पुण्यातल्या घरांची एक ठेवण होती. म्हणजे बंगल्यांची. टुमदार हा शब्द ऐकल्यावर तसला बंगला माझ्या डोळ्यांसमोर येतो. कसा? एक मजली. दोन-तीन कधी चार पायऱ्या चढून जावं लागेल असं जोतं. बाहेर ओटा, आत आल्यावर व्हरांडा, मग इकडे हॉल, तिकडे आतली खोली - म्हणजे आजकाल याला बेडरूम म्हणतात. मग स्वैपाकघर. मागे एक पॅसेज आणि संडास बाथरूम. ह्या बाजूला मुलांची खोली. जरा मोठा प्लॉट असेल तर डायनिंग रूम वेगळी असायची. आणि एखादं दोन लहान खोल्या भाडेकरू ठेवता यावेत यासाठी!
मी हे बंगले म्हणतोय ना ते डेक्कन, प्रभात रोड, भांडारकर रोडचे नाहीत. ते उच्चभ्रू! हे बंगले बांधले होते सरकारी नोकरीतले गॅझेटेड ऑफिसर, टेल्को-बजाज-किर्लोस्कर मधल्या मॅनेजरांनी, वा अगदी शिक्षक नगर, आयकर सोसायटी, स्टेट बॅक कॉलनी, अशा नावांतूनच लक्षात येणाऱ्या नोकरदारांनी. एकोणीसशे पन्नास ते साधारणतः ऐंशी-पंच्यैंशी पर्यंत बांधलेल्या या सोसायट्या. आगोदरचेही असतील. पुण्याची वाढ होऊ लागली तशी या बंगल्यांच्या सोसायट्या जुन्या गावाच्या चहू दिशांनी फुलल्या. स्वारगेटहून पद्मावतीकडे, दांडेकर पुलापासून हिंगण्याकडे, कर्वे रोडवर कर्व्यांच्या हिंगण्याकडे. तिकडे भांबुर्ड्याहून विद्यापीठाच्या दिशेनं. गावातल्या संस्कृतीचा वसा घेऊन ही नवमध्यमवर्गीयांची प्रगती घडत होती.
नंतर मग अपार्टमेंटांचं पेव फुटलं. मी अपार्टमेंटातही भाड्यानं रहाणाऱ्या घरातला!
----
अपर्णा माझ्या क्लासला होती. कानडी प्रांतातल्या एका मराठी कुटुंबातली होती. आमचा क्लास सदाशिव पेठेत. आमच्या काळी दातार अन् जोग वगैरे भले जंगी क्लासेस होते. त्या मानानं हा आमचा क्लास अगदीच मामुली. दहावीच्या वर्गात असताना सगळी मिळून दहा-पंधरा जणं असावीत. सगळे इंग्लिश मिडीयमचे. म्हणजे आम्ही काही मराठी शाळेत फक्त सायन्स आणि मॅथ्स इंग्लिशमधून शिकणारे, पण बाकी काही पूर्ण इंग्लिश आणि काही कॉन्व्हेंटातले. अपर्णा इंग्लिश मिडीयमवाली. आणि बंगलावाली. त्यामुळे आमच्या 'क्लासात' फरक होता. त्यात ती मुलगी (ऐंशी-पंच्यैंशीची गोष्ट आहे हो)! या फरकामुळे बोलणंचालणं काहीच नाही. बरं, सायकल हे त्याकाळचे सर्वमान्य वाहन. क्लास सुटला की कोपऱ्यावर आम्ही मुलं घोळका करून गप्पा ठोकणार. पण मुली तडक मार्गी लागायच्या. त्यामुळे ती बंगलावाली आहे आणि माझ्याच घराच्या दिशेला रहाते हे कळायला वर्षं गेलं.
असाच एकदा संध्याकाळी क्लासनंतरच्या गप्पा संपवून निघालो होतो. माझ्या घराअलिकडच्या डोंगर पायथ्याची चढण तावात पैडल हापसत चढत होतो. अचानक मला अपर्णा सायकल ढकलत तो चढ चढताना दिसली. धर्मसंकट! मदत करावी तर... पण मग... झालं, मुखदुर्बळपणा नडला. मी बघितलंच नाही अशा तावात पुढे निघून गेलो. पण सद्सद्विवेक बुद्धी अगदीच मेली नव्हती. थंडीचे दिवस होते. सातला अंधार पडला होता. आणि हो बुद्धी पण झोपली नव्हती! माझा नेहमीचा सायकलवाला साधारणतः या वेळेला बंद व्हायचा. तो आहे का अजून हे बघायला मी तावात मी पुढे गेलो. सुनील दुकान बंदच करत होता. पाण्याचं घमेलं त्यानं दुकानात ठेवलंतं.
ए सुन्या, थांब जरा..
काय रं? काय हालं?
माझी सायकलची कायमची बोंब असायची. पंक्चर, पायडल तुटणे, चाकं आऊट, सतरा भानगडी व्हायच्या. पण नेहमीचा गडी होता. दोस्ती होती. दुकान बंद झालं असेल तर मग पंक्चर सायकल तिथेच लावून मी घरी चालत जायचो. तो सकाळी सकाळी बघायचा, आणि मी साडेसातला पोहोचेपर्यंत दुरुस्त करून ठेवायचा.
आता याला काय सांगायचं?
अरे ते एक मुलगी.. तिची सायकल पंचर दिसतेय. ती येतेय चढावरनं.
त्याच्या चेहेऱ्यावर हसू फुटलं.
मं? तुला काय? लय हानली सायकल? कोन हाय?
ती... काय म्हायती? पण मला दिसली
बार बार येऊं दे, तो हसतच म्हणाला.
मी बावचळून नेहमीचा रस्ता सोडून गल्लीत सायकल घातली.
ए रव्या तिकडं कुठं चालला?
आलोच म्हणून मी पळालो.
गल्लीतून वळत वळत परत रस्त्याला लागलो आणि एका वळणावर,पण चटकन दिसणार नाही असा थांबलो. ती येत होती सायकल ढकलत. पण चौकातच ती खालच्या अंगाला वळली.
हात्तेच्या. उगाचच सुन्याला भरीस घातला. ही तिकडे कुठे तरी रहाते बहुतेक...
----
नववीचं वर्षं होतं. क्लासचा सेंडॉफ आणि सरांचा वाढदिवस एकच आला. मग सरांनी सेंडऑफच्या पैशांत भर घालून सगळ्यांना जेवणच ठरवलं. त्या दिवशी मग उशीर होणार होता. सरांनी विचारलं. रवी, तू त्या इथे राहतोस ना? मग हिला सोबत जा. अपर्णा, रवी येईल तुला सोडायला. घरी सांग, उशीर होणार आहे पण काळजी करू नका.
जेवणं झाली. नऊ वाजत आले होते. सगळे निघालो. सरांनी खात्री करून घेतली, रवी तू आहेस ना अपर्णा बरोबर?
मी निघताना अपर्णाला विचारलं, कुठे राहतेस तू?
आता काय तरी बोललं पाहिजे ना?! म्हणजे बरोबर जायचं आणि काहीच बोलायचं नाही हे कसं?
ती म्हणाली सुजननगरला.
मी मान डोलावली. कसं जायचं?
ती म्हणाली, तुझ्याच रस्त्यानं.
तिचा सूर थोडा चढा वाटला. मी नजर उचलून तिच्याकडे बघितलं. ती माझ्याकडेच साभिप्राय बघत होती. काय प्रतिक्रिया द्यायची या संभ्रमात मी काहीच बोललो नाही.
टांग टाकली, निघालो. रस्ता तसा मोकळा होता. पण तिच्या पुढे-मागे चाललो होतो. एक ताण होता. खूप पुढे जायचे नव्हते पण अगदीच तिच्या मागून चालवणंही जमण्यासारखं नव्हतं.
तो चढ आला. ती सायकलवरून उतरली. मग मी पण उतरलो.
अचानक म्हणाली, त्या दिवशी तू थांबला नाहीस.
आता प्रसंग कठीण होता. मला मुद्दा लक्षात आला होता. पण उगाच वेड पांघरून मी विचारलं, कधी?
तिनं परत तो कटाक्ष टाकला. तुला माहितीये.
मग मात्र मी शेपूट घातलं. हो .. पण म्हणजे मी.. तशी आपली ओळख नव्हती नं..
ती काहीच बोलली नाही. चढ चढून आलो. मग म्हणाली,
पण मी बघितलं. त्या वळणावर थांबला होतास तू!
मी तिच्याकडे न बघता शुंभासारखी मान हलवली.
ती हसली. तुम्ही सगळी मराठी शाळांतली मंडळी अशीच...
मला जरा बोचलं ते. पण प्रतिवाद करण्यात हशील नव्हता.
हा तुझा रोजचा रस्ता आहे का? कारण मी तुला कधी पाहिलं नाही.
नाही. मी त्या सर्कल वरून जाते.
तरीच. मी तुला कधी पाहिलं नाही.
आणि जेव्हा बघितलं तेव्हा बोलला नाहीस, मदत करायचं तर दूरच.
हे मला जरा लागलं.
पण मी पुढे जाऊन माझ्या सायकलवाल्याला थांबवला होता. पण तू अगोदरच वळलीस.
म्हणजे?
म्हणजे, सुनील दुकान बंद करत होता. त्याला जाऊन मी थांबवला. म्हटलं एक मुलगी येतेय. तिची सायकल पंचर झालीये.
तिच्या डोळ्यांत जरा वेगळा भाव उमटला.
आणि मग परत येऊन या कॉर्नरला उभा राहिलास? आम्ही सायकली हातातच धरून चालत होतो. बोलत बोलत आता त्या कोपऱ्यावर पोहोचलो होतो.
हो, पण तू इथेच वळलीस.
तिचा परत एक कटाक्ष. पण या वेळी तो जरा मवाळ होता.
मग ती हॉपिंग करून सायकलवर बसली. मी पण माझ्या सायकलवर टांग टाकली. या दिशेनं आता उतार होता. बुंगाट वेगात तिनं सायकल हापसली. रात्रीची वेळ, रस्ता मोकळाच होता. सपासप अंतर कापत आम्ही सुजन नगरला पोहोचलो. चौकानंतर एक गल्ली सोडून तिचा बंगला होता. तो बंगला. व्हरांड्याच्या ग्रिल मधून लाईट येत होता. तिच्या वडिलांची आकृती दिसत होती. वाट पहात असावेत. आम्ही गेटपाशी पोहोचल्यावर बंगल्याचं दार उघडून ते बाहेर आले. ओटीवरचा दिवा लावला.
अपर्णानं तोपर्यंत मला अच्छा बाय, उद्या भेटू केलं होतं. पण तिचे वडील गेट पर्यंत आले. त्यांनी मला आपादमस्तक न्याहाळले. मला नाव विचारलं, शाळा विचारली. कुठे राहतोस, वडील काय करतात, अशी सगळी चौकशी झाली. हे होईस्तोवर आम्ही दोघं बाहेरच सायकली घेऊन उभे होतो. एवढ्यात तिची आई दरवाज्यात आली. तिनं म्हटलं, अहो तिथेच काय चवकशी करताय, आत बोलवा नं त्याला!
पण मीच घाईघाईनं म्हणालो, काकू आत्ता नको, उशीर झालाय. मी येतो नंतर..
बरं, नीट जा असं काकू म्हणाल्या
वडील म्हणाले, आईवडलांना घेऊन ये.
ठीक आहे म्हणून मी निघालो. दोन पायडल मारल्यावर लक्षात आलं, मी अपर्णाला बाय म्हटलंच नाही. मागे वळून पाहिलं तर ती सायकल वळवून घरात नेत होती, आणि तिचे वडील माझ्याकडे पहात होते.
----
हे बंगले असायचे नं, टिपिकल असायचे. एक स्कूटर आत जाईल इतपत गेट. क्वचित एखाद्या कारची पार्क करण्याची सोय असायची. मग गेटाच्या दोन्ही बाजूंना झाडं, छोटी बाग, त्यात गुलाब, मोगरा, गुलबाक्षी, जास्वंद अशी फुलझाडं. मग आंबा, पेरू, चिक्कू, क्वचित रायावळा अशी फळझाडं. आणि नारळ! अशोकाच्या झाडांची फॅशन होती! मधुमालती, जाई-जुईचे वेल, प्राजक्त असायचा! मागे एखादा हौद, आणि लागून धुणंभांडी करायला मोरी. प्लॉटच्या आकाराप्रमाणे यात कमी जास्त फरक पडायचा. पुलंनी वर्णन केलेलं चौकोनी कुटुंब अशा घरांत फिट्ट मावायचं!
----
अपर्णाशी तोंडओळख अशी नववीचं वर्षं संपता संपता झाली. नववीची परीक्षा संपवून छोट्याशा सुट्टी नंतर दहावीचं महत्त्वाचं वर्ष सुरू झालं. आमच्या क्लासची व्हेकेशन बॅच नव्हती. पण रेग्युलर क्लास सुरू झाला. शाळा अजून चालू झाल्या नव्हत्या. त्यामुळे आता वेळ दिवसाची होती. पहिल्याच दिवशी अपर्णानं हसून ओळख दाखवली. रोजचा एक तासाचा क्लास आता दोन-तीन आणि कधी कधी चार तासांचा असायचा. कदाचित त्यामुळे असेल पण मुला-मुलींमधला संवाद वाढला होता. जनरलीच वातावरणात हलकेपणा आला होता. मराठी शाळा आणि इंग्लिश मिडीयम हा फरक जरा कमी जाणवायला लागला होता. याचं एक कारण आता आम्ही मराठी शाळावाले इंग्रजीला अधिकाधिक सरावलो होतो हे होतं. दर आठवड्याला किंवा एका आड एक आठवड्याला परीक्षा असायची. मग सर विद्यार्थ्यांनाच एकमेकांचे पेपर तपासायला सांगायचे. भयंकर टेन्शन यायचं. आपला पेपर एखादी मुलगी तपासणार,ती सुद्धा इंग्लिश मिडीयमची! पण आपण सगळे एकाच माळेचे मणी आहोत हे पहिल्या दोनतीन प्रसंगानंतर कळलं, मग त्याचंही काही वाटेनासं झालं. पण एकमेकांच्या ओळखी घट्ट व्हायला त्याची खूपच मदत झाली.
आम्ही मुलं जमून गप्पा मारताना आता एखादं दिवस अपर्णा आणि इतर मुलीपण सामील व्हायला लागल्या. जून सुरू होताना सरांनी एक आठवड्यांची सुट्टी दिली. कारण मग शाळा सुरू होत होत्या. कशी कोण जाणे एक टूम निघाली. रोज एकेकाच्या घरी जाऊन पत्ते किंवा तत्सम बैठे खेळ खेळायचे! मे महिन्याच्या सुट्टीत बुडलेली गंमत त्या आठवड्याभरात लुटायचा हा एक प्रयत्न होता.
या प्रकरणात एकदा आमच्याकडे सगळे आले होते. आमच्या घरामागे डोंगर. तर मी जरा बदल म्हणून लोकांना सांगितलं की सकाळी किंवा संध्याकाळी या, दुपारच्या उन्हात डोंगर नको. दुसरा मुद्दा होता की आमचं दोन रुमचं घर. दहा बारा जणं तीन-चार तास मावणं कठीण. पब्लिक म्हणालं संध्याकाळी. बरं, या चार वाजता. आले सगळे. आईनं पोहे केले आणि एक नारळाची वडी. खाऊन निघायला पाच वाजले. मग पर्वतीच्या मागून डोंगरमाथ्यानं वाघजाई. इथे पोहेचेपर्यंत सहा झालेच. आता तळजाई असा अपर्णानं बूट काढला. ती सुजननगरची त्यामुळे तिला तळजाई माहितीची. पण मी चक्क नाही म्हणालो. अंधार पडला असता. आणि त्यावेळचं तळजाईचं जंगल दाट होतं. वाट काढत जाणं सोपं नव्हतं. मी गेलो होतो चारसहा वेळा, पण ते सगळं दिवसा उजेडी. बरं मग वरपर्यंत जाऊन परत येऊ. ठीकाय. आता वयच ते, धावत चढण्याची शर्यत लागली. चढणं ठीक होतं. पण परत धावत उतरताना पल्लवीचा पाय घसरला, पडली आणि पाय मुरगाळला. टेकवताच येईना. आता? अपर्णा म्हणाली माझे बाबा आले असतील ऑफिसहून. ते स्कूटर वरून पोचवतील पल्लवीला. हां, अपर्णाचं घर त्यातल्या त्यात जवळ. त्यामुळे हा पर्याय बरा होता. पण त्यांना निरोप कसा पोहोचवणार? मग मी त्यांना शाहू कॉलेजमधे उतरणारा रस्ता दाखवला. तो सगळ्यात जवळचा पॉईंट होता. अपर्णा आणि मिलींदच्या आधाराने पल्लवी हळूहळू उतरायला लागली. माझ्या काय पायाखालची वाट. मी बुंगाट पळत डोंगरातून घरी परत आलो. सायकलवर काढली आणि सुसाट सुजन नगरच्या दिशेनं सुटलो. पाच-सात मिंटात अपर्णाच्या घरी पोहोचलो.
काका चड्डी-बनियन वर चहा पीत बसले होते. त्यांना ओळख सांगितली. अडचण सांगितली. ते झटपट शर्टपॅंट घालून निघाले. मी सायकलवर पुढे. शाहू कॉलेजच्या वॉचमनशी तेच बोलले. आता जाऊन पल्लवीला घेतलं तेव्हा सात वाजत आलेच होते.
मग आम्ही बाकीचे सगळे गप्पाटप्पा करत मधल्या रस्त्यानं घरी आलो. आईनं चहा केला. तो घेऊन सगळे वाटेला लागले. पल्लवी सायकल घेऊन आली होती. मग तिची सायकल घेऊन मी आणि अपर्णा तिच्या सायकलवरून असे आम्ही अपर्णाकडे निघालो. काय होतं की पल्लवी मुकुंद नगरला रहायची. तिला सायकल उचलायला सुजननगर सोईचं पडलं असतं.
जाताना मग आमच्या गप्पा रंगल्या. तिच्या लेखी मी एकदम हिरो झालो होतो. मंजे हिरो नै पण.. मंजे लक्षात येतंय ना..
तिच्या घरासमोरच सायकलला टेकू देऊन आमच्या गप्पा चालल्या होत्या. मग काका आले. त्यांनी आत बोलावलं. काकूंनी एकेक केळं हातावर ठेवलं. इकडतिकडच्या जरा गप्पा झाल्या. व्हरांड्यापलिकडच्या रातराणीचा मंद सुगंध यायला लागला तेव्हा मी उठलो. काकू म्हणाल्या ये कधीही. आता आपला भाव वधारला होता.
त्या बंगल्याशी, नव्हे एका घराशी ओळख झाली होती.
(क्रमशः)
मस्त.
मस्त.
ह्या सगळ्या एरिआतुन लहानपणी बागडलो आहे . त्यामुळे जवळीक साधली गेली. त्रिकोण आहे असे दिसतेय. बघू या पुढे काय होते ते. विशेष वाटले ते लिहिण्याची पद्धत एकदम निराळी पकडली आहे.
पुढच्या भागाची वाट बघतो आहे,
तुमच्या कथा छान असतात..
तुमच्या कथा छान असतात..
आणि तुम्ही त्या पटपट पूर्ण करता हा बोनस..
छान. वाचतेय.
छान. वाचतेय.
वाचतोय
वाचतोय
छान सुरुवात.
छान सुरुवात.
भाग २ https://www.maayboli
भाग २ https://www.maayboli.com/node/89227
एका वाचकाच्या सूचनेचा आदर राखून पुढच्या भागाची लिंक इथे देत आहे.
छान लिहिलं आहे. तुमचं नाव
छान लिहिलं आहे. तुमचं नाव बघून वाचायला घेतलं.
छान लिहिलं आहे. तुमचं नाव
छान लिहिलं आहे. तुमचं नाव बघून वाचायला घेतलं.>+११११११११