सर्व्हे रिपोर्टः विभाग -कुटुंब

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 April, 2010 - 08:13

कुटुंब

या सदरातील शेवटचा प्रश्न सोडता सर्व प्रश्न अनिवार्य होते. कुटुंबातील घरकामाचे लिंगाधारित विभाजन, परंपरेनुसार घरातील जबाबदार्‍या, दिवसाकाठी स्वयंपाकघरात देण्यात येणारा वेळ आणि तीन पिढ्यातील फरक याभोवती या विभागातील प्रश्न गुंफले होते.

हे वाचण्यास सुरूवात करण्यापूर्वी प्राथमिक माहिती हा धागा पूर्ण वाचावा.

  • तुमच्या घरात लिंगाधारित कामाची विभागणी आहे का? योग्य वाटते का?

    HC.JPG

    प्रश्नावलीत उत्तरासाठी दिलेले पर्याय खालीलप्रमाणे होते.

    • विभागणी आहे / योग्य वाटते
    • विभागणी आहे / योग्य वाटत नाही
    • विभागणी नाही / योग्य वाटते
    • विभागणी नाही / योग्य वाटत नाही

    प्रश्न विचारण्याचा उद्देश घरकामातील लिंगाधारित विभाजन तपासणे हा होता. या पर्यांयाचा अर्थ कदाचीत चुकीचा घेतला गेला असावा याचा बर्‍याच उत्तरांवरुन अदमास येतो (कारण एकाच व्यक्तिने दिलेल्या बाकीच्या प्रश्नांच्या उत्तरांशी या प्रश्नाला दिलेल्या उत्तराचा ताळमेळ बसत नाही). या प्रश्नातील दुसर्‍या भागाचे म्हणजे योग्य वाटतं का याचे उत्तर देताना, काही मैत्रिणींने आपल्या घरातील कामाची विभागणी किंवा system योग्य वाटते किंवा वाटत नाही असे सांगितले आहे. याउलट काही जणींनी कामाच्या लिंगाधारित विभागणीबद्दलचे आपले मत व्यक्त केले आहे (apart from system followed in their home). प्रश्नावलीकर्त्यांना आपल्या घरातील कामाची विभागणी आणि त्याबद्दलचे मत हे अपेक्षित होते.

    ३३% मैत्रिणींनी त्यांच्या घरात लिंगाधारित कामाची विभागणी आहे असे सांगितले.

  • स्वयंपाकघरातील वेळ ... (तवा मियते भाकर...)

    Kitchen.JPG

    स्वयंपाकघरात दिवसाकाठी एका तासापेक्षा कमी वेळ देणार्‍या स्त्रियांची संख्या २६ (२१%) इतकी आहे व यामध्ये एकही गृहिणी नाही. सद्ध्या भारतात स्थित असलेल्या स्त्रियांपैकी दिवसाकाठी एका तासापेक्षा कमी वेळ स्वयंपाकघरामध्ये देणार्‍या सर्व स्त्रिया पूर्णवेळ नोकरी अथवा व्यवसायात आहेत तर सध्या परदेशात स्थित असलेल्या स्त्रियांनी पूर्णवेळ नोकरी, अर्धवेळ नोकरी, नोकरीच्या शोधात व विद्यार्थी हे पर्याय नोंदवले आहेत. सद्ध्या गृहिणी असलेल्या ६१% स्त्रिया स्वयंपाकघरात दिवसाकाठी दोनपेक्षा जास्त तास देतात.

  • तुम्ही घरातील कुठली कामं बहुतांशी एकटीने करता? यांपैकी कुठली न झाल्यास तुम्ही स्वतःला जबाबदार धरता?

    Primary HC responsibility.JPG

    नमूद केलेली सर्व कामे पूर्ण होण्यासाठी स्वतःलाच जबाबदार ठरवणार्‍या स्त्रियांची संख्या मात्र अपेक्षेपेक्षा खूप कमी म्हणजे फक्त २ आहे. या दोन स्त्रियांनीसुद्धा त्या ही कामे करून घेण्यासाठी मोलाने मदत घेतात असे सांगितले आहे. परंतू तरीही ही कामे प्राथमिकतः त्यांची जबाबदारी आहे असे त्यांचे मत आहे.
    याचबरोबर नमूद केलेल्यांपैकी फक्त एखादेच काम करणे आपली जबाबदारी मानणार्‍या स्त्रियांची संख्यासुद्धा खूप कमी म्हणजे ३ आहे व त्यातही एक अविवाहित विद्यार्थिनी आहे.

    घरकाम व स्वयंपाक (पारंपारिकदृष्ट्या स्त्रियांची अशी मानली जाणारी कामे) आपली जबाबदारी मानणार्‍या स्त्रियांची संख्या ३८ आहे. घरकाम, स्वयंपाक व सफाई यांची जबाबदारी ३० जणी स्वतःची समजतात. याच कामात जर भांडी व कपडे धुणे जोडले तर या सर्व कामाची जबाबदारी स्वतःवर घेणार्‍या स्त्रियांची संख्या २१ आहे. ३४ जणींनी यापैकी कोणतेही काम त्या (स्वतःची) एकटीची जबाबदारी समजत नाहीत असे नमूद केले आहे.

  • सद्ध्या तुमच्या घरी घरकाम आणि तत्सम कामांसाठी पगारी नोकर आहेत का? किती आणि कुठल्या कामासाठी ?

    या प्रश्नाला उत्तर देताना ५७% स्त्रियांनी घरकामासाठी कोणतेही नोकर नाहीत असे उत्तर दिले. त्यापैकी बहुतांश स्त्रिया सध्या परदेशात वास्तव्य करत आहेत. याव्यतिरिक्त ९% मैत्रिणींने सध्या परदेशात असल्याचे परंतू इथे आठवड्यातून / पंधरा दिवसातून / महिन्यातून एकदा सफाईसाठी किंवा घरकामासाठी किंवा बागकामासाठी व्यक्ती आहे असे सांगितले. सध्या भारतात वास्तव्य करत असलेल्या ६६% स्त्रियांकडे कोणत्या ना कोणत्या कामासाठी पगारी नोकर आहे.

    बहुतांश म्हणजे ३८ जणींनी भांडी घासायला तर त्याखालोखाल २५ जणींनी झाडू-फरशीसाठी व २३ जणींनी धुण्यासाठी कामाला बाई असल्याचे सांगितले. १३ जणींनी पोळ्यांसाठी, १२ जणींनी वरकामासाठी, ६ जणींनी मुलांना सांभाळायला, ५ जणींनी स्वयंपाकाला बाई असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त भाज्या चिरणे, गाडी पुसणे यासाठी पगारी नोकर, आणि वाहनचालक असल्याचेही काहीजणींनी नमूद केले आहे. आपल्या घरी घरकाम आणि तत्सम कामासाठी असलेल्यांची नेमकी संख्या जरी प्रत्येक मैत्रिणीने दिली नाही, तरीही साधारणतः एक ते दोन जण कामाला असल्याचे उत्तरातून दिसून येते. घरकामासाठीच असलेल्या नोकरांची जास्तीत जास्त नोंदलेली संख्या ५ आहे.

  • मुलांना/कुटुंबाला देता येणार्‍या वेळेबाबत तुम्ही किती समाधानी आहात ?

    Time Commitment.JPGअसमाधानी आहे असे उत्तर देणार्‍यांपैकी निम्म्या स्त्रिया सद्ध्या परदेशात आहेत व त्यांच्यापैकी निम्म्या स्त्रिया अभारतीय वंशाच्या आहेत. असमाधानी आहे असे उत्तर देणार्‍या बहुतांशी स्त्रिया पूर्णवेळ नोकरी करतात. (परदेशातील दोन जणींनी विद्यार्थिनी आहे व नोकरीच्या शोधात आहे असे सांगितले). यापैकी ५६% स्त्रियांनी त्यांच्या घरात लिंगाधारित विभागणी असल्याचे सांगितले आहे व त्यातील एक स्त्री सोडल्यास बाकी कोणीही घरातील कोणतेही काम मोलाने करुन घेत नाही.
    उरलेल्या ४४% पैकी बहुतांशी स्त्रिया मध्यम व्यवस्थापकीय प्रकारचा पदभार सांभाळत आहेत व त्यांनी मुले झाल्यावर नोकरीबाबत संभ्रमात पडल्या होत्या असेही सांगितले आहे.

    पुरेशी समाधानी आहे, पण अजून वेळ देता आला असता तर बरं असे सांगणार्‍यांपैकी ३६% स्त्रिया आपल्या घरात लिंगाधारित कामाची विभागणी आहे असेही सांगतात. (यातही बहुतांशी पूर्णवेळ नोकरी करणार्‍या स्त्रिया आहेत. परंतू यात काही गृहिणी, विद्यार्थिनी व अर्धवेळ नोकरी/ व्यवसाय करणार्‍या स्त्रियाही आहेत. ) पुरेशा समाधानी असलेल्या, पूर्णवेळ नोकरी करणार्‍यांपैकी बहुतांशी स्त्रिया कनिष्ठ किंवा मध्यम व्यवस्थापकिय काम करतात. लिंगाधारित विभागणी नसलेल्या, घरकामाला मदत घेणार्‍या, कुटुंबाला देता येणार्‍या वेळेबाबत पुरेश्या समाधानी असलेल्या स्त्रिया मध्यम व वरिष्ठ व्यवस्थापकीय पदभार सांभाळतात.

    कुटुंबासाठी देण्यात येणार्‍या वेळाबाबत पूर्णपणे समाधानी असलेल्यांपैकी फक्त २९% स्त्रिया पूर्णवेळ नोकरी करतात.

  • आजी/आई/आपण/मुलं (असल्यास) या पिढ्यांमध्ये नक्की काय फरक वाटतो?

    Presentation1.jpg

    या प्रश्नाला उत्तरं अतिशय मनमोकळी, लख्ख आली आहेत. हा प्रश्न खुला होता (शब्दमर्यादा नव्हती) आणि अनिवार्यही नव्हता. आणि तरीही या प्रश्नाला (इतर सदरातील काही प्रश्नांच्या तुलनेत) अतिशय तपशीलवार उत्तरं आली आहेत. पुन्हापुन्हा मूळ शब्दातच वाचण्यासारखी.

    पिढीगणिक विचार/शिक्षण/निर्णय/आर्थिक बाबी याबाबतचे स्वातंत्र्य, कुटुंब केंद्रस्थानी मानून केलेल्या तडजोडींची व्याप्ती, नातेसंबंध,आरोग्य,घरकाम आणि इतर बर्‍याच घटकातील फरक मैत्रिणींनी व्यक्त केला आहे. संगोपनातील फरकाबाबतही सहज, आपसुक प्रतिक्रिया आल्या आहेत.
    आरोग्याबाबतच्या प्रतिक्रियांचा अंदाज यावा म्हणुन मूळ शब्दात एखादी प्रतिक्रिया दिली आहे.
    आरोग्याबाबत भारतीय स्त्रियांमध्ये हा सूर काही प्रतिक्रियांमध्ये कमीजास्त प्रमाणात येतो आहे. हे लिहिताना मैत्रिणींनी स्त्रियांचे संततीनियमनामुळे वाढीव आयुष्यमान, बालमृत्यु, सुलभ प्रसुतीसाठी उपलब्ध वैद्यकीय मदत यापैकी कसल्याही घटकांचा समावेश केला नाही ही विचारकरण्याजोगी बाब आहे. यावरील भाष्य टाळून आम्ही हे वाचक म्हणून आपल्यावर सोपवतो.

    विस्तारभयास्तव सर्वच प्रतिक्रिया देता येत नाहीत. तरीही मूळ शब्दात काहीही फेरफार न करता या काही प्रतिक्रिया. शब्दांवर (फार) प्रक्रिया करण्याचे मुद्दाम टाळले आहे. आपली यावरची मतं जरुर कळवा.

    आजी, आईच्या काळात त्यांचा स्टॅमिना प्रचंड होता, मोठे संसार, आलागेला, सण एकटीच्या बळावर तारून नेत असत. नवर्‍याकडून घरकामात मदतीची अपेक्षाही नव्हती. आता आपल्या पिढीत तंत्रज्ञानामुळे सुखसोयी बर्‍याच आहेत, पण वेळ नाही. आजच्या स्त्रिया बाहेरच्या जगात वावरायला जास्त सक्षम आणि खंबीर आहेत. स्त्री-पुरुष भेदाभेद सुशिक्षित घरात कमी होत आहेत. मुलं मात्र शार्प होत आहेत.

    आजी - केवळ स्वयंपाकघर,पै-पाहूणे हेच विश्व.
    आई - घर, स्वयंपाकघर, पै-पाहूणे, नोकरी, सोशल लाईफ, स्वतःचे छंद जोपासणे इत्यादी.
    मी - नोकरी नसल्याने अनुभवविश्व खूप कमी. स्वतःचे छंद,आवडीनिवडी जोपासणे एकदम व्यवस्थित जमते. आधीच्या पिढीशी तुलना केल्यास घरकाम(भांडी घासणे, आवराआवरी,.. ) आवडत नाही! पण करावे लागते त्यामुळे त्या गोष्टी मनापासून होत नाहीत. जुन्य पिढीसारखी त्या कामांत आत्मियता येत नाही. उगीच स्त्रीमुक्तीचे विचार येतात. मीच का करू वगैरे.......
    ... मन बंडखोरी करते आणि नाही जमत आईसारखे!

    आई ची पिढी कामसु होती. आजकाल आळस फार येतो. मला तर आयडेंटीटी क्रायसेस वाटतो. अजुन आपण घरी राहुन काही घरकाम करणार आहोत ही कल्पनाच पचनी पडत नाहीये. त्यांच्या पिढीला शिकुन सवरुन सुद्धा हे कसे शक्य झाले हे आश्चर्य वाटते.

    आचार-विचार स्वातंत्र्याचा चढता आलेख, मते आणि विचारांमधील फरक

    आईची आई , आई अन मी या तिन्ही पिढ्या बघितल्या तर मला खूप थोडासा फरक तो पण संसारासाठी केलेल्या तडजोडींच्या व्याप्तीमध्येच जाणवतो. पण हेच मी वडलांची आई किंवा सासुबाई वैगरेंना बघितलं तर खूप फरक वाटतो. या बायकांचं स्वतःचं वेगळं आयुष्यच नव्हतं. जे होतं ते संसार, मुलं अन नवरा यांच्याच भोवती. म्हणजे मग मला वाटतं हा फरक पिढ्यांमधला माहीये, हा फरक वाढताना मिळालेल्या वातावरणाचा आहे.

    आधीची पिढी पुर्वापारपासुन चालत आलेल्या रुढी, आचारविचार डोळे झाकुन पाळत होती. त्यांचे विचार हळूहळू बदलताहेत पण तरीही जुने तेच सोने असे त्यांना वाटते. नवी पिढी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या विचारांवर/मुल्यांवर घासुन पाहणारी आहे. जे पटते तेच स्विकारणार अशी. माझी मधली पिढी, जुने सोडवत नाहीय पण नवेही पटतेय अशा काहीश्या त्रिशंकु अवस्थेत आहे.

    आईच्या पिढीतल्या बायका सर्रास अर्थार्जन करायला लागल्या होत्या, पण 'करियर' फारशा करत नव्हत्या. त्यांची 'निष्ठा' घरात होत्या. त्यामुळे ही दोन्ही बाजूंनी कष्टांनी पिचलेली 'सूपरविमेन'ची पिढी. आज्ज्या प्रपंच नेटका करत होत्या, आणि आपली पिढी यांत निवड करू शकते. त्यामुळे आपण त्याअर्थी सुखी. पण निवड करायची जबाबदारी आल्यामुळेच anxious सुद्धा.

    आईला अजिबात कॉन्फिडन्स नाही. तीला डोमेस्टीक व्हायोलेन्सला सामोरे जावे लागले. मी कुठलाही अन्याय कधीच सहन केला नाही. माझ्यात स्वाभिमान आणि धैर्य कॉन्फिडन्स आहे. पैशाचं पाठबळ नसल्याने कायमच साधनांची कमतरता अनुभवावी लागली यात अन्न वस्त्र निवारा तिन्हीचा समावेश आहे. माझ्या मुलाला या सगळ्याला सामोरे जावे लागत नाही. खरं तर आवश्यकतेपेक्षा जास्त साधनसंपन्नता आहे असं म्हणलं तरी अयोग्य ठरु नये.

    विचारांमधे नक्कीच फरक आहे. घरकाम, मुलं, स्वयंपाक-पाणी ही आपली जबाबदारी असे त्यांना वाटते. मला तसे वाटत नाही. नवर्‍याशी फार वाद घालू नये, बर्‍याच गोष्टी चालायचेच म्हणून सोडून द्यावे असे त्यांना वाटते. मी जगाच्या अंतापर्यंत त्याच्याशी भांडावे अशा मताची आहे. आपला हक्क बजावावा अशा मताची आहे. मुलींना शिकून काय करायचे असे आजीला वाटायचे, आईला वाटते मुलींनी शिकलेच पाहिजे, पायावर उभे राहिले पाहिजे. मलाही तसेच वाटते.

    विचारप्रक्रियेत फरक वाटतो. आधीच्या पिढीइतक्या तडजोडी करणार नाही.फार जास्त स्ट्रेस्ड वाटते आपली पिढी, वेळ अजिबात नसतो. मुलांना विपुलतेचे प्रश्न भेडसावणार याची काळजी वाटते.
    गेल्या दोन पिढ्यातील आर्थिक परिस्थितीत फार फरक आहे.संगोपनातील फरक वाटतो- मी माझ्या आई/आजी पेक्षा चांगली आई आहे (more open minded, less fussed) असं वाटतं.

    .......As far as "being happy" is concerned, I don't know if I am any less or more happier than them......

    The lines are more blurred as to what each person is responsible in the home with each generation

    Women in my family are becoming more socially liberal and less dependent upon men.


stline2.gifनिष्कर्ष

इतर काही सदरातील (उदा- विवाहसंस्थेबद्दलची मतं इ.) प्रश्नांपेक्षा या सदरातील प्रश्न तात्विक स्वरुपाचे नव्हते. तसे ते जाणीवपूर्वक ठेवले नव्हते. इतर सदरात बर्‍यापैकी वैयक्तिक मत/ भावना व्यक्त करण्यास वाव होता. ह्या भागाचे विश्लेषण मुळातच इतर भागांबरोबर पुन्हा एकदा वाचायला हवे. (आणि मायबोलीवरील अलिकडेच कामाच्या विभागणीवरील वादग्रस्त चर्चेच्या पार्श्वभूमीवर पडताळून पहायला हरकत नाही.)

लिंगाधारित घरकामाच्या विभागणी बाबत प्रश्नावलीतील त्रुटीमुळे (शब्दांचा वापर), किंवा प्रतिक्रिया देणार्‍यांच्या समजातील फरकामुळे, याचे विश्लेषण अपुरे राहते आहे. घरकामासाठी मोलाने करुन घेण्यात येणार्‍या मदतीवर सद्ध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाचा (भारतात/ भारताबाहेर) प्रभाव आहे.

नमूद केलेल्या कामांपैकी कुठलेही काम केवळ आपलेच आहे याला "कोणतेही नाही" हा पर्याय नोंदवणार्‍या प्रतिक्रियाही काही प्रमाणात आहेत ही लक्षात घेण्याजोगी बाब आहे.

कुटुंबाला देण्यात येणार्‍या वेळाबद्दलच्या प्रतिक्रियांवर नोकरीस्थितीचा/घरातील लिंगाधारित कामाच्या विभागणीचा प्रभाव जाणवतो.

सर्वेक्षणात भाग घेतलेल्या स्त्रियांच्या मतानुसार तीन/चार पिढ्यातील फरकांचा आढावा हे समाजातील, कुटुंबसंस्थेतील स्थित्यंतरांचे प्रातिनिधिक चित्रण आहे असं तुम्हाला वाटतं का?

कुटुंबासाठी देण्यात येणार वेळ is a bit tricky. याबाबत मलाही आपण पुरेसा (म्हणजे किती ?) वेळ देऊ शकत नाही ही खंत कुठेतरी वाटतेच.
तरीही माझ्या एका आवडत्या पुस्तकातील (I don't know how she does it) वाक्य देते ..you can screw up whether far or near ..

असमाधानी आहे असे उत्तर देणार्‍या बहुतांशी स्त्रिया पूर्णवेळ नोकरी करतात. >>> हे वाचून थोडंसं वाईट वाटलं, चुटपुटतं वाईट. कितीही शिकलेली असली, कामाची समान विभागणी असली, बाहेर मान असला, तरी कुठेतरी एक कोपरा घरासाठी, मुलांसाठी कायम आसूसलेला, पाखर घालणारा असतोच, मग तो मान्य करा वा ना करा. बर, लौकिकार्थाने ही स्त्री सगळ्यांना, अगदी स्वतःलाही पुरेसा वेळ देते, तरीही, तिला थोडा 'अजून वेळ' हवा असतोच Happy

मीही 'समाधानी आहे, पण अजून वेळ द्यायला आवडला असता'मध्ये. सगळं मॅनेज केलेलं असतं, पण तरी 'अजून थोडा वेळ..'ची इच्छा असतेच Happy ही खूप आतली, मनातली इच्छा ह्या निमित्ताने बोलली गेली (कारण, सहजासहजी स्त्री हे मान्य करणार नाही :))

महत्त्वाचे- हे फक्त माझे मत आहे.

ह्म्म्म.. मी त्या पूर्णपणे समाधानी आहे असे उत्तर देणार्‍यांपैकी. पण मग घरात देणार्‍या वेळाबाबत जरी मी समाधानी असले तरी, मी नोकरी करत नाही ही बोच मनात कुठे ना कुठे, कधी ना कधी येतेच. नोकरी न करता मुलाला वेळ द्यायचा असा निर्णय पूर्ण विचारांती घेवूनही मी घरी रहाण्याबाबत अजूनही बर्‍याचदा संभ्रमात पडते.

म्हणजे मग हे नाही तर ते असमाधान आहेच की. Happy अर्थात तुम्हाला सगळंच काही मिळत नसतं हेही मान्य आहे. तरीपण डोक्यात प्रश्न येतो, मला पडतो तसा संभ्रम पुरुषाला पण पडतो का? Happy

पूनम १००% नोकरी करून खरं कितीही मॅनेज केलेलं असल तरी अजून वेळ हवाच.
अल्पना नोकरी करत नसेल तर ...ती करत नाही म्हणून पण असमाधान नक्की>>>>>>माझं पण हेच मत

>>संभ्रम पुरुषाला पण पडतो का?

हे पण मला वाटते स्वभावावर आणि संस्कारांवर (लहानपणीचे घरातले वातावरण, आदर्शाच्या कल्पना या अर्थी) अवलंबून आहे. आपल्या आजूबाजूला असे पुष्कळ 'दमलेले बाबा' आहेत, ज्यांना घरात पुरेसा वेळ देता येत नसल्याने वाईट वाटते.

मीही 'समाधानी आहे, पण अजून वेळ द्यायला आवडला असता'मध्ये...

कधीच पूर्णपणे समधानी आहे अस होणार नाही असच वाटतं....कामाच्या ठिकाणी घराला वेळ देता येत नाही म्हणून चुट्पुट.. घरी औफिसच्या कामाची चिंता..

या उपक्रमात सहभागी झालेल्या सगळ्यांचे अन संयोजक चमूचे मनापासून आभार.

संपूर्ण सर्व्हे टीमचे ( प्रश्नावली तयार करण्यापासून ते आता तपशीलवार अ‍ॅनलिसिस करणार्‍या सार्‍या ) खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे हा तुलनात्मक अभ्यास शक्य होतो आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता हा सर्व्हे नक्कीच प्रातिनिधीक नाही पण मायबोलीवरच्या सख्यांचे विचार जाणून घेता येत आहेत ही किती आनंदाची बाब आहे. विचारांना पाठबळ मिळाल्यासारखे वाटते आहे Happy