हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १०

Submitted by बेफ़िकीर on 5 May, 2010 - 15:11

स्स्स्स्स्स्स्स्स्साला! असं असतं होय प्रेम???

आं??

प्रेम असं असतं??

हे एक नवीनच च्यायला! काय तर म्हणे प्रेम! बर झालं! आजवर माहितीच नव्हतं! नायतर लय हालत ब्येक्कार झाली असती आपली!

एक सालं कळत नाय! तोच माणूस, तेच जीवन, सगळं तेच! मग मुलीच का अशा वाटतात???

हा विकी इथे बसलाय, हा अबूबकर.. नाय.. म्हाताराय.. पण आहे.. इथे बसलाय.. तो समीर फिरतोय... झिल्या वाट्टेल ती ऑर्डर देऊन जातोय... काय नाय... ** यांच्याबद्दल काय वाटत नय

मुलीच का अशा असतात???

गोड... गुलाबी.. नुसतं आपलं बघतच राहावं अशा.. सगळी कामं सोडून.. काय असतं काय त्यांच्यात???

काहीही करत नाहीत. काहीही म्हणजे काहीही करत नाहीत. नुसत्या बघून गोड हसतात. झालं!

यांचं काय जातयं?? हसायचं आपलं! बघायच... अन हसायचं!

गेला जीव! ज्याच्याकडे बघतात ना... त्याचा... गेला जीव!

या निवांत!

हसून बिसून मोकळ्या.... पुढचं पुढे स्सालं!

आपणही लय मोठेच झालोय...

पोरीबाळी हसतायत बघून...

हिला काय गरज होती काल?? आं??

नेमके अगदी त्याच खिडकीत येऊन... अगदी बायको व्हायला तयार असल्यासारखे हसण्याची...

गरज काय होती गरज??

पण काय नाय... हासली... ते यशवंतकाका आत जेवतायत.. सीमाकाकू पुस्तक वाचतायत..

हे हासले खिडकीत येऊन..

हासले म्हणजे असे हासले की जीवच जावा...

अन आज सकाळपासून काय तर म्हणे घरच बंदय..

पाह्यलं काय त्या यशवंतकाकाने??

की काकूंना कळलं?

आपला व्हायचा... जबरदस्तीचा अब्दुल...

ढाबा तर निवांत चालूय.. कुणाला काय घेणं नाय ना देणं!

क्या चलरहेला क्या हय???

ही हासते... तो आत जेवतो.. ही बाहेर पुस्तक वाचते.. ही हासल्यामुळे आपला जीव गेलेला.. तर आज सुबहको साला कोई घरमेच नय.. दार बंद.. चाचा फिरतोय निवांत.. अबूबकर नेहमीसारखा बोलतोय... झिल्या तलवारीने मुंड्या कापतोय ऑर्डरींच्या... गिर्‍हाईक ढेकरा देतय.. पद्या नोटा मोजतोय..

अन आपण???

आपण हितं रस्से करतोय रस्से...

हिंमत नाय विचारायची... गये किधर सब???

आं? स्साला सबकेसब गये किधर???

दिपू - अबू?? ये... यशवंत बिशवंत किधर हय आज?? दिखाई नय दिये...
अबू - बिशवंत नय पता किधर हय...

विकी बासुंदी ओतता ओतता फस्सकन हासला.

दिपू - नय नय... मेरेको क्या... चिवडे का दुकान बंद हय करके पुछा...

पुन्हा कामे चालू झाली. दिपूचे काही मन लागेना!

मधेच खोलीत जाऊन खिडकीतून पाहून आला. काजलचे घर आपले बंदच!

यड बिड लागलं काय?? काल बरे होते... आज सकाळी नायत.. का बल्ब लावला म्हणून पेटले आपल्यावर?? हल्ली माणसाचा भरोसा नाय..

पुन्हा भटारखान्यात आलेल्या दीपकरावांना काही चैन पडेना! पण पुन्हा पुन्हा तेच तेच अबूला कसे विचारायचे?

मग चाचा काही कारणाने आत आला. आता दिपूच्या मते हा खरे तर मगाचच्या संवादात नसलेला एक नवीन माणूस होता. याला तोच प्रश्न विचारला तर याला तो प्रश्न नवीन वाटला असता. पण अबू अन विकी इथेच होते. यांच्यासमोर पुन्हा विचारायचा म्हणजे अडचण! पण.. मग नाहीतर कळणार कसे?

दिपू - चाचा? साखरूको नय तो दादूको चिवडेका दुकान संभालनेको बोलना क्या??
चाचा - अंहं!

तोंडातून दोन अक्षरे उच्चारून चाचा निघून गेला.

चाचा हा एक अतीगंभीर प्राणी आहे हे दिपूला समजले. चाचा हसत नाही हे माहीत होते. पण बोलतही धड नाही. आता लोकांना जर चिवडा मिळालाच नाही तर कसे काय होणार लोकांचे? यामुळे चांगल्या हेतूने मी विचारले तर बोलतच नाहीत काही.

रस्से! रस्से करावेत रस्से! इकडे काजल हसते, तिकडे बल्ब लावा. तिकडे पंक्चर काढा, चिवड्याच्या दुकानाची काळजी आपल्यालाच, रमण म्हणतो आपण छोटे आहोत, अबू म्हणतो बिशवंत कुठे गेला माहीत नाही, इथे भाज्या तयार करा... काय चाललंय काय???

पुन्हा दीपक अण्णू वाठारे खोलीत जाऊन खिडकीतून बघून आले. काही हालचालच नाही.

ढाबा सोडून गेले का काय?

तवा सब्जीत रस्सा आल्यामुळे एक गिर्‍हाईक वैतागले. झिल्या बोंब मारत आला. अबूने शांतपणे दिपूकडे बोट दाखवले. झिल्याने दिपूला झापले.

दिपू आणखीनच वैतागला.

रस्सा कायको दिया! रस्सा कायको दिया म्हणजे काय? मी काय यडाय म्हणून रस्सा बनवत बसतो का काय? म्हणे तवा भाजी! अरे तुला कोणी तवा भाजी खायला सांगीतली?? आं?

दिपू - विकी.. कांदा दे
विकी - ये क्या हय इधर... ये क्या लकडीका कांदा हय क्या??

कोण नीट बोलायलाच तयार नाही. म्हणे लकडीका कांदा हय क्या! एक तर माझं डोकं ठिकाणावर नाही. कांद्याशिवाय एक भाजी बनत नाही. त्यात हा विक्या नेहमीच्या जागेवर कांदा न ठेवता...

अरे? चुकलंच आपलं! नेहमीच्याच जागेवर आहे की कांदा!

महुरवाडी झालीय महुरवाडी डोक्याची!

की टहेरं झालंय? टहेरंच झालं असेल! ती काजल तिथलीच आहे ना? मग टहेरं झालं असणार!

विकी काही कारणाने बाहेर गेला. अबू एकटाच पातेली इकडून तिकडे करत असताना समीर आला.

दिपू - सम्या? तूने देखा क्या?? मैने कल सीमाकाकूके घरपे बल्ब लगाया??
समीर - हां तो??
दिपू - नय... रातमेच लगता बल्ब.. अबी तो दिन हय..
समीर - .......तो??
दिपू - इसलिये अबी बल्ब नय लगाया हय उन लोगने
समीर - तो??
दिपू - तो मुझे लगा के हयच नय घरपे...
समीर - हां तो नयच है घरपे.. तो???
दिपू - हय नय?? ... किधर गये???

हा प्रश्न ऐकायच्या आधी समीरपंत बाहेर गेलेले होते.

आता काय करावे? तीच तीच माहिती पुन्हा देत बसतात.

झिल्या - अय.. अंडा भुर्जी बना.. दो.. तीखा

म्हणे अंडा भुर्जी बना! एक तर यशवंतकडचे कुठे गेलेत समजत नाही. इथे अंडा भुर्जी हवीय. सकाळचे दहा वाजलेत. आत्ता अंडा भुर्जी खातात का?

मग दीपकरावांना आठवले. आपण स्वतःच सकाळी साडे आठला ऑम्लेट्स खातो. च्यायला? आज नाश्त्याला नव्हतीच काजल!

दिपूने सात मिनिटात अंडा भुर्जी बनवून मग बाहेर मोर्चा वळवला.

झिल्याशी काही बोलण्यातच अर्थ नव्हता. तो दिसला माणूस की झापायचा! म्हणजे... त्याच्यापेक्षा ज्युनियर कुणी दिसला की! अबू, चाचा, पद्या अन बाळ्यासमोर कसा गप्प असतो. दु:खी असेल बिचारा! अब्दुल गेला म्हणून! किती रडला काल अन परवा!

कुणाला विचारावं?? हां! तो मन्नू बसलाय खोलीवर! त्याला विचारू.

गेले. महाशय मन्नू अन साखरूच्या खोलीवर गेले.

दिपू - क्यारे मन्नू.. क्या कररहा
मन्नू - ये यशवंतचाचा किधर गये???

संपला! प्रश्नच संपला.

हेच यडं आपल्याला विचारयतंय! मग आता आपण काय विचारायचं??

दिपू - गये होंगे शिरवाड!

आले पुन्हा माघारी! आता काय करावं? झरीनाचाची आलीच नाहीये आज!

तेवढ्यात दादू तिथेच आला. नवी शक्कल लढवायला पाहिजे.

दिपू - दादू? ये देखो... मन्नू क्या पूछरहा...
दादू - काय?
दिपू - बोलता हय यशवंतवाले किधर गये..
दादू - क्यों?
दिपू - क्या मालूम.. कुछबी पुछता हय...

दादू अशक्य व्यक्तीमत्व आहे. याला काही विचारलं की 'का विचारलं' इथपासूनच सुरुवात होते.

चला! जाऊ भटारखान्यावर!

कसली हसते यार ती! एकदम.. म्हणजे.. अगदी.. फक्त आपल्यालाच समजेल अशी .. फक्त आपल्याचसाठी हसल्यासारखी! कशी काय अशी हसते??

भटारखान्यात जायचं की रमणला एकदा विचारावं?? बाहेरच बसलेला असतो.

मागच्या बाजूने पुढे हायवेपाशी गेटवर पोचला दिपू!

दिपू - क्या चाचा! आज इधर??

रमणला वाटले याला वेड लागले. रमण नेहमी तिथेच असायचा.

रमण - इधर मतलब? इथेच बसतो की मी?
दिपू - नय.. म्हंजे... आज... आपलं दुकान बंद कसं?
रमण - य्शवंत किधरबी तो गयेला लगता हय...
दिपू - किधर??
रमण - अबू को पुछ! उसको सब मालूम रयता...

तोच तर प्रॉब्लेम आहे ना? म्हणे अबूला विचार! ते काय मला समजत नाही? तेच तर केलं पहिल्यांदा! पण हा इथे नुसता बसून करतो काय?

दिपू - आप नय देखे?
रमण - क्या?
दिपू - यशवंतवाले किधर गये वो...??
रमण - नय ना... सुबह उठा तो थे ही नय...

प्रश्न मिटला! भल्या पहाटे कुठेतरी गेले असावेत.

गल्ल्यावर पद्या बसला होता. दिपू त्याच्याकडे आला.

पद्या - क्या बे? क्या टायमपास होरहा?
दिपू - नय नय.. ऐसाच रमणचाचाके पास गया था..
पद्या - मुर्गी बनारहा क्या अबू आज??
दिपू - बनायेगा ना.. वो... शिरा बनानेवाले थे.. उसका क्या हुवा...
पद्या - वो तो सीमाचाची बनाती हय.. उसने सिखाया कहा किसीको??
दिपू - हय किधर आज वो??
पद्या - घरपे नय हय..
दिपू - तबीच तो पुछरहा मै..
पद्या - तेरेको क्या दुनियादारी.. जा.. अंदर काम कर...

इथे तर काही प्रश्नच नव्हता. पद्यासमोर कोण बोलणार?

चला! कळेल तेव्हा कळेल!

आणि भर दुपारी अडीच वाजता कळलं!

चाचा भटारखान्यात आलेला असताना अबू त्याला म्हणाला:

अबू - ढाबेपे फन्क्शन तो रखनाच पडेगा नय?
चाचा - हां! अपनेच लोग हय..

हा संवाद ऐकून दिपूला शंका आली.

दिपू - कायका फंक्शन

चाचा आणि अबू काहीही बोलले नाहीत. ते आपल्याच धुंदीत होते. विकी बोलला:

विकी - वो यशवंतके घरवाले... काजलकी शादी पक्की हुवी हय ना गुजरातमे.. उधर गये है.. तारीख पक्की करनेके लिये.. काजलकेलिये फन्कशन रखनेका हय...

खूप काही हाललं मनात! खूप काही! पण.. शब्दात मांडणं शक्यही नव्हतं ... अन .. ते शोभूनही दिसलं नसतं हेही समजत होतं!

सगळा... सगळा प्रश्नच संपला होता. सूरत! ३५० किलोमीटरवरच्या नवसारी - बरोडा रोडवर कुठेतरी सगळे गेले होते. सकाळी सहालाच!

काजलचं लग्न ठरवायला!

लग्न? इतकी मोठी आहे ती?

आईने हाकलले होते त्यादिवशी जसे वाटले होते... अगदी तितके नसेलही... पण कदाचित... जवळपास तितकेच वाईट आहे हे...

कुणीही नाही! आपल्याला कुणीही नाही अन कुणीही असू शकत नाही.

हा ढाबा! ही कळकट्ट पातेली, हा राक्षसासारखा दिसणारा अन विनोद करणारा अबू, विकी, पद्या, दादू.. गिर्‍हाईके.. पंक्चर काढणे.. रस्सा करणे...

आपले आयुष्य हेच...

अंजना! तिचं खरं प्रेम होतं?? त्याशिवाय का त्या रात्री तिने कपडे काढले असते स्वतःच स्वतःचे? त्याशिवाय इतका मार खाल्ला असता?? ...... पण...

अंजना...

अंजना आणि काजल....

छे! काहीच जुळेनासे!

काजलबद्दल ... तसे कुठे वाटते??

वाटते ते हे .... की... काजल इथे नसेल... तर .. आपण... महुरवाडी??

कशाला?? आई बोलवतीय म्हणून?? अंहं!

मग.. कुठेतरी जायचंच तर... काजलच्याच गावाला...

तिथेच राहायचं... दिसेल नुसती.. लग्न तर लग्न...

पण..

काहीही सुचत नव्हते दिपूला! यांत्रिक हालचालीं मधूनही हवी ती चव येतच होती पदार्थांना! अबू काहीतरी बकबक करून डोकं उठवत होता. विकी हासत होता. झिल्या, दादू, समीर.. काउंटरवरून यांत्रिकपणे ऑर्डर्स देऊन जात होते.

खोलीत जाण्यात आता काही अर्थच नव्हता. आले तरी काय? पेढेच वाटतील! दुसरं काय? तिच्या... तिच्या फन्क्शनला आपण कसं थांबणार इथे?

शक्यच नाही. निघून जायचं पिंपळगाव नाहीतर शिरवाडला! बाळ्या नेईल आपल्याला. आणि न्यायला कशाला पाहिजे? आपल्यात धमक नाही का? दहा वर्षांचे असताना या ढाब्यावर एकटे आलोयत आपण!

पण... तिला.. तिला कळेल का... की.. आपण का थांबलो नाहीत ते??

तिला कसे कळेल?

तिच्यापेक्षा लहान आहोत आपण.. आपल्याबद्दल असे विचारच नसतील तिच्या मनात...

आपणच उगीच काहीतरी समजून बसलो.

काजल... काजल जाणार?

मग आली कशाला?

केवळ दोन दिवसात??

असे काय झाले? ... बरोबर... बोटाला पट्टी बांधली नसती तर... आपल्याला कशाला काही वाटले असते?

आणि... रात्री मग खिडकीतून..

तिच्याही मनात असेल का??

टळटळीत दुपारीची सह्य संध्याकाळ व्हायला चारच तास लागले. सांयकाळी सहा वाजता ढाब्याला नवसंजीवनी मिळायची! आत्तापर्यंत दमलेल्या पोरांच्या जागी दुपारी आलेली पोरे आता वेगात ढाबा लढवायची. बाळ्या, समीर अन दादू... जरा जरा टेकत होते... मन्नू, साखरू... आज दुसर्‍या शिफ्टला होते.. स्वतः पद्या आता कॅप्टन झाला होता... झिल्या भटारखान्यात येऊन चहा घेत होता...

विकीला दिपूच्या आईबद्दल कमालीचे आश्चर्य वाटत होते. इतकी चांगली आई असताना हा जात का नाही तिच्याबरोबर?

आणि त्याचवेळेस तो प्रकार झाला.

अचानक काउंटरवर एक पदार्थ ठेवत असताना दिपूला लांब गल्ल्यापाशी साखरू गल्ल्यातून नोटा उचलताना दिसला. पद्या जेमतेम एक मिनिटासाठी कुठेतरी गेला असेल तेवढ्यात साखरूने हा पराक्रम केला होता.

रक्त! अशावेळी रक्तात असतं तसा माणूस वागतो. रक्ताच्या नैसर्गीक गुणधर्मांच्या क्षमतेच्या बाहेर झेप घेणे मानवी शरीराला शक्य नसते.

दिपूने सरळ अबूला काउंटरपाशी बोलून तिकडे हात दाखवून प्रसंग सांगीतला.

गल्ल्यातील पैसे चोरीला जाणे अन तेही एका स्टाफकडून ही गोष्ट अबूच्या अखत्यारीतील नव्हती.

अबूकडे मोठी प्रकरणे यायची. एका गावरान ग्रूपने तुफान शिवीगाळ करून एकमेकांत किंवा स्टाफशी मारामारी केली. कुणीतरी भांडण उकरून काढले वगैरे!

हे प्रकरण चाचाच्या हातातील होते.

अबूने गणपतला ते सांगीतले.

गणपत गप्पच बसला.

ढाबा निवांत चालू होता.

दिपूला आश्चर्य वाटले. सरळ सरळ एक चोरी होते. दोघेही गप्प बसतात? पद्याला तर सांगीतलेही नाही. असे कसे? त्यात आणखीन साखरू सरळ काउंटरवर येऊन दिप्याला लेटेस्ट ऑर्डर्स सांगत होता. अन त्या दिपूला ऐकायला लागत होता.

चोरी! चोरी? चोरी का नाही केली आपण कधीच? काल विकी म्हणाला की तो उपाशी होता म्हणून एक दिवस त्याने स्टॉलवरून दोन पुर्‍या पळवल्या होत्या. इथे साखरूने नोटा पळवल्या. का? विकी उपाशी होता. साखरू? साखरू तर सगळ्यांच्या वरताण जेवतोय. मग? मग चोरी कशाला?

किती चोरले असतील? हजार? ... की... दोनतीनशे??

आणि... करणार काय त्या पैशांचं?? इथेच तर राहतो. खातोही इथेच! मग... पैसे घेऊन करणार काय?

पण मुळात... आपण... कधीच का चोरी करत नाही??

आपल्याला तसे का नाही वाटत?

चाचावर प्रेम आहे म्हणून? की अबूवर? की पद्यावर??

फक्त दोनच सूक्ष्म बदल झाले होते. एक म्हणजे पद्याच्या ऐवजी चाचा स्वतः गल्ल्यावर बसला होता आणि...पद्याला काहीतरी विशिष्ट सूचना असल्यासारखा तो संपूर्ण ढाब्यावर लक्ष देत इकडे तिकडे फिरत होता.

रात्री साडे दहा! ढाब्याची पीकची वेळ! पावणे दहा वाजता आलेली मालेगाव नाशिक जेवायला थांबलेली असायची आणि एकाचवेळेस येणार्‍या नंदुरबार अन वलसाड गाड्या पावणे अकराला जेवायला थांबायच्या!

रात्री पावणे दहा ते रात्री बारा हे दोन तास भयानक असायचे ढाब्यावर! सगळाच्या सगळा नसला तरीही दोन, तीन सोडून बाकी सगळा स्टाफ ढाब्यावर असायचा त्यावेळी!

चाचणी म्हणून चाचा पुन्हा भटारखान्यात आला. येताना पद्याला 'चल आता जातो मै' असे मोठ्यांदी सांगत आला अन काउंटरच्या आत हळूच उभा राहिला.

साखरू पुन्हा एक दिड मिनिटातच गल्ल्यापाशी पोचलेला असतानाच पद्या अचानक तिथे गेला. त्याला पाहून साखरूने पोबारा केला.

आत असलेल्या चाचाला दिपूचे म्हणणे बर्‍याच अंशी पटले. अन ते दिपूलाही समजले. त्याचबरोबर दिपूला हेही समजले की चाचा अन पद्या मिळून साखरूवर लक्ष ठेवत आहेत.

आणि ते सिद्ध झाले. साडे बारा वाजता जेव्हा दुपारची पोरेही जेवायला बसली तेव्हा जेवण होईपर्यंत चाचा, अबू अन पद्या... कुणीच काही बोलत नव्हते. दिपू झोप येत असूनही मुद्दाम थांबला होता. चोरीची शिक्षा काय असते आणि ती खरच मिळते की नाही हे त्याला तपासायचे होते.

जेवणे झाल्यावर आपापल्या थाळ्या उचलून झोपायला जाताना सगळ्यांना चाचाने पुन्हा बसायला सांगीतले.

चाचाने साखरूला विचारले...

चाचा - साखरू.. बेटा तुने कोई पैसा वगैरे तो नय लिया ना गल्लेपेसे

साखरू प्रचंड हादरला. अचानक असा प्रश्न विचारण्याचे कारण काय? आजवर आपण तीन चारवेळा पैसे उचलले तेव्हा नाही विचारला. आज अगदी सगळ्यांना मुद्दाम इथे बसवून ...का???

साखरू - मय?? नय तो? क्युं??
चाचा - सच बोल (चाचाचा आवाज अतिशय शांत अन प्रेमळ होता)|
साखरू - नय लिया पैसा... (साखरू सोळा वर्षांचा असूनही गुर्मीत होता.)
चाचा - देख बेटा... अबी छोटा हय तू... पैसा चाहिये तो मांगके लेनेका... ऐसा नय करनेका..
साखरू - पर मै लियाच नय ना... क्या बोलते आप??
चाचा - ऐसा मत कर.. मै तेरेको चाहे जितना पैसा दे सकता... लेकिन मांगके लेनेका
साखरू - ........
चाचा - कितना पैसा लिया तुने
साखरू - नय लिया (हिंस्त्रपणे)

चाचा आणखीनच शांत झाला. अतिशय थंडपणे त्याने पद्याकडे पाहिले अन म्हणाला:

चाचा - तू झूठ बोलेगा तो ढाबेपे झूठको जगह नय.. अबी सच नय बोलेगा तो पद्या मारेगा तेरेको
साखरू - ऐसे कैसे मारेंगा... मै किया क्या हय... ??

अजूनही खुन्नस जात नव्हती.

चाचा - दिपूने खुद देखा है तेरेको नोटा लेते..

झालं! साखरू अत्यंत विषारी नजरेने दिपूकडे पाहायला लागला. दिपू मुळासकट हादरला. दिपू कितीही हुषार असला तरीही कोमल स्वभवाचा होता. साखरूसारखा दंडेलशाही करणारा नव्हता. आता हा साखरू काय करणार याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. साखरूने अचानक अ‍ॅप्रोचच बदलला.

साखरू - हां तो?? पगार नय.. कुछबी नय... काम कायको करनेका इधर...
चाचा - ऐसा नय बोलनेका... तू लहान आहेस.. तुझ्या नावचे सगळे पैसे तुला अठरा सालका होनेके बाद मिलनेवाला हय... तेरा पगार शिरवाडमे जमा करता बेटे मै.. अच्छे बच्चे चोरी नय करते.. तू चांगला मुलगा आहेस ना??
साखरू - मेरेको सब पगार अब्बी होना... नय तो मेरेको बोलनेका नय.. पैसा क्युं लिया करके..

यानंतर मात्र चाचा उठला. त्याने खाडकन साखरूच्या कानाखाली आवाज काढला. चाचाचा हात जबरदस्त होता. साखरूला 'आपल्याला मारतील' ही कल्पनाच नव्हती. तो एकदम कलंडला. डोळ्यापुढे तारे चमकत होते. गालावर बोटे उमटली होती. वेदना सहन होत नव्हती. चाचाने कोणताही विचार न करता सरळ त्याला थप्पड हाणली होती.

मग पद्याने उठून त्यचे खिसे तपासले. पन्नसच्या तीन नोटा मिळाल्या. खूप झाप पडली साखरूला! तरीही बदमाशासारखा सगळ्यांकडे खुन्नसने बघत होता. मग पद्याने एक धपाटा मारला. तरीही त्याची जिरेना!

शेवटी त्याला खूप समजावून सगळे उठले. त्यावेळेस त्याने दिपूकडे बघून 'तुला बघतोच' अशा पद्धतीचा चेहरा केला. दिपू खूपच घाबरला. साखरूने केलेला चेहरा कुणाच्या लक्षात आलेला नव्हता.

सगळे झोपायला जातानाच अचानक ....

यशवंत तिथे प्रकटला..

त्याला बघून दिपूला दु:खात सुख, वाईटात चांगले.. इतकेच वाटले की निदान...

काही दिवस तरी काजल दिसणारच...

अत्यंत उत्सुकतेने दिपू यशवंतकडे बघत होता. तितक्यात यशवंतने विचारले..

यशवंत - गणपतभाई... क्या हुवा?? क्या किया इसने??
चाचा - कुछ नय... छोटा बच्चा हय.. गलतीसे चोरी किया...
यशवंत - इसने?? दिखनेमे कितना सरल लगता...
चाचा - लेकिन...

चाचा लेकिन म्हणेपर्यंत सीमाकाकू अन त्यांच्या मागोमाग काजल आत आलेल्या होत्या....

काजलने आज साडी नेसली होती...

काजलचे ते रूप पाहून दिपूच्या मनाची कालवाकालव झाली...

इतकी नटून थटून.. ही... कुणाचीतरी होणार...

आपले आयुष्यच असे आहे..

चाचाने त्याचा प्रश्न पूर्ण केला...

चाचा - लेकिन ... तुम ल्ग इतनी रात को?? कल आनेवाले थे नां??
यशवंत - हां! लेकिन ... हमारी किस्मत अच्छी नय.. वो मुलगा भोत पीता... हम .... हम नकार देके आगये....

विमान आता पडणार... पडणार... अगदी म्हणजे पडणारच... पायलटनेही आशा सोडलेली आहे.. आणि अशात अचानक काहीतरी व्हावे... विमान सुरळीत चालू लागावे...

किंवा???

किंवा काय???

किंवा... पनीर खारट होणार... गिर्‍हाईक बोंब मारणार...

ह्या!

ही काय उपमाय???

हां!!

काजल आता बघणार... बघणार ... म्हणजे अगदी बघणारच...

जगातला सर्वात सुखी माणूस कोण???

असा प्रश्न जर त्यावेळेस दीपक अण्णू वाठारे यांना कुणीही विचारला असता...

त्यांचे उत्तर प्रश्न संपायच्या आतच आले असते...

'मैहीच'

आणि...

दिवसभराचा सगळा शिणवटा एका... केवळ एका क्षणाने जावा ... अन पुढचे आयुष्यभर पुरेल अन उरेल इतका तजेला मिळावा ... असा चेहरा करत जेव्हा दीपक अण्णू वाठारेंनी आपली मान हसतमुखाने काजलकडे वळवली... तेव्हा...

... तेव्हा.. काजलचे लग्न मोडले म्हणून संपूर्ण ढाबा दु:खी झाला होता ... ...

...आणि...

टहेर्‍याची माशुका लाजरं, मिश्कील, खट्याळ, प्रेमळ अशा सर्व भावनांचे मिश्रण असलेलं हसू चेहर्‍यावर खेळवत ...

दिपूकडे बघत होती....

त्याचवेळेस अबू यशवंतला विचारत होता...

"क्या खायेंगा यशवंत???"

आणि यशवंत सीमाकडे बघत म्हणत होता....

कुछ नय...

.. बस...

हाफ राईस .... दाल मारके....

गुलमोहर: 

तरीच म्हणल आज काहीतरी चुकल्यासारख वाटत होत, कारण हाफ राईस...चा पुढचा भाग नाही आला Happy

धन्यवाद, हा भाग्पण ईतक्या लवकर लिहिल्याबद्दल, पु.ले.शु.!!!