भस्मबीज - भाग २९
पूर्वभाग
इन्स्पेक्टर हेगडे अभिजितची भेट घेऊन बारा महिलांच्या बेपत्ता होण्यामागील पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतात; देवप्पा त्यांना जंगलातील अनामिक जागा आणि आगामी तेराव्या बळीच्या धोक्याची जाणीव करून देतो. कल्लेश्वर स्मशानात उग्र तारा साधना सुरू करतो, तर त्याला बारा स्त्रियांच्या आत्म्यांचे भास होऊ लागतात. अभिजितच्या ४१ दिवसांच्या व्रतामुळे त्याच्या शरीरात आणि मनात बदल घडू लागतात; दुसरीकडे देवप्पा मल्लीच्या मनात चंद्रिकेबद्दल संशय निर्माण करण्यात यशस्वी होतो. अनन्या मुंबईतील आणि विहिरीजवळील घटनांचा संबंध शोधू लागते आणि अथर्वकडून त्या रात्रीच्या रहस्यमय स्त्रीच्या आवाजाची माहिती मिळवते. हेगडे बारा प्रकरणांचा तपास करताना जंगलाकडे जाणारे समान धागे आणि सरकारी नकाशावर अस्तित्वात नसलेला एक प्रदेश शोधतात.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग ३० - तेरावी बळी...अनन्या?
नेहा संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतली तेव्हा तिच्या फोनवर स्वातीचा मिस्ड कॉल दिसला. तिने कपडेही न बदलता लगेच स्वातीला फोन लावला.
"स्वाती, तुम्ही फोन केला होता? अनन्याची तब्येत कशी आहे?"
“तब्येत ठीक आहे, नेहा,” स्वाती म्हणाली. मात्र तिच्या आवाजातील थकवा नेहाच्या लगेच लक्षात आला.
“पण काहीतरी झालंय ना?”
“अनन्या आता पूर्वीसारखी राहिलेली नाही गं. सारखे प्रश्न विचारत असते. अथर्वला एकटं गाठून मुंबईतल्या त्या रात्रीबद्दल विचारते. मला तर रोज विचारते की बाबांचा फोन का येत नाही. तिला माहिती आहे की त्या दिवशी ती विहिरीत पाय घसरून पडली नव्हती."
"मी तिला काय सांगू, तेच मला कळत नाही." स्वातीने खोल श्वास घेतला. "आणि आता तिचा वाढदिवस अकरा दिवसांवर आलाय. ती म्हणते की बाबा येणार नसतील तर आपणच त्यांच्याकडे जाऊ. मी तिला नाही म्हटलं, तर ती काहीच बोलली नाही, पण तिचा चेहरा बघून मला वाटतं की ती ऐकणार नाही."
"मी तिच्याशी बोलू का?" नेहाने विचारलं. “कधी कधी मुलं घरातल्या माणसांचं ऐकत नाहीत; पण घराबाहेरच्या परिचित व्यक्तीने समजावलं, तर त्यांचा शब्द मानतात.”
“हो, तूच बोलून बघ. कदाचित तुझं ऐकेल.”
स्वातीने अनन्याला आवाज दिला आणि फोन तिच्या हातात दिला.
“हॅलो, नेहा!” अनन्याने फोन घेताच विचारलं, “तुम्हाला माहीत आहे ना बाबा कुठे आहेत?”
"आई सांगत नाही, आणि आजोबा रोज रात्री पडवीत राखण करत असल्यासारखे बसून राहतात."
“अनन्या, तुझे बाबा सुरक्षित आहेत. ते सध्या एका महत्त्वाच्या कामात आहेत. ते काम पूर्ण होईपर्यंत त्यांना कुणीही त्रास देऊ नये, एवढंच.”
“म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोलता.” अनन्याच्या आवाजात नाराजी होती. “मग तुम्ही तरी मला का काही सांगत नाही? त्या दिवशी विहिरीत जे घडलं, ते तसं नव्हतं, नेहा. माझ्या हातात काहीच नव्हतं. माझ्याकडून कुणीतरी काहीतरी करवून घेत होतं. मला स्वतःलाच कळत नव्हतं की माझ्यासोबत काय घडतंय. आणि मग कुणीतरी मला वाचवलं. मी आईला हे सगळं सांगितलं, पण तिने माझ्यावर विश्वास ठेवण्याऐवजी माझ्यापासून सत्य लपवलं. तुम्ही तरी माझ्याशी असं करू नका. मला खरं काय घडलं ते जाणून घ्यायचं आहे.”
नेहा शांत राहिली. अनन्याच्या बोलण्यातला राग तिला समजत होता; पण त्यामागची भीती आणि एकटेपणाची भावना अधिक जाणवत होती.
“मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही, अनन्या. पण काही गोष्टी तुला समजावून सांगण्यासाठी तुझ्या बाबांशीच बोलणं गरजेचं आहे.”
“मग ते कधी बोलणार माझ्याशी?”
"तुझा वाढदिवस चौदा मेला आहे ना, मग असं करूया. त्या दिवशी आपण तुझ्या बाबांना भेटायला जाऊ. मी तुला घेऊन जाईन. तुला जे काही विचारायचं आहे, जे काही जाणून घ्यायचं आहे, ते तू त्यांनाच विचार.”
“खरंच नेहा? तुम्ही मला घेऊन जाणार?”
“हो. पण तोपर्यंत आईला त्रास द्यायचा नाही, चालेल?”
“हो. नक्की!”
अनन्याला खूप दिवसांनी मोकळं वाटू लागलं. "थँक यू, नेहा." ती डोळे पुसत म्हणाली.
फोन ठेवल्यावर नेहा बराच वेळ तशीच बसून राहिली, अनन्याच्या आवाजातील आनंद तिला जाणवलं होता; पण त्याच वेळी आपण काय बोलून बसलो, याची जाणीव तिला अस्वस्थ करत होती. अभिजितला किंवा स्वातीला विचारल्याशिवाय वचन देणं तिच्या अधिकारात नव्हतं. आणि ते वचन पूर्ण करणं तिच्या हातात होतं की नाही, याचीही तिला खात्री नव्हती.
************************************************************************************************************************
साधनेच्या तिसऱ्या रात्रीपर्यंत ती कुजबुज कल्लेश्वराच्या इतकी अंगवळणी पडली होती की तिची भीती वाटेनाशी झाली, चौथ्या रात्री जेव्हा ती अचानक थांबली, तेव्हा आधी आश्चर्य वाटलं, त्याला वाटलं की साधना संपली की काय. नदीचा आवाज अजूनही दूर हरवलेला होता, आणि अचानक त्या विलक्षण शांततेत, राखेच्या वर्तुळाच्या बाहेर, अनवाणी पावलांचा एक हळुवार आवाज उमटला. ती पावलं त्याच्या उजव्या बाजूने सुरू झाली, पाठीमागून वळसा घेऊन डाव्या बाजूला गेली आणि समोर येऊन थांबली, आणि मग पुन्हा उजव्या बाजूने सुरू झाली, एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा, प्रत्येक फेरीत वर्तुळाच्या काठाच्या थोडी जवळ सरकत होती.
कल्लेश्वराने मंत्र चालू ठेवला, एकेक आवर्तन पूर्ण झाले की डाव्या हातातली एक एक कवडी उजवीकडे सरकवत हिशेब राखला, कारण पहिल्या रात्री त्याला कळलं होतं की भीतीच्या गोंधळात आकडा विसरला तर संपूर्ण रात्र व्यर्थ जाते.
पाचव्या रात्री पावलं आणखी जवळ आली. ती वर्तुळाभोवती एकदाच फिरली आणि मग त्याच्या अगदी पाठीमागे येऊन थांबली, इतकी जवळ की त्याला आपल्या मानेवर बर्फासारखी थंड नजर टिकलेली जाणवली, आणि उरलेली संपूर्ण रात्र ती तशीच उभी राहिली, एक पाऊलही न हलवता. कल्लेश्वर दक्षिणेकडे तोंड करून माळ ओढत जप करत राहिला, घामाने भिजलेला आणि हातांना कंप सुटलेला. पहाटे जेव्हा त्याने आसन सोडलं, तेव्हा पाठीमागे राखेवर कुणाच्याही पावलांचा ठसा नव्हता.
सहावी आणि सातवी रात्रही कोणत्याही अनपेक्षित घटनेशिवाय शांततेत गेली. मात्र ही शांतताच त्याला अधिक अस्वस्थ करू लागली होती. कारण एखादी भीतीदायक घटना घडू शकते, याची जाणीव असताना ती कधी घडेल याची वाट पाहत राहणं, हे प्रत्यक्ष संकटाला सामोरं जाण्याइतकंच भयावह असतं.
आठव्या रात्री त्याला जाणवलं की आज रात्र नेहमीसारखी संपलेली नाही. त्याने डोळे उघडले, तेव्हा समोरच्या दिव्याची ज्योत सरळ उभी न राहता वर्तुळाच्या काठाच्या दिशेने कललेली होती, जणू कुणीतरी तिथे उभं राहून तिला आपल्याकडे ओढत होतं. तिथे, राखेच्या वर्तुळाच्या अगदी काठावर, एका स्त्रीची सावली उभी होती. चंद्राच्या फिकट उजेडात राखेवर स्पष्ट उमटलेली; लांबट, काळसर आकार, खांद्यावर मोकळे सोडलेले केस.
कल्लेश्वराने श्वास रोखला. त्याला पूर्वीची हाकिणीची आणि क्रोध भैरवाची घटना आठवली आणि उठून पळून जावंसं वाटलं. पण, धीर एकवटून त्याने डोळे न मिटता, थरथरत्या ओठांनी, मंत्र पुन्हा सुरू केला. सावली तशीच स्थिर हालचाल न करता रात्रभर वर्तुळाच्या काठावर उभी राहिली, आणि पहाटेची पहिली किरणं पडली तेव्हा ती राखेच्या पृष्ठभागावर विरून गेली.
************************************************************************************************************************
दोन दिवसांनी हेगडे आपल्या सर्वात विश्वासू हवालदार पुत्रन याला बरोबर घेऊन यानाला पोहोचले. जीप रस्त्याच्या कडेला झाडाखाली लावली, ड्रायव्हरला तिथेच थांबायला सांगितलं, आणि दोघं जंगलाच्या पायवाटेने चालू लागले. ही अधिकृत शोधमोहीम नव्हती, एसपींच्या परवानगीची वाट बघत बसण्यापेक्षा एकदा स्वतः जागा बघून यावी, एवढाच हेगडेंचा हेतू होता, आणि पुत्रनला त्यांनी फक्त एवढंच सांगितलं होतं की जंगलात काही संशयास्पद हालचाली आहेत. पुत्रन उत्तर कन्नडमधलाच माणूस असल्यामुळे यानाच्या जंगलाबद्दल लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टींनी त्याचे पाय आधीच जड झाले होते.
पडक्या देवळापासून दीडशे पावलांवर असतानाच त्यांना हसण्याचे आणि खोकण्याचे आवाज ऐकू आले. हवेत गांजाचा तीव्र, गोडसर वास पसरलेला. हेगडेंनी हात उंचावून पुत्रनला थांबवलं, आणि झाडीच्या आडून पुढे डोकावले. देवळाच्या भिंतीला टेकून सहा माणसं बसली होती.
त्यांच्यात चिलीम एकाकडून दुसऱ्याकडे फिरत होती आणि मोठ्या आवाजात गप्पा चालू होत्या. त्यांच्यापैकी एक जण हातातली चिलीम दुसऱ्याकडे सरकवत म्हणाला, "बाबा आजकाल इकडे येत नाहीत रे, रात्र रात्र नदीकाठी बसून असतात म्हणे, त्यांच्या गुरूंनी कसलीतरी साधना सांगितलेय ती करतात." दुसरा म्हणाला, "अशाच साधनेत मागच्या वेळेस परमेश गेला होता त्यांच्याबरोबर तो परत आलाच नाही."
"काहीही बरळू नकोस, तू बघिलंय का स्वतःच्या डोळ्यांनी? उगाच बाबांना दोष देऊ नकोस." त्यांच्यातला वयस्कर जोगी म्हणाला. "या जंगलात अमाप खजिना लपलाय, तेराव्या रात्रीची बाबांची विधी एकदा पूर्ण झाली की आपण सगळे मालामाल होणार."
"तेरावी रात्र" हे शब्द ऐकताच हेगडेंच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तेवढ्यात पुत्रनच्या पायाखाली एक वाळकी फांदी कडकडली. सहाही माणसं एकाच क्षणी गप्प झाली आणि एकाने कर्कश आरोळी ठोकली, "पोलीस!" चिलीम खाली पडली, धुराचे लोट उठले,आणि क्षणार्धात ते सगळे दाट जंगलात पळत सुटले.
पुत्रनने पिस्तूल काढत पुढे धाव घेतली, पण हेगडेंनी त्याला अडवले. "थांब पुत्रन. त्यांच्या मागे जाऊ नकोस."
"साहेब, ते सुटतील!"
"सुटू दे," हेगडे म्हणाले, त्यांच्या आवाजात करडेपणा होता. "आपण दोघंच आहोत, जंगलाची आपल्याला फारशी माहिती नाही, त्यापेक्षा आपण देवळात बघू काही सापडतंय का?."
देवळात शिरताच हेगडेंना गाभाऱ्यातली थंड, कुबट हवा जाणवली. फरशीवर राखेचं एक जळकं वर्तुळ आखलेलं होतं, त्याच्या मध्यभागी विझलेल्या अंगाऱ्यांचा ढीग, आणि भोवती काळ्या कापडात गुंडाळलेली लिंबं, कुंकू चोपडलेले दगड आणि मोडक्या मातीच्या गाडग्यांचे तुकडे विखुरलेले होते. वर्तुळाच्या काठावर कुंकू लावलेली एक फुटकी कवटी ठेवलेली होती, आणि तिच्या शेजारी काही लांब हाडं, त्यांपैकी एक हाड मांडीचं असावं असं हेगडेंना वाटलं, पण ते माणसाचं की जनावराचं हे सांगायला त्यांच्याकडे कोणतीही साधनं नव्हती.
पुत्रनने मागून कुजबुजत सांगितलं, "साहेब, याला हात लावू नका" पण हेगडेंनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत हातमोजे घातले आणि प्रत्येक वस्तू फोनमध्ये फोटो काढून, एकेक करून प्लास्टिकच्या पिशव्यांत घालायला सुरुवात केली. कायद्याप्रमाणे हे पंचांसमोर करायला हवं होतं, पण इथे पंच म्हणून कोणीच नव्हतं, म्हणून त्यांनी सर्व वस्तूंची यादी करायला पुत्रनला सांगितलं आणि ठाण्यात परतल्यावर औपचारिक पंचनामा करायचं ठरवलं.
पण काम करत असतानाच त्यांना एक विचित्र जाणीव सतावू लागली. त्यांच्या पाठीमागे एक अदृश्य नजर रोखलेली होती, जणू कुणीतरी त्यांच्या प्रत्येक हालचालीची नोंद ठेवत होतं. त्यांनी दोनदा झटकन मागे वळून पाहिलं, आणि दोन्ही वेळा गाभाऱ्यात फक्त पुत्रन आणि अंधार होता. देवळाच्या बाजूला एक प्रचंड वडाचं झाड होतं. त्याच्या फांद्यांवरून असंख्य वटवाघळं उलटी लटकत होती, त्यांची संख्या इतकी प्रचंड होती की जणू त्या वडाची पानेच वाटत होती. ती दिवसा झोपलेली असावीत असं वाटत होतं, त्यांच्या पंखांचा कुबट वास आत गाभाऱ्यापर्यंत येत होता. पुत्रनने नाकावर रुमाल धरला, "साहेब, इथून निघूया."
हेगडेंनी शेवटची पिशवी बंद केली आणि सगळ्या वस्तू घेऊन बाहेर पडले. उभं राहून त्यांनी शेवटचं एकदा पडक्या देवळाकडे आणि त्याच्या बाजूच्या वडाकडे पाहिलं, आणि त्या क्षणी त्यांना कळलं की आतून जाणवणारी ती नजर कुठून येत होती. वडाच्या वरच्या फांद्यांवर, वटवाघळांच्या गर्दीत, डझनावारी कावळे बसले होते, पूर्णपणे स्तब्ध, आणि त्यांचे लाल डोळे हेगडेंच्या दिशेने रोखलेले होते.
************************************************************************************************************************
देवप्पाने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. रोज रात्री तो मल्लीच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करी. मात्र त्यात घाई नव्हती. मल्लीच्या मनावर एकदम प्रभाव टाकण्याऐवजी, त्याच्या मनात आधीपासूनच दडलेल्या आठवणींना हळूहळू जागं करायचं, एवढाच त्याचा उद्देश होता. प्रत्येक रात्री तो आदल्या रात्रीपेक्षा थोडा अधिक वेळ तिथे थांबू लागला.
पहिल्या रात्री त्याने मल्लीच्या मनात चंद्रिकाच्या हसण्याची एक जुनी आठवण अलगद जागवली. एखाद्या शांत तळ्यात पडलेल्या पाण्याच्या थेंबामुळे जशी लहानशी वलयं उमटतात, तशीच ती आठवण मल्लीच्या मनात उमटली. चंद्रिकाचा हसरा चेहरा, तिच्या डोळ्यांतील आपुलकी आणि त्याच्याकडे पाहताना तिच्या चेहऱ्यावर उमटणारे ते निरागस हास्य... क्षणभर मल्ली त्या आठवणीत हरवून गेला. पण देवप्पाने लगेच आपला प्रभाव मागे घेतला. त्याला मल्लीच्या मनात काही नवीन रुजवायचे नव्हते; केवळ विस्मृतीच्या थराखाली दडलेली एखादी भावना पुन्हा वर आणायची होती.
दुसऱ्या रात्री त्याने तीच आठवण थोडा अधिक वेळ टिकू दिली. यावेळी मल्लीने चंद्रिकेच्या चेहऱ्याबरोबरच तिचा आवाजही आठवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मनात अनेक वर्षांपूर्वीचे काही प्रसंग तरळून गेले. तिच्याशी झालेल्या गप्पा, तिने केलेली मस्करी, त्याच्या दुःखाच्या वेळी तिने दिलेला आधार... या सगळ्या आठवणींनी त्याच्या मनात एक अनामिक हुरहूर निर्माण केली. इतकी वर्षं ज्या आठवणींना त्याने स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, त्याच आता पुन्हा त्याच्या मनात जाग्या होऊ लागल्या होत्या.
पुढच्या काही रात्री देवप्पाने हळूहळू आपला प्रभाव वाढवला. तो मल्लीच्या मनात आधीपासूनच असलेल्या प्रश्नांना आणि आठवणींना अधिक ठळक करत होता. चंद्रिका त्याला का दिसत नव्हती? बारा विधी पूर्ण होऊनही तिच्या अस्तित्वाची जाणीव का होत नव्हती? कल्लेश्वराने दिलेली आश्वासने खरी होती का? असे प्रश्न आता मल्लीच्या मनात अधिक ठळकपणे आकार घेऊ लागले.
त्याचा परिणाम त्याच्या वागण्यातही दिसू लागला. पूर्वी तो चंद्रिकेच्या जुन्या निळ्या साडीशी बसून राहायचा, पण आता त्या साडीला हात लावताच तो बराच वेळ विचारात हरवून जाऊ लागला. कधी तिच्या पदरावरून हात फिरवत तो मंद हसायचा, तर कधी अचानक त्याच्या डोळ्यांत पाणी तरळायचे. आजूबाजूला काय घडत आहे, याचेही त्याला काही वेळा भान राहत नसे. कल्लेश्वराने हाक मारली तरी ती त्याच्या कानांपर्यंत पोहोचायला उशीर होऊ लागला. कधी तर दुसऱ्यांदा हाक मारल्यावरच तो भानावर येई.
मात्र मल्लीच्या वागण्यात होणारे हे बदल आता कल्लेश्वराच्याही नजरेतून सुटत नव्हते. पूर्वी चंद्रिकेच्या आठवणींत हरवणारा मल्ली काही वेळाने पुन्हा भानावर येत असे; पण आता त्याची तंद्री अधिकच वाढू लागली होती. कल्लेश्वराने हाक मारल्यानंतरही तो बराच वेळ प्रतिसाद देत नसे. कधी तर समोर उभं राहून काही विचारलं तरी त्याचं लक्ष तिकडे नसे. सुरुवातीला कल्लेश्वराने याकडे दुर्लक्ष केलं; पण हळूहळू त्याच्या मनात संशय निर्माण होऊ लागला.
मल्लीच्या मनात नेमकं काय सुरू आहे? तो केवळ चंद्रिकेच्या आठवणींत हरवतोय, की त्याच्या मनात आणखी काही विचार आकार घेत आहेत? कल्लेश्वराला मल्लीच्या बदललेल्या वागण्यामागे काहीतरी वेगळंच कारण असावं असं वाटू लागलं. त्याने आता मल्लीकडे अधिक बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली.
************************************************************************************************************************
अभिजितच्या साधनेचे दिवस पुढे सरकत होते; मात्र घरापासून दूर राहिल्यामुळे त्याचे मन अधूनमधून अस्वस्थ होत असे. स्वातीशी बोलणे होत होते, पण मुलांशी फारसा संपर्क नव्हता.
त्या दिवशी संध्याकाळी स्वातीचा फोन आला. “अभिजित, अनन्या ऐकत नाहीये. कितीही समजावलं तरी तिच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे. तुझ्याशी बोलल्याशिवाय ती शांत होणार नाही असं वाटतंय.”
अभिजितने क्षणभर विचार केला. “ठीक आहे. फोन दे तिच्याकडे.”
“हॅलो, पप्पा!”
“काय गं अनन्या? आई म्हणत होती, तू तिचं काही ऐकत नाहीस.”
“आईला उगाच काळजी वाटते. मी काही लहान नाही आता. पप्पा, तुम्ही कधी येणार आहात?”
“अजून काही दिवस लागतील. माझं प्रशिक्षण संपलं की येईन.”
“मग मीच येते तुम्हाला भेटायला.”
“तू? इथे याना जंगलात?”
“हो. चौदा मे ला येणार आहे मी.”
“चौदा मे?”
“हो. माझा वाढदिवस आहे ना त्या दिवशी. तुमच्याशिवाय वाढदिवस साजरा करायचा नाहीये मला. म्हणून आम्ही तुमच्याकडे येणार. नेहाशी बोलले मी, ती पण येणार आहे.”
अभिजित काही क्षण गप्प राहिला. “पण आईला विचारलं आहेस का?”
“अजून नाही. आधी तुम्हाला सांगतेय. तुम्ही हो म्हटलं की आईला सांगते.”
“बरं, आपण बोलू यावर. तू आधी आईशी नीट बोल.”
“पण पप्पा, तुम्ही नक्की असणार ना तिथे?”
“हो. काळजी करू नकोस.”
फोन ठेवताना त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं होतं. पण पुढच्याच क्षणी त्याच्या मनात काहीतरी चमकलं.
चौदा मे...
त्याने फोन पुन्हा हातात घेतला. तारीख मनात घोळू लागली. अचानक त्याला इन्स्पेक्टर हेगडे आठवले. हेगडेकडे असलेली त्या बारा बेपत्ता महिलांची यादी... ती यादी अभिजितनेच तयार केली होती. प्रत्येक नावासमोर जन्मतारीख, शेवटचे ठिकाण आणि इतर तपशील नोंदवले होते.
त्याने त्या यादीतील तारखा आठवण्याचा प्रयत्न केला. एकेक नोंद मनात तपासताना अचानक त्याच्या डोळ्यांसमोर एक तारीख तरळली. अनन्याची जन्मतारीख!
त्याने स्वतः तयार केलेल्या यादीतल्या सातव्या स्त्रीच्या बेपत्ता होण्याची तारीख १४ मे २०१० होती. अधिक मास अमावास्या. आणि तोच अनन्याचा जन्मदिवस होता. यादी तयार करताना त्याचं संपूर्ण लक्ष त्या बारा बेपत्ता आणि मृत स्त्रियांच्या तपशीलांवर केंद्रित झालं होतं. त्यांच्या जन्मतारखा, बेपत्ता होण्याच्या तारखा आणि इतर घटनांमधील साम्य शोधण्यात तो इतका गुंतला होता की यादीत अनन्याची जन्मतारीख कशी आली, याकडे त्याचं लक्षच गेलं नव्हतं.
क्षणभर त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्याने मनात ती तारीख पुन्हा पुन्हा तपासली. १४ मे २०१०.
अभिजितच्या अंगातून जणू सगळी शक्तीच निघून गेली. हातातील फोन कधी सैल झाला, हेही त्याला कळलं नाही. काही क्षणांपूर्वी मुलगी वाढदिवसाला भेटायला येणार, या विचाराने त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू आता पूर्णपणे नाहीसं झालं होतं. त्याच्या डोळ्यांसमोर अनन्याचा चेहरा तरळू लागला. तिचं निरागस हसणं, त्याच्याशी बोलताना केलेला हट्ट आणि वाढदिवसाला भेटण्याची व्यक्त केलेली इच्छा...आता त्या प्रत्येक गोष्टीमागे एक भयंकर शक्यता उभी राहिली होती.
पण त्याच क्षणी त्याच्या मनात आणखी एक विचार चमकून गेला. देवप्पा इतके दिवस काहीतरी लपवत होता. प्रत्येक वेळी तेराव्या विधीचा विषय निघाला की तो काहीतरी सांगायचं टाळत असे. अभिजितला आवश्यक तेवढीच माहिती देत असे; पण काही गोष्टी जाणीवपूर्वक त्याच्यापासून दूर ठेवत असल्याचं त्याला अनेकदा जाणवलं होतं.
आता त्या सगळ्या वागण्याचा अर्थ नव्याने समोर येत होता. देवप्पाला हे आधीपासूनच माहीत होतं का? अनन्याची जन्मतारीख अधिक मास अमावास्येला येते, हे त्याला ठाऊक होतं? आणि म्हणूनच तो इतके दिवस ही गोष्ट अभिजितपासून लपवत होता?
अभिजितच्या मनात संतापाची एक लाट उसळली. जर हे खरं असेल, तर देवप्पाने त्याला आधीच का सांगितलं नाही? अनन्याच्या जीवाला धोका असताना त्याला अंधारात ठेवण्याचा अधिकार देवप्पाला कोणी दिला होता?
पण लगेचच त्याच्या मनात दुसरा विचार आला. कदाचित देवप्पा काहीतरी वेगळंच सांगण्याचा प्रयत्न करत असेल. कदाचित त्याच्याकडे यामागचं असं काही कारण असेल, जे अभिजितला अजून माहीत नव्हतं.
या सगळ्यांचा संबंध केवळ योगायोग असू शकत नव्हता. पण मग इतके दिवस आपणच ज्या धोक्याचा शोध घेत होतो, त्याच धोक्याच्या केंद्रस्थानी आपली मुलगी असू शकते, हे आपल्या लक्षात कसं आलं नाही?
त्याच्या छातीत धडधड वाढली. मनात एकच विचार पुन्हा पुन्हा घुमू लागला. ज्या तेराव्या बळीची कल्लेश्वर वाट पाहत होता... ती अनन्या तर नव्हती ना?
व्वा!!!! अ फा ट!!!!!! लवकर
व्वा!!!! अ फा ट!!!!!! लवकर येऊ द्या पुढचे भाग!
पण मग इतके दिवस आपणच ज्या
पण मग इतके दिवस आपणच ज्या धोक्याचा शोध घेत होतो, त्याच धोक्याच्या केंद्रस्थानी आपली मुलगी असू शकते, हे आपल्या लक्षात कसं आलं नाही? >>> This is scary,
14 मेला काय होणार?.
हा भाग सुद्धा छानच. मस्त सुरू
हा भाग सुद्धा छानच. मस्त सुरू आहे कथा. दिवाळीचा फराळ खात हा भाग वाचला. पुढचा भाग लवकर येऊ द्या.
छानच झालाय हा भाग पण!
छानच झालाय हा भाग पण!
अनन्याची काळजी वाटतेय एकीकडे आणि या लढाईतील कदाचित तीच अभिजीतच ट्रम्प कार्ड असेल असही वाटतय.
पु भा प्र!
बापरे!!!
बापरे!!!
जबरदस्त झालाय हाही भाग
नवीनच हे अनन्या बाबतीत
पण तिला काही होणार नाही असं मन सांगत आहे
भारीय
भारीय
अरे बापरे...
अरे बापरे...
मला नाही वाटत, अनन्या तेरावा
मला नाही वाटत, अनन्या तेरावा बळी असेल.
कथेतील मागचे संदर्भ बघता तस वाटत नाही.
उलट नेहा असू शकेल असं वाटत.
अनन्याचा सहभाग असेल शेवटी पण बळी म्हणून नाही.
कल्लू ची लढाई आता कठीण झाली
कल्लू ची लढाई आता कठीण झाली आहे, पाच आघाड्या त्याला सांभाळणं कठीण होणार आहे. अभिजीत आणि देवप्पा हे उघड शत्रू आहेत त्याचे, मल्ली ला पण सांभाळावं लागेल, आता पोलिस उतरलेत आणि त्याची स्वतःची भीती त्याचा घात करू शकते.
खूप ताकदीने ही कथा साकारली जात आहे.
नितिन खरच छान लिहिता तुम्ही.
तुमच्या सगळ्याच कथा copyright करण्यासाठी पावलं उचला. आजकाल AI जमान्यात कुठून कोण काय उचलून स्वतःच म्हणून सांगू शकतो. तुमच्या कथा मौल्यवान आहेत.
इतके दिवस आपणच ज्या धोक्याचा
इतके दिवस आपणच ज्या धोक्याचा शोध घेत होतो, त्याच धोक्याच्या केंद्रस्थानी आपली मुलगी असू शकते, हे आपल्या लक्षात कसं आलं नाही? >>>बापरे. आता फारच उत्सुकता आणि काळजी लागून राहिली.
कल्लूची साधना सफल होत कामा नये.
पुढचा भाग लवकर टाका
कथेत इतक गुंतला जातोय मी, की
कथेत इतक गुंतला जातोय मी, की चक्क कॅलेंडर वर timeline काढून बघत होतो.
अधिक अमावस्या जून १५ ला. अभिजीत यानाला मुलांच्या परीक्षा संपायच्या सुमारास गेला असेल मार्च मधे. त्यानंतर काही गोष्टी घडल्या पिशाच्च बंधन, अनन्या च विहिरीत पडण वैगरे आणि त्याने ४१ दिवसांच व्रत अमावस्येनंतर सुरू केलं. ती अमावस्या चैत्य अमावस्या एप्रिल १७ ची असायला हवी.
आता १४ मे ला अनन्या आणि नेहा यानाला येणार असतील तर तोवर व्रत पूर्ण होणार नाही.
जबरदस्त शेवट असणार आहे कथेचा..