अज्ञात गांधी - श्री. नारायणभाई देसाई

Submitted by चिनूक्स on 20 April, 2010 - 15:16

मोहनदास करमचंद गांधी हा 'माणूस' व 'विचार' समजणं अतिशय कठीण. गांधीजींचं आयुष्य, एका सामान्य माणसाचं 'महात्मा' बनणं खरोखर अद्भुतरम्य आहे. गांधीजींना ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, सहवासातून अनुभवलं अशांपैकी नारायणभाई देसाई हे एक. गांधीजींचे पुत्रवत स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे सुपुत्र. गांधीजींच्या अंगाखांद्यावर खेळलेले आणि दांडीयात्रा, चलेजाव चळवळ वगैरे ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार. गांधीविचार व गांधीचरित्र लेखन-कथन हा नारायणभाईंचा ध्यास आहे. 'मारु जीवन एज मारी वाणी' (माझे जीवन हाच माझा संदेश) या नावाने चार खंडांत त्यांनी गुजराती भाषेत गांधी चरित्र लिहिलं आहे. बापू हे एक रोल मॉडेल आहेत, याची जाणीव तरुणाईला व्हावी, या उद्देशाने नारायणभाईंनी गांधीकथा सांगायला सुरुवात केली. गुजराती, हिंदी, इंग्रजी, आसामी, बंगाली इत्यादी भाषांतून जगभरात अनेक कार्यक्रम त्यांनी केले.

महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीप्रसंगी ग. दि. माडगुळकरांनी 'बापू सांगे आत्मकथा' हे गीत रचलं. या गीतापासून स्फुर्ती घेऊन नारायणभाईंनी कथाकथनाचे कार्यक्रम सुरू केले. नारायणभाईंनी मराठीत सांगितलेल्या बापूकथेचं पुस्तकरूप म्हणजे 'अज्ञात गांधी' हे पुस्तक. या कथेचं पुस्तकात रुपांतरण श्री. सुरेशचंद्र वारघडे यांनी केलं आहे.

सत्यासाठी जगलेल्या आणि सत्यासाठी मृत्यू पत्करलेल्या गांधीजींची ही कथा आपण विसरलो, तर ती फार मोठी चूक ठरेल. गांधींचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे न्यायचं असेल तर गांधीविचारांना पर्याय नाही, हे पटवून देणार्‍या या पुस्तकातली ही काही पानं...

adnyat 001.jpg

संस्कारांची शिदोरी

भारताच्या जडणघडणीत बापूंचा मोठा वाटा आहे, असं विधान मी सुरुवातीलाच केलं तर कुणी अचंबित होणार नाही, हे मला निश्चितपणे ठाऊक आहे. पण बापूंच्या जडणघडणीत भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या तीन देशांचा वाटा आहे, असं म्हटलं तर कदाचित काहींना वेगळं वाटेल. जीवनप्रवासातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आशिया, युरोप व आफ्रिका या तीन खंडांशी बापूंचा प्रत्यक्ष संबंध आला. त्यांच्या आयुष्यातली पहिली अठरा वर्षं आशिया खंडात (भारतात) व्यतीत झाली. बॅरिस्टरीसाठी ते तीन वर्षं युरोपात (इंग्लंडला) राहिले आणि दक्षिण आफ्रिकेत तब्बल एकवीस वर्षं राहिले. त्यात दोन वेळा ते भारतात आले. दोन वेळा इंग्लंडला गेले. आशियात त्यांचं व्यक्तिमत्त्व घडलं. युरोपात नागरिकत्वाचं, आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्याचं, तसंच इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याचं शिक्षण त्यांना मिळालं. जगभरच्या नवनव्या विचारप्रवाहांचं स्वागत करायला गांधीजी इंग्लंडमध्ये शिकले. दक्षिण आफ्रिकेत त्यांची जीवनसाधना झाली. आयुष्याच्या अशा प्रत्येक टप्प्यावर
गांधीजी घडत होते, अगदी लहानपणापासून, बालपणीचे अनुभव, घरच्या मंडळींच्या वागण्यातून होणारे संस्कारही त्यांना घडवत होते.

लालजी गांधी हे गांधी परिवारातले मूळ पुरुष. त्यांचा किराणामालाचा व्यापार होता. बापू कधी कधी स्वतःचा 'बनिया' म्हणून उल्लेख करत तो यामुळेच. व्यापार करता करता लालजी कुशाग्र बुद्धीच्या जोरावर पोरबंदर संस्थानाचे कारभारी झाले. त्यांच्यानंतर रामजी व राहीदास ही त्यांची मुलंही कारभारी झाली. पुढे या राहीदासच्या मुलांकडे - हरजीवन व दिमन यांच्याकडे कारभारीपद आलं. हरजीवनचे चिरंजीव उत्तमचंद, म्हणजे बापूंचे आजोबा उत्तमचंद गांधी हे 'ओता गांधी' या नावाने प्रसिद्ध होते. त्यांची पोरबंदर संस्थानाच्या जकात अधिकारीपदी नेमणूक झाली होती. मध्यस्थी करुन पोरबंदर संस्थान व जुनागडचा नबाब यांच्यातील सीमेबाबतचे वादविवाद त्यांनी मिटवले. दोन्ही संस्थानांत मित्रत्वाचे संबंध निर्माण केले. त्यांच्या या कामगिरीवर पोरबंदरचा राणा खूष झाला. दिवाणपदी नेमणूक करुन राणाने ओता गांधींच्या कामगिरीचा गौरव केला.

ओता गांधींनी दिवाणाचं काम अतिशय निष्ठेने केलं. ते स्वच्छ व स्वाभिमानी होते. १८३१ साली पोरबंदरच्या राणाचं निधन झाल्यानंतर मुलं सज्ञान नसल्याने राणी रुपालीच्या हाती संस्थानचा कारभार आला. रुपाली कानाने हलकी होती. काही स्वार्थी रोक ओता गांधींबद्दल तिला खोटंनाटं सांगायचे आणि ती विश्वास ठेवायची. ओता गांधींच्या हाताखाली संस्थानच्या कोठाराची म्हणजेच खजिन्याची व्यवस्था पाहणारा खिमजी नावाचा एक माणूस होता. राणीच्या दासी त्याच्याकडे अवास्तव आणि गैरहिशोबी मागणी करायच्या; परंतु ओता गांधींच्या परवानगीशिवाय खिमजी त्यांना काही देत नव्हता. या पार्श्वभूमीवर दासींनी राणीचे कान फुंकले. खिमजीला दोरखंडाने बांधून आणण्याची राणीने आज्ञा केली; परंतु तो निसटला आणि त्याने ओता गांधींचं घर गाठलं. त्याची नि:स्पृहता पाहून ओता गांधींनी त्याला आपल्या घरात आश्रय दिला. हे कळल्यावर राणी संतापली. दिवाणाचं घर तोफांनी उडवण्याचा हुकूम तिने सोडला. ते कळताच ओता गांधींनी खिमजीला एका खोलीत बसवलं आणि त्याच्याभोवती ओता गांधींच्या परिवारातले सारे सदस्य वर्तुळाकार बसले. 'राणीच्या लोकांनी माझ्या घराचे दरवाजे तोडले तरी तुझ्या केसाला धक्का लागण्यापूर्वी सर्व गांधी परिवार प्रथम बलिदान करेल,' असं म्हणून ओता गांधींनी खिमजीला अभय दिलं. ही गोष्ट राजकोटच्या ब्रिटिश रेसिडेंटला कळल्यावर त्याने राणीची कानउघडणी केली. त्यानंतर ओता गांधींचं घरदार तोफांनी उडवण्याचा हुकूम राणीने मागे घेतला खरा; परंतु तिने ओता गांधींचं घरदार व मालमत्ता जप्त केली. एका नि:स्पृह शरणागत माणसासाठी बलिदान करण्याचा संस्कार बापूंना ओता गांधींकडून असा मिळाला.

जुनागडला गांधींचं एक वडिलोपार्जित घर होतं. पोरबंदरमधील मालमत्ता राणीने जप्त केल्यावर ओता गांधी तिथे राहायला गेले. ते समजल्यावर जुनागडच्या नबाबाने ओता गांधींना आपल्या दरबारात बोलावलं. तिथे त्यांनी नबाबाला डाव्या हाताने सलाम केला. नबाब रागावला. डाव्या हाताने सलाम केल्याबद्दल त्याने खुलासा विचारला. त्यावर 'उजवा हात अद्यापि पोरबंदरच्या सेवेत अडकल्याने डाव्या हाताने सलाम केल्याचा' खुलासा ओता गांधींनी केला. त्या खुलाशावर नबाब खूष झाला. त्याने ओता गांधींना आपल्या महालाचं कारभारीपद देऊ केलं. इकडे १८४१ साली राणी रुपालीचं निधन झालं. तिच्यानंतर तिचा सज्ञान झालेला मुलगा पोरबंदरच्या गादीवर बसला. त्याने नबाबाच्या मध्यस्थीने ओता गांधींना पुन्हा पोरबंदरला आणलं. त्यांची जप्त केलेली मालमत्ता परत करून पोरबंदरच्या दिवाणपदी त्यांची पुन्हा नेमणूक केली. परंतु स्वाभिमानी ओता गांधींनी राणाने देऊ केलेलं दिवाणपद स्वीकारलं नाही. राणीने ओतांचे चिरंजीव करमचंद गांधी (बापूंचे वडील) यांना पोरबंदरचं कारभारीपद व नंतर दिवाणपद बहाल केलं.

करमचंद गांधी यांना लोक 'कबा गांधी' या नावाने संबोधत. पोरबंदरचं दिवाणपद त्यांनी अतिशय सचोटीने सांभाळलं. त्यांचं शिक्षण गुजराती पाचव्या इयत्तेपर्यंत झालं होतं, परंतु त्यांचं अनुभवजन्य व्यवहारज्ञान अतिशय उच्च होतं. अतिशय अवघड समस्या ते चुटकीसरशी सोडवत. ते राजनिष्ठ, सत्यवादी व नि:स्वार्थी होते. धनाचा लोभ त्यांनी कधी धरला नाही. शासकीय कामात ते अतिशय निपुण होते. वादविवादात ते जनतेला न्याय देत. त्यामुळे ते संस्थानातील प्रजेत लोकप्रिय होते. पुढे एका टप्प्यावर संस्थानं आपली आधारस्तंभ बनावीत यासाठी ती खालसा करण्याचं धोरण इंग्रजांनी बदललं. तसंच १८६४ साली त्यांनी बड्या जमीनदारांना संस्थानिकांचा दर्जा दिला. त्यामुळे काठेवाडात छोटी छोटी २१२ संस्थानं निर्माण झाली. या संस्थानांच्या आपापसातील जमिनीच्या वादांचा निवाडा करण्यासाठी सरकारने १८७३ साली एक न्यायालय स्थापन केलं. त्यावर कबा गांधींची नेमणूक करण्यात आली. राजकोटला राहून वर्षभर त्यांनी या न्यायालयाचं काम पाहिलं. तसंच राजकोट रेसिडन्सीचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. नंतर राजकोटच्या ठाकोरने त्यांना आपल्या संस्थानचं दिवाण केलं. तिथेही एकनिष्ठ राहून त्यांनी निर्भयपणे उत्तम काम केलं. एका ब्रिटिश प्रांताधिकार्‍याने राजा ठाकोरचा अपमान केला, तेव्हा स्वाभिमानी कबा गांधींनी प्रांताधिकार्‍याला चांगलंच झाडलं. संतापलेल्या त्या प्रांताधिकार्‍याने कबा गांधींकडे माफीची मागणी केली; परंतु 'आपण सत्यनिष्ठ असल्याने माफी मागणार नाही' असं सांगून कबा गांधींनी माफी मागायला नकार दिला. परिणामी, अधिकार्‍याने कबा गांधींना अटकेत ठेवलं. मात्र कबा गांधी अजिबात घाबरले नाहीत. काही तास अटकेत ठेवल्यावर त्यांना सोडून देण्यात आलं. सत्यनिष्ठता व निर्भयता ही गांधी परिवाराच्या रक्तातच कशी होती, याचा प्रत्यय या प्रसंगावरुन खचितच येतो.

विशेषतः या घटनेनंतर कुशल प्रशासक म्हणून कबा गांधींची सर्व काठेवाडात कीर्ती पसरली. राजकोटपासून पस्तीस-चाळीस किलोमीटर अंतरावर वाकानेर नावाचं छोटंसं संस्थान होतं, तिथल्या कारभारात अंदाधुंदी माजली होती. कारभारात सुधारणा करण्यासाठी कबा गांधींना वाकानेरला पाठविण्याची विनंती वाकानेरच्या राजाने राजकोटच्या ठाकोरांना केली. ठाकोरांनी ती विनंती मानली. त्यांनी कबा गांधींना आपल्या सेवेतून मुक्त केलं आणि वाकानेरच्या दरबारी पाठवलं. अर्थात या वेळी कबा गांधींनी वाकानेरच्या राजाला एक अट घातली. ते म्हणाले - "आपण पाच वर्षं दिवाणपद सांभाळू; परंतु आपला सल्ला मानला गेला नाही तर मुदतीपूर्वीच आपण दिवाणपदाचं त्यागपत्र देऊ. मात्र ठरलेलं पाच वर्षांचं वेतन आपणास दिलं गेलं पाहिजे. पण जर संस्थानिकाने आपणास मुदत संपण्याअगोदरच निवृत्त केलं तरी पाच वर्षांचं वेतन मिळालं पाहिजे". कबा गांधींच्या या अटी वाकानेरच्या संस्थानिकाने मान्य केल्या. कबा गांधी वाकानेरचे दिवाण म्हणून काम पाहू लागले. त्यांनी वाकानेरची बिघडलेली घडी व्यवस्थित बसवली. पण पुढे त्या संस्थानिकाला दारूचं व्यसन जडलं. कबा गांधींचा सल्ला ते अव्हेरू लागले. अटीचा भंग होताच कबा गांधींनी संस्थानिकाकडे त्यागपत्र पाठवलं. संस्थानिक त्यांना भेटले आणि म्हणाले, "देखो दिवाणसाब, आपको पाच बरसका वेतन तो देता हूँ| ऊपर दस हजार रुपये देता हूँ| लेकिन आप मुझे छोडकर मत जाईये|" पण या विनंतीस मान न देता कबा गांधी घोडागाडीतून पोरबंदरकडे निघाले. रस्त्यात ते विश्रांतीसाठी थांबले असताना गाडीच्या मागील भागातून एक थैली खाली पडली. गाडीवानाने ती कबा गांधींना दिली. थैलीत दहा हजार रुपये होते. कबा गांधींनी घोडागाडी पुन्हा वाकानेरला वळवली. त्यांनी राजाला थैली परत केली. त्या वेळी वाकानेरचा राजा त्यांना म्हणाला, "दिवाणसाहब, शर्त भंग की बात छोड दो| थोडा सोच लो| आपको दस हजार देनेवाला मेरे जैसा कोई नही मिलेगा|" त्यावर 'दस हजार ठुकरानेवाला आपकोभी कहीं नहीं मिलेगा|' या निश्चयी शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त करुन कबा गांधींनी पुन्हा पोरबंदरचा रस्ता धरला. बापूंचे आजोबा आणि वडील असे जीवनमूल्य मानणारे होते, निष्ठावंत, नि:स्पृह व कार्यतत्पर होते, वचनाला जागणारे होते. कोणत्याही मोहाला ते बळी पडले नाहीत. सच्ची जीवनमूल्यं, कार्यदक्षता आणि निष्ठा हे संस्कार बापूंना या दोन्ही पिढ्यांकडून प्राप्त झाले.

खुद्द बापूंनी बालपणी अनुभवलेल्या गोष्टींमधूनही त्यांना जगण्याचे धडे मिळाले होते. गांधींनी लहानपणी 'श्रावणबाळ' नाटक पाहिलं होतं आणि त्यांच्या मनात मातृ-पितृसेवाभाव जागृत झाला होता. कदाचित त्याचमुळे आजोबा ओताबाबा व पिताजी कबा आजारी असताना त्यांच्या सेवेसाठी गांधी शाळेतून पळत यायचे. यातूनच गांधींना आजारी माणसाची सेवा करायची सवय जडली. आजार्‍यांची सेवा करता करता ते रुग्णांचे वैद्य बनले. कबा गांधींकडे अनेक धर्मपंथांचे साधुसंत यायचे. त्यांची धार्मिक चर्चा गांधींच्या कानावर पडायची. अशा चर्चेतून त्यांनी पैगंबरांची कथा ऐकली. पिताजींचे पाय दाबता दाबता त्यांनी रामायण ऐकलं. जैन परिवारांशीही गांधींचे स्नेहपूर्ण संबंध जडले. गांधींजींची माता पुतळाबाई ही उदार संप्रदायाची होती. या संप्रदायाचे मुख्य गुरू अरबी, पारशीतून लिहायचे. त्यामुळे या भाषांचही परिचय गांधींना झाला. गांधींचा परिवार वैष्णव असला, तरी अनेक धर्मांचा आदर करायचा संस्कार गांधींना घरातल्या अशा वातावरणातून मिळाला.

गांधींना लहाणपणापासून नाटक पाहण्याचा छंद होता. त्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असायच्या. एक म्हणजे तिकिटाचे दोन आणे आणि दुसरी म्हणजे पिताजींची परवानगी. एकदा झालं असं, की 'नाटक पाहायला जाऊ का?' असं गांधींनी पिताजींना विचारलं. इच्छा नसतानाही पिताजी 'जा' म्हणाले. गांधी नाटकाला गेले त्या वेळी पिताजी आजारी होते. वेदनेने ते डोके आपटत असल्याची खबर नाटक पाहण्यात गुंग असलेल्या गांधींना नोकराने सांगितली. तेव्हापासून वडील जिवंत असेपर्यंत बापू कधीच नाटकाला गेले नाहीत. अशाच एका प्रसंगी बापूंनी आंबा खाणं सोडलं. निग्रहाची, संयमाची शिकवण बापूंना अशी मिळाली.

नात्यागोत्यातल्याच नाही, तर संपर्कात येणार्‍या प्रत्येकाकडून काही चांगलं शिकण्याचा बापूंचा स्वभाव होता. या मोहनला बालपणी सांभाळायला लहाणपणी रंभा नावाची एक दाई पुतळाबाईंनी म्हणजे बापूंच्या आईने नेमली होती. पुतळाबाईंप्रमाणेच रंभादाई मोहनला 'मोनिया' म्हणायच्या. मोहनची रंभादाईंवर अपार श्रद्धा होती. एकदा या रंभादाईंपाशी मोहनने आपल्या मनातली भीती बोलून दाखवली. ती भीती होती अंधाराची, भुताखेतांची, चोराचिलटांची! मोहनच्या मनातल्या या भीतीबद्दल ऐकल्यावर ररंभादाई म्हणाल्या, "रामनाम जपलंस तर कोणतीच भीती वाटणार नाही". या प्रसंगानंतर रंभादाईंइतकीच रामनामावर बापूंची श्रद्धा जडली. ही श्रद्धा अखेरच्या श्वासापर्यंत टिकली. आई पुतळाबाई यांच्याकडूनही गांधींना अनेक संस्कार मिळाले. पुतळाबाई व्रतनिष्ठ होत्या. त्या पौर्णिमेचं व्रत करायच्या. चंद्र दिसल्यावरच उपवास सोडायच्या. अर्थात पावसाळ्यात चंद्रदर्शनात व्यत्यय यायचा. चंद्रदर्शन झाले नाही, तर त्या उपाशीच राहायच्या. त्या आठवणींविषयी गांधी सांगायचे, "आईने उपाशी राहू नये, तिने जेवावं, म्हणून आम्ही घराच्या गच्चीवर चंद्र पाहायला जयचो. रमझानात मुसलमानांना चंद्रदर्शनाची जेवढी उत्सुकता वाटते तेवढी आम्हाला पावसाळ्यात वाटायची. ढग थोडे विरळ झाले आणि चंद्र दिसला की आम्ही आईला ओरडून सांगायचो; पण ती गच्चीवर येईपर्यंत चंद्र पुन्हा काळ्या ढगाआड जाऊन दिसेनासा होई. चंद्रदर्शन न झाल्याने आईला उपाशी राहावं लागणार याचं आम्हांस दु:ख होई. त्यावेळी आई म्हणे, दु:खी होऊ नका. मी उपवास करावा, अशीच भगवंताची इच्छा आहे.' अशी होती माझ्या आईची व्रतनिष्ठा!" अशा या व्रतनिष्ठ आईवर गांधीजींची अपार श्रद्धा होती. अर्थात आईच्या काही गोष्टी मात्र गांधीजींनी कधी मानल्या नाहीत. 'घरात शौचकूप साफ करणार्‍याला शिवू नको, स्पर्श करू नको', असं पुतळाबाईंनी बापूंना सांगितलं होतं, ते गांधींनी मानलं नाही. आपण घाण करायची आणि ती स्वच्छ करणार्‍याला अस्पृश्य समजून स्पर्श करायचा नाही, हे त्यांना मान्य नव्हतं. बापू त्याला शिवायचे, त्याला धन्यवाद द्यायचे. त्या वेळी बापू अवघे नऊ वर्षांचे होते.

मद्यपान, मांसभक्षण आणि परस्त्रीगमन न करणे याबाबत गांधींनी आपल्या आईला शब्द दिला होता. आईसमोर घेतलेल्या या तीन प्रतिज्ञा गांधीजींनी कटाक्षाने पाळल्या. लंडनला बोटीतून जाताना सागरी प्रवासात प्रचंड थंडी होती. गांधींचा तो पहिलाच प्रवास होता. ते अक्षरशः कुडकुडत होते. बाकी प्रवासी शरीरात ऊब निर्माण करण्यासाठी मद्यपान करत होते. गांधींची ती अवस्था बघून सर्वांनी त्यांना मद्यपान करण्याचा आग्रह केला; पण गांधींनी तो मानला नाही. 'थंडी खूप आहे. दारू प्यायला नाहीस तर थंडीने काकडून मरशील', असंही काही प्रवाशांनी सांगितलं; पण गांधींनी मद्यपान केलं नाही.

असाच आणखी एक प्रसंग. बॅरिस्टरची पदवी घेण्यापूर्वी प्रत्येक पार्टीला उपस्थित राहावं लागत असे. त्या भोजनात मांसाहारावर भर असायचा. पण तिथेही गांधींनी मांसाहार न करण्याची प्रतिज्ञा पाळली. 'लंडनच्या थंडीत मांसाहार केला नाहीस, तर मरशील' अशी पुस्तकातले दाखले देऊन मित्रांनी गांधींना विनंतीही केली; तरी गांधींनी आपली प्रतिज्ञा मोडली नाही. एकदा लंडनमध्ये असताना गांधी गंभीर आजारी पडले. "शरीरात ताकद निर्माण झाली तर आजारातून उठाल. त्यासाठी मांस खावं लागेल", असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. त्यावेळी आईसमोर मांसाहार न करण्याची प्रतिज्ञा केल्याचं गांधींनी डॉक्टरांना संगितलं. तेव्हा "तुमच्या अशिक्षित आईला इंग्लंडमधील हवामान आणि परिस्थिती माहिती नाही, त्यामुळे तिने तुमच्याकडून मांसाहार न करण्याची प्रतिज्ञा वदवून घेतली असेल. परिस्थिती माहीत असती, तर तिने तुम्हाला मांस खाण्यास मनाई केली नसती", असं सांगून डॉक्टरांनी गांधींची समजूत घातली परंतु "आता आईने सांगितलं तरी मी मांस खाणार नाही", असं उत्तर देत गांधींनी मांसाहाराला ठाम नकार दिला. त्यांनी डॉक्टरांना विचारलं, "डॉक्टर, मी मांस खाल्लं नाही तर मरेन आणि खाल्लं तर मरणार नाही, असं तुम्हाला म्हणायचं आहे का?" त्यावर डॉक्टरांनी उत्तर दिलं- "जगणं मरणं तर देवाच्या हतात आहे!" हा संवाद चालू असताना एक नर्स चिकन सूप घेऊन आली व गांधींना देऊ लागली. तेव्हा- "जगणं मरणं तर देवाच्या हतात असेल तर मग मी मांसाहार का करू?" असं म्हणत गांधींनी सूप घेण्याचंही टाळलं. आईला दिलेली शपथ बापूंनी अक्षरशः आपले प्राण पणाला लावून त्या वेळी टिकवून ठेवली.

जी गोष्ट मांसाहाराची नि मद्यपानाची, तीच गोष्ट परस्त्रीगमनाची. इंग्लंडमधील घटना आहे. एकदा शाकाहारी कॉन्फरन्ससाठी गांधी व त्यांचे मित्र सागरकिनार्‍यावरच्या पोर्ट स्मिथ या ठिकाणी राहायला गेले होते. ते खलाशांचं बंदर होतं. तिथे त्यांची एका महिलेच्या घरी निवासी व्यवस्था कर्ण्यात आली होती. अतिथीने अधिक पैसे दिले तर घरातील महिला त्याच्याशी शरीरसंबंध ठेवायला तयार होत, असा रिवाज त्या काळात होता. रात्री जेवण झाल्यावर महिलांबरोबर पत्त्यांचा डाव रंगला. अश्लील विनोद सुरू झाले. त्यातून शरीरचेष्टा सुरू झाल्या, तेव्हा मित्र गांधींना म्हणाला, "अरे, हे तुझं काम नाही. पळ, सूट इथून". हे ऐकून गांधी खूप शरमिंदा झाले. त्यांनी मित्राचे हृदयपूर्वक आभार मानले. आईजवळ केलेली प्रतिज्ञा त्यांना आठवली. त्यांची छाती धडधडू लागली. लटलट कापत ते खोलीत गेले. अक्षरशः शिकार्‍याच्या हातून सुटलेल्या पाखरासारखी त्यांची अवस्था झाली होती. त्यांना रात्रभर झोप नाही आली. विकारवशतेची शक्यता निर्माण करणारा हा बापूंच्या जीवनातला पहिला प्रसंग होता.

दुसरा प्रसंग बापू सुटी साजरी करण्यासाठी ब्रायला या ठिकाणी गेले होते त्या वेळचा आहे. ते एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तिथे मेन्यू फ्रेंच भाषेत लिहिला होता. बापूंना फ्रेंच वाचता येत नव्हतं. ते मेन्यूकार्ड पाहत राहिले. पण त्यांना पदार्थांची नावे कळत नव्हती. खाण्यासाठी काय मागवावं कळत नव्हतं. तेवढ्यात त्यांच्यासमोर एक वृद्ध महिला येऊन बसली. मेन्यूकार्ड पाहून तिने स्वतःसाठी जेवण मागवलं. तिचं जेवण झालं तरी गांधी आपले बसून होते. हा माणूस खाण्यासाठी काही मागवत नाही, नुसताच खूर्चीवर बसून आहे, याचं त्या म्हातारीला नवल वाटलं. न राहवून ती म्हणाली, "माझं खाणं झालं तरी तू असा बसून का राहिला आहेस?" त्यावर बापूंनी आपली भाषेची अडचण तिला सांगितली. शेवटी म्हातारीने मेन्यूकार्डातल्या शाकाहारी पदार्थांची यादी बापूंना वाचून दाखवली, पदार्थ मागवले आणि अडचण सोडवली.

खाणं चालू असताना दोघांचा संवाद सुरू झाला.
वृद्धा : तू कुठे राहतोस?
बापू : लंडनमध्येच.
वृद्धा : काय करतोस?
बापू : बॅरिस्टरी.

त्या वृद्धेला गांधींबद्दल आत्मीयता वाटली. गांधींना तिने आपल्या घरी भोजनाचं निमंत्रण दिलं. गांधींनी ते स्वीकारलं. ठरलेल्या वारी, दिलेल्या पत्त्यानुसार गांधी म्हातारीच्या घरी गेले. म्हातारीची एक तरूण भाची घरात होती. म्हातारीने तिच्याशी बापूंचा परिचय करून दिला. 'मी भोजन तयार करते, तोपर्यंत तुम्ही बाहेर फिरून या,' असं म्हातारीने गांधींना सांगितलं. पुढच्या रविवारीही म्हातारीने गांधींना पुन्हा भोजनाचं आमंत्रण दिलं. त्यावर मात्र बापूंचं आत्मचिंतन सुरू झालं. त्यांच्या मनात आलं - 'आपण अविवाहित आहोत असं समजून भाचीबरोबर आपला दाट परिचय व्हावा यासाठी म्हातारीने आपल्याला भोजनाचं आमंत्रण दिलं असावं. खरं तर आपण विवाहित आहोत, हे आपण तिला अगोदरच सांगायला हवं होतं. आपण तसं सांगितलं नाही. आपण म्हातारीची फसवणूक केली'. या विचारांमुळे बापूंना अपराधी वाटू लागलं. तरीही मनातून त्यांना म्हातारीकडे जायला आवडायचं. पुढचा रविवार कधी येतो, याची ते आतुरतेने वाट बघत असत.

शेवटी न राहवून बापूंनी म्हातारीला एक चिट्ठी पाठवली : 'तुमचं आमंत्रण मला गोड वाटतं. पुढचा रविवार येण्याकडे मी डोळे लावून बसलेला असतो. तुम्हांला सांगायची गोष्ट म्हणजे मी विवाहित आहे. मला एक मुलगा आहे. त्याला भारतात सोडून मी इकडे आलो आहे. हे सर्व कळल्यावर तुम्ही मला भोजनाचं आमंत्रण दिलं नाही तरी मला वाईट वाटणार नाही. बोलावलं तर मी येईन'. ही चिट्ठी वाचून 'तू जरूर ये, तुझी तंगडीच खेचते' असं उत्तर म्हातारीने पाठवलं. बापूंचे या वृद्धेबर्प्बरचे सौहार्दाचे संबंध पुढेही कायम राहिले. गांधी भारतात परतल्यानंतरही त्यांचा पत्रव्यवहार चालूच राहिला.

महात्म्याची अखेर

महाभारतातल्या अखेरच्या पर्वात युधिष्ठिराची जी अवस्था झाली असेल तशी अवस्था गांधीजींच्या अखेरच्या काळात झाली होती. जीवनातल्या निष्फलतेच्या कालखंडात ते पोहोचले होते. सत्याच्या एकेका शिखरावर आरोहण केलेलं एकेक स्वप्न भग्न होत होतं. अखेर गांधी कट्टरतेचे शिकार झाले आणि ख्रिस्त व सॉक्रेटिसच्या रांगेत जाऊन बसले.

ज्या वेळी धर्म संकुचित शाखेत विभागला जातो, त्या वेळी त्याला संप्रदाय म्हणतात. संप्रदाय आदेशावर चालतो. संप्रदायाशी ममत्व जुळतं त्या वेळी तो कट्टरतेपर्यंत पोहोचतो. संप्रदायात आर्थिक व राजनैतिक स्वार्थ निर्माण झाला की कट्टरता अधिक प्रदुषित होते, भयानक स्वरूप धारण करते. हिंसा हेच मग कट्टरतेचं माध्यम बनतं. अशा कट्टरतेचा भोग देशाने भोगला, गांधीजींनी भोगला. हिंदूंमधला कट्टर जातीयवाद, मुसलमानांची संकुचित सांप्रदायिकता व समस्या वाढवत नेण्याचं इंग्रजांचं धोरण या त्रिकोणातून निर्माण झालेल्या साडेसातीने गांधीजींचा बळी घेतला.

गांधींची अखेरची दोन्ही उपोषणं हिंसेची आग शमवण्यासाठी झाली. एक कलकत्यात व दुसरं दिल्लीत. कलकत्यात शांतता प्रस्थापित करून गांधी पंजाबला जाणार होते; परंतु दिल्लीत हिंसेची आग भडकल्याने त्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं. ९ सप्टेंबर १९४७ ला गांधी दिल्लीला आले. दिल्लीत लोक एकमेकांची घरं जाळताना सरेआम दिसत होते. दिल्ली सोडून गेलेल्यांची घरं शरणार्थींनी बळकावली होती, मशिदींचा कब्जा घेतला होता. भडकत्या आगीत उडी टाकून बापू व त्यांचे सहकारी दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत होते. शांतता प्रस्थापित करणा-यांवर गोळीबार होत होता. जखमींना रुग्णालयात नेणार्‍यांवर हल्ले होत होते. पण न डगमगता बापू व त्यांच्या सहकार्‍यांचं शांतिकार्य चालू होतं. त्यांनी घायाळांना आपल्या हृदयाशी कवटाळलं, शरणार्थींना आधार दिला. दिल्लीत काही काळ शांतता निर्माण झाली. शरणार्थींच्या छावणीत फिरत असताना एक निर्वासित गांधींवर भडकला. “तुमच्यामुळे आमची दुर्दशा झाली, कृपया तुम्ही हिमालयाचा रस्ता पकडलात तर आमच्यावर कृपा होईल", असं तो रागाने बोलला. “कुणाच्या सांगण्यामुळे मी हिमालयात का जावं?" असा प्रश्न बापूंनी करताच बाकीचे शरणार्थी भडकले. त्यांनी बापूंना लाखोली वाहिली. तरी बापू शांत राहिले. त्यांना म्हणाले,“ मला हिमालयातली शांती नको आहे. मला दु:ख आणि संकटातून निर्माण होणारी शांती पाहिजे. माझा हिमालय इथेच आहे. तुमचं दु:ख-वेदना मी जाणतो. त्यात मी पूर्णपणे सहभागी आहे. परमेश्वर दाखवेल त्या मार्गाने चालत लोकसेवेचं व्रत मी अवलंबलं आहे. त्या परमेश्वराला माझं जे करायचं ते तो करेल. त्याला वाटलं तर तो माझं जीवन संपवेल; पण मी माझं व्रत सोडणार नाही". या प्रसंगानंतर काही मौलवी बापूंना भेटले. म्हणाले, “आम्हांला पाकिस्तानात जायचं नाही. हिंदुस्थानातच आमचा जन्म झाला. हीच आमची मातृभूमी आहे. आम्हाला इथेच राहायचं आहे. पण आम्ही हिंदुस्थानात जगू शकत नाही, अशी परिस्थिती आहे, आम्हाला इंग्लंडला पाठवा". हे ऐकल्यावर बापू बेचैन झाले. दिल्लीतली शांतता वरवरची असल्याचं त्यांना जाणवलं. या पार्श्वभूमीवर दिल्लीत कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होईपर्यंतचं उपोषण गांधींनी सुरु केलं.

उपोषणाचा एक चांगला परिणाम झाला. दिल्लीतील भोजनालयं मालकांनी बंद ठेवली. एक लाख शरणार्थींनी उपवास करून गांधींच्या उपोषणाला पाठिंबा दिला. कट्टर हिंदू-मुस्लिमही उपोषणात सहभागी झाले. भीतीपोटी दिल्लीतून पलायन केलेले मुसलमान पुन्हा दिल्लीत आले. याच कालखंडात पाकिस्तानी सैन्याच्या पाठिंब्याने सरहद्द प्रांतातले लोक काश्मीरमध्ये घुसले. आपलं संस्थान भारतात विलीन करायचं की पाकिस्तानात, याचा निर्णय काश्मीरच्या राजाने तोवर घेतलेला नव्हता. ‘बळकावलेला प्रदेश सोडल्याशिवाय करारात ठरलेले पंचावन्न कोटी रुपये आम्ही पाकिस्तानला देणार नाही,’ अशी भूमिका नेहरू व पटेलांनी घेतली होती. माऊंटबॅटन यांना तो वचनभंग वाटला. त्यांनी ही गोष्ट गांधींच्या कानावर घातली. भारत व पाकिस्तान या दोन देशांतला हा आंतरराष्ट्रीय करार होता. याचा भंग झाला तर जगात देशाची बदनामी होईल, याची चिंता गांधींना वाटत होती. आपली चिंता त्यांनी नेहरू-पटेलांना सांगितली. पण गांधींचं उपोषण केवळ त्यासाठी नव्हतं. गांधींच्या शांती व सद्भावनेच्या प्रस्थापनेला पोषक ठरावं यासाठी ठरलेले पंचावन्न कोटी रूपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला. दिल्लीतल्या सर्व धार्मिक, सामाजिक व राजकीय संस्थांनी कायमस्वरूपी शांततेची हमी गांधींना दिली. त्यानंतर गांधींचं पाच दिवसांचं अखेरचं उपोषण १८ जानेवारीला सुटलं आणि पुढे ३० जानेवारीला त्यांचा बळी घेतला गेला.

गांधींनी मुसलमानांचं तुष्टीकरण केलं, त्यांची बाजू घेतली, हिंदूंवर अन्याय केला, देशाची फाळणी केली, इत्यादी आरोप गांधींवर पूर्वीच लादण्यात आले होते. पाकिस्तानला पंचावन्न कोटी रूपये देण्यात आले, या नवीन आरोपाची त्यात भर पडली. त्यामुळे त्यांची हत्या झाली, हा प्रचार करून संबंधितांनी त्यांच्या हत्येचं समर्थन केलं. पाकिस्तानला पंचावन्न कोटी दिले नसते तर गांधींची हत्या झाली नसती, असं सांगण्यात आलं. या बाता म्हणजे इतिहास लपवण्याची युक्तीच म्हणायला हवी !

त्या काळी चिंतामणराव देशमुख हे रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर होते. त्यांनी म्हटलं आहे - ‘पंचावन्न कोटी रूपये देण्याचा निर्णय फाळणीच्या करारावर नमूद करण्यात आला होता. काहीही झालं असतं तरी ते द्यावेच लागले असते. संपत्तीचा किती हिस्सा कोणाला द्यावा, हे करारात नमूद करण्यात आलं होतं. तो करार एक प्रकारचा वचननामा होता. त्याचं पालन करणं गरजेचं होतं'.

मुसलमानांना साथ दिल्याचा आणि हिंदूंवर अन्याय केल्याचा गांधींवरचा आरोपही साफ खोटा आहे. माणूस कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याचं दु:ख निवारण करण्यासाठी गांधी धावून गेले. १९१५ साली गांधी भारतात आले होते. त्यापूर्वी दक्षिण अफ्रिकेत त्यांनी केवळ हिंदू व मुसलमान नाही, तर यहुदी, ख्रिस्ती, पारशी या सर्व धर्मातील पीडितांचं नेतृत्व स्वीकारलं होतं. सर्व धर्मियांना आसरा दिला होता. नौखालीत हिंदूंची हिंसा झाली तेव्हाही त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जीव धोक्यात घालून गांधी नौखालीत गेले होते. गावागावात फिरले होते. हिंदूंना त्यांनी निर्भयतेची प्रेरणा दिली होती. अर्थात ‘गांधींनी मुसलमानांचे लाड केले’ असं म्हणणारी मंडळी हे सर्व सोयीस्करपणे विसरतात. फक्त बिहार व दिल्लीची उदाहरणं सांगतात, खरं तर हिंदू व मुस्लिमांतील कट्टरपंथीयांच्या प्रस्थापित हिताआड गांधी येत असल्याने ते गांधींवर नाराज होते. कट्टरवाद्यांना ऐक्य नको होतं. कट्टर हिंदुत्ववाद्यांनी तर गांधींच्या सांप्रदायिक सद्भावाशी व समन्वयाशी उभा दावा मांडला होता. जनतेवरील गांधींचा प्रभाव त्यांना सहन होत नव्हता. गांधींना संपवणं, हाच एकमेव मार्ग त्यांना दिसत होता.

स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून कट्टरवादी गांधींच्या जिवावर अक्षरश: टपून बसले होते. चौदा वर्षात सहा वेळा गांधींचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला होता. पुण्यात गांधींच्या गाडीवर बॉम्ब टाकण्यात आला होता. त्यात गांधी बचावले; परंतु सात-आठ लोक जखमी झाले होते. नेरळला गांधी प्रवास करत असलेली ट्रेन उलटवण्याचा प्रयत्न झाला होता. पाचगणीत ‘गांधी मुर्दाबाद’च्या घोषणा झाल्या. गडबड झाली. ते मी स्वत: पाहिलं आहे. त्या वेळी ज्याला अटक झाली त्याच्या पिशवीत मोठा सुरा सापडला होता. तो नथुराम गोडसे होता. तो ‘अग्रणी’ नावाचं साप्ताहिक काढायचा. ‘मी एकशे पंचवीस वर्ष जगेन’ असं गांधींनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्या वेळी ‘पण जगू देईल कोण?’ या शीर्षकाचा लेख गोडसे याने ‘अग्रणी’त लिहिला होता.

१९४४ सालची घटना आहे. मुंबईत गांधी व जीनांची भेट होणार होती. या भेटीला काही लोकांचा विरोध होता. त्यात हैद्राबादचे खाकसार लोकही होते. विरोध करणार्‍यांचं एक दल वर्ध्याला पोहोचलं होतं. त्यांच्या कारवायांचा सुगावा कलेक्टरला लागला होता. तेव्हा ‘गांधींना वर्ध्यात रोखण्यासाठी काही लोक आले आहेत’, गांधींच्या गाडीचं टायर फोडणार आहेत’, ही बातमी कलेक्टरने फोनवरून सेवाग्राम आश्रमात गांधींचे सचिव प्यारेलाल यांना कळवली होती. प्यारेलालजींनी ती गांधींना सांगितली होती. त्यावर वर्धा स्टेशनपर्यंत पायी जाण्याचं गांधींनी ठरवलं. या दलातल्या नेत्याने गांधींना भेटण्याचा निरोप पाठवला. गांधींनी त्या नेत्याशी चर्चा करण्याचा उलट निरोप धाडला. काही मार्ग काढायचा असेल, तर आमच्या नेत्याऐवजी गोडसेबरोबर चर्चा करा, तेच आमचे जमादार आहेत, असं अटक झालेल्या थत्ते नावाच्या इसमाने सांगितलं होतं. त्याच्याजवळचा धारदार सुरा पोलिसांनी जप्त केला होता. या सर्व घटनांवरून दिसतं की गांधीहत्या हे एक षडयंत्र होतं. अनेक वर्ष शिजत असलेल्या कटाचा तो एक भाग होता.

१८ जानेवारीला गांधींचं उपोषण सुटलं आणि २० जानेवारीला बिर्ला भवनात त्यांच्या प्रार्थनासभेत बॉम्ब फेकण्यात आला. गांधींपासून दोनशे फुटांवर त्याचा स्फोट झाला. त्यात कुणी जखमी झालं नाही. स्फोटाने गांधीजी विचलितही झाले नाहीत. सर्वांना शांत राहण्यास सांगून त्यांनी प्रार्थना पूर्ण केली. त्यानंतर केलेल्या भाषणात ‘असं कृत्य देशाला व हिंदू धर्माला घातक आहे. त्या तरूणाला आपली चूक कळेल. त्याचा पोलिसांनी छळ करू नये,’ असं गांधींनी सांगितलं होतं. बॉम्ब फेकणार्‍या मदनलाल पालवा या तरूणाला अटक करण्यात आली. त्याने कटाची सर्व माहिती सांगितली होती; पण कटाचा योग्य दिशेने तपास झाला नाही. बिर्ला भवनात येणार्‍यांची तपासणी करण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्याचा आदेश सरदार पटेलांनी दिल्ल्लीच्या पोलिसप्रमुखांना दिला. गांधींनी त्याला नकार दिला. दिलेली सुरक्षा त्यांनी नाकारली. मृत्यूसह कशालाही ते घाबरत नव्हते. कुणाचीही त्यांना भीती वाटत नव्हती.

३० जानेवारीचा दिवस उगवला. दुपारी वल्लभभाई पटेल गांधींना भेटायला आले. जवाहरलाल नेहरू व वल्लभभाईंत काही मतभेद असल्याचं एव्हाना गांधींच्या कानावर आलं होतं. वल्लभभाईंच्या खांद्यावर हात ठेवत गांधी म्हणाले होते, "आपल्यात आणि जवाहरलालमध्ये काही मतभेद असेल तर देशाच्या भल्यासाठी सर्व विसरून एकसाथ राहावं. जवाहरलाललाही मी हेच सांगेन". हाच सल्ला प्रार्थना संपल्यावर नेहरूंना बापू देणार होते. आणखी एका गोष्टीविषयी इथे बोलावंसं वाटतं. गांधींनी सरदारांना पंतप्रधान न बनवता नेहरूंना पंतप्रधान केलं, याची चर्चा नेहमी होताना दिसते. असं म्हटलं जातं, की कॉंग्रेसने नेमलेल्या समितीने पंतप्रधानपदासाठी पटेलांचं नाव सुचवलं होतं. गांधींनी त्यांचं नाव उचलून धरलं असतं तर सरदार पटेल पंतप्रधान झाले असते. खरं तर गांधींनी कुणालाही पंतप्रधान बनवलं नव्हतं. कॉंगेस कमिटीने एकमताने आपला नेता निवडला होता. १९४५ नंतर कॉंग्रेस गांधीजींचा सल्ला मानत नव्हती आणि त्या पार्श्वभूमीवर ’माझं आता कुणी ऐकत नाही’ असे निराशेचे उद्गार स्वत: गांधींनी काढले होते.

स्वातंत्र्यानंतर ’देशाची स्थिरता’ हा गांधींचा मुख्य विषय होता. सरदारांचं वय झालं होतं. त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. ते गांधींचे पेशंट होते. गांधींचे निसर्गोपचार त्यांच्यावर चालू होते. पटेलांना अटक झाली त्या वेळी ’मी त्यांची चिकित्सा करतो. त्यांना माझ्याबरोबर ठेवा’ , असं पत्र गांधींनी गव्हर्नरला लिहिलं होतं. त्यांच्या प्रकृतीची गांधींना चिंता वाटत होती. पंडित नेहरू हे पटेलांच्या तुलनेत जवान व धडधाकट होते. पंतप्रधान अधिक काळ टिकले नाहीत तर वारसाबद्दल कटकटी निर्माण होतात, देशाच्या स्थिरतेला धोका निर्माण होतो, हा विचार गांधींनी केला होता. म्हणून नेहरूंना पंतप्रधान केल्यावर गांधींजींनी त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. सरदार पटेल हे सैनिकी बाण्याचे होते. कोणत्याही पदावर राहून देशसेवा करण्याची त्यांची वृत्ती होती. नंतर पंडित नेहरू सतरा वर्षं पंतप्रधान राहिले. सरदार पटेलांचं स्वातंत्र्यानंतर अडीच वर्षांत निधन झालं. नेहरूंनी देशाला स्थिरता दिली, हे कुणी नाकारू शकत नाही.

३० जानेवारीच्या दिवशी गांधीजी नेहरूंची प्रतीक्षा करत होते. प्रार्थनेला थोडा उशीर झाला होता. पटेलांना सांगून ते पाच वाजून दहा मिनिटांनी बिर्ला भवनातल्या प्रार्थनास्थळी जाण्यासाठी उठले. लोक अगोदरच जमले होते. जानेवारीतल्या थंडीचे दिवस होते. बापूंच्या खांद्यावर चादरीसारखं वस्त्र होतं, परंतु छाती उघडी होती. गांधी येताना दिसल्यावर हात जोडत लोक उभे राहिले. प्रार्थनास्थळी जाण्यासाठी गांधींना त्यांनी वाट करून दिली.

दरम्यान, सावजाची वाट पाहत बसलेला नथुराम गोडसे उठला. खिशातलं पिस्तूल लपवत धक्के मारत तो पुढे सरकला. गांधीजींचा एक हात मनूच्या खांद्यावर होता. लोकांना नमस्कार करण्यासाठी तो हात त्यांनी काढला. हात जोडून ’नमस्ते’ म्हणत नथुराम खाली वाकला. गांधींना प्रार्थनेसाठी उशीर होतोय म्हणून मनूने त्याला सूर सारण्याचा प्रयत्न केला. मनूला धक्का मारून त्याने खिशातलं पिस्तुल काढलं. गोडसे गांधींसमोर आला. त्या वेळी सुहास्य वदनाने गांधीजींनी हात जोडले होते. जणू भक्त यमदुताला भेटण्यासाठी अधीर झाला होता, असा भाव त्यांच्या चेहर्‍यावर होता. नथुरामने विलक्षण चापल्याने नि:शस्त्र भगवद्भक्तावर तीन गोळ्या झाडल्या. त्या गोळ्या बापूंच्या उघड्या छातीत घुसल्या. वयाच्या ७९च्या वर्षी तो महामान्व खाली कोसळला. ’हे राम’ हे अखेरचे शब्द उच्चारून या महामानवाने अखेरचा श्वास घेतला!

"बिछान्यावर पडून मृत्यू पावलो तर हा माणूस ’महात्मा’ नव्हता असं समजा. प्रार्थनेस जाताना कुणी गोळ्या झाडल्या, तर मरताना रामनाम मुखातून यावं आणि मारणार्‍याबद्दल मनात कटुता नसावी", हे आपलं मनोगत बापूंनी मनूला वर्षभरापूर्वी याच दिवशी म्हणजे ३० जानेवारी १९४७ रोजी सांगितलं होतं. त्यानंतरही अनेकांजवळ आपल्या मृत्यूबद्दलचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं होतं. मृत्यूच्या एक दिवस अगोदरही हेच विचार त्यांनी मनूजवळ बोलून दाखवले होते. बापूंनी जसं मनोगत व्यक्त केलं होतं तसाच मृत्यू त्यांना आला. यालाच इच्छामरण म्हणतात.

गांधीजींचा अचेतन देह चादरीने झाकला होता. मनू रडत होती. सरदार वल्लभभाई पटेल सुन्नपणे बसलेले होते. त्या दरम्यान व्हाईसरॉय माऊंटबॅटन आले. त्यांनी मनूला शांत केलं. बापूंच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन ते खुर्चीवर बसले. माऊंटबॅटन यांच्या पाठोपाठ पंडित नेहरू आले. रक्तरंजित चादरीत डोकं खुपसून ते ढसाढसा रडू लागले. सरदार पटेलांनी नेहरूंच्या पाठीवरून हात फिरवून त्यांचं सांत्वन केलं. माऊंटबॅटन यांनी नेहरू - पटेलांच्या खांद्यावर हात ठेवला. "हा माणूस सत्यासाठी जगला आणि सत्यासाठी मरण पावला. मृत्यू त्यांच्यासाठी सद्भाग्य परंतु आपल्यासाठी दुर्भाग्य आहे", असं मनोगत व्यक्त करून माऊंटबॅटन पुढे म्हणाले होते, "दोन दिवसांपूर्वी गांधीजींची व माझी शेवटची भेट झाली होती. नेहरू - पटेलांनी हातात हात घालून देश चालवला पाहिजे. माझ्यापेक्षा तुम्हांला ते दोघंही जास्त मानतात. दोघांनाही तुम्ही समजावून सांगा, असं गांधीजींनी मला सांगितलं होतं". पुढे बापूंचा शब्द नेहरू - पटेलांनी पाळला.

गांधी नावाच्या महामानवाकडे कोणतंही राजनैतिक पद नव्हतं. कोणत्याही धर्माचा तो गुरू नव्हता. कोणत्याही संप्रदायाचा प्रमुख नव्हता. पण त्याच्या मरणाचं दु:ख सार्‍या जगाने अनुभवलं. अमेरिकेत एक मुलगी भोजन करत होती. रेडिओवर तिने गांधीहत्येची बातमी ऐकली. बातमी ऐकताच ती ताटावरून उठली आणि गांधीजींसाठी प्रार्थना करायला बसली. फ्रान्सचा एक समाजवादी नेता म्हणाला होता, "मी त्यांना कधी पाहिलं नाही, त्यांची भाषा मी जाणत नाही; परंतु गांधी जाण्याने माझ्या घरचा कोणी माणूस गेल्याचं दु:ख मला झालं".

बापूंसाठी अक्षरश: सारं जग रडत होतं, पण भारतातील कट्टरवाद्यांत मात्र आनंदाचं वातावरण होतं. गांधीहत्येला वध मानून हत्येचं समर्थन व उदात्तीकरण करण्यात आलं होतं. यासारखी घृणास्पद गोष्ट दुसरी नव्हती. आपल्या पाकिस्तानी दौर्‍याच्या तयारीसाठी बापूंनी डॉ. सुशीला नायर यांना लाहोरला पाठवलं होतं. पण त्याच वेळी बापू जग सोडून गेले. त्या पार्श्वभूमीवर एक पाकिस्तानी नेता डॉ. सुशीलांना म्हणाला होता, "गांधीजींच्या हत्येला आपण सर्व जबाबदार आहोत. कारण विभाजन न करण्याचा त्यांचा विचार आपण मानला नाही".

नानाजी देशमुखांनी आयुष्यभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम केलं. एकदा त्यांची भेट झाली असता ते मला म्हणाले होते, "ज्यांच्यावर गांधींच्या खुनाचा आरोप होता त्या आरएसएसचा मी नानाजी देशमुख तुम्हाला सांगतो, की पाच हजार वर्षांचा इतिहास मी वाचला आहे. त्यात एक माणूस असा मिळाला, की त्याने जे काम हाती घेतलं ते समर्पण भावनेने केलं. तो माणूस ’महात्मा गांधी’ होता". नानाजींसारख्या माणसालाही गांधींची समग्रता स्पर्श करते यातच काय ते आलं!

अर्थात, कुणी काय म्हणावं यावरून मोहनदास करमचंद गांधी या माणसाची महानता ठरत नाही. खुद्द गांधींनीही कधी या गोष्टीला मह्त्त्व दिलं नाही. आपला ’आतला आवाज’ जे सांगतो त्याबरहुकुम ते वागत राहिले. १९४८पर्यंत गांधींनी तीस उपोषणं केली, पण ती काही कुणाच्या सांगण्यावरून केली नाहीत, आतल्या आवाजाच्या प्रेरणेतून केली. आतला आवाज जिवंत असणं, तो ऐकणं, त्यानुसार वागणं, या सार्‍यातच गांधींचं माहात्म्य दडलं होतं.

****************

अज्ञात गांधी

लेखक - श्री. नारायणभाई देसाई
रूपांतर - श्री. सुरेशचंद्र वारघडे

समकालीन प्रकाशन
पृष्ठसंख्या - १७३
किंमत - रुपये २००

मायबोली खरेदीमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/Adnyat-Gandhi.html

***************

टंकलेखन साहाय्य - rar, साजिरा, श्रद्धा

***************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे वडिल संघाचे कार्यकर्ते होते. मी त्यांना एकदा विचारल की संघाने १९४८ साली बंदी उठवल्यानंतर किंवा संघाच्या नेत्यांनी गांधीवधाच्या बदनामीकारक खटल्यातुन निर्दोष सुटका झाल्यानंतर तत्कालिन सरकारवर अब्रुनुकसानीचे खटले का नाही भरले ?

स्वातंत्र्यविर सावरकरांसारखे किती चांगले लोक यात भरडले गेले ?

यावर माझे वडिल म्हणाले काँग्रेसचे लोक म्हणजे काही गोरे नाहीत देश लुटायला आलेले. आपलेच भाऊ ते. मोठ्या किंवा धाकट्या भावाने चुक केली म्हणुन आपण असे वागलो तर भारतमातेला वैभवाला पोचवण्याच्या मुख्य उद्देशापासुन आपण लांब जाउ हा विचार त्यांना त्यांच्या त्या काळातल्या जेष्ठानी शिकविला होता. संघबंदीविरुध्दच्या सत्याग्रहात भाग घेतल्याने त्यांची शाळा शिक्षकाची नोकरी गेली. या विरुध्द उभ्या आयुष्यात वैषम्य वाटुन घेतल नाही. ते म्हणायचे संघ द्वेश हे फॅड आहे. संघटना न बांधु शकणारे व न टिकवु शकणारे अनेक या मार्गाने गेले. आपण विचलीत होऊ नये.

काँग्रेसमध्ये ही द्रष्टे लोक होते व आहेत. काँग्रेसला हरवु शकण्याची ताकद एकट्या संघाच्या विचारात आहे हे त्यांनी जाणले होते म्हणुन हा संघद्वेश रुजला. अर्थातच आणिबाणीत आणि रामजन्मभुमी आंदोलनकाळात याची चुणुक कॉग्रेसने पहिली हे ही थोडके नसे.

गांधीजींच्या विचारांना विरोध करत रहाणार ते केवळ नवीन पिढीने समजुन उमजुन विचार घ्यावेत यासाठी. गांधीजींच्या हत्येच मात्र समर्थन करणार नाही. माझ्या ही लेखी हा विषय संपला आहे.

>> परंतू मोठ्या प्रमाणावर समाजात मिसळून काम करणे हे संघाला यशस्वीरित्या जमले नाही.
मान्य. ह्याच कारण अस आहे की संघाची पोलादी शिस्त, विशुद्ध चारित्र्य सगळ्यांना झेपणार नाही.
>> तसेच संघटनेवर प्रचंड निष्ठा व अनेकदा ती आंधळी होणे हे संघटनेचे अपयशच आहे.
अमान्य.
>> आज ८० वर्षांनंतरही संघ कमकूवत का आहे ...
१. जगातील सगळ्यात मोठी गैर सरकारी संघटना.
२. संघप्रेरित देशातील क्र. १ च्या संघटना: अ. भा. वि. प., मजदूर संघ, वनवासी कल्याण आश्रम
३. ५ वर्षे खरखुर गैर कॉग्रेसी सरकार चालवणारे पंतप्रधान, गृहमंत्री. अंदाजे १० राज्यात मुख्यमंत्री.
तीन अन्याय्य सरकारी बंद्यांमधून तावून सुलाखून बाहेर निघालेली, ५३ वेगवेगळ्या संघटना चालवणारी मातृसंस्था कमकुवत??
ध्येय अजून खूप लांब आहे - पण संघटनेला कमकुवत म्हणणे हास्यास्पद आहे.
विषयांतराबद्दल माफी. पण उगीच संघाला नको तिथे गोवलत तर उत्तर देण भाग आहे.

BTW, भगतसिंग समाजवादी (socialist) होते कम्युनिस्ट नाही - प्रचंड तफावत आहे. >>>>>
समाजवादी म्हणजे एस एम जोशी, साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन ते राममनोहर लोहिया, जेपी असा स्पेक्ट्रम (पट्टा) येतो.. तुम्हाला भगतसिंग ह्या पट्ट्यात बसत होते असे म्हणायचे आहे का? माझ्या माहितीप्रमाणे भगतसिंग हे लेनिनवादी साम्यवादी होते. भगतसिंग हयात असताना लेनिनची व त्यानंतर इतरांनी वाढवलेली जी क्रांतीची विचारधारा व शास्त्र होते त्यावर भगतसिंगाचा विश्वास होता/ते ह्या विचारधारेचे समर्थक होते.

>>>>>> वरील विधान हा संघवाले केवळ राष्ट्राशी बांधील आहेत आणि विचारधारानिरपेक्ष व्यक्तिच्या राष्ट्रोन्नतीतील सहभागाचा आदर करणारे आहेत ह्याचा पुरावा नाही काय? >>>> नक्कीच आहे. म्हणुनच प्रातःस्मरणात गांधीजी/आंबेडकर/भगतसिंग ह्यांना स्थान आहेच. पण ह्याचा अर्थ सर्व स्वयंसेवक हे ह्या सर्व व्यक्तिंना त्यांचे योग्य ते स्थान देतात असा नाही. गांधीजी प्रात:स्मरणात असूनदेखील गांधीद्वेष हा चांगल्यापैकी दिसतो. संघात नेहेरुंना सुद्धा जिथे पाहिजे तिथे श्रेय खुल्या मनाने दिले जात नाही.

गांधीजींना भगतसिंग आणि सुभाषचंद्र बसू ह्या दोघांच्या राष्ट्रभक्तिबद्दल शंका नसावी, मार्गांबद्दल मतभिन्नता नक्कीच होती.. आणि सुभाषबाबू पहिल्यांदाच जेव्हा कॉन्ग्रेसचे अध्यक्ष म्हणुन निवडून आले तेव्हा ते अहिंसक कॉन्ग्रेसचे सदस्य असूनदेखील पुढे ते हिंसात्मक संघर्षाचा मार्ग निवडायची शक्यता आहे हा गांधीजींचा होरा अचूकच ठरला नाही का? मग गांधीजी आपल्या मतप्रणालीस ठाम चिकटून राहिले हा त्यांचा अपराध कसा होतो?

भगतसिंग "सोशालिस्ट" रेपब्लिकन आर्मी चे सदस्य होते - त्यांची प्रेरणास्थाने शिवाजी, राणा प्रतापांपासून जगभरातील अनेक क्रांतीकारक होते. ते कम्युनिस्ट कसे काय?

>> सुभाषबाबू पहिल्यांदाच जेव्हा कॉन्ग्रेसचे अध्यक्ष म्हणुन निवडून आले तेव्हा ते अहिंसक कॉन्ग्रेसचे सदस्य असूनदेखील ..
अहिंसक कॉग्रेस?? तेव्हा कॉग्रेस जहाल आणि मवाळ अशा गटात विभागली गेली होती. सुभाषबाबू त्यांच्या राजकिय जन्मापासून जहाल होते. ही बाब त्यांनी न लपविता ते कोग्रेसचे लोकशाही मार्गाने अध्यक्ष झाले. पुढे गांधी-नेहरु दुकलिच्या जाचाला कंटाळून त्यांनी कॉग्रेस सोडली. ही गांधींची वैचारिक हूकूमशाही नव्हे काय? मतप्रणालीला चिकटून रहाणे आणि आपली मते दुसर्याने मानली नाहीत तर त्याची राजकिय कारकिर्द होत्याची नव्हती करणे ह्यातला फरक ओळखा.

तरीही मला असे वाटते की हा बाफ अक्षरवार्ताचा आहे आणि केवळ पुस्तक परिचय हाच याचा मुख्य हेतू आहे. बाकीची चर्चा वेगळ्या बाफवर होऊ शकते.

या अश्विनीताईंच्या विधानाला अनुमोदन.

ग्वालियर, मध्य प्रदेश : दोन दिवसांपूर्वी अखिल भारतीय हिंदू महासभेकडून आपल्या ग्वालियर कार्यालयात 'गोडसे ज्ञानशाळा' नावानं एक वाचनालय उघडण्यात आलं होतं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या नावानं उघडलेल्या या वाचनालयामुळे परिसरात तणावाचं वातावरण परसलं होतं. मात्र, मंगळवारी ग्वालियर जिल्हा प्रशासनानं हस्तक्षेप करत हे वाचनालय बंद केलं.

तर, 'हिंदू महासभेच्या सदस्यांसोबत एक बैठक घेण्यात आली. यानंतर ज्ञानशाळा बंद करण्यात आली. साहित्य, पोस्टर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय', असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

https://maharashtratimes.com/india-news/godse-gyanshala-of-hindu-mahasab...

सामान जप्त

Pages