भस्मबीज - भाग २७
पूर्वभाग
कल्लेश्वर जखमी अवस्थेत तो मल्लीच्या गुहेत परततो; मात्र भस्मबीजाच्या शक्तीवर ताबा मिळवण्याचा त्याचा निर्धार कायम असतो. अभिजित ४१ दिवसांच्या वीरशास्ता व्रताची तयारी सुरू करतो. देवप्पाला भस्मबीजाच्या गुप्त विधीतील हरवलेल्या पानाचे रहस्य माहीत असल्याने तो कल्लेश्वरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. तीस वर्षांपासून बेपत्ता असलेल्या पत्नीची फाईल घेऊन मामा पोलीस ठाण्यात पोहोचतात आणि तिच्या खुनासह आणखी अकरा स्त्रियांच्या बळींची केस पुन्हा उघडण्याची मागणी करतात.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग २८ - नवी सुरुवात
"मला तीस वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या माझ्या बायकोची केस परत उघडायची आहे. माझी खात्री झालीय की माझ्या बायकोचा खून झालाय, आणि त्याच परिसरात गेल्या ३३ वर्षांत आणखी ११ महिलांचा बळी दिला गेला आहे." मामांनी एका दमात सगळे सांगितले.
इन्स्पेक्टर हेगडेंनी हातातला पेन खाली ठेवला आणि चष्म्यातून समोर बसलेल्या मामांकडे पाहिले. त्यांनी मामांनी दिलेली फाईल उघडली. पहिल्या पानावरची तक्रार वाचली, मग फोटोकडे पाहिलं. एक साधी, हसरी नवयुवती.
"तीस वर्षे खूप मोठा काळ असतो, भागवत" हेगडे शांतपणे म्हणाले. "तेव्हा तपास झाला असेल ना?"
"झाला होता,"मामा म्हणाले. "तेव्हा पोलिसांनी दोन महिने शोध घेतला. मग निष्कर्ष काढला की ती स्वतःहून निघून गेली आणि केस बंद केली. "
"आणि आता तुम्हाला खून झालाय असं का वाटतंय? तुमच्याकडे काय पुरावा आहे?"
मामा क्षणभर थांबले. नेहाचं स्वप्न, देवप्पाचं नाव,अस्थी, यातल्या कशाचाही उल्लेख पोलीस ठाण्यात करता येणार नव्हता, हे त्यांना माहीत होतं. त्यांनी खिशातून घडी घातलेला एक कागद काढला आणि फाईलवर ठेवला. "माझ्या भाचीच्या एका सहकाऱ्याने काही नोंदी जमवल्या आहेत. उत्तर कन्नड जिल्ह्यात १९९३ पासून बारा स्त्रिया बेपत्ता झाल्या आहेत. नोंदी वेगवेगळ्या ठाण्याच्या हद्दीत झाल्यामुळे कुणाला संबंध लक्षात आला नाही. पण तारखा एकत्र नीट बघा."
हेगडेंनी चष्मा सरळ केला. बोटाने एक एक ओळ खाली गेली. १६ सप्टेंबर १९९३. १५ जुलै १९९६. १३ जून १९९९. १६ ऑक्टोबर २००१...
“या सगळ्या अधिक मासाच्या अमावास्या आहेत," मामा म्हणाले.
"योगायोगही असू शकतो."
"बारा वेळा?"
हेगडेंनी कागदावरून नजर वर केली. "तुम्ही मला नेमकं काय करायला सांगताय, भागवत? गुन्हा तीस वर्षं जुना आहे. साक्षीदार नाहीत, मृतदेह नाहीत."
"मला फक्त एवढंच हवंय, की या सगळ्या फाईलींचा एकमेकांशी संबंध आहे, म्हणून त्यांचा एकत्रित तपास व्हावा. वेगवेगळ्या ठाण्यांत पुरावे न सापडल्यामुळे एकेक फाईल धूळ खात पडलीय."
हेगडेंनी शांतपणे फाईल आणि तो कागद आपल्या बाजूला सरकवला. "ठेवून जा. मी बघतो.”
तो कागद वाचताच त्यांचं बोट एका ओळीवर थांबलं होतं.
************************************************************************************************************************
अमावास्या उलटली आणि वैशाख प्रतिपदेची पहाट उजाडली. अभिजितला कुणीही न उठवता तो स्वतःच जागा झाला होता. पावलांखालची ओली माती थंडगार लागत होती, ओढ्याच्या पाण्यात उतरताच ती थंडी पायांपासून थेट हाडांपर्यंत पोहोचली. आंघोळ उरकून त्याने काळं धोतर नेसलं आणि वर निळा अंगरखा चढवला.
तो अंगणात परतला तेव्हा सूर्य डोंगराच्या माथ्यावर नुकताच उगवत होता.
अभिजित काही न बोलता चटईवर मांडी घालून बसला. हातातलं भस्मशैल ऊबदार लागत होतं. त्याने डोळे मिटले आणि आणि मन एकाग्र करून मंत्रोच्चारण सुरु केले.
"ॐ हं पं रं क्ष्रौं कौं सं खं हरिहरपुत्राय नमः।
ॐ वीरशास्ते महाशक्तये रणरङ्गोद्धुरेशाय नमः॥"
जप संपेपर्यंत ऊन अंगणात उतरलं होतं. मग दिवस नेहमीसारखाच सुरू झाला, पण अंगावरचं खरबरीत कापड, पायाखालची तापलेली जमीन आणि अनवाणी चालण्याची जाणीव त्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देत राहिली की आता इथून पुढचे दिवस पूर्वीसारखे नसणार. दुपारी यल्लप्पाने समोर आणून ठेवलेलं साधं सात्त्विक जेवण त्याने शांतपणे घेतलं. संध्याकाळी उन्हं कलली, सावल्या लांबल्या, पहिला दिवस तसा सहज गेला होता. असे तीन दिवस झाले. चौथ्या रात्री चटईवर आडवा होऊन छताकडे बघत असताना अचानक त्याला स्वातीचा चेहरा आठवला; मुंबईतलं घर, खिडकीतून येणारा सकाळचा उजेड, आणि तिचं हसणं.
त्याने तो विचार दाबला. मग नेहाचा चेहरा डोळ्यांसमोर येऊ लागला. तोही त्याने प्रयत्नपूर्वक दाबला, पण त्याच्या जागी आणखी तीन विचार उठले. ते दाबले, तर मन आणखीनच भरकटू लागलं. त्याने एक दीर्घ श्वास सोडला आणि विचारांशी झगडणं थांबवलं. स्वातीचा चेहरा पुन्हा समोर आला, थोडा वेळ तिथेच रेंगाळला, आणि मग ढगासारखा पुढे सरकला. त्याच्या मागोमाग नेहाचा विचार आला, तोही तसाच निघून गेला. डोळे केव्हा जड झाले, हे त्याला कळलंही नाही; जाग आली तेव्हा पहाट झाली होती.
************************************************************************************************************************
अनन्या त्या दिवसानंतर हळूहळू बरी होत गेली; गालावर पुन्हा रंग आला आणि ती पूर्वीसारखीच अथर्वशी भांडू लागली, पण स्वातीला दिसत होतं की ती थोडी शांत झाली आहे, आणि पूर्वी जितकं बोलायची त्यापेक्षा आता कमी बोलते.
एका संध्याकाळी स्वाती धुतलेले कपडे घड्या घालत बसली होती, तेवढ्यात अनन्या येऊन तिच्या शेजारी बसली.
"आई."
"हं?"
"बाबा खरंच ट्रेनिंगला गेलेत ना?"
स्वातीचे हात थांबले. "हो गं. का?"
"बाबांनी गेल्यापासून एकदाही व्हिडिओ कॉल केला नाही. तुम्ही माझ्याशी असे वेगळे का वागताय." अनन्या शांतपणे म्हणाली.
"तिथे रेंज..."
"रेंज नसते, मला माहितीये." अनन्याने तिच्याकडे बघितलं. "आई, मी लहान नाही."
मुलीच्या डोळ्यांतलं ते स्थिर, खोल पाहणं स्वातीला नवीन वाटलं आणि त्यावर काय बोलावं हे तिला सुचेचना.
"मी मोठी झालेय, मला सगळं कळायला हवं," अनन्या म्हणाली. आणि मग काही क्षण गप्प राहून तिने आईच्या डोळ्यांत पाहिलं. "मला माहितीये, आई. त्या दिवशी मी विहिरीत पाय घसरून पडले नव्हते."
स्वातीच्या हातातला कपडा खाली घसरला. तिने तो उचलायचाही प्रयत्न केला नाही; तिच्या छातीत जोरात धडधडू लागले.
"अनन्या, तू काय..."
"मला सगळं आठवतंय आणि मला हेही माहितीये की तुम्ही मला खरं सांगत नाही," अनन्या म्हणाली, तिचा आवाज थरथरत होता. "मला बाबांना भेटायचंय. पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस आहे. बाबा येतील ना?"
"बघू."
"बघू म्हणजे नाही." अनन्याचा आवाज आता अधिक ठाम झाला. "ठीक आहे. मग आपणच जाऊ त्यांना भेटायला."
"अनन्या..."
"मला सगळं कळायलाच हवं," ती उठली, एक क्षण आईकडे पाहिलं आणि खोलीबाहेर निघून गेली. स्वाती बराच वेळ तशीच बसून राहिली; वाढदिवसाला अजून महिन्याभराचा अवधी होता, पण तोपर्यंत अभिजितचं व्रत चालू असणार होतं. तिला हो म्हणता येत नव्हतं आणि नाही म्हणण्याचं कारण सांगता येत नव्हतं. देवप्पांना सगळं माहीत होतं, पण ते सांगण्याची वाट बघत बसून चालणार नाही, कारण अनन्या गप्प बसणार नाही, उद्या ती स्वतः उत्तर शोधायला निघेल.
************************************************************************************************************************
लेप लावायला सुरुवात करून आता पाच दिवस झाले होते. रात्री लेप लावायला सुरुवात केली तेव्हा मल्लीच्या बोटांखाली कसलेच वळ लागले नाहीत; पाठीची त्वचा पूर्वीसारखी गुळगुळीत झाली होती आणि दंडावरच्या व्रणांच्या जागी आता फक्त फिकट पांढऱ्या रेषा उरल्या होत्या.
"बाबा, जखमा भरल्यात आता." मल्ली म्हणाला.
कल्लेश्वराने खांदे फिरवले, पाठ ताठ केली, आणि काही न बोलता गुहेच्या भिंतीकडे तोंड करून मांडी घालून बसला. "उद्यापासून तीन दिवस मी जंगलात साधना करायला जातोय. माझी वाट बघू नकोस मल्ली आणि हांडी जोग्यांपैकी कुणी काही विचारलं तर बाबा साधना करायला गेलेत परत कधी येतील ते माहित नाही असे सांग"
"ठीक आहे बाबा" असे म्हणत मल्ली चटईवर आडवा झाला. मध्यरात्री मल्लीला कसल्यातरी आवाजाने जाग आली. कुणीतरी बोलत होतं, अगदी हळू, झोपेत बोलल्यासारखं, मल्लीने बाबांकडे बघितले; बाबा बसलेलेच होते, डोळे मिटलेले, ओठ किंचित हलत होते.
"गुरुजी... मी चुकलो नाही...."
मल्ली श्वास रोखून ऐकत राहिला.
"मी चुकलो नाही... तुम्ही..."
शब्द तिथेच थांबले आणि गुहेत पुन्हा शांतता पसरली. मल्ली बराच वेळ छताकडे बघत राहिला, कारण बाबांना गुरू होते हे त्याने कधी ऐकलं नव्हतं, आणि त्याला जाणवलं की इतक्या वर्षांत बाबांनी त्याला स्वतःबद्दल काही सांगितलं नव्हतं.
संध्याकाळ उतरली तेव्हा कल्लेश्वर गुहेच्या तोंडाशी उभा राहून बराच वेळ क्षितिजाकडे बघत राहिला, मल्ली त्याच्या मागे येऊन थांबला.
"बाबा, तुम्ही कुठे जाताय?"
"स्मशानात," कल्लेश्वर म्हणाला, आणि त्याने मागे वळूनही पाहिलं नाही. "शरीराच्या जखमा भरून निघाल्या मल्ली आता मनाला पुन्हा उभारी द्यायचीय. त्या म्हाताऱ्याने मला धूळ चारलीय. जोपर्यंत मी स्वतःचा कमकुवत झालेला आत्मविश्वास पुन्हा मिळवत नाही, तोपर्यंत समोरच्याला कसा जिंकणार?"
"मी येऊ?"
"नाही. तू इथेच थांब."
तो अंधारात उतरत गेला आणि मल्लीला त्याच्या पाठीकडे पाहताना नकळत वाटलं की गेल्या काही दिवसांत त्याने बाबांना पहिल्यांदाच इतकं एकटं चालताना पाहिलं आहे.
कल्लेश्वर पुन्हा नदीकाठच्या त्या जुन्या स्मशाना जवळ पोहोचला होता. नदीकडून येणारा वारा राखेचा आणि ओलसर मातीचा वास घेऊन येत होता.
याआधीही अनेक वेळा हा विचार त्याच्या मनात आला होता आणि त्याने तो वेळोवेळी टाळला होता पण आता त्याच्याकडे पर्याय नव्हता, या पराभवाच्या चक्रातून बाहेर पडायचे असेल तर त्याला हे करणं भाग होतं. शेवटी मनाशी निश्चय करून कल्लेश्वराने एका जुन्या चितेच्या थंड राखेवर मांडी घातली, भोवती भस्माचं वर्तुळ आखलं, आणि हातातल्या कमंडलूतून थोडं पाणी राखेवर शिंपडलं. मग डोळे मिटून तो खालच्या, एकसुरी आवाजात जप करू लागला.
“ॐ नमो गुरुदेवाय नमः।
तमसो मार्गं दर्शय,
साधनासिद्धिं प्रदर्शय।
गुरुशक्तिः प्रबोधय,
ॐ ह्रीं अघोरगुरवे हुं फट्॥”
तो जप करत राहिला, तास सरत गेले, आणि मध्यरात्रीच्या सुमारास विचित्र शांतता पसरली. नदीचा आवाज बंद झाला, पानं हलेनाशी झाली, आणि समोरच्या अंधारातून हळूहळू एक आकृती पुढे आली; पांढरी दाढी, काळे डोळे, कपाळावर भस्माची आडवी रेघ. त्याचे गुरुजी.
"कल्लेश्वरा," आकृती म्हणाली.
कल्लेश्वराचा जप थांबला. त्याच्या अंगावर काटा आला, तो गेली कित्येक वर्षं ज्या आवाजापासून पळत होता हा तोच आवाज होता.
"तू चुकलास," गुरुजी म्हणाले. "ज्या ग्रंथाला हात लावू नकोस म्हणालो होतो, तोच तू वाचलास. आणि आता तू ज्या वाटेवर आहेस, तिथे परतीचं दार नाही. पराभूत झालास तरी तू वाचणार नाहीस, आणि जिंकलास तरी नाही."
"तुम्ही मला हाकललंत, गुरुजी... मी चुकलो नाही, मी फक्त वेगळं शिकण्याचा प्रयत्न केला" कल्लेश्वर म्हणाला, त्याचा आवाज कापत होता.
मग तो वर्तुळाच्या काठावर गुडघ्यांवर बसला आणि पहिल्यांदाच आपली मान त्या आकृतीसमोर झुकवली, कारण त्याला जाणवलं की इतकी वर्षं तो जी गोष्ट मनात दाबून धरत होता, ती आता बाहेर यायला मागत होती. "मी तुमचा सर्वांत आवडता शिष्य होतो, गुरुजी. आपल्या लाडक्या शिष्याची चूक पदरात घाला. तुमचा शाप मागे घ्या. इतके दिवस मला मिळणाऱ्या अपयशाचं कारण तुमची अवकृपा आहे, हे मला आता कळतंय."
"मी तुला शाप दिला नव्हता, कल्लेश्वरा," ते म्हणाले. "तुझ्या अपयशाचं कारण तू निवडलेली वाट आहे. पण तू माझा लाडका शिष्य होतास, हे मी विसरलेलो नाही." कल्लेश्वराच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं.
"तुला एक उपाय सांगतो," गुरुजी म्हणाले. "उग्र तारेची साधना. पंधरा रात्री."
कल्लेश्वराने चमकून वर पाहिलं. "उग्र तारा?"
"या साधनेसाठी आधी ५ लाख गुरुमंत्राचा जाप आवश्यक आहे जो तू आश्रमात असताना पूर्ण केलेला आहेस, म्हणूनच मी तुला ही परवानगी देतो," गुरुजी म्हणाले. "रोज रात्री या स्मशानात यायचं, राखेच्या वर्तुळात दक्षिणेकडे तोंड करून बसायचं, रोज १०८ माळा जप करायचा. आणि सूर्योदयापर्यंत त्याबाहेर पाऊल टाकायचं नाही.”
मग त्यांनी हळू आवाजात त्याच्या कानात साधनेचा मंत्र सांगितला, ॐ ह्ल्रीं ह्ल्रीं उग्र तारे क्रीं क्रीं फट्।
"ही साधना सौम्य नाही. रात्रीगणिक तुला भास होतील, पावलांचे आवाज येतील, सावल्या दिसतील, आणि पंधराव्या रात्री ती षोडशवर्षीय बालिकेच्या रूपात येऊन विचारेल, "तू मला का बोलावलंस?" पण तू ५१ माळा पूर्ण होईपर्यंत उत्तर देवू नकोस. एकदा ही साधना पूर्ण केलीस तर तुला पुन्हा कुणीही भीती घालू शकत नाही.”
"पण लक्षात ठेव," गुरुजींचा आवाज कठोर झाला. "हा उपाय फक्त तुझ्या रक्षणासाठी आहे, आक्रमणासाठी नाही. याच्या बळावर तू कुणावर घाव घातलास, तर तो तुझ्यावरच उलटेल."
"आज्ञा, गुरुजी," कल्लेश्वर म्हणाला, पण "वचन देतो" असं त्याने म्हटलं नाही.
गुरुजींच्या नजरेत क्षणभर काहीतरी हलल्यासारखं झालं, जणू त्यांनाही ते जाणवलं होतं, आकृती हळूहळू धूसर होत गेली आणि अंधारात विरली.
कल्लेश्वर उभा राहिला. त्याचा श्वास जड झाला होता, कपाळावर घाम आला होता, पण त्याचे हात आता थरथरत नव्हते. तो वर्तुळाबाहेर पडला, नदीकडे वळला, आणि काही क्षण पाण्याकडे बघत राहिला, इतक्या वर्षांत पहिल्यांदा त्याला वाटलं की त्या नाकारलेपणाचं वजन थोडं हलकं झालंय.
आता तो गुरुजींनी सांगितलेली साधना करणार होता ज्यामुळे त्याच्या मनातील भय समूळ नष्ट होईल.
************************************************************************************************************************
रात्री अंगणात देवप्पा नेहमीप्रमाणे मन एकाग्र करत बसला होता, डोळे समोरच्या मिणमिणत्या दिव्यावर स्थिर. यल्लप्पा दाराबाहेर उभा होता, कारण देवप्पानी सांगितलं होतं की आज रात्री कुणीही आत यायचं नाही.
देवप्पाने पाठ ताठ केली, डोळे मिटले आणि मोहिनी शक्तीला आवाहन केलं. ही दूरसंमोहनाची शक्ती त्याला अत्यंत सौम्यपणे, हळुवारपणे वापरायची होती नाहीतर कल्लेश्वरला चाहूल लागायची.
तो मल्लीच्या मनात कुठलाही आवाज न पेरता, कुठलाही शब्द न उच्चारता फक्त त्याच्या विचारांच्या प्रवाहाला अत्यंत सूक्ष्म , जवळजवळ न जाणवणारी दिशा देत होता.
तो मल्लीला धूसरपणे पाहू शकत होता, गुहेतल्या दगडी भिंतींच्या सावलीत, चटईवर आडवा होऊन मल्ली छताकडे डोळे लावून बसलेला आणि त्याच्या मनात विचारांची ती अस्थिर, अर्धवट रांग वाहत होती. भूक, थकवा, बाहेरचा वारा, आणि कुठेतरी खोलवर एक जुना, न उमटलेला प्रश्न. देवप्पाने तो प्रश्न शोधला, आणि त्यावर अलगद प्रकाश टाकला, तेवढाच की मल्लीचं लक्ष त्याकडे जावं, जास्त नाही.
मल्लीच्या मनात एक विचार उमटला, जो त्याला स्वतःचाच वाटला. बाबा नेहमी म्हणतात, आणखी थोडं थांब. आता आणखी किती थांबायचं?
त्याची नजर गुहेच्या कोपऱ्यात घडी घातलेल्या निळ्या साडीकडे गेली, आणि त्याला वाटलं की बारा विधी झाले, बारा वेळा बाबांनी "आणखी थोडं" म्हटलं, तरी चंद्रिकेची अजून साधी चाहूलही जाणवली नाही; त्याला त्या विचाराचा स्रोत जाणवला नाही, आणि तिथेच देवप्पाला कळलं की साधना खरोखर लागू होते आहे, कारण मल्लीला या प्रवाहात कुठलाही परकेपणा जाणवत नव्हता.
देवप्पा एवढ्यावरच थांबला, जास्त घाई केली तर हा एक पर्याय बाद व्हायचा, आणि देवप्पाला भस्मबीजाला थांबवायचे सगळे पर्याय खुले ठेवायचे होते.
देवप्पाने आपली साधनेची पकड सैल केली.
"यल्लप्पा, पाणी" देवप्पा धापा टाकत म्हणाला, आणि पाणी प्यायल्यावर तो म्हणाला, "आज एक विचार वळवणे शक्य झाले यल्लप्पा. उद्या आणखी पुढचा प्रयत्न करू. पण घाई करून चालणार नाही नाहीतर तो ओळखेल."
"कोण, गुरुगळे? कल्लेश्वर?"
"नाही," देवप्पा म्हणाला. "मल्ली. हळूहळू तो माझ्या नियंत्रणात येतोय."
************************************************************************************************************************
रात्री उशिरापर्यंत कुमठा पोलीस स्टेशनात दिवे चालू होते. हेगडेंनी हवालदाराला घरी पाठवलं, आणि केबिनचं दार आतून लावलं. मामांनी ठेवलेला कागद टेबलावर पसरला होता. बाजूला लीलाची फाईल.
तारखा पुन्हा वाचताना त्यांचा हात एका ओळीवर थांबला. १३ जून २०१८. ते हळूहळू खुर्चीत मागे रेलले. ड्रॉवर उघडला आणि तळाशी ठेवलेली एक छोटी, मळकट डायरी बाहेर काढली. त्यांच्या सिरसीतल्या दिवसांची. तेव्हा त्यांना या प्रकरणाचा कसलाच संबंध माहित नव्हता.
१३ जून २०१८. त्या दिवशी बेपत्ता झालेल्या विजया या शिक्षिकेची फाईल त्यांनी कसलेच पुरावे मिळाले नाहीत म्हणून बंद केली होती. त्यांच्या कारकिर्दीत मोजक्याच न सुटलेल्या केसपैकी एक. त्या फाईलच्या पहिल्या पानावर तिची जन्मतारीख होती - १६ सप्टेंबर १९९३, म्हणजे यादीतली पहिलीच तारीख.
सकाळी हेगडे ठाण्यात आले तेव्हा त्यांचे डोळे लाल होते, रात्रभर ते यादी आणि सिरसीची डायरी यांच्यात अडकले होते, चहा आल्यावर त्यांनी पहिला फोन अंकोल्याच्या ठाण्यात लावला, जिथले पीएसआय त्यांच्या ओळखीचे होते.
"तुमच्या हद्दीत १६ सप्टेंबर १९९३ ला एखादी महिला बेपत्ता झाली होती का? जुनं रजिस्टर बघून सांगा."
वीस मिनिटांनी फोन आला. "साहेब, होती. एका बाईची तक्रार होती. फाईल पुरावे सापडले नाहीत म्हणून बंद केलीय."
हेगडेंनी डोळे मिटले आणि यादीतल्या पहिल्या तारखेसमोर एक खूण केली, आणि मग दुसरा फोन होनावरला, तिसरा सिद्धापूरला, आणि दर वेळी त्यांना तेच उत्तर मिळाले.
दुपारपर्यंत हेगडेंच्या टेबलावर चार नावं जमली होती, वेगळ्या ठाण्यांच्या हद्दीतली, वेगळ्या वर्षांतली, ते खुर्चीत मागे रेलून बराच वेळ पंख्याकडे बघत राहिले, कारण ही बारा प्रकरणं एका धाग्यात बांधलेली होती आणि तो धागा तेहतीस वर्षांपासून कुणाच्याच नजरेत आला नव्हता. भागवत बरोबर बोलत होते, प्रत्येक फाईल वेगळ्या कपाटात धूळ खात पडली होती, आणि त्यातली एक फाईल त्यांच्याच हातांनी बंद केली होती.
त्यांना विजयाची आई आठवली, जी सिरसीच्या ठाण्यात दर आठवड्याला यायची; न बोलता एका बाकावर बसून राहायची, आणि हेगडे तिला प्रत्येक वेळी "शोध चालू आहे" असं सांगायचे.
त्यांनी समोरचा फोन उचलून मामांचा नंबर लावला, "भागवत, सिनियर इन्स्पेक्टर हेगडे बोलतोय. मला ज्याने ही यादी तयार केली त्याच्याशी बोलायचंय. कुठे भेटेल ही व्यक्ती?"
नवीन भाग मस्त . वेगेवेगळ्या
नवीन भाग मस्त . वेगेवेगळ्या स्तरावर घटना घडत आहेत . मजा येतेय वाचायला.
मल्ली ला बरेच प्रश्न पडतील आता. तुमचं डिटेलिंग वाचताना प्रत्येक दृश्य डोळ्यासमोर उभे रहाते.
या भागासाठी रोज किती तरी वेळा
या भागासाठी रोज किती तरी वेळा मायबोली साइट सुरू झाली का हे बघत होते.
आला बाबा फायनली नवीन भाग.
आला बाबा फायनली नवीन भाग. बरीच वाट पाहत होतो.
डिटेलिंग जबरदस्त आहे नेहमीप्रमाणे.
देवप्पाने अचूक निशाणा साधला आहे. त्याला त्यात यश मिळो.
छान. हा भाग सुद्धा मस्त जमलाय
छान. हा भाग सुद्धा मस्त जमलाय. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
यंदाच्या दिवाळीत फराळ करत या कथेचे भाग वाचेन.
छान झालाय हाही भाग
छान झालाय हाही भाग
पु भा प्र
वेग जरा कमी आहे कारण घटना आता स्थिरावल्या आहेत
तयारी सुरु आहे
झकास. वाचतोय.
झकास.
वाचतोय.
वेग वेगळ्या ठिकाणी, वेग
वेग वेगळ्या ठिकाणी, वेग वेगळ्या स्तरावर कथा पुढे जातेय
हे एखाद्या पटकथे सारख वाटतं, खरच कुणीतरी ह्याच्यावर webseris बनवायला हवी.
मस्त झालाय हा ही भाग
मस्त झालाय हा ही भाग
वेगवेगळ्या घटना घडत आहेत
सगळे एकत्र येईल नंतर.
गुरूंना बोलवायला कल्लूने कोणती साधना केली ते कळले नाही फक्त.