संजीव अभ्यंकर

Submitted by मीन्वा on 5 January, 2007 - 02:20

नुकतच ज्यांच्या first stage performance ला पंचवीस वर्ष पुर्ण झाली आहेत ...
ज्यांचा पन्नासावा solo album निघाला आहे ...
आणि १९९८ मधे ज्यांना playback singing साठी national award मिळालं आहे ...
असं संजीव अभ्यंकरजींबद्दल ऐकल्यावर नक्कीच त्यांच्याबद्दल अधिक जाणुन घ्यायला तुम्हाला सर्वांना आवडेल. संजीवजी एप्रिल, मे २००७ मधे कार्यक्रमांच्या निमित्ताने संपुर्ण अमेरीकेच्या दौर्‍यावर येणार आहेत. तेव्हा मायबोलीच्या अमेरीकेत असलेल्या सदस्यांना त्यांच्या गायनाचा प्रत्यक्ष आस्वाद घेण्याची संधी लवकरच आहे.

TCS मधे संजीव अभ्यंकरजींचा कार्यक्रम होता. एका मायबोलीवरच्या मैत्रिणीमुळे (अपर्णा) तीथे गाणं ऐकायचा योग आला. कार्यक्रमाचं स्वरूप संजीवजींचं गाणं आणि थोडा वेळ संवाद या प्रकारचं होतं. त्या कार्यक्रमानंतर आपल्या मायबोलीच्या वाचकांसाठी संजीव अभ्यंकरजींची मुलाखत घ्यावी असं वाटलं. त्यांना त्या संदर्भात विचारताच त्यांनी अजिबात आढेवेढे न घेता तयारी दर्शवली ईतकच नव्हे तर लगेच वेळही दिली.
मग मुलाखतीसाठी तयारी करण्यात व प्रत्यक्ष मुलाखत घेण्यातही वैभवनी खुपच मदत केली. मी आणि वैभव दोघेही संजीवजींना त्यांच्या घरीच भेटलो. पुर्ण दोन तास अतिशय मोकळेपणानं ते बोलत होते. तुम्हा सर्व वाचकांसाठी त्या गप्पा ईथे देत आहोत.
sanjivabhyankar001.jpgसंजीवजी तुमच्या सांगीतीक background विषयी काही तुम्ही सांगाल का आम्हाला ..?

माझी आजी आईची आई गायची. तीने MA (music) केलं होतं. माझी आई पण गाणं शिकली आहे. तीही MA ला पहीली आली. PhD level चा तीचा गाण्याचा अभ्यास आहे. माझ्या वडीलांचे आजोबा, अभ्यंकर आजीचे वडील गोखलेबुवा, पण गाण्याचे शिक्षक होते. त्यामुळे मुळातच दोन्हीकडुन गाण्याचा धागा होता.

गाण्यात तुमची गती आहे हे कसं दिसलं ..?
मी अडीच तीन वर्षाचा असताना "माझे माहेर पंढरी" हा भीमसेनजींचा अभंग कडव्यासकट म्हणुन दाखवला. माझी आजी मला झोपवताना हा अभंग म्हणुन दाखवायची. नुसतं म्हणुन दाखवला असं नाही तर सुरात म्हणुन दाखवला. ते ऐकल्यावर माझ्या आईबाबांना वाटलं की माझ्यात spark आहे. मला अर्थात हा प्रसंग आठवत नाही पण असं ते सांगतात.

तुम्ही गाण्यात career करावं या दृष्टीकोनातुन योग्य वेळी निर्णय कसा काय घेता आला ..?
माझ्या आईला गाण्याची आवड होती. पण त्या काळात मुलींना performing च्या दृष्टीकोनातुन गाणं शिकवणं हा प्रकार कमी होता. तीला गाणं शिकायला पाठवलं पण ते परीक्षार्थी किंवा विद्यालयीन या प्रकारात. ते तीला आवडलं नाही आणि तीनी ते सोडुन दिलं. माझ्या जन्मानंतर तीनी performing च्या दृष्टीकोनातुन गाणं शिकायला सुरुवात केली. तीला योग्य वयात performing च्या दृष्टीनी गाणं शिकायला मिळालं नाही. पण योग्य वयात हा निर्णय घेणं किती महत्वाचं आहे हे तीच्या लक्षात आलं होतं.

मग लगेच अडीच तीन वर्षाचा असतानाच तुमची आवड ओळखुन तुम्हाला गाणं शिकायला पाठवायचं ठरलं का ...?
नाही. साधारण तीन ते आठ वर्षापर्यंत मी कुठलही गाणं लागलं की त्यातला राग ओळखु शकत होतो. प्रभा अत्रेंची एक प्रसिद्ध record होती कलावती आणि मारु बिहाग ती माझी अतिशय आवडती होती. त्यातले 'जागु मै सारी रैना बलमा' आणि 'तनमन तोपे वारु' मी अगदी आवडीनी ऐकायचो. गीत रामायणातील काही गाणी 'मागणे हेची आता आपुल्या द्या पादुका' यासारखी शास्त्रीय बैठक असलेली गाणी मी त्या वयातही एकटा बसुन ऐकायचो. आईला मी गाणी लावुन द्यायला सांगायचो आणि मन लावुन ऐकायचो. ते पाहुन आईनी मला योग्य वयात शास्त्रीय संगीत शिकवावं असं ठरवलं. परंतु या पाच सहा वर्षात आईनी बघितलं की माझं total inclination संगीताकडे आहे. फक्त काही काळापुरतं तात्पुरतं असं त्या आवडीचं स्वरुप नव्हतं. त्यानंतर वयाच्या आठव्या वर्षी मला गाणं शिकायला पाठवलं.

पण मधल्या काळत आई तुम्हाला घरी शिकवत होती का ..?
नाही. त्या काळात शिकवायला सुरुवात झाली नव्हती.

तुमचे पहीले गुरु कोण?
माझ्या आईचे गुरु पिंपळखरेबुवा तेच माझेही पहीले गुरु. त्याचवेळी आईनी घरी माझ्याकडुन बैठकीच्या दृष्टीनी तयारी करुन घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे आई आणि पिंपळखरेबुवा यांच्याकडे मी एकाच वेळी शिकायला सुरुवात केली.

ईतक्या लहान वयात तुम्ही नियमीतपणे रीयाज करत होतात का ..?

हो. खरं म्हणजे अकरा वर्षाच्या मुलाला तु रोज सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास रीयाज करच असं म्हणलं तर तो पळुनच जाईल. पण दर महीन्यात माझा एखादा कार्यक्रम असायचा आणि त्यासाठी म्हणुन मी महीनाभर रीयाज करायचो.
अकराव्या वर्षी मी मुंबईला पहीला कार्यक्रम केला. नंतर माझी सगळीकडे गाणी सुरु झाली. professionally नाही, पण त्यानिमित्तानी रियाज होईल म्हणुन दर महीन्यात एक तरी कार्यक्रम घेतला जायचा. child prodigy म्हणुन खुप मोठ्या प्रमाणावर मला mouth publicity मिळत होती. आई बैठकींसाठी माझी तयारी करुन घेत असे. आणि माझ्या वयापेक्षा जास्त परीपक्व असं गाणं मी म्हणेन असं ती बघत असे. लहान आहे म्हणुन मी काहीतरी बाळबोध गात नव्हतो तर माझ्या वयाच्या मानानी माझं गाणं खुपच परीपक्व असं होतं.

गाण्यात career करायच्या दृष्टीनी महत्वाच्या ठरलेल्या अशा घटना कोणत्या ..?
माझ्या वयाची साधारण बारा आणि तेरा ही वर्ष यासाठी अतिशय महत्वाची कलाटणी देणारी ठरली. कुंदगोळला गंगुबाई हनगळांनी मला दोनवेळा गायला बोलावलं. कुंदगोळ, सवाई गंधर्वांच जन्मस्थान. तीथे एक सवाई गंधर्व महोत्सव असतो आणि त्याचं यजमानपद गंगुबाईंकडे असतं. हिराबाई बडोदेकरांकडे तीन वेळा माझं गाणं झालं. पुलंनी माझं गाणं दोनदा ऐकलं. वसंतराव, ज्योत्स्नाबाई, भीमसेनजी या सर्व गाण्याच्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी तेव्हा माझं गाणं ऐकलं. शाळेचं कुठलही स्नेहसंमेलन माझ्या सहभागाशिवाय कधी झालं नाही. पुलं माझ्याबद्दल बोललेच पण आण्णा (भीमसेनजी) म्हणाले की, हा ज्ञानेश्वरांच्या कुळातला मुलगा आहे. वसंतरावांनी, हिराबाईंनी आईबाबांना सांगीतलं की आता ह्याला performing artist कडे पाठवा.
वसंतरावांनी मला सांगीतलं की, बेटा रीयाज किती करतोस त्यापेक्षा कसा करतोस हे जास्त महत्वाचं आहे. जे गाशील ते मनापासुन गा. त्यावेळी मला हे सर्व कलाकार किती महान आहेत ते कळत नव्हतं त्यामुळे त्यांच्यासमोर गाताना माझ्यावर ताणही नसायचा. मला ईतकच माहीत होतं की मला जास्तीत जास्त चांगलं गाणं म्हणुन दाखवायचं आहे.
वसंतरावांनी माझ्या आईबाबांना सांगीतलं की, याला स्पर्धांमधे उतरवणं थांबवा. त्याचं विश्व विस्तारीत होऊ दे. मग त्यावेळी साधारण १९८२-८३ पासुन आईबाबांनी मला स्पर्धात उतरवणं थांबवलं मग मी एकदम ९० साली all india radio स्पर्धेत उतरलो. त्यात मी पहीला आलो.

तुमचं prodigy म्हणुन खुप कौतुक होत होतं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ..?

हो. prodigy काही हजारो नसतात त्यामुळे प्रसिद्धी खुप मिळाली. खरं म्हणजे जे माझं कौतुक करत होते ते लोक किती मोठे आहेत हे मला काही कळत नव्हतं आणि हे कौतुक डोक्यात जाणार नाही याची कळजी आईबाबा घेत होते. प्रत्येक वेळी कार्यक्रम झाला की एक lecture असायचं. सुरेख गातोस तु हे पहीलं वाक्य असायचं. पण हा काही शेवट नाहिये. आई तर खुप लक्षपुर्वक समिक्षण करुन चुका सांगायची की आज तु हे गुंडाळलस किंवा तीथे ताना का घेतल्या नाहीस? किंवा ईथे जरा जास्त घेतल्यास. मग मी चिडायचो. त्यावर हेही असायचं की हे तुला आम्हीच सांगणार आहोत बाकीचे फक्त कौतुक करणार आहेत. अगदी प्रत्येक कार्यक्रमानंतर हे ठरलेलच. त्यांनी असं मला कायम control मधे ठेवलं आणि माझा स्वभावही तसा नाहीये डोक्यात जाण्याचा.

त्या काळातला कुठला तुमचा आवडता राग होता का ..?
हो. बागेश्री माझा अगदी आवडता राग होता. आजही आहे. अजुनही असं वाटत नाही की बागेश्री खुप गायलो. आजही तो मी तितकाचा fresh गातो.

जसराजजींकडे गाणं शिकायचा निर्णय कसा घेतला?
हिराबाईंनी आणि वसंतरावांनी सांगीतलं की आता याला performing artist कडे शिकायला पाठवा, त्याला पुर्ण वेळ गाणं करु देत. त्याचा जन्मच गाण्यासाठी झालाय. त्यावेळेपर्यंत आईनी माझी सांगीतीक वृत्ती सौंदर्यवादी आहे हे ओळखलं होतं. जशी क्रिकेटमधे batting करायची प्रत्येकाची वृत्ती असते तशाच वृत्ती संगीतामधेही असतात. दोन दिवसाची batting करण्याची ज्याची वृत्ती आहे, त्याला पटकन batting करुन यायला जमत नाही. तर माझी सांगीतीक वृत्ती सौंदर्यवादी होती आणि त्या वृत्तीला पोषक गुरु म्हणजे जसराजजी. मी सातवीत असतानाच आई त्यांच्याकडे गाणं शिकायला लागली होती. जसराजजी गायला लागले तेव्हापासुनच त्यांचं गाणं सुंदर होतं. आईबाबांनी ठरवलं की ते शिकवायला हो म्हणले तरच मी गाण्यात career करायचं नाहीतर मी academics मधेही चांगला होतो.
आईला गाण्यातलं कळतं असल्यामुळे माझ्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेतले गेले, त्याचा मला खुप फायदा झाला. आणि या सर्व प्रयत्नांना वडीलांचा भक्कम पाठींबा होता. मी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी दोनशे शहरात गायलो होतो. बावन्नाव्या वर्षी हे साध्य करणं शक्य आहे. पण बत्तीसाव्या वर्षी हे शक्य झालं ते केवळ योग्य निर्णय योग्य वेळी घेतले गेल्यामुळे.

जसराजजींनी तुम्हाला गाणं शिकवायचं ठरवलं त्याबद्दलची तुमची काही आठवण असेल तर सांगाल का ?
हो. जसराजजींनी माझ्या कुंदगोळच्या कार्यक्रमाबद्दल ऐकलं होतं. ते माझ्या आईला म्हणाले "सुना है तुम्हारा बेटा बहुत धुंवाधार गाता है" आईनी विचारलं "तुम्ही ऐकाल का त्याचं गाणं?" ते म्हणाले की, पुण्याला येईन तेव्हा ऐकीन. मग त्यांनी गाणं ऐकलं. त्यादिवशी मी राग यमन आणि 'काटा रुते कुणाला' गायलं तेव्हापासुनच मी नाट्यगीतं व अभंग गातो आहे. गुरुजींना माझं 'काटा रुते कुणाला' खुप आवडायचं. कुणी आलं की ते मला म्हणायला लावायचे.
आईबाबांनी त्यांना विचारलं की तुम्ही शिकवाल का तेव्हा गुरुजींनी विचारलं की मग पुण्यात ईतके legends आहेत मग मीच कशाला ? आईबाबांनी सांगीतलं की तुम्ही शिकवत असाल तरच तो पुढे पुर्ण वेळ गाणं शिकेल. गुरुजींनी विचारलं की "इसका academic दिमाग कैसा है ? engineer वगैरा बन सकता है क्या ..? " कारण त्या वेळी मी नववीत होतो. माझ्यासाठी महत्वाची कलाटणी होती. आईबाबा म्हणाले की तो अभ्यासात चांगला आहे सहज बनेल engineer वगैरे, एकपाठी आहे. गुरुजी म्हणाले की "अगर मै सिखाऊंगा तो फुल टाईम गाना करना पडेगा मेरे साथ रहना पडेगा " ते म्हणाले मी fees घेणार नाही पण माझ्याबरोबर कार्यक्रम असेल तीथे यायला लागेल. vocal support करायला लागेल. तोही शिक्षणाचाच एक भाग होता. जसराजजी शिकवणार हे ठरलं मग ते म्हणाले की दहावी होईपर्यंत पुणेमुंबई up down करु देत मग मी माझ्या घरी घेऊन जाईन.
गुरुजींकडे गेल्यावर माझ्यासाठी इतकं मोठं विश्व समोर आलं की मग बनचुकेगिरी आलीच नाही. मला संगीताच्या समुद्रात फेकल्यासारखं झालं. गुरुजी मला बरोबर घेऊन फिरायचे त्यामुळे मला त्यांचे अनेक best performances ऐकायला मिळाले.

तुमच्या बाबतीत गाण्यात भविष्य घडविण्याचा निर्णय खुप लहान पणी घेतला गेला त्याबद्दल तुम्हाला कळायला लागल्यावर तुम्हाला काय वाटलं ..?
आईनी मला विचारलं होतं गुरुजी तुला शिकवायला हो म्हणले तर तु जाशील ना मुंबईला? मला गाणं ईतकं आवडत होतं की मी पटकन 'हो' म्हणालो. मग मुंबईला जाऊन रहाणं किती अवघड आहे, आईच्या हातची गरम पोळी सोडुन हा विचार मनातही आला नाही. निर्णय जरी आईबाबांनी घेतला असला तरी पुर्णपणे माझ्या संम्मतीनी घेतला होता. आणि माझ्यासाठी वातावरणच तोपर्यंत पुर्ण संगीतमय झालं होतं.

त्यावेळी तुम्ही नाट्यगीत जास्त गात होतात का ?
नाही. त्यावेळी नाट्यगीतं म्हणली की खुप कौतुक व्हायचं. सर्वजण बालगंधर्वांची गाणी म्हणायचे. पण आई मला नेहेमी म्हणायची की तुझं target 'ख्याल' आहे. त्यामुळे त्याकडे बघु नकोस. त्यामुळे मी उपशास्त्रीय संगीत हे माझ्या ख्याल गायकीला support होईल ईतकच गायचो.

आवाज फुटल्यावर काय होईल अशी काळजी वाटली होती का career चा निर्णय घेताना ?
हो. माझा आवाज पंधराव्या वर्षी फुटला जेव्हा मी गुरुजींकडे शिकत होतो. तेव्हा मलाही थोडा मानसिक त्रास व्हायचा. मला हवं तसं गाता येईनासं झालं. आवाजाला वजन नव्हतं. गुरुजी म्हणायचे "हो जायेगा बेटा चिंता मत करो". तेव्हा माझे स्वतःचे कार्यक्रम माझे ध्येय नव्हते केवळ शिक्षण हेच माझं target होतं.

तुम्हाला गुरुजींनी पहील्यांदा काय शिकवलं होतं ?
गुरुजींनी पहील्यांदा मला मेवाती घराण्याचा पहीला राग 'राग भैरव' दीड वर्ष शिकवला. त्यानंतर अनेक वर्ष मी रोज भैरव राग गात होतो.

जसराजजींकडचा तुमचा दिनक्रम कसा होता ?
मी व माझी गुरुभगिनी श्वेता जव्हेरी तेव्हा गुरुजींकडे रहात होतो. गुरुजी म्हणायचे "अपना अपना रीयाज शुरु करो" त्यांचं सांगणं असायचं की मी उठायची वाट नका बघु. आपलं आपण उठुन रीयाजाच्या खोलीत रीयाज सुरु करा. वरती गच्चीत रीयाजाची छोटी खोली होती. तीथे जाऊन आम्ही गायला बसायचं, त्यांना मनात येईल तेव्हा ते यायचे आणि शिकवायचे. त्यांनी शिकवलेलं तीन वेळा गायचं असा नियम होता. सकाळ, दुपार, संध्याकाळ. त्या त्या वेळचे राग म्हणायचे. मग मधल्या वेळात मी cricket खेळायला मामाकडे जायचो. माझा मामा जवळ रहायचा. मी रोज तेव्हा चार ते साडेचार तास गायचो. त्यावेळी गळा तयार करायचा होता त्यामुळे अगदी झापड लावल्यासारखं रीयाज असायचा सगळे राग गळ्यावर चढवायचा रीयाज असायचा. खुप अवघड असतं दिवसात तीन वेळा गाणं.

खाण्या पिण्याची काही पथ्य होती का ?
हो, मला होती. माझा आवाज खुप sensitive आहे त्यामुळे होती. मी अनुभवानी बघितलं होतं की आपल्याला काय चालतं आणि कशाचा त्रास होतो. बाकी पथ्य ही मुख्यता tonal quality साठी असतात. मला आवाज साफ लागतो नाकात येता कामा नये. त्यामुळे मी पथ्य पाळत होतं. शिवाय जसराजजींच्या माझ्याकडुन खुप अपेक्षा होत्या त्याचाही माझ्यावर ताण होता.

गुरुजींबरोबरच्या तुमच्या vocal support चे काही अनुभव ?
गुरुजींच्या माझ्याकडुन खुप अपेक्षा असल्यानं खुप अवघड असं काही ते गाताना एकदम माझ्यासाठी सोडुन द्यायचे. आणि मी योग्य पद्धतीनी गायल्यावर अशी काही दाद द्यायचे, अगदी दिलखुलासपणे. मग stage वर आहे म्हणुन त्यात आखडतेपणा नव्हता. त्यानंतर तो प्रवासच सुरु होतो. तुम्ही अजुन अधिकाधिक चांगलं गाण्याची संधी शोधत असता. ते मला vocal supporter सारखं गायला नाही सांगायचे. नेहेमी म्हणायचे की "संजीव देखो कैसे गाता है vocal supporter जैसा 'सा' नही लगाता है गवय्येजैसा गाता है"
मला vocal supporter म्हणुन असलेली माझी मर्यादा कळायची आणि मी त्या मर्यादेतच रहायचो. हे अतिशय अवघड असतं पण पाळायलाच लागतं vocal supporter ला. प्रत्येकच क्षेत्रात हे असतं तुम्ही कितीही ज्ञानी असलात तरी अंतिम निर्णय हा CEO चाच असतो. तुम्ही एखादी गोष्ट सुचवु शकता पण निर्णय नाही घेऊ शकत. माझ्या स्वतःच्या कार्यक्रमामध्ये मी राजा असतो, पण vocal support देताना ईतर साथीदारांप्रमाणे vocal supporter पण एक साथीदार असतो. त्या प्रमुख गायकाच्या गाण्यात रंग भरणं हेच त्याचं काम असतं.

vocal support देताना कुठे तुमची साथ हवी आहे हे कसं ठरवायचात ..?
vocal supporter म्हणुन ते मलाच ओळखायला लागायचं की कुठे मी रंग भरु शकतो. तीथे अशी काही एकमेकांना खुण वगैरे कुणी करत नसतं. ती gap जीथे support suit होतो ती मलाच ओळखायला लागे. कधी कधी मग पाच मिनीटं आवाज लावलाही नाही असंही व्हायचं.
नागपुरच्या मैफीलीतला एक फार सुंदर अनुभव आहे. ९१ साली मी गुरुजींबरोबर नागपुरला गेलो होतो. तोपर्यंत मी नागपुरात गायलो नव्हतो. तीथे मी आणि माझा अजुन एक senior गुरु बंधु असे दोघे support द्यायला होतो. अशावेळी आमचा एक अलिखित नियम असायचा की junior शिष्याचं स्थान त्या दोघांच्याही नंतरचं असायचं. गुरुजी मला म्हणाले "तुम एक राग चुप बैठना, बादमें शुरु हो जाना" त्यांनी मिया मल्हार गायला. जवळ जवळ चाळीस पंचेचाळीस मिनीटं मी गप्पच होतो आवाजच लावला नाही. पण गुरुजींना रहावलं नाही. माझी double speed नी जाणारी तान त्यांना खुप आवडते ती माझी खासीयत आहे. दृत सुरु झाल्यावर त्यांनी मला खुण केली की आधी single मधे घेतलेलं तु double मधे घे. एवढा वेळ गप्प बसलेला होतो मी, फार अवघड असतं performer ला असं बसणं. जसं नुसतं bat हातात घेऊन non striking end ला उभं राहणं batsman ला अवघड वाटेल. त्यानंतर मी चार आवर्तनाची मोठ्ठी सुरेख तान घेतली. गुरुजींनी स्वरमंडल खाली ठेवलं आणि माझी पाठ थोपटली.

गुरुकुल पद्धत जी आता फारशी नाहीये त्या पद्धतीनी तुम्ही शिकलात तर त्यातले तुमचे अनुभव कसे होते ? घर सोडुन रहाण्याचे ?
माझ्यासाठी घर सोडुन राहणं फारच अवघड होतं मला सारखीच घरची आठवण यायची. मी आईबाबांना खुपच attach होतो. मी homesick झालो की गुरुजी म्हणायचे की तु घरी जाऊन ये आता. मी महिन्यातुन साधारण दहाबारा दिवस घरी असायचो. माझं college आईनी पुण्यात ठेवलं होतं.
शिकवताना गुरुजी कुणाला डावं उजवं करायचे नाहीत सगळ्यांना एकसारखं शिकवायचे. inspiration नी एखाद्या वेळी शिकवलेलं असं असायचं की परत त्यांनी नाही शिकवलं तरी चालेल असं वाटायचं. असा अगदी मला स्पष्ट आठवतोय तो राग जौनपुरी. ते शिबीरं घ्यायचे ज्याला बाहेर गावचे शिष्यही यायचे. मी आणि श्वेता माझी गुरुभगिनी आम्ही त्यांच्याबरोबरच रहायचो. अशा एका शिबीरामधे शिबीर संपल्यावर बाहेरगावचे सगळे विद्यार्थी परत गेले. तेव्हा ते म्हणाले एक दिवस ईथेच राहु मग पुढे गावाला जायचं होतं. दुसर्‍या दिवशी सकाळी जौनपुरी इतका सुंदर शिकवला. शिकवला म्हणजे ते inspired होते अगदी त्या दिवशी. हेच गुरुकुल पद्धतीमधलं तत्व आहे की शिष्यानी शिकण्यासाठी सदैव तयार असलं पाहीजे. त्यादिवशी असा काही जौनपुरी शिकवला की वाटलं, नाही आता यांनी परत शिकवला जौनपुरी तरी चालेल. तेव्हा मी शिष्य म्हणुन शिकण्यासाठी पुर्ण वेळ उपलब्ध होतो. पुन्हा पुर्ण वेळ गाणं करायचं ठरविल्यामुळे मला एक असुरक्षिततेची भावनाही होती. त्यावरच माझं भविष्य अवलंबुन होतं. मी पुर्ण वेळ अतिशय सतर्क होतो. प्रत्येक संधीचा मी शिकण्यासाठी योग्य उपयोग करुन घ्यायचो.
८७ साली ग्वाल्हेरला तानसेन सभागृहात गुरुजींचं गाणं होतं. प्रवास करताना मी second class नी जायचो आणि गुरुजी विमानानी. तर ग्वाल्हेरला गेलो तेव्हा मला राग कलावती शिकवलेला नव्हता. गुरुजी म्हणले की रागाचं चलन बघुन घे. असं म्हणुन green room मधे गातात तेव्हा त्यांनी मला चलन दाखवलं बंदीशीचा मुखडा फक्त दाखवला. त्यांनी सांगीतलं "तुम एक पंधराबीस मिनीट सुनना और शुरु हो जाना". त्यादिवशीची साथ ईतकी सुंदर झाली. मग organiser नी विचारलं की आम्हाला संजीवला काही तरी भेट द्यायची आहे तर काय देऊ. तेव्हा ते म्हणाले की मग त्याला विमानाचं तिकीट देऊन माझ्याबरोबर पाठवा. आणि घडलही तसचं

पुण्याला आल्यावरही रोज रीयाज करायचात का ?
हो अगदी. आई बारकाईनी लक्ष द्यायची. गाताना चेहरे वेडेवाकडे करत नाहीये ना ? हातवारे जास्त करत नाहीये ना ? ईथपासुन आईबाबांचं लक्ष असायचं. 'शास्त्रप्रमाण राग कर गान शुद्ध मुद्रा शुद्ध बाणी ताको बडो मान' अशी संगीताच्या क्षेत्रात एक म्हण आहे. त्याप्रमाणे तिनही वेळेला माझं गाणं होतय की नाही हे आईबाबा अगदी कटाक्षानी बघायचे.
आणि खरं म्हणजे नुसतं रीयाजानी गाणं चांगलं बनत नाही. उपजत प्रतिभा आणि आयुष्यात घडणार्‍या सगळ्या गोष्टींचा परीणाम मिळुन माणुस उत्कृष्ट गाऊ शकतो. आयुष्यातले कडुगोड अनुभव, त्या सर्व गोष्टींशी व्यक्तीची असलेली संवेदनशीलता, रचनाकौशल्य, कलात्मकता या सर्व गोष्टी मिळुन माणुस सुंदर गातो.

जो राग गायचा आहे त्याला पुरक अशी मानसिकता नसेल तर अशावेळी मग तुम्ही काय करता ?
हो, असं होतं. मग मी पहीला राग त्या माझ्या मानसिकतेला पुरक असा म्हणतो. एक राग गायला की मी बाकी सगळं विसरतो आणि गाण्याशी एकरुप होतो. कधी कधी फारसं प्रसन्न वाटत नसेल तर एखादा राग गायला की एकदम ताजंतवानं वाटायला लागतं असंही होऊ शकतं.

मैफीलीच्या आधी तुम्ही थोडं गाणं म्हणता का आवाज मोकळा करण्यासाठी ?
हो. थोडसं warmup करतो एक पंधरा मिनीट पुरतात मला warmup साठी.

मेवाती घराण्याची म्हणुन काय खासियत आहे ?
प्रत्येक घराण्याचे काही खास राग असतात. जे विशेष करुन त्याच घराण्यात गायले जातात. नगध्वनी कानडा, जयवंती तोडी, शुद्ध बराडी, दिनकी पुरीया असे मेवाती घराण्याचे अनेक खास राग आहेत. तांत्रिकदृष्ट्या सांगायचं झालं तर मिंड, खटके, कणस्वर यांचा खास पद्धतीनी वापर व तीनही सप्तकांमधे development वर भर ही मेवाती घराण्याची खासियत आहे.

कुणाला वेगवेगळ्या घराण्यांमधल्या आवडलेल्या गोष्टी एकत्र करुन गावसं वाटलं तर चालतं का ?
हो, चालतं आणि तसं करतातच. गुरुजींनीही ते केलं त्यामुळे मेवाती घराण्याची गायकी त्यांनी खुप पुढे नेली. आता खुपच स्वातंत्र्य आहे. सर्व कलाकारांचाही याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.

संजीवजी गाण्याव्यतीरीक्त तुमच्या आवडी कोणत्या आहेत ?
क्रिकेट मला फार आवडतं. मला चित्रपट साधारण ६० ते ८० च्या काळातले, ज्यात लतादीदी आणि आशाताईंची गाणी आहेत ते पहायला खुप आवडतात. मैफिलीवरुन आलं की TV लावुन जेवण करता करता बरेचसे त्या काळातले चित्रपट मी पाहीलेत.

संजीवजी तुम्हाला मायबोलीबद्दल माहीती आहे का ?
हो. मायबोलीची site अतिशय प्रसिद्ध आहे. मी आणि आश्विनी, माझी बायको आम्ही दोघांनीही site बघितली आहे.

तुमचा स्वतःचा गाणं शिकवायचा विचार आहे का ?
सध्या तरी नाही. काही वर्षांनंतर जरुर शिकवीन.

तरुण वर्गाला शास्त्रीय संगीताकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने तुम्ही काही प्रयत्न करत आहात का ?
SPICMACAY - Society for Promotion of Indian Classical Music And Culture Amongst Youth या संस्थेतर्फे शाळा व कॉलेजमधे जाऊन मी देशभर कार्यक्रम करतो. कार्यक्रमाचं स्वरुप शास्त्रीय गायन व त्यासंबंधी संवाद असं असतं.

अजुन काय प्रयत्न उपयोगी पडतील असं वाटतं ?
शाळेच्या अभ्यासक्रमात शास्त्रीय संगीत विषयाचा समावेश करायला हवा आहे.

तुमचा सध्या नविन आलेला album कोणता आहे ?
prodigy या नावाने माझा ५० वा solo album आला आहे. ०२ ऑगस्ट २००६ ला माझ्या पहील्या stage performance ला पंचवीस वर्ष पुर्ण झाली त्यानिमित्तानी हा album काढला आहे. याचं वैशिष्ठ्य म्हणजे माझ्या लहानपणीच्या गाण्याचा यात समावेश आहे. http://www.sanjeevabhyankar.com/ या माझ्या संकेतस्थळावरही मी तेराव्या वर्षी गायलेलं गाणं ऐकता येईल.

Taxonomy upgrade extras: 

Mrinmayee

Thursday, January 04, 2007 - 12:25 pm:

मीनु, खूप म्हणजे खूपच सुंदर घेतली आहेस मुलाखत. प्रश्णही छानच निवडलेत. मुलाखतीत दिलेल्या उत्कृष्ट लिंकबद्दल धन्यवाद!

Shyamli

Thursday, January 04, 2007 - 12:33 pm:

ए मीनु मस्तच ग...
छानच झालेली दिसेतीये मुलाखत
परत वाचुन मग अजुन सांगते ग

तुला आणि वैभवला धन्यवाद

Zelam

Thursday, January 04, 2007 - 12:46 pm:

मीनू,
सुंदरच झालीय मुलाखत. आवडेश.
तुला आणि वैभवला धन्यवाद.

Nilyakulkarni

Thursday, January 04, 2007 - 1:11 pm:

मीनु... वैभव...
धन्यवाद...
खरच छान झालीये मुलाखत...

Supriyaj

Thursday, January 04, 2007 - 1:20 pm:

Meenu.. thanks alot for this wonderful treat of interview from Sanjeevji.. he has the amazing voice quality which is pretty rare these days. ani ti 'Child prodigy' special clip tar farach apratim ahe.
U r the lucky person and so are we maaybolikars..

Dineshvs

Thursday, January 04, 2007 - 1:46 pm:

मीनु आणि वैभव, छान आहे मुलाखत. ते गायक म्हणुन तसेच परफ़ॉर्मर म्हणुनहि ग्रेट आहेत. शिवाय कलाकारांत दुर्मिळ असलेली नम्रता त्यांच्या ठाई आहे.

Mvrushali

Thursday, January 04, 2007 - 6:10 pm:

छान आणि प्रामाणिक आहे मुलाखत,धन्यवाद इतका सुरेख अनुभव दिल्याबद्दल........

Psg

Friday, January 05, 2007 - 12:02 am:

मीनु, छान झाली आहे मुलाखत..

Deepstambh

Friday, January 05, 2007 - 12:23 am:

खरंच छान मुलाखत.. मला शास्त्रीय संगीतातले ओ का ठो कळत नाही पण मुलाखत रोचक वाटली.

पण मिनु.. तुझी मुलाखत अचानक ठरली होती का.. मग एव्हढे सुंदर प्रश्न तुला कसे पडले??

Kmayuresh2002

Friday, January 05, 2007 - 1:21 am:

मीनु,मुलाखत मस्तच झाली आहे..
एखादा फ़ोटोही टाकायला हवा होतास संजीवजींबरोबरचा

Kandapohe

Friday, January 05, 2007 - 4:17 am:

मीनू, वैभव सुंदर आणी मुद्देसुद मुलाखत झाली आहे. मजा आला.

Jayavi

Friday, January 05, 2007 - 5:25 am:

मीनू, वैभव...... मुलाखत फ़ारच सुरेख झालीये... कलाकाराला कसं खुलवायचं ते महत्वाचं असतं कारण एकदा का तो खुलला की मुलाखत अविस्मरणीय होते. तुम्ही दोघांनीही फ़ारच सुरेख घेतलीये मुलाखत.

तुमचं हार्दिक अभिनंदन !

Gajanandesai

Friday, January 05, 2007 - 3:58 pm:

मीनू, वैभव, खूप छान झाली आहे मुलाखत.

Rakhalb

Friday, January 05, 2007 - 4:02 pm:

meenu , मुलाखत उत्क्रुष्ट आहे. अतीशय प्रामाणिक आणि inspiring आहे. एक world-class artist कसा बनतो, ह्याचा अंदाज येतो. ह्या मुलाखतीत १९९१ सालच्या नागपूरच्या बैठकीचा उल्लेख आहे, मी स्वत: त्या बैठकीला गाणं ऐकलयं. अतीशय ह्रुदयस्पर्शी गाणं झालं होतं त्या दिवशी. हे दोघे कलावंतं अक्षरश: trance मध्ये गेल्या सारखे गात होते. I don't have enough words to express, really .

अशी गुणी माणसं क्वचितंच बनतात. आपलं भाग्यं म्हणायचं की इतकं सुश्राव्यं गाणं ऐकायला मिळातंय.

Paragkan

Friday, January 05, 2007 - 7:46 pm:

wah ... .. .. !!

Jo_s

Saturday, January 06, 2007 - 12:06 am:

मीनू, मस्तच झाल्ये मुलाखत. प्रश्नांचा क्रमही छान जमलाय.
इतकी छान मुलाखत आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल तुझे आणि वैभवचे धन्यवाद. माझ्या मुलाला फार आवडेल ही वाचायला

Upas

Saturday, January 06, 2007 - 8:55 am:

मीनू, वैभव मुलाखत आवडली..

Shrutisangam

Sunday, January 07, 2007 - 4:51 am:

मीनू वैभव मुलाखत फारच सुंदर झाली आहे. वाचून फार आनंद झाला. धन्यवाद इतक्या सुरेख अनुभवाबद्दल.

Bardi

Sunday, January 07, 2007 - 4:34 pm:

Excellent!!!...Chhaan zali Mulakhat..Surekh Mulakhatibaddal Dhanyavaad !!!

Atlya

Saturday, January 13, 2007 - 8:29 am:

छान मुलाखत.. खरंच छान मुलाखत.. मलापण शास्त्रीय संगीतातले ओ का ठो कळत नाही पण मुलाखत छान वाटली. प्रथमच एक कलाकरा बद्द्ल वाचन केले. तुझे आणि वैभव चे अभिनन्दन......

Gs1

Tuesday, January 16, 2007 - 1:25 am:

मीनू आणि वैभव, अतिशय सुंदर घेतली आहे मुलाखत. खर तर संजीव अभ्यंकरांच्या बर्‍याच मुलाखती येत असतात, पण त्यांचे पैलू आणि सर्व प्रवास अगदी छान उलगडणारी अशी ही विशेष मुलाखत आहे.

तुमचे आभार आणि अभिनंदन.

Itsme

Wednesday, January 17, 2007 - 3:31 am:

मीनु, वैभव ...

सुरेख मुलाखत, खरचच 'उलगडणारी' हा शब्द अगदी समर्पक आहे. खुप छान flow आहे मुलाखतिचा.

अभिनंदन !!

Saee

Wednesday, January 31, 2007 - 7:24 am:

अप्रतिम झालीये मुलाखत. प्रश्न वक्त्याला खुलवणारे विचारलेत. मीनु, वैभव कौतुक आहे तुमचं. प्रश्नकर्ते आणि वक्ता यांचा सुंदर मिलाफ दिसतोय इथे.

एक अतिशय प्रसन्न, प्रगल्भ आणि जमिनीवर पाय असणारं व्यक्तिमत्व आहे अभ्यंकरांचं. शिवाय अष्टावधानी असल्यामुळे कायम updated असतात. बोलताना किंवा एखादी तांत्रीक बाब समजावतानाही चपखल उपमा आणि संज्ञा वापरतात. त्यांची भाषाही ऐकत रहावी अशी असते. 'हे सुरांनो चंद्र व्हा' या नावाची आकाशवाणीवर 'युववाणी'त त्यांची एक मालिका झाली. ती खुप प्रभावी होती आणि तरुणाई आवडीनी ऐकेल अशीच पध्दत होती त्यांची सादरीकरणाची. संगीतातली तंत्रे समजावण्यासाठी वापरलेली क्रिकेटमधली तंत्रे अगदी तंतोतंत जुळायची आणि चटकन समजायची पण. शिवाय कष्टाचं महत्व, व्यक्तिमत्व विकास, करीअरसाठी केलेले त्याग हे सगळं तरुणाने तरुणांना सांगितल्यामुळे मालिकेला प्रचंड प्रतिसाद होता. संगीतात नसते तरी इतरत्रही ते झळकलेच असते असं वाटतं. He is the real idol indeed! 'माचिस'मधे विशाल भारद्वाजनी त्यांचा आवाज अगदी थोडा पण खुप प्रभावीपणे वापरला आहे. तो त्यांच्या मला आवडणार्‍या performences पैकी एक आहे.

मायबोलीच्या अगदी प्रवेशदारावरच मुलाखतीतला कळीचा मुद्दा मांडुन ठेवलाय त्याबद्दल नेमस्तकांचेही अभिनंदन.

Srp

Wednesday, April 11, 2007 - 9:44 pm:

फार भारी .. एवढच मी म्हणू शकतो.. पुन्हा एकदा .. फार भारी

Nagesh1234

Friday, July 06, 2007 - 7:59 am:

Really good ... No other words ... Thanks for such a nice thing

thanks

प्रतिक्रीयांबद्दल सगळ्यांना धन्यवाद. हो आणि फोटो टाकले आहेत आता ..
दिप नीट वाच बरं मुलाखत परत.

छान योगदान...