धो-धो पावसात ठाणाळ्याहून तेलबैला...

Submitted by विमुक्त on 25 February, 2010 - 06:15

(आज सहजच मागच्या काही भटकंतीचे फोटो बघत होतो... तर गेल्या पावसाळ्यातल्या एका भटकंतीचा अनुभव खूप खूप आठवला... हा अनुभव तेव्हा मी इतर काही ठीकाणी सांगीतला होता, पण मायबोलीवर प्रथमच सांगत आहे...)
------------------------------------------------------------------------------------------
"हँलो आई, मी पालीला आलोय... आता बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन भटकायला जाणार आहे" मी.
"अरे, पण तू तर साताऱ्याला जाणार होतास ना आज?" आई.
"हो, पण अजित आणि सरांचा आज भटकायला जायचा बेत होता... मग मला राहवलं नाही... उद्या जातो साताऱ्याला" मी.
"बर..." आई.

असं अचानकच अजित आणि सरांसोबत मी भटकायला निघालो. ठाणाळ्याहून वाघजाई घाटानं चढून तेलबैलाला पोचायचा बेत होता.

गर्दी नसल्यामुळे बल्लाळेश्वराचं दर्शन निवांत झालं. सकाळी पुण्याहून उपाशी पोटीच निघालो होतो, मग देवळा जवळच एका हॉटेल मधे खाऊन घेतलं. हॉटेल मधे चौकशी केल्यावर कळालं, की डायरेक्ट ठाणाळ्याला बस जात नाही. "पालीहून नाडसूरला जा आणि तिथून २-३ कि.मी. चालून ठाणाळ्याला पोहचा" असं हॉटेलवाल्याने सुचवलं. भर पावसात भिजतच आम्ही बस-स्टँडच्या दिशेने चालायला लागलो. सरसगडाच्या पायथ्याशीच पाली वसलंय, त्यामुळे बस-स्टँडला जाताना पावसात ओलाचिंब भिजलेला हिरवागार सरसगड लक्ष वेधून घेत होता. नाडसूरला जाणारी बस दुपारी १.१५ ला सुटेल अशी माहिती बस-स्टँडवर मिळाली. इतक्या उशीरा ठाणाळ्याला पोचलो तर ठरल्या प्रमाणे काहीच होणार नव्हतं, म्हणून टमटम ठरवली आणि ठाणाळ्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. पाऊस चांगलाच कोसळत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, पावसामुळे सुखावलेली भाताची रोपं वाऱ्यावर डुलत होती. समोर दूरवर तेलबैलाच्या भिंती धुक्यामुळे अस्पष्ट दिसत होत्या आणि डोंगरावरुन असंख्य धबधबे तळकोकणात उडी घेत होते. दुपारी १२ च्या सुमारास आम्ही ठाणाळ्याला पोचलो तेव्हा पावसाचा जोर जरा कमी झाला होता. "ठाणाळे लेणी बघायची आहेत, तर वाट जरा दाखवा" असं गावात विचारल्यावर ५-६ बायका एकदम अंगावरच आल्या...
"एवढ्या पावसात कसली लेणी बघताय?" पहिली म्हणाली.
"गेले दोन दिवस खूप पाऊस पडतोय... ओढ्याला मरणाचं पाणी आहे... ओढा पार नाही करता येणार... घरी जा परत..." दुसरी.
अजून काही विचारलं तर ह्या काय आपल्याला पुढे जाऊ देणार नाहीत, हे आम्ही ओळखलं आणि गुपचूप गावाच्या मागे जाणारी वाट धरली. नसतं धाडस करायचं नाही असं सरांनी मला आधीच बजावलं होतं.

गावाच्या मागे पोचल्यावर पाण्याचा आवाज येऊ लागला. इतक्या दूरवर एवढा आवाज येतोय म्हणजे ओढ्याला भरपूर पाणी असणार ह्यात काही शंका नव्हती. थोड्याच वेळात ओढ्याच्या काठावर पोचलो... ओढा कसला?... नदीच ती!... केवढं ते पाणी आणि केवढा तो पाण्याचा जोर?... आवाजानं तर अजूनच धडकी भरत होती...
(फोटो मधे ओढ्याचा निम्माच भाग दिसतोय...)

गावातल्या बायका म्हणाल्या ते खरं होतं, ओढा पार करणं अवघड होतं. पाण्याचा जोर आणि खोली कमी असेल अशी जागा शोधण्यासाठी ओढ्याच्या काठाने चालायला सुरुवात केली. दाट झाडीतून वाकून गुरांच्या वाटेवरुन पुढे सरकत होतो. वाटेवर सुद्धा भरपूर पाणी वाहत होतं आणि त्यात असंख्य खेकडे धडपडत होते. बरंच पुढे गेलो, पण मोक्याची जागा काही सापडेना... कुठे पाण्याचा जोरच जास्त होता तर कुठे खोली. अजून जरा पुढे जाऊन बघावं म्हंटल तर अजीबातच वाट नव्हती आणि पुढून ओढ्याच्या पात्रात उतरणं फारच अवघड होतं कारण दरीची खोली वाढली होती. अर्धा तास चालल्यावर मागे फिरलो आणि परत मोक्याची जागा शोधायला लागलो. एका जागी ओढ्याचं पात्र जरा पसरट होतं, अंदाजे ५० फुट... इथूनच जमेल असं आम्हाला वाटलं आणि आम्ही ओढ्यात उतरलो... कमरे पर्यंत पाणी होतं, पण जोर खूप जास्त नव्हता आणि अधे-मधे धरायला झाडं किंवा खडक होतेच... नीट तोल सावरत आडवं पुढे सरकता येत होतं... विरळाच रोमांच अनुभवत पलीकडच्या काठावर पोचलो...
वा! जमलं शेवटी... वाटलं होतं त्यापेक्षा सोपं निघालं... सगळे एकदम खूष होते... इतकावेळ ओढा पार करायच्या नादात आजुबाजूच्या निसर्ग सौंदर्याकडे लक्षच गेलं नाही... सारा सभोवताल धुक्यात बुडाला होता... सगळ कसं पावसात ओलचिंब भिजलं होतं... सारा परिसर स्वच्छ आणि नितळ झाला होता...

आता ओढा पार केला होता, पण पुढची वाट सापडत नव्हती... लेणी कुठे आहेत ह्याचा थोडा अंदाज होता, मग त्या दिशेने चालायला लागलो... बरेच लहान-मोठे ओढे पार करत पुढे सरकत होतो...

अजून जरा पुढे गेल्या वर पुन्हा ओढा लागला... जरा वरच्या बाजूला पाहिलं तर दाट जंगलात, झाडीमधून धबधबा पडत होता... झाडांचे शेंडे हलक्या धुक्यात लपले होते... मधूनच एखादा बगळा धबधब्यावरुन उडत होता... केवढा भव्य देखावा तो!... किंगकाँग सिनेमातल्या देखाव्यांची आठवण झाली... गर्द हिरवीगार झाडी, पांढरं-शुभ्र पाणी, पोपटी गवताचा गालिचा, हलकं धुकं आणि एकांत... अगदी अवाक् होऊन बराच वेळ सभोवतालचा परिसर न्याहाळत राहिलो...

का कोणास ठाऊक, पण आम्ही हा ओढा पार न करता, होतो त्या काठानेच वर चढायला लागलो... जंगल अजूनच दाट झालं... जमीनीवर पिकल्या पानांचा थर साचला होता... लेण्यांचा काहीच पत्ता नव्हता... जरा धुकं कमी झाल्यावर जाणवलं, की समोरच्या टेकाडावर चढलो तर जरा अंदाज येईल... वर पोचलो... तरी लेण्यांचा काही अंदाज येईना, पण तेलबैलाचं पठार आणि आमच्या मधे खोल दरी आहे आणि इथून वाट नाही हे स्पष्ट झालं... तेलबैलाच्या पठारावरुन डोंगराची एक रांग दूरवर डाव्या हाताला उतरत होती... त्या रांगेवरुनच तेलबैलाला पोचायच असं आम्ही ठरवलं... दुपारचे २.३० वाजले होते, वाट सापडत नव्हती आणि भरपूर चढायचं होतं, म्हणून लेण्यांचा नाद सोडला आणि तेलबैलाच्या पठारावरुन जंगलात उतरणाऱ्या धारेच्या दिशेने चालायला लागलो... अर्धा तास चालल्यावर जेवणासाठी थांबलो... ब्रेड-श्रीखंड खाल्लं... अजून वाट सापडली नव्हतीच, त्यामूळे कदाचीत आजची रात्र इथे जंगलातच घालवावी लागेल अशी लक्षणं दिसू लागली... त्यासाठी तिघांची मनापासून तयारी होती... पावसाचा जोर परत वाढला होता... थोड्याच वेळात धडपडत धारेच्या पायथ्याशी पोचलो आणि चढायला सुरुवात केली... अर्धा तास चढल्यावर लहानसं पठार लागलं... ह्या पठारावरुन कोकणाकडे पाहिलं तर... जणू आभाळच धरणीला टेकलं होतं...

पठारावरुन पुसटशी वाट वर जात होती... संपूर्ण दिवसात पहिल्यांदाच जरा नीट वाटेवर चालायला सुरुवात केली... आता, आज तेलबैलाला पोचणार ह्याची खात्री होती, पण पोचायला उशीर होणार होता आणि इतक्या उशीरा तेलबैलाहून लोणावळ्याला जायला काही वाहन मिळण्याची शक्यता नव्हती... शक्यतो सरांना आजच घरी पोचायचं होतं... पठाराच्या टोकावरुन मोबाईला रेंज मिळाली, मग सरांनी त्यांच्या एका मित्राला पुण्याहून कार घेऊन सालतर खिंडीत बोलावलं... त्याला खिंडीत पोचायला संध्याकाळचे ७.३० वाजणार होते; तोपर्यंत आम्ही सुद्धा खिंडीत पोचणार होतो...

आता जरा निंवातच चढत होतो... पक्ष्यांचा चिवचीवाट आणि गवतफुलं आता लक्ष वेधून घेत होते... होला (little brown dove), हळद्या (Golden oriole), मोर, वटवट्या (Prenia) असे बरेच पक्षी स्वच्छंदपणे बागडत होते... हिरव्यागार गवताच्या गालिचावर रंगीबेरंगी गवतफुलं जास्तच मनमोहक दिसत होती...

(गौरीचे हात...)

आता धारेवरुन दुसऱ्या बाजूचा डोंगर सुद्धा नजरेस पडत होता... असंख्य जलधारा डोंगरावरुन खालच्या जंगलात विलिन होत होत्या...

ह्या वाटेवर फारशी ये-जा नसल्यामुळे वाट मळलेली नव्हती... आणि पावसात गवत वाढल्यामुळे अधून-मधून वाट नाहीशी व्हायची... जसजसे वर सरकत होतो, तसतसा चढ जास्तच तीव्र होत चालला होता... डोंगराच्या माथ्याच्या अगदी जवळ थोडीशी सपाटी लागली, मग थोडावेळ तीथे विसावलो...

(अगदी मागचा डोंगर म्हणजे सुधागड)

इथून जे काही दिसत होतं, त्याचं वर्णन करणं शक्यच नाही... केवळ स्वर्गीय अनुभव... निसर्गाचं हे रुप बघूनच कोणा एकाला स्वर्गाची कल्पना सुचली असावी...

(धुक्यातून मान वर काढून डोकावणारा सरसगड)

थोडावेळ आराम करुन शेवटचा टप्पा चढून तेलबैला पठारावर पोचलो... तेलबैला आपली दोन शिंग वर करुन धुक्यामधे बसला होता...

पठाराच्या टोकावर जाऊन खालची दरी न्याहळत बसलो...

(आज दिवसभर खालच्या जंगलात आम्ही भटकत होतो...)

आज दिवस भरात जे काही पाहिलं, अनुभवलं ते एक स्वप्नच वाटत होतं... थोडा अभिमान, खूप आनंद आणि प्रचंड समाधान होतं... एकदम सुरुवातीला जो ओढा आम्ही पार केला होता, त्याचा आवाज इथपर्यंत येत होता... संध्याकाळचे ६.१५ वाजले होते... वेळेत खिंडीत पोचायचं असल्यामुळे तेलबैला गावाच्या दिशेने चालायला लागलो... एक आजोबा गुरं हाकत गावाकडं निघाले होते... त्यांच्या सोबत गप्पा मारत गावात पोचलो... इतक्या पावसात कोणी वाटाड्या सोबत न घेता ठाणाळ्यातून वर आलो, हे ऐकल्यावर आजोबा थक्कच झाले...
म्हणाले... "जिगर केलीत तुम्ही..."
त्यांनी मस्त गरम चहा पाजला... गावातल्या लोकांची माया वेगळीच असते... किती जिव्हाळ्यानं वागतात आणि क्षणात आपलसं करुन घेतात... त्यांचा निरोप घेऊन गावातून बाहेर पडलो तेव्हा अंधारलं होतं... एकदमच आभाळ फाटल्या सारखा पाऊस कोसळू लागला... काळाकुट्ट अंधार, जोराचा पाऊस ह्यामुळे दोन हातांवरच सुद्धा दिसत नव्हतं... अंदाज घेत चाचपडत चालत होतो... काळोखाला ठीगळं पाडत अनेक काजवे चमकत होते... सुमारे ८ वाजता खिंडीत पोचलो, पण कार काय आली नव्हती... तो वाटेत असेल; इथे त्याची वाट बघत बसण्या पेक्षा लोणावळ्याच्या दिशेने आम्ही चालायला लागलो... वेगळेच मंतरलेले क्षण अनुभवत रात्री ९ वाजता सालतर गावात पोचलो... थोड्याच वेळात सरांचा मित्र सुद्धा तिथे पोचला... इतक्या उशीरा ह्या रस्त्याला काळं कुत्र सुद्धा फिरकत नाही आणि अंबवणेच्या पुढचा सगळा रस्ता जरा कच्चाच आहे... शनीवारचं ऑफिस संपल्यावर, सरांचा मित्र एकटाच अशावेळी इथे आला होता आणि तेपण एकदम आवडीने... गाडीत बसलो आणि लोणावळ्याच्या रस्त्याला लागलो... भरपुर धुकं असल्यामुळे फारच सावकाश चाललो होतो... रात्री ११.३० वाजता पुण्यात घरी पोचलो... अंघोळ आणि जेवण आटपून झोपायला १ वाजला...

दुपारी १२ पासून रात्री ९ पर्यंत अगदी मोकाट भटकलो... दिवसभर मुसळधार पावसात मनसोक्त भिजलो... आज एका दिवसात अख्खा पावसाळा जगलो...

विमुक्त
http://murkhanand.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विमुक्त भर हिवाळ्यात असे पावसाळी फोटो बघुन वाटले की पावसाळाच आहे , बाकी ओढ्याचे (की नदी) फोटो तर क्लास आले आहेत, धन्यवाद मुड चेंज केल्या बद्दल.

विमुक्त परत एकदा सुंदर फोटो. वर्णन अजून वाचायचंय. ठाणाळे लेणी आहेत नां? आणि ते गवत कसलं लुसलुशीत दिसतंय. कलर एकदम सही आणि आपल्या इथल्या पावसाळ्याचा नजारा तर केवळ अप्रतिम असतो.

काय सही आहेत फोटो आणि वर्णनही. असं निरुद्देश, निसर्गाच्या सानिद्ध्यात भटकायचा आनंद काही आगळाच!

सही ! सरसगड, तैलबैला अन गौरीचे हात अप्रतिम ! अन वर्णनही सुरेख ! अगदी तिथे जाउन भिजतोय असं वाटलं. धन्यवाद या ट्रीप आणि ट्रीट बद्दल Happy

व्वाह!!!
वर्णन आणि फोटो एकदम मस्तच!!!!!!!
!>>>>अगदी तिथे जाउन भिजतोय असं वाटलं. धन्यवाद या ट्रीप आणि ट्रीट बद्दल >>> अगदी अगदी

कसले जबरा आहेत फोटोज.. वर्णनही छान!
मला आमची पावसाळ्यातली भटकंती आठवली.. I am really missing those moments now! Sad

व्वाव! मस्त फोटो... हिरवाईच्या पार्श्वभूमीवरील पांढरे/गुलाबी फुल सुंदर दिसतेय!

अन कसले धाडस करतात हो तुम्ही लोक!!!

ठाणाळे गावाच्या मागे डोंगरामधे लेणी आहेत... गावातून साधारण अर्धा तास लागतो लेण्यात जायला...

इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून वासुदेव बळवंत फडके काही दिवस तिथे (ठाणाळे लेण्यामधे) मुक्कामाला होते असं ऐकलयं...

काय मस्त फोतो आहेत मित्रा !!!
जिन्कलस !!!!
या पावसाळ्यात असे कुठे भतकायला जाणार असाल तर एक टोपिक टाकुन ठेव आधी !!

आम्हालाही यायला आवडेल !!