आठवणीतला, एक जुना लेख…
थोडासा रुह-ओमानी हो जाय!
‘मरू’स्थल हे नाव सार्थ ठरवणारे वाळवंटी प्रदेश अजिबात आवडत नसल्यामुळे प्रत्यक्षात तर दूरच; पण नकाशात देखील त्या प्रदेशात मी कधी फिरकत नसे. मनुष्य ‘जगू’ शकेल अशा सर्व साधनांचा अभाव असलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या ‘मरु’भूमीला नेमक्या कसल्या आधारावर ‘सहारा’ नाव दिले असावे याचा विचार करताना गंमत वाटायची. बरं, शाळेत हे सगळं भौगोलिक ज्ञान आत्मसात करताना शिक्षकांची शैलीही इतकी रुक्ष होती की त्यापुढे अशी मरुस्थळंदेखील हिरवीगार वाटावीत. अही-मही असुरांच्या जोडगोळीसारखा भूगोलाबरोबर इतिहासही होताच. त्या इतिहासाच्या पुस्तकात घुसवलेल्या कितीतरी अनावश्यक संदर्भातून एक संदर्भ मात्र मला भूगोलाशी जोडता येत असे. महमूद गझनी, घोरी किंवा अब्दाली असे इतिहासातले सगळे कुप्रसिद्ध खलनायक उन्हाच्या काहिलीनं हैराण होऊन केवळ लुटीसाठी नाही तर उन्हाळी सुटीसाठी हिंदुस्थानात वारंवार येत असावेत अशी माझी ठाम समजूत होती. अर्थातच कनवटीच्या चार मोहरा उधळून अंगाची लाहीलाही करून घ्यायला आपणहून असल्या ठिकाणी ‘फिरायला’ जाईन हा विचार कधी स्वप्नातही मनाला शिवला नाही. पण हा योग एकदा यायचाच होता. बहुदा देवानं हातावरची कुठलीतरी रेषा वाळूनं काढून ठेवली असावी.
मायबोलीवरचे 'सरनौबत' आणि मी अगदी परममित्र. गेली बरीच वर्षं ते ओमानमधे तळ ठोकून आहेत. पूर्वी आलमगीरानं सरनौबत नेताजी पालकरांना मुहम्मद कुलीखान बनवून सक्तीनं अफगाणिस्तानच्या मोहिमेवर पाठवून दिलं होतं. इथं पोटानं सरनौबतांवर धर्मांतराची नाही तरी स्थलांतराची सक्ती नक्कीच केली होती. सगळ्या व्यापातून सुटी घेऊन आले की पुण्यात आमची भेट व्हायची. सरनौबतांच्या आग्रहाखातर मस्कत मोहीम मुकर्रर करण्यात आली. सरनौबतांची भेट आणि गप्पा हेच मुख्य उद्दिष्ट असल्यामुळं वाळवंटात काय का आणखी कुठे काय या गोष्टीला फारसं महत्त्व नव्हतं. म्हंटलं, चला मस्कत तर मस्कत! लहानपणी मस्कती डाळिंब असा माफक उल्लेख भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात वाचल्यासारखा आठवायचा; तोही डाळिंब या फळाबद्दल विशेष आपुलकी असल्यामुळे. तेव्हा त्यापलीकडे काही या शहराबद्दल फारशी माहिती नव्हती आणि जाणून घेण्यात तेवढा रसही नव्हता. आखाती देशांत भयाण उन्हाळा असल्यानं तिकडे हिवाळ्यात जावं म्हणजे त्यातल्या त्यात सुसह्य वाटेल इतपतच विचार केला होता. परंतु एकत्र सुट्ट्यांचं गणित काही जमत नव्हतं. मोहीम पुढे ढकलण्यापेक्षा दोन विकांताचे चार दिवस लांबची ठिकाणं आणि बाकीचे दिवस जमेल तसं जवळपास हिंडू असं ठरवलं; आणि फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील अष्टमीला, अर्थात गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार अठराला, पुण्याहून मोहिमेचं ‘रण’शिंग फुंकलं.
मुंबई ते मस्कत अंतरच ते केवढं! एक डुलकी काढून होत नाही तर खाली मस्कतमधले दिवे लुकलुकताना दिसू लागले. पूर्वग्रहदूषित मनात विचार आला, ‘रात्रीचा आलो हे एका अर्थी बरंच झालं; डोळ्यांच्या सर्व कडा व्यापून टाकणाऱ्या वैराण पिवळ्या रंगापेक्षा हा काळा रंग तरी बरा!’ पण हा पूर्वग्रह लवकरच बदलणार होता.
खुद्द सरनौबत जातीनं विमानतळावर घ्यायला आले होते. त्यांच्या तळावर पोहोचेतो रात्रीचे बारा वाजले. ताजंतवानं होऊन आधी साग्रसंगीत जेवणावर आडवा हात मारला; आणि ओमानमध्ये शुक्रवार हा सुटीचा दिवस असल्यामुळे खलबतखान्यात पुढच्या मोहिमांबद्दल मसलत करत बसलो. अर्थात, घरात बसून फक्त मसलती करणं हे काही सरनौबत आणि किल्लेदार दोघांच्याही नावलौकिकास साजेसं नव्हतं. त्यामुळे सकाळची न्याहारी करून आणि सौ. सरनौबतांनी बांधून दिलेली शिदोरी घेऊन ‘अल सवादी’ या समुद्री किल्ल्याकडे कूच केलं .
प्रशस्त रस्ते आणि इमारतींच्या गर्दीतून शहराबाहेर पडलो. वाटलं होतं अगदी तसंच सर्वदूर करड्या, पिवळ्या रंगाचंच साम्राज्य होतं. पैगंबर मुहम्मदानं हिरवा रंग का निवडावा ते अशा ठिकाणी आलं की लगेच कळतं. मस्कतपासून नव्वद किलोमीटरवर ‘अल सवादी’ किल्ला आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बोटीने जाता येतील अशी बेटं हे इथलं वैशिष्ट्य. फेब्रुवारीचा सुखद गारवा आणि भरतीमुळे उचंबळणाऱ्या लाटा अंगावर झेलत छोट्या बोटीतून किल्ला असलेल्या बेटावर पोहोचलो. सुमारे अर्धा तास पायऱ्या चढून माथा गाठला. किल्ल्यावरनं भवताल अतिशय सुंदर दिसत होता. चहूबाजूंना पसरलेला निळाशार समुद्र आणि त्यावर पांढरीशुभ्र नक्षी काढत धावणाऱ्या चिमुकल्या बोटी! भरपूर भटकंती झाल्यावर घरून आणलेल्या मेथी पराठ्यांवर ताव मारला अन् किल्ला उतरून दुपारच्या चहाला घरी पोहोचलोसुद्धा.
हिंडण्या-फिरण्या खेरीज ‘खाणे’ हीदेखील दोघांची समान आवड. एखाद्याकडे दुपारी चारच्या सुमारास गेल्यास ‘काय घेणार?’ हा प्रश्न हमखास असतो. याचं उत्तर ‘चहा, कॉफी का सरबत’ असं अपेक्षित असतं. आम्ही दुपारी भेटतो तेव्हा मात्र ह्या प्रश्नाचं उत्तर ‘रेड लेबल’, ‘सोसायटी’ किंवा ‘वाघ बकरी’ ह्यापैकी एक असतं. एकंदरीत रागरंग बघून फिका किंवा कडक चहा, त्याला साजेशी क्रोकरी, कपात चहा ओतताना एक थेंब देखील बशीत सांडणार नाही ह्याची घेतलेली दक्षता आणि खास सुरीनं सफाईदार कापलेला हिंदुस्थान बेकरीचा प्लेन केक! आमच्या खवय्येगिरीचे असे छत्तीस गुण जुळत असल्यानं अगदी साध्या गोष्टींचा सुद्धा सोहळा होतो.
सरनौबतांनी किल्लेदारांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन पुढच्या आठ दिवसांचा बेत आधीच आखून ठेवला होता. बाहेर पडल्यावर फलाफेल, शावर्मा, फ्राय केलाबिया अशा अरेबिक पक्वान्नांचा मनसोक्त आस्वाद घेतला; तर घरच्या मुदपाकखान्यात सात्त्विक फ्लॉवर-बटाटा रस्श्यापासून राजसिक स्पेशल फिश करीपर्यंत सर्व मेजवान्या रंगल्या. खाण्यापिण्याची आवड असावी, पण वेळ-काळाचं भान ठेऊन हौस पुरवावी, यावर उभयतांचं एकमत होतं. त्यामुळं फिरायला मर्यादित वेळ असल्यास जिभेचे चोचले पुरवण्यापेक्षा मुलुखगिरीलाच प्राधान्य असायचं. म्हणूनच बहला फोर्ट, जबल अखदरसारख्या थोड्या लांबच्या ठिकाणी जाताना घरूनच पराठे, उकडलेली अंडी, संत्री, केक वगैरेंची शिदोरी बांधून बाहेर पडायचो; नाहीतर बऱ्याचदा हॉटेल शोधण्यात आणि जेवण्यात इतका वेळ जातो, की प्रत्यक्ष हिंडायला फारसा वेळच उरत नाही.
गोवा म्हटलं की फेसाळते निळेशार समुद्रकिनारे आणि त्याहून जास्त फेसाळणाऱ्या बिअरचं चित्र चटकन डोळ्यांसमोर उभं राहतं. ओमानमध्येही अतिशय सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. असा निळाशार समुद्र आणि डोक्यावर दुपारचं कडकडीत ऊन असताना हातात बिअर नसणं म्हणजे खरंतर दखलपात्र गुन्हाच मानायला हवा! परंतु ओमानमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास मनाई असल्याने ‘बीचवर बसल्यास’ नंतर सहा महिने ‘तुरुंगात बसावं’ लागू शकतं. त्यामुळं मद्यविरहित बिअर पिऊन दुधाची तहान ताकावर भागवली. सरनौबतांबरोबर गप्पांच्या नशेत तीसुद्धा नेहमीच्या बिअरसारखीच रुचकर लागली.
दोन विकांत हाताशी असल्यानं बऱ्यापैकी मुलुख पादाक्रांत करता आला. ‘जबल अखदर’ आणि पायथ्याशी असलेलं ‘बिरकत अल मौझ’- कालौघात अतिशय जीर्णशीर्ण झालेलं पण तरीही पाय रोवून टिकून राहिलेलं हे पुरातन गाव बघतानाचा अनुभव वेगळाच होता. बहला, जब्रिन आणि अल सवादी हे किल्ले काबीज झाले! तुर्की स्थापत्याची सुरेख झलक दाखवणारी तैमूर मशीद आणि शहराच्या अगदी मध्यवर्ती भागातली अतिशय भव्य आणि देखणी ‘ग्रँड मॉस्क’ बघायचा योग आला. एरवी आखाती देशांचा नुसता उल्लेख झाला, तरी आधी तापलेलं रखरखीत वाळवंट आणि तेलाच्या विहिरी एवढंच आठवतं; मात्र ओमानचं एक वेगळंच निसर्गसौंदर्य अन् ते खुलवायला शहरात जागोजागी सजवलेले रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, नेटाने जपलेली हिरवाई, गर्द निळा समुद्र आणि अतिशय साधी ओमानी अरब माणसं यामुळे माझा पूर्वग्रह पार विरून गेला.
जबल अखदरच्या पायथ्याशी असलेलं बिरकत अल मौझ हे अतिशय पुरातन गाव

आठ दिवसांत घरी आणि कारमधे मनमुराद गप्पा झाल्या. लॉन्ग ड्राइव्ह मध्ये ऐकण्यासाठी खास निवडलेली, आवडीच्या गाण्यांची स्पेशल प्लेलिस्ट बनवली होती ती अजूनही दोघांकडे आहे. पु.ल. ‘गणगोत’ पुस्तकात लिहितात, "वाढत्या वयाबरोबर पुढे जाण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते". असा नॉस्टॅल्जिया या आठ दिवसांत अनेकदा अनुभवला. मस्कत बीचवर रात्री कॉफीचा घोट घेताना डेक्कनवरच्या रुपालीमधली रविवार सकाळ आठवली. ‘जबल अखदर’च्या उंच पर्वतावर, कॉलेजच्या दिवसांतले घामाघूम होत राजगड सर करणारे तरणेबांड सरनौबत आणि किल्लेदार येताना आठवणींत दिसले. वातानुकूलित, ऐसपैस कारमधून भटकतांना, सीए आर्टिकलशिपच्या वेळी तोंडाला फडकी बांधून मोटारसायकलवरनं मारलेल्या पुणे-भोसरीच्या फेऱ्या आठवून गंमत वाटली. तैमूर मशिदीच्या मऊ हिरवळीवर, पुणे विद्यापीठातल्या हिरवागार परिसरातच गप्पा मारत फिरतोय असा भास व्हायचा.
ते आठ दिवस कापरासारखे भर्रकन उडून गेले. ठरवल्यानुसार अनेक गोष्टी घडून आल्या तर काही राहूनही गेल्या. “पुढच्या मस्कत मोहिमेत उरलेली कसर भरून काढू” असं स्वतःला बजावत मस्कतचा निरोप घेतला. मुंबईला जाणाऱ्या विमानात बसल्यावर विचार आला की पुढच्या वेळी ‘दोघांनाही सुट्टी आहे!’ एवढाच निकष ठेवायचा. तिकडे हिवाळा आहे का उन्हाळा असले हिशोब मांडायचे नाहीत. कारण मित्राबरोबर हास्यविनोदाचे तुषार उडत असताना मे महिन्याची टळटळीत दुपार देखील चंद्राप्रमाणे शीतल वाटते.
अब तो तमन्ना-ए-दिल-ए नादाँ है के
यह दोस्ती ला-फ़ानी* हो जाए
जिस्म-ओ-जान गुलज़ार
और रूह ओमानी हो जाए.
*ला-फ़ानी - अमर













तमन्ना-ए-दिल-ए नादाँ करता
तमन्ना-ए-दिल-ए नादाँ करता आमीन.
फोटो खरेखुरे देखील हवे होते
हर्पेन - आपल्या आग्रहाखातर
हर्पेन - आपल्या आग्रहाखातर काही खरेखुरे फोटोही डकवण्यात आले आहेत
अरे वाह मस्तच!
अरे वाह मस्तच!
जब मिल बैठेंगे तीन यार..
किल्लेदार, सरनौबत और मद्यविरहित बिअर
किल्लेदार, मस्कत भेटी बद्दल
किल्लेदार, मस्कत भेटी बद्दल तुम्ही आधी कुठे लिहिले आहे का ? हे वाचल्यासारखे वाटते आहे.
AI made चित्रं अजिबात आवडायची नाहीत, पण तुमचा apt+ asthetic वापर हळूहळू मत बदलायला लावतो आहे.
BTW, मस्कती डाळिंब लिहिलेत
BTW, मस्कती डाळिंब लिहिलेत अन् मस्कती/ ओमानी खजूर विसरलात? त्यातल्या काही जातींचे खजूर हैदराबादेत 16k per Kg ने विकणारे आणि विकत घेणारे आहेत.
… कडक चहा, त्याला साजेशी क्रोकरी, कपात चहा ओतताना एक थेंब देखील बशीत सांडणार नाही ह्याची घेतलेली दक्षता….
याबाबतीत आपल्याच गोत्राचे कुणी सापडल्याचा अतोनात आनंद झाला. मोगँबो ख़ुश हुआ.
आपल्या आग्रहाखातर काही
आपल्या आग्रहाखातर काही खरेखुरे फोटोही डकवण्यात आले आहेत >>
धन्यवाद किल्लेदार.
हे सांगायचे राहूनच गेले होते की किल्लेदार आणि सरनौबत ही नामाभिधाने आवडली आहेत
ऋन्मेऽऽष - नॉन अल्कोहॉलिक बरी
ऋन्मेऽऽष - नॉन अल्कोहॉलिक बरी लागते कधी कधी
अनिंद्य - हो जुनाच लेख आहे. थोडेसे बदल केलेत आणि आवडती चित्र बनवून टाकली. फोटोग्राफी आवडतेच पण त्या नादात अनुभवणं कमी होतं म्हणून आधी अनुभव घ्यायचा आणि थोडी कल्पनाशक्ती वापरून AI चित्र बनवायची. मजा येतेय सध्यातरी.
-खजूरही प्रचंड आवडतो. पण डाळिंबाला एक विशेष स्थान होतं आणि आहे.
- <<<कपात चहा ओतताना एक थेंब देखील बशीत सांडणार नाही ह्याची घेतलेली दक्षता >>>कुणी याला OCD म्हणेल...म्हणू द्यात
हर्पेन - खरंय. आम्ही गंमत म्हणून त्याच भाषेत एकमेकांना इमेल करायचो, करतो.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
एआयनिर्मित फोटो एरवी फारसे आवडत नाहीत, पण हे आवडले.
छान लिहिलंय. मला पण एआय
छान लिहिलंय. मला पण एआय रेखाचित्र आवडली! (थोडी खरीही टाकलीत ते बरे केले पण)
खूप रंजक लिहिले आहे. मस्त
खूप रंजक लिहिले आहे. मस्त वाटलं वाचून