हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १२

Submitted by बेफ़िकीर on 10 May, 2010 - 03:01

भुलोबाचा उरूस म्हणजे नुसती धमाल असते हे काजलला समजले. उगाच बकरे कापणे वगैरे प्रकारच तिच्या मनात होते. पण तिथे नुसता धिंगाणा चालला होता. झरीनाचाची जातीने दोघांना सांभाळत वेगवेगळ्या गोष्टी दाखवत होती. छोटा पाळणा, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, विविध विक्रेते, सर्वत्र उत्साही आवाज, नंतर होणारी खोटी भांडणे!

आणि... हे सगळे करताना दीपक बरोबर चालायचे! व्वा!

दिपू तर हवेतच तरंगत होता. आपण किती चालतोय, काय करतोय, त्याच्या डोक्यात काहीही नव्हते.

फक्त, काजल... काजल... काजल!

एक मात्र झालं! बोलणी होऊच शकल नाही तिथे असताना! पण मग ती कसर परत येताना भरून काढता आली. रात्री दोन वाजता त्यांना चाचीचा मुलगा सोडायला म्हणून निघाला. त्याच्या डोक्यात 'कधी एकदा यांना सोडून पुन्हा वर जातोय' ही घाई होती! त्याचा फायदा इतकाच झाला की यांना सोडायला म्हणून येऊनही तो यांच्या पुढे पंचवीस पावले असायचा. आणि मग यांच्यात कुजबुजत संवाद झडू लागले.

काजल - तू आलावतास आधी? उरुसाला?
दिपू - आलोवतो.. पण...
काजल - पण काय??
दिपू - आजच्यासारखी मजा नय यायची
काजल - का? (अपेक्षित उत्तर येते का या मूडमधे)
दिपू - झरीनाचाची... सब दिखाया आज उसने.. वैसा हुवाच नय आजतक..
काजल - म्हणून होय...
दिपू - तसं नय.. म्हणजे.. अबूसंग आता था मय तो.. अबू सिर्फ खानेकोच देता.. सब दिखाता नय..
काजल - हं हं! म्हणून होय..
दिपू - नय.. म्हणजे.. अकेला अकेला लगता था ना?
काजल - हं हं! तो आज अच्छा हुवा... चाची होती बरोबर... नाही का?
दिपू - चाची क्या... तुला कसा वाटला उरूस??
काजल - चाची क्या म्हणजे?
दिपू - चाची आली म्हणजे .. तू होतीस म्हणून आली.. मला काय डर नाय इथनं जाताना..
काजल - पुरुषांना भीती वाटतच नाही अंधाराची!

कोण खुष झाले वाठारे!

काजल - आपण दोघं लहान हायत म्हणून चाची आली..

सपाट! च्यायला... धड बोलताच येत नाही हिला!

दिपू - ह्या! मय तो कैंदा गेलोय हितनं!
काजल - अकेला???
दिपू - तो फिर?
काजल - अच्छा अच्छा!

दिपू - तेरेको... तो लडका.. पसंद नव्हता?
काजल - सूरतचा?
दिपू - हं?
काजल - भोत पसंद था.. कितना अच्छा दिखता..
दिपू - पसंद था??
काजल - फिर?
दिपू - म्हणजे शादी करणार होती तू?
काजल - मग? त्याच्यासाठीच गेलीवती ना?
दिपू - शराब अच्छी चीज नय...
काजल - तुला काय म्हैत?
दिपू - अब्दुलचाचा नय क्या मर्‍या पी पीके..
काजल - इतना नय पीता वो लडका...
दिपू - यशवंतचाचाको बिलकुल नय चलता लेकिन.. और उसीमे भलाई बी है तेरी...
काजल - अच्छा! अब तू भलाई देखेंगा मेरी..
दिपू - ऐसा नय.. एक आपलं.. दोस्ती म्हणून...
काजल - दो दिन नय हुवे मेरेको यां आकर... दोस्ती होबी गयी??
दिपू - नय हुवी?
काजल - अंहं!
दिपू - तो ऐसे हाथ पकडके कायको चल रही हय?
काजल - फिरसे गिर गया तू तो?
दिपू - मै कैसे गिरेंगा.. ?? मैहीच तेरेको जपून नेतोय
काजल - मेरेको मत जप! मी चालते बरोबर...

काजलने खट्याळपणे हात सोडवून घेतला. दिपूच्या मनात कालवाकालव झाली. काजल खुसखुसत होती. पण अंधारात दिपूला ते कळत नव्हते.

काजल - अच्छा चल पकड...
दिपू - काय नको... पडली बिडलीस तर? म्हणून पकड्या था...
काजल - मुलीचा हात धरायचा नसतो ... माहितीय ना?
दिपू - का?
काजल - अंहं!
दिपू - का पण?
काजल - नसतो धरायचा
दिपू - पण का???
काजल - तुला का धरावासा वाटतो ते सांग..
दिपू - मय नय सांगणार
काजल - का?
दिपू - अंहं!
काजल - का पण?
दिपू - मऊ असतो म्हणून...

खळखळून हसत काजलने स्वत:च दिपूच्या हातात आपला हात गुंफला.

दिपू - चिडवू नको..
काजल - गुस्सा आला?
दिपू - अंहं!
काजल - खिडकीसे बारबार क्या देखता हय... हमारे घरकी तरफ?
दिपू - यहीच... बल्ब चलरहा के नय.. ये देखता
काजल - और.. बल्ब लगानेसे पयले क्या देखता था?
दिपू - वहीच.. यहां बल्ब लगा सकते क्या...सीमाकाकू बिचारी किताब पढते अंधारात...

काजलने अंधारातच त्याच्याकडे बघत 'असं असं' असा चेहरा करत दुसरा हात 'छान छान' म्हणताना हलवतात तसा हलवला. दिपूला ते कळलंच नाही.

काजल - वो लडकेको नकार दिया तो तू क्युं हस रहा था?
दिपू - कुछ नय
काजल - सांग ना?
दिपू - मै हसहीच नय रहा था
काजल - हस रहा था.. मेरेको देखकर
दिपू - मै सोचा... इतनी दूर जाके.. काय पण वर बघून आलेत..
काजल - वर मतलब?
दिपू - ते नय का? तूच म्हणलीस... वर मिळवायला चाललीय भुलोबाला...

काजल आणखीनच हसायला लागली.

दिपू - मिळाला का वर?
काजल - म्हणजे?
दिपू - आत्ता भुलोबाकडून नयच मिळाला ना वर?
काजल - असा कसा वर मिळेल?
दिपू - तूच बोलती हय सब?
काजल - मिळाला...
दिपू - कुठय?? (दिपूने थबकत विचारले)
काजल - ये क्या जा रहा हय...
दिपू - कौन?
काजल - ये चाचीका बेटा.. आगे जा रहा है

दिपूने पुन्हा हात झटकन सोडला. काजल हसायला लागली.

काजल - तेरेको क्या मिला भुलोबासे?
दिपू - वरीण...

वरीण ऐकून काजल सरळ एका दङडावर बसून हासली. पुढे चाचीचा मुलगा होता तो मागे वळून 'ए चला जल्दी' म्हणून डाफरला. काजल हसू दाबत चालायला लागली.

दिपू - हसती कायको?
काजल - तेरेको अबीसे वरीण क्युं हवी?
दिपू - बरं पडतं!

खदाखदा हसत काजल चालली होती. दिपू शरमल्यासारखा उत्तरे देत होता.

दिपू - तू अब हसेंगी तो मय बोलणारच नय..
काजल - तू आनेवालाच नय था ना भुलोबाको?
दिपू - हां! लेकिन चाचा म्हणाला एकटी मुलगी जाणं चांगलं नय
काजल - हो का????
दिपू - तू बी नय आनेवाली थी..
काजल - बाबा म्हणाले एकटा मुलगा जाणं चांगल नय...

संपूर्ण रस्ताभर दिपू तिच्याशी एक वाक्यही बोलला नाही की हात हातात घ्यायला गेला नाही.

ढाबा दिसायला लागल्यावर झरीनाचाचीचा मुलगा त्यांना सोडून मागे वळला. हायवेपासून शंभर एक फुटांवर कुणालाही दिसणार नाहीत अशा ठिकाणी दोघे उभे होते. हायवेच्या पलीकडे दूर ढाब्याचा झगमगाट होता. मोठा आवाज येत होता. बर्‍याच गाड्या थांबल्या होत्या.

मागच्या बाजूला अंधारलेली वस्तीकडे जाणारी वाट, काही अंतरावर शांततेचा भंग करत जाणारे ट्रक्स, त्या पलीकडे गजबजाट असलेला ढाबा, वर निरभ्र आकाश, थंड हवा, दोघांचेही चालून चालून श्वास फुललेले...

हा प्रवास संपावा असे मनातून कुणालाच वाटत नव्हते.

क्षणभर दिपू एका खडकावर बसला. झरीनाचाचीचा मुलगा आता दिसत नव्हता. काजल दिपूच्या शेजारी बसली.

आत्तापर्यंत ते हातात हात घेऊन चालत असले तरीही.. पहिल्यांदाच ती इतक्या निकट बसल्याने दिपूला तिच्या रेशमी केसांचा सुगंध प्रकर्षाने जाणवला.

अंजनाबरोबर दिपूचे काय झाले होते हे काजलला माहीत असते तर ती इतक्या जवळ बसलीच नसती.

आणि अंजना अन काजलच्या निकटच्या सहवासात काय फरक आहे हे आकलन दिपूला अतीशय व्यवस्थित होत होते. एक आग होती, दुसरी शीतल नदी! एकीत शरीरसुखाची भूक होती, एकीत मनाची तहान भागवण्याचे सामर्थ्य! अंजना जवळ आल्यावर नियंत्रण सुटून दिपू तिच्याकडे खेचला गेला होता. काजल जवळ येऊन बसल्यावर नुसती असेच बसून खूप बोलत राहावे असे वाटत होते. अंजनाची भीती वाटावी इतकी ती कृत्रिम भावना घेऊन भेटलेली होती. काजलबद्दल नैसर्गीक ओढ निर्माण होत होती. अंजनाला संपूर्ण उपभोगायची इच्छा होणे साहजिक होते...

.. पण... काजल नुसती समोर असली तरी चालत होते... चालत काय.. फक्त तेच चालत होते...

दूरवरून ढाब्याचा प्रकाश जेमतेम पोचत होता. एखाद्याच ट्रकचा दिवा चोरून त्या खडकापाशी आपला प्रकाश घेऊन पोचला तरच! अन्यथा अंधारच होता. फक्त इतकेच, की एखाद्या ट्रकच्या दिव्याच्या प्रकाशाच्या झोतात क्षणभरच दोघांना एकमेकांचे चेहरे अन त्यावरचे भाव दिसायचे.

पाच मिनिटे! कुणीही कुणाशीही काहीही न बोलता व्यतीत केलेली पाच मिनिटे! पण त्यात खूप बोलणं झालं होतं! संपूर्ण भुलोबाच्या प्रवासात झालं नसेल इतकं बोलणं त्या पाच मिनिटांत झालं!

काजलने केलेली थट्टा दिपू केव्हाच विसरला होता. त्याच्या मनात फक्त धाकधूक एकच होती. चुकून काजलने अंजनासारखे काही केले तर? पण त्याचवेळी त्याला इतका फरकही लक्षात येत होता की अंजना अन काजलमधे प्रचंड व नेमका हाच फरक आहे. काजलच्या मंद होत असलेल्या श्वासांचा आवाज दिपूला अजून ऐकू येत होता. काजलने आपली मान जमीनीकडे वळवली होती. दिपू मधेच तिच्याकडे चोरून पाहात होता. त्याच्याकडे अजिबात न बघताही काजलला तो आपल्याकडे बघत आहे हे समजत होते.

अंधुक प्रकाशात दिपूने तिला दोन तीन वेळा चोरून निरखले. ती त्याच्या डावीकडे बसली होती.

तिचे मुलायम केस तिने तिच्या डाव्या खांद्यावरून पुढे घेतले होते. ओढणीशी बोटांनी चाळा करत असताना तिचे ओठ किंचित विलग झालेले होते. नजर वाटेकडे खाली झुकलेली होती. खूप चालल्यामुळे तिच्या श्वासांबरोबर होणार्‍या हालचाली पाहून दिपू खिळल्यासारखा झाला होता.

दोघांनाही समजले होते. आपल्यापैकी कुणालाच हा प्रवास संपावा असे वाटत नाहीये. पण काजलला भान ठेवणे आवश्यक होते.

काजल - चल... जानायना घरपे?

खूप उदास झाला दिपू! आता जाऊन काय करणार? तर तेच तेच! नेहमीची कामे, पोरांच्या गप्पा! पुन्हा अशी सहल थोडीच करता येणार आहे? त्याने धाडस करून प्रश्न विचारला.

दिपू - ऐसाहीच कबी कबी जायेंगे क्या? ... भुलोबा को?

काजलने खालीच बघत मंदपणे नकारार्थी मान हलवली. दिपूने 'का' म्हणूनही विचारले नाही. त्याला जाणीव झाली ती इतकीच! की जायचं तर तिलाही आहे, पण परवानगी मिळणार नाही म्हणून ती नाही म्हणतीय.

दिपू - किसीको.. बतायेंगेच नय..

अजूनही काजलची मान खाली होती. इतर वेळी या विधानावर ती खळखळून हसली असती. दिपूच्या पोरगेलेपणाची थट्टा केली असती. पण आत्ता अजूनही ती शांतच होती. दिपूच्या या वाक्यावर तिने काहीही प्रतिक्रिया दर्शवली नाही. मात्र तिच्या डोळ्यातले भाव 'याने अजून काहीतरी बोलावे' असे होते.

दिपू - भोत जल्दी आगये अपन..वापस...

नि:शब्द काजल! तिच्या मनातलेच वाक्य दिपूने बोलूनही ती नि:शब्दच!

दिपू - तू.. तेरी .. उमर क्या हय?
काजल - सतरा...
दिपू - दो सालसे बडी हय तू..

काजलने मान वळवली. नेमका नको तोच मुद्दा आला होता. हीच गोष्ट तिला मनात छळायची. दिपू दिसायला किंचित थोराड झाला होता. सततचे श्रम अन दाबून आहार यामुळे तो आत्ताच सतरा वर्षाचा वाटत होता. पण चेहर्‍यावरचे पोरगेलेसे भाव तसेच होते. आणि हाच मुद्दा आपल्या दोघांच्या विरोधात जाणार आहे याचे काजलला संपूर्ण भान होते.

मात्र, काजलने वास्तव उच्चारले.

काजल - अबी.. फिरसे.. नय लडका ढूंढरहे हय...

दिपूच्या मनातील सगळा उत्साहच संपला. त्याला जाणीव झाली. इथून ढाब्यावर परत गेलो की काजलशी इतके निवांत बोलायची संधीच मिळणार नाही. जे काय बोलायचे ते आत्ताच्या आत्ता!

दिपू - इतनी कम उमरमे शादी कैसे लेकिन?
काजल - अंहं! लडकिया जल्दी बडी होतीय..

हे सगळे दिपूला माहीत नव्हते.

दिपू - कौन लडका हय?
काजल - बघितला नय अजून.. शोधतायत...

काही क्षणांनी काजलनेच पुढाकार घेतला.

काजल - का?.. तू का विचारतोयस??

दिपूला काय बोलावे हे समजेना. मगाचची परिस्थिती उलटी झाली. आता दिपू जमीनीकडे बघू लागला. निराश होऊन! आणि काजल दिपूकडे!

दिपू - कुछ नय.. शादी बोले तो.. जलेबी, श्रीखंड.. नाचना .. गाना..

काजलला समजले. त्याला जे बोलायचंय ते तो बोलू शकत नाही आहे.

काजल - मेरी शादीमे.. नाचेंगा तू???

दिपूने मान वळवली. काजलच्या पापण्यांमधे ओलावा आला.

दिपूने मात्र त्याच्या वयाला अजिबात शोभणार नाही असे.. मात्र त्याच्या स्वतःच्या अनुभवातून निर्माण झालेले वाक्य उच्चारले... अत्यंत विषारी वाक्यं...!

दिपू - मै घरसे हकालेला लडका हय.. किसीकेबी शादीमे नाचता हय मै..

आजूबाजूच्या रोपांची पाने सुद्धा स्तब्ध झाली होती. कोणताही आवाज आता दोघांच्या कानापर्यंत पोचत नव्हता. काजलने मान फिरवल्याचे दिपूच्या अन दिपू उदासपणे काळोखाकडे बघतोय हे काजलच्या लक्षात आले होते.

दिपू - आती रहेंगी ना? .. ढाबेपे?? ... मिलनेको??

एक अस्पष्ट हुंदका! दिपूने खाडकन काजलकडे बघितले.

पंधरवडाही लोटलेला नव्हता एकमेकांना भेटून! पण कुठल्याकुठे पोचली होती मने!

दिपू - रो रही हय?

काजलने विरुद्धच दिशेला बघत नकारार्थी मान हलवली.

भुलोबाचा उरूस अजूनही जोरात होता. वरची माणसे उजाडेपर्यंत खाली येणार नव्हती.आणि आता खालून वर जाणारे कुणीच असणार नव्हते. कारणं अर्धा उत्सव तर पारही पडलेला होता.

दिपूला या क्षणाचे महत्व प्रकर्षाने जाणवले. या क्षणी आपण बोललो नाहीत तर कदाचित पुन्हा तशी संधीच येणार नाही.

दिपू - मय तो भोत रोयेंगा.. तू जायेगी तो..

काजलने ओलावलेल्याच डोळ्यांनी क्षणात दिपूकडे मान वळवली.

काजल - क्युं??

दोघांनाही माहीत असलेलेच उत्तर देताना एकाला किती प्रयास पडतात अन तेच उत्तर ऐकायला दुसर्‍याचे कान किती आतूर असतात याचा दोघांनाही आलेला आयुष्यातील तो पहिलावहिला अनुभव होता.

दिपू - मै..

काजल जीवाचे कान करून ऐकत होती.

दिपू - छोटा हय तुझसे.. लेकिन..

काजल - ... बोल.. बोल ना...

दिपूने आता विरुद्ध दिशेला मान फिरवली. हे वाक्य बोलताना काजलच्या चेहर्‍याकडे बघणे त्याला शक्य नव्हते. त्याला स्वतःलाच अतिशय लाज वाटत होती.

दिपू - फिरबी... भोत अच्छी लगतीय तू मेरेको..

पंचवीस टक्के विषय तरी कसाबसा उरकलेला होता.

दिपू - .. और..
काजल - क्या?.. और क्या??
दिपू - ....प्यार करताय मै.. तुझसे..

हे वाक्य बोलताना दिपूच्या मनावर प्रचंड ओझे होते. वाक्य तोंडातून निसटले तरीही ते ओझे तसेच होते. कारण काजलची प्रतिक्रिया काय आहे हे माहीत नव्हते. तिच्या मनात तसे काही नसलेच तर...??? पण एकंदरीत पन्नास टक्के विषय तरी संपला होता.

काजल जवळपास मिनिटभर नि:शब्द बसली होती.

दिपू - गलती हुई क्या मेरी?? अच्छा नय लगा ऐसा बोल्या तो??
काजल - ... अंहं! ऐसा कुछ बी नय.. (काजलचा आवाज अत्यंय पुटपुटल्यासारखा येत होता.)

ऐसा कुछ बी नय! पंचाहत्तर टक्के विषय काजलने संपवला होता.

दिपू - तेरेको.. क्या लगता हय...
काजल - काय??
दिपू - मेरे.. बारेमे..??

दिपूच्या मनातील वादळे क्षणार्धात संपावीत, सर्वत्र कोवळे तेज पडावे, मातीला सुगंध यावा, संपूर्ण आयुष्यच मखमली व्हावे.. अशी घटना केवळ निमिषार्धात घडली.

जवळच बसलेल्या काजलने उत्तरादाखल जराही विचलीत न होता दिपूच्या खांद्यावर मान टेकली.

काय क्षण होता तो! काय क्षण होता... !!!

पंधरा साडे पंधरा वर्षाचे प्रेमवीर दीपक अण्णू वाठारे.. आयुष्यातील पहिल्यावहिल्या शुद्ध, कोवळ्या प्रेमात बाजी जिंकले होते.

सगळे प्रश्नच आता संपले होते त्याच्या दृष्टीने!

आपण कोणत्या स्फुर्तीतून हा प्रश्न विचारला, तो कसा काय तोंडातून बाहेर पडला, तिने काहीच विरोधही कसा केला नाही ... अन..

हे सगळे जाऊदेत.. पण तिने चक्क आपल्या खांद्यावर मान टेकवली???

अवघे जग आपल्या कोवळ्याश्या मुठीत असल्यासारखे वाटत होते त्याला.

काजल जर तयार असेल तर कोणताही प्रश्न आता उरलेला नव्हता. चाचा अन अबूमार्फत प्रेशर आणून यशवंतकाकांना समजावून सांगणे शक्य होते. जातपातही एकच होती. गावेही जवळपासचीच होती!

आपला सगळा पगार आपल्याला मिळणारच आहे आणि आपल्याला चांगला पगारही दिला जातो हे त्याला माहीत होते.

स्वतः यशवंतकाकाच जर कुटुंबासकट ढाब्यावर राहात असतील तर ढाब्यावरचा मुलगा नको असे म्हणणे शक्यच नव्हते.

त्यात दीपकशीच लग्न झाले तर मुलगी कायम डोळ्यासमोरच राहील हाही फायदा होताच!

प्रश्न, खूप म्हणजे खूपच मोठा प्रश्न मिटलेला होता. पण नवीन प्रश्न समोर उभा राहिला होता.

इतका वेळ जिच्या हाताच्या मऊशार स्पर्शांचे नावीन्य अनुभवत असतानाही मनात जी भावना फारसे डोके वर काढत नव्हती तिला आता संजीवनी मिळाली.

काजलचा इतका निकटचा सहवास! संपूर्ण एकांत! तिची नाजूक मान आपल्या खांद्यावर! तिच्या केसांमुळे आपल्या गाला अन कानाला गुदगुल्या होतायत! केसांचा सुगंध तर काय विलक्षणच! पण... पण...

यावेळी आपण काय करायचे असते? म्हणजे.. समजा आपण तिला जवळ ओढून घेतले तर..

ती अचानक रागवून आपल्याला नकार तर नाही ना द्यायची? की आवडेल तिला?

पण.. तपासणार कसं?

मगाचपासून हात हातात होतेच.. हे आठवल्यामुळे दिपूने तिच्या पाठीमागून स्वतःचा डावा हात ताणत तिच्या डाव्या हाताची बोटे स्वतःच्या हातात घेतली. काजलने आपली बोटे गुंफवून आणखीन थोडे दिपूकडे सरकून होकारार्थी प्रतिसाद दिला.

मग मात्र दिपूला राहवले नाही.

त्याने तिचे दोन्ही हात धरून तिला उभी केली. आता ती धीटपणे त्याच्याकडे पाहात होती. हा आपल्यापेक्षा लहान आहे ही भावना अजूनही मनात होती. पण तिचे अस्तित्व कमी झालेले होते.

दिपूने काही कळायच्या आधीच हातांच्या ओंजळीत तिचा गोरापान चेहरा धरत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले.

क्षणभर! फक्त क्षणभरच काजलची चलबिचल झाली. तिच्या तोंडातून अस्पष्ट प्रतिकाराचे काही ध्वनी उमटले तितकेच! पण तिला त्या जादूसमोर नामोहरम होण्यातली मजा समजायला केवळ एक क्षण गेला. क्षणार्धातच तिने आपले पाकळ्यांसारखे ओठ उघडले आणि ...

दीपक अण्णू वाठारे यांनी स्वतःच्या आयुष्यातील पहिलेवहिले, स्वेच्छेने व आवडत्या मुलीचे घेतलेले चुंबन..

खूपच प्रदीर्घ होते..

दीपक या वयाने लहान असलेल्या मुलाच्या मिठीमधे असलेली ताकद काजलला जाणवली. पाठीचा कण्याचे पीठ होईल इतक्या आवेगाने दीपकने तिला आलिंगनात घेतले होते. अनावर झालेला दिपू आणि तितकीच अनावर झालेली काजल!

आलिंगन सुटण्याचे कारण मात्र फार म्हणजे फारच.. अशुभ होते...

हायवेवर कर्णकर्कश आवाजात दोन ब्रेक्स लागत होते अन तो आवाज संपतोय न संपतोय तोच धडाम असा आवाज पाठोपाठ आला होता आणि तोही आवाज विरेपर्यंत अत्यंत अभद्र किंकाळ्यांनी अवघा परिसर दुमदुमून गेलेला होता.

रामरहीम ढाब्याच्या अगदी समोर एक भयानक अपघात झाला होता. भरवेगात असलेला एक ट्रक अन तितक्याच वेगात असलेली एक खासगी बस यांची समोरासमोर टक्कर झाली होती अन त्यात बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झालेला होता. ट्रक अब्दुलच्या पंक्चरच्या दुकानात घुसलेला होता अन बस ढाब्याच्या तोंडावर येऊन आदळली होती.

ती घटनाच अशी होती की ढाब्यातील लहान मूलसुद्धा हायवेवर धावले होते.

आणि आलिंगन केव्हाच सोडून अवाक होऊन त्या घटनेकडे बघत असणारे दिपू अन काजल सुसाट वेगाने हायवेकडे धावले होते.

गर्दीत मिसळले तेव्हा त्यांच्या लक्षात आले.. रमण ढाब्याच्या तोंडावरच बसत असूनही सुदैवाने बसची त्याला धडक बसलेली नव्हती.

आणि किमान चार जण त्या अपघातात ठार झालेले होते अन अनेक जण जखमी झालेले होते.

रामरहीम ढाब्यासमोर झालेला हा पहिलावहिला अपघात अन तोही इतका भयंकर! बाहेरून बघणार्‍या बायकाही किंचाळत होत्या. काजल तर कधीच आईकडे पोचली होती. दिपू पोरांमधे मिसळला होता.

फक्त एकाच गोष्टीचे नवल वाटत होते सगळ्या स्टाफला!

अब्दुलच्या दुकानात जो ट्रक घुसला होता त्याचा ड्रायव्हर व्यवस्थित हातीपायी धड होता अन अपघाताच्या जागी बेशुद्ध पडलेल्या, मेलेल्या नसलेल्या एका मुलाच्या शरीराकडे पाहून म्हणत होता..

ये लडका बीचमे आया.. इसको बचाने मैने व्हील घुमाया... ये सब सत्यानाश इसी वजहसे हुवा है...

अन चाचापासून मन्नूपर्यंत यच्चयावत स्टाफ त्या शरीराकडे धावला होता....

बसची अलगद धडक बसल्यामुळे..

बेशुद्ध होऊन पडलेला समीर...

दिपू आणि काजल काय बोलतात हे बघण्यासाठी गेले तासभर खडकापासून काही अंतरावर लपलेला होता...

आणि त्यांनी मिठी मारलेली पाहून सगळ्यांना सांगून बोंब मारायला ढाब्यावर पळत येत असताना हा अपघात झालेला होता...

आणि हे..

टहेर्‍याची माशुका काजल यशवंत बोरास्ते आणि महुरवाडीचे आशिक दीपक अण्णू वाठारे यांना माहीतच नव्हते...

प्रेम सुरू तर भर वेगात झालं होतं!.. आता काय काय होणार होतं हे मात्र समजत नव्हतं....

गुलमोहर: 

अरे! साखरु नाही, पद्या नाही...समीर होता तो! छान सस्पेन्स होता Happy
आणि काय रंगवली आहे कथा!!! तोड नाही त्याला...
प्लीज, पुढचा भाग लवकर येऊ द्या...आतुरतेने वाट पाहतेय...

बेफिकीर, मस्तच हा भाग सुद्धा!
आणी तुमच्या आई लवकर पूर्ण बर्‍या होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना!

निशब्द करुन घेलत राव.
लवकर लिहा..............................
पु.ले.शु.
पु.ले.शु.
पु.ले.शु.
पु.ले.शु.
पु.ले.शु.
पु.ले.शु.
पु.ले.शु.
पु.ले.शु.