सत्ते पे सत्ता .... अर्थात अगाध सत्ता ईश्वराची - गद्य STY

Submitted by श्रद्धा on 2 September, 2008 - 02:22

सत्ते पे सत्ता .... अर्थात अगाध सत्ता ईश्वराची

सुंदरनगर नावाच्या एका गावात (जे बरेचदा मुंबईचे उपनगर असावे असे दिसत असे आणि जिथे समुद्रकिनारा आणि हिलस्टेशन होते!) अशा गावात अमजद खान आणि निरुपा रॉय हे जोडपे राहत होते. त्यांनी पंचावन्न साली पंचायत आणि लोकांच्या विरोधाला न जुमानता आंतरधर्मीय विवाह केला होता आणि जुने गाव सोडले होते.

पंचायतीचा मुख्य हा प्रेमनाथ नावाचा होता. तो एका डोळ्याने अंध असला तरी दुसर्‍या डोळ्याची त्याची नजर चांगली होती. अनायासेच एक डोळा मिटलेला असल्याने त्याला बंदुकीचा नेम धरणे चांगले जमायचे. त्याच्यासारखा नेमबाज पंचक्रोशीत कुणी नव्हता.

अमजद आणि निरुपा यांनी लग्न केल्यावर पंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार घातला. अमजद गोडेतेल आणायला दुकानात जात असताना काही लोकांचे बोलणे त्याला ऐकू आले. पंचायतीतल्या काही लोकांनी प्रेमनाथच्या आदेशावरून अमजद आणि निरुपाला त्याच रात्री संपवण्याचा घाट घातला होता.
अमजद आणि निरुपाने त्याच रात्री गाव सोडायचे ठरवले.

पहाटे साडेतीनची वेळ. अमजद आणि निरुपा नेसत्या वस्त्रांनिशी निघाले. निरुपाने नेसत्या वस्त्रांनिशी निघायचे म्हणून लग्नातलीच लाल साडी नेसली होती आणि सगळे दागिने अंगावर घातले होते. अमजदने शेरवानी घातली होती. जंगलातून रात्री पळताना वाट दिसावी म्हणून अमजदने एक मोठी मशाल पेटवून हातात घेतली होती. पण हाय रे दुर्दैवा! वाड्याच्या गच्चीवर दबा धरून बसलेली प्रेमनाथ आणि मंडळी त्यांचीच वाट बघत होती. प्रेमनाथचा मुलगा रणजीत हा नुकताच दहा वर्षांचा झाला होता आणि तो वडलांच्या कामी त्यांना मदत करायला सज्ज झाला होता.

प्रेमनाथने मशालीच्या रोखाने नेम धरून बंदूक झाडायला सुरुवात केली. त्याची एक गोळी अमजदच्या गुडघ्यात शिरली व त्याच्या गुडघ्याच्या वाटीला दुर्धर इजा झाली. त्याचा एक पाय कायमचा अधू झाला. दुसरी एक गोळी निरुपाच्या खांद्याला चाटून गेली. तेव्हा अमजदने हातातली मशाल त्वेषाने हवेलीच्या दिशेने भिरकावली. हवेलीच्या प्रांगणात असलेल्या गोठ्यात प्रेमनाथाची बायको रमोला नावाच्या तिच्या लाडक्या गाईचे दूध काढत होती. ती मशाल पडली ती नेमकी रमोलाच्या गोठ्यावर आणि पाहता पाहता आगीत गोठा जळून खाक झाला.
..... रमोलाचे आर्त हंबरणे, भडाभडा पेटलेला गोठा आणि मदतीचा धावा करणारी प्रेमनाथाची बायको हे त्या अमजद निरुपाच्या गावाच्या आठवणींतले शेवटले दृश्य!

आपल्या हातून प्रेमनाथची बायको नि गाय हकनाक मारल्या गेल्या याचे अमजदला तीव्र दु:ख झाले. हे दु:ख विसरण्याचा एकच मार्ग होता त्याच्यापाशी! दारू..... तो रोज बारमध्ये जाऊन बाटली बाटली दारू प्यायला लागला आणि निरुपाच्या आयुष्यात कष्टाचे दिवस सुरू झाले. ती बी ए फर्स्ट क्लास असूनही बांधकामावर विटा वाहण्याचे काम करू लागली. तिचे कष्टाचे सगळे पैसे अमजद हिसकावून घेत असे आणि त्या पैशाने दारू पीत असे. तरी निरुपा सोशिकपणे सगळे सोसत होती. तिने स्वतःचे आचार सोडले नव्हते. ती रोज नमाज पढत असे आणि हिंदू संस्कार कसोशीने पाळायचे म्हणून सदैव रुपयाएवढे कुंकू लावत असे.

अशीच एक संध्याकाळ होती. निरुपाचे करवा चौथचे व्रत चालू होते. इकडे अमजद बारमध्ये पीत बसला होता. तेवढ्यात तिथे उगीचच ऍक्सेंट मारत बोलणारा जीवन नावाचा तस्कर आला. त्याने अमजदला स्वतःकडे सहाय्यक तस्कर म्हणून जॉब ऑफर केला. 'मी खुनाचं पाप केलंच आहे. आता मला वाममार्गाला लागल्यावाचून गत्यंतर नाही. त्याशिवाय मला पैसा मिळणार नाही.' अमजदने मनाशी विचार केला आणि जीवनला आपण ऑफर घेत असल्याचे कळवले.

एके दिवशी अमजद खूप सारी रंगीत कागद गुंडाळलेली खोकी घेऊन घरी आला आणि त्याने निरुपाला उचलून गोल गोल फिरवले. त्याला नोकरी मिळाल्याचे ऐकताच तिने लगोलग देवाची प्रार्थना करून आणि नमाज पढून आपला आनंद व्यक्त केला. दुसरे दिवशी सकाळी अमजद आणि निरुपा ब्रेकफास्ट टेबलावर गप्पा मारत बसले होते. आजपासून निरूपाने विटा वाहण्याची नोकरी सोडल्याने तिला वेळच वेळ होता.

"नोकरी मिळाली एकदाची, बरं झालं गडे. पण नोकरी कसली आहे?"
"सांगतो. पण पहिले एक कप चहा आण बघू मला."
निरुपा हसली आणि चहा करायला स्वयंपाकघरात गेली. तिने मनापासून चहा बनवला. कप घेऊन बाहेर येतायेताच अमजदने जाहीर केले;
"मी जीवन नावाच्या तस्कराचा साहाय्यक म्हणून नोकरी करणार आहे."
तिच्या हातातली कपबशी पडून खळकन फुटली. 'नाहीSSSSSSSSS' अशी किंचाळी फोडून ती जमिनीवर बेशुद्ध होऊन कोसळली.
तिला शुद्ध आली तेव्हा ती एका नवीन बंगल्यात बेडरूममध्ये होती. अमजद बाजूला बसून तिचे कपाळ चेपत होता. अमृतांजनाचा वास खोलीभर दरवळत होता.
"मी इथे कशी आले? हे कुणाचं घर आहे?"
"हे मला जीवनसाहेबांनी दिलेलं घर आहे. आजपासून तू इथेच राहायचंस. तुला इथून कधीच बाहेर पडायची परवानगी नाही." अमजद उठला एवढे बोलून आणि ताडताड पावले टाकत तस्करीच्या कामाला निघून गेला. निरुपाने नशिबाला बोल लावला आणि ती त्या बंगल्यात दु:खी जीवन जगू लागली.

अशीच बरीच वर्षे गेली. आता त्या बंगल्यात सात लहान मुले बागडत होती. त्यात तीन तर अमिताभ बच्चन होते, कारण निरुपाला एकावेळी तिळे झाले होते. अमजदचा तिळ्यांवर विशेष जीव होता आणि सगळ्यांत धाकटा जो विनोद (खन्ना) तो मात्र त्याला फारसा आवडत नसे. तिळे जरासे मोठे झाले की त्यांनाही तस्करीच्या बिझनेसमध्ये आणायचे, हे अमजदचे स्वप्न होते. निरूपाला आता चिंतेने ग्रासले. तिला आपला एकही मुलगा तस्करीमध्ये जाऊ द्यायचा नव्हता. अमजदपासून त्यांना कसे वाचवावे, याचा ती अहोरात्र विचार करू लागली. अशातच तिला एक आशेचा किरण दिसला. पृथ्वीचा अक्ष साडेतेरा शतांशाने कलल्यामुळे राजापूरची गंगा अचानक सुंदरनगरमध्ये प्रकट झाली आणि ताबडतोब कुंभमेळ्याची घोषणा झाली. निरुपाला हीच अखेरची संधी होती.

अमजद कोकेनची डिलिव्हरी घेण्यासाठी पौर्णिमेला समुद्रकिनार्‍यावर जाणार होता. सगळा व्यवहार पूर्ण व्हायला किमान दोन दिवस लागणार होते. तेवढ्या वेळात आपला बेत तडीला न्यायचे निरुपाने ठरवले.
प्रत्येक मुलाच्या पाठीवर त्यांचे आडनाव 'खान' उर्दूमध्ये गोंदले होते. बंगल्याजवळच्या झोपडीत राहणार्‍या आणि निरुपाला बहीण मानणार्‍या ए के हंगलने भाऊबिजेला घातलेल्या ओवाळणीतून निरुपाने सात लॉकेट्स आणली. आणि प्रत्येक मुलाच्या गळ्यात ती घातली.
पौर्णिमेला अजून सात दिवस होते. त्या भागात बरेचदा फिरणार्‍या फकिराला तिने मुलांना 'जिसका कोई नही उसका तो खुदा है यारों.....' हे गाणे शिकवण्याची गळ घातली. तो रोज दुपारी दोन तास त्यांची शिकवणी घेऊ लागला.

.........अखेर कुंभमेळ्याचा दिवस उजाडला. निरुपाने लग्नातलीच लालजर्द साडी नेसली. मुलांना नीट तयार केले; प्रत्येकाला प्रेमाने अखेरचे छातीशी कवटाळले आणि ती निघाली. सुंदरनगरच्या नदीच्या घाटांच्या ठिकाणी तोबा गर्दी झाली होती. निरुपाने नीट प्लॅनिंग करून एकेका मुलाला गर्दीत हरवून टाकले. तिळ्यांना हरवताना तर तिला खूप कष्ट करावे लागले. यात दोन दिवस निघून गेले. अमजद परत यायची वेळ झाली होती. आता फक्त विनोद तिच्यापाशी राहिला होता. पण तिला सर्वांत धाकट्या विनोदला टाकवेना. एवढासा तो जीव! हा नाहीतरी अमजदला आवडत नाही फारसा... मग तो त्याला तस्करीच्या बिझनेसमध्ये घेणार नाही कदाचित... असा विचार करून निरुपा त्याला घेऊन घरी परतली. व्हरांड्यातच अमजद तिची वाट बघत होता.

"माझ्या परवानगीशिवाय कुठे गेली होतीस तू?" तो कडाडला.
"कु... कु... कुंभमेळ्यामध्ये...."
"बाकीची मुलं कुठे आहेत माझी?"
"हरवलीSSSSSSSSSSSSS....."
अमजद संतापाने लालपिवळा झाला. त्याने निरुपाच्या अंगावर चाबकाने फटकारे मारले.
"सगळी मुलं हरवून हा माझा नावडता मुलगा तेवढा घेऊन आलीस??????????? आजपासून या घरात तुझ्यासाठी जागा नाही.... चालती हो....................."

निरुपाने डोळ्यांतून अखंड पाणी वाहायला लागले. आणि त्या अश्रूंमधले आम्लाचे प्रमाण जरा जास्त झाल्याने तिची दृष्टी गेली. तिला पार दिसेनासे झाले. आपल्या धाकट्या मुलाला हृदयाशी धरून ती स्टेशनाकडे धडपडत, ठेचकाळत चालू लागली. कॉलनीच्या कोपर्‍यावर तो फकीर गातच होता....
'जिसका कोई नही.... उसका तो खुदा है यारों'....
निरुपा विनोदला मांडीवर घेऊन एका गाडीत विनातिकीट चढली. ती बंगलोर एक्स्प्रेस होती जी दिल्लीपासून बंगलोरला आणि उलट जायची. निरुपाचा प्रवास सुरू झाला. मध्ये कुठल्याशा स्टेशनावर गाडी थांबली. विनोद तहानेने रडत होता. खरेतर दिसत नसताना निरुपाने कुणालातरी दुसर्‍याला पाणी आणायला सांगायला हवे. पण नुकतीच आंधळी झाल्याने तिला अजून आंधळेपणाचा सराव झाला नव्हता. बाजूच्या बाईला तिने विनोदवर लक्ष ठेवायला सांगितले. आणि ती पाणी आणायला उतरली.
पाणी भरून झाल्यावर मात्र तिला परत गाडीकडे जायला सुधरेना. तिने एका माणसाला विचारले....
"दादा, बंगलोर एक्स्प्रेस कुठली?" आणि......

तिच्या दुर्दैवाने अप आणि डाऊन दोन्ही बंगलोर एक्स्प्रेस एकाचवेळी त्या स्टेशनावर प्लॅटफॉर्म २ आणि ३ ला लागल्या होत्या. त्या माणसाने तिला एका बंगलोर एक्स्प्रेसच्या तिने सांगितलेल्या डब्यात चढवले आणि दोन्ही गाड्या एकदम सुटल्या. ती आपल्या मुलाला शोधू लागली पण हाय रे दुर्दैवा.... तो दुसर्‍या गाडीत होता. निरुपाने आक्रोश सुरु केला. आणि ती बेशुद्ध झाली. प्लॅटफॉर्मवर उभा तो फकीर मात्र गातच होता.....
"जगी सगळ्यांत मोठी सत्ता ईश्वराची...
जगी सगळ्यांत मोठी सत्ता ईश्वराची...
ईश्वरापुढे न सत्ता मोठी असे कोणाची....
बिछड जायें तो वो ही मिलाता है यारों...."

.......इकडे अमजद कुंभमेळ्यात आपल्या सहा मुलांना शोधत होता. तेवढ्यात अचानक प्रेमनाथ आणि रणजीत आपल्या माणसांसकट त्याच्यासमोर उभे ठाकले. अमजद टोळी आणि प्रेमनाथ टोळी यांच्यात घनघोर मारामारी सुरू झाली. प्रेमनाथने नेम धरून गोळी झाडली (त्याचा नेम चांगला होता हे आठवत असेलच!) आणि अमजदला ती गोळी लागून तो थेट नदीत कोसळला.

निरुपा मुंबईत उतरली. इथे ती कुणालाच ओळखत नव्हती. स्टेशनातून बाहेर येऊन ती वाट फुटेल तिकडे चालू लागली. जाता जाता ती एका बंगल्यांच्या कॉलनीत येऊन ठेपली. तिथे एका बंगल्यात हलकल्लोळ माजला होता. तिथला छोटा मुलगा रडत होता आणि शांत व्हायचे नाव घेत नव्हता. त्याची आई त्याला जवळ घेऊ पाहत होती पण तो सतत तिच्या हाताला हिसडे देत होता. एकदम जोरदार हिसडा देऊन तो बंगल्याच्या गेटबाहेर पळाला. समोरून एक ट्रक येत होता.

निरुपाला आतापावेतो आंधळेपणाची सवय झाली होती. तिने धडपडत जाऊन त्या मुलाला उचलले आणि ट्रकच्या मार्गातून बाजूला घेतले. मुलगा आता शांत झाला होता. होणारच, कारण त्या दुर्दैवी मातेला माहीत नव्हते की तो तिचाच हरवलेला मुलगा होता... तो केवळ तीन वर्षाचा होता आणि त्याला अजून फार बोलता येत नव्हते. त्या बंगल्याच्या मालकिणीने धावत येऊन मुलाला जवळ घेतले.
"तुमचे फार उपकार झाले. फार नवससायासांनी झालाय हा... (ती कशाला सांगेल की हा मुलगा तिने कुंभमेळ्यातून उचलून आणला आहे ते!) तुमचे उपकार फेडण्याची मला संधी द्या. तुम्ही याची आया म्हणून आमच्याचकडे राहा."
निरुपाला डोईवर छप्पर हवेच होते. तिने ते कबूल केले. अशा प्रकारे एक आई आपल्याच मुलाची आया बनून त्या बंगल्यात राहू लागली.
कोपर्‍यावर एक फकीर गातच होता....
"त्या ईश्वराची सगळी लीला न्यारी..
संकट देतो तोच ते संकट वारी....
खुशी से पहले वो गम भी देता है यारों..."
जिसका कोई नही, उसका तो खुदा है यारों..."

STY चे नियम:
१. सात भावांना सात नायिका मिळायलाच हव्यात.
२. शेवटी सात भाऊ आणि आईवडील एकमेकांना भेटलेच पाहिजेत.
३. घडणार्‍या सगळ्या गोष्टी अचाट नि अतर्क्य असायला हव्यात.
४. प्रेमनाथ (रणजीतसकट) आणि जीवनदेखील शेवटच्या फायटिंगमध्ये यायला हवेत.
५. 'जिसका कोई नही...' हे या सिनेमातले महत्त्वाचे गाणे आहे. तो सगळ्या कुटुंबाला जोडणारा धागा आहे. ते शक्य तिथे वेगवेगळ्या कडव्यांसकट यायला हवे. (शक्यतो).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संदीप, व्वा!
पण मंडळी , विषयांतर करू नका.. नाहीतर संयोजक येऊन कान पकडतील..
आपले हो. Proud
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
Happy

अरे बापरे डोके गरगरले नी सोडून दिली मध्येच वाचता वाचता...... multi starrer picture नेहमी पडतो रे बाबा..

anyways, चालु द्या.... Happy

ती कर्ती करवती मायबोलीची मनमोहन देसाई कुठे ...? Happy जरा गाडीला धक्का द्यायला सांगा तिला....

ती सिंगापूर दर्शनात मग्न आहे

मनुस्विनी .. बडजातिया ब्रॅड किती चलतात.. कोणाच कोणाशी लफड आहे ते कळायलाच लोकाना २-३ वेळा बघावा लागतो ना चित्रपट...

मी काय म्हनतो येवड्या मोथ्या स्टार कास्टच्या डेट्स क्श्या काय मिळाल्या?? बीगी बीगी चालु द्या की...
आमी अडानी मानसं काय लिवनार इथं? Biggrin

"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

Pages