हरिश्चंद्राची फॅक्टरी

Submitted by ऋयाम on 14 February, 2010 - 10:13

आजकालच्या 'एक ग्रॅम-गोल्डन नेकलेस' आणि 'इमिटेशन ज्वेलरी'च्या काळात 'बावनकशी सोन्याचा चपलाहार' दुर्मिळच झालाय! 'हार'च कशाला घेऊन बसता? 'सोनंच' महाग झालंय म्हणा ना..

कितीही 'टुकार' सिनेमा असला तरी 'वन टाईम सी' आहे असे म्हणत बघण्याच्या आजच्या काळात आत्ताच 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' पाहिला आणि थेट 'बावनकशी सोन्याचा चपलाहार'च आठवला!

कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत...
म्हणजे खरंच नाहीत.
अख्खा सिनेमा संपेपर्यंत बसल्या जागेला माणुस खिळुन राहिलेला.
कुठेच 'रॉकेलचा वास' नाही हो या 'साखरेला'... खरंच....
आणि गोड, गोड साखर! वाह!

'ते, अमुक-अमुक होतं, ते असं नाही करायला हवं होतं.... '
'बाकी सारं ठिक आहे, पण ते तमुक-तमुक जे होतं ते काही नाही पटलं.... '
'जाउद्या हो.. आपला मराठी सिनेमा आहे. थोडं घ्या सांभाळुन...'
अशा कसल्याही कुबड्यांची जराही गरज नाही इथे!!!
नट-नट्या, दिग्दर्शक, संगीतकार, सेटवाले, जे कोणी असतात या कामात, सर्वांचेच 'प्रचंड' कौतुक करायला हवे.
जुना काळ अगदी जसाच्या तसा उभा करुन दाखवलाय!

आणि शेवटी दस्तुरखुद्द 'जादुगार केळफा'.
तो काळ, तेव्हाची परिस्थिती, त्यांनी घेतलेले 'परिश्रम', अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही त्यांना मिळालेली त्यांच्या पत्नीची साथ आणि या सार्‍याचं मुळ, त्यांचं 'ध्यासपर्व'!
'एखाद्या गोष्टीचा 'ध्यास' घेतला की कुठलीही गोष्ट आड येऊ शकत नाही', याचं उत्तम उदाहरण इथे दिसलं..

'सोन्याचा हार' तर उत्तमच बनलाय. पण याचं मुळ श्रेय त्या 'बावनकशी सोन्यालाही' आहेच की!
त्यामुळं, हा 'हार' म्हणजे त्या 'सोन्याला मानाचा मुजराच' आहे म्हणायचा!

फाळके, 'भारतीय सिनेमाचे जनक'. आपल्या १९वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी शंभराहुन अधिक सिनेमे बनवले.
त्यांच्या या कार्यामुळेच आज दर वर्षी जवळपास ९०० चित्रपट, २० भाषांमधे बनवले जातात...
... जिथे ३०लाख लोकांना रोजगार मिळतो.
भारतीय सिनेमा ही जगातील सर्वात मोठी सिनेसृष्टी आहे.

* इतका सुंदर सिनेमा पाहिल्यावर "'चित्रपट कसा वाटला' मधे याची नोंद करुन सोडुन द्या" असं करावसं वाटलं नाही, म्हणुन स्वतंत्र लिहीलं....
* जवळजवळ १२:३० होऊन गेलेत, पण खरंच... झोपच उडालीये!

* (संदर्भ : साखरेला रॉकेलचा वासः - रेशनच्या साखरेला कधी कधी रॉकेलचा वास लागतो.
पण साखर चांगली असते.... म्हणुन तशीच वापरतात साखर... )

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अतिशय आवडला हा चित्रपट! लगेच इतर नातेवाईक, मित्रमंडळींना कळवलं...पहाच म्हणून! ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांनी त्यांनी चित्रपट 'अतिशय म्हणजे अतिशय' आवडल्याची प्रतिक्रिया दिली. मराठीत, आपल्या मराठी माणसाविषयी, त्यातही भारतीय सिनेसृष्टीच्या जनकाविषयी इतका सुंदर, हलका -फुलका, माहितीपूर्ण, रंजक व खिळवून टाकणारा चित्रपट माझ्या परिचयातील अनेक मराठी, अमराठी तरुण तरुणींनी पाहिला व तो आवडल्याचे आवर्जून सांगितले.

चित्रपट खूप आवडला पण पाहताना सारखा प्रश्न पडत होता की खरंच फाळक्यांचा सगळा प्रवास इतका सहज होता का ? विशेषतः बायकोने नवर्‍याला साथ देणे वेगळे आणि प्रपंचाच्या विवंचनेत जराही न पडता हसतखेळत नवर्‍याच्या सगळ्या बेतांना बिनविरोध मान्यता देणे वेगळे. चित्रपट हलकाफुलका बनवण्याच्या नादात या बाबीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले ( किंवा झाले ) आहे असे वाटले. अर्थात असे जर खरंच प्रत्यक्षात घडले असेल तर मग चित्रपट वेगळ्याच उंचीवर जाईल. चित्रपटाचा कॅनव्हासही खरेखुरे जग ( त्या काळची मुंबई, इंग्लंड ) ह्यापेक्षा मोठ्या प्रमाणात उभारलेला सेट असे जास्त वाटले. पण कदाचित त्यासाठी लागणारे बजेट निर्मात्याकडे नसेल त्यामुळे त्यामुळे त्या गोष्टीला मी तरी फारसे महत्व दिले नाही.
पण चित्रपट सर्वांनी आवर्जून बघावा इतका चांगला नक्कीच आहे.

जाणकारांनी कॄपया मार्गदर्शन करावे. त्या काळातील मुंबई, बोलली जाणारी भाषा, वेशभूषा,अजून काही तांत्रिक बाबी ह्याबद्दल काहीच अभ्यास नाही. जाणून घ्यायला आवडेल.

चित्रपटाचा पोत कसा असावा याबाबत दिग्दर्शकानं काहीतरी ठरवलं असणार. आणि म्हणूनच चित्रपटात संघर्ष आला नसावा. मात्र, कॅमेरा हाती आल्यानंतर एक नवीनच विश्व समोर येतं.. चित्रपटात फाळके आणि त्यांच्या कॅमेर्‍याचं नातं बघायला आवडलं असतं.

बाकी, कमी पैशात जितकं शक्य होतं तितकं नेपथ्य नितीन देसायांनी केलं, असं दिग्दर्शकानं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

अगो ला अनुमोदन, इतका सहज त्यांचा प्रवास झाला असेल अस मलाही वाटल नाही चित्रपट पहाताना. सगळाच संघर्ष खूप भराभर दाखवल्यासारखा वाटला.. पण चित्रपट पहाताना कुठेही कंटाळा मात्र येत नाही. अगदी मस्त एंजॉय केला सिनेमा. सगळे कलाकार एकदम मस्त जमलेत. अगदी शेजारच्या आज्जीपण. Happy

त्यांचा प्रवास सहज झाला असेल असे वाटावे तरी का? अर्थात तो सहज नव्हता. चित्रपट थोडा विनोदी अंगाने घेतला म्हणजे प्रवास सहजसाध्य होता त्यांचा असे म्हणणे मला तरी योग्य वाटले नाही!
हेच जर त्यात अजुन प्रसंग टाकून बायकोचा विरोध, रडगाणं , तक्रारी टाकल्या असत्या व अजुन काही तर आपणच त्याला किती मेलोड्रामाटीक केलंय असे म्हटले असते!

मला भयंकर आवडलं ज्या पद्धतीने घेतलाय पिक्चर. पिक्चर पाहून झाल्यावर आम्ही सुन्न बसून राहिलो होतो, किती धाडस आहे या माणसाचे, असा विचार करत.. हसतखेळत घेतलाय म्हणून, पाहील्यावर विनोदी पिक्चरसारखा डोक्यातून निसटून गेलाय का?अज्जिबात नाही!!
ऑफकोर्स फाळकेंनी खूप संघर्ष केला! बायकोनी कुरबुर केली असेल! पण साथही तेव्हढीच जास्त महत्वाची आहे.
हा आक्षेप फार ठिकाणी ऐकला/वाचला म्हणून जर्रा उद्वेगाने लिहीतेय. विनोदी पद्धतीने प्रसंग घेणे म्हणजे गांभिर्य कमी करणे असे या पिक्चरमध्ये खरेच वाटतेय?? I don't think so !

>>विनोदी पद्धतीने प्रसंग घेणे म्हणजे गांभिर्य कमी करणे असे या पिक्चरमध्ये खरेच वाटतेय

हो मला तरी अगदी असेच वाटले. ह्या चित्रपटामुळे जे फाळक्यांना सोसायला लागले असेल त्याची अजिबात कल्पना येत नाही. सगळे कसे अगदी हसत हसत पार पडल्यासारखे वाटते.

वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून त्याचा आनंद जरुर घेतला मात्र मला तरी ती फाळक्यांना त्यात योग्य न्याय मिळाला आहे असे वाटत नाही.

बाकी जुन्या काळचे रेफरन्स, सर्वान्चा अभिनय, पात्रान्चि निवड, सेट्स, जुने कॅमेरे, इ कशातच खोट काढण्यासारखे नाहिये. अगदी ट्राम वगैरेसुद्धा दाखविली आहे जी जुन्या मुम्बईची जीव का प्राण होती.
बॅकग्राउंड आवाज जर कोणी नोटीस केले असतील तर "कल्हईवाल्याची हाक, बैल्गाड्यांचा - घुन्गरांचा आवाज" वगैरे गोष्टी वातावरण निर्मितीसाठी खूप चांगल्या पध्दतीने वापरले आहेत.

चित्रपट थोडा विनोदी अंगाने घेतला म्हणजे प्रवास सहजसाध्य होता त्यांचा असे म्हणणे मला तरी योग्य वाटले नाही! >>> चित्रपट थोडा विनोदी अंगाने नाही गं घेतलाय बस्के. फक्त आणि फक्त विनोदी अंगानेच घेतलाय. त्याला फाळक्यांच्या आयुष्यातील संघर्षाची थोडी तरी किनार हवी होती असं मला वाटलं. त्या साठी चित्रपट मेलोड्रमॅटिक करण्याची अजिबातच गरज नाही Happy आणि प्रवास सहजसाध्य नसणारच म्हणून तर ...

जबरी चित्रपट. आणि वेगळ्या पद्धतीने हाताळल्याबद्दल विशेष कौतुक. कदाचित त्यांचा संघर्ष, मेलोड्रामा दाखवला असता तर तो चरित्र चित्रपट बनला असता. ( स्वा. सावरकर, संत तुकाराम पठडीतला) आणि त्याला आता जो खुला प्रेक्षकवर्ग लाभला आहे तो नसता मिळाला, असं दिग्दर्शकाला वाटले असावे ज्यात चूक काहीच नाही. शब्दोच्चार सुधारावेत, पाठ असायला हवी म्हणून रोज देवापुढे बसूनच रामरक्षेची घोकंपट्टी मुलांना करायला लावण्यापेक्षा विरंगुळा म्हणून ती जर प्रत्येक श्लोकाच्या अर्थासहित गोष्टीरुपाने सांगितली तर मुलांना ती 'अवजड' न वाटता 'अर्थपूर्ण' , 'रसाळ' व सोपी वाटेल, आणि ते आपणहून ती म्हणत राहतील; असाच आधुनिक दृष्टीकोन, ज्याचं जोरदार स्वागत झालेलंच आहे! Happy
रच्याकने, चित्रपटातल्या सर्वच बालकलाकरांचं काम खूप गोsड झालंय. सगळ्यात सहज सुंदर सीन म्हणजे दादरच्या घरात प्रवेश करताक्षणीच मुलांचं तिथल्या गादीवर लोळण्याचं अप्रूप! Happy

अगदी १००% अनुमोदन. एक अप्रतिम सुरेख चित्रपट. काढू म्हणलं तरी एकही उणीव काढता येणार नाही असा. दुर्मिळ अनुभव.. Happy

मी पण पाहीला हा सिनेमा... खुपच छान आहे...
मला सगळ्यात जास्त आवडलेला सीन ::
फाळके जेवण तयार करतात्..आणी त्यांची मुले जेवण करायला नकार देतात.
जेव्हा ते स्वतः १ घास घेतात तेव्हा अशक्य आहे हे जेवण!!!!! असे बोलतात..
मी आणी माझे मिस्टर खुप मोठ्याने हसत होतो... Lol

चित्रपट खूपच सुन्दर
शाम म्हणतो त्याप्रमाणे अख्खा सिनेमा संपेपर्यंत बसल्या जागेला माणुस खिळुन राहिलेला.
घरी आलो तरी चित्रपट मनात रेन्गाळतच होता
अतिशय छान

ज्यांनी पाहिलेला नाहीये अजुन, त्यांनी जरुर पहा!
निखळ करमणुक आजकाल महाग होत चालली आहे. Happy

सर्वांची मते वाचली आणि पटली बरीच! आभारी आहे सर्वांचा!

माझे अनुमोदन चिनुक्सला आहे इथे!!
त्यांचा प्रवास प्रचंड खडतर झाला असेल, यात वादच नाही! पण त्यांचा तो सारा प्रवास जसाच्या तसा मांडायचा असता, तर दिग्दर्शकाने सिनेमाचं नावच मुळी "भारतीय सिनेमाचे जनक" वगैरे भारदस्त काहीतरी दिलं असतं.. असं मलाही वाटलं..

सर्वांपर्यंत त्यांची कथा पोहोचावी या हेतुने ती हलकीफुलकी केली असावी.
अगदी म्हणायचंच झालं तर मग त्या काळी एखादा भारतीय इतक्या सहज इंग्लंडला कसा गेला असेल? तिथे जाउनही पोलिसांनी निष्कारण चौकशीस पकडुन त्रास दिला नसेल का? वर्णद्वेष, जो अजुनही कित्येक ठिकाणी असतो, तोही झाला असेलच! तो 'स्त्री नटी मिळवायचा' प्रसंग! किती अवघड झालं असेल सारं!
"माणुस घरातली प्रत्येक गोष्ट विकतोय आणि बायको त्याला आपले दागिने काढुन देते! " हा प्रसंग तसा अतिरंजितच!

.....पण हे सारे प्रश्न मला तेव्हा पडले नाहीत. कारण हा विचार न करताही सारं सुरळित चालु होतं.

बाकी, ..... "हे खाणं अशक्य आहे" कडक होता. मनापासुन बोलतो जादुगार केळफा Wink
आशुडी ने म्हटल्याप्रमाणे, "लहान मुले गादीवर लोळण्याचा सीन! "
नकळत तोंडातुन वाहवा निघाली तेव्हा!
अजुन एक म्हणजे, लहान भाऊ मोठ्याच्या पाठीवर बसलेला असतो. मोठा त्याला लाथेने पाठीवर मारत असतो, आणि लहान त्याला आपल्या वजनाने दाबत असतो. किती सुरेख, नैसर्गिक प्रसंग आहेत! Happy

मागच्या विसेक वर्षातले शेकडो चित्रपट ओवाळुन टाकता येतील या चित्रीत केलेल्या क्षणांपुढे!

मला आवडला. जसा आहे तसाच. संघर्ष, कष्ट, रडारड वगैरे दाखवायला गेले असते तर तो boring झाला असता! आहे त्यातच तसं थोडसं दाखवलं असतं तरी ते विचित्र झालं असतं.

मला पण आवडला हा सिनेमा . आधी वाटलं गंभीर, चरित्रत्मक असेल, पण इतका हलका फुलका, आणि विनोदी अंगाने घेताल्यामुळे जास्त छान वाटला.
मेन्टल हॉस्पिटल मधे मित्र घेऊन जातात तेव्हा, "कपाटाचं कळलं" वाला प्रसंग , शेजारच्या आजींचे बहुतेक डायलॉग्ज, फाळक्यांना वेश्यावस्तीत पाहून लगबगीने घरी बातमी द्यायला आलेल्या माणसाला फाळक्यांची बायको काही बोलू न देता "माहितेय माहितेय" असे म्हणते , स्त्री पार्टी नटांना दिलेली "प्रॅक्टिस", असे बरेच प्रसंग अगदी खुसखुशीत झालेयत ! Happy

मलापण आवडला हा चित्रपट खूप!
चित्रपट पाहिल्यावर पहिल्यांदाच "पहिल्या माणसाला" काय दिव्यातून जावं लागलं असेल ह्याचा विचार केला (नाहीतर आपण गोष्टी किती गृहित धरतो!)
बस्के ला अनुमोदन!!

मलाही खुप आवडला हा सिनेमा.
आणि विनोदी ढंगाबद्द्ल एक असही वाट्लं की समजा तुम्ही तुमच्या आवडिची गोष्ट करत असाल आणि तुमच्या Passion साठी तुम्ही काम करत असाल तर ते Struggle पण एवढं हलकं फुलकं होऊन जात असेल. (direction point)
बाकी सिनेमा मस्तच.

मागल्या महिन्यातच बघितला होता, पण लिहिण्याच्या चालढकलीमुळे राहूनच गेले होते. आता हा बीबी चालू केल्याबद्दल धन्यवाद. (रुयाम हा बीबी 'चित्रपट' ग्रुपमध्ये पण टाका की.)

अगो आणि इतरांनी व्यक्त केलेले मत आणखी अनेकांनी व्यक्त केले आहे. परेश मोकाशीच्या एका मुलाखतीतही त्याला हे विचारले गेले होते. तेव्हा म्हणाला होता, 'अर्थातच फाळकेंचा प्रवास एवढा सोपा नव्हताच. अनेक कटकटी, आर्थिक, तांत्रिक, कौटूंबिक वगैरे अडचणींनी भरलेला होता. पण त्यांचे चरित्र वाचत असताना मला त्यांच्या स्वभावात सदैव मिस्कीलपणाची एक झाक मला आढळली. प्रत्येक गोष्ट हलकेच घेण्याची त्यांच्या सवयीमूळेच हा कठीण प्रवास त्यांनी पार केला. त्यांच्या या मिश्किलीलाच मी चित्रपटाचा 'प्लॅटफॉर्म' बनविण्याचे ठरवले. हे एकदा ठरवले, म्हटल्यावर त्याशी प्रामाणिक राहणे भाग होते. संपूर्ण चित्रपटच त्या अंगाने जाताना आज आपल्याला जो दिसतो तो यामुळेच..'

पुढे परेश असेही म्हणाला, की एखादा प्रसंग वेगवेगळ्या पद्धतीने मांडून, शूट करून एडिटिंग करताना वेगवेगळी काँबिनेशन्स वापरून, नंतर एकूणात-संपूर्ण चित्रपट पुन्हा बघताना तो विशिष्ट प्रसंग कसा वाटतो, भावतो- यावरही भरपूर काम केले. भरपूर विचारांती 'मिश्किली' हा पोत सोडायचा नाही, तसाच शेवटापर्यंत कंटिन्यू करायचा असे ठरवले. आज या चित्रपटाचा थोडा अनपेक्षित, अचानक वाटेल, असा जो शेवट आपण बघतो- ते यामुळेच. फाळके ब्रँण्डची खेळणी वगैरे. उथळ, अव्यावहारिक वाटणारा हा माणूस शेवटी एक ब्रॅड म्हणून जनमाणसाच्या गळी उतरला, हे अतिशय छान पण सहज पद्धतीने परेशने या शेवटच्या प्रसंगातून दाखवले.

थोडक्यात बस्के, लालू वगैरे म्हणाताहेत, तसंच थोडंसं. घरातल्या वस्तू विकणे, डोळे जाणे, अपत्य झाल्याची खबरही नसणं, चित्रपट थेटरात लावल्यावर कुणीच न फिरकणं या सर्व गोष्टींवर प्रचंड मेलोड्रामा करता आला असता. तो फाळकेंनी टाळला, म्हणून परेशनेही टाळला असावा.

इतक्या नर्मविनोदी पद्धतीने या महान माणसाचं आयुष्य मांडणं हे फार अवघड काम होतं, ते परेशने पेललं, असं वाटतं.

बाकी त्याकाळची भाषा-उच्चार, सेट्स, काही प्रसंग ओलांडल्यासारखे वाटणे, चित्रपट निर्मितीची तांत्रिक अंगे फारशी न दाखवणे इत्यादी खटकलेच. परंतू तो पर्यंत बघण्याचा फोकस या सर्व गोष्टींवरून शिफ्ट होऊन फक्त 'फाळाके' या व्यक्तीभोवतीच केंद्रित झाला होता.

बाकी- 'तिकडे जाऊन बेशूद्ध पड', 'अहो काय विकताय, ते तरी सांगा', 'हे खाणं अशक्य आहे', 'औषधाची बाटली रस्त्यातच फुटली', तारामती निवडण्याचे आणि इतर अनेक प्रसंग खरेच मजा आणतात.

अप्रतिम सिनेमा. Happy

हो ना! त्यांचा मित्र त्र्यंबकेश्वराहून येतो तेव्हा तो शंकर 'कैलासावर' काय बसलेला - वर आशीर्वाद देतोय, एक स्त्रीपात्र बिडी फुकतंय, आणि दुसरं उंबर्‍यावर अंग झोकून.... मी इतकी जोरजोरात हसत होते की माझ्याशेजारच्या, आजूबाजूच्या सीट्सवर बसलेले तमाम प्रेक्षक शेवटी टवकारून माझ्याकडे पहायला लागले!!! Lol

त्या आजींचे डायलॉग्ज पण सह्ही झालेत! नंतर कळाले की त्या माझ्या काकूला औरंगाबाद येथे शाळेत शिकवायच्या.

मुलांची कामे तर गोंडस.... फाळक्यांची दृष्टी अधू होते/ जाते तेव्हा त्यांचा थोरला मुलगा त्यांची ज्या प्रकारे समजूत घालून त्यांना घरी घेऊन जातो तो प्रसंग हृद्य आहे.
हास्य - विनोदाची झालर असली तरी त्यातून फाळक्यांना घ्यायला लागलेल्या कष्टांची, सोसायला लागलेल्या हालअपेष्टांची जाणीव होतच राहाते. मधे कुठंतरी वाचलं की फाळक्यांचा स्वभाव मुळात गमत्या होता म्हणे! तसं जर असेल तर त्यांनी आपल्या भवतालचं वातावरण तसेच ठेवण्याचा प्रयत्न केला असणार.... जे चित्रपटात दिसते. फाळके ज्या प्रसंगात नाहीत ( उदा. लेकीच्या वेळचे बाळंतपण, रोहिदासाची गोष्ट, ते घरी उशीरा पर्यंत येत नाहीत व मोठ्या मुलाचा पत्ता नाही तेव्हा त्यांच्या पत्नीने धाकट्यास बडविणे) अशा अनेक प्रसंगात कोठेही मेलोड्रामा न करता गांभिर्याची झलक दिसते. पण त्या प्रसंगांना कोठेही गडद केले नाही हे विशेष!

Pages