वेळ असल्यास कृपया आधी ही प्रस्तावना वाचा: -
( क्योटो-नारा-ओसाका ) :- प्रस्तावना
तर त्या "क्योतोकॉल"मधे अजुन थोडीशी(च) भर टाकुन मुळ क्यो~तो विषयाला हात घालुया...
१८) जिथे जाऊ तिथे काहीतरी घेतलेच पाहिजे असे नाही. लॉकेट्स वगैरे लहानपणी घेतली ती पुष्कळ झाली.
१९) आजुबाजुचं थोडंसं निरीक्षण करुन उगाच "फार समजत असल्यागत", "जनरलाईज्ड स्टेटमेंट" बनवु नये.
२०) जाईल तिथे तिकीटे मिळतात. (प्रवेशद्वारापाशी योग्य ती रक्कम दिल्यावर, ) ती घरी येईपर्यंत जपुन ठेवायची
गरज नाही. नंतर टाकणे होत नाही, घरात कचरा होतो. * म्हणुन रस्त्यावर टाकु नये. हा आपला भारत नाही.
.......................असं करत करत ती "काकाकन" यादी सफळ संपुर्ण झाली..................
* * * * * * * 「京都」 * * * * * * *
बर्याच जणांना माहिती असेल, की "क्योटो" हा खरं तर आंग्ल उच्चार.
मुळ जपानी भाषेत म्हटलं तर "क्यो~तो". 「京都」
京 : क्यो~ : राजधानी(चे)
都 : तो : शहर
आता जपानची राजधानी तर 'टोक्यो'! मग 'क्यो~तो' चा अर्थ "राजधानी" असा कसा?
* लगे हाथ टोक्योची चित्रलिपीही बघुन घेऊया. 「東京」
बरोबर ओळखलंत. १) टोक्यो हादेखिल आंग्ल उच्चार.. खरं तर ते "तो~क्यो~" आणि
२) टोक्यो आणि क्योटो मधला "क्यो~" हा एकच, ज्याचा अर्थ, "राजधानी"
थोडंसं (अगदी थोडंसंच! ) इतिहासात पाहिलं तर सापडतं, की राज्यकारभार जेव्हा "एदो" भागाकडे गेला, तेव्हा १८६८ मधे, राजधानी "क्यो~तो" हुन "एदो"ला हलवण्यात आली. "एदो" चं नंतर "तो~क्यो~" असं नामकरण झालं. तेव्हाही काही काळ "क्यो~तो" ला "पश्चिम राजधानी" म्हटलं जात असे.
"क्यो~तो" हे जपानच्या *पश्चिम दिशेला येतं...
"तो~क्यो~" मधल्या "तो~" चा अर्थ "पुर्व" असतो, हेही ओघाने सांगणे आलेच.
* अजुनही काही जुन्या लोकांच्या मते, "खरी राजधानी" क्यो~तोच आहे.
"क्यो~तोचं नाव कसं पडलं?? " याबद्दलही थोडी रोचक माहिती मिळाली...
इ.सन ७९४ मधे "हेइआन कालखंडाच्या सुरुवातीपासुन "क्यो~तो" शहर जपानची राजधानी बनलं.
पण नावानं पुर्वी ते "क्यो~तो" नव्हतंच....
जपानी भाषा, जी पुर्वी केवळ बोलीभाषा होती, ती लिहीता येऊ लागली, ती चीनच्या चित्रलिपीची ओळख झाल्यापासुन. त्यामुळे बरीच चित्रलिपीमधली चित्रं चीनी भाषेतुन "जशीच्या तशी" उधार घेतली गेली आहेत. त्यातलंच मुख्य उदाहरण म्हणजे क्यो~तो.
दोन्ही भाषांमधे चित्र एकच, पण उच्चार वेगळा. ( चित्रलिपी : 京都 )
चिनी भाषेत वाचतात, "जिन्गडु"! खरंच.
मधल्या काळात त्याचं नाव "क्यो~(京)", "मियाको(都)", "क्यो~नो मियाको(京の都)" असं होतं.
होता होता, ११व्या शतकात जपानी भाषेत "क्यो~तो" असं त्याचं बारसं झालं, ते शेवटचं...
इतका इतिहास पुरे झाला. आता आम्ही क्यो~तो सर करायला सज्ज झालो होतो.
जपानी भाषा शिकायला लागलो, की १) नवी लिपी, २)अगम्य उच्चार, ३) प्राचिन संस्कृती अशा एक ना अनेक गोष्टींमुळे विद्यार्थी जपानच्या प्रेमात न पडला तरच नवल. आमचंही तसंच झालं होतं.
"ज्या दिवशी जपानला आमची पायधुळ लागेल, तो दिवस सोन्याचा!?!?!? " अशा काहीशा भावना मनात होत्या जपानी शिकण्याच्या काळात. जपानला येणं तर जमलं, पण क्यो~तोचा योग काही येत नव्हता.
गोल्डन वीक असला म्हणुन क्लायंटकडे सुट्टी मिळेल याची खात्री नसल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत डळमळित वातावरणात शेवटी ग्रीन सिग्नल मिळाला. त्याच दिवशी रात्री लॉजचं बुकिंग केलं.
दुसर्या दिवशी बुकिंगला गेलो. "स्वस्त म्हणुन बसने" जायचं होतं...
काऊंटरला जाऊन "आज रात्रीचं तिकीट द्या.." म्हटलं.. "तिकीटं मिळाली..."असती तर आश्चर्य! दिवाळीच्या सुट्टीच्या आदल्या दिवशी जाऊन आज रात्रीचं "पुणे-कोल्हापुर रिझर्वेशन द्या" म्हणण्यासारखंच होतं...
टोक्यो पासुन शिंकानसेनने "५१३किमी" इतकं अंतर "२तास १८ मिनीटं" अशा विक्रमी वेळात पार केलं..
शिंकानसेनला *ओजिगी (१२००० जपानी येन/६००० रु.) करुन आम्ही क्यो~तोमधे प्रवेश केला.
जपानी "ओजिगी" बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर, "लवुन अभिवादन्/नमस्कार करणे!"
आपल्या "सावधान" अवस्थेमधे कमरेमधे साधारण ४५अंश झुकणे! काही वेळा ७० ते ९०अंश झुकणारे जपानीही नजरेस पडतात. ते जर का आपल्याला पाहुन कधी असे झुकले, तर मात्र आपण खरंच काहीतरी महान काम केलं आहे असं समजायला हरकत नाही. खरंच!
शिंकानसेन अर्थात बुलेटट्रेनमधे न बसलेल्यांसाठी थोडीफार माहिती देणं भाग आहे.
जागेवर बसल्या कॉफी. (३००येन/१५०रु.)
आतला व्ह्यु~. विमानच जणु...
नोझोमी: - लय फाष्ट शिंकानसेन...
क्यो~तो मधे मुख्य आकर्षणं म्हणजे तिथली देवळं!
पॅगोडा पद्धतीची तिथली देवळं मुळ चीनच्या देवळांवर आधारित वाटतात.
तसं पाहिलं तर जपानच्या बर्याच गोष्टी ह्या मुलत: चीनच्या संस्कृतीमधुन (परत एकदा) उधार घेतल्या गेल्यात असं आपण म्हणु शकु कदाचित. पण म्हणुन त्याचं महत्त्व कमी होतं असं मात्र मानता येणार नाही. उधार घेणं वेगळं आणि एखादी गोष्ट समजुन घेऊन त्यावर नवा विचार करुन ती आणखी उत्तम कशी बनवता येईल अर्थात त्या गोष्टीचं 'कायझेन' कसं करता येईल यावर भर देणारी जपानी संस्कृती आहे असं म्हणता येईल कदाचित.
क्यो~तो पाहिलेले लोक, सहसा पुढिल दोन प्रकारच्या गटामधे विभागता येतील असं मला वाटतं.
- भारत/इतर देशामधुन थेट क्यो~तो ला आलेले
- जपानमधे राहिलेले, पण क्यो~तो ला काही काळानंतर गेलेले
असं विभाजन करायचं कारण म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया, ह्या या दोन गटावरुन विभागता येतात.
पहिल्या गटातले लोक म्हणजे साधारण 'केसरी' किंवा अशाच ट्रॅवल कंपनीमधुन येऊन चार दिवसात क्यो~तो पाहुन "माझं क्यो~तो" निबंध लिहीणारे. मला फार हसु येतं अशा लोकांचं... दोन दिवसात कसं ते "माझं" होतं??
.................
त्या सर्वांची मी आज जाहिर माफी मागतो.
.................
खरं तर मी दुसर्या गटातला, जो टोक्यो किंवा इतर ठिकाणी राहुन जपानी संस्कृतीची बर्यापैकी ओळख झालेला, आणि 'क्यो~तो' या मंदिरांच्या शहरात जाउन "हे काय, इथं सगळी मंदिरंच...." म्हणणार्यातला असायला हवा होतो. पण टिपिकल जपानी कंपनीमधलं अति-काम म्हणा किंवा २-३ वर्षं इथे राहुन आलेला आळस म्हणा देवळात वगैरे जाणं बंदच झालं होतं आणि अशाच वेळी क्यो~तो ला जाणं झालं आणि ती मगाचची माफी: - "मीही क्यो~तो च्या प्रेमात पडलो. " जाहिर!!!
"का असं प्रेम वाटावं एखाद्या शहराबद्दल? "
आणि १ मधल्यांचं प्रेम आणि २ मधे असुनही १ प्रमाणे मला क्यो~तो बद्दल वाटलेलं प्रेम यातही फरक आहेच!
मी माझ्यापुरतं, "२ मधे असुनही १ मधल्याप्रमाणे" बद्दल जरुर बोलु शकतो: -
"भाषेतला ओलावा", "अनोळखी व्यक्तीलाही सहज मदत करण्याची वृत्ती", "औपचारिकतेचा अभाव" या माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी क्यो~तो मधे भरभरुन आढळल्या.
उगाच वाद नको म्हणुन भारतातल्या कुठल्याही शहराशी तुलनेचा मोह आवरता घेत, "मोठ्या/औद्योगिक शहराहुनही, त्यापेक्षा थोड्या लहान शहरातली संस्कृती, राहणी जास्ती चांगली असते " असं मला तरी वाटतं आणि तेच आवडतं. क्यो~तो मधे नेमकं हेच दिसलं आणि आवडुन गेलं.
* इथेच तो "दोन-चार दिवसात 'माझं क्यो~तो' कसं होऊ शकतं?" प्रश्नाचं माझ्या मते असलेलं उत्तर आहे: -
संदर्भासाठी, तुलनेसाठी जर आपल्याकडे पुरेशी माहिती असेल, तर जरुर दोन-चार दिवसात ते आपलं होऊ
शकतं. बाकी "नवीन, कधी न पाहिलेलं म्हणुन आवडणं", ते वेगळं...
क्यो~तो मधे पाहाण्यासारखी ठिकाणं बरीच! पण आम्ही मात्र एकुण चारच ठिकाणं पाहिली.
*इथे परत त्या टुरटुर कंपनीवाल्यांची माफी मागतो.
' "टुर"वाल्या कंपन्या कशा पळवतात ' चे किस्से आपण बरेचदा ऐकतो. हसतो.. पण ते का पळवतात हे क्यो~तो सारख्या ठिकाणी आलं की समजतं. आपण एकाच ठिकाणी बागडत बसलो, की बाकीची ठिकाणं कशी होणार?
क्यो~तो मधे फिरताना सर्वात सोयीचा पर्याय म्हणजे "सिटी बस"!
क्यो~तो स्टेशनमधुन बाहेर पडलो, की समोरच हे दिसतं: - [ 市バス 京都 一日乗車券 ]
"तोशी बासु क्यो~तो इचि निची जो~शा केन" (बस मधुन 'क्यो~तो' भर फिरायचा, एक दिवसाचा पास)
तिथेच बाहेर उभारलेल्या कंडक्टरला नमस्कार करुन (५००येन) पास मिळवायचा.
पहिल्यांदा गेलो, ते "कियोमिझु देरा"ला.
प्रवेशद्वार
कियोमिझुदेरा: - 清水寺
फोड करुन सांगायची झाली तर,
कियो: - 清 : - स्वच्छ. ; मिझु: - 水 : - पाणी; देरा(तेरा): - 寺 : -मंदिर
क्यो~तो राजधानी झाली तेव्हाचं म्हणजे "हेईआन कालखंडामधलं हे देऊळ."
मुळ बांधलं गेलं ७९८ मधे आणि १६३३ च्या तोकुगावा कालखंडामधे जिर्णोद्धार केला गेला.
"देवळाच्या बांधकामात एकही खिळा वापरला गेला नाही" अशी एक आख्यायिका आहे.
* मी खिळा शोधायचा प्रयत्न केला नाही...
पॅगोडा
मुख्य मंदिर
उज्ज्वल भविष्य म्हणा, प्रवास चांगला होईल म्हणुन म्हणा, परि़क्षा पास होईन म्हणुन म्हणा..
अशा प्रकारे गंडेदोरे-ताईत बाधणं जपानमधे उदंड प्रमाणात आहे!
अंधश्रद्धा म्हणा, काही म्हणा दगडाला शेंदुर फासला की लोकं डोकं टेकवतात.
मग "जपानचं देखिल असंच का?" असं तुम्हाला वाटुन गेलं तर मात्र फसलात!
जपानइतका धर्मांध "नसलेला" देश जगात कुठेही नाही...
* माफ करा, जनरलाईज्ड स्टेटमेंट
सद्यस्थिती सांगायची, तर जपानी लोक बौद्ध धर्माचे असले तरी "देवळात जाणं" हे "जन्म", "लग्न" आणि "मृत्यु" या मुख्य 'समारंभावेळीच' होतं... अजुन एक वेळ म्हणजे 'नवीन वर्षारंभ!' हा दिवस चुकवला जात नाही सहसा.
असं नवर्षाच्या निमित्तानं देवदर्शनाला जाण्याला "ओमाईरी"/"जिंज्या माईरी" असं म्हणतात.
जिंज्या म्हणजे देऊळ आणि माईरी म्हणजे जाणे...
बाकी लग्नंही आजकाल ख्रिश्चन पद्धतीनं होत असल्यानं देव सहसा एकटाच असतो...
थोडंसं विषयांतर झालं खरं, पण आता परत क्यो~तोकडे वळुया...
नुकताच "साकुरा" संपुन झाडं नव्या जोमानं, हिरव्या पानानी बहरुन गेलेली.
अशा हिरव्यागार डोंगरावर असलेलं "कियोमिझुदेरा".
"जागतिक सांस्कृतिक वारशामधे" याचा समावेश आहे.
मंदिराचेच दोन फोटो.
पुढुन.
पाठिमागुन. इथुन क्यो~तो पाहु शकतो...
"पापक्षालन": -
* तिथे ओळीत उभ्या असलेल्या एकाने, "त्या पळीला तोंड लावुन पाणी पिताना" पाहुन आम्ही "पापक्षालन फिर कभी..." म्हणुन तिथुन निघालो..
"काय काय करायचं नाही" अर्थात काकाकना यात लिहील्याप्रमाणे "विचारुन" काढलेला फोटो.
क्यो~तोमधे भेटलेल्या पोरी: -
सकाळपासुन विशेष काहीच खाणं न झाल्यामुळे (शिंकानसेनमधे बसण्याआधी आणि थोड्या वेळाने अजुन एकेक कॉफी + एक फ्रेंच टोस्ट ) १२:३० च्या आसपास भुक लागु लागली.
'कियोमिझुदेरा'दर्शन तर झालं होतं. म्हणुन मग एकेक ड्रिंक घ्यावं म्हटलं.
निसर्गाच्या सान्निध्यात "जपानी भातापासुन बनवलेली नॉन अल्कोहोलिक ओसाके (आलं घालुन) " आणि सोबतीला उलाँग च्या (हा चायनीज आहे. परत उधार )!
ही ओसाके पिताना म्हणजे थेट, "डोंगरावर चढुन गेल्यावर मिळालेला आलं घातलेला चहा"च जणु.
आणि "ऑर्डर घेताना" उगाचच आदर दाखवुन "काय पाहिजे साहेब" वगैरे प्रकार नाही.
"काय घेणार?" असा सवाल. की आपण खुश. टोक्यो मधे मिळेल असं??
मग प्रेमात पडणार नाही तर काय? म्हणुन "माझं क्यो~तो"!!!
"जपानी भातापासुन बनवलेली नॉन अल्कोहोलिक ओसाके (आलं घालुन) " आणि सोबतीला "उलाँग च्या" :
मधेच छोट्यामोठ्या बागा होत्याच....
मंदिराच्या जवळच एक आडवाट होती, जाऊन पाहिलं तरः -
स्मशान...
स्मशानावरुन मग जपानी भाषा शिकताना पुण्याच्या रानडे इन्स्टिट्युटमधे आम्ही विद्यार्थ्यांनी केलेला "जपानी अंतिमसंस्कार विधी" बद्दल केलेला प्रोजेक्ट आठवला. खरंच... थोडक्यात सांगायचं तर जपानी माणसांचे अंतिमसंस्कार म्हणजे प्रथम हिंदु संस्कृतीप्रमाणे "दहन" आणि मग "उरलेल्या राखेचे पुरणे." हे पुरणेदेखील विशिष्ट पद्धतीचे. जुन्या काळात परिवाराची अशी वेगळी "ओ-हाका" (थडगं) असे. ज्यात परिवारामधला सदस्य आयुष्याच्या शेवटी येत असे... नंतर नंतर आपली स्वतःची "ओ-हाका", ही "लाखात एक" अशा जपान्यांनी लाखो येनच्या "ओ-हाका" बनवुन घेतल्याचं वाचनात आलं होतं...
तिथल्या "ओ-हाका" खरं तर प्रेक्षणिय होत्या. वेगवेगळ्या आकाराच्या. पण "स्मशान" ह्या शब्दाची इतकी धास्ती/भिती आहे, की दहाबारा पावलं पुढे गेलेलो लगेचच परत फिरलो...
दोनेक तास "कियोमिझुदेरा" च्या परिसरात होतो. थंड, हिरवं गार वारं. निळं आसमंत.
तिथुन बाहेर पडताना वाटेत दिसलं हे "रंगीत-झाड"!
"हिरव्या रंगानंच आपल्याला इतकं मोहात पाडलंय, तर ऐन "शरद" ऋतुमधे काय बोला?" मनात विचार आलाच..
परत एकदा त्या देवळातल्या देवाला नमस्कार केला.
हातातल्या नकाशामधे पुढचं ठिकाण दिसत होतं "गीन-काकु-जी"!!!
(क्रमशः)
*** याबाबत आणि एकुणच प्रवास करायच्या आधी थोडीफार भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती मिळवावी
म्हणुन विकीपीडीयावर चक्कर टाकली.
पुढचा भागः -
खूप खूप खरं बोलू? जाऊदे, मला
खूप खूप खरं बोलू? जाऊदे, मला फोटोज आवडले
अरे मला एकदम नात्सुकाशिई वाटत
अरे मला एकदम नात्सुकाशिई वाटत आहे. मला पण क्योतो आवडलेल.
आमची दोनदा सफर झाली आहे क्योतो-नाराची, पण ओसाका नाही पाहिल.
धन्यवाद
धन्यवाद
चांगलं चाललंय. विचारणारच होते
चांगलं चाललंय. विचारणारच होते की नोझोमीने गेलात का? सगळी देवळं पाहिलीत का?
सही रे...
सही रे...
छानच...आमाझाके ओईशीसो~ गर्दी
छानच...आमाझाके ओईशीसो~

गर्दी किती आहे रे
पण तुम्ही मस्त मजा केलेली दिसतेय!!गर्दी नसती तर त्या किमोनो मधल्या सुंदर्या कशा दिसणार
मस्तच. क्योतोमध्ये फिरतोय
मस्तच. क्योतोमध्ये फिरतोय असंच वाटतंय. येऊ देत अजून.
फार सही वर्णन व फोटोज.. खूप
फार सही वर्णन व फोटोज..
खूप दिवसांपासून सांगायचे होते, तू अतिशय सहज लिहीतोस! आवडते वाचायला त्यामुळे..
सुट्टीमुळे खुपच लोक आलेले
सुट्टीमुळे खुपच लोक आलेले दिसताहेत. आम्ही गेलो तेंव्हा मंदिरे बर्यापैकी शांत होती - एक सोडुन. तिथे मुंजीसारखा काहीतरी विधी सुरु होता.
छान रे ऋयाम. आम्ही एकुणात ४
छान रे ऋयाम.
आम्ही एकुणात ४ वेळा क्योतो, नारा वारी केली. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी सापडलं. तरी बर्फात, साकुरा फुलताना आणि ऑटममध्ये राहिलंच. अमितचे (नवर्याचे) क्योतो मोमीजीचे फोटो अप्रतिम आहेत.
तुला विकांताला झब्बू देते.
किनकाकुजी, गिनकाकुजी,सांजुसांगेंदो, अराशीयामा, निजो जो, र्योआनजी, हेईआन जिंगु पाहिलंस का?
प्रत्येक जपानी जिंगु किंवा बागेत पाण्याचा वापर पाहिला, रॉक गार्डन पाहिले की मला आचवलांच किमया आठवतं. पाण्याचा जपान्यांनी जसा वापर केला तसा कोणीच केला नाही असं आचवल म्हणतात. किनकाकुजी पाहिल्यावर, हेईयान पाहिल्यावर शब्दशः पटतं. खरं तर तो परिच्छेदच इथे टाकला पाहिजे.
जाता जाता: सायोनारा सायोनारा गाण्यात ही सर्व ठिकाणं आहेत.
धन्यवाद सर्वांना रैना.. एक
धन्यवाद सर्वांना
रैना.. एक पानी झब्बु द्या. गड्डा नको 
मस्त रे मस्त.. फोटो पण मस्त
मस्त रे मस्त.. फोटो पण मस्त आलेत....
पु.ले.शु.
धन्यवाद हिम्सकुल. पुढचा भाग :
धन्यवाद हिम्सकुल.
पुढचा भाग : - http://www.maayboli.com/node/15992
किती मस्त आहे
किती मस्त आहे क्योतो........
फोटो एकदम सहिच आलेत.
माझे पण झब्बु चालतील का? ईथेच
माझे पण झब्बु चालतील का? ईथेच द्यायचे का?
धन्यवाद प्रिया
धन्यवाद प्रिया धुपकर.
aschig
झब्बु म्हणजे तुम्ही काढलेले फोटो ना? द्या की
वर्शु-निल म्हणजे चायना तस
वर्शु-निल म्हणजे चायना तस तुम्हि म्हणजे जपान अस होऊ द्या कि.छान वर्णन.
छान लिहिलं आहेस. पुढचा भाग
छान लिहिलं आहेस. पुढचा भाग कधी?
ऋयाम छान लिहिलयस. ती थडगी
ऋयाम छान लिहिलयस.
ती थडगी बघुन एक गोष्ट आठवली. एका मित्राने जपानी ग्रुपमधेच विचारले होते, "ही थडगी अशी उभी का?जपान मधे जागा कमी म्हणुन माणसांना उभे पुरतात का?" नशिब दुसरा प्रश्न जपानी मधे नव्हता विचारला !
ऋयाम, तिथल्या बागांचे आणखी
ऋयाम, तिथल्या बागांचे आणखी फोटो टाकता येतील का ? छान वाटताहेत.