दहावीचं वर्ष चालू झालं. रोजचं आयुष्य कसं बदललं वगैरे सांगायचं तर मला आता इतक्या वर्षांनी कुठलं आठवायला? पण काही ठळक गोष्टी आठवतात. दसऱ्याला मी नित्यनेमानं आजारी पडतो. चार दिवस ताप असतो आणि तीन-चार दिवस अशक्तता. काय माहिती माझं आणि दसऱ्याचं काय वाकडं आहे. व्हायचं काय की दसऱ्यानंतर लगेच सहामाही परीक्षा असायची. या आजारपणामुळे माझी कायम गोची व्हायची सहामाहीत. तसा दहावीतही आजारी पडलो. फरक एवढाच होता की सहामाही नंतर आजारी पडलो. अगदी दिवाळीच्या तोंडावर.
(भाग १ https://www.maayboli.com/node/89222)
त्या आठवड्यात सरांनी सगळ्या शाळांचे सहामाहीचे पेपर सोडवून घेतले होते. तापामुळे माझं ते बुडालं. मग सर म्हणाले ये रोज इथे आणि सोडवत बस सुट्टीत. सुट्टी म्हणजे, दिवाळी नंतरचा आठवडा सरांनी क्लासला सुट्टी दिली होती. शाळेला तर होतीच. अचानक अपर्णा म्हणाली, सर मी पण येईन.
सरांसकट सगळ्यांना आश्चर्य वाटलं! अपर्णा जादा अभ्यास करणार?!
बरं, ये. आठ ते बारा सकाळी बसा.
नको सर, आम्ही तीन ते सात बसतो असं तिनं पटकन सरांना सांगितलं. तसाही आमचा क्लास सात पर्यंत रोज असायचा. त्यामुळे सरांना काही विशेष वाटलं नाही. मला सकाळचं बरं वाटत होतं. पण अब बोल ही दिया है भिडू तर संध्याकाळी बसू.
अपर्णा खूप अभ्यासू नव्हती. अन्.. तशी हुशार नव्हती. म्हणजे साठ-पासष्ट टक्क्यांच्या कुंपणावर ती असायची. सावळी होती पण स्मार्ट होती. त्यात इंग्लिश शाळेत आलेला कॉन्फिडन्स. त्या मानानं आम्ही कवटात होतो!
सोमवारी मी दुपारी तीनला पोचलो. सरांच्या घरून किल्ल्या घेतल्या आणि क्लासची रूम उघडून बसलो. अपर्णा आलीच. कदाचित दिवाळीत घेतलेले नवे कपडे असतील पण एकदम भारी दिसत होती. म्हणजे, तसं माझं काही हे नव्हतं. पण जे दिसलं ते सांगितलं!
पाचच मिनिटात तिचं अभ्यासातलं लक्ष उडालं. शेजारच्या चाळीत वाजणारा रेडिओ, त्यावरची गाणी, ती गायला लागली. तिला चांगलं गाणं यायचं. त्यात ते रंभा हो हो संभा.. वाली गाणी तर झकास गायची. संधी मिळाली की सुरू व्हायची! गेल्या वर्षीच्या सेंड ऑफला गायली होती की! मग सनी देओल, अनिल कपूर वगैरे गप्पा सुरू झाल्या. खरं तर मी मॅटिनीला लागणारे जुने पिक्चर बघणारा इसम. हे नवे पिक्चर काही फार माहितीचे नव्हते. तू बेताब पाहिला नाहीस?! मग तिच्यात अमृता सिंग संचारली! तासभर तिनं मला बेताब ऐकवला. म्हणजे, मला कळलं ही नाही एक तास कसा गेला... तिला ॲक्टिंग छान जमेल असं मी म्हटलं तिला.
पाच वाजले अन् ती म्हणाली आज लौकर जाते. उद्या बसू. खरं तर अभ्यास काहीच झाला नव्हता. मी पण त्या मूडात नव्हतो. जाऊ दे मरू दे म्हणत मी पण निघालो. मी निघतो म्हटल्यावर तिची जरा चलबिचल झाली. ती म्हणाली तू जा घरी पण मी मैत्रिणी कडे जातेय. जाते तर जा... मी क्लासला कुलूप लावलं आणि मित्रांना शोधायला गेलो.
दुसऱ्या दिवशी तिनं सांगितलं की तिची आई म्हणाली तुम्ही दोघंच बसता तर घरी बसा. क्लासला कशाला तडफडत जाताय? हे सांगताना तिची चिडचिड मला जाणवली. कदाचित घरातच बसावं लागतंय याचा तिला राग आला असावा. आजही ती लवकरच गेली. आज ती जास्त नटली होती का?
मग तिसऱ्या दिवशीपासून मी अपर्णाच्या घरी जायला लागलो. अपर्णा अस्वस्थ होती पण तिचा निरुपाय होता. तिचाच अभ्यास मी घेतोय असं चित्र होतं. म्हणून असेल कदाचित, पण ती जरा हिडीसफिडीस करत होती. पण आईची देखरेख असल्यानं तिला पर्याय नव्हता. आणखी काही तरी कारण होतं. काकूंच्या तिला मारलेल्या टोमण्यांवरून मला असं वाटलं - ती काल मैत्रिणीलाच भेटायला गेली होती ना?
तुम्हाला सांगू, त्या वयात मुलांना जोड्या जमवायची फार खोड असते. माझी आणि अपर्णाची जोडी आपोआपच जमली होती! त्यामुळे मला बरंच चिडवलं जायचं! खरं तर मलाही बरं वाटायचं. मनात कुठेतरी गुदगुल्या व्हायच्या. एक सॉफ्टकॉर्नर आपोआप तयार झाला होता. पण मला एक जाणिव होती, ती आमच्या परिस्थितीतल्या तफावतीची!
त्या बंगल्यात शिरकाव झाला होता, आणि मग त्या घराचे अंतरंग कळायला लागले. अपर्णाची आई मॉडर्न होती. म्हणजे त्या काळी स्लीव्हलेस ब्लाऊज घालणाऱ्या स्त्रिया माझ्यालेखी मॉडर्न होत्या. माझ्याच का, पण समाजाच्या दृष्टीनंही. पण काकूंमध्ये असं काही तरी होतं की ते मॉडर्नपण जास्त जाणवायचं. ते मोठं कुंकू असेल वा घरात पंजाबी ड्रेस घालणं असेल. म्हणजे मला त्यावेळीही वाटलं आणि आज मागे वळून बघताना तर ठळक जाणवतं. आम्हाला त्या चहा ऐवजी कॉफी द्यायच्या. आता, माझ्या अनुभवातली कॉफी म्हणजे घट्ट दुधाची, वेलदोडा वगैरे घातलेली गोडमिट्ट कॉफी जी आई करायची. मला त्यावर साय धरली ना की डोक्यात जायची. पण ती कॉफी सुद्धा वर्षातून चारसहा वेळेलाच व्हायची. पण इथली कॉफी? पाणीदार, कडवट, थोडीच साखर अशी असायची. एकदा काकू म्हणाल्या सुद्धा - आवडली का कॉफी? अशी होतं नसेल ना घरी? बरोबर नानकटाई किंवा क्रीम बिस्कीटं द्यायच्या. हे सुद्धा नवलच होतं माझ्यासाठी. त्यांच्याकडे फोन होता, फ्रीज होता, रंगीत टीव्ही होता, रेकॉर्डप्लेयर होता. अपर्णासाठी वेगळा कॅसेट प्लेअर होता म्हणजे बघा. आमच्याकडे तर शीतकपाटसुद्धा अजून आलं नव्हतं! आम्हाला कॉफी देऊन त्या तयार होऊन त्या बाहेर पडायच्या. त्यांची बजाज स्कूटर होती. त्यावरून त्या ऐटीत जायच्या त्या काकांच्या परतीच्या वेळी यायच्या. काकू हे रसायन काही तरी वेगळं होतं. मध्यमवर्गीय-शिरोमणी चट्टेरीपट्टेरी चड्डी घालणारे काका आणि स्लीव्हलेस मॅक्सीतल्या काकू हे व्यस्त चित्र माझ्या लक्षात राहिलंय.
काय काय प्रभाव असतात नं माणसाच्या जडणघडणीत?!
अपर्णाच्या शेजारीपाजारी काय परिस्थिती होती कळलं नाही. पण एकदा तिची एक कॉन्व्हेंटवाली मैत्रिण आम्ही अभ्यास करताना आली होती. कुठली तरी लांडा स्कर्टवाली शाळा होती. ती शाळेतून घरी जाताजाता आली होती. त्यांना कुठली आलीये दिवाळीची सुट्टी? मला काय आठवतंय सांगू? आम्ही हॉलमध्ये जमिनीवरच फतकल मारून बसलो होतो, सगळी वह्या-पुस्तकं पसरून. पण तिला मात्र त्या स्कर्टापायी कोचावर बसावं लागलं होतं हे मला पक्कं लक्षात आहे! बरं त्यांच्या गप्पा? काहीही पत्ता लागला नाही. उगाच मायकेल जॅक्सन वगैरे ओळखीची एक दोन नावं. आणि बाकी मित्रमैत्रिणींचा उल्लेख टोपण नावानं. आणि मग खिदळायच्या. पोरी म्हणजे...
----
तेव्हा नं बंगल्यांच्या दारात बोगनवेल नावाचा तो कागदी, रंगीबेरंगी फुलांचा वेल लावायची फार फॅशन होती. ते काटेरी, नकली फुलांचं झाड मला कधीच आवडलं नाही.
-----
डिसेंबर उजाडला. प्रिलिमचे वेध लागले होते. सिलॅबस संपून उजळण्या सुरू झाल्या होत्या. एक दिवस अपर्णा क्लासला आली नाही. दुसऱ्या दिवशी ती आली तीच उशिरा. विलक्षण एंट्री होती तिची! नवे भारी कपडे, मेकपनं उजळलेला चेहेरा आणि उत्स्फुल्ल चाल! सर बघतच राहिले. सर काय, आम्ही सगळेच शॉकमधे होतो.
सर, मी दोन आठवडे येणार नाही क्लासला! आल्या आल्या तिनं अनाउन्समेंट केली!
का ग, काय झालं आणि एवढी खूष का आहेस?
सर, काल मी अनुप जलोटांच्या कार्यक्रमाला गेले होते. तिथे नं ते नवीन टॅलेंट शोधत होते. ते सगळ्यांची गाणी ऐकत होते. त्यांनी माझं गाणं ऐकलं. आणि मला आणि रोहनला त्यांनी सिलेक्ट केलंय. दोन आठवडे तिकडे मुंबईत ट्रेनिंग साठी बोलावलंय!
हे ऐकून आम्ही चाट!
माझ्या डोक्यात किडा वळवळला. हा रोहन कोण?
सर म्हणाले, अरे वा! पण आता प्रिलिम तोंडावर आली आहे. तू त्यांना सांग मी दहावीची परीक्षा देऊन येते.
अपर्णाचा चेहेरा बदलला. एक क्षणमात्र तिच्या डोळ्यांत चिडचिड उमटून गेली. पण ती चांगली ॲक्टर होती! तिनं तडक पवित्रा बदलला...
सर, मला किती नशिबानं ही संधी मिळाली आहे. काल माहितेय, ऑडिशनला दिडशे माणसं होती. पण फक्त आम्ही दोघंच सिलेक्ट झालोय. अनुपजींनी आपणहून बोलावलं मला. मग त्यांचे असिस्टंट आहेत नं ते प्रीतमसर त्यांनी सगळी माहिती घेतली. ते म्हणाले, प्रिलिमच आहे ना, ती जाऊ दे. मी तुला दहावीच्या परीक्षेच्या आत सोडतो. पण तुझ्या सारखं गाण्यातलं टॅलेंट खूप क्वचित असतं.
त्यांनी खूपच आग्रह केला आहे सर! भारतातून दहा मुलं सिलेक्ट करणार आहेत ते सर! त्यात माझी निवड झाली आहे. मला जायलाच पाहिजे.
सरांना काही तरी गडबड वाटत होती. त्यांनी विचारलं, आईवडील काय म्हणतात? त्यांनी परवानगी दिली का?
हो सर! माझ्या आईला तर खूपच आनंद झाला आहे.
हे ऐकल्यावर सरही शांत झाले.
बरं तर मग बेस्ट लक! मुंबईला जाते आहेस जपून रहा. हे गाणं- पिक्चरचं जग वेगळं आहे हं.
हो सर, मी काळजी घेईन, ती म्हणाली.
सर मी, मी पल्लवीशी बोलू का?
एकंदर सगळ्या विद्यार्थीवर्गात अपर्णाच्या बातमीनं झालेली खळबळ सरांच्या लक्षात आली होती. त्यांनी सांगितलं, चला आज इथेच थांबू. तुम्ही बोला अपर्णाशी.
मग काय कल्लाच झाला. तिनं डिटेलवार सांगितलं की सिलेक्शन कसं झालं, कुठली गाणी म्हटली अन् काय काय. मला नवल वाटत होतं, अनुप जलोटा भजनवाला. त्याला हे डिस्को कसं काय आवडलं? असेल बुवा. आणि हा रोहन कोण?
मी विचारलं अपर्णाला. तिचा तो कटाक्ष मला बऱ्याच दिवसांनी जाणवला. रोहन त्यांच्या शाळेतून तीन वर्षांपूर्वी दहावी पास आऊट झाला होता. तिनं तो शाळेत असताना ॲन्युअल फंक्शनला एकत्र गायलं होतं. तो तिचा चांगला फ्रेंड होता. आता उद्या ती त्याच्यासोबतच बॉंबेला चालली होती.
चला आता मी जाते. आईबरोबर कॅंपात नवे ड्रेस घ्यायला जायचंय.
आम्ही सगळ्यांनी तिला बेस्ट लक दिले. तिच्या नव्या ड्रेसच्या चकाकीपेक्षा तिच्या डोळ्यातली चमक जास्त लक्षात राहिली.
दोन-चार दिवसांनी, अपर्णाची काही खबरबात नव्हती म्हणून मी एक चक्कर तिच्या बंगल्यावरून टाकली. रविवार होता. म्हटलं कुणी दिसलं तर विचारावं. पण बंगल्यात अंधार दिसला. मी मनाची समजूत करून घेतली कदाचित काका-काकू तिला भेटायला गेले असतील मुंबईला. पण मनात शंकेची पाल मात्र चुकचुकली.
रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात जाणवलं की अरे, बंगल्याला रंग दिलेलाच नाहीये कधी, हे आपल्या लक्षात नाही आलं.
----
सोमवारी नेहमीप्रमाणे क्लास भरला होता.
अचानक अपर्णाचे वडील दरवाज्यात उभे दिसले. त्यांचा चेहरा गंभीर होता. त्यांनी सरांना म्हटलं, सर दोन मिनिटे तुमच्याशी बोलायचं आहे. जरा बाहेर येता का?
सर हातातलं पुस्तक खाली ठेवून खडूच्या पावडरनं भरलेले हात झटकत बाहेर गेले. तो पर्यंत काकांनी एक नजर वर्गावरून फिरवली. क्षणभरच त्यांची माझी नजरानजर झाली. एक थकवा त्यांच्या गात्रांवर, डोळ्यांत ओथंबला होता. क्लासमधलं वातावरण गंभीर झालं. काही तरी अनपेक्षित घडलं असल्याची जाणीव सगळ्यांना झाली.
सर बाहेर गेले म्हटल्यावर होणारी गडबड, बडबड अजिबात न होता सगळे एकमेकांची नजर चुकवत होते. पण शेवटी पोरंच ती, हळूहळू त्यांची कुजबूज सुरू झालीच. ए, अपर्णाचे वडील ना ते? काय झालं असेल रे?
बऱ्याच वेळानंतर सर आत आले. कोपऱ्यात ठेवलेल्या माठातलं पाणी प्यायले. वर्ग चिडीचूप होता. त्यांचा चेहेरा गंभीर होता.
ते आलेले अपर्णाचे वडील होते. त्यांनी बोलायला सुरुवात केली.
अपर्णा उद्यापासून क्लासला यायला लागेल. पण त्यांना आपल्याकडून एक गॅरंटी हवी आहे, एक वचन हवं आहे. आपण कुणीही अपर्णाला काय झालं हे विचारणार नाही हे वचन त्यांना हवं आहे. अपर्णा मुंबईला गेली होती. ती आता परत आली आहे. आणि अभ्यासाला सुरुवात करणार आहे एवढंच आपल्याला महत्त्वाचं आहे. इतर गोष्टींचा अभ्यासाशी संबंध नाही. बरोबर?
आम्ही नंदीबैलासारख्या माना डोलावल्या.
ते बाहेर थांबले आहेत. मी त्यांना तुमच्यातर्फे शब्द देऊ? निश्चित? ठीक आहे. पण आपल्याला दिल्या शब्दाचं पालन करायचं आहे हे पक्कं.
विषय संपला.
अपर्णा दुसऱ्या दिवशी क्लासला आली. पण त्यानंतर तिचं बोलणं चालणं नॉर्मल झालं नाहीच. माझ्याशी तर तिचं काहीच बोलणं झालं नाही. महिन्याभरात प्रिलिमनंतर तिनं क्लास सोडला.
---
त्या काळच्या घरांभोवती तारेचा कंपौंड असायचं. आणि मग एक रानटी झुडूप लावायचे. मी तरी त्या झुडपाला मेंदी म्हणतो. मेंदीच्या पानावर मन अजून झुलतय, ते हे झुडूप? काय माहिती. मुद्दा काय तर ते दाट वाढायचं आणि कुत्रे,डुकरं इतर प्राण्यांना आत घुसायला जागा द्यायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही प्राणी त्याला तोंड लावायचा नाही! तर हे असं कुंपण अपर्णाच्या बंगल्यालाही होतं. पूर्वी ते नीट कापलेलं असायचं. नंतर मात्र ते कसंही बचबच वाढलं होतं.
(क्रमशः)
काहीतरी गुपित आहे. ते ह्या
काहीतरी गुपित आहे. ते ह्या भागात उघड केलेले नाही.
BTW पल्लवीचे काय झाले?
दोन्ही भाग आवडले. त्या
दोन्ही भाग आवडले. त्या काळातल्या पुण्याचं वर्णन मस्त. अपर्णाच्या आईबद्दल वाचताना 'शाळा'मधली चित्र्याची आई आठवली. तीपण अशीच 'मॉडर्न' होती.
अपर्णा पळून जाईल असा अंदाज
अपर्णा पळून जाईल असा अंदाज लागला होता. लगेच परत आली, हा ट्विस्ट आहे.
बोगनवेल
हा भागसुद्धा छान झालाय!
हा भागसुद्धा छान झालाय! अपर्णाच्या आईचे वर्णन वाचून मला आमच्या सायन्सच्या शिक्षिका 'पोतदार मॅडम'ची आठवण झाली. अशाच स्लिव्हलेस ब्लाउज घालायच्या आणि दुचाकी घेऊन शाळेत यायच्या.
छान चालली आहे कथा..
छान चालली आहे कथा..
"शाळा" ची आठवण झाली.
भाग ३ https://www.maayboli
भाग ३ https://www.maayboli.com/node/89237
इतक्या फास्ट भाग टाकून तुम्ही
इतक्या फास्ट भाग टाकून तुम्ही मायबोली वाचकांचा संयम आणि patience कमी करत आहात आणि बाकी लेखकांसाठी बार उंचावत आहात...
आधीचा भाग नीट वाचून तर होऊ दे आधी...

खूप मस्त. गोष्टी चा फ्लो मस्त
खूप मस्त. गोष्टी चा फ्लो मस्त आहे. मेंदी च्या अशा उल्लेखाने पुढे काही तरी वाईट होणार आहे असं वाटून हुरहूर लागलीये. गोष्टी त छोट्या छोट्या डिटेल्स आल्या आहेत त्या वाचून गंमत वाटली. कोचावर बसावं लागणारी मैत्रीण