मातृदिन : नाच गं घुमा

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मातृदिनाच्या कार्यक्रमांमधे माझ्या आईची ही कथा इथे देत आहे. १२ मार्च १९९२ ला मुंबईत जे बाँबस्फोट झाले होते त्या पार्श्वभुमी वर आईने तेव्हा ही कथा लिहिली होते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्रावणसरी कोसळत होत्या. उनपावसाचा पाठशिवणीचा खेळ चालू होता. मंगळागौरीची रात्र, खेळाला अगदी रंग भरला होता. सगळ्याच जणी अगदी भान हरपून खेळत होत्या. लहानमोठ्या, म्हातार्‍याकोतार्‍या वय विसरून नाचत होत्या. ठेका छान जमला होता...
नाच गं घुमा,
कशी मी नाचू ?
नाच गं घुमा
नाचू मी कशी ?
खेळातली घुमा नाचू मी कशी म्हणून विचारत होती, पण प्रत्यक्षातली ? तिला विचारायला मुळी सवडच नसते. तिने फक्त तालावर नाचत रहायचं असतं सगळ्यांच्या !
तिला दुसरा दिवस डोळ्यासमोर येतो. पहाटेचं घडयाळ डोळ्यासमोर दिसायला लागतं. दूधवाला येतो, चहा करायचा, कणीक भिजवायची, भराभर भाजी चिरायची, मुलांना तयार करायचं, डबा-दप्तर भरायचं शाळेत पाठवायचं. दिवसभर त्यांची ताटातूट असते. मग गाद्या आवरायच्या, केर-वारे, धुण्याचं मशिन लावणे, आपले डबे भरणे. एकीकडे पाय भिंगरी सारखे फिरत असतात, मन घड्याळापेक्षाही जास्त वेगाने फिरत असतं. मग स्वतःची तयारी, तोंडात टाकायला वेळ असेल तर खायचं नाहीतर दूध घेऊन कप तोंडाला लावायचा. देवाला मनोभावे हात जोडून पळायचं. पळताना पायात गोळे येतात. प्लॅटफॉर्म तुडूंब भरलेला असतो, गाडी नेहेमीप्रमाणे लेट झालेली असते. ही गाडी शेवटची म्हणजे आता लेटमार्क अटळ. गाडी उशिराने येते, मग धक्काबुक्कीत जिवाच्या बाजीने स्वतःला आत ढकलायचं. एकीकडे पदर, छत्री सावरत घुसमटत रहायचं, तडतडत आत जायचं. बसलेल्यांचे मख्ख भावनाहीन चेहेरे पहायचे, त्यांच्या डुलत्या माना सावरायच्या. घाटकोपर, कुर्ला, दादर करता करता व्हिटी स्टेशन आलं की त्यावर धबधब्यासारखं कोसळायचं. पायांना उभ्याने रग लागलेली असते. केस विस्कटलेले असतात. साडीची इस्त्री मोडून तिचा पार चोळामोळा झालेला असतो. फुलं, गजरे पडलेले असतात.
सगळ्या थकव्याकडे, वेदनेकडे लक्ष न देता धावत सुटायचं. माणसांच्या लोंढ्यातून वाट काढता काढता जेरीस येऊन बाहेर पडायचं, क्रॉसिंगला अडकायचं. सगळा संताप मनात गोळा झालेला असतो. एव्हानं धावत धावत पुढे आलं की भली मोठी सापाच्या शेपटीसारखी रांग पार करत बसपर्यंत पोचत नाही तो बसची डबल बेल वाजून ती बस सुटते. मग परत दुसर्‍या बसची आराधना. कशीबशी बस मिळून ऑफिसला पोचावं तर लिफ्टलाही लाईन. १,२,३, ४ करत लिफ्ट आठव्या मजल्यावर पोचते. सही करायला मस्टरपाशी जावं तर कोणितरी आंबट चेहेर्‍याने सांगतं, लेटमार्क झाले ! म्हणजे साडेपाच ते साडेदहापर्यंत केलेली तडतड, जिवाचा आटापिटा फुकट ! मग दिवसभर ऑफिसची कामं, पिवळे पेपर, कॅश, फायली, चेक ह्यांत जातो. मग जेवताना मात्र थोडं बरं वाटतं. चारजणींचे प्रकार, थोड्या गप्पा-टप्पा.
परतताना पायांना जास्तच गती येते. मिळेल ती गाडी, उभ्याने तर उभ्याने. घरी परतताना मुलांचे चिमणे, केविलवाणे चेहेरे दिसायला लागतात. घड्याळ पुढे सरकतं तसं मुलांना संभाळणार्‍या बायकांची बडबड सुरू होते. त्यांचाही नोकरी करणार्‍यांवर राग. मग परत रात्रीचा स्वयंपाक. मुलांचे अभ्यास (सुशिक्षित पालक ना आम्ही). झाकपाक, कपड्यांची आवराआवरी... की साडेदहा अकराला डोळे उघडेच राहू शकत नाहित. म्हणून पडलं की झोप. कधीकधी वाटतं की देवासारखे आपल्यालाही चार हात असते तरी कमीच पडले असते. घरी गेल्यावर नवर्‍याची फर्माईश होते "काहीतरी चमचमीत कर !!" जसं काही आम्हांला चमचमीत खावसं वाटतच नाही !
खेळाचा ठेका चालूच असतो. पुढे लय लागते..
नाच ग घुमा
नाचू मी कशी ?
ह्या गावचा त्या गावचा माळी नाही आला
वेणी नाही मला
कशी मी नाचू ?
ह्या गाण्यातल्या घुमाला वेणी नाही, साडी नाही, दागिने नाहीत म्हणून ती कशी मी नाचू असं विचारते. पण अलिकडची घुमा? तिला शेकड्यांनी साड्या आहेत, तर्‍हेतर्‍हेचे दागिने आहेत, आधुनिक योयी आहेत, लाखालाखांचे फ्लॅट्स आहेत पण तिला उपभोग घ्यायला सवड नाही. 'नावडतीचं मीठ अळणी' म्हणतात. पण कमावतीचं, नोकरीवालीचा पैसा सोडून सगळच आळणी वाटतं. मग तिनं काय मिळवलं ? घरच्यांची नाराजी, रजा, सुट्ट्या घेतल्यामुळे ऑफिसमधे वरिष्ठांची नाराजी, मुलाबाळांची आबाळ, कामाचं समाधान म्हणावं तर बर्‍याचदा तेही नाही. अक्षरशः 'धोबी का कुत्ता ना घरका ना घाटका' अशी तिची स्थिती आहे.
पूर्वीच्या बायकांना नवर्‍यांची मर्जी संपादन करणं, त्यांनी दिलेल्या पैशांत घरखर्च भागवणं, एव्हढीच चिंता असायची. पण हल्ली सकाळी उठल्यापासून दूधवाला, पाणी, बेबीसिटरच्या अडचणी, मुलाला शाळेत सोडणार्‍या बाईची वाट बघणं, गाड्या लेट, वेळेत ऑफिसला पोचणं, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन येतं. परिणामी हार्ट ट्रबल, सांधे दुखी, ब्लडप्रेशर सारख्या रोगांना बळी पडावं लागतं. मग अर्धे श्रम त्यात खर्च होतात.
प्रत्येकीचाच प्रश्न वेगळा असतो. तर्‍हा वेगळी असते. संध्या मुलाला बेबीसिटरकडे ठेवते, घरात थकलेले सासू-सासरे, त्यांचं पथ्यपाणी, नवर्‍याचं अतिश्रमांमूळे अधेमधे आजारपण. स्वतःला अ‍ॅसिडीटीचा त्रास, थकवा. ती शेवटची गाडी धावत धावत पकडायला जाते. धावता धावता पडते. हाताला फ्रॅक्चर. मग सगळं घरच आजारी पडतं. मुलगा अतिशय द्वाड असतो. त्याला संभाळायला कोणी तयार होत नाही. त्याचा अभ्यास नाही घेतला तर तो करत नाही आणि मग शाळेत शिक्षा होते. हे सुशिक्षित आईला पटणारं नसतं. मग तिची चिडचिड, संतापणं. उपयोग काय? पण ह्या प्रसंगानंतर सासुसासरे स्वतःचं थोडंफार स्वतः करतात. मुलगा आपला अभ्यास स्वतः करायला लागतो. स्वयंपाकाला बाई ठेवली जाते. नवराही मदत करायला लागतो. तेव्हा दुखण्यातही तिला थोडं समाधान मिळतं. आपण एकट्या नाही, सगळं घर आपल्या बरोबर आहे असं जाणवून हुरुप येतो.
अशीच एक मीना. तिला दोन जुळे मुलगे. एक अतिशय समंजस होता. तो आईकडे रहायचा. दुसरा अतिशय द्वाड. त्याचा आय.क्यू. कमी, तो बाईकडे संभाळायला असे. तिलाही खूप त्रास देई. दर दोन चार महिन्यांनी वेगळी बाई. शाळेच्या रोजच्या तक्रारी. घरी जाता जाता मुलाला धपाटे मिळत. नशिबाला दोष दिला जाई. मुलाच्या भवितव्यासाठी पैशाची तरतूदही तेव्हडीच आवश्यक. मग आलटून-पालटून रजा. ती नाही मिळाली की सासुसासर्‍यांच्या मिनतवार्‍या. की मग त्यांची तोंड वाकडी. असं हे चक्र फिरतच रहातं.
त्यातुनही सगळ्याजणी आनंद, सुख शोधत रहातात. गाडीत उभ्याने वाचतात. चर्चा करतात. गाणी म्हणतात. जीव रमवतात. त्यामुळे गाडीचा प्रवास, खाल्लेले धक्के थोडेफारतरी सुसह्य होतात.
तेव्हड्यात खुंटण मिरची सुरु होते.
सासू मारिते..
बरं करिते.
सासरा मारितो..
बरं करितो..
आताचे सुशिक्षित सासू-सासरे मारत नाहित. खोचक टोचक बोलतात. मानसिक त्रास देतात आणि तो तिला निमुटपणे सोसावा लागतो. ती विचार करते. एव्हड्या तेव्हड्या कारणांनी वाद कशाला घालायचा ? घरातले प्रॉब्लेब्स चव्हाट्यावर कशाला आणायचे?
अश्या वेळी मनाची प्रचंड उलाघाल होते. अगदीच सहन नाही झालं तर निघून जायचं पण तेही तितकं सोपं नसतं. आपण म्हणतो पिढी बदलली, समाज बदलला, आधुनिक मतप्राणाली आली. पण खरच तसं झालं का? स्त्रीला समान हक्क मिळाले का ? ती पण शिकलेली आहे, तिलाही तिचे छंद आहेत, आवडीनिवडी आहेत, मतं आहेत पण किती जणींना घरी प्रोत्साहन मिळतं ? वेळ देता येऊ शकतो? पैसा हातात आला. आत्मविश्वास आला. कर्तबगारीची, हुशारीची सोनसाखळी गळ्यात आली पण स्वतःला कर्तबगार समजता समजता मंगळसुत्राभोवती त्या सोनसाखळीचे एकेक फास घट्ट बसत जाताहेत हे तिला कळलच नाही. दोन मनांचं सतत द्वंद्व होत असतं. मनावरचा ताण वाढतो. त्या सगळ्यात ती बिचारी थकून गेली. आधी संसाराला हातभार म्हणून. मग घर घ्यायचं म्हणून, मग मुलांची शिक्षणं - उच्चशिक्षणं म्हणून. ह्या सार्‍या हव्यासापायी ती ह्या चक्रात फिरतचं रहाते. इच्छा असो वा नसो.
मुलंपण आई दिवसभर घरी नाही म्हणून नाखूष असतात. सकाळी प्रमाने हळुवारपणे उठवणं एव्हडी किमान अपेक्षाही ती पुरवू शकत नाही. मग बाकीचं तर दूरच. तरीही ती वेळात वेळ काढून मुलांचं नीट करते. सणवार, वाढदिवस आवर्जून लक्षात ठेवते. आपण कुठेही कमी पडू नये ही तिची धडपड असते. पण हे मुलांना मोठेपणी कळेल तर ठिक. नाही तर त्यांना वाईट सवयी किंवा व्यसनं लागली तरी तिची ओढओढ, अपार कष्ट, सारं फुकट गेल्यासारखं होतं. मग ती दिवसभर नाचली कश्यासाठी ?
तिच्या डोळ्यासमोर १२ मार्चची सकाळ तरळून जाते. तिला खूप थकवा जाणवत होता. उठवत नव्हतं. पण स्वत:च्या बारिक दुखण्यासाठी सुट्टी घेऊन चालणार नव्हतं. म्हणून ती बिचारी तशीच उठली. त्यादिवशी मुलाचा, रोहितचा वाढदिवस होता. म्हणून तिने आदल्यादिवशीच ड्रेस आणून आणि गुलाबजाम करून ठेवले होते. 'लवकर येईन' सांगून घराबाहेत पडली. तिचं ऑफिस एअर-इंडिया बिल्डींग मधे होतं पण त्या दिवशी ऑफिसच्या कामासाठी दुपारी दादरला जायचं म्हणून तिला आनंदच झाला होता. म्हणजे लवकर घरी येता आलं असतं. कामाच्या गडबडीत एक वाजून गेला होता. म्हणून ती जागेवरच जेवली आणि दादरला गेली आणि एक वीसच्या सुमारास पहिला बाँबस्फोट झाला आणि त्या पाठोपाठ मालिकाच सुरु झाली. ती प्लाझापर्यंत आली. तोपर्यंत तिला ह्या गोष्टीची कल्पनाच नव्हती. माणसांचे लोंढेच्या लोंढे धावत येत होते. धुराचे लोट येत होते आणि एकदम मोठा आवाज झाला. तिला काही कळलं नाही. जीव मुठीत घेऊन ती स्टेशनकडे धावत आली.सगळे जण वाट फुटेल तिथे सैरावैरा धावत होते.
तोपर्यंत घरी बाँबस्फोटाची बातमी कळली. सासूसासरे कावरे बावरे झाले आणि देवाला नवस बोलले. मुलगा रडवेला झाला. तिची बँक एअर-इंडिया बिल्डींग मधेच असते आणि तिथला एकही कर्मचारी वाचलेला नाही हे घरी समजलं. नवरा घाबरून गेलेला. फोन लागत नाहीत. तो तसाच गाडी पकडून व्हिटीला गेला. धुर, गोंधळ, गडबड काहीच दिसत नाही, कळत नाही. मृतांच्या यादीत तिचं नाव नव्हतं पण कुठे पत्ताही लागला नव्हता. शेवटी तो दमून जातो आणि काय करायचं न समजून घरी परततो. ती भेदरेलेल्या अवस्थेत मुलाला मिठी मारून रडते. नवर्‍याला पहाताच तिला उमाळा दाटून येतो. तो तर आनंदाने नाचायचाच बाकी राहिलेला असतो, देवासामोर गुळ ठेवला गेला आणि घरावरचं संकट गेलं.
त्याच क्षणी तिला पटलं.. की आपण फक्त नाच गं घुमा सारख्या एकट्या नाचत नाही तर आपण आपल्या कुटूंबातला एक घटक म्हणून सगळं करत आहोत आणि ह्या सगळ्यांनासुध्दा आपल्याबद्दल तेव्हडच प्रेम, आपुलकी आहे. त्याशिवाय का सगळयांची अशी अवस्था झाली ? तो प्रसंग खूप काही शिकवून गेला आणि ती पुन्हा नव्या उमेदीने दुसर्‍या दिवशीच्या तयारीला लागली होती.

इकडे खेळ रंगतच होता.. ठेका धरला जात होता आणि लयही साधली जात होती.... !!

- सौ. नीला सहस्रबुध्दे.

प्रकार: 

पराग, छान मांडलंय सगळं आईने.

आमच्या मागच्या दोन पिढ्यांच्या आधीच्या बायकांनी नोकरी-संसार ही तारेवरची कसरत कशी जमवली असेल ह्याचं खरंच आश्चर्य वाटतं. त्याच पिढीचं प्रतिनिधत्व करणारी ही कथा... मस्त जमलिये.

खूपच सुरेख लिहिलंय..... सध्याच्या नोकरी करणार्‍या स्त्रीचं अगदी मनातलं छान मांडलंय.... Happy
आपल्या आईंचा नामोल्लेखही करावा म्हणजे लेखिकेचे नाव आम्हाला समजेल! Happy

छान लिहिलंय्. नोकरी-संसार करणार्यांची खरेच अनेकदा फरफट होते..विशेषतः ज्यांना नाईलाजाने हे सगळे करावे लागतेय त्यांची तर जास्तच Sad

बाकी इथे तरी माबो वरच्या काही वाह्यात आयडीज येऊन धिन्गाणा घालणार् नाहीत अशी अपेक्षा!!

माझ्यामते एअर इंडिया बिल्डींग ही फक्त एअर इंडियाचीच आहे. >>> नाही सायो. त्याच बिल्डिंगमध्ये एक बँक आहे आणि NCST चं ऑफिसपण तिथेच आहे. मी जाऊन आलीये बर्‍याचदा.

खुप सुंदर कथा. त्या काळातल्या नोकरी करणार्‍या स्त्रियांकडे कुच्ष्टेनेच पहात असत. त्याना घरच्या कुठल्याच जबाबदारीतून सुटका मिळत नसे.
त्या बिल्डींगमधेच तळमजल्यावर ओमानची बँक होती. ओमानने दशहतवादाला पाठींबा न दिल्याने, तिथे बाँबस्फोट झाला.

फार फार आवडलं रे पराग. तिची तगमग आणि त्या प्रसंगानंतर घरच्यांच्या वागणुकीनं कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात सुखावत जाणं ह्या सगळ्याचंच शब्दचित्र आईनं खूप सुरेख रेखाटलंय.

Pages