाराकडे काम करायला जायला लागली. तिथेच तिची ओळख भानूशी झाली. भानूने दोन वर्षात प्रेमाचे भरपूर नाटक करून शेवटी तिला साहूसकट पळवले अन ...

गंगाबाईच्या डिस्को इमारतीत थेट आणले.. व्यवहार झाला.. ललिताला इतर मुली बघून शंका येतच होती.. पण चक्क पैशांचा व्यवहार झालेला पाहिल्यावर मात्र ती पुन्हा आक्रोश करायला लागली. भानू निर्लज्जासारखा हसत तिथून निघून गेला अन ललिताला पळण्याचा प्रयत्न करता आला नाही कारण साहूला धड उचलून धावणेही शक्य नव्हते अन त्याला तिच्याइतक्या वेगात धावणेही शक्य नव्हते.

दोन दिवसांचा पाण्याविना झालेला उपास, साहूचा मलूल होत जाणारा आक्रोश, मधून अधून पडणारा जहरी मार अन इस्माईलची बरबटलेली नजर पाहून शेवटी ललिता परिस्थितीला शरण गेली.

आणि नंतर...

......परिस्थिती तिला...

डिस्कोतली ललिता रात्रीला दोन हजार कमवते ही बातमी कर्णोपकर्णी झाली अन काही लोक नुसते तिला बघूनच जाण्यात सुख मानू लागले.

तोहफा, वेलकम अन इतर अनेक अत्यंत सामान्य व घृणास्पद इमारतींमधे गहजब माजला.

वेलकमच्या मुंगुस दलालाने तर ललिताचा भाव करण्याचा प्रयत्न केला. पण गंगाबाई ललिताला सोडणे शक्य नव्हते.

मुळात, ललिताला इथे पळवून आणल्याची तक्रारच कुणी केली नव्हती. त्यामुळे पोलिसांनाही काही लक्ष घालायचे कारण नव्हते.

आणि आठवड्याभरातच बुधवार पेठेने मान्य केले...

ललिताकडे एकदा गेलेले गिर्‍हाईक इतरत्र जायला नकार देते.. आणि.. ललिताने मान्य केले..

कळकट्ट, दाढीवाले, घामट, दारुडे, चोवीस तास गुटखा खाणारे.. तसेच...

पांढरपेशे..इस्त्रीचे कपडे घालणारे.. गोरे गोमटे.. सेंट लावणारे.. सभ्य भाषेत बोलणारे... तसेच..

उधारीवर येणारे.. रोकड मोजणारे.. टीप देणारे..

सगळ्या प्रकारचे पुरुष... बेडवर सारखेच असतात.. घाण कशाची वाटून घ्यायची????

मजुराबरोबर.. किंवा हमालाबरोबर झोपावे लागले याची???

आणि हे मान्य केल्यावर डिस्कोमधे आजवर कुणालाही मिळाला नसेल असा मानसन्मान ललिताला मिळू लागला...

गंगाबाई आपल्याबरोबर तिचे पान घ्यायला सांगायची.. तिच्यासाठी प्रसाधनांची कमतरताच नव्हती.. सगळ्या मुली तिच्याकडे असूयेने पाहायच्या... ललितासाठी गिर्‍हाईक ठरवून आणले जायचे.. म्हणजे..

ज्या रोगट म्हातार्‍यांकडे बघवतही नाही.. आणि एखादी वेश्या किंवा एखादा दलाल येता जाता एखादी शिळी पोळी ज्यांच्यापुढे फेकतो.. त्या सर्वात हीन जमातीत मोडतात..

दिवसाढवळ्याच दगडूशेठ गणपतीच्या चौकात उभे राहून अपेक्षेने येणार्‍या जाणार्‍याकडे पाहणार्‍या पन्नाशीला पोचलेल्या वेश्या ही त्यापेक्षा बरी जमात....

त्यापेक्षा.. श्रीकृष्ण टॉकीजपर्यंतच दिवसा उभ्या राहणार्‍या जरा वरच्या..

त्याहून.. फक्त रात्रीच उभ्या राहणार्‍या आणखीन वरच्या...

एकदम गल्लीच्या तोंडाशी.. किंवा अगदी आत आत उभ्या राहणार्‍या.. फारच वरच्या..

आपापल्या खिडकीतून गल्लीत डोकावणार्‍या त्याहून... आणि..

ज्या दिसतच नाहीत .. ज्यांचा बोलबाला ऐकून लोक चौकशीला येतात. ज्यांची बोली स्वतः कोठेवाली ठरवते.. सिलेक्ट गिर्‍हाईके ज्यांच्यापर्यंत पोचतात... त्यात ललिता मोडू लागली... केवळ महिन्यातच..

घाणेरड्या कंपार्टमेंटाइवजी ललिताला एक खोली मिळाली होती.

आणि त्या खोलीचा दिवा बंद केला की ती मनातच मूक रडायची.. आणि गिर्‍हाईक त्याचे काम करत राहायचे..

आणि सगळ्यात गंमत चालली होती साहूची! केवळ पाच वर्षाचा साहू पोरींमधे सुरुवातीला लाडका ठरला होता. पण जसजसे ललिताचे सोनेरी दिवस आले.. त्याच पोरी साहूवरही जळायला लागल्या. मुद्दाम त्याच्यापुढे एखादी गोळी वगैरे चघळायची अन हसायचे. तो रडायला लागला अन तयने गंगाबाईला सांगीतले की त्या पोरींना चांगली झाप पडायची. मग त्या नवी शक्कल लढवायच्या. पण या प्रकारात गंगाबाईने साहूकडे जातीने लक्ष दिले. ती त्याला चमचमीत पदार्थ घेऊन द्यायची, गोळ्या, चिक्की घेऊन द्यायची. त्यामुळे तो तिच्याच शेजारी, तिच्याच पलंगावर बसून असायचा.

साहूला आपण इथे का आहोत, इथे काय चालते याची कल्पना नव्हती. 'तुझ्या आईकडे लोक येतात त्यांच्याबरोबर ती आत काम करते' इतकेच त्याला सांगीतले जायचे.

पण मधून मधून एखादी मुलगी त्याला कपडे बदलताना किंवा कंपार्टमेंटमधून अर्धनग्नावस्थेतच बाहेर येताना दिसली की तोच शरमायचा. आपली आई असे तर काही करत नाही ना याची शंका मात्र त्याला नव्हती.

कारण ललिता त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने लक्ष पुरवायची आणि तिने त्याला सांगीतलेले होते की येणार्‍या लोकांबरोबर ठरवावे लागते की इथे शाळा कुठे आहे, तुला आता शाळेत घातले पाहिजे वगैरे! साहूल आत काय झाले असावे याची कल्पना यायची नाही.

मात्र.. चारच महिन्यात परिस्थितीत अचानक फरक पडला..

आधीच्या रेघेपेक्षा मोठी रेघ काढली.. की आधीची लहान वाटू लागते..

संगीता...

संगीता ही ती लांब रेघ होती...

संगीता मुंबईच्या फोरास रोडवरून स्वतःहून पुण्यात आलेली मुलगी होती... आणि.. कोणत्याही स्टँडर्डने ती ललितापेक्षा सुपीरीयर होती..

उघड आहे. ललिताची खोली गेली. तिला आता कंपार्टमेंटमधेच जायला लागले. तिच्यासाठी खास बोली लावून येणारे गिर्‍हाईक होते खरे! पण आता असे गिर्‍हाईक आले की गंगाबाई संगीताची त्या गिर्‍हाईकासमोर स्तुती करायची अन मग संगीताला पेश केले जायचे. गिर्‍हाईकही खुळ्यासारखे बघत बसायचे.

ललिताला सुरुवातीला फार आनंद व्हायचा. आलेल्या माणसाने आपल्याला नापसंत केले.. चला बरे झाले.. झाली सुटका! .. पण या आनंदात एक गहन दु:ख आहे हे तिला हळूहळू समजायला लागले..

आपल्याकडे गिर्‍हाईकाने न येणे याचा अर्थ आपण इथे नकोसे होणे असा आहे व ते गंगाबाई व सगळ्याच मुली वागण्यातून दाखवून देतात हे तिला समजले..

त्या दिवशी ... ललिता.. पहिल्यांदा खरीखुरी वेश्या झाली... मनाने वेश्या झाली..

जगायचे असेल तर गिर्‍हाईकाला भूल पडलीच पाहिजे...

मात्र, एक महत्वाचा फरक पडलेला होता. गंगाबाईच्या मनातून ललिताचे आधीचे स्थान डळमळीत झालेले असल्यामुळे आता तिला अन साहूला पुर्वीचा आदर मिळत नव्हता. साहूमुळे बोलणी खावी लागलेल्या मुली आता ललिताकडे गिर्‍हाईक आले की त्याची मुद्दाम खोड काढायच्या अन गंगाबाई पुर्वीसारखे मुलींना न बोलता साहूला दम भरायची.

एकविसाव्या वर्षी ललिताची कमाई मात्र सरासरीपेक्षा बरीच अधिक होती. त्याबाबत तक्रार असण्याचे कारणच नव्हते.

आणि.. तेवीसाव्या वर्षीही..

चक्क दोन वर्षे ललिताने डिस्कोमधे काढली.

मांढरेशेठ! नसरापूरचा दूधवाला! बुलेट घेऊनच आळीत घुसायचा. जायचा तो तडक डिस्कोमधे! डिस्कोमधील एक मुलगी नव्हती जी मांढरेशेठने उपभोगली नव्हती. त्याचा खाक्या भिन्न होता. 'मला मजा करायची असेल तर पोरीला पैशाच्या बाबतीत नाराज करता कामा नये आणि एकदा मी मागीतलेल्यापेक्षा जास्त पैसे दिल्यावर पोरीने मला नाराज करता कामा नये'! असा तो खाक्या! आणि याच त्याच्या प्रवृत्तीमुळे त्याला सुंदर स्वागत प्राप्त व्हायचे. फक्त.. संगीता आजवर त्याला घेऊन खोलीत गेलेली नव्हती. कारण आजवर तिच्याकडे जरा पांढरपेशेच लोक जास्त यायचे. गंगाबाईनेही संगीताची जादू संपता संपता तिला मांढरेशेठसमोर सादर करायचे ठरवले होते.

आणि त्या दिवशी तो प्रसंग घडला. रोज रात्री कुणीतरी वेगळा माणूस येतो अन आईबरोबर त्या घाणेरड्या खोलीत जातो हे साहूला केव्हाच माहीत झाले होते. त्याचप्रमाणे.. आतमध्ये आई जे करते त्याचा अंदाज त्याला येऊ लागला होता. इतर पोरींच्या चर्चा चालायच्या त्याही कानावर पडायच्याच! मात्र, त्या दिवशी त्याला आईसक्रीम हवे होते अन गंगाबाईने पैसे द्यायला नकार दिला होता. रात्रीचे आठ वाजलेले होते. मांढरेशेठ आज त्याच्या आईला घेऊन कंपार्टमेंटमधे गेला होता. साहूला या सगळ्याशी देणेघेणे नव्हते.

त्याने दारावरून हाका मारल्या व शेवटी बुक्क्या मारायला सुरुवात केली. दोन, तीनदा ललिताने त्याला थांबायला सांगीतले. पण आज पहिल्यांदाच तो हट्टीपणे वागला. त्यात गंगाबाईचे नेमके तिकडे लक्ष नव्हते. नाहीतर तिने मांढरेशेठला नाराज होऊच दिले नसते. मांढरेशेठ पिऊन आला होता. तीन, चार वेळा डिस्टर्ब झाल्यावर मात्र त्याने दार खाडकन उघडले अन खाली साहूकडे बघत त्याने साहूच्या हनुवटीवर हात ठेवून त्याला ढकलले व म्हणाला 'गंगाबाई.. काय कटकट हाये ही?? बंद करीन येणं हितं'

एका मांढरेशेठचे येणे बंद झाल्यामुळे डिस्कोला काहीही फरक पडला नसता. पण गिर्‍हाईक नाराज झालं तर तोहफा अन वेलकम ला जायला लागतं अन तिथे इथली बदनामी सांगतं! बाकीची गिर्‍हाईके मग त्या स्टोर्रीवर विश्वास ठेवून येईनाशी होतात. यामुळे गंगाबाई चवताळली. त्यात पुन्हा ललिताच्या मुलामुळे झाले हे कळल्यावर तिला आयतेच कोलीत सापडले ललितावरचा खर्च आणखीन कमी करण्यासाठी! ती ताडताड तिथे येईपर्यंत भीतीने थरथरत असलेला साहू मांढरेच्या अगडबंब उघड्या शरीराकडे अन आईच्या चादरीत गुंडाळलेल्या शरीराकदे बघत होता.

तेवढ्यात संगीता तेथे पोचली. तिने मांढरेच्या दंडावर आपले डोके घुसळून त्याला म्हणाली..

"आओ सर.. मेरे साथ आओ.. सेपरेट रूम है.. "

मांढरे हे नवीन प्रकरण पाहातच राहिला. होता तसाच तो संगीताबरोबर निघून गेला.

त्या रात्री तीन वेगवेगळ्या गोष्टी घडल्या.

संगीतावर अपरिमीत खुष झाल्याने मांढरेने गंगाबाईला घसघशीत रक्कम दिली...

ललिताची महागडी प्रसाधने बंद होऊन त्या जागी आता फक्त पावडर व एक स्नो मिळेल हे ठरले..

.. आणि...

त्या दिवसापासून सायंकाळी सात ते रात्री एक.. या वेळात.. काय वाट्टेल ते झाले तरी...

साहू गल्लीत कुठेही फिरेल.. पण डिस्कोत येणार नाही हे ठरले...

आणि रात्री नऊ वाजता रडत रडत बाहेर पडलेल्या साहूला पुन्हा आईसक्रीमची गाडी पाहून भूकही लागली होती अन आईसक्रीमही खावेसे वाटू लागले होते.

आणि त्याचवेळेस त्याला ते रस्त्यात ठोकून ठेवलेले नाणे दिसले होते... त्याने दगड घेऊन खूप प्रयत्न केला होता नाणे काढण्याचा.. आणि त्याचा तो निष्फळ प्रयत्न बघून गोपी नावाचा वेश्याव्यवसाय करणारा पंचवीस वर्षाचा तृतीयपंथीय हसत हसत त्याला म्हणत होता... जे ऐकून आजूबाजूचे कित्येक लोक हासले होते...

वो छटेली लेके क्या करेगा यार तू.. गंगाबाईके पास सोयेगा??

गुलमोहर: 

खरच, हाफ राईस नंतर उद्या काय करायचे हा मोठा पेच सोडवलात तुम्ही.
नव्या कादंबरीबद्दल धन्स आणि पु.ले.शु. Happy

मानलं तुम्हाला बेफिकीरजी!!!! खुप मोठा पेच सोडावलाय तुम्ही आम्हा वाचक वर्गाचा!!! आणि तोही इतक्या लवकर Happy
कथा काय..नेहमीप्रमाणे उत्तमच!!! आणि उत्तमच होणार..वादच नाही..येऊद्या पटापट Happy

अरे वा! किती पटकन नवीन कादंबरी!!!
दिपू ह्या पुढे भेटणार नाही ह्या विचाराने उदास झालेले... तेवढ्यात तुमची नवीन कादंबरी! खुप खुप धन्स Happy
आवडला पहिला भाग...वाचून वाईटच वाटलं खरंतर...ललिता आणि साहूचे अनुभव पुन्हा एकदा विदारक सत्यच दाखवणार ह्याची जाणीवसुद्धा भयावह आहे. Sad

अहो आत्ताच मी 'हाफ राइस...' चा प्रतिसाद लिहीला, आणि लगेच हे ? धन्य आहे तुमची !
पण आमचा उद्या काय हा प्रश्न सोडवल्याबद्दल लाख लाख धन्स !
तु म्ही पुण्याचे क हो ? मी लवकरच पुण्याला येत आहे. आपली भेट घ्यायला आवडेल.

वरील सर्व प्रतिसादांशी सहमत आहे.
खरच मलाही उद्या काय वाचु असा प्रश्न पडला होता. दिपुची कथा वाचताना जरी खुप आनंद होत असला तरी आता चांगल लिखाण वाचायला मिळणार नाही अस खुप वाटत होत.
नविन कादंबरी सुरु केल्या बद्द्ल धन्यवाद.
आणि पुढील लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा.

मा.बो. वर कायम तुमच्या वेगवेगळ्या कादंबर्‍या वाचायला मिळाव्यात ही सगळ्या तुमच्या चाहत्याकडुन इच्छा............ Happy

झकास.....कथानक आणी त्यास खुलवण्याच्या तुम्च्या कलेस सलाम....
तुमचा लेखनाचा उद्देश्य... हे वाचून एकाचे तरी मन द्रवित झाले पाहिजे असे आहे.... माझ्या मते तुमचा उद्देश १०० % यशस्वी होणार.

डॉ.कैलास

बेफिकीर खरंच अफलातून आहात. बाकी कोणच्या गोष्टीपेक्षा तुमच्या वेगाचे कौतुक करावेसे वाटते. आधी एसएसएस आणि हाफ राईस.. पाठोपाठ ही कादंबरी... कसे काय जमते तुम्हाला..
तुमच्या लेखनाचे व्यसन लागल्यासारखे झाले आहे.

सही