भेसूर प्रार्थना

Submitted by रानभुली on 22 November, 2026 - 09:03

दुपारच्या रखरखीत उन्हात जेव्हा गावच्या नाल्याची शुष्क कातडी तडकत असे, तेव्हा हरियाच्या ओसरीवरची चिलीम हळूहळू विझत चाललेली असायची.
राखेचा एक पातळ, धूसर थर त्या चिलमीच्या तोंडावर साचायचा.
हरियाच्या उरल्यासुरल्या देहभानावर साचला होता, तसाच . ती राख वारा आला की उडायची नाही, तिथेच चिकटून राहायची,. काळोखाचा एक मूक, आरसपानी लेप त्या दगडी चिलमीवर फासला गेला होता.

हरियाच्या कपाळावरच्या सुरकुत्या, पांढरट दाढी आणि वाकलेला पाठीचा कणा त्याचं वय काहीही सांगत असलं तरी ते कालमहिमा म्हणून होतं कि त्याचे भोग होते हे नवीन माणसाला कळणारं नव्हतं. तरुणपणी ज्या हातांनी नांगर धरला होता, त्या हातांच्या नसा आता निळ्या, फुगलेल्या दोऱ्यांसारख्या त्वचेखाली उठून दिसायच्या. तरीही, जगण्याच्या ओझ्यापेक्षा शरीराची आदिम, अनाकलनीय भूक त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

तो कधी कधी लोकांकडे पडेल ते काम करताना दिसायचा.
कधी कधी ओसरीवर तासन तास चिलीम ओढताना दिसायचा. त्याला वाटलं तर असा कारभार होता. कधी कधी येणार्‍या जाणार्‍या किंवा आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करत रहायचं हाच त्याचा दिनक्रम असे.

अंगणात आडाचा डोह होता. वरून पाहिल्यावर आत नुसता अंधार दिसायचा.
पहाटे पहाटे पाणी उपसायचं काम मात्र हरिया न चुकता करायचा. ती त्याची अंगवळणी पडलेली सवय होती.
त्यात दोर सोडला कि तळ दिसायचा नाही.
धप्प असा आवाज आला कि मग पाणी उपसायला सुरूवात व्हायची.
त्याच्या मनात खोलवर रूतलेल्या स्मृतींच्या पटलावर जेव्हा भूतकाळ उलगडायचा, तेव्हा आभाळाला एक विचित्र, कृष्णांबूस झाक यायची. जेव्हां पाणी काढून व्हायचं तेव्हां सोनसळी किरणांनी आडाच्या बाहेर सांडलेलं पाणी झळाळून उठायचं. त्या क्षणी हरियाच्या आयुष्यातले सुवर्णक्षण त्याच्यासाठी संधी घेऊन आलेले असत,

पण हरिया !!!

तो घरात पाण्याची भांडी भरून ठेवण्यात मग्न असे.
न जाणो आज काही खायला नाही मिळालं तर पाणी तरी होईल पोट भरायला.
ते झालं कि तो कामावर जायचा. नाही गेला कि ओसरीवर चिलीम ओढत बसायचा.

येणारे जाणारे त्याच्याकडे लक्ष देत नसत. पण तो त्यांना न्याहाळत असे कि शून्यात नजर लावत असे हे समजायचं नाही. पण त्या शून्यात चिलीमीच्या धूराचा पडदा वेगवेगळे आकार दर्शवत असे. त्यात त्याला त्याच्या आयुष्याचा चित्रपट दिसायचा.

मुलीच्या लग्नासाठी सावकाराच्या कर्जखतावर जेव्हा हरियाने अंगठा उमटवला, तेव्हा कागदावर शाईचा एक काळा ठिपका उमटला होता की त्याच्या आयुष्याच्या पानावर एक भोक पडलं होतं, हे त्याला तेव्हा कळलं नव्हतं.

दुष्काळाच्या त्या सलग दोन वर्षांत पेरणीचा दाणा जमिनीत रुजण्याआधीच सुकून गेला होता. सावकाराने हसून, पण डोळ्यांत एक थंडगार, काचरी धार ठेवून म्हटलं होतं, *हरिया, देवाची माया आकाशात , पण गावावर माझी माया आहे ! देवाशी तू भांडशील, पण या कागदाशी भांडण करता येणार नाही."

एका सकाळी शेताच्या बांधावर हरिया उभा होता. ऊन अजून कोवळं होतं ,
पण जमिनीवरून एक उष्ण, वाळलेली वाफ वर येत होती. शेताच्या कडेला असलेली ती जुनी, वाकलेली चिंच अचानक हरियाला एखाद्या म्हाताऱ्या, थकलेल्या माणसासारखी वाटली. तिथल्या काळ्या मातीचा शेवटचा कण त्याने मुठीत घेतला. तो कण हातातून निसटून खाली पडला, आणि तेव्हाच त्याला काही तरी परकेपणाची जाणीव झाली. लग्न तर थाटात पार पडलं होतं. लेक आनंदात असेल या समाधानात तो होता.

पण त्याला कुठेतरी जाणवत होतं की या मातीचा आत्मा गहाण पडला आहे. पावलांखालची जमीन अचानक मऊ, दलदलीसारखी वाटू लागली. जणू काही ती त्याला आत ओढून घेत आहे, पण गिळायला मात्र तयार नाही.

सशाची वारूळं असलेली जागा त्याने न पेरता ठेवून दिली होती. एक ससा बाहेर येऊन अन्न शोधत होता. अचानक त्याच्यावर सावली पडली आणि आकाशातून शिकारी खाली झेपावला. क्षणात तो कापसाचा गोळा दिसेनासा झाला. हरिया बघत होता.

दोन वर्षे दुष्काळाने कहर केला. पाण्याचा टिपूस नव्हता.
जमीन गेल्यानंतर काही महिने उलटले. गरिबी आणि हताशा हळूहळू घराच्या भिंतींना पोखरत गेली. घरी खायलाही असायचं नसायचं. बायकोने काही काळ शेजारी पाजारी, नातेवाईकांकडून उसनवार केली. पण असं किती दिवस चालणार? मुलाचं शिक्षण अर्धवट होतं.

तिने हे सगळं मुकाट्याने सहन केलं, पण जेव्हा पोटाची खळगी भरणंही अशक्य झालं आणि गावात हरियाच्या नावाने कुजबुज सुरू झाली, तेव्हा तिने त्याला कामं मिळवण्याची तंबी दिली. गावात कुणाकडेच काम नव्हतं. पण जमीन होती. पोटापुरतं होत होतं.

हरिया डोंगरावरच्या रानात जाऊन लाकडं तोडून आणायला लागला. बाजारच्या गावाला जाऊन वखारीत लाकडं घातली कि थोडेफार पैसे मिळायचे. पण दोन दिवस चांगले गेले कि पुन्हा कुटुंबाची तोंडं आ वासून पुढ्यात दिसायची. रोज रोज बेसुमार लाकूडतोड करून पण चालणार नव्हती. कुणी न कुणी हटकलंच असतं. गावात पण काम नव्हतं.

हरिया गावाच्या वेशीवर हरितीदेवीच्या छोट्या देवळात बसला होता. देवळाला छाया देणारं झाड सुकत चाललं होतं.
देवीला इतक्यात कुणी दिवा बत्ती केली नव्हती. ना तिला कुणी कुंकू लावलं होतं. लुगडं नेसवायची गोष्टच वेगळी. हरियाच्या मनात देवीची सेवा करावी असं आलं. त्याने आजूबाजूला पाहिलं. कुठेच फडकं नव्हतं. त्याने सावकाश झाडाची पानं तोडली. देवीच्या चेहर्यावरची धूळ पुसली. वाळलेल्या पाचोळ्याचा झाडू करून परिसर स्वच्छ केला. कुंकवाचा करंडा नव्हताच. देवीला लुगडं नेसवायचा विचार मनात आला. मग बायको डोळ्यासमोर आली. इरकल घेतलं होत त्याला किती वर्षे उलटून गेली होती. साधं धडकं लुगडंही घेता आलं नव्हतं.

तो मनाशी म्हणाला "देवीला लुगडं नेसवणं बाप्याचं काम नाही. बाया माणसाला सांगायला पाहिजे."
गावाची अवस्था पण देवीच्या देवळासारखीच झाली होती.

***********

बाभळीवर घुबड आलं होतं. बघायला पोरं पळत होती आणि त्यांच्या मागं त्यांच्या आया त्यांना दापायला पळत होत्या. घुबड भेदरलेलं होतं. आकाश काळंभोर झालं होतं. लाखोंच्या संख्येने टोळ आकाशात भिरभिरत होते. दहा मैलांवर नदीला पाणी आलं होतं. पीक डोलत असणार. हरियाला वाटलं तिकडं काम मिळंल. पण टोळधाडीनं आता आशा मावळली होती.

दिवस चालले होते.
हल्ली गावात काही हालचाल चालू होती. हरियाचा विठ्ठल आता तरूण झाला होता. गावात काय चाललंय याची कुणकुण त्याला होती. आवाज फुटलेली मुलं आता दिवसेंदिवस थव्याने बसत होती. जे करू नये अशा कामाचं खूळ गावात सुरू झालं होतं. कुणालाच काही वाटत नव्हतं. पैसे येत होते. काही दिवसातच थोड्या मोठ्या मुलांकडं गाड्या आल्या. दोन नंबरचा धंदा सुरू झाला होता. त्याला ते काम म्हणत होते. दोन वर्षात गावात आलिशान घरं उभी राहिली. गावात पहिल्यांदा बॅंक आली. मागोमाग चैनीच्या वस्तूंची दुकानं उभी रहायला लागली. हॉस्पिटल सुरू झालं. पक्के रस्ते आले. गावचा विकास होऊ लागला. काही महिन्यात एक पोलीस चौकी पण आली. गावाचं नाव देशात खराब होऊ लागलं.

विठ्ठलला गावाचं नाव सांगितल्यामुळं एक दोन ठिकाणी काम द्यायला नकार मिळाला होता. त्याचं रक्त खवळलं होतं. त्याने पोलीस चौकीत जाऊन बेकायदेशीर धंद्यात सामील असलेल्या मुलांची नावं सांगितली. पोलिसांनी त्याला हाकलून दिलं.

हरिया विठ्ठलला समजावून सांगत होता. आपण पंगे घेऊ नयेत. एक दिवस ओढ्याला लागून असलेल्या बाभळीत एका तरूणाचं मृत शरीर सापडलं. त्याचं शीर नव्हतं. पण कपडे सांगत होते... तो विठ्ठल होता.
हरियाने आक्रोश केला.
शीर शोधण्यसाठी जंग जंग पछाडलं होतं.

हरियाच्या बायकोचे अश्रू आटले होते. नवर्‍याच्या नाकर्तेपणाला तिने सांभाळून घेतलं होतं. पण मुलाला न्याय देण्याचीही धमक त्याच्यात नाही हे तिला दिसत होतं.
तिची अवस्था एखाद्या प्रेतासारखी झाली होती. हरियाबद्दल कुठलाही संताप व्यक्त न करताही तिच्या थंड नजरेतून अंगार व्यक्त होत होता.

हरियाला तिच्या नजरेला नजर द्यायची हिंमत होत नव्हती. एके दिवशी पहाटेच आपलं लहानसं गाठोडं तिने उचललं. ती दाराशी थांबली. तिची नजर हरियाच्या चेहऱ्यावर स्थिरावली. ती नजर तिरस्काराची नव्हती. संपूर्ण पीक जळालेल्या शेताकडे पाहणाऱ्या शेतकर्याची नजर होती.

नजरेतूनच तिने निरोप घेतला. हरियाची तिला अडवण्याची हिंमत झाली नाही. उलट आता तिच्या नजरेतून त्याला जाणवणारा अपराधबोध आयुष्यभर झेलावा लागणार नाही हाच त्याला दिलासा वाटला.

ती निघून गेली. तिची पावलं वेशीबाहेर पडली, आणि घरातील भिंती अधिकच उंच आणि रिकाम्या झाल्यासारख्या वाटल्या. त्या भिंतींवरची सावली हळूहळू लांबत गेली आणि एखाद्या काळ्या सापासारखी हरियाच्या पायाशी येऊन स्थिरावली.

चिलीमीचा धूर विरला. चित्रपट विस्कळीत झाला. जणू फिल्म संपल्यावर रीळांचे आकडे वेडेवाकडे दिसावेत तसे.
सकाळची उन्हं आता वर आली होती. चटके बसत होते.

मुलाचं शीर नसलेलं धड त्याच्या आठवणीतून जात नव्हतं. हरियाच्या आतला झराच आटून गेला.जगण्याची इच्छा संपली, तरी शरीराच्या आदिम, अनाकलनीय भूका त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या.

गोदा त्याच्या घरावरून चालली होती. हरियाची नजर तिच्यावर खिळली होती. तिला ती नजर मागूनही जाळत होती. पण सवयीनं तिने दुर्लक्ष केलं. पदर सारखा केला आणि केस मागे सोडले. थोड्या वेळानं समोरच्या घरातून नगमा बाहेर आली. कुरडया वाळत घातल्या आणि कोंबड्यांना दाणे टाकले. हरिया तिच्या हालचालींकडे बघत होता. ते सहेतुक कि निर्हेतुक हे नगमाला ठरवता येत नव्हतं. तिने कबूतरांचं खुराडं सोडलं. त्याच क्षणी जमिनीवर तिला सावली दिसली.

आकाशातला शिकारी घिरट्या घालता घालता निघून गेला. तिने ओसरीकडे पाहिलं. ती रिकामी होती.

******

गावच्या विहिरीवर सकाळ संध्याकाळ पाण्याचा खळखळाट सुरू असायचा. घागरी भरताना बायकांच्या हातांतल्या बांगड्यांचा किणकिणाट हवेत तरंगायचा. हरिया तिथे असायचा. कधी झाडाच्या सावलीत, कधी भिंतीच्या कोपऱ्यात. तो बायकांकडे पाहायचा. ती नजर अश्लील नव्हती. हिंसक सुद्धा नव्हती तीत एक विचित्र, थंडगार, आरपारची उत्सुकता होती. जणू काही तो स्वतःच्या हरवलेल्या देहभानाची साक्ष त्या स्त्रियांच्या हालचालींतून शोधत असायचा. एखाद्या बाईच्या पदराचा किनारा वाऱ्यावर फडफडताना पाहून त्याच्या आत काहीतरी हलल्यासारखं वाटायचं. पण ते हलणं आनंदाचं नसायचं. ती एका मृत पाण्यावर पडणाऱ्या क्षीण तरंगासारखी असायची.
लोक हरियाबद्दल काहीबाही बोलत होते. त्याची नजर चांगली नाही अशी चर्चा सुरू झाली होती.

गावावर भिरभिरणार्‍या घारींची संख्या वाढत होती. त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नव्हतं.
सावकाराकडे दुष्काळात आलेल्या जमिनीवर बाहेरून शेतमजूर येऊन काम करत होते. शेतकर्यांची मुलं आता बेकायदेशीर धंद्यात रुळली होती. त्यामागे कोण होतं हे सर्वांना महिती होतं. कुणी त्याबद्दल बोलत नव्हतं.

गावकरी आपापल्या कामात गर्क असायचे. कुणी जाता येता हरियाला टोचून जायचं, कुणी हसून टिंगल उडवायचं.

विहिरीवर घागर बाजूला ठेवून एक बाई कमरेवर हात ठेवून उभी राहिली. तिच्या पदराचा किनारा पाण्यावर भिजलेला होता, आणि त्या ओल्या कापडाचा एक जड, लालभडक रंग तिथे पसरला होता.

"काय काका, आज कोणाची सावली धरलीय ?" ती बाई पदर सावरत, हसून टोचून म्हणाली. " घरचं गेलं, संसार गेला... तरी हे डोळे अजून जुन्याच वळणावर रेंगाळतायत का? वयाचं तरी भान ठेवा."

त्यांच्या शेजारची दुसरी बाई घागर उचलत म्हणाली, "अगं जाऊ दे गं, उरलंय काय याच्याकडे? फक्त एक रिकामी नजर आणि मेलेलं खोड "

त्यांचे शब्द एखाद्या बोथट, गंजलेल्या सुरीसारखे हरियाच्या अंगावर ओरखडे उमटवायचे, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र एक निर्विकार शांतता पसरलेली असायची.

कधी कधी, जेव्हा संध्याकाळच्या त्या हळव्या किरमिजी रंगात मुलाची आठवण दाटून यायची, तेव्हा हरिया गाव सोडून बाहेरच्या टेकडीवर निघून जायचा.

टेकडी चढून आल्याचे श्रम झाले कि तो एका भग्न मंदीराला टेकून बसायचा. तिथली मूर्तीही भग्न होती.बुद्धाची. फक्त शीर होतं.
धड कुठे गाडलं गेलं होतं, की काळानेच गिळलं होतं, कुणास ठाऊक. त्या दगडी शिरावर काळाच्या अनेक काळ्या छटा साचल्या होत्या. मावळत्या सूर्याची तिरपी, रक्ताळलेली किरणं जेव्हा त्या शिरावर पडायची, तेव्हा ते दगडी मुखवटे जिवंत झाल्यासारखं वाटायचं. त्या दगडी डोळ्यांतून, त्या मिटलेल्या ओठांवरून एक अथांग, निर्विकार शांतता पाझरायची . एक नि:शब्द शांतता एका अनोळखी केसाळ प्राण्यासारखी लाल माणकाच्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत असायची.

हरिया त्या शिरासमोर बसायचा. कधी कधी ती शांतता त्याला इतकी असह्य व्हायची की त्याच्या छातीत तीव्र कळ उठायची.

"इतका शांत कसा रे तू?" त्या मुतीच्या शिराशी तो बोलायचा.
पण तो एक निर्जीव दगड होता. तो काहीही उत्तर देऊ शकत नव्हता.

त्याला त्या मूर्तीवर रागवायचं असायचं, ओरडायचं असायचं, त्या दगडी शिरावर डोकं आपटून घ्यायचं असायचं. पण त्याच्या गळ्यातून शब्दच फुटायचे नाहीत. रागवण्याची क्षमताच जणू त्याच्या आत गोठून गेली होती. तो फक्त तिथे बसून राहायचा. वाऱ्याची झुळूक आली की दगडावरची धूळ उडायची, आणि हरियाच्या डोळ्यांतून एखादा थेंब निसटायचा, जो जमिनीवर पडण्याआधीच वाळून जायचा.

आता तो टेकडीवरून येताना रिकाम्या बाटलीत ओढ्यातून पांणी भरून आणायला लागला होता. येताना वाट वाकडी करून तो हरिती देवीच्या मूर्तीला त्या पाण्यानं अभिषेक करायचा. त्याच्या बुद्धीला जी काही वेडीवाकडी समज असेल त्याप्रमाणे तो करत होता. उरलेलं पाणी झाडाच्या मुळाशी ओतून देत असे. रात्री या झाडाजवळ जायचं नाही याचा त्याला विसर पडला होता. तसंही त्याला भान नव्हतंच.

एक दिवस दुपारी, गावच्या पाराजवळ हरिया एका तरुण बाईकडे पाहत उभा होता. त्या बाईच्या घागरीतून सांडलेलं पाणी दुपारच्या उन्हात चमकत होतं. हरियाची नजर तिच्याकडे वळली. तीत भूक होती, पण तरीही एक प्रकारची थंड, निर्जीव अलिप्तता होती. तिने आरडा ओरडा केला.

गावगुंडांना तेवढंच निमित्त पुरेसं होतं. ते पारावरून उठले आणि हरियावर तुटून पडले. लाथा-बुक्क्यांचा मार बसला. धूळ, घाम आणि रक्ताने माखून हरिया जमिनीवर कोसळला. त्याने पाहिलं. त्याच्या मुलाला अशीच लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली होती पोलीसांसमोर. हेच चेहरे होते, नाही का?

"म्हातारा झालास तरी अक्कल आली नाही " एकजण थुंकून म्हणाला. "बायकांकडे नजर टाकतोस , जीव प्यारा आहे की नाही?"

रात्री सावकाराने त्याला वाड्यावर बोलावलं. वाड्याच्या मोठ्या, लाकडी दाराआड एक तेलाचा दिवा मंद तेवत होता. त्या मंद प्रकाशात सावकाराचा चेहरा अधिकच कठोर आणि दगडी दिसत होता. अंगणात घुबड बसलं होतं. ती मघाची बाई पदराने तोंड लपवत बाहेर पडली. सावकारानं त्याला धमकी दिली.

हरिया मेलेल्या नजरेने खुरडत खुरडत घरी परतला.
अंग ठणकत होतं. त्याला लेप लावता येत होता. पण मनाच्या वेदना थांबत नव्हत्या.
त्याच्या आतलं रिकामेपण आभाळाहून मोठं होऊन त्याला छ्ळत होतं. त्या रात्री तो आपल्या झोपडीत पडला, पण झोपेतही त्याला एक जड, काळ्या पाण्यासारखा दाब जाणवत होता. अंधारात त्याला भिंतीवर हरितीदेवीच्या देवळाजवळचं झाड दिसत होतं. एक घुबड त्या अर बसायचा प्रयत्न करत होतं पण पुन्हा पुन्हा बाहेर फेकलं जात होतं. हारियाची शुद्ध हरपत चालली होती.

*********************

हरिया अंधारात चालत चालत एका अनोळखी गावात पोहोचला होता.

हे गाव त्याच्या गावासारखं नव्हतं. इथे आकाशाला एक विचित्र, तपकिरी झाक होती. वारा एक भयाण गाणं गात होता. तंबाखूसारखा उग्र वास वाताव्रणात भरून राहिला होता. कुणीतरी दबक्या आवाजात रडतंय अशा आवाजात एक प्रार्थना कणाकणातून ऐकू येत होती . तिचा भेसूर नाद भरून राहिला होता. हरिया हळूहळू गावाच्या मधोमध आला. तिथे एक चर्च होतं. त्यावरचा क्रॉस निखळून उलटा लटकलेला होता.
चर्चच्या आजूबाजूला बर्फाळ हवा होती. त्या बर्फाचा एक थंड पदर त्या दृश्याला कवेत घेत होता.

त्याचे पाय मागे सरकले.
तिथून एक गल्ली जात होती. पाऊल टाकावं तसं ती आत आत ओढून घेत होती.
तिथे फक्त चिकन आणि मटणाची दुकाने होती. एक नाही, दोन नाही , सगळ्या गल्ल्यांमध्ये, चौकांमध्ये फक्त तीच दुकाने. त्याच्या पायात धावायचंही बळ नव्हतं. तरी तो पळत सुटला. हजारो गल्ल्या एकमेकांत मिसळत होत्या. संपूर्ण गावात फक्त चिकन आणि मटणाचीच दुकानं होती.

दुकानांच्या बाहेर लाकडी ठोकळे होते. त्यांवर एकामागून एक कोंबड्यांच्या माना कापल्या जात होत्या. पंखांची निशब्द फडफड, उडणारे रक्तबिंदू, आणि जमिनीवर साचणारा लालेलाल ओलावा. दुसऱ्या बाजूला बकरे कापले जात होते. त्यांच्या डोळ्यांतली ती क्षणभराची धडपड, आणि मग शांत होणारा देह. कापणारे हात वेगाने चाललेले होते, सुऱ्या चमकत होत्या, पण त्या गावात एकही आवाज नव्हता, ना कोंबड्यांचा केकाटण्याचा, ना बकऱ्यांच्या ओरडण्याचा, ना कुणाच्या किंकाळीचा. सगळं काही एका भयानक, निशब्द नाटकासारखं सुरू होतं.

हरियाने नजर फिरवली.

दुकानांमध्ये कोण होतं? हातात सुऱ्या घेऊन कोण होतं ? काही समजत नव्हतं. पण मांसाचा आणि रक्ताचा चिखल झाला होता.
त्या गावात कुणीही ग्राहक नव्हता. रस्ते ओसाड होते. एकही माणूस नव्हता. सगळा बळी, सगळं रक्त, सगळा मांसबाजार मांडलेला होता. पण गिऱ्हाईकच कुणी नव्हतं. तो इथे कसा आला? हे कुणासाठी होतं?

हरियाने हे पाहिलं आणि त्याच्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं झालं. आधी त्याला आश्चर्य वाटलं, मग एक विचित्र, अनाकलनीय भावना त्याच्या आत उफाळून आली. आणि अचानक तो जोरजोरात हसू लागला.

त्याचं हसणं त्या ओसाड गावात घुमू लागलं. तो हसत होता, हसत होता. इतका की त्याच्या डोळ्यांतून पाणी आलं, पोट दुखायला लागलं. का हसतोय, हे त्याला स्वतःलाही कळत नव्हतं. कदाचित त्या निरर्थक रक्ताचा, त्या गिऱ्हाईक नसलेल्या बाजाराचा त्याला अर्थ लागला होता.
आणि एकाएकी दृश्यं बदललं.

त्या सर्व कोंबड्या बकर्यांच्या मुंडक्याच्या जागी बुद्धाचं शीर दिसू लागलं. शीरंच शीर,
शांत एकदम शांत.

त्या मुक्या जनावरांच्या धडाच्या जागी त्याला मग जे काही दिसलं, त्यापासून तो पळत होता. ते त्याला नको होतं. ते पुसायचा त्याने प्रयत्न केला होता. रात्रीच्या अंधारात काळे ठिपके आकाशात घिरट्या घालू लागले होते.
*******************

त्याने डोळे उघडले तेव्हां सणकून ताप भरला होता. कदाचित दोन दिवस झाले असतील. कदाचित जास्त. पोटात काही नव्हतं.
ते स्वप्न होतं का?
कि खरंच तो कुठे गेला खरंच?
स्वप्न असेल तर ते संपलं का?
या प्रश्नांना उत्तरं नव्हती.

घराच्या भिंती पडायला आल्या होत्या. घर कसलं झोपडंच ते.
तो बाहेर आला. गावात पाऊल टाकताच त्याला एक विचित्र, थंडगार पोकळी जाणवली. तो गावाला दिसत नव्हता कि त्याला गावातलं कुणी दिसत नव्हतं हे समजत नव्हतं.

तो निरूद्देशपणे चालत राहिला.
कधी टेकडीवर पोहोचला ते समजलंच नाही.
***************************

गावात हरिया गायब होण्याची आणि हरितीदेवीचा कोप होण्याची अशा दोन्ही बातम्यांचा संबंध लावण्याची स्पर्धा भरली होती. एक विचित्र रोगाची साथ आली होती. सणकून ताप भरत होता. रक्ताच्या उलट्या होत होत्या. हॉस्पिटल गावातल्या पेशंटसनी भरलं होतं. कुणी तरी हरियाच्या गायब होण्याची खबर पोलिसात दिली होती.

अखेर गावाच्या बाहेर एकदाचे पोलीस पोहोचले तेव्हां तिथे एक शीर नसलेलं धड होतं ते बुद्धाच्या शीराला चिकटलं होतं.
अंगावरचे कपडे जीर्ण होऊन गेले होते. मांस झडून गेलं होतं. दुर्गंधी सुटली होती.

तो हरिया आहे हे कुणालाही ठामपणे सांगता येत नव्हतं.
सांगायला गावात कुणीच शिल्लक नव्हतं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंगावर आली.
जी ए कुलकर्णी आठवले.

जबरदस्त कथा..!

कथा वाचताना जी.ए. च्या लेखनाची आठवण येत होती. प्रत्येक वाक्य वाचताना गूढ वाटत होतं. हरियाचं खूप वाईट वाटलं. त्यांचं आयुष्य म्हणजे एक गूढ शोकांतिका आहे. एखाद्याचं नाव कानफट्या पडलं की त्याला समाजाकडून आयुष्यभर टक्के- टोणपे खावे लागतात. त्याच्या मुलाच्या बाबतीत खूप दुःखद घडलं. एवढ्या भीषणतेने तर पशू सुद्धा हल्ला करत नाहीत. पण गावचं राजकारण अतिशय सुडबुद्धीने, हेव्यादाव्यांनी चालतं असं बऱ्याच बातम्यातून दिसून येतं. माणसं जरी त्याच्या बाजूने नसली तरी निसर्ग त्याच्या बाजूने होता. छान लिहिलीस कथा..!

पुढच्या कथेला शुभेच्छा..!

जबरदस्त...
अंगावर आली. शोकांतिका आहे पण छान लिहिलीस कथा.आता एखादी फील गुड कथा येउदे.
पुढच्या कथेला शुभेच्छा..! +१

अतिशय सुंदर. जबरदस्त. राभु मला खरंच जी ए पुनर्जन्म घेऊन आले वाटलं.
या शैलीत अजून लिही, काही काही वेळा थोडा सुखांत असला तरी चालेल.

ओह!