उत्कलप्रांताचा परमोच्च बिंदू : कोणार्क

Submitted by विशाल कुलकर्णी on 22 April, 2010 - 02:32

"पुत्रा, गुन्हाच तसा घडला होता तुझ्याकडून. भलेही नारदमुनींनी मुद्दाम कळ लावून हे घडवून आणलय. पण चुकून का होइना तू श्रीकृष्णमहाराजांचा गुन्हा केलास आणि त्यांच्या तोंडून शापवाणी निघाली. आणि तूला कुष्ठरोग झाला."

"अगदी योग्य बोललीस माते, पण माझं निर्दोष असणं सिद्ध झाल्यावर तातांनीच त्यावर उ:शाप म्हणून सुर्यपुजेचा उपाय सांगितला. सुर्यदेव जे सर्व त्वचाविकारांचे नाशक मानले जातात त्यांची साधना."

"आणि गेल्या बारा वर्षाच्या अथक साधनेनंतर आज तू त्या महाभयंकर व्याधीतून मुक्त झालास. आता पुढे काय करायचे ठरवले आहेत. सुर्यपुजा अशीच चालू ठेवणार?"

"माते, गेली बारा वर्षे चंद्रभागेच्या तीरी मित्रवनातील या पवित्र जागी सुर्यदेवांची उपासना करत आलोय. त्यांच्या कृपेने या व्याधीतून मुक्त झालोय. त्या सुर्यदेवांचं भव्य मंदीर या ठिकाणी उभे करायची माझी इच्छा आहे."

"अगदी माझ्या मनातले बोललास पुत्रा, पण आधी या आनंदाच्या क्षणी श्रीकृष्ण महाराजांचे दर्शन घेवून त्यांचे आशीर्वाद घेवूया. या मंदीर उभारणीबद्दलही त्यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यकच आहे, नाही?"

"चल माते, आधी तातांचे आशीर्वाद घेवून त्यांच्यासमोर ही मनीषा व्यक्त करू."

आणि श्रीकृष्णपुत्र सांब आपली माता जांबुवंतीसह पित्याच्या महालाकडे, त्या सर्व शक्तिमान, पुर्ण पुरूषाच्या, देवोत्तमाच्या, श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी निघाला.......!

**********

नारदाच्या खोडकर, कळी लावण्याच्या स्वभावामुळे एकदा श्रीकृष्णपुत्र सांब याला आपल्या पित्याचे कोपभाजन व्हावे लागले. सांबाने आपल्या स्वभावानुसार एकदा नारदाची खोडी काढली. त्याला धडा शिकवण्यासाठी म्हणून नारदमुनी त्याला एका ठिकाणी घेवून गेले. नेमके ती जागा श्रीकृष्णाच्या बायकांची स्नान करण्याची जागा होती. सांबाला तिथे सोडून नारद त्याच्या नकळत कृष्णाला तिथे घेवून आले. आपल्या बायकांच्या स्नानाच्या ठिकाणी सांबाला पाहून संतप्त झालेल्या कृष्णाने त्यास कुष्ठरोग होइल असा शाप दिला. नंतर सांबाने आपले निर्दोषत्व सिद्ध केले पण एकदा दिलेला शाप परत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे श्रीकृष्णांनी त्यास सुर्यदेवांची आराधना करण्यास सुचवले. त्यानुसार बारा वर्षे सुर्याची आराधना केल्यावर सांबास आपले आरोग्य आणि सौंदर्य पुनश्च प्राप्त झाले.

(दंतकथा संदर्भ : श्री सांब पुराण)

*************************************************************************************

ही आणि अशा अनेक दंतकथा पुराणात वाचायला मिळतात. सांबपुराणानुसार श्रीकृष्णपुत्र सांबाने आपल्या कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून त्याकाळी चंद्रभागेच्या तीरी (सद्ध्याची चिनाब त्याकाळी चंद्रभागा या नामे ओळखली जात असे म्हणे) पुढे सांबाच्या नंतर मुळ-सांबपुर म्हणुन ओळखल्या गेलेल्या नगरी (सद्ध्याचे पाकिस्तानमधील मुलतान) एक विशाल सुर्यमंदीर बांधले. साधारण सातव्या शतकात भारताला भेट दिलेल्या चिनी प्रवासी ह्यु-एन त्संग याच्या लिखाणात मुलतानच्या या पुरातन सुर्यमंदीराचे उल्लेख येतात. नंतर हे मंदीर जिथे सांबाने प्रत्यक्ष सुर्याची आराधना केली होती तिथे हलवण्यात आले. यामागे देखील एक दंतकथा आपल्या पुराणात तसेच कपिल संहितेत आढळते. उडीया भाषेतील मदला पंजी या स्थानिक ग्रंथातदेखील अशाच प्रकारची दंतकथा सापडते.

आपली तपश्चर्या पुर्ण केल्यावर सांबाने चंद्रभागेत ( हे चंद्रभागा म्हणजे एक छोटेसे सरोवर आहे कोणार्कपासुन काही किमी अंतरावर) स्नान करण्यासाठी म्हणून एक डुबकी मारली, तेव्हा त्याला पाण्यात एक मुर्ती सापडली. जी विश्वकर्म्याने घडवलेली सुर्याची मुर्ती होती. त्या मुर्तीची सांबाने तिथुन जवळच असलेल्या मित्रवनात एक छोटेसे मंदीर बांधून तिथे प्रतिष्ठापना केली. बहुदा आताचे कोणार्क आणि त्यावेळचे मित्रवन या जागा एकच असाव्यात, म्हणूनच सांबाने सांबपूरात बांधलेले भव्य सुर्यमंदीर पुन्हा इथे स्थलांतरीत करण्यात आले.

कोनार्कचे जगदविख्यात सुर्यमंदीर.....!

दुसर्‍या एका दंतकथेनुसार पुढे कधीतरी केसरी राजवंशाच्या पुरंदरकेसरी नामक राजाने कोनार्क देवाचे एक मंदीर उभे केले. कोनार्क हा शब्द बहुदा कोना ( Corner : भारताच्या एका कोपर्‍यातच ओरिसातील हे जगदविख्यात सुर्यमंदीर वसलेले आहे) आणि अर्क (सुर्य) यांच्या संधीतून निर्माण झाला असावा. त्याला त्याकाळी कोनादित्य या नावाने संबोधले जात असे. त्यानंतर तिथे गंगा राजवंशाच्या राजवटीत राजा नरसिंहदेव (१२३८-६४) याने या मंदीरासमोरच दुसरे एक भव्य मंदीर उभे केले. राजा नरसिंहदेवाचा पिता राजा अनंगभिम याने पुरीच्या जगन्नाथासमोर या मंदीराचे एका भव्य मंदीरात रुपांतर करण्याचे कबुल केले होते. हे मंदीर एका रथाच्या आकाराचे होते. मध्यभागी अतिषय देखणे असे भव्य मंदीर (रथ) ज्याला सात अश्व आणि चक्रांच्या (चाकांच्या) १२ जोड्या म्हणजे रथाला अतिशय सुक्ष्म आणि सुंदर कोरीवकाम केलेली एकुण २४ चाके आहेत.

इथे आणखी एक दंतकथा सांगण्याचा मोह आवरत नाही. राजा नरसिंहदेवाने जेव्हा हे भव्य मंदीर बांधायला घेतले, तेव्हा सुरूवातीला या मंदीराच्या बांधकामासाठे एकुण १२०० कामगार तत्कालीन विख्यात वास्तुविद 'बिसू महाराणा' याच्या हाताखाली राबत होते. मंदीर पुर्ण करायला त्यांना अतिशय कष्टाची अशी १२ वर्षे लागली. पण मंदीर काही पुर्ण होत नव्हते. सगळे बांधकाम कळसापाशी येवून अडकले होते. एवढा विस्तीर्ण कळस पेलायची खालच्या सांगाड्याची ताकत नव्हती. त्यामुळे कळस काही पुर्ण होत नव्हता. नेमका त्यावेळी बिसू महाराणाचा १२ वर्षाचा मुलगा 'धर्मपद' मंदीराचे बांधकाम पाहण्यास आला. आणि पित्याची अडचण पाहून कळस पुरा करण्याचे काम त्याने स्वतःच्या डोक्यावर घेतले. कळसाचा शेवटचा दगड त्याने स्वतःच्या हाताने बसवला, आणि कळस पुर्ण झाला. पण हा शेवटचा दगड काही वेगळ्याच प्रकारचा होता. तो नक्की दगडच होता की......?

पण त्यानंतर काही दिवसातच समुद्रकिनारी धर्मपदाचे शव सापडले. दंतकथा असे सांगते की धर्मपदाने आपल्या योगशक्तीच्या जोरावर आपल्या शरीरातील सर्व उर्जा त्या दगडात ओतून त्याचे एका महा - शक्तिशाली चुंबकात रुपांतर केले होते. त्यामुळे काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. पण त्याची पुर्ण ज्ञाती त्याच्या या त्यागामुळे राजाच्या कोपाला बळी जाण्यापासून वाचली.....

ऐकावे ते नवलच.....

पुराणातील अनेक दंतकथा, किवंदंतीने सजलेले तत्कालीन शिल्पकलेचा विलक्षण नमुना असलेले हे सुर्यमंदीर केवळ अद्वितीयच आहे. काही दिवसांपुर्वी ऑफीसच्या काही कामानिमीत्त ओरिसाभेटीचा योग आला. त्या संदर्भातले काही फोटो इथे टाकले होते. काम आटोपल्यावर सुदैवाने लागुनच आलेला एक सुटीचा दिवस पकडून मी भटकंतीला निघालो. हॉटेलहून बाहेर पडलो तेव्हा प्रवासाची काहीच रुपरेषा ठरवली नव्हती. मिळेल ती बस पकडून आधी जगन्नाथ पुरीला जायचे आणि जगन्नाथाचे दर्शन घेतल्यावर वेळ मिळालाच तर आजुबाजुला जवळपास असलेली काही ठिकाणे पाहायची असे ठरवले होते. त्याप्रमाणे एक खाजगी बस पकडून पूरीला पोहोचलो. सुदैवाने जगन्नाथाचे अगदी व्यवस्थीत दर्शन झाले. भोग वगैरे चढवून बाहेर आलो. मंदीरात, आत कॅमेरा नेण्याची परवानगी नसल्याने बाहेर आल्यावर बाहेरूनच मंदीराचे काही फोटो काढले. मंदीराच्या समोरच एक कातीव, भव्य असा स्तंभ उभा आहे. त्याला अरूण स्तंभ असे म्हणतात. तिथल्या एका पुजार्‍याने सांगितलेल्या माहितीवरून हा स्तंभ आधी कोनार्कच्या सुर्यमंदीरापाशी होता. अठराव्या शतकात मराठ्यांनी आपल्या एका ओरीसास्वारी दरम्यान हा क्लोराईटने बनलेला अरुणस्तंभ कोनार्कहून आणून पुरीला जगन्नाथाच्या दारात उभा केला म्हणे. असे म्हणतात की या स्तंभावरील अरुणाची मुर्ती अगदी श्री जगन्नाथाच्या मंदीरातील मुळ मुर्तीच्या पातळीत येते. ...

(जगन्नाथपुरी : श्रींचे मंदीर)

तिथून बाहेर पडल्यावर थेट पुरीच्या समुद्रकिनार्‍यावर गेलो. सुटीचा दिवस असल्याने प्रचंड गर्दी होती. भर दुपारचे १२.३० वाजलेले. तिथे चौकशी केली असता कळले की कोनार्क इथुन अवघ्या ४० किमीवर आहे. बस्स, आता दुसरा काही विचार करण्याचा प्रश्नच येत नव्हता.

(पुरीचा समुद्र किनारा)

बस स्टँडकडे येताना भर रस्त्यावर प्रेमाने गप्पा गोष्टी करणारे हे दोन मित्र भेटले आणि त्यांचे ते प्रेम पाहून मग मला कॅमेरा हातात घेण्यावाचुन गत्यंतरच राहीले नाही. Proud

बसस्टँडहून कोनार्कला जाणारी बस लागली आणि मीही लटकलो...... ! बसला... Wink

पुरी ते कोणार्क हा प्रवास बर्‍यापैकी हिरव्यागार भागातून होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजुला येणारी छोटी छोटी गावे, माडाच्या झाडांच्या दाटीत वसलेली घरे वेड लावतात. हा पुर्ण पट्टाच हिरव्यागार निसर्गाने भारलेला आहे. मध्येच एका ठिकाणी कुठलीतरी एक छोटीशी नदी लागली आणि मी कॅमेरा सरसावला.

साधारण ४० मिनीटांनी बसायला जागा मिळाली. मी खुशीत येवून सीटवर टेकलो आणि हुश्श.....तेवढ्यात बस थांबली आणि बसवाहक ओरडला (त्याला बोंबलणे हा शब्द जास्त समर्पक ठरावा)......

"उतरो भाय्...कोSSSSSSSSणार...... !

शेवटचा 'क' त्याने खाल्ला की बसमधल्या कोलाहलाने कुणास ठाऊक? पण पुन्हा धक्के खात एकदाचा कोनार्कच्या त्या बसथांब्यावर उतरलो. तसे लगेच तिथले गाईडस माझ्याकडे धावले.......

"यार पहिली बार नही आ रहा हू मै...गाईडकी जरुरत नही है!" या परिस्थितीतला माझा पेटंट डायलॉग.

मेल्यावर उकळत्या तेलाच्या कढईकडे नेणार्‍या यमदुतालादेखील बहुदा हेच ऐकवीन मी.....! Proud (चमकलात? थेट स्वतःलाच नरकात नेवून उभे केले हे पाहील्यावर. वो क्या है ना भाय, अपन अपने दोस्तलोगको भोत चाहता है भिडू..जिधर तुमे लोगा रहेंगे उधरीच अपुनभी आयेगा, बोले तो ...... Innocent ) तसे त्यांनी स्थानिक भाषेत बहुदा दोन चार शिव्या हासडून माझा नाद सोडला. तरी एकजण मंदीरापर्यंत माझ्या पाठीमागे होताच. शेवटी वैतागून मीच त्याला विचारले सौ रुपये देगा क्या, तो मै तेरेको साथमें लेताय गाईड करके.... तो बिचारा खालमानेने निघून गेला. Uhoh (सज्जन होता बिचारा, खरेतर मी भांडायची आणि तशीच वेळ पडली तर बचावासाठी पलायनाची तयारीही ठेवली होती. Wink )

मंदीरापाशी आल्यावर कळाले की सुर्यमंदीर आणि तेथील पुराण वस्तु खात्याचे वस्तु संग्रहालय यांचे कॉमन तिकीट एकाच ठिकाणी मिळते. मी २० रुपये मोजून तिकीट घेतले. मंदीरदर्शनाची फी १० रुपये आणि संग्रहालयाची १० रुपये...आणि मंदीराकडे निघालो. समोरून मंदीराचे प्रथमदर्शन झाले ते या स्वरुपात. यावरुनच मंदीराच्या भव्य स्वरुपाची कल्पना येते.

तिकीट खिडकीपाशीच मंदीराबद्दल माहिती देणारे दोन फलक आढळले.

तिथे असलेल्या गार्डकडुन तिकीट पंच करुन घेतले आणि आत शिरलो.

या भव्य वास्तुच्या प्रांगणात आपले स्वागत होते.... ते भोग मंडपाच्या दर्शनाने. आता भोग मंडपाचे फक्त अतिषय सुंदर कोरीव काम असलेले उभे खांब आणि पाया शिल्लक आहेत, पण जे काही आहे, तेही वेड लावायला पुरेसे आहे. परमेश्वराच्या भोजनासाठी म्हणुन हा भोग मंडप (भोग : नैवेद्य) उभारण्यात आला होता. अतिशय सुंदर, आणि बारीक कलाकुसर असलेला भोग मंडप त्यावेळी आपल्या परमोच्च अवस्थेत असलेल्या ओरीसाच्या अत्युच्च शिल्पकलेची साक्ष देत आजही उभा आहे. पुर्णपणे अतिषय बारीक नक्षीकाम केलेल्या एका विस्तीर्ण चौथर्‍यावर सोळा संपुर्णपणे अतिषय सुरेख नक्षीकाम केलेल्या खांबाच्या आधाराने भोग मंडपाचे हे शिल्प उभे होते. आता फक्त चौथरा आणि खांबच शिल्लक आहेत. पण जे काही आहे ते निर्विवादपणे भव्य आणि सुंदर आहे.

(भोग मंडप)

भोग मंडपातून बाहेर पडले की समोर येतो तो सुर्यमंदीराचा दर्शनी भाग. त्याकडे आपण शेवटी येवू....

सुर्यमंदीराच्या उजव्या बाजुला एक पुरातन वटवृक्ष आपल्या स्वागताला हजर असतो..

मी मंदीराच्या प्रदक्षिणेला सुरूवात केली.

डाव्या बाजुला दर्शनी बाजूला सात अश्वांपैकी आता फक्त दोन शिल्लक आहेत, तेही भग्नावस्थेत. मी भारावल्यासारखा मंदीराच्या चारीबाजुनी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. नृत्यकला, यक्ष किन्नर यांच्याबरोबरच कामशास्त्रातील विविध श्रुंगारीक आसने अशा विभीन्न प्रकारांनी नटलेली ती नितांत सुंदर शिल्पे बघताना डोळे एका जागेवर ठरत नव्हते. हे एवढं भव्य, विशाल आणि तरीही इतकं सुक्ष्म नक्षीकाम केलेलं महाशिल्प उभे करायला किती वेळ लागला असेल्..किती जण त्यासाठी राबले असतील? त्या पुरंदरकेसरी ने किंवा नरसिंहदेवाने त्यांच्या प्रजेसाठी काय केले माहीत नाही, पण हे अद्वितीय मंदीर उभारून अखंड भारताला मात्र एक खुप मोठा सन्मान प्राप्त करून दिला आहे एवढे नक्की.

(प्रदक्षिणा मार्ग )

दोन तीन प्रदक्षिणा घालून झाल्यावर जाणवले की ...

अरेच्चा, अजुन आपल्याला खुप काही पाहायचे आहे. इथेच गुंतून राहीलो तर कसे व्हायचे? म्हणून मी प्रदक्षिणेचा नाद सोडला आणि मंदीराच्या प्रांगणात असलेल्या इतर शिल्पांकडे वळलो.

मंदीराच्या डाव्या बाजुला एक छोटेसे सद्ध्या भग्नावस्थेत असलेले शिल्प आहे. याला नटमंदीर या नावाने ओळखले जाते. उपलब्ध माहितीनुसार या मंदीरात नर्तकी (देवदासी ? ) देवासमोर नृत्य करायच्या. भग्नावस्थेत असलेले हे छोटेसेच नटमंदीरदेखील अंगा खांद्यावर आपल्या तत्कालीन वैभवाच्या अनेक समृद्ध खुणा बाळगून होते.

(नटमंदीर)

पुर्वी केसरी वंशातील श्री पुरंदरकेसरी याने बांधलेल्या शिल्पात एक श्रीकृष्णाचे (जगमोहन) मंदीरही होते. बहुदा सुर्यमंदीराची अजस्त्र वास्तू ढासळायला (कळस) सुरूवात झाल्यावर ते बंद करण्यात आले असावे. पण त्या मंदीरातील 'जगमोहना'चे देखणे शिल्प मात्र आजही नटमंदीरात प्रतिष्ठापीत करून जतन करून ठेवले आहे.

(जगमोहन)

जगमोहनाचे (श्रीकृष्णाचे) दर्शन घेवून बाहेर पडलो आणि अहो आश्चर्यम इथे मला अचानक आपली माणसं भेटली.

"वो ताई, हिकडं या. येक फोटू काडू या समदे मिळून....!"

एक पांढरा शुभ्र सदरा आणि पायजामा घातलेले, गांधीबाबांचे समर्थक (?) (त्यांना गांधीबाबांना समर्थन करण्यासाठी गांधी टोपीची गरज नव्हती, डोइवर मस्त पुर्णचंद्र चमकत होता, भर माध्यान्हसमयी कुणातरी ताईंना हाका मारत होते.

त्या परक्या राज्यात मराठी कानावर पडलं आणि माझी अवस्था 'देता किती घेशील दो कराने' अशी झाली. त्यांच्या हातवार्‍यांच्या रोखाने पाहीलं आणि अजुनच चाट पडलो. ते एका विदेशी तरुणीला बोलावत होते. नंतर तिचाशी बोलताना कळले की ती जपानी असुन, तिचे नाव 'एमिको' आहे, ज्याचा जॅपनीजमध्ये अर्थ होतो 'हसरं मुल' किंवा ' सुंदर मुल' ! दोन्ही नावं तिला अगदी सुट होत होती.

तर या काकांचा, माफ करा काकांची ओळख राहीलीच. Happy

चार काकालोक (अगदी सदरा, पायजामा आणि मुंडासं किंवा गांधी टोपी अशा पारंपारीक महाराष्ट्रीय वेशातले) आणि चक्क नऊवारीतल्या सहा मावश्या (बहुतेक सगळेच ४५-५० च्या पुढचे) असा हा सुरेख गृप खास नाशकाजवळच्या मालेगाववरून थेट ओरीसात जगन्नाथाच्या दर्शनासाठी आणि आजुबाजुचा हा भाग पाहण्यासाठी आला होता. विशेष म्हणजे एवढ्या लांब आलोय, तर काही जामानिमा करून नटून थटून वगैरे न येता अगदी घरगूती पेहरावात ही सगळी मंडळी आली होती. सर्वच जण सामान्य घरातले आहेत हे त्यांच्या पेहरावावरूनच लक्षात येत होते. पण प्रवासाची त्यांची या वयातली ओढ पाहून खुप छान वाटले. विशेष म्हणजे ती जपानी तरूणी 'एमिको' भाषेचा अडसर बाजुला ठेवून त्यांच्यात अगदी सहज मिसळून गेली होती.

कसं असतं ना, तुमची मनं शुद्ध असली, मनापासुन नाती जोडण्याची तयारी असली की वय, शिक्षण, भाषा, रंग, रूप, देश हे सगळे अडसर क्षुद्र ठरतात. केवळ हातवारे आणि खाणा खुणा यांच्या साह्याने त्यांच्या संभाषण चालू होते.

मी लगेचच काकांना गाठले....

"नमस्कार काका, कुण्या गावचे?"

मी संभाषणाला सुरूवात केली, मराठी ऐकली आणि काका हरखले.

"आरं ही तर आपली भाषा हाये. आमी मालेगावहून आलो देवा, तुमी कुंकडून आले?"

"मी मुंबईला असतो, कंपनीच्या कामासाठी आलो होतो. आज सुटी होती मग फिरायला बाहेर पडलो झालं. तुमच्या तोंडुन आईची भाषा ऐकली आणि राहवलं नाही" इति मी.

"लै बेस झालं देवा, आता तुमीच आमची आमच्या नव्या तायशी नीट वळक करून द्या बिगी बिगी."

म्हणाजे आत्तापर्यंत त्यांना त्या जपानी मुलीचं किंवा तिला त्यांचं नाव ही माहीत नव्हतं. मग मी त्यांच्याशी आईच्या भाषेत आणि एमिकोशी इंग्लिशमध्ये बोलत (माझ्या धन्य इंग्लीश अ‍ॅक्सेंटमध्ये) त्यांची ओळख करुन दिली. एमिको (याचा उच्चार अमिको असाही करतात का? पण स्पेलिंग EMIKO असेच होते.असो) तिच्या बॉयफ्रेंडबरोबर जगभरातील विविध जाती-धर्माच्या मंदीरांचा अभ्यास करत, जग बघायला निघाली होती. मी तिला मुंबईला येण्याचे आमंत्रण द्यायला विसरलो नाही.

(गाववाले काका आणी जॅपनीज ताई)

नंतर मालेगावची काका-मावशी कंपनी आणि जॅपनीज ताईचा निरोप घेवून मी पुढे निघालो.

मुळ मंदीराकडे वळण्याआधी मी पुन्हा एकदा आजुबाजुचा परिसर पाहून घेतला. आपल्या पुराण वस्तु संशोधन खात्याने (त्यांच्याकडून अपेक्षा नसतानाही) सुर्यमंदीराच्या आजुबाजुच्या निसर्गाची व्यवस्थीत निगा राखलेली आहे. चारी बाजुला बागा मेनटेन केलेल्या आहेत. सगळीकडे हिरवेगार असल्याने परिसर कसा प्रसन्न वाटत होता.

(सुर्यमंदीराभोवतालचा निसर्ग)

आधीच ठरवल्याप्रमाणे सगळ्यात शेवटी मी मुख्य मंदीराकडे वळलो....

कोनार्कचे हे सुर्यमंदीर तत्कालीन ओरीसा वास्तु शैलीचे एक अतिषय सुंदर उदाहरण आहे. उडीया शैलीप्रमाणे मुळ मंदीराच्या रचनेत देऊळ (गर्भगृह), जगमोहन (सभामंडप किंवा महामंडप) , अंतराळ आणि भोग मंडप अशा वास्तु अंतर्भूत आहेत. भोग मंडपाची वास्तू मुळ मंदीराच्या वास्तुपासून थोडी बाजुला असली तरी तो संपुर्ण योजनेचाच एक मुलभुत घटक आहे हे नक्की. अन्य उडीया मंदीरे आणि कोनार्कचे सुर्यमंदीर यात एकच मुलभुत फ़रक दिसून येतो तो म्हणजे हे मंदीर एका योग्य आणि सुस्थीत चौथर्‍यावर बांधण्यात आलेले आहे. एक भक्कम बेस (पाया, कट्टा .. काय बरे म्हणता येइल त्याला?) बांधून त्यावर मंदीर बांधण्यात आलेले आहे.

टिपीकल वक्रीय शिखरासहीत असलेले गर्भगृह हे उडीया शैलीच्या 'रेखा देउळ' या पद्धतीने बांधण्यात आलेले आहे. तर जगमोहन किंवा सभामंडपाचे बांधकाम हा "उडीया शैलीच्या "पिढा देउळ" या प्रकाराचा उत्कृष्ट अविष्कार आहे. दोन्ही वास्तू म्हणजे रेखा देऊळ आणि पिढा देऊळ मे मुळ प्लानप्रमाणे आतुन आयताकृती असून बाहेरून मात्र उडीया वास्तू शैलीच्या पंचरथ शैलीचे अतिषय योग्य आणि लक्षणीय उदाहरण आहे. या आणि अशाच प्रकारची बरीच माहिती तो गाईड सांगत होता. खरेतर ते सगळे माझ्या डोक्यावरून जात होते. कारण तो ज्या अगम्य हिंदी-इंग्लीश किंवा तत्सम भाषेत बोलत होता ती भाषा जाम डोक्यावरून (की डोक्यात जात होती). मलाच ते फारसं कळालं नाही पण जे कळालं ते इथे लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे.

(सर्वसाधारण आराखडा : मुख्य मंदीर + जगमोहन मंदीर)

मुख्यमंदीरालाच लागून असलेल्या या भव्य मंदीरालाच (सभामंडप) जगमोहन म्हणूनच संबोधले जात असावे. कारण तिथले गाईडलोक त्याचा उल्लेख जगमोहन असाच करीत होते. साधारण ३० चौरस मिटर आकारमान आणि तेवढीच उंची लाभलेल्या जगमोहन नामक या वास्तुला लागुनच मुख्य सुर्यमंदीर कळासासहीत उभे आहे (साधारण ६८ मिटर उंच). पुढच्या काळात कधीतरी शिखराचा भाग ढासळला गेला... (त्याची कारणे आजही अज्ञात आहेत)

यासंदर्भात इथे गाईडकडून एक विलक्षण दंतकथा ऐकायला मिळाली. (मी त्याचा फुकट्या ग्राहक होतो). त्यानुसार त्यावेळी जगमोहनाचे शिखर बांधताना त्यात एक विलक्षण शक्तीशाली असा चुंबक बसवण्यात आला होता. तो चुंबक सर्व वास्तुचा (कळस) भार सावरून धरत असे. परंतू मध्ये काही शतकांपुर्वी मंदीरावर वीज कोसळली आणि त्यावेळी तो चुंबक निखळून पडला आणि त्या नंतर मंदीराचे शिखर ढासळायला सुरूवात झाली. ही कथा जर खरी असेल तर त्यावेळचे आपले वास्तुशास्त्र किती प्रगत असेल याची कल्पनाच केलेली बरी. खरे खोटे तो जगमोहनच जाणो. नंतर शिखर कोसळायला सुरूवात झाल्यावर मंदीरात आत, गाभार्‍यात भर घालून लोकांना जाण्यास मनाई करण्यात आली. तिन्ही बाजुला असलेली दारे आता सुरक्षेच्या कारणास्तव काँक्रीटने बंद करण्यात आलेली आहेत. त्यापुर्वी वर सांगितल्याप्रमाणे आतली जगमोहनाची मुर्ती काढून बाहेरील नटमंदीरात स्थापीत करण्यात आली. जगमोहनाचे छत तीन विभीन्न स्तरात विभाजीत करण्यात आले आहे. या तिन्ही स्तरांवर अतिशय सुंदर आणि सुक्ष्म नक्षीकाम केलेली विविध शिल्पे कोरण्यात आलेली आहेत.

(जगमोहन : सभामंडप)

जगमोहन हे मला वाटते त्यावेळी एकप्रकारचे सभास्थान किंवा देवाचा दरबार भरण्याची जागा असावी. तत्कालीन उडीया मंदीरांप्रमाणे हे देखील पंचरथ पद्धतीचे बांधकाम आहे. एका विस्तृत प्लॅटफॉर्म किंवा पिठावर उभारलेल्या जगमोहनाचा आराखडा पाच आडव्या विभागांमध्ये (स्तर) विभागला गेलेला आहे. सगळ्यात खालचा भाग 'पभगा', त्यानंतर त्यावरील स्तर 'जंघा', 'बंधना' 'उर्ध्वजंघा' आणि त्यानंतरचा भाग म्हणजे 'वरंडा'. हा प्रत्येक स्तर पुन्हा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये विभागला गेलेला आहे. त्यावर मुर्ती कोरण्यासाठी किंवा नक्षीकाम करण्यासाठी छोटी छोटी खिडकीवजा आकार कोरण्यात आले आहेत. त्याला पिढा मुंडी, खाखर मुंडी आणि वज्र मुंडी अशी नावे आहेत. यापैकी पिढा मुंडीच्या रचनांमध्ये मुख्यतः यक्ष, किन्नर, फुले, नागदेवता कोरलेल्या आहेत. बाडा उर्फ जगमोहनाच्या सगळ्यात वरच्या स्तरात आठ मुक्तपणे उभ्या असलेल्या दिपकला अर्थात अष्टदिशांच्या देवतांच्या मुर्ती उभ्या केलेल्या होत्या. उदा. इंद्र (पुर्व), अग्नि (south east), यम (दक्षीण), नैरुत्य (नैरुत्य), वरुण (पश्चिम), वायू (north west), कुबेर (उत्तर) आणि इशान (इशान्य) इ. यापैकी बर्‍याचशा मुर्ती चोरून परदेशी स्मगल करण्यात आल्या. यापैकी एक मुर्ती परत मिळवण्यात ओरिसा सरकारला यश आले. ती मुर्ती सध्या कोणार्क येथील वस्तु संग्रहालयाची शोभा वाढवते आहे.

असो तर पिढा मुंडीच्या नंतर जरा वर सरकले की क्रमांक लागतो तो खाखरमुंडी रचनांचा. हे आकार बहुतांशी रिकामे आहेत किंवा बहुतेकांमध्ये काही विचित्र आकाराचे प्राणी आणि बहुतांशी अगदी लाईफ साईझ म्हणता येतील अशी कामशास्त्राशी संबंधीत शिल्पे कोरण्यात आलेली आहेत्.पुर्ण वास्तू बहुदा लोखंडी बिम्सच्या आधारावर उभी आहे. आणि मधला भिंतीचा भाग , तसेच दरवाजे बहुदा क्लोराईट किंवा तत्सम पाषाणापासुन कोरण्यात, बनवण्यात आलेले आहेत. या दरवाज्यांवर किंवा चौकटींवर म्हणु हवेतर देखील अतिषय सुक्ष्म आणि सुंदर असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. (आराखड्याच्या फोटोत डावीकडील उभे तीन आकार हे पिढा मुंडी, खाखर मुंडी आणि वज्र मुंडीचे आहेत)

जगमोहनाला लागूनच मुख्य सुर्यमंदीर आहे. इथे बाहेरच्या बाजुने, चौकटीमधून तीन सुर्यप्रतिमा स्थापीत करण्यात आलेल्या आहेत. जे काही समोर होते ते विलक्षण भारावून टाकणारे होते. या तिन्ही सुर्यप्रतिमा शैशव, तारुण्य आणि वार्धक्य या मानवी जीवनाच्या तीन कालावधीनुसार बसवलेल्या आहेत. काळ्या पत्थरात (क्लोराईट) कोरलेल्या या सुर्यप्रतिमा अतिषय देखण्या आणि भव्य आहेत. मला इथे आणखी एक रंजक माहिती मिळाली जी आधी कधीच ऐकलेली नव्हती. आपल्याकडे वैदिक काळापासून सुर्यपुजेची पद्धत आहे. पण सुर्य हा आपला देव नाही. सुर्य हा आर्यांचा देव. शेकडो युगांपूर्वी आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर आपले देवही आणले. त्यात सुर्य हा प्रमुख देव होता. त्यामुळेच आपल्या इतर देवांपेक्षा वेगळी एक गोष्ट सुर्याच्या प्रतिमेत आढळते ती म्हणजे सुर्यदेवाच्या पायात घोट्याच्याही वर येणारे बुट आहेत.

(सुर्यदेव)

निघण्यापुर्वी मंदीराच्या परिसरातील अन्य काही भग्न शिल्पांचे घेतलेले फोटो.

पाय निघत नव्हता पण निरोप घेणे आवश्यक होते. संध्याकाळ व्हायला लागली होती. मग शेवटी न राहवून पुन्हा एकदा मंदीराभोवती एक प्रदक्षीणा घातली आणि मावळत्या सुर्यनारायणाला नमस्कार करत कोणार्कच्या त्या अद्वितीय चमत्काराचा निरोप घेतला. निघता निघता तिथून जवळच असलेल्या पुराण वस्तु खात्याच्या संग्रहालयाला भेट दिली. मंदीरातून तुटून पडलेली काही शिल्पे इथे जतन करून ठेवली आहेत.

शेवटी पुन्हा एकदा इथून थेट भुवनेश्वरला जाणारी बस पकडली..... अहं लटकलो... बसला ! Happy

बॅक टू पॅव्हेलियन.... भुवनेश्वर ! उद्या मुंबईला परत..........

कोणार्कला जायचे कसे?

ट्रेन अथवा विमानाने भुवनेश्वर आणि तिथून मग बस (खाजगी बसेस सुटतात भुवनेश्वरहून). पुरी, कोनार्क एका दिवसात सहज होण्यासारखे आहे. कोनार्कच्या आसपास अजुनही काही बघण्यासारखी क्षेत्रं आहेत. उदा. चंद्रभागा ई. पुरीबरून कोनार्कला जाताना मध्येच हे लागते. मला नाही जमले पण होण्यासारखे आहे. राहण्याची सोय भुवनेश्वर आणि पुरी इथे चांगली होवू शकेल. कोनार्कमध्ये मला काही विशेष हॉटेल्स दिसली नाहीत. भुवनेश्वरला राहणे उत्तम.

इतर फ़ोटो इथे आहेत.....

कोनार्क पिकासा फोटो लिंक..

http://picasaweb.google.co.in/vishalkulkarni35/Konark?feat=email#

विशाल कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर माहिती आणि फोटो. पौराणिक संदर्भ, दंतकथा, प्रेझेंटेशन.. सारेच सुंदर. Happy

फक्त ते (नाशिक जिल्ह्यातल्या) मालेगावचे लोक अशी भाषा बोलत नाहीत. अहिराणी बोलतात. मराठी बोलले, तरी ती अशी नसते. ते शक्य झाले तर बघून घे एकदा. Happy

विशाल अप्रतीम उपक्रम. कॉलेजमध्ये असताना ह्या मंदीराच्या स्थापत्य आणि कला विषयी शिकले होते, त्याची अधिक सखोल उजळणी झाली. त्यात भर म्हणजे कथा-उपकथा विथ विशाल टच Happy संग्राह्य छायाचित्रे.

तो हत्तीवर सिंह काय प्रकार आहे नक्की ?>>>>

नंदीनी हे बघा, मी म्हणाल्याप्रमाणे तुमच्यासाठी अजुन एक काम आले. आता प्लीज लिहाच....

बाकी सर्वांना धन्स !

फारच छान लेख आणि प्रकाशचित्रे.
मी कुठेतरी वाचले होते, कि हे सूर्यमंदीर कधीच ग्रहणकक्षेत येत नाही, त्याबद्दल काहि कळले का ?

विशाल, छान लिहिले/गुंफले आहेस. त्या परिसरात पाहण्यालायक अजुन अनेक जागा आहेत. जमल्यास लिहितो १-२ दिवसात.

दिनेश, सुर्यग्रहणांना ती जागा वर्ज्य नाही.
www.eclipse-chasers.com/pics/TotalSolarEclipses_2010_2050.pdf

AM_konark_giraffe_sP1010116_5.jpg

हा तो जिराफचा फोटो.

विशाल, भुवनेश्वर मधील अनेक मंदिरांव्यतिरीक्त जमल्यास पुढच्यावेळी हिरापुर आणि शिशुपालगढला जाता आले तर पहा. हिरापुर मधी ६४ योगिनींचे मंदिर भव्य जरी नसले तरी स्तापत्यशास्त्राच्या व पुराणवस्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे आहे (८वे शतक), तर शिशुपालगढला अजुनही उत्खनन सुरु आहे (निदान ३ वर्षांपुर्वी मी गेलो होतो तेंव्हा तरी होते). ते शहर कलिंगाची राजधानी असावी असा कयास होता/आहे (ईसपुर्व तिसरे शतक).

http://avyakta.caltech.edu:8080/photo2007/india/india07_/bhub_surrounds....

दिनेशदा, अस्चिग मनःपूर्वक आभार.
अस्चिग, फोटो आणि माहितीबद्दल आभार. पुढच्या वेळी शिशुपालगढ आणि हिरापुर नक्की. धन्स. Happy

Pages