भटकंती -- कर्नाटक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

गेल्या खूप दिवसापासून "कुठेतरी फिरायला जाऊ या ना!!" अशी भुण भुण कधीपासून आमची चालू होती. त्यात पप्पाना एकुलत्या एका जावयाला कर्नाटकातून तेही स्वतःच्या गावी घेऊन जायचे होतेच होते. आमचा देसायांचा वाडा, गावातले धरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक प्रांत एकदा फिरवून आणायचा होता. अर्थात सतिशला पण फिरायची फारच आवड असल्याने तो तर कधीचाच तयार होता. पण त्याला कर्नाटकामधे सर्वात जास्त उत्सुकता ही तिथल्या वडापची होती. लोकं बसच्या टपावरून प्रवास करतात असे त्याला कुणीतरी सांगितले होते. आईला मंत्रालयमला जाऊन जावयाकडून सुवर्ण रथोत्सव करायचा होता.

पण काही केल्या आम्हाला जायचा योग येत नव्हता. नोव्हेंबरमधे जायचे जवळ जवळ फिक्स झाले तवर आन्ध्रामधे पावसाने थैमान घातले आणि मंत्रालयम पूर्ण पाण्याखाली गेले. मधे आईचे अँजिओप्लास्टीचे ऑपरेशन झाले, त्यामुळे तिला प्रवास झेपेल की नाही याची चिंताच होती. पण एखादी गोष्ट ठरवून करायची म्हटली की होत नाही, अचानकच होते...

शनिवारी सकाळी माझ्या मामाचा फोन आला. आईचे मूळ गाव कुरूबगट्टी (धारवाडपासून १० किमीवर) इथे हनुमान जयंतीची यात्रा होती. हे आईच्या घराण्याचे मंदिर त्यामुळे पूर्ण यात्रा ही मामाकडूनच असते. मामाने यात्रेला यायचे आग्रहाचे निमंत्रण दिले होते. जाणे शक्य नाही हे माहितच होते. तितक्यात आत्याचा फोन आला... तिच्या घराण्याचे देखील मारुतीचे देऊळ.. ते धारवाडपासून ४ किमीवर. त्याचीदेखील यात्रा. आत्याचे पण "तुम्ही याच" असा सज्जड दम. पप्पा आईला इतक्या लांबचा प्रवास करून देणार नाहीत असे आत्याला समजावले.

पण आता माझ्या व योगेशच्या डोक्यात किडा वळवळला होता. असे कितीसे अंतर आहे धारवाड्-रत्नागिरी. (सुमारे ३०० किमी). रस्ता चांगला आहे आणि जायचं तर स्वतःच्याच गाडीने. मग कशाला काय त्रास होतोय..

पप्पाना दाभोळला फोन लावला आणि "पप्पा देवदर्शनाला जाऊया... देवाचे काहीतरी करायला हवे ना.. आई व्यवस्थित येइल, मी डॉक्टरना विचारून आले" इत्यादि इत्यादि मखलाशी केली.

पप्पानी "मला भरपूर काम आहे. रिग बांधणे म्हणजे काय दिवाळीतला किल्ला आहे का? मला इथे जेवायलासुद्धा फुरसत नाही" इत्यादि इत्यादि फटाके फोडले...

आमचा आवाज बंद Sad

पप्पा इतके बडबडलेले असल्याने मी सतिशला काहीच विषय बोलले नाही. उगाच ऑफिसमधे फोन करून त्याला काय सांगायचे!!!

पण आमचे पप्पा म्हणजे ग्रेटच आहेत हं! दुपारी तीन वाजता त्याचा फोन आला. "निघायची तयारी करा"
पप्पा दाभोळवरून रत्नागिरीला येत होते. वाटेत त्याना रत्नागिरीच्या यार्डमधे काहीतरी काम पण होतंच. तसंच त्यानी सतिशच्या बॉसकडून (हापण पप्पाच्याच गावचा) त्याला चार दिवसाची रजा दे गावाला जायचय हेही सांगून टाकलं परस्पर.

कल्पना करा... सतिशचा बॉस जाऊन सतिशला म्हणला.. "अरे, तुला मी चार दिवसाची रजा दिलीये. नुग्गीकेरीच्या जत्रेला जायला, हे पाचशे रूपये घेऊन माझीपण महापूजेचा पावती कर."

कुठला नुग्गीकेरी?कसली जत्रा? कोण जातय? आणि चार दिवसाची रजा???

संध्याकाळी घरात नुसता गोंधळ उठला होता. पाच जण जाणार म्हणजे आमची मारुती नेता येणार नाही. दुसरी मोठी गाडी नेता आली पाहिजे. चार दिवस जायचे तर घरात कोणतरी झोपायला ठेवले पाहिजे. कपडे इस्त्रीचे हवेत. देवळात वाटायला काहीतरी प्रसाद केला पाहिजे. तिथे न्यायला घरचे नारळ उतरवले पाहिजे.

त्यात परत पप्पाने अजून एक तोफ डागली. नुसते धारवाडला जाऊन काय उपयोग?? आपण कोल्हापूर - नरसोबाची वाडी-औदुंबर- मुधोळ- बागलकोट्-मुचखंडी- बागलकोट- बदामी- धारवाड- रत्नागिरी-असे करत जायचे. अजून वाटेत काही इंटरेस्टिंग असेल तर ते पण पहायचे. गूगल अर्थवर्रून प्रवासाचा अंदाज काढला. चार दिवसात फक्त बाराशे किमी!!!!

घरात खूप गोंधळ होता ते बरंच झालं... कुणीच मला हा प्रवास झेपेल का? हा विचारदेखील केला नाही. Proud

रविवारी सकाळी भल्या पहाटे तीन वाजता आम्ही उठलो... (जांभई देणारी बाहुली) आणि साडेचार वाजता कोल्हापूरला जायला निघालो. कोल्हापूरमधे जानेवारीमधे सगळेच रस्ते खणलेले असल्याने तिथे लवकरात लवकर पोचायचे होते. (हे कोल्हापूर रस्ते खणणे प्रकरण ज्यानी अनुभवलय त्यानाच समजेल)

सात वाजता कोल्हापूरमधे पोचल्यावर बरेचसे रस्ते चक्क बुजवलेले (डान्बरीकरण नव्हे!!) पाहून जरा बरे वाटले पण गाडी अजून कोकणातल्याच रस्त्यावर आहे असे वाटत होते.

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे सकाळी साडेसात वाजता दर्शन घेतले. तशी फार मोठी रांग नव्हती पण तरीही गाभार्‍यापर्यंत पोचायला पंधरा मिनिटे लागली.

यावेळेला पहिल्यान्दा अंबाबाईचे विश्वरूप दर्शन घडले. अंबाबाईची नुसती मूर्ती!! अलंकार पूजा वगैरे अजून काहीही झालेली नव्हती. ही अशी काळ्या पाषाणामधली मूर्ती मी प्रथमच पाहत होते. सर्रकन अंगावर काटा आला आणि डोळ्यत पाण्याचा एक चुकार थेंब.... का?? ते मलाही माहित नाही. मूर्तीमधे अप्रतिम तेज आहे.. ती मूर्ती जिवंत आहे, नुसते दगड नाही... इतकेच नव्हे तर आज ही अंबाबाई माझ्याकडे चक्क बघतेय असादेखील एक फील आला.

प्रवासाला निघताना सर्व काही सुरळीत सुखरूप होइल की नाही याची काळजी होती. अंबाबाईने तर आशिर्वाद दिलाच होता.. आता पुढचा प्रवास चालू झाला होता.

देवळातून बाहेर पडलो तर रांग चक्क दक्षिण दरवाज्यापर्यंत येऊन पोचली होती. एवढ्या पहाटे उठून आलो तरी उत्तम दर्शन झाले याचेच समाधान वाटत राहिले. भवानी मंडपात जाऊन तुळजा भवानीचे दर्शन घेतले. इथे आमच्या वाहनचालकाने विलक्षण माहिती दिली. तो मागे कधीतरी एकदा कोल्हापुरात एकटाच आलेला असताना "अंबाबाईचे" देऊळ समजून इथेच दर्शन घेऊन गेला होता. वर जो कुणी कोल्हापुरात देवळात फार गर्दी होती असे सांगितले की "मी गेलेलो तेव्हा देवळात मी सोडून दुसरं कुणीच नव्हतं" हे देखील सांगायचा!! त्याचा गैरसमज दूर झाला ते एक बरे झालं...

दर्शन झाल्यावर एका उडुप्याकडे पोटभर नाश्ता केला. आणि मग नरसोबा वाडीच्या रस्त्याला लागलो. वाटेमधे टेंबलाईच्या देवळाकडे गेलो, मी पाच सहा वर्षाची असताना पप्पा घाटगे पाटिल मधे बोरवेलच्या कामावर होते आणि इथेच टेंबलाईच्या पायथ्याशी विक्रम नगरमधे आम्ही रहायचो. त्यामुळे कोल्हापूरला गेलो की इथे जाणे मस्ट असते...

इथल्या देवीचे दर्शन घेतले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथली गुरविण इतल्या वर्षानंतरदेखील आम्ही कधीही गेलो तरी आम्हाला ओळखते.

आम्ही कोल्हापूरमधे होतो, तो काळ पप्पांसाठी खर्‍या अर्थाने स्ट्रगलचा काळ होता. तिथे आम्ही एकाच खोलीत रहायचो... पप्पा आठवडेच्या आठवडे घरात नसायचे. बोरवेलचे काम म्हणजे शेताखेतातून हातात भली मोठी टूल बॅग घेऊन फिरायचं. तिथून सुरूवात केली ते आज इथे येऊन पोचले. साहजिकच तो काळ अजून विसरता येत नाही. किंबहुना, तो काळ आहे म्हणून आज आम्हा सर्वाचेच पाय जमिनीवर आहेत. पैसा काय आज येतो उद्या जातो महत्वाचं असतं ते आपापसातलं नातं..

मला खरं तर झोप येत होती पण आता पप्पांच्या लेक्चरला रंग चढत चालला होता. जावयाचे कोचिंग क्लास घेणे हे त्याचे आवडते काम तसं पण आहेच... आता तर काय विचारायला नको!!! त्याचं अफाट मराठी आणि सतिश तर "कन्नडा नल्ला!!! त्यामुळे दुभाषाची जबाबदारी माझ्यावर!!!

कोल्हापुरातून आम्ही नरसोबा वाडीला गेलो. आता ऊन चांगलंच पोळत होतं. पण तिथेदेखील उत्तम दर्शन झालं.. तिथे मिळणारी प्रसिद्ध कवठाची बर्फी घेतली आणि इथून औदुंबरला जायचा आमचा प्लान होता..

इथे माझं कधी नव्हे ते डोकं चाललं आणी मी "खिद्रापूर" इथून जवळ आहे जाऊया का? असे विचारले. चौकशी करताना खिद्रापूर वाडीपासून फक्त १८ किमीवर असल्याचे समजले तसेच तिथून औदुंबरला जायला रस्ता असल्याचे देखील समजले. या खिद्रापूरबद्दल मध्यंतरी एका मसिकातून बरेच काही वाचले होते.

१८ किमी जायला आम्हाला फक्त एक तास लागला इतका रस्ता दिव्य होता!!!

khidra pur mandir.jpg

खिद्रापूर इथे एक कृष्णा नदीच्या काठी शंकराचे देऊळ आहे. "कोपेश्वर" या नावाने. हे ११व्या-१२व्या शतकातील सातवाहन कालीन देऊळ भव्य आहे. तसेच, नक्षीकामदेखील सुंदर आहे. मंदिराचे चार भाग आहेत- स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ कक्ष आणि गर्भ गृह.

स्वर्गमंडप म्हणजे चारी बाजूने बांधलेल्या भिंती.. आणि वर नसलेले छत.. या छतावरून मध्यन्ही ऊन बरोबर स्वर्गमंडपाच्या मधोमध पडते इथे १४ते १५ फूट असा एकच दगडाची मोठी थाळी टाईप आहे. स्वर्गमंडपाभोवती १२ खांब असून सर्वच खांबावर अप्रतिम असे शिल्पकाम केलेले आहे. या स्वर्गमंडपाचा उपयोग यज्ञ करण्यासाठी केला जात असावा.

Swarga mandap khidrapur.jpg

कोपेश्वराचे हे मंदिर बरेच जुने आहे. असे म्हणतात की कुठल्यातरी मुसलमान सरदाराला हे मंदिर फार फार आवडले आणि त्याने इथेच रहायचे ठरवले पण काफीराची कला मान्य नसलेल्या त्याच्या सेनेने या मंदिराची तोडफोट केली. याविषयी अधिक माहिती समजू शकली नाही कारण, कुणीच गाईड नव्हता.

या मंदिराविषयी पुराणकालीन कथा अशी की, सतीने यज्ञामधे उडी मारल्यावर शंकर खूपच कोपाविष्ट झाले आणि इकटे तिकडे रागाने फिरू लागले. या ठिकाणी आल्यावर त्याचा कोप शांत झाला. त्याच्या मनाला समाधान मिळाले.

संपूर्ण मंदिर हे अर्धवर्तुळाकार अशा ९२ हत्तीच्या गजपीठावर उभारण्यात आलेले आहे.

khidrapur hattee.jpg

मात्र,इथे पर्यटनाच्या दृष्टीने कसलीही सोय करण्यात आलेली नाही. वॉश रूम्स, गाईड आणि उपहारगृह अशा बेसिक सुविधाचा देखील अभाव आहे. सर्वात मोठी समस्या ही रस्त्याची आहे. पौराणिक दृष्ट्या आणि पर्य्टनाच्या दृष्टीने इतक्या महत्वाच्या असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी साधा एक डांबरी रस्ता असू नये याचे आश्चर्यच आहे!! कोल्हापूरपासून अवघ्या ६५ किमीवर असून आणि नरसोबावाडीपासून १८ किमी असून देखील शासनाची उदासीनतेमुळे या स्थानाचा विकास झालेला नाही.

इथे आमचा अंतराचा आणि वेळेचा अंदाज चुकला होताच!!! पप्पाना कर्नाटकात एंट्री करून मग जेवण करायचा विचार होता पण एवढेसे अंतर जायला यायला आम्हाला तब्बल तीन तास लागले.

शेवटी सपाटून भूक लागल्याने सांगली रस्त्यावरच्या एका हॉटेलमधे जेवण केले आणि औदुंबरच्या रस्त्याला लागलो. नशीबाने इथे रस्ता चांगला होता.. त्यामुळे जास्त वेळ लागला नाही.

औदुंबराचे दत्त दर्शन घेतले आणि चहापान करून आम्ही बागलकोटच्या रस्त्याला लागलो. सांगली आणि बागलकोट १४२ किमीचे अंतर आहे..

{नरसोबा वाडी अथवा औदुंबर येथले फोटो मुद्दाम काढण्यात आलेले नाहीत. जागृत देवस्थानामधे जाताना आपल्या मनात फक्त भक्तीभाव असावा इतर काहीही चित्त विचलित करणार्‍या गोष्टी असू नयेत म्हणून आम्ही कॅमेरा बाहेर काढतच नाही!!!}

कर्नाट़कात आल्यावर आम्ही महालिंगपूर नावाच्या एका छोट्या गावात जेवायला थांबलो. या भागात फिरताना आम्हाला जेवणाचा कधीच प्रश्न उद्भवत नाही. एखादी लिंगायताची खानावळ शोधायची. तिथे गर्दी आहे की नाही ते बघायचं आणि मस्तपैकी जेवायचं. हा आमचा या दौर्‍यातला अलिखित नियम असतो.

हे घरगुती खानावळवाले मोठी गाडीवाले आप्ल्याकडे जेवायला थांबले म्हणून इतके खुश होतात, आधीच त्याच्या थाळीत पदार्थ भरपूर वर अजून काहीतरी स्पेशल वाढतात. आतमधे किचनमधे भाकर्‍या थापल्याचा आवाज आणि खरपूस भाजल्याचा वास येत असतो, त्या वासाने भूक लागलेली नसताना देखील लागते. अर्थात सतिशसारख्या गोडखाऊ माणसाला ते झणझणीत जेवणं जरा कठीण होतं पण शेवटी भूक महत्वाची!!

आता मेनू ऐका बरं..

मेथीचा कच्चा पाला. कच्चा कांदा. तांदळाच्या भाकर्‍या वाटाव्यात अशा गरम मऊ पांढर्‍या ज्वारीच्या भाकर्‍या. मटकीची उसळ (ही माझी फेवरेट). अंबाडीची भाजी, शेंगदाण्याची चटणी. पापड. लोणंचं. पिठलं. भात आणि शेवग्याच्या शेंगा घालून केलेलं सार. ताक आणि दही.

(वरील सर्व पदार्थ अनलिमिटेड बरं का!!!!) किंमत फकस्त तीस रूपये!!!!!

आणि स्पेशल म्हणून गूळाच्या पोळ्या. या पोळ्या असल्या फर्मास होत्या की आम्ही पार्सल बांधून घेतल्या.

वेळापत्रक कोलमडल्याने (आम्ही फिरत असताना हे कायम होतंच होतं) आम्हाला बागलकोट गाठायला रात्रीचे दोन वाजले.

पप्पाचे लहानपण याच परिसरात गेल्यामुळे आणि तसेदेखील शेतीच्या निमित्ताने बागलकोटला सतत जाणं येणं असल्याने लॉज वगैरे शोधताना काहीच अडचण पडली नाही. रूमवर गेलो आणि मस्तपैकी झोपून गेलो.

बागलकोट हा उत्तर कर्नाटकातील एक प्रमुख जिल्हा आहे. पूर्वी हा विजापूर जिल्ह्याचा एक भाग होता. इथून जवळच असलेल्या आलमट्टी धरणाचे पाणी बागलकोट शहराच्या काही परिसरामधे शिरल्यामुळे बागलकोटचा थोडा भाग मुचखंडी येथे विस्थापित करण्यात आलेला आहे. तो जिथे विस्थापित केला ती सर्व जमीन आमची म्हणजे देसायांची होती. त्या अर्थाने आम्ही प्रकल्पग्रस्त!! कूळ कायद्यामधे आमची साडेतीनशे एकर शेती गेली होती. जी काय उरली सुरली होती ती या प्रकल्पात गेली. Sad

दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळी मुचखंडीला गेलो. (गेलो म्हणजे काय तीन चार किमीचे तर अंतर) पण इथे इरण्णला (आमचे ग्राम दैवत) जायचे असल्यामुळे मला नेहमीचा टूरिस्ट वेष सोडून "नवरी वेष" परिधान करायचा होता. लग्नानंतर मी गावात पहिल्यादाच जात असल्याने इतर "भंगार सामान" पण घालायचेच होते Proud

मुचखंडी हे आमचे मूळ गाव. आम्ही इथल्या २० गावाचे देसाई. त्यामुळे गावात अजून पण आपली वट टिकून आहे. घाटावर जसे पाटिल किंवा कोकणात जसे खोत तसे इथे आम्हाला "धणेर" म्हणतात. गावातले लोक अजूनही आदर दाखवतात. आमचा अर्ध्याहून जास्त एकरावर पसरलेला वाडा पूर्णपणे पडलेला असून देखील तिथे कुणी इतर लोकं जाऊन रहायला मागत नाहीत.
म्हातार्‍या बाया बापड्या पण आईला किंवा पप्पाना नमस्कार करताना बघून कसेसेच वाटत होते. सतिशला जाम गंमत वाटत होती. त्याची ओळख सर्वत्र "नम्म अळ्या" अशी करून दिली की तर फिस्सकन हसायचा. (कानडीत जावयाला अळ्या म्हणतात. सुनेला सोशी म्हणतात. सोन्याला भंगार म्हणतात Proud )

या भागातील सुप्रसिद्ध अशी इरकली साडी मी मुद्दाम नेसले होते. नेसायला आणि वावरायला ही सर्वात कम्फर्ट साडी. वर साडी विकत घेतल्यावर फॉल पिको मॅचिंग ब्लाऊज अशी भानगडी नाही. एखादा खणाचा ब्लाऊज असला की काम झाले!!!

irakali.jpg

मुचखंडीमधे इरण्णाचे दर्शन घेतले. पूजा वगैरेची पावती फाडली. आणि आम्ही निघालो आमच्या फेवरेट स्थळाकडे. इरण्णाच्या देवळाच्याच पाठच्या बाजूला असलेल्या धरणाकडे. धरण अगदी नविन बांधलय. १८८२ साली. Happy

muchkhandee.jpg

हे धरण सुमारे एकशेवीस वर्षापूर्वीचे जुने आहे आणि अर्थातच ब्रिटिशानी बांधलेले आहे. इथल्या एका तलावाचे पाणी या धरणाने अडवलेले आहे आणि अजूनही ते मजबूत स्वरूपाचे आहे. या धरणाच्या खाली सुमारे सतराशे हेक्टर जमीन गेलेली आहे. ही जमिन आमच्या पणज्या-खापर पणजोबापैकी कुणीतरी ब्रिटीशाना एक पोती चांदीची नाणी या हिशोबाने ९९ वर्षाच्या कराराने दिली होती. १९८२ साली हा करार संपुष्टात आला आणि त्यानंतर भारत सरकारकडून ही जमिन परत देसायाच्या वंशजाना मिळायला हवी. मात्र, एका महान व्यक्तीने आमच्या घरावर फारच उपकार केले आणि या कराराचा जो मूळ मोडी भाषेतला कागद आहे तो हरवून टाकला. (हा माणूस पप्पाचाच चुलत चुलत भाऊ आहे!!!)

त्यामुळे सध्या आम्ही मुचखंडीला गेलो की, ही बघा आपली जमिन असे म्हणतो आणि खुश होतो. Happy

muchkhandi dam.jpg

धरणाच्या जवळच एक छोटासा डोंगर आहे. आई पप्पाचं लग्न झाल्यावर जेव्हा ते इथल्या मंदिरात आले होते तेव्हा या टेकडीच्या एका दगडावर बसून त्याचा एक फोटो काढलेला होता. जवळ जवळ तीस वर्षानी पप्पानी माझा आणि सतिशचा तिथेच बसून फोटो काढला. Happy

dam 2.jpg

इथून पुढे सतिश योगेश आणि पप्पा या टेकडीवर चढून गेले. ऊन अति झाल्याने आणि साडी सांभाळायचे टेन्शन असल्याने मी आणि आईने गाडीत बसणे पसंत केले. Happy

गावातल्या वाडापहायला गेलो. इथले फोटो मुद्दाम काढलेले नाहीत. Sad स्वतःच्याच घराचे पडलेले अवशेष बघणे हा खरोखर दु:खद अनुभव.

इथे पप्पानी आम्हाला वाड्यामधे जिथे गुप्तधन आहे असे म्हणतात तो दगडी ओटा दाखवला. या वाड्याची सुमारे पंचवीस वर्षापूर्वी वाड्याची डागडुजी करताना एक हाडाचा सापळा सापडला होता. तेव्हा जाणकाराना आजोबानी विचारले होते.. या वाड्यामधे एका सासुरवाशीणीचा खून झाल्याने हा पूर्ण वाडा शापित झालेला आहे आणी इथे राहणार्‍या लोकाना ही वास्तू कधीच सुखाने राहू देणार नाही असे सांगण्यात आले होते. मात्र, सातव्या पिढीनंतर हा शाप संपतो.. आमच्या पप्पाची ही सातवी पिढी आहे. म्हणजे पप्पानंतर योगेशला या वाड्याचे पूर्ण वैभव तसेच त्याने इथे शोधले तर त्याला गुप्तधन मिळेल असे आम्हाला कधीचेच सांगण्यात आलेले आहे. हा वाडा आणि त्याची सर्व माहिती लिहायची म्हटली तर एक वेगळा लेख होइल.

(ता.क. वरील माहिती ही फक्त माहिती आहे यावरून कुणी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यानी इथे येऊन आंदोलन छेडू नये ही विनंती. Proud )

सतिशला पप्पानी अख्खा गाव फिरवून दाखवले. तोदेखील उत्साहाने हे काय आहे वगैरे विचारत फिरत होता. त्याचा अख्खा जन्म कोकणात गेलेला. त्यामुळे त्याला उत्सुकता भयंकर. मधेच एका शेतात पाटाचे पाणी पाहून त्याने लगेच ते पाटाचे पाणी कसे फिरते याची शेतात उतरून समग्र माहिती घेतली. पप्पा आणि सतिश तिथे शेतात पाटाचे पाणी बघत असतानाच मी एक ऊसाचे कांडे मागून घेतले. आणि आईला डायबेटिस असल्याने तिला टूक टूक करत खाल्ले. ऊस खायचा तर तो असाच खायचा असतो!!! ऊसाचा रस हे म्हातार्‍याना वगैरे ठिक आहेत.. Happy

यानंतर वास्तविक आम्हाला त्याच रस्त्याने पुढे जाता आले असते पण आम्ही सकाळी चेक आऊट केलेले नव्हते. त्यामुळे लॉजवर येऊन जरासे फ्रेश होऊन आम्ही आमच्या पुढच्या मार्गाकडे निघालो. आणि इथून पुढे तर दिवसभर खरी भटकंती होती. बदामी-ऐहोळे आणि पट्टद कल्ल... एका विशाल आणि समृद्ध साम्राज्याच्या दगडामधे कोरलेल्या अप्रतिम पाऊलखुणा!!!

बागलकोटवरून बदामी ३० किमी अंतरावर आहे. वाटेत जातानाच आम्ही दुपारचे जेवण एका लिंगायत खानावळीत घेतले.

मेनू:- कांदा, गाजर आणि मुळ्याचे तुकडे. मूगाची उसळ. कोबीची भाजी. ज्वारीची भाकरी. भात आणि सांभार. दुर्दैवाने याच्याकडचे दही त्याचदिवशी खराब झाल्याने (बिचार्‍याने त्याचे दहा रूपये कमी केले) ताक दही मिळाले नाही.

बदामीच्या लेण्यापर्यंत पोचेस्तवर आम्हाला चांगला एक वाजला होता. असल्या कडकडीत उन्हात किमान दोन तास फिरायचे होते. तापमान ३५ च्या वर तरी नक्की होते. आजूबाजूला झाडी हिरवळ अजिबात नाही.

हा सर्व भाग ज्वालामुखीय दगडानी बनलेला आहे. दूर दूरवर दिसतात ते फक्त दगड. रस्त्यावरून जाताना या दगडातोन विविध आकार शोधणे हा तसा चांगला टीपी होऊ शकतो. (इथे येऊन रॉक क्लाईंबिग एकदा करायचेच आहे हा मंत्र मी एकशे आठवेळा जपून घेतला Happy )

badami5.jpg

बदामी ही ५व्या ते ७व्या शतकामधे चालुक्याची राजधानी होती. त्याकालात तिचे नाव वातापी असे होते. इथून जवळच अगस्त्य तीर्थ नावाचा एक तलाव आहे. या तलावाबद्दल अनेक पुराण्कालीन दंतकथा इथे सांगितल्या जातात. बदामीच्या अवतीभवती अनेक मंदिरे इमारती आजही दिसून येतात. त्यामधे प्रमुख अशी ही चार गुंफामंदिरे आहेत. या गुंफा मानवनिर्मित आहेत, म्हणजे डोंगर आतमधे खोदत खोदत जाऊन त्यामधे मंदिरे उभारलेली आहेत. या लेण्यामधे विविध शिल्पाकृती पुराणातील कथाप्रसंग तसेच, देव देवता चित्रीत करण्यात आलेल्या आहेत.

या गुंफाचे तीन भाग आहेत. मुख मंडप (ओसरी), सभा मंडप आणि गर्भ गृह.

पहिली गुंफा:-
ही गुंफा शंकराची आहे. यामधे अर्थात गर्भ गृहामधे सध्या कसलीच मूर्ती अथवा लिंग नाही. पण पुरातत्त्वशास्त्रज्ञानी मंदिरातील विविध प्रसंगाचे व मंदिर बांधणीचे स्वरूप पाहून हे ठरवलेले आहे.

या गुंफेच्या सुरूवातीलाच एक नटराजाची मूर्ती आहे. अठरा हाताच्या या नटराजाने भरत नाट्यमच्या ८१ मूद्रा दाखवलेल्या आहेत.

badami4.jpg

याच मूर्तीच्या बाजूला एक छोटीशी अंधारी पडवी आहे. इथे महिषासूर मर्दिनी ची मूर्ती आहे. याच मूर्तीच्या खालच्या बाजूला दोन डोके आणि चार धड असलेल्या बाळाची मूर्ती आहे. (अशा मूर्त्याना यापुढे आपण ट्रिक मूर्ती म्हणू!!!!) व्यवस्थित पाहिल्यास अँटि क्लॉकवाईज मधे हे बाळ आधी उताणं झोपलय, मग पालथं पडलय मग रांगतय आणि शेवटी बसलय..

(हा फोटो अंधारात काढल्यामुळे नीट आलेला नाही. त्याबद्दल क्षमस्व!!)

या मंदिराना पूर्वी लाकडी अथवा कापडी असे अजून बांधकाम असण्याची शक्यता आहे मात्र कालौघात ते नष्ट झालेले आहे.

गुंफेच्या मुख्मंडपामधे प्रवेश करताना डावीकडे पुराणकथेतला एक प्रसंग चित्रीत करण्यात आलेला आहे.

badami1.jpgकार्तिकेय हा पक्का स्त्रीद्वेष्टा. त्यामुळे त्याने शंकर आणि पार्वतीची पूजा करायला नकार दिला आणि फक्त शंकराचीच पूजा करायचे ठरवले. यामुळे पार्वती क्रोधित झाली. "माझ्याच रक्ता मांसावर वाढलेला तू. माझाच तिरस्कार करतोस?" असे म्हणून तिने कार्तिकेयाचे रक्त मांस काढून घेतले. मात्र, अगदी हाडाचा सापळा उरलेला असताना देखील कार्तिकेय स्वत्तःच्या हट्टापासून मागे सरला नाही व त्याने एका पायावर उभे राहून शंकराची तपश्चर्या केली. शंकर कार्तिकेयावर प्रसन्न झाला मात्र त्याच्यासमोर तो अर्ध नारीनटेश्वराच्या स्वरूपात प्रकट झाला. आता जर शंकराला प्रणाम केला तर अर्धा पार्वतीला देखील जाईल म्हणून कार्तिकेयाने एका भुंग्याचे रूप घेतले आणि अर्धनारीनटेश्वराच्या नाभीतून आत प्रवेश केला व फक्त अर्ध्या शंकराची प्रदक्षिणा घातली. अशी या मूर्तीची कथा. हाडाचा सापळा असलेला आणी एका पायावर उभा असलेला कार्तिकेय. अर्धनारीनटेश्वराच्या रूपातील शंकर त्याच्या पाठी उभा असलेला नंदी आणि बाजूला उभी असलेली पार्वती. हा सर्व प्रसंग आकाशातून पाहणार्‍या गंधर्वकन्या..

याच मूर्तीच्या समोर असलेली मूर्ती ही हरिहराची आहे. हरिहर म्हणजे अर्धा शंकर आणि अर्धा विष्णु. या दोन प्रमुख देवताच्या फ्युजनची ही संकल्पना अवघ्या भारतभर दिसून येते. वैष्णव आणि शैव या दोन भिन्न मतप्रणालीमधील हा एक समान दुवा सतत दिसत राहतो.

badami2.jpg

शंकराच्या हातातील त्रिशूळ व परशू तसेच, विष्णुच्या हातामधे शंख व गदा आहे (गदा तुटलेली आहे) तसेच, दोघाच्या आजूबाजूला मानवरूपमधे नंदि व गरूड उभे आहेत. पार्वती आणि लक्ष्मी नटून सजून आशिर्वाद मुद्रेमधे उभ्या आहेत.

या मूर्त्याच्या खाली असलेल्या पट्टीवर कोरलेल्या या गंधर्वकन्या बघा

badami6.jpg

आणि जरा त्याची हेअरस्टाईल ब्रिटीश जजानी कशी चोरली ते पण बघा!!!
=======================================
=======================================

दुसरी गुंफा -

ही गुंफा विष्णुची आहे. यामधे सुरूवातीलाच विष्णुच्या त्रिविक्रम व वराह अवतारातील मूर्त्या आहेत.

वराह अवतार-

badami70.jpgया मूर्तीमधील भूदेवी, शेष आणि गरूड याचे वराहाच्या मूर्तीसोबत असलेले प्रमाण बघा आणि या सर्वाच्या चेहर्‍यावरील भाव देखील निरखून बघा.

त्रिविक्रम अवतार -
badami9.jpgया मूर्तीमधे डावीकडच्या कोपर्‍यामधे वामन अवतारातील विष्णु तसेच बली राजा, त्याची पत्नी शुक्राचार्य व इतर मंत्री दिसत आहेत. उजवीकडे भव्य प्रमाणात वामनाचा झालेला त्रिविक्रम अवतार दिसत आहे. एका पावलात धरती दुसर्‍या पावलात आकाश व्यापलेला विष्णु तिसर्‍या पावलासाठी बली राजाला पाताळात ढकलत आहे आणि बलीराजाचा मुलगा विष्णुला रोखण्यासाठी त्याचे पाय धरून खेचत आहे.

याच गुंफेमधे एकीकडून पाहिल्यास लहान बाळ व ४५ अंशात फिरून पाहिल्यास दिसणारा मारूती अशी ट्रिक मूर्ती देखील आहे.

तिसरी गुंफा:-

ही गुंफादेखील विष्णुचीच आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे इथे एक संस्कृत शिलालेख आहे, याची लिपी हळे कनडा आहे (जुनी कानडी). ५७८ इ.स. मधे कोरलेला हा लेख असून हे मंदिर राजा किर्तीवर्मा चालुक्याच्या काळात बांधलेले असल्याचा त्यामधे उल्लेख आहे. इथल्या चारही गुंफामधे ही सर्वात प्रेक्षणीय गुंफा आहे. या गुंफेमधे विष्णुचे दशावतार तसेच, अनेक पुराणकथा कोरलेल्या आहेत.

badami10.jpgशांत प्रसन्न मुद्रेमधे असलेला हा नरसिंह. त्याच्या पावलाशी असलेला गोबरा, कुरळ्या केसाचा प्रल्हाद. त्याच्या चिमुकल्या चेहर्‍यावर आश्चर्य आणि भक्तीभाव. दुसर्‍या बाजूला उभी असलेली प्रल्हादची आई.

या गुंफेमधे नैसर्गिक रंग वापरून केलेले रंगकाम अजूनही शिल्लक आहे. आणि गंमत म्हणजे हे रंगकाम करण्यासाठी जे रंग कालवले गेले त्यासाठी मंदिराच्या सुरूवातीलाच छोटे छोटे वाटीसारखे खड्डे खणले गेले आहेत.

एकदाही पेन न उचलता ही चार स्वस्तिक काढता येतात का बघा जरा --

badami13.jpg

इथली अजून एक मूर्ती खूप महत्वाची आहे. चालुक्य हे स्वतःला विष्णुप्रमाणे आदर्श राजा समजत. स्वतःच्या प्रजेची पूर्ण काळजी घेत असत. अर्थात हा मुद्दा प्रजेच्या मनात ठसावा म्हणून त्यानी इथे एक विष्णुची मूर्ती बनवली आहे. सर्वसाधारणप्रमाणे शेषशायी विष्णु हा शेषावरती पहुडलेला असतो. लक्ष्मी त्याचे पाय चेपत असते. मात्र, ही मूर्ती बघा!!

badami 12.jpg

इथे विष्णु शेषावर बसलेला आहे. याच बैठक मुद्रेमधे चालुक्य राजा राज्य दरबारामधे बसत असत. इथे गरूड सेवक बनून ऐकत आहे आणि लक्ष्मी विष्णुला काहीतरी सांगत आहे. यावरून त्याकाळच्या राण्या राजदरबारामधे येत असत असे वाटते. तसेच, शेषावर बसलेल्या विष्णुची ही एकमेव मूर्ती आहे.

आता जरा खालच्या या तीन मूर्त्या बघा. एका खांबावर कोरलेल्या आहेत. आणि त्याचे वैषिष्ट्य सांगा बघू

badami11.jpg

चौथी गुंफा:

ही गुंफा जैन तीर्थंकर महावीर याची आहे. सुरूवातीच्या तीन गुंफा वैदिक पंथाच्या असताना ही गुंफा जैन पन्थाची का? तर, चालुक्य राजे हे सर्वधर्मसमभाव दर्शवणारे होते. त्यामुळे वाढत्या जैन पंथाचा प्रभाव पाहून त्यानी ही गुंफा उभारलेली आहे. या गुंफेमधे चोवीस तीर्थंकर आणि इतर जैन कथा कोरलेल्या आहेत. गर्भगृहामधे महावीर याची मूर्ती अजूनही अभंग स्थितीमधे आहे.

बाहुबली:
DSC02020.JPG

तसेच, इथे एक पाचवी नैसर्गिक गुहा आहे. ज्याचा उपयोग बौद्ध भिक्शू करत असत.

बदामी इथली चार मंदिरे वगळता इतर अनेक मंदिरे आहेत. यामधे भूतनाथ, बदामीचा किल्ला हे बघण्यालायक आहेत. त्यापैकी कित्येक मंदिरे भग्न अवस्थेत आहेत. याच लेण्याच्या पायथ्याशी एक दर्गादेखील आहे!!!

इथे असलेल्या वस्तु संग्रहालयामधे सर्वत्र मिळालेल्या मूर्ती व इतर अवशेष ठेवलेले आहेत. या मधे सर्वात मह्त्वाची मूर्ती ही लज्जा गौरीची आहे. या मूर्तीबद्दल सांगणे योग्य नाही, आपल्याच डोळ्यानी ती बघावी हे इष्ट!!! Happy

(क्रमशः)

नंदे तू क्रमशः लिहून काहीच पोस्ट टाकू नकोस..
लोक पुढचं वाचायला थांबणार नाहीत...
आधीच्या किती कथा क्रमशः लिहून लटकवलेल्या आहेस ते माहितीये सगळ्यांना... Wink

(क्रमशः)>>>>>>>
अब्बे ओये!!!
तुझी सवय गेली नाय का अजुन??? Proud
ठिक आहे. १२०० किमी एकाच्ग पोस्टमध्ये नको पण जरा जास्त अंतर कापा मॅडम.. Happy
सुरवात मस्त झाली आहे.
सतिशचा बॉस जाऊन सतिशला म्हणला.. "अरे, तुला मी चार दिवसाची रजा दिलीये>>>>
तुझे बाबा एकदम भारी प्रकरण दिसतय. Happy

जबरी वर्णन.. एका दमात वाचून काढले सगळे..
श्री महालक्ष्मी, टेंबलाइ परिसर, घाडगे-पाटील, विक्रम नगर.. अहो मी माझ्या घरीच जाउन पोचलो डायरेक्ट.. Happy
कोल्हापुरात उचगावलाच घर आहे... मिल्ट्री महादेवाचे मंदीर पण छान आहे तिथले..

हे मुचखंडी जमखिंडीच्या जवळ येते का ?

पुढचे वर्णन आणि फोटु येउद्यात लवकर.. Happy , बनशंकरीचे मंदीर.. बेळगावचा कुंदा- माण्डे.. Happy

नन्दिनी, लवकर येऊ देत गं उरलेला भाग.... छान वर्णन.... तुझे माझे बाबा एकाच फील्डमधले..... ते शेतजमीन तुडवण्याचे वाचून त्यांचे 'ढेकळे तुडवण्याचे' बोल आठवतात....:)

अरे वा खिद्रापूरला पण जाउन आलात काय.. छान.. बाकी कोल्हापूर, वाडी, खिद्रापूर, औदुंबर आणि मग परत मिरजेवरुन बागलकोट म्हणजे चांगलाच आडवा-तिडवा प्रवास केलात..

खिद्रापूर हे एक पुरातत्वशास्त्राच्या व शिल्पकलेच्या दृष्टीने अतिशय मह्त्वाचे मंदिर पण भयंकर दुर्लक्षित.. सात-आठ वर्षांपुर्वी मिरजेत आम्ही संस्कारभारतीच्या माध्यमातून दोन दिवसांचे 'पुरातत्वशास्त्राची तोंडओळख' करुन देणारे एक शिबीर घेतले होते.. तेव्हा अर्ध्या दिवसाची प्रात्यक्षिक सहल खिद्रापूरच्या देवळात ठेवलेली होती..

अवांतर पार्ले माहिती: नरसोबाच्या वाडीला बासुंदी अचाट मिळते.. दुपारच्या जेवणाला कधीही कुठल्याही पुजार्‍यांकडे बासुंदी मिळतेच मिळते.. Happy

व्वा: माहितीपूर्ण वर्णन Happy
देवळान्चे फोटोही झकास, ते तेवढे सेव्ह करुन ठेवलेत Happy
नन्दिनीचा फोटू मस्तच, ओळखूच येत नाही की हीच ती तेव्हा म्हशीवर बसलेली नन्दिनी Lol
बाकी ते नाकातल वगैरे भन्गार दिसत नाही, का बर? Wink
[बघा, म्हणजे कपड बदलले की व्यक्तिमत्व कस बदलत ते! ]

टण्या, आम्हाला अशाच जुन्या मंदिरातून फिरायला फार आवडते.
बासुंदीच्या माहितीबद्दल धन्यवाद. पण मधुमेही लोक सोबत असली की अशी चंगळ करता येत नाही Happy
बाकी तुझ्यासाठी हा परिसर एकदम पायाखालचा असेल ना??

भंगार नाही गं, बंगार/बंगारु Light 1
फोटो झ्याक आणि माहीती पण मस्त. खिद्रापूर आवडले.
जमीन आणि वाड्याबद्दलचे वाचून वाईट वाटले. फोटो न टाकल्याबद्दल धन्यवाद. मलाही 'आमच्या' जुन्या वाड्यांचे अवशेष पाहून गलबलून येते.
(इरकली साडी छान दिस्त्येय तुला. नाकात पण बंगारु घालत जा-जाच म्हणून नै, छान दिसेल ते)

छान वर्णन. आणि कोपेश्वराचे फोटो ही छान.
तो बाहेर खाण्याचा बीबी उशीरा सुरु झाला ते बरंच झालं नाही? नाहीतर रस्त्याच्या कडेच्या हॉटेलात खाताना भटारखान्याचा विचार मनात आधी आला असता. Wink
अळ्या, भंगार Proud

मस्त सुरुय Happy

स्वर्गमंडपाचा फोटो जर जास्तीचा प्रकाश कमी केलास तर लयी भारी वाटेल.
अ‍ॅन्गल जबरी आहे तो. Happy

मी कधी प्राथमिक शाळेत असताना गेलेलो खिद्रापुरला.
तेव्हाच बर्‍याच हत्तींची सोंड, पाय तुटले आहेत अशी अवस्था होती.

मंदीरात आत लाइट नव्हती त्यामुळे सगळी मुल धडपडत गेलो होतो.

भंगार, अळ्या Biggrin

चिन्नु, आमच्याकडे भंगार असाच उच्चार आहे. आम्ही अशुद्ध कानडीवाले. Happy

सायो, अजून एक माहिती. हे लिंगायत खानावळवाले अत्यंत स्वच्छ असतात. किंबहुना या खानावळी घरातच चालवल्या जात असल्याने आम्ही कित्येकदा वॉश रूम सुविधेचा देखील लाभ घेतो. त्यावरूनच मी म्हणेन की इथे खाणं उलट जास्त सेफ आहे. कर्नाटकात फिरताना शक्यतो उडुप्याकडे जाऊ नये असा आमचा कटाक्ष असतो. इतर राज्यातून फिरताना उडुपी द बेष्ट.. Happy

सुरेख वर्णन. आवडलं. Happy इरकल, फोटो छान.
>>सोन्याला भंगार म्हणतात Lol
मेनू एकदम जबरदस्त आहे!

अंबाबाईचं मलाही असं दर्शन मिळालं यावेळी. पूर्ण पूजा पाहिलीस की नाही? तुळजाभवानीचंही असं मिळालं होतं. खिद्रापूर खूप छान आहे असं ऐकलं, कधी जाणं झालं नाही.

Pages