सुखीराम भेळ!

Submitted by निमिष_सोनार on 2 November, 2026 - 05:03

चला आज शिकूया, सुखीराम भेळ!
त्यासाठी खाली दिलेले पदार्थ लागतात.

पदार्थ:
फरसाण, मोठे मुरमुरे (भडंग), झिरोपेक्षा मोठे बारीक पिवळे शेव, कांदा, टमाटा, कांद्याची पात, चेपलेले उकडलेले बटाटे, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा लाल तिखट, पुदिना चटणी किंवा चिंचेची गोडआंबट चटणी, गाजर, ताजे दही, कुटलेले किंवा अख्खे शेंगदाणे (खारे शेंगदाणे किंवा नारळ पाण्यात भिजवून वाळवलेले गोडचट शेंगदाणे), उकडलेले मक्याच्या कणीसचे दाणे, चाट मसाला, मीठ, लिंबू, कोथिंबीर.

कृती:
एका मोठ्या वाडग्यात फरसाण टाका. त्यात मुरमुरे आणि शेव टाका. त्यात टमाटे, कांदे चिरून टाका. चांगले मिक्स करा. मग त्यात चेपलेले उकडलेले बटाटे टाकून, पुदिना चटणी किंवा चिंचेची गोडआंबट चटणी (किंवा दोन्ही) आणि ताजे दही टाका. मोठ्या चमच्याने चांगले मिक्स करा. मग दोन चार गोड गाजर किसून त्यावर टाका. मग कुटलेले शेंगदाणे किंवा अख्खे खारे/गोड शेंगदाणे टाका. उकडलेले शेंगदाणेसुद्धा चालतील. तुमच्या आवडीनुसार ठरवा. त्यानंतर मक्याच्या कणसाचे उकडलेले गोड दाणे (किंवा उकडलेले कणीस किसून) त्यात टाका आणि चांगले मिक्स करा. त्यावर मीठ, चाट मसाला टाकून मस्तपैकी रसदार लिंबू पिळा. ज्यांना आवडते त्यांनी कोथिंबीर टाका. अन्यथा कांद्याची पात आहेच, ती चिरून टाका.
झाली तुमची सुखीराम भेळ तयार! ही भेळ खाल्ल्यावर तुमचा आत्मा होणार सुखी!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users