हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ३

Submitted by बेफ़िकीर on 23 April, 2010 - 09:31

माकड नावाचा एक प्राणी असतो अन तो वाट्टेल तशा उड्या मारू शकतो अन काहीही पळवू शकतो ही अद्भुत माहिती दीपकरावांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली. आपल्याकडे पाच वर्षाचे व्हायच्या आधीच मुले ’झू’ पाहून आलेली असतात. निदान चित्र तरी पाहतातच! महुरवाडीत माणसेच झू मधल्या प्राण्यांसारखी दिसायची. आणि ती माणसे जे प्राणी विकायला म्हणून पकडून आणायची त्यात काही पक्षी, बदक, ससा असे पशुपक्षी त्याने पाहिलेले होते. वाघ, सिंह व हत्ती ही नावे तो ऐकून होता. कधीतरी कुणीतरी कुणालातरी ’माकडा’ म्हणायचे तेव्हा त्याला ती एक दर्जेदार व वापरायला सोपी अशी शिवी वाटायची. बेडूक, डास, काही किडे, कोळी, पाल, उंदीर, कोंबड्या, शेळ्या अन गाढवे हे वैविध्यपूर्ण सजीव त्याला वारंवार दिसायचे. वस्तीत दिवसा मेल्या मढ्याप्रमाणे पडलेली कुत्री रात्री भुंकून झोप घालवतात हे त्याला माहीत होते. मांजर केव्हाही कुठेही असू शकते याची त्याला कल्पना होती. बैल, गायी, म्हैस हे अवाढव्य प्राणी वस्तीत जरी कुणाकडेही नसले तरी चांदवडच्या वाटेवरून काही जण असले प्राणी हाकत न्यायचे अन ते प्राणी काठीला घाबरतात हे त्याने जाणलेले होते. पण माकड? माकड हा एक प्राणी आहे?? वडाळी भुई या ठिकाणच्या दोन वर्षाच्या प्रदीर्घ वास्तव्यातही माकड या प्राण्याशी दिपूचा सुतराम संबंध आलेला नव्हता.

ढाब्यावर अचानक माकड आले. धुलिया गाडी नुकतीच थांबत होती अन रमण जिवाच्या आकांताने शिट्टी मारून त्या गाडीला येऊदे येऊदे करत होता. चालत्या गाडीतूनही चार, पाच उत्साही माणसे अन एक अगदीच घाईची लागलेला असे सहा एक जण उतरलेले होते. आणि एक माकड आले.

वेळ संध्याकाळची सातची होती. धुलिया गाडीपासून जी ग्राहकांची सुरुवात होणार होती ती थेट रात्री दोन वाजेतोवर नुसता धिंगाणा चालणार होता ढाब्यावर!

समोरून अब्दुल धावत धावत ओरडत आला. माकड, माकड! तेव्हा पद्या एका टेबलाची ऒर्डर घेत होता, गणपतचाचा गल्ल्यावर होता अन दिपू गार्डनमधल्या एका टेबलावर बसलेल्या माणसांकडे कुतुहलाने बघत बसला होता.

अब्दुल का ओरडतोय बघितल्यावर त्याला अचानक एक विचित्र प्राणी दिसला. राखाडी रंगाचा! तो तुफ़ान वेगात वाट्टेल तशा उड्या मारत होता. दिपू अक्षरश: गळाठलाच. मात्र तो प्राणी क्षणार्धात त्या टेबलावर आला अन फ़रसाणाची डिश घेऊन पळाला. या प्रक्रियेत बरेचसे फ़रसाण आजूबाजूला सांडले. त्या लोकांना काय झाले ते समजायच्या आधी फ़रसाण गुल झाले होते. एकच हल्लकल्लोळ माजला. पहिले म्हणजे दिपू आत सुसाट धावत गेला. त्याचा तो वेग पाहून भटारखान्यात दादूने विचारले काय झाले त्यावर दिपू म्हणाला वो कुछ तो भी आयेला है उधर, फ़रसाण लेके भाग्या!

धुलिया गाडीतली माणसे, विशेषकरून बायका, उतरायलाच तयार होईनात! मगाशी उतरलेल्या चार सहा माणसांना परत घेऊन ते पुढच्या ढाब्यावर गेले. गणपत त्यांना परोपरीने सांगत होता की माकड गेलेले आहे, आता येणार नाही. पण त्यांना गणपतचे आश्वासन फ़ोल वाटत होते.

पहाटे तीन वाजता सगळी कामे संपल्यावर सगळे भटारखान्यात बसून भात अन वरण खात होते तेव्हा त्या माकडावर खूप चर्चा झाली. जवळपास पंधरा मिनिटे सगळे बोलत होते. इथे कुंपण लावायला हवे, एखादे कुत्रे ठेवुयात, अब्दुलच्या मागेच कुंपण लावुयात, रमणचे लक्ष असायला हवे वगैरे वगैरे!

चर्चा संपत असताना दिपूने तो प्रश्न विचारला.

माकड ऐसा होता है???

झालं! सगळं गांभीर्यच गेलं! दमून कधी एकदा झोपतोय असा विचार करणारे सगळे तिथेच थांबले अन खो खो हसायला लागले. फ़क्त गणपतचाचा हसत नव्हता आणि पद्याचे त्याच्याकडे बारीक लक्ष होते. चाचाने पाणी पिण्यासाठी भांडे तोंडाला लावल्यावर पद्याला शंका आली की पाण्याचे निमित्त करून हे हसत असतील!

पद्या - आप हसे ना चाचा?
गणपत - इसमे क्या हसनेका है??

पुन्हा सगळे हसायला लागले.

केवळ एका आठवड्यात दिपू त्या ढाब्यावर रमला होता. एक गोष्ट कालच्यासारखी होत नव्हती. रोज काही ना काही शिकायला मिळत होते. आज माकड म्हणजे काय ते कळले होते.

अबू - माकड ऐसा नय होता, वो आदमी था .... दस साल पयले सामने ढाबा चलाता था...

असे म्हणून अबूने ’सध्या गणपत असा दिसतोय त्यावर जाऊ नका, पुढे हाही त्या माकडासारखाच दिसेल’ असे भाव तोंडावर आणून गणपतकडे पाहायला सुरुवात केली. सरळ सरळ गणपतचाचाला माकड म्हणतोय तरी चाचा काही बोलत कसा नाही याचे दिपूला आश्चर्य वाटले. तेवढ्यात चाचा बोलला.

चाचा - उसके ढाबेपेभी ऐसाही रोटी बनानेवाला होगा तो बंदर तो होगाही आदमी....

बोलायला चाचाही कमी नव्हता. एरवी गप्प असायचा एवढेच!

पहाटे चार वाजले तरी सगळे गप्पाच मारत होते.

दिपू जागच्याजागी लवंडलेला पाहून पद्याने त्याला उचलून त्याच्या खोलीत ठेवले.

काय एकेक कस्टमर येतात ढाब्यावर!

त्या दिवशी विचित्रच प्रकार झाला. चार स्थानिक माणसे येऊन साडे सातला गार्डनमधे बसली. त्यांच्याकडे बाटल्या होत्या आणि एक मोठी पिशवी होती.

पद्या आपली ऒर्डर घेत होता.

त्या लोकांपैकी एक उठला अन चाचाकडे आला. दिपू गल्ल्यापाशी उभा होता. तो माणूस आजूबाजूला कुणी नाही हे पाहून चाचरत चाचरत चाचाला म्हणाला!

तो - बात करनेकी है
चाचा - बताईये??
तो - इधर... मोर मिलेगा क्या मोर?
चाचा - मोर? ...मतलब?
तो - मोर नय होता क्या? लांडोर.. मोर.. उसमेका मोर
चाचा - मोर कैसे मिलेगा?? ये ढाबा है!
तो - हम मोर देंगे तो पकायेंगे क्या?
चाचा - आप मोर देंगे? ....कहॊंसे देंगे?
तो - आणला हाय!
चाचा - मोर? कहा है?
तो - बॆगमे है
चाचा - जिंदा???
तो - ह्या! ......... मारेला है..
चाचा - मोर मारनेका नही है... राष्ट्रीय पक्षी है वो... पकडेंगे ...आपको भी और मेरेको भी...
तो - वो मेरको पता है! मै फ़ॊरेस्टकाच आदमी है! मारेला मतलब मरा हुवा मिलेला है...
चाचा - अंहं! मोर नही बनाते हम....
तो - आधा आपकेलिये रख्खेंगे..
चाचा - साब... यहा मोर नही पकासकते...आप चिकन लीजिये....
तो - हम तो फ़ॊरेस्टमेही पकानेवाले थे... आपके ढाबेका नाम सुना इसलिये यहा आये...

ते लोक निघून गेले. ते जाताना चाचा काळजीपुर्वक त्यांच्या जाण्याकडे बघत होता. आपल्याला तपासायला तर लोक आले नसतील ना अशी त्याला शंका होती. दिपूला मोर पाहायला मिळाला नाही.

दिपू - क्या बोल रहे थे?
चाचा - मोर का मटण मंगता था
दिपू - मोर का? हमारे पास होता है?
चाचा - छ्या! मोर मारनेका नही...
दिपू - क्युं??
चाचा - वो राष्ट्रीय पक्षी है..
दिपू - याने?
चाचा - मोर मारना गुन्हा है... पकडते है मोर मारनेवालेको...
दिपू - इनको नही पकडेंगे?
चाचा - नही... ये लोग मोर मारे नही.. मरेला मोर लेके आये थे...
दिपू - मोर मारा तो क्या शिक्षा होती है???
चाचा - जेल मे डालते...
दिपू - और....

चाचाने दिपूच्या तोंडाकडे ’आता हा काय विचारणार आणखी’ म्हणून पाहिले

दिपू - मुर्गी मारनेवाले को...???
चाचा - मुर्गी मारनेवाले को नही डालते जेल मे...
दिपू - इसलिये मुर्गी मारते है???

किती साध्या शब्दातून केवढे तत्व व्यक्त झाले होते. केवळ कायदा आहे म्हणून मोर मारायचा नाही. कोंबड्या तर काय, पोसल्याच जातात मारण्यासाठी! दोन्ही जीवच! पण एकाला कायदा, एकाला नाही! आयुष्यात पहिल्यांदाच केविलवाणी ओरडत असलेली कोंबडी आठवून गणपतचाचा अधिकच गंभीर झाला. ओरडत असलेल्या कोंबडीची सुटण्याची धडपड बघताना थिजलेल्या बाकीच्या कोंबड्या आठवून त्याने काहीही न बोलता ढाब्याबाहेर नजर वळवली. आणि... दिपूला प्रश्नाचे उत्तर समजले होते.

शक्य आहे म्हणून कोंबडी मारतात, जेल होऊ नये म्हणून मोर मारत नाहीत...

एक एक फ़िलॊसॊफ़ी त्याच्या रक्ताचा भाग नकळतपणे बनत चालली होती. यापुढे आयुष्यात शक्य असेल तेथे दिपू आपले चालवणार होता. ही निष्ठुरता, तथाकथित व्यावहारिकता, कोरडेपणा, दिपूमधे हे सगळे आपण निर्माण करत आहोत हे मोर घेऊन येणारे, झिल्या, पद्या, अबू अन गणपतचाचा यांना माहीतच नव्हते. माहीत झाले असते तरी ते काहीही करू शकले नसते. कारण! कोंबडी खाण्यामुळे त्यांचे पोट भरत नसले तरीही कोंबडी मारण्यावर त्यांचे पोट अवलंबून होते.

दिपू - अबू.. पद्या बोला कुर्मा मंगता करके
अबू - हां! तो?
दिपू - कुर्मा कलही खतम नही क्या होगया?
अबू - राम रहीम ढाबेपे कुछ खतम नही होता... वो रस्सा ले.. सब सब्जीया हातसे निकाल, उसमे मटर और फ़्लॊवर डाल
दिपू - ये? ये तो पनीर माखनवाला...
अबू - आदमी पियेला है... उसको क्या समझेगा??? तू जे देगा उसको कुर्मा समझेंगा वो...

दिपू हसत होता. धमाल आहे राव इथे! कोण मागतंय काय अन देतायत काय? अन तरी पैसे मिळतायत! जगाला खोट्याची किती सवय झालीय!

एका रात्री दिपू खोलीत झोपलेला असताना अचानक त्याला दोन अडीचला जाग आली. दादू अन समीर शेजारी झोपलेले होते. दिपूची किंचित हालचाल चाललेली होती. पण त्यांची झोप जायला नको म्हणून त्याने हालचाल थांबवली. ढाब्यावर येऊन दोन महिने झाले होते. काम करायचे नाही सांगूनही दिपू अनेक गोष्टी शिकला होता. फ़ोडणी कशी बनवतात, रस्सा कसा करतात, रोटीचे टेक्निक काय, एकाच रश्यात अनेक भाज्या घालून थोडासा फ़ेरफ़ार करून कसे विविध नावाचे पदार्थ करून वेगवेगळे भाव लावता येतात... हे सगळे त्याला नुसते बघून माहिती झाले होते. केले काहीच नव्हते. पण मधेमधे करून काही ना काही मदत तो अबूला रोजच करायचा. ढाबा हे एकमेकांवर प्रेम कसे करावे याचे नितांतसुंदर उदाहरण होते. चार, पाच दिवसांनी कधीतरी मनीषा ताई, स्वाती ताईंची आठवण यायची. स्वाती ताईचे लग्न झाले असेल! आईची आठवण मात्र दिवसागणिक पुसट होत चालली होती. सध्या आईच्या जागी झरीनाचाची होती. आई नसलेल्या पोराला दोन अडीच वर्षात चार चार आया मिळालेल्या होत्या. आनंद मानावा की दु:ख हे समजण्याचे त्याचे वय नव्हते.

पण एक झाले होते. अंगात जोर यायला लागला होता. लहानपणचे बाळ अंग जरी जात असले तरी ताकद वाढू लागली होती. आवाज फ़ुटला होता. पद्या, विकी, बाळ्या, दादू, समीर अन झिल्या हे जीवाचे सवंगडी झाले होते. वयाची अट प्रेमात येत नव्हती. पण... पण.. आपल्याला आत्ता ... अशा वेळी जाग का आली???

पाच एक मिनिटांनी त्याला ते आठवले. आज संध्याकाळी आलेल्या मालेगाव नाशिक बसमधे एक म्हातारी बसलेली होती. आणि... अगदी ताजी आठवण नसली तरी इतके नक्कीच आठवत होते की ती... बहुतेक... आक्का होती! महुरवाडीची! बहुतेक काय?? नक्कीच.. नक्की आक्काच होती ती!

ती महुरवाडीला चाललेली होती की महुरवाडीहून? हे काही समजत नव्हते. पण अर्थ नक्की हाच होता. मालेगाव नाशिक या मार्गावर कुठेतरी महुरवाडी आहे. खिशात दिडशे रुपये साठलेले होते. कधी टीप, कधी चाचाने उगाचच दिलेले, पहिल्या दिवशीचे... असे सगळे मिळून...

जायचं? जाउयात का गावी? घेतील आपल्याला पुन्हा? आता आपण मोठे झाले आहोत. मन्नूकाकाला घरात पाहून आपण आता घाबरणार नाही. आपल्याला इलेक्ट्रिक कळतं, वाचता येतं, लिहिता येतं, रस्सा बनवता येतो... घेतील आपल्याला...

पण.. इथे काय सांगायचं? झरीनाचाची अन अबूला?

आजच आक्काला भेटून विचारायला हवं होतं! पण... तिला विचारायच म्हणजे त्यांना आधीच कळणार की आपण इथे आहोत अन तिकडे यायचा प्रयत्न करतोय! बरं झालं नाही विचारलं ते! एकदम गेलं पाहिजे! पण ... कधी? आत्ता? छे! आत्ता बसही नाहीये. इथे जवळपास दोन गावं आहेत म्हणा! पण रात्रीचे चालतच जावे लागेल इतक्या लांब! उद्या.. उद्या निघूयात.. कदाचित ... आई आपल्याला जवळ घेईल.. आणि मग... झरीनाचाचीची आपल्याला काही.. गरजच... नाही नाही.. असे नाही.. आईने काय केलंय? फ़क्त हाकलून दिलं आपल्याला... कोण सांभाळणार होतं आपल्याला? झरीनाचाची अन मनीषाताईच चांगल्या आहेत...

दिपूचे विचार उलटसुलट चालत असतानाच त्याला खुसपुस जाणवली. हळूच त्याने वळून पाहिले तर ....

झोपेत दादूची पॆंट गुडघ्यापर्यंत खाली घसरलेली होती.... आणि......

समीर स्वत:च्या हाताने दादूचा........

भण्ण पोकळी निर्माण झाली दिपूच्या मनात! हे काय? हे काय करतायत असलं काहीतरी?? आपण जागे आहोत हे माहितीच नाहीये यांना! आत्ता आपण उठलो अन विचारले किंवा बोललो तर आपल्याला काहीतरी करतील... मन्नूकाका नव्हता का चिडलेला... आपण आत्ता बोलायचंच नाही...

दिवस उजाडून दादू अन समीर बाहेर जाईपर्यंत दिपू पडून होता पण... जागाच होता...

आणि त्याला एक गोष्ट निश्चीत समजलेली होती...

रात्री मोठी माणसे काहीतरी करतात हे नक्की... मग बाई अन पुरुष असो... नाहीतर पुरुष अन ... पुरुष!

अफ़ाट लोकसंख्या असलेल्या अन पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण झपाट्याने करत असलेल्या भारताला मुलांच्या लैंगिक शिक्षणाची तीव्र आवश्यकता आहे खरे तर... पण ते मिळत नाही. कित्येक गुन्हे केवळ संस्कृतीच्या प्रभावामुळे होत आहेत अन अशा गुन्ह्यांचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढत आहे.

बी.पी.ओ. किंवा तत्सम उद्योगातील स्त्रियांना घरी सोडण्याची जी गाडी असते त्यातील ड्रायव्हरने एकतर्फ़ी प्रेमाने काहीतरी केल्याची अनेक उदाहरणे वाचून झाली. बलात्काराच्या घटना कित्येक घडल्या.

मुळात हे होण्याची प्रेरणा काय? स्त्रीला स्वातंत्र्य किंवा पुरुषाइतकेच स्थान समाजात असायला हवे हा विचार अतिशय स्तुत्य आहे. पण... सगळेच्या सगळे लोक तसे असतील तरच ते होणार ना? अमेरिकेत लैंगिक गुन्हे घडत नाहीत असे नाही. पण मुळातच इतके स्वातंत्र्य तेथे आहे की भर रस्त्यावर स्त्रीच्या शरीराचा काही भाग कपड्यांमधून दिसला की शिट्ट्या मारत किंवा कॊमेंट्स पास करत (बहुतेक) तिथली टवाळ पोरे हिंडत नसावीत. कारण त्यांच्या डोळ्यासमोर ही रोजच घडणारी घटना आहे. पण भारतात रात्री एक वाजता परकी असूनही शेजारी बसलेल्या अन हसून गप्पा मारत असलेल्या मुलीच्या शरीराचा भाग जर ड्रायव्हरला रोज दिसत असला तर त्याचा गोड गैरसमज होणे किंवा नियंत्रण सुटणे शक्य नाही का? अर्थात, स्त्रियांची बदलती वेशभुषा अन त्याचे परिणाम वगैरे गप्पा इतरांनी माराव्यात.

पण... खेडेगावात काय???

दिपूसारख्या मुलांना मात्र या शिक्षणाची अतिशय गरज असते. आणि त्याला पहिलाच धडा जो जीवनाने दिला तो समोरचा मन्नूकाका अन आपली आई यांच्यामार्फ़त तर दुसरा धडा दिला तो समलिंगी संभोगाचा!

आठवडभर दिपू समीर अन दादूशी बोलतही नव्हता अन काहीतरी कारण सांगून तो एकटा भटारखान्यात झोपायला लागला होता. चाचाला वेगळाच संशय असल्याने त्याने सुरुवातीला दिपूवर लक्ष ठेवले होते पण झोपतानाचा त्याचा निरागस चेहरा पाहून चाचाने त्याला कायम तिथेच झोपायची परवानगी दिली होती.

पंक्चरवाला अब्दुल हे एक पात्रच होते. चोवीस तास हा माणूस दारू प्यायलेला असायचा. मी सकाळी उठतो का तर दारू पिण्यासाठी अन रात्री झोपतो का तर तेव्हा घेतलेली उतरल्यावर सकाळी पुन्हा घेता येईल या आनंदात असे तो अभिमानाने सांगायचा.

एवढे होऊन पंक्चर काढण्यात कसलीही दिरगाई नाही. कस्टमर नसेल तेव्हा तो आपला ढाब्यावर येऊन बसायचा. त्याचे घर झरीनाचाची ज्या वस्तीत राहात होती तिकडेच होते. तो एकटाचा होता. असेल चाळीस वर्षांचा!

दारू चढली हा प्रकार त्याच्याबाबतीत होऊन किती वर्ष झाली होती हे त्यालाही आठवत नव्हते. ढाब्यावर मात्र त्याला कुणी साथीदार नसायचा. पार्टी वगैरे केली तर गणपत घ्यायचा, पण ते दोन महिन्यातून एकदा वगैरे! अबू म्हणे पुर्वी खूप प्यायचा. काहीतरी झाले अन त्याने पिणे सोडून दिले असे कुणीतरी दिपूला सांगीतले होते. आणि गणपतचाचा आणि अबू यांना घाबरून पण हळूच लपव्न पद्या म्हणे कधीतरी बीअर घ्यायचा.

विकी दिप्याचा चांगला मित्र झाला होता. दिपू प्रकटायच्या आधी ढाब्यावर काय काय झाले होते हे जेवढे माहीत असेल तेवढे विकी त्याला वेळ काढून सांगायचा. दादू अन समीरचा त्या रात्रीचा प्रकार विकीला सांगावा की नाही हे दिपूला कळत नव्हते. त्यालाच लाज वाटत होती.

त्या दिवशी नेहमीप्रमाणे कोंबड्या घेऊन गाडी आली. यावेळेस कोंबडी सिलेक्ट करायला दिपू गाडीवर चढला. ढाब्यात पस्तीस चाळीस ग्राहक होते. नेहमीच्या खिडकीतून अबूचा काळाकभिन्न चेहरा दिसत होता. ती खिडकी ते ढाब्याचा एन्ट्रन्स हे अंतर साधारण पनास मीटर असावे. दिपूला चांगल्या गलेलठ्ठ वीस कोंबड्या सिलेक्ट करायला सांगीतले होते. त्यात सात कोंबडे हवे होते अन तेरा कोंबड्या! कोंबडा असेल तर वीस रुपये प्लेट जास्त मिळायचे. पण खास कोंबडाच पाहिजे असे म्हणणारे लोक कमी असायचे.

या बाळाने गाडीवर चढून सर्वांदेखत हातात एक कोंबडं धरत ओरडून अबूला विचारले...

दिपू - अबू... ये मुर्गी है कि मुर्गा कैसे पहचाननेका???

याहीवेळेस गणपत हसला नाही. मात्र ढाब्यावर आलेल्या बायकासुद्धा एकमेकींकडे बघत पदराने तोंड दाबत हसू लागल्या. तो प्रश्न फ़ार निरागसपणे अन जोरात विचारण्यात आला होता.

अबू आणखीन पुढचा होता!

अबू - मुंडी मरोडके देख
दिप - कायको???
अबू - चिल्लायेगा तो मुर्गा ... चिल्लायेगी तो मुर्गी...

अख्खा ढाबा खो खो हसत होता. कोंबडीची गाडी घेऊन येणाराही हसत होता. पण त्या दिवशी कुणाचे लक्ष नाही बघून दिपूने काढून ठेवलेल्यातली एक कोंबडी अब्दुलने हळूच मागच्यामागे पळवली अन दुकानात नेऊन एका लाकडी खोक्यात लपवली.

रात्री अकरा वाजता नेहमीप्रमाणे टाईट होऊन अब्दुल गल्ल्यापाशी आला अन चाचाला स्वत:कडची जिवंत कोंबडी दाखवत म्हणाला

अब्दुल - इसका चिकन बनाके दोगे क्या?
चाचा - चिकनही तो है ये...
अब्दुल - अंहं! रस्सा
चाचा - क्यो? ढाबेपे है ना बनायेला चिकन?
अब्दुल - अंहं! वो तुम लोग मुर्गीके साथ रेट लगाते है... मै मुर्गी अपनी दुंगा... खाली बनानेका रेट बोलो..
चाचा - खाली बनाते नही हम... अभी तू जा.. रातमे हम खाना खाते है तब बुलायेगा तेरेको.. तब देता मै.. अबी कस्टमर है...
अब्दुल - मै कस्टमरही है...
चाचा - अब्दुल... मै तेरे दुकानपे गाडी लेके आयेगा और बोलेगा के पंक्चर मै निकालता हूं लेकिन दुकान तेरा है इसलिये बोल कितना लेगा... तो तू क्या बोलेगा??

पण का कुणास ठाऊक, अचानक अबू तिथे येऊन पोचला होता.

अबू - क्या बोलता ये??
चाचा - चिकन करनेको बोलता है... मुर्गी इसकी...

अबूला अनुभवाने सगळा प्रकार लक्षात आलेला होता. ही कोंबडी गावरान नसून अब्दुलने पळवलेली आहे हे त्याच्या लक्षात आलं! तो म्हणाला:

अबू - ला, मै बनाके देता इसका चिकन
अब्दुल - कितनेमें?
अबू - मुर्गी कितनेकी है??
अब्दुल - मुर्गी पीछे बस्तीमे दौड रही थी... मै पकड्या
अबू - तो फ़ोकटकीही है ना??
अब्दुल - हां तो?
अबू - तो रस्सेका एकसो बीस रुपया
अब्दुल - एकसो बीस? कायको??
अबू - कायको मतलब? मुर्गी मारनेका, साफ़ करनेका, पर निकालनेका, धोनेका, उबालनेका, रस्सा बनानेका...
अब्दुल - लेकिन चिकन मसाला कितनेका है?
अबू - चिकन मसालामे क्या होता है? एक तंगडी और तीन पीस.. ये अख्खा मुर्गी है..
अब्दुल - तो?
अबू - अख्खा मुर्गीको चिकन हंडीका रेट लगेगा और उसमेसे मुर्गी मायनस...
अब्दुल - हंडी कितनेकी?
अबू - ढाईसो
अब्दुल - तो मेरे लिये डिस्काउंट करो ना... सत्तर रुपये मे रस्सा..
अबू - ठीक है.. सत्तर रुपये का रस्सा देता हूं.. और ये मुर्गी उसमे डालता हूं..
अब्दुल - मतलब? रस्सा कम पडगया तो??
अबू - कितने आदमी खानेवाले है?
अब्दुल - मैहीच.. अकेला
अबू - तो सत्तर रुपये का रस्सा बहुत है तेरे लिये... उतनाभी नही जायेगा तेरेको
अब्दुल - मै तो कलभी खायेगा
अबू - कल होशमे होगा तो खाले... अभी दे मुर्गी इधर

आता गणपतचाचा मधे पडला. दिपू बघत होता.

चाचा - अरे अबू... हमने आजही मुर्ग्या ली ना? ये लेके क्या करेगा तू??
अबू - वो मै देखता....

अबू कोंबडी अन सत्तर रुपये ओढून घेऊन आत निघून गेला. दिपक त्याच्यापाठोपाठ गेला. आत जाताना अबूने अब्दुलला आत यायचे नाही असे सांगीतले.

अब्दुल पुन्हा दुकानावर जाऊन बसला अन दर दहा मिनिटांनी येऊन विचारू लागला झाले का चिकन?

शेवटी अर्ध्या तासाने अबूने एक पातेले भरून इतके गरम चिकन आणले की अब्दुलच्या तोंडाला पाणीच सुटले. मात्र रोटी दहा मिनिटांनी घेऊन जा म्हणून सांगीतले.

दुकानावर जाऊन त्याने आधी पुन्हा भरपूर दारू लावली. वाटीत रस्सा घेऊन प्यायला. मग रोटी आणायला पुन्हा ढाब्यावर आला. अबू हळूच त्याच्या दुकानावर गेला आणि ते पातेले उचलून पुन्हा भटारखान्यात आला. आता दिपूला हसू यायला लागले. हा अबू आता काहीतरी मजा करणार असे त्याला वाटायला लागले. रोटी घेऊन दुकानावर गेलेला अब्दुल बोंबलत ढाब्यावर आला अन जोरजोरात चिकन कुठे गेले म्हणून चाचाला विचारू लागला.

अबू पुन्हा गल्ल्यापाशी प्रकट झाला!

अबू - क्या बे?? क्या हुवा??
अब्दुल - चिकन कहा है?
अबू - कायका चिकन?
अब्दुल - जो मै अबी लेगया था वो...
अबू - मतलब? कहा गया?
अब्दुल - वही मैच पुछरहा!
अबू - तू खुदही लेगया ना??
अब्दुल - हा लेकिन रोटी लेनेको आया तो चिकन कहा गया
अबू - फ़िर पीछेकी बस्तीमे गया होएंगा... भागके
अब्दुल - अबूबकर.. मजाक सुझता तेरेको? सत्तर रुपया देके लिया था मैने..
अबू - सत्तर रुपया देके रस्सा लिया दोस्त तुने
अब्दुल - मतलब??
अबू - ये तेरा सत्तर रुपया.. अब जा
अब्दुल - मतलब?
अबू - जैसे तू अभी चिकन हंडी ढूंढरहेला है ना.. वैसेही मैभी वहीच मुर्गी ढूंढरहा था.. जो तुमने चुरायी हमारे यहॊंसे

गणपतचाचा आ वासून अबूकडे बघत होता. दिपूला आपण कोंबड्यांवर लक्ष ठेवले नाही याची लाज वाटली. आणि अब्दुलचा चेहरा सर्रकन उतरला होता. त्याची सरळ सरळ मानहानी झाली होती. तो उतरलेल्या तोंडाने ’आज चिकन मिळणार होते, पण आपण पकडलो गेलो’ अशा भावनेने उदास होऊन मागे फ़िरला. अबूने हाक मारली.

अबू - अबे ओ अब्दुल...

अब्दुलने मागे पाहिले. अबूच्या हातात ते पातेले होते.

अबू - ये ले जा! मजा कर! तेरा सामने दुकान है.. पैसा देनेकी क्या जरुरत है? कभीभी आके हकसे चिकन खा सकता है तू! दोस्त है ना हम?

अबू उदासवाणा होऊन पुन्हा मागे फ़िरला.

अबू - अबे ओ? फ़िर चोरी मत करना.. यही समझानेकेलिये भगुला छुपाया मैने...

अब्दुलने मागे वळून पुन्हा अबूकडे पाहिले. अबूच्या तोंडावर प्रेमळ हसू होते तर अब्दुलच्या डोळ्यात पाणी!

अब्दुल म्हणाला:

अब्दुल - अबूबकर, तू सही कहरहा! लेकिन शराबकी वजहसे सब पैसा उडजाता मेरा! फ़िर खानेको पैसाही नय बचता. हमेशा चाचासे ढाबेपे उधार मांगेंगा तो क्या इज्जत रहेगी?? इसलिये अल्लाहसे माफ़ी मांगकर चुराली मुर्गी... माफ़ कर...
अबू - अल्लाहसे... शराब पीनेकी माफ़ी रोज मांगता है क्या??

अब्दुलने खाडकन वर करून लगेच खाली घातलेली मान पातेले हातात घेऊन दुकानात जाऊन आतून दार लावेपर्यंत वर केली नाही.

आणि अल्लाह म्हणजे काय हे दिपूला माहीत नसल्याने त्याने रात्री विकीला विचारले तेव्हा समजले...

अबूबकर, अब्दुल, झरीनाचाची अन झिल्या.. हे चौघे मोहमेडीयन आहेत.. आपल्यातले नाहीत... मुसलमान आहेत... याच लोकांनी म्हणे मालेगावला दंगल केली होती...

दिपूच्या मनात विचार आला... जर... यांनीच दंगल केली होती तर.. गणपतचाचाला अन त्याच्या घरच्यांना अबूने कसे वाचवले?? आज अब्दुल स्वत:च्याच समाजातला असून त्याची चोरी अबूने का पकडली??? त्याला दारू पिऊ नको म्हणून कसे सांगीतले??? अब्दुल गणपतचाचाची माफ़ी मागून कसा काय गेला???

आणि मुख्य म्हणजे... झरीनाचाची.... तिचा स्पर्श आपल्याला ... आपल्याच आईसारखा कसा वाटतो...??? हे लोक आपल्यातले नाहीत?? की??? आपणच... आपल्यातले नाही आहोत???

किती मोठा विचार होता हा! आपणच आपल्यातले नसणे! मानवनिर्मीत सीमारेषांच्या पलीकडे जाण्याच्या मार्गावरचे पहिले पाऊल!

फ़क्त, ते पाऊल आपण उचलले आहे याची जाण बारा वर्षाच्या दीपक अण्णू वाठारेला नव्हती...

आपण बाकीचे सगळे हिंदू आहोत हे त्याला विकीने सांगीतले. पण आपण हिंदूच का आहोत हे विकीलाही सांगता आले नाही. संवाद थांबला तेव्हा रात्रीचे दिड वाजले होते. विकी निघून गेल्यावर दिपू खोलीतून बाहेर आला. आज त्याला अबूने चिकन बिर्याणी कशी बनवतात हे दाखवले होते.

भटारखान्यात तो झोपायला गेला तेव्हा बहुतेक सगळ्या एस.ट्या. येऊन केव्हाच गेलेल्या होत्या. तुरळक दोन, चार कस्टमर लडखडत काहीतरी बोलत होते.

गणपतचाचा, पद्या अन विकी अबूने आज केलेली ताजी ताजी गरमागरम चिकन बिर्याणी खात होते.. आणि त्याचवेळी...

अबूबकर नावाचा दैत्य त्याचवेळी उद्या गणपती बसणार, आपला गणपतचाचा नेहमी बसतो तसे नाहीत, खरेखुरे गणपती बसणार आहेत असे दिप्याला ओरडून सांगत ढाब्याच्या एका कॊर्नरला आरास करण्यात गढून गेला होता.

गुलमोहर: 

व्वा!!! मजा येत आहे... प्रत्येक प्रसंग आणि त्याचा त्या मुलाच्या मनावर होणारे परिणाम अगदी छान उतरवला आहे..पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

तुम्ही प्रस्तावनेमधे लिहील्याप्रमाणे विविध भागांमधे राहील्याचं समजतंय वाचताना...
मुख्य म्हणजे तिथलं निरिक्षण केलेलं दिसतंय..
त्यामुळे पिक्चर बघतोय की काय इतकं सगळं डोळ्यापुढे घडतंय असं वाटतंय...

विनोदही पटणारे आणि दिप्याच्या मनातले विचारही पटतायत. "असं होऊ शकतं.." असं वाटतंय...
खुप मोठ्या प्रमाणावर विविध विषयांना हात घालत लिहीलंय...
जमेल तसे पुढचे भाग लिहा. फार छान.

शुभेच्छा!

दिपूसोबतच आमचेही ब्रेनवॉशिंगही चालू आहे.... शिकतोय... जीवनाच्या शाळेतले धडे, जे कुठल्याही शाळेत सहजासहजी शिकायला मिळत नाहीत आणि त्याची फी पहील्या भागात सांगितल्याप्रमाणे आयुष्य पणाला लावणारी असते.. वा बेफिकीर, आयुष्याचे तत्वज्ञान फ्री मध्ये शिकवताहात... फी फक्त नियमितपणे मायबोलीला भेट देउन हाफ राईस दाल मारके वाचणे...

सगळ्या सामाजिक, भावनिक, तात्विक विचारांना, समस्यांना स्पर्शतेय कादंबरी... छान...

सुंदरच.. वाचतांना तंद्री लागते अगदी.. आपणच त्या ढाब्यावर हजर आहोत आणी सर्व आपल्याससमोर घडतय असं वाटतय..खूप प्रभावी वर्णन

खुप छान लिहिता ......अस वाटत खरच ढाब्यावर पोहोचलोय..
पुढची हाफ राईस प्लेट कधी..? खुप भुक लागली आहे...तेव्हा जरा लवकर...