माझी आई आणि तिची आई
मी माझ्या आईवर खूप जास्त अवलंबून आहे. आधीही होतेच, पण लग्न, स्वतःचा संसार, स्वतःचं मूल झाल्यानंतरही आई अजूनही सारखी लागतेच. जरा कुठे खुट्ट झालं, एखादा पदार्थ करायचा असला, चार लोक येणार असले, लेक आजारी पडला, ऑफिसात/ घरी वाद झाले की सगळे आईच्या कानात ओतल्याशिवाय चैन पडत नाही! प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा फोनचं प्रमाण अर्थातच जास्त. कारण फोन कानाला लावणं सोपं. आता एकाच गावात रहातो, सर्व सुविधा हाताशी आहेत म्हणून आईशी सतत बोललं जातं असंही नाही. ती सवयच आहे, किंवा नैसर्गिक ओढ- सगळं आईला सांगायची. त्यात्या वेळेला ती जेजे सांगेल तेही १०० टक्के पटतं असंही नाही, पण तिच्याशी मोकळेपणाने वादही घालता येतो, चिडता येतं, तिच्यापाशी रडता येतं, हताश होता येतं हे ठाऊक असल्याने सहाजिकच सगळं सगळं तिला सांगितलं जातं.
माझ्या आईचीही मी तशी मैत्रिणच (अशी माझी समजूत). म्हणजे कशी, की ती मुळातच मितभाषीच. घरात तिच्या सासूपुढे आणि माझ्या वडिलांपुढे गप्पा वगैरे मारायची टापच नाही. आता इतक्या काळानंतर वडिलांशी बरंच मोकळेपणाने बोललं जातं, पण सासूशी अजूनही नाहीच. माझ्या बहिणीचं लग्न मी दहावीत असतानाच झालं आणि ती खूप लांब गेली रहायला. ना तिच्याकडे ना आमच्याकडे फोन होता तेव्हा. पत्र हे एकच साधन, त्यात ती तिची खुशाली कळवत असे पण रोजच्या समस्या, फोडणी कशी करू, अमक्यात काय घालू टाईप प्रश्न (जे मी अजूनही विचारते ते) पत्रामधून कसे विचारणार? त्यामुळे ती तशी लांबच गेली. रोजच्या सुख दु:खाच्या गप्पा मारायला तिला मी न् मला तीच. त्यामुळे आई माझा हक्काचा श्रोता. कॉलेजच्या गंमती, मैत्रिणी, अभ्यासाचं टेन्शन, वेळापत्रकं, चैन, सिनेमे सगळं तिला विचारून. मी इतकी भरभरून बोलत असताना आई मात्र फक्त छोटं हसायची किंवा दोनचार वाक्यांचे योग्य असे प्रतिसाद द्यायची इतकंच. सासूशी मात्र तणाव असह्य झाला किंवा वडिलांच्या अफाट रागाची तोफ डागली गेली की मात्र आई बोलायची काहीबाही. पण ती प्रचंडच खंबीर. मी तर सगळं ठीक असतानाही थोडंस्स्संही काही बिनसलं की येताजाता रडायला सुरूवात करणारी. पण आई माझ्यासमोर तरी रडली नाही, हताश झाली नाही, कधीच.
माझंही लग्न झालं आणि वाटलं आता आई खरंच एकटी पडली असेल. कोणी न सांगताच आपणहोऊन मी आई-वडिलांच्या काळजीचा मक्ता मी माझ्याकडे घेतला. मुद्दाम त्यांना फोन करणं, काहीही विषय नसताना गप्पा उकरून काढणं, मुलाच्या निमित्तानं त्यांच्याकडे चक्कर तरी मारणं, काही नवीन पदार्थ केला तर तो पोचवणं असं काहीबाही..
मात्र आईचं तिच्या आईशी, म्हणजे माझ्या 'त्या' आजीशी कसं नातं होतं? ही माझी 'ती' आजी ग्रेट होती. सोळाव्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेऊन तीन महिने तुरुंगात राहूनबिहून आलेली. सुटका झाल्यानंतर तिच्या पालकांनी मात्र तिचं लगेचच लग्न लावून दिलं. माझे आजोबा टिपिकल त्या काळातले सरकारी नोकर. दोन वेळा खायला मिळेल, ल्यायला मिळेल, मुलांना माफक शिकता येईल इतपत कमाई, अगदी मध्यमवर्गीय. मुलांचे फाजिलच काय, साधेही लाड अगदी क्वचित. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न त्यांनी झटपट ओळखीतली स्थळं पाहून लावून दिली. सण, रितीरिवाज, बाळंतपणं वगैरे केली आणि मुलींच्या संसारामधून अलिप्तता स्वीकारली. गावात, चालत जाण्याच्या अंतरावर माहेर असूनही आईही सारखी तिच्या आईकडे येताजाता जायची नाही आणि तिच्या आईचीही तशी अपेक्षा नव्हती. 'ती' आजी फक्त काही सण, पूजा, कार्य असलं की आमच्याकडे आलेली आठवतेय मला. 'ते' आजोबा तर कधी आले असतील का, शंकाच आहे! घरातले मतभेद, वाद, इतकंसं खुट्ट झालं की ते घेऊन माझी आई कध्धीच तिच्या आईकडे गेली नाही. खूपच जास्त झालं, तर देवळात जाऊन यायची. आल्यानंतर परत रोजचं काम सुरू. गाडंदेखील आपोआप मागील पानावरून पुढे चालू.
हळूहळू काळाची पानं उलटली, हे सगळेच लोक म्हातारे झाले, त्यांची वयं झाली, तसतसे संसारात अनेक बदल आपोआप होत गेले. ज्या गोष्टी आधी महत्त्वाच्या वाटत नव्हत्या, त्या आता वाटायला लागल्या, कोपरे बोथट झाले, काही तर हळवेही. आता माझी आई तिच्या आईची खुशाली, काळजी फोनवरून तरी घेऊ लागली, तिच्याकडे औषधं, खाऊ घेऊन जायला लागली. आता त्यावरून तिची सासू तिला बोलली तरी त्याची फारशी खंत ती करेनाशी झाली. पण मी माझ्या आईशी मारत असे, तशा खळखळून गप्पा, सुटसुटीत ऐसपैस वागणं असं ते नसायचं, नुसताच अबोल ओलावा, अनुभवण्यासारखा.
दोन वर्षांपूर्वी माझे 'ते आजोबा' गेले. वृद्धापकाळाने. पुण्यवान आत्मा. खितपत पडले नाहीत की कोणाला, अगदी आजीलाही त्यांची सेवा करायला लागली नाही. थकले मात्र होते खूप. तापाचं निमित्त झाले आणि तीन दिवसात गेले. त्यांचं जाणं हे त्या आजीला धक्कादायक नव्हतं, कारण काळाने आपले हातपाय तिच्यावरही पसरले होते, पण ते गेले, तशी 'आता आपण सुटलो' ही भावना तिने मनात धरली. 'आपल्यामागे त्यांचं कसं होईल?' ही प्रचंड भीतीदायक चिंता कोणत्याही वृद्ध जोडप्यात असते, तशी त्यांच्यातही होती. आजोबा गेले, तसं मात्र आजीने सगळ्यातूनच अंग काढून घ्यायला सुरूवात केली. आता आईला, मावशीला कधी फोन करायला, भेटायला जायला उशीर झाला, तरी तिने रागावणं बंद केलं. तिच्याकडची जी काही जमापूंजी होती, ती तिने मुलांना, नातवंडांना वाटायला सुरूवात केली. हे तिचं असं वागणं फार विचित्र वाटायचं, तिच्याकडून काही घेताना अगदी लाजल्यासारखं वाटायचं. पण 'घ्या गं, मी जिवंत आहे तोवर घ्या. आता माझे किती दिवस राहिलेत?' असं म्हणायची आणि यावर निरुत्तरच व्हायचो आम्ही. नंतर नंतर ऐकायला कमी येतं, समोरचा काय बोलतो हे पटकन कळत नाही म्हणून तिने बोलणंच बंद केलं होतं.. तिला भेटलं की एक अनामिक भीतीच वाटायची..
'ती' आजी १५ दिवसांपूर्वी गेली. अगदी अचानक. कोणताही आजार नाही, दु:ख नाही. एका टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं होतं, दुपारी १ च्या सुमारास. टेस्टला थोडा वेळ होता, म्हणून खोलीत नेलं आणि चारच्या सुमारास कार्डीयॅक अरेस्टमुळे अजून एक पुण्यात्मा पंचतत्वात विलीन झाला.
आमच्या सर्वांसाठीच हा प्रचंड मोठा धक्का होता. वार्धक्य आलं, माणूस जाणार हे सगळं माहित असतं, तरीपण त्याचं जाणं असं अंगावर येणं आपण थांबवू शकत नाहीच कधी. मला वडिलांचा फोन आल्याबरोब्बर मी आईकडे धाव घेतली. अजून ते सगळं सिन्क इन होत होतंच. मी आईच्या मिठीत शिरले. आज माझ्या आयुष्यात मी आईला प्रथमच रडताना पाहिलं. आई थरथरत होती. "पूनम, मी पोरकी झाले गं आज.." ती म्हणाली आणि मी शब्दशः शहारले!! "आई, नको ना असं बोलूस.. अगं आम्ही आहोत ना सगळे.. मी आहे.. "
"पण आई नाही ना गं.. आता मी एकटी पडले.." आई कोसळली.
आणि मीही.
इतकी वर्ष मी प्रचंड गर्वात होते. आईला फक्त मीच समजून घेऊ शकते. आईची मीच बेस्ट फ्रेन्ड. मला आई आणि तिला मी. जे ती माझ्या वडिलांशी बोलू शकत नाही, माझ्या बहिणीशी बोलू शकत नाही, ते ती मला सांगते. फक्त मला.
पण किती चूक होते मी. त्या क्षणी मी त्या आजूबाजूच्या गर्दीत जशी एकटी पडले तशी कधीच पडले नसेन. ती माझी फक्त आई होती. पण तिलाही एक आई होती. जे नातं माझं आणि तिचं होतं, तसंच तिचं आणि तिच्या आईचंही होतंच. भले त्या रोज बोलत नसतील, गप्पा मारत नसतील. मी जे माझ्या आईशी वागते, तशा त्या वागत नसतील, पण शेवटी ते एका आई-मुलीचंच नातं होतं. ते मी माझ्या मापदंडात बसवायचा फुटकळ आणि चूकीचा प्रयत्न करत होते. मी असल्यावर आईला कोणी नसलं तरी चालेल असा वृथा अभिमान गोंजारत होते, तो असा एका क्षणात गळून पडला. माझे हात, माझी कूस माझ्या आईला सामावून घेण्यासाठी असमर्थ होती. परत एकदा मीच तिचा कुशीत शिरले, हमसून हमसून रडत... आजीच्या जाण्याच्या दु:खाने, आईच्या मोडून पडण्याने आणि माझ्या तोकडेपणाचं सत्य जाणवून.
(No subject)
(No subject)
माझी आजी गेली ३-४
माझी आजी गेली ३-४ महिन्यापुर्वी तेव्हा अगदी असंच झालं होतं. "माझी आई गेली, माहेर संपलं गं आता" असं म्हणुन् रडणारी आई मी कधी ईमॅजिनच केली नव्हती. वास्तविक भाउ/ भाचे खुप मनापासुन करतात तरी आईशिवाय कसलं कौतुक त्या माहेरपणाचं, हे आता लग्न झाल्यावर नीटच कळतयं, पण आईचं सुद्धा असं होत असेल हे विसरुनच गेलेले मी.
परवा मदर्स डे ला तिला फोन केला आणि म्ह्टलं "तुझी खुप आठवण येतेय गं,तु काय करतेय्स?" तर ती म्हणे "मला पण माझ्या आईची आठवण येतेय, मी तिला कुठे करु फोन" कस्संतरी झालं आतुन आणि पटकन फोन ठेवुन दिला.
खुप छान लिहल आहे.... आपण हे
खुप छान लिहल आहे.... आपण हे विसरतो आई ला पण आई आसते....
पूनम..
पूनम..
(No subject)
पूनम खूप वाईट वाटतंय गं.....
पूनम
खूप वाईट वाटतंय गं.....
रक्ताच्या नात्यात कसं एक
रक्ताच्या नात्यात कसं एक विचीत्र बांधलेपण आणि तरीही तुटलेपण असतं हे सत्य समजतं पण उमजत नाही. अजुनही नाही. आणि आपल्याच पोरांशी किंचीत फटकुन वागणार्या पिढीचं रहस्य मला कधीच समजलं नाही. मनमोकळे बोलायला मला फक्त जन्माचा साथीदार किंवा एखाद दुसरी मैत्रीण, तरीही रक्ताच्या नात्यांची वीण प्रसंगी धातुंची असते त्याचा प्रत्यय येतोच. असो.
ही वाक्य मलाच विसंगत वाटतायेत ... लेखनाला दाद म्हणुन आपोआपच आली. जरा विवेक सापडला की "योग्य" काहीतरी लिहेन.
मी ३ वर्षाची असताना आईची आई
मी ३ वर्षाची असताना आईची आई गेली. त्यावेळेपासून माझ्या आईनी काय भोगलं असेल, काय झालं असेल तिचं, किती काय काय साचलं असेल तिच्या मनात हे आता ती स्वतःच गेली अडीच वर्षापूर्वी तेव्हाच कळलंय.
हा लेख वाचून ते सगळं आठवलं. खूप रडले परत एकदा.
निशःब्द !
निशःब्द !
रडवलस गं
रडवलस गं
फारच हृद्य लिहिलंय...डोळे
फारच हृद्य लिहिलंय...डोळे भरून आले. अगदी खास असतं आईशी नातं. मतभेद, भांडणं झाली तरी आतून ओढ घेत आईकडे. आणि म्हणतात ना ''स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी.'' तशीच स्थिती होते आईविना.
(No subject)
माझ्या आईची आई तर ती १५ ची
माझ्या आईची आई तर ती १५ ची असतानाच गेली. तिला कधीच माहेर नव्हत. लिहिवत नाहिये पुढे.
माझी आजी गेली तेव्हाची आई
माझी आजी गेली तेव्हाची आई आठवतीय मला.. हिस्टेरिकली रडणारी!
पूनम खरच आईची आई आपण किती
पूनम
खरच आईची आई आपण किती बारीक सारीक गोष्टी आईला सांगत असतो, आई कोणाला सांगत असेल? कधी विचारच नव्व्हता केला गं . रडवलस 
पूनम,
पूनम,

!
!
वहिनी, काय उत्तर लिहावं कळत
वहिनी,
काय उत्तर लिहावं कळत नाही !
पूनम.. खूपच टची लिहिल आहेस हे
पूनम.. खूपच टची लिहिल आहेस हे !
सकाळपासून तीन वेळा वाचलं.
सकाळपासून तीन वेळा वाचलं. ह्या प्रसंगातून सावरायला तुला कष्ट पडले असतीलच पण हे लिहिताना पुन्हा आठवून अधिकच कष्ट झाले असतील. अगदी सच्चेपणाने लिहिले आहेस. आजवरच्या तुझ्या सर्व लेखांत हे सर्वोच्च.
माझी आजी पॅरलिसिसने आजारी होती. एक दिवशी कुठल्याशा अनामिक ओढीने माझी आई आजीला भेटायला गेली आणि तिच्या देखत आजीने देह ठेवला. आजी गेल्यावर किती पटकन आईने सगळे व्यवहार सुरळीत चालु केले होते. पण नंतर कधी तरी बोलता-बोलता म्हणाली लुळी-पांगळी का होइना आई होती. ती गेली तसं डोक्यावरचं छप्पर गेलं
खरच फारच हृद्य लिहिलंय. नकळत
खरच फारच हृद्य लिहिलंय. नकळत आपल्या नातेसंबंधाला एकदम स्पर्श करुन जाणार.
पूनम, डोळ्यात पाणी आल्यावचुन
पूनम, डोळ्यात पाणी आल्यावचुन राहिलं नाही.
अगदी ह्रद्य लिहीलंयस पूनम..
अगदी ह्रद्य लिहीलंयस पूनम.. आतपर्यंत पोचलं. आपलं दुःख मनात ठेवून नित्य व्यवहाराला लागणं किती कठीण जात असेल आपल्या आयांना...
खरंच, प्रतिक्रिया म्हणून काय
खरंच, प्रतिक्रिया म्हणून काय लिहायचे कळत नाही. फार छान लिहीले आहे.
पूनम आठवणींचा पूर दाटलाय
पूनम

आठवणींचा पूर दाटलाय मनांत.. हे सर्व आईला सांगायला शोधतेय तिला मी..
आता पुढचं काही दिसत नाहीये
सुरेख आणि अतिशय हृदय.
मनाला अतिशय भिडून गेलेले
मनाला अतिशय भिडून गेलेले लेखन. होल्डिन्ग हॅण्ड्स.
अतिशय सुंदर. मलाही माझ्या
अतिशय सुंदर. मलाही माझ्या आईविषयी असेच वाटते. आणि माझ्या मुलीच्यात ( ती ६ च महिन्याची आहे ) आणि माझ्यात असेच नाते निर्माण होउ शकेल का (व्हावे) असे पण खुप वाटते.
पूनम.....खरंच
पूनम.....खरंच रडवलंस.......!!
आपण किती फक्त आपल्याच बाजूने विचार करतो ना......!! लेखाचा शेवट खूपच हळवं करुन गेला........सगळं अगदी माझ्या मनातलंच बोलते आहेस असं वाटलं !!
Pages