सत्ते पे सत्ता .... अर्थात अगाध सत्ता ईश्वराची - गद्य STY

Submitted by श्रद्धा on 2 September, 2008 - 02:22

सत्ते पे सत्ता .... अर्थात अगाध सत्ता ईश्वराची

सुंदरनगर नावाच्या एका गावात (जे बरेचदा मुंबईचे उपनगर असावे असे दिसत असे आणि जिथे समुद्रकिनारा आणि हिलस्टेशन होते!) अशा गावात अमजद खान आणि निरुपा रॉय हे जोडपे राहत होते. त्यांनी पंचावन्न साली पंचायत आणि लोकांच्या विरोधाला न जुमानता आंतरधर्मीय विवाह केला होता आणि जुने गाव सोडले होते.

पंचायतीचा मुख्य हा प्रेमनाथ नावाचा होता. तो एका डोळ्याने अंध असला तरी दुसर्‍या डोळ्याची त्याची नजर चांगली होती. अनायासेच एक डोळा मिटलेला असल्याने त्याला बंदुकीचा नेम धरणे चांगले जमायचे. त्याच्यासारखा नेमबाज पंचक्रोशीत कुणी नव्हता.

अमजद आणि निरुपा यांनी लग्न केल्यावर पंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार घातला. अमजद गोडेतेल आणायला दुकानात जात असताना काही लोकांचे बोलणे त्याला ऐकू आले. पंचायतीतल्या काही लोकांनी प्रेमनाथच्या आदेशावरून अमजद आणि निरुपाला त्याच रात्री संपवण्याचा घाट घातला होता.
अमजद आणि निरुपाने त्याच रात्री गाव सोडायचे ठरवले.

पहाटे साडेतीनची वेळ. अमजद आणि निरुपा नेसत्या वस्त्रांनिशी निघाले. निरुपाने नेसत्या वस्त्रांनिशी निघायचे म्हणून लग्नातलीच लाल साडी नेसली होती आणि सगळे दागिने अंगावर घातले होते. अमजदने शेरवानी घातली होती. जंगलातून रात्री पळताना वाट दिसावी म्हणून अमजदने एक मोठी मशाल पेटवून हातात घेतली होती. पण हाय रे दुर्दैवा! वाड्याच्या गच्चीवर दबा धरून बसलेली प्रेमनाथ आणि मंडळी त्यांचीच वाट बघत होती. प्रेमनाथचा मुलगा रणजीत हा नुकताच दहा वर्षांचा झाला होता आणि तो वडलांच्या कामी त्यांना मदत करायला सज्ज झाला होता.

प्रेमनाथने मशालीच्या रोखाने नेम धरून बंदूक झाडायला सुरुवात केली. त्याची एक गोळी अमजदच्या गुडघ्यात शिरली व त्याच्या गुडघ्याच्या वाटीला दुर्धर इजा झाली. त्याचा एक पाय कायमचा अधू झाला. दुसरी एक गोळी निरुपाच्या खांद्याला चाटून गेली. तेव्हा अमजदने हातातली मशाल त्वेषाने हवेलीच्या दिशेने भिरकावली. हवेलीच्या प्रांगणात असलेल्या गोठ्यात प्रेमनाथाची बायको रमोला नावाच्या तिच्या लाडक्या गाईचे दूध काढत होती. ती मशाल पडली ती नेमकी रमोलाच्या गोठ्यावर आणि पाहता पाहता आगीत गोठा जळून खाक झाला.
..... रमोलाचे आर्त हंबरणे, भडाभडा पेटलेला गोठा आणि मदतीचा धावा करणारी प्रेमनाथाची बायको हे त्या अमजद निरुपाच्या गावाच्या आठवणींतले शेवटले दृश्य!

आपल्या हातून प्रेमनाथची बायको नि गाय हकनाक मारल्या गेल्या याचे अमजदला तीव्र दु:ख झाले. हे दु:ख विसरण्याचा एकच मार्ग होता त्याच्यापाशी! दारू..... तो रोज बारमध्ये जाऊन बाटली बाटली दारू प्यायला लागला आणि निरुपाच्या आयुष्यात कष्टाचे दिवस सुरू झाले. ती बी ए फर्स्ट क्लास असूनही बांधकामावर विटा वाहण्याचे काम करू लागली. तिचे कष्टाचे सगळे पैसे अमजद हिसकावून घेत असे आणि त्या पैशाने दारू पीत असे. तरी निरुपा सोशिकपणे सगळे सोसत होती. तिने स्वतःचे आचार सोडले नव्हते. ती रोज नमाज पढत असे आणि हिंदू संस्कार कसोशीने पाळायचे म्हणून सदैव रुपयाएवढे कुंकू लावत असे.

अशीच एक संध्याकाळ होती. निरुपाचे करवा चौथचे व्रत चालू होते. इकडे अमजद बारमध्ये पीत बसला होता. तेवढ्यात तिथे उगीचच ऍक्सेंट मारत बोलणारा जीवन नावाचा तस्कर आला. त्याने अमजदला स्वतःकडे सहाय्यक तस्कर म्हणून जॉब ऑफर केला. 'मी खुनाचं पाप केलंच आहे. आता मला वाममार्गाला लागल्यावाचून गत्यंतर नाही. त्याशिवाय मला पैसा मिळणार नाही.' अमजदने मनाशी विचार केला आणि जीवनला आपण ऑफर घेत असल्याचे कळवले.

एके दिवशी अमजद खूप सारी रंगीत कागद गुंडाळलेली खोकी घेऊन घरी आला आणि त्याने निरुपाला उचलून गोल गोल फिरवले. त्याला नोकरी मिळाल्याचे ऐकताच तिने लगोलग देवाची प्रार्थना करून आणि नमाज पढून आपला आनंद व्यक्त केला. दुसरे दिवशी सकाळी अमजद आणि निरुपा ब्रेकफास्ट टेबलावर गप्पा मारत बसले होते. आजपासून निरूपाने विटा वाहण्याची नोकरी सोडल्याने तिला वेळच वेळ होता.

"नोकरी मिळाली एकदाची, बरं झालं गडे. पण नोकरी कसली आहे?"
"सांगतो. पण पहिले एक कप चहा आण बघू मला."
निरुपा हसली आणि चहा करायला स्वयंपाकघरात गेली. तिने मनापासून चहा बनवला. कप घेऊन बाहेर येतायेताच अमजदने जाहीर केले;
"मी जीवन नावाच्या तस्कराचा साहाय्यक म्हणून नोकरी करणार आहे."
तिच्या हातातली कपबशी पडून खळकन फुटली. 'नाहीSSSSSSSSS' अशी किंचाळी फोडून ती जमिनीवर बेशुद्ध होऊन कोसळली.
तिला शुद्ध आली तेव्हा ती एका नवीन बंगल्यात बेडरूममध्ये होती. अमजद बाजूला बसून तिचे कपाळ चेपत होता. अमृतांजनाचा वास खोलीभर दरवळत होता.
"मी इथे कशी आले? हे कुणाचं घर आहे?"
"हे मला जीवनसाहेबांनी दिलेलं घर आहे. आजपासून तू इथेच राहायचंस. तुला इथून कधीच बाहेर पडायची परवानगी नाही." अमजद उठला एवढे बोलून आणि ताडताड पावले टाकत तस्करीच्या कामाला निघून गेला. निरुपाने नशिबाला बोल लावला आणि ती त्या बंगल्यात दु:खी जीवन जगू लागली.

अशीच बरीच वर्षे गेली. आता त्या बंगल्यात सात लहान मुले बागडत होती. त्यात तीन तर अमिताभ बच्चन होते, कारण निरुपाला एकावेळी तिळे झाले होते. अमजदचा तिळ्यांवर विशेष जीव होता आणि सगळ्यांत धाकटा जो विनोद (खन्ना) तो मात्र त्याला फारसा आवडत नसे. तिळे जरासे मोठे झाले की त्यांनाही तस्करीच्या बिझनेसमध्ये आणायचे, हे अमजदचे स्वप्न होते. निरूपाला आता चिंतेने ग्रासले. तिला आपला एकही मुलगा तस्करीमध्ये जाऊ द्यायचा नव्हता. अमजदपासून त्यांना कसे वाचवावे, याचा ती अहोरात्र विचार करू लागली. अशातच तिला एक आशेचा किरण दिसला. पृथ्वीचा अक्ष साडेतेरा शतांशाने कलल्यामुळे राजापूरची गंगा अचानक सुंदरनगरमध्ये प्रकट झाली आणि ताबडतोब कुंभमेळ्याची घोषणा झाली. निरुपाला हीच अखेरची संधी होती.

अमजद कोकेनची डिलिव्हरी घेण्यासाठी पौर्णिमेला समुद्रकिनार्‍यावर जाणार होता. सगळा व्यवहार पूर्ण व्हायला किमान दोन दिवस लागणार होते. तेवढ्या वेळात आपला बेत तडीला न्यायचे निरुपाने ठरवले.
प्रत्येक मुलाच्या पाठीवर त्यांचे आडनाव 'खान' उर्दूमध्ये गोंदले होते. बंगल्याजवळच्या झोपडीत राहणार्‍या आणि निरुपाला बहीण मानणार्‍या ए के हंगलने भाऊबिजेला घातलेल्या ओवाळणीतून निरुपाने सात लॉकेट्स आणली. आणि प्रत्येक मुलाच्या गळ्यात ती घातली.
पौर्णिमेला अजून सात दिवस होते. त्या भागात बरेचदा फिरणार्‍या फकिराला तिने मुलांना 'जिसका कोई नही उसका तो खुदा है यारों.....' हे गाणे शिकवण्याची गळ घातली. तो रोज दुपारी दोन तास त्यांची शिकवणी घेऊ लागला.

.........अखेर कुंभमेळ्याचा दिवस उजाडला. निरुपाने लग्नातलीच लालजर्द साडी नेसली. मुलांना नीट तयार केले; प्रत्येकाला प्रेमाने अखेरचे छातीशी कवटाळले आणि ती निघाली. सुंदरनगरच्या नदीच्या घाटांच्या ठिकाणी तोबा गर्दी झाली होती. निरुपाने नीट प्लॅनिंग करून एकेका मुलाला गर्दीत हरवून टाकले. तिळ्यांना हरवताना तर तिला खूप कष्ट करावे लागले. यात दोन दिवस निघून गेले. अमजद परत यायची वेळ झाली होती. आता फक्त विनोद तिच्यापाशी राहिला होता. पण तिला सर्वांत धाकट्या विनोदला टाकवेना. एवढासा तो जीव! हा नाहीतरी अमजदला आवडत नाही फारसा... मग तो त्याला तस्करीच्या बिझनेसमध्ये घेणार नाही कदाचित... असा विचार करून निरुपा त्याला घेऊन घरी परतली. व्हरांड्यातच अमजद तिची वाट बघत होता.

"माझ्या परवानगीशिवाय कुठे गेली होतीस तू?" तो कडाडला.
"कु... कु... कुंभमेळ्यामध्ये...."
"बाकीची मुलं कुठे आहेत माझी?"
"हरवलीSSSSSSSSSSSSS....."
अमजद संतापाने लालपिवळा झाला. त्याने निरुपाच्या अंगावर चाबकाने फटकारे मारले.
"सगळी मुलं हरवून हा माझा नावडता मुलगा तेवढा घेऊन आलीस??????????? आजपासून या घरात तुझ्यासाठी जागा नाही.... चालती हो....................."

निरुपाने डोळ्यांतून अखंड पाणी वाहायला लागले. आणि त्या अश्रूंमधले आम्लाचे प्रमाण जरा जास्त झाल्याने तिची दृष्टी गेली. तिला पार दिसेनासे झाले. आपल्या धाकट्या मुलाला हृदयाशी धरून ती स्टेशनाकडे धडपडत, ठेचकाळत चालू लागली. कॉलनीच्या कोपर्‍यावर तो फकीर गातच होता....
'जिसका कोई नही.... उसका तो खुदा है यारों'....
निरुपा विनोदला मांडीवर घेऊन एका गाडीत विनातिकीट चढली. ती बंगलोर एक्स्प्रेस होती जी दिल्लीपासून बंगलोरला आणि उलट जायची. निरुपाचा प्रवास सुरू झाला. मध्ये कुठल्याशा स्टेशनावर गाडी थांबली. विनोद तहानेने रडत होता. खरेतर दिसत नसताना निरुपाने कुणालातरी दुसर्‍याला पाणी आणायला सांगायला हवे. पण नुकतीच आंधळी झाल्याने तिला अजून आंधळेपणाचा सराव झाला नव्हता. बाजूच्या बाईला तिने विनोदवर लक्ष ठेवायला सांगितले. आणि ती पाणी आणायला उतरली.
पाणी भरून झाल्यावर मात्र तिला परत गाडीकडे जायला सुधरेना. तिने एका माणसाला विचारले....
"दादा, बंगलोर एक्स्प्रेस कुठली?" आणि......

तिच्या दुर्दैवाने अप आणि डाऊन दोन्ही बंगलोर एक्स्प्रेस एकाचवेळी त्या स्टेशनावर प्लॅटफॉर्म २ आणि ३ ला लागल्या होत्या. त्या माणसाने तिला एका बंगलोर एक्स्प्रेसच्या तिने सांगितलेल्या डब्यात चढवले आणि दोन्ही गाड्या एकदम सुटल्या. ती आपल्या मुलाला शोधू लागली पण हाय रे दुर्दैवा.... तो दुसर्‍या गाडीत होता. निरुपाने आक्रोश सुरु केला. आणि ती बेशुद्ध झाली. प्लॅटफॉर्मवर उभा तो फकीर मात्र गातच होता.....
"जगी सगळ्यांत मोठी सत्ता ईश्वराची...
जगी सगळ्यांत मोठी सत्ता ईश्वराची...
ईश्वरापुढे न सत्ता मोठी असे कोणाची....
बिछड जायें तो वो ही मिलाता है यारों...."

.......इकडे अमजद कुंभमेळ्यात आपल्या सहा मुलांना शोधत होता. तेवढ्यात अचानक प्रेमनाथ आणि रणजीत आपल्या माणसांसकट त्याच्यासमोर उभे ठाकले. अमजद टोळी आणि प्रेमनाथ टोळी यांच्यात घनघोर मारामारी सुरू झाली. प्रेमनाथने नेम धरून गोळी झाडली (त्याचा नेम चांगला होता हे आठवत असेलच!) आणि अमजदला ती गोळी लागून तो थेट नदीत कोसळला.

निरुपा मुंबईत उतरली. इथे ती कुणालाच ओळखत नव्हती. स्टेशनातून बाहेर येऊन ती वाट फुटेल तिकडे चालू लागली. जाता जाता ती एका बंगल्यांच्या कॉलनीत येऊन ठेपली. तिथे एका बंगल्यात हलकल्लोळ माजला होता. तिथला छोटा मुलगा रडत होता आणि शांत व्हायचे नाव घेत नव्हता. त्याची आई त्याला जवळ घेऊ पाहत होती पण तो सतत तिच्या हाताला हिसडे देत होता. एकदम जोरदार हिसडा देऊन तो बंगल्याच्या गेटबाहेर पळाला. समोरून एक ट्रक येत होता.

निरुपाला आतापावेतो आंधळेपणाची सवय झाली होती. तिने धडपडत जाऊन त्या मुलाला उचलले आणि ट्रकच्या मार्गातून बाजूला घेतले. मुलगा आता शांत झाला होता. होणारच, कारण त्या दुर्दैवी मातेला माहीत नव्हते की तो तिचाच हरवलेला मुलगा होता... तो केवळ तीन वर्षाचा होता आणि त्याला अजून फार बोलता येत नव्हते. त्या बंगल्याच्या मालकिणीने धावत येऊन मुलाला जवळ घेतले.
"तुमचे फार उपकार झाले. फार नवससायासांनी झालाय हा... (ती कशाला सांगेल की हा मुलगा तिने कुंभमेळ्यातून उचलून आणला आहे ते!) तुमचे उपकार फेडण्याची मला संधी द्या. तुम्ही याची आया म्हणून आमच्याचकडे राहा."
निरुपाला डोईवर छप्पर हवेच होते. तिने ते कबूल केले. अशा प्रकारे एक आई आपल्याच मुलाची आया बनून त्या बंगल्यात राहू लागली.
कोपर्‍यावर एक फकीर गातच होता....
"त्या ईश्वराची सगळी लीला न्यारी..
संकट देतो तोच ते संकट वारी....
खुशी से पहले वो गम भी देता है यारों..."
जिसका कोई नही, उसका तो खुदा है यारों..."

STY चे नियम:
१. सात भावांना सात नायिका मिळायलाच हव्यात.
२. शेवटी सात भाऊ आणि आईवडील एकमेकांना भेटलेच पाहिजेत.
३. घडणार्‍या सगळ्या गोष्टी अचाट नि अतर्क्य असायला हव्यात.
४. प्रेमनाथ (रणजीतसकट) आणि जीवनदेखील शेवटच्या फायटिंगमध्ये यायला हवेत.
५. 'जिसका कोई नही...' हे या सिनेमातले महत्त्वाचे गाणे आहे. तो सगळ्या कुटुंबाला जोडणारा धागा आहे. ते शक्य तिथे वेगवेगळ्या कडव्यांसकट यायला हवे. (शक्यतो).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्र, जिओ जिओ , सहि जमलय!
अश्रूंमधले आम्लाचे प्रमाण ,

त्या भागात बरेचदा फिरणार्‍या फकिराला तिने मुलांना 'जिसका कोई नही उसका तो खुदा है यारों.....' हे गाणे शिकवण्याची गळ घातली. तो रोज दुपारी दोन तास त्यांची शिकवणी घेऊ लागला.

अनायासेच एक डोळा मिटलेला असल्याने त्याला बंदुकीचा नेम धरणे चांगले जमायचे

उगीचच ऍक्सेंट मारत बोलणारा जीवन नावाचा तस्कर आला. त्याने अमजदला स्वतःकडे सहाय्यक तस्कर म्हणून जॉब ऑफर केला
<<<<<<<<<<
हे मला सर्वात आवडलेले संवाद!!!!!

श्रद्धा!
अचाट आणि अतर्क्य मध्ये तू लिहिलेल्या सर्व भागात हा भाग सर्वात उच्च! Rofl

चिनू.. तू पण प्रयत्न कर बरं असच अ. आणि आ. लिहायचा.. Happy

adm, जेनु काम तेनु थाय! आपली 'तितकी' काय प्रगती नाय Happy

अमजद पाण्यात पडल्यावर प्रेमनाथ आणि रणजीतला तो मेला अस वाटुन ते रमोला गायीच्या खुनाचा बदला घेतला म्हणुन भांगडा करतात. तेवढ्यात जीवन तीथे येतो व अमजद मेल्याचे कळल्याने प्रेमनाथला तस्करीची ऑफर देतो. पण प्रेमनाथचा नेम चांगला असल्याने त्याला ५०% भागीदारी हवी असते. जीवन चांगला साथीदार मिळेल म्हणुन हो म्हणतो पण मनात खार खाउन असतो.

इथे अमजद नदित कोसळतो तो पुराच्या पाण्यात वहात वहात मुंबईत येतो. (सुंदरनगरला समुद्र असुन सुद्धा तिथली नदी मुंबईच्याच सागराला येउन मिळत असते.)
प्रेमनाथचा नेम चांगला असला तरी ह्या वेळी पण गोळी त्याच्या दुसर्या पायाच्या गुढग्याला लागते आणि त्याचा दुसरा पाय पण निकामी होतो पण जान वाचते. मिठी नदिच्या तीरावर तो येतो.

तिथुन एक फकिर गाण म्हणत जात असतो.

बुराईना करो
हर बच्चे से प्यार करो
बुरे काम का सबब बुरा होता है यारो
जिसका कोई नही उसका तो खुदा है यारो

गाण ऐकुन त्याला उपरती होते आणि त्याच आता एकच ध्येय असत .........
अच्छा काम करो......हर अच्छे काम का सबब अच्छा है यारो.
निरुपमा व विनोदला शोधुन त्यांची माफी मागायचीच अस तो ठरवतो.

तो तिथल्याच एका बस्तीत रहायला लागतो. बस्तीतले लोग त्याला प्रेमाने खानचाचा बोलवु लागतात.

श्रद्धा - खल्लास
आता लिहिते घाईघाईत.
---
इकडे अमजद जरी नदीत पडला असला तरी त्याला त्या नदीच्या पाण्याची चांगलीच सवय होती. सुंदरनगरमध्ये नदी समुद्राला मिळत असल्याने आणि मध्ये डोंगरावर शहर वसल्याने तो शहराच्या एका बाजूला नदीस्नानासाठी आणि दुसर्‍या बाजूला बीचवर जात असे. त्यामुळे नदीत पडूनदेखील तो वहात वहात समुद्रात पोचला. पण सुंदरनगरमध्ये इतके दिवस राहिल्याने त्याला scuba diving, snorkeling यांची चांगलीच practice होती. त्यामुळे बेशुद्ध पडूनही तो बुडाला नाही.
दूर एका होडीतून सांभा शिडापाशी उभा राहून दुर्बिणीने निरीक्षण करत होता. तेवढ्यात त्याला अमजद पाण्याबरोबर वहाताना दिसला. लोकांचा गेम करणे हे त्याचे काम असल्याने आधी त्याला काही वाटले नाही. तो आपली दुर्बिण दुसरीकडे करणार इतक्यात त्याला अमजदचा चेहरा दिसला आणि सांभाच्या चेहर्‍यावरचे भाव झपाट्याने बदलले.
'सरदार... सरदार...'
'कलिया लवकर ये. सरदार... पाण्यात्...लवकर.'
बरीच आरडाओरड करून सांभा आणि त्याच्या सहकार्‍यानी अमजदला होडीत उचलून घेतले. थोड्या वेळाने अमजदला शुद्ध आली.
'मै कहां हूं?'
'सरदार...सरदार...कसं वाटतय आता? तुम्ही पाण्यात कसे पडलात? त्या सुंदरनगरच्या जीवनच्या गँगने तर असं नाही ना केलं? मांकसम त्या जीवनचा आपल्या रामगढवर डोळा आहे, आपल्या एरिआत यायला बघतात...'
अमजदच्या डोक्यात काही प्रकाश पडत नसल्याचं बघून सांभा बोलायचं थांबला.
'मै कहां हूं? कौन हूं मै?
'सरदार आप गब्बर...' .. सांभा बोलला खरा पण गब्बरची याददाश गेल्याचं सत्य त्याला उमगलं.

इथे कुंभ के मेले मे निरूपा आणि अमजदची मुलं फिरतच होती. कधी अंगणाबाहेर खेळलं तरी रट्टे देणार्‍या आईने आपला धरलेला हात कसा काय सोडला हेच त्यांना उमगत नव्हतं.

सगळ्यात मोठा शशी फार हुशार. तो लगेच त्या मेळ्यामध्ये दिसलेल्या इन्स्पेक्टर इफ्तेकार कडे गेला आणि त्याला आपण हरवले असल्याचं सांगितलं. पण त्या मेळ्यातून कधी कुणी कुणाला शोधलं नसल्याने आणि इन्स्पेक्टरची बायको औलादकेलिये तरसत असल्याने तो शशीला डायरेक्ट सांभाळण्यासाठी घरीच घेउन गेला.

दुसर्‍या नंबरच्या राजेशला आपण हरवलोय याची मजाच वाटत होती. तो आपला समोर येईल त्या मुलीला पाहून 'मेरी सपनोंकी रानी कब आयेगी तू' हे गाणं म्हणत होता. त्याची ती माना वेळावत गाण्याची पद्धत बघून इला कबिलेवालीचं त्याच्याकडे लक्ष गेलं.
'कहां के हो बेटे? आओगे हमारेसाथ?'
बंगल्यात आणि अंगणात बंदिस्त होऊन रहाण्यापेक्षा मस्त हुंदडलेलं बरं हा विचार करून तो कबिल्याला join झाला.

इथे तीन अमिताभांपैकी एकाला भूक स्वस्थ बसू देईना. पण काही खायला तर त्याच्याकडे पैसे नव्हते. अमजदचे जीन्स त्याच्याही अंगात असल्याने लगेच कोणचं तरी पाकिट मारण्याची आयडीया त्याच्या डोक्यात आली. सराईतपणे तो एकाचं पाकीट मारत असताना त्याला कादरभाईने बघितलं आणि आपल्या टीममध्ये सामील करून घेतलं. पण कादरभाई मुंबईच्या डॅनी 'सरकारचा 'उजवा हात असल्याने तो अमिताभ१ ला घेउन मुंबईला रवाना झाला.

अमिताभ २ ला प्राणने मेळ्यात बधिरपणे भटकत असताना बघितलं. प्राण आधी जीवनचा सहाय्यक तस्कर म्हणून काम करत असे. खरं तर तो वकिली शिकला होता पण गुन्हेगारांचा बचाव करता करता तो गुन्हेगारीच्याच प्रेमात पडला. बराच काळ जीवनला साथ दिली होती त्याने पण आताशा त्याचं काम पसंद न पडल्याने जीवनने त्याला कामावरून कमी केलं होतं आणि अमजदला offer दिली होती. याचं शल्य प्राणच्या मनात होतच. त्यामुळे कसही करून त्याला अमजदवरचा राग काढायचा होता. अमिताभ२ ला पाहून त्याने त्याला खोटच 'तुझे आईवडील अपघातात गेले' असं पटवलं आणि त्याला वाढवण्याची जबाबदारी घेतली.

अमिताभ३ ला आईने बोट सोडल्याचं जरा उशीराच कळलं. आई म्हणून तो बराच वेळ वेगळ्याच बाईशी गप्पा मरत चालला होता. पण जेव्हा कळलं तेव्हा तो लांब लांब ढांगा टाकत धावत सुटला. बराच वेळ धावूनही कोणी दिसेना त्यामुळे फीट येउन पडला. शुद्धीवर आला तेव्हा तो मेळ्यातील एका तात्पुरत्या उभ्या केलेल्या hospital मध्ये होता आणि डॉ. तरुण बोस त्याची आस्थेने विचारपूस करत होते.
'नाम क्या
है बेटा तुम्हारा?'

आईनेच हात सोडला, आपलं काय उरलय आता या विचाराने तो म्हणाला 'मेरा नाम 'आनंद'
त्याने डॉक्टरना आपण अनाथ आहोत, आपली कुठे सोय होते का बघा अशी कळकळीची विनंती केली. डॉक्टरांना मदतनीस हवाच होता, मग तेही त्याला खळखळ न करता कोलकत्याला घेउन गेले.

सहावा रणधीर जरा मंद होता. निरुपाचा भाउ हंगल देवळात पुजारी होता. त्याने रणधीरला एकटच भटकताना पाहिलं आणि आईचा हात का सोडला म्हणून फटके दिले. निरुपा आणि अमजदचा पत्ता लागत नाही म्हटल्यावर रणधीर त्याच्याबरोबरच राहू लागला.
दूर फकीर गात होता.
हम तो क्या है, वो फरिश्तोंको आजमाता है
बनाकर हमको मिटाता है, फिर बनाता है
आदमी टूटकर सौ बार जुडा है यारो
जिसका कोइ नही उसकातो खुदा है यारो

अरे आधीचे post वाचा नि तिथून सुरू करा पुढे, नाहितर pirated print मधे वेगळी story सुरू होऊन STY च्या yarn मधे गुंता होईल Lol

अमृता पोस्ट टाकत होती तेव्हा मीपण एडिटत होते. म्हणून झाला गुंता Happy

मी तर दोन्ही एंजॉय करतिये. हेहेहे लिवा अजुन लिवा.

इकडे सुंदरनगर मध्ये हे सगळे घडत असताना तिकडे विजय नगर मध्ये वेगळीच गोष्ट घडत होती..
विजयनगर.. समुद्राच्या किनारी असलेले एक छोटेसे खेडेगाव. पण एकदम मोक्याच्या जागी.. मुंबई पासून मोजून ३०० किमीवर... त्यामुळे एकदम संपन्न.. चाचेगिरी मध्ये ह्या गावाचा हात कोणीच धरू शकणार नाही.. प्रत्येक घरात किमान एक तरी खलाशी असणारच.. पण हे सगळे खलाशी एकाच माणसा साठी काम करत..
मोगॅम्बो... "खूश नही हुआ..."
आणि अशा ह्या गावात मुनिमजी अनुपम मोगॅम्बोच्या सेवेत इमाने इतबारे काम करीत आपले आयुष्य व्यतित कर होता... पण त्याला एकच दु:ख सतावत होते.. त्याच्या शेवटच्या मुलीच्या जन्माच्या वेळी त्याची बायको रिमा त्याला सोडून देवाघरी जाते.. मोगॅम्बोच्या अड्डयावर बिंदू पण काम करत होती.. ती अनुपमवर लहानपणा पासूनच प्रेम करत असते पण अनुपम तिला कधीच भाव द्यायचा नाही... सध्या सध्याच अनुपमला असे वाटू लागत असते की आता आपल्या ७ मुली मोठ्या झाल्या आहेत, त्यांना जरा स्वंयपाक पाण्याचे काय असते ते तरी निदान कळायला पाहिजे.. त्यामुळे तो हळूहळू बिंदूची लाईन मोकळी करून देण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी करत असतो..
पण त्याच्या त्या ७ कन्यका एक नंबरच्या चालू आणि वस्ताद असतात...
जया - ही लहानपणी आईला सारखी भाज्याच चिरताना बघायची त्यामुळे ही चाकू, सुर्‍या असली सगळी हत्यारं हाताळण्यात एकदम पटाईत झालेली असते.
रेखा - हिला नटण्या मुरडण्या शिवाय दुसरे काही जमायचे नाही. पण एक गोष्ट मात्र होती सगळ्या बहिणींमध्ये दिसायला एकदम सुरेख होती आणि समोरच्या माणसाला बाटलीत कसे उतरवायचे हे तिला पक्के ठावूक होते..
परवीन - आपले कपडे कोणते असावेत ह्याबाबत ही फारच जागरूक असायची. आणि तोंडानी एकदम फटकळ.. समोरच्यानी अरे म्हटले ही कारे म्हणणारच
नीतू - हिला कसला नाद होता काही समजतच नसे कोणाला.. प्रत्येक वेळेस कोणता तरी वेगळाच वेष घेऊन असायची.. चंद्रकांतामधल्या अय्यारांचा फारच प्रभाव होता तिच्यावर
शर्मिला - हिला फुलांचा फार नाद होता.. डोक्याचा सारखा प्लॉवरपॉट करूनच फिरायची भारी हौस होती तिला..
बबिता - ही अत्यंत मठ्ठ होती .. तिला कशातलंच ओ का ठो कळायचे नाही सगळ्या बहिणी ठरवून हिलाच कायम गोत्यात आणायच्या
शबाना - ही सगळ्यात धाकटी होती तरी सगळ्यात वस्ताद होती.. सगळ्या बहिणींचे गुण हिच्यात एकवटले होते..
अनुपमच्या मते त्याच्या मुली एकदम साध्या भोळ्या होत्या.. पण अंदर की बात अशी होती की ह्या सगळ्या मोगॅम्बोसाठीच काम करायच्या.. मोगॅम्बो त्यांच्या भागातला एक नंबरचा चाचा होता.. आणि त्याच्यासाठी रोजच्या रोज बाहेरच्या देशातून बोटीनी माल यायचा.. आणि हा माल उतरवून घेऊन योग्य ठिकाणी पाठवायच्या कामी त्याला ह्या बहिणी मदत करायच्या..
ह्या मोगॅम्बोचे एक स्वप्न होते.. त्याला संबंध जगावर राज्य करणारा चाचा व्हायचे होते आणि त्या दृष्टीने त्यानी पावले उचलायला सुरुवात केली होती.. आणि म्हणूनच तो लवकरच ह्या बहिणींना मुंबईत पाठवण्याचा घाट घालणार होता..
ह्या सगळ्या बरोबरच बिंदूला भाऊ पण होते.. एक असरानी "हम अंग्रेजोंके जमाने के सेलर है" हे त्याचे पालुपद होते... आणि दुसरा मेहमूद.. "हम गोरे है तो क्या हुआ दिलवाले है"...हा कोडेड होता. हे दोघे एक नंबरचे काम चुकार.. ह्यांच्यामुळे मोगॅम्बोसारखा अडचणीत यायचा पण ह्या ७ बहिणी अगदी 'सेव्हन सामुराई' सारख्या त्याला त्यातून बाहेर काढायच्या. ह्या बहिणींच्या जोरावरच त्याची सगळी पुढची पावले उचलणे चालू होते...

==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

अशीच वर्षामागून वर्षे गेली.

शशी - खूप खूप शिकून बीए झाला आणि इन्स्पेक्टर इफ्तेकारच्या हाताखाली सब इन्स्पेक्टर म्हणून काम पाहू लागला.

राजेश - इला कबिलेवाली म्हातारी झाल्याने आणि तिचा आवाज फुटत असल्याने कबिल्याची जबाबदारी आपोआप राजेशवर येऊन पडली.

अमिताभ१ उर्फ डॉन - डॅनी सरकारने याच्यातली skills लहानपणीच ओळखली होती आणि त्यालाच आपला वारीस मानलं होतं. लहानपणापासून practical training मिळालेला अमिताभ१ डॅनीनंतर 'डॉन सरकार' म्हणून ओळखला जाऊ लागला.

अमिताभ२ उर्फ विजय - प्राणने लहानपणापासून याच्याकडून वकिलीचा अभ्यास घोटवून घेतल्याने हा प्रसिद्ध criminal lawyer बनला.

अमिताभ३ उर्फ आनंद - डॉ. बोसांकडे कंपाउंडरकी करत करत हा डॉक्टर झाला. फक्त आपण 'आनंद' नाव का घेतलं, ते डॉक्टरचं नाही तर रोग्याचं नाव आहे असा विचार तो मध्ये मध्ये करत असे.

रणधीर - याला काहीच करण्यासारखं नसल्याने तो 'गाव का गोरा' झाला आणि टवाळगिरी करू लागला.

विनोद - हा बड्या बापाचा बेटा झाल्याने करता येईल त्या सगळ्या चैनी करू लागला.

दरम्यान सगळ्या भावंडांच्या गळ्यातली लॉकेट्स तशीच होती आणि त्याची चेन त्यांच्या गळ्याला अजिबात घट्ट झाली नाही.

इथे अनुपमच्या मुलीही मोट्या झाल्या होत्या.

>>>दरम्यान सगळ्या भावंडांच्या गळ्यातली लॉकेट्स तशीच होती आणि त्याची चेन त्यांच्या गळ्याला अजिबात घट्ट झाली नाही.>>>

अफलातुन Happy

मस्त सुरु आहे ष्टोरि पण ३ तासात मावणार नाहि असे वाटते. पार्ट१ आणि २ असे दोन चित्रपट बनवावे लागतिल.

मोगॅम्बोची लहानपणी अंबाबाईच्या जत्रेत हरवलेली बहीण सीमा रामगढ मधे रहात असते. ती रामगढची ठकुराईन असल्याने पैठण्या नेसून विहिरीवरून स्वतः पाणी शेंदून अगंणात सडा संमार्जन करणे, कुठल्याही वेळी तुलशी वृंदावनापाशी दिवा लावणे अन आपल्या साती मुलींना सकाळ संध्याकाळ 'बोटावरच्या भाकर्‍या' वाढणे हे सर्व करत असते.
सीमाच्या मुली मात्र पूर्णपणे आत्या नादिराच्या ताब्यात असतात. जायदाद चा वारस , सात मुलींच्या पाठचा सचिन मात्र रोज युनिफॉर्म घालून शाळेत जाणारा सज्जन मुलगा असतो
सचिन च्या मोठ्या बहिणी
बिंदू - ही कायम घागरा चोली घालून असते
२. अरूणा - ही पण घागरा चोलीच घालते पण हिच्या तोंडात कायम कैरी , बोरं आवळे, चिंचा वगैरे असता. रामगढच्या ठाकुरच्या घरी मोठं ग्रीन हाऊस असल्याने अमेरिकेत जशा बारा महिने स्ट्रॉबेर्‍या मिळतात तसं हिला वर्ष भर कैर्‍या अन बोरं मिळत असतात.
३. परवीन - हिला फक्त शरारा घालायचे असतात. अन सगळ्या बहिणींच्या काजळाच्या डब्या ही एकटीच संपवत असते.
४.रीना - ठाकुरची सगळी जायदा ही न्हाव्याच्या दुकानात उधळायला तयार असते. रामदास पाध्येंचा बाहुला बोलताना त्याच्या चेहर्‍यावर तरी थोडे हावभाव दिसत असतील
बिंदिया - ही सतत इकडून तिकडे उड्या मारत असते. तिला 'वॉकिंग फीट' नाहीतच. गंगावन लावून दोन लांबलच्क वेण्या घातलेल्या असतात. सातही बहिणींमधे फक्त हिचं सचिनवर खरं प्रेम असतं , बाकी साही जणी त्याला पाण्यात पहात असतात.
६. झीनत - रामगढ मधे एकच शिम्पी असावा.पहिल्या पाच जणींचे कपडे शिवून तो दमला की झीनतकरता छोटे, पटकन शिवून होणारे कपडे देतो. कधी कधी तितकंहि जमत नाही तेंव्हा ही बिचारी चिंध्या,बेल्ट, वगैरे वापरते.
७ . किमी - काटकसर हे तिचं मिडल नेम असल्याचं तिच्या कपड्यांवरून व (न) अभिनयावरून कळतं .

नादिरा आत्याकडे अमजदच्या सगळ्या मुलांचा मरॉडर्स मॅप असतो. तिने आपल्या भाच्यांना ते हॅरी पॉटर मधली सगळी पोशन्स शिकवली आहेत त्यायोगे या साती बहिणी वेळप्रसंगी स्वत:चे मेकप अन कॉस्च्यूम चे रूल गुंडाळून ठेवून अनुपम च्या कुठल्याही मुलीचे रूप धारण करू शकतात.
पण त्यांची कुठलीही पोशन्स तयार करताना
त्यांना सगळ्यांना मिळून हे गाणं म्हणावं लागतं.
' जिसका कोइ नहीं उसकी भी दवा है यारों
हम नहीं कहते पोशन्स की किताब में लिखा हे चोरो.'

नुसती पात्रं ? प्रसन्ग कुठे आहेत... एवढी सगळी पात्रं सन्गीत नाटकागत नांदी करायला लागली तर तीन तास त्यातच सम्पतील..... आता काही पात्रे मारुन टाका...

ऑप्शन्स :

१. गावात प्लेग येतो
२. मोगेंबोने टाकलेल्या बॉम्बमुळे...

जामोप्या, STYचा बेसिक नियम आहेत-
१. उगाचच कोणाला मारायचं नाही
२. 'हे सगळं स्वप्न होतं' असं म्हणून आधीच्या भागाचा बट्ट्याबोळ करायचा नाही! Proud

तर आता पात्र खूप झाली. मी तर कागदावर उतरवून ब्ल्यूप्रिंट केलाय! Lol

आढावा असा- ७ मुलं, आणि त्यांच्या १४ हीरॉइनी '१६ बरस' ची तरी किमान झालेत. मुंबई वाढलीये, जीवनची तस्करी, मोगॅम्बोची चाचेगिरी जोमात चालू आहे. सगळे पापी पेट के वास्ते मुंबईतच आलेत. एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर असून एकमेकांना ओळखत नाहीयेत.

काय ७ व्हँप जाऊन, शुद्ध चारित्र्याच्या ७ हीरॉईन्सना ते ७ हीरो मिळतील?
काय निरूपा आणि अमजद पुन्हा भेटतील?
काय तस्करी आणि चाचेगिरी संपुष्टात येईल?
काय कमिशनर इफ्तेखार सगळ्यांना लायनीला लावेल?

है सवाल सौ और जवाब हजार
या खुदा तेरी कृपा अपरंपार
देवदासको भी मिली ना पारो
लेकिन मत भूल
जिसका कोई नही
उसका तो खुदा है यारो!

लिहित रहा. वाचत रहा- 'सत्ते पे सत्ता'! टॅणटढॅणSSSSSSSSSSS

Proud

-----------------------------------------------
शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
Happy

अरे पहिल्या भागात निरूपा स्वतःच्याच मुलाची दाई बनून राहते तो मुलगा कुठला आणि विनोद बंगलोर एक्सप्रेस मध्ये राहिला होता..... Proud

अगं श्र, तो नाहीतरी हरवलेलाच होता, आता फिरत फिरत आईला शोधत त्याच ट्रेन मधून मुंबईला परत आणि एका कुटुंबाला सापडला. आणि त्याच कुटुंबाकडे निरूपा दाई म्हणून कामाला लागली गं- योगायोग योगायोग म्हणतात ते हेच बरं!
Proud
-----------------------------------------------
शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
Happy

७ हिरो... १४ हिर्विनी...

मग नाव सत्ते पे सत्ता का?
सत्ते पे चौदा... ठेवा..

अरे बाप रे काय मल्टी स्टारर कथा आहे... आणि ह्या सगळ्यांची पुन्हा भेट घडवायची... ? हि कथा आहे की कोडं?

मुंबईत येताच अमिताभ (डॉन सरकार) ची ओळख धरावी किंग 'रजनि सर'शी होते. रजनीचा मेन धंदा हा ईडली आणि डोस्याचा असतो. तो तांदळाने भरलेल्या पोत्याला लात मारत असे आणि मग त्यातले तांदुळ उडून दोन दिवस आधी लात मारुन फिरवलेल्या रगड्यात पिसले जाउन... बजुला असलेल्या उकळत्या पाण्याच्या भांड्यावरुन उडताना शिजले जाउन... डायरेक्ट ईडलीच्या भांड्यात पडतं आणि ईडल्या तयार होत. अशा ईडल्या रजनी सायकलच्या मागे मोठ्ठ पातेल लावुन, आतली चड्डी दिसेल इतकी लुंगी वर बांधुन, हातातला भोपु वाजवत विकत आसे. कुणी ईडली मागता बसल्या बसल्या एक उलटीं लात ईडलीच्या पातेल्यावर मारत असे, आणि लगेच एक पान आणि दोन ईडल्या रजनीच्या हातावर पडत, गिर्‍हाईकाने "चटणी" मागताच रजनी लुंगीवर करुन सीटवर उडि मारत असे...सीटवर ऊडी मारली रे मारली ची सायकलच्या सीट मधुन चटणी उडुन डायरेक्ट ईडली वर... मग रजनी त्याच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये एक डोळा बारिक करुन आणि तोंड वाकड करत ईडली प्लेट गिर्‍हाकाच्या हातात देत असे. त्याची ईडल्या डॉनला खुप आवडतं. त्या ईडल्या खाउन त्याला, त्याच्या आईच्या हातचे पराठे आठवतं... आणि धारावीतली पोरं रजनीच्या मागे

आगया आगया ईडलीवाला आगया
आगया आगया ईडलीवाला आगया ... गाण म्हणत फिरत असत.

तिथेच ईडली खायला आलेल्या शशीची प्लेट अमिताभच्या प्लेटला आदळते आणि एकमेकाच्या प्लेटमधल्या ईडल्याची अदलाबदल होते... जशी लहान असताना ते आपटले असताना आईच्या हातच्या पराठ्यांची झाली असते.. आता भाउ एकमेकांना भेटतील असे वाटत असतानाच ईडली एक्स्चेंज वरुन त्यांच्यात वाद होतो आणि दोघां मध्ये चांगलीच जुंपते...

इसकी ईडली उसकी ईडली से टकराई यारो
हाय रे किस्मत...भाई भाई से टकरा गया देखो प्यारो...
जिसका कोई नही उसका तो खुदा है यारो!

इडली.. ?

लोकाना येडली करणारी ष्टोरी... Happy

आत्ता गं बया? आता रजनी बी येनार व्हय?
जरा डोस्कं चालवायचं म्हन्तू, तर नवीनच कोन तरी उडी मारतंय..
कोंबडीच्या, आजून इंट्रावल बी जाला नाय, तर आनला त्या सुक्काळीच्या रजनीला इडल्या उडवत.
आत्ता ह्यो घोळ कोन निस्तरनार रेSSSS @#%%*&^!!!

बापरे!!! गोष्टीच कॉकटेल झालय अगदी.
आता बा माझ्या अवाक्याच्या बाहेर गेली गोष्ट.... :p
कोण कोण काय आहे कुठे रहातय, कोणा बरोबर रहातय, त्यांचे स्पेशल स्कील्स काय आहेत? हे असल काही म्हणजे काही लक्षात नाहि बुवा आता. Sad

सही जा रहेले है ... हसता हसता पुरेवाट Happy

इडली.. ?

लोकाना येडली करणारी ष्टोरी... >>>>> Rofl

सही चाललय पब्लिक्स .. येउ द्या अजुन पोस्ट्स..:हाहा:

एवढी पात्रं घेउन सत्ते पे सत्ता करायचं ?

त्यापेक्षा सरळ घाशीराम कोतवाल करायचा ना !!

मला तर वाटतंय, हातात कागद पेन्सिल घेऊन या गोष्टीचा ERD काढावा.. म्हणजे कळेल कोणत्या entity ची इतरांची काय relations आहेत. Proud सगळा घोळ झालाय ..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
Happy

श्रद्धा -- तू काय मनमोहन देसाई - प्रकाश मेहराचे पिक्चर्स कोळून प्यायलीस काय ?
एकदा वाचले पण ष्टोरीने भंजाळलो आहे.... बघतो परत एकदा वाचून Happy

>> मला तर वाटतंय, हातात कागद पेन्सिल घेऊन या गोष्टीचा ERD काढावा..
अश्विनी -- अजून 'पट्टीची' सिस्टीम ऍनालिस्ट झाली नाहीस वाट्टं ! आम्ही तर कॉलेजमधेच 'पट्टीचे' सिस्टीम ऍनालिस्ट झालो ! प्रॉब्लेम पाहिल्यावर आधी टेबल्स डिझाईन करायची, रिलेशनशिप्स डिफाईन करायच्या, रेफरेन्शिअय इंटिग्रिटी सेट करायची, प्रोग्रॅमिंग ही करून टाकायचं --- हे सगळं झाल्यावरच ERD वगैरे अशी किरकोळ (!) कामं करायची ! (ह्या पद्धतीने ERD काढणे सोपेही जाते!) Happy

Pages