MRPच्या नावाने होणारी लूट : ग्राहक संरक्षणाच्या कायद्यानेच निर्माण केलेला नवा बाजार?
तुकाराम मुंढेंनी उघड केलेली वैद्यकीय क्षेत्रातली लूट ही अनेकदा बोलून दाखवली गेलेली आहे. मुंढेंमुळे त्याला सरकारी आवाज मिळाला. हा कायदेशीर दरोडा आहे. अन्य लुटींबाबात जे पांढरपेशे सात्विक संतापाने व्यक्त होतात ते अशा लुटीबाबत गप्प राहतात. इतरांच्या गैरकृत्यांबद्दल भरभरून बोलणारे लोक आपल्या धंद्यातल्या गैरकृत्यांच्या बाबतीत एक तर मौनात जातात किंवा चक्क बचाव करू लागतात , मग ते स्कॅम मधे सहभागी असोत वा नसोत. मात्र वैद्यकीय क्षेत्रातल्या या स्कॅम बद्दल कायद्याने कारवाई का करता येत नाही हे समजण्यासाठी एम आर पी म्हणजे काय, ती का आणली, कायद्याचा उद्देश काय होता आणि हाच कायदा लुटीसाठी सरकारी संरक्षण कसा बनला हे जाणून घ्यावे लागते.
(मुंढेंच्या निमित्ताने हा विषय पुढे आला असेल तरी एम आर पी स्कॅम खूप व्यापक आहे. त्यामुळे फक्त वैद्यकीय क्षेत्रासाठी इतर धाग्यावर लिहीता येईलच. इथेही ना नाही. मात्र वैद्यकीय घोटाळ्यामुळे एमआरपीचा विषय बाजूला पडू नये ही अपेक्षा.)
----------------------------------------------------------------------------------------------------------------
पॅकेटवर छापलेली MRP म्हणजे त्या वस्तूची किंमत नाही. ती त्या वस्तूसाठी ग्राहकाकडून आकारता येणारी कमाल किरकोळ किंमत आहे. म्हणजेच दुकानदाराला MRPपेक्षा कमी दराने वस्तू विकण्यास कायद्यात कोणतीही मनाई नाही. उलट MRP ही कमाल मर्यादा आहे, विक्रीची सक्तीची किंमत नाही.
पण प्रत्यक्ष बाजारात चित्र वेगळे दिसते. अनेक ठिकाणी MRP ही कमाल मर्यादा न राहता वस्तूची नेहमीची आणि जवळजवळ अंतिम किंमत बनली आहे. त्यामुळे MRPच्या व्यवस्थेतील सर्वात मोठा प्रश्न केवळ MRPपेक्षा जास्त पैसे आकारण्याचा नाही. त्यापेक्षा मोठा प्रश्न असा आहे की MRP ठरवलीच कशी जाते आणि ग्राहकाला त्या किंमतीपेक्षा कमी दर मिळण्याची बाजारातील शक्यता किती उरते?
MRPची सुरुवात कशासाठी झाली?
भारतामध्ये पॅकेज्ड वस्तूंवर किंमत, वजन, उत्पादकाची माहिती आणि इतर तपशील देण्याची कायदेशीर व्यवस्था 1970च्या दशकात निर्माण झाली. Standards of Weights and Measures Act, 1976 आणि त्याखालील Packaged Commodities Rules, 1977 ही त्याची प्रमुख साधने होती.
25 मे 1990 रोजी नियमांमध्ये महत्त्वाची दुरुस्ती करण्यात आली. Retail Sale Price म्हणजे पॅकेज्ड वस्तू अंतिम ग्राहकाला विकता येणारी कमाल किंमत अशी व्याख्या करण्यात आली. या किंमतीमध्ये करांबरोबरच वाहतूक खर्च, डीलरचे कमिशन, जाहिरात, पॅकिंग, डिलिव्हरी आणि तत्सम खर्च समाविष्ट करण्यात आले.
या व्यवस्थेचा मूलभूत विचार साधा होता. ग्राहकाला पॅकेटवरच कमाल किंमत दिसली पाहिजे आणि दुकानदाराने त्या किंमतीपेक्षा अधिक रक्कम मागता कामा नये. ग्राहकाला किंमत लपवून, मनमानी पद्धतीने किंवा बाजारातील टंचाईचा फायदा घेऊन अधिक पैसे आकारण्यापासून संरक्षण देणे हा त्यामागचा प्रमुख हेतू होता.
न्यायालयीन नोंदीतही या वजनमापाच्या कायद्यामागे ग्राहकांचे संरक्षण हा उद्देश असल्याचे स्पष्टपणे नमूद झाले आहे.
डोंगराळ / दुर्गम भागात किंवा पर्यटन स्थळी MRPचा अर्थ काय होता?
समजा एखाद्या दुर्गम डोंगरी गावात एखादी पाण्याची बाटली शहराच्या तुलनेत अधिक खर्च करून पोहोचते. वाहतूक महाग आहे, दुकानांची संख्या कमी आहे आणि ग्राहकाकडे पर्याय मर्यादित आहेत.
अशा परिस्थितीत पूर्वी दुकानदाराला वस्तूची किंमत मनमानी पद्धतीने वाढवण्याची संधी असू शकते. MRPची कमाल मर्यादा अशा व्यवहारावर लगाम घालते.
ही कल्पना ग्राहकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
पण इथे या व्यवस्थेचा दुसरा परिणाम सुरू होतो.
जर उत्पादकाने एखाद्या वस्तूसाठी देशभर एकच MRP छापली, तर त्या MRPमध्ये वाहतूक, वितरण, डीलर कमिशन आणि इतर खर्चांचा समावेश करता येतो. त्यामुळे दूरच्या प्रदेशात विक्री करताना होणारा अतिरिक्त खर्च MRPमध्ये आधीच सामावला जाऊ शकतो. ही किंमत पर्यटकांची किंवा दुर्गम प्रदेशातल्या स्थानिकांची लूट थांबवण्यासाठी आहे. पण या किंमतीला मुंबई पुण्यात ती वस्तू विकलीच पाहीजे हा या कायद्याचा उद्देश नाही.
म्हणजे दुर्गम भागातील ग्राहकाचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेली कमाल किंमत मैदानी भागातील ग्राहकासाठीही तीच कमाल मर्यादा बनते.
कायदा मात्र दुकानदाराला तीच किंमत आकारण्यास सांगत नाही. पण या किंमतीला दुर्गम / डोंगराळ/ पर्यटन क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी विकू नये असे कायद्यात कुठेही म्हटलेले नाही. म्हणजे जो उद्देश सांगितला आहे तो कायद्यात उतरलेला नाही.
आपण वर्षातून एकदा सिमला, मनाली, महाबळेश्वर अशा ठिकाणी जाऊ. तेव्हां आपली लूट झाली नाही हे समाधान आहे. पण बाकीचे वर्ष आपण राहतो तिथे पर्वतीय किंमतीला वस्तू घ्यावी लागते याचा आपल्याला ना खेद ना खंत.
बाजाराने तशी सवय लावून घेतली आहे. ग्राहकानेही मान्य केले आहे.
MRP कमाल किंमत होती, पण तीच विक्रीची किंमत कशी बनली?
ही MRP व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाची विसंगती आहे.
कायद्याने MRP ही कमाल किंमत ठरवली. परंतु ग्राहकाच्या मनात पॅकेटवर छापलेली किंमत हीच वस्तूची किंमत बनली. कायद्याने एमआरपी डोंगराळ भाग, पर्वतीय क्षेत्र, दुर्गम भाग, पर्यटक क्षेत्राव्यतिरिक्त किंमत छापायला सांगायला हवी होती. किंवा मुंबई, पुणे, चंदीगढ, चेन्नई अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पॅकेजिंग असायला हवे होते.
उदाहरणार्थ एखाद्या वस्तूवर 100 रुपये MRP छापलेली असेल आणि दुकानदाराला ती 70 किंवा 80 रुपयांना मिळत असेल, तर ग्राहकाला ती 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळू शकते. परंतु प्रत्यक्षात अनेक व्यवहारांत 100 रुपयेच मागितले जातात. एम आर पी येण्याआधी एक केस स्टडी वाचला होता. बहुधा ग्राहक पंचायतीशी संबंधित असेल.
एखादी वस्तू समजा टिव्ही जर दहा हजार रूपयांना ग्राहकाला मिळत असेल तर स्टॉकिस्टला तो पाच हजारांना, डिस्ट्रीब्युटरला साडेपाचहजारांना, रिटेलरला आठ हजारांना मिळतो. पुढे रिटेलर डिस्काउंट देत असेल तर ते आपल्या नफ्यातून.
आता एम आर पी आली. एम आर पी ने याच वस्तूची किंमत चौदा हजार झाली. तर पूर्वी रिटेलरचं मार्जिन दोन हजार रूपये होतं. ते आता थेट सहा हजार रूपये झालंं. हे वरचे चार हजार रूपये त्याला कायद्याने दिले. ते पर्वतीय क्षेत्रासाठी होते. आता दुकानदार दोन हजार डिस्काउंट देत असेल तरी त्याला त्याचं दोन हजाराचं मार्जिन मिळतंच आहे, वरून दोन हजारांची कमाई होतेय.
काही जण म्हणतील कि स्पर्धेमुळे किंमती नियंत्रित राहतात. तर व्यापार्यांच्या असोसिएशन्स असतात. ते कसे फतवे काढतात याची माहिती घ्या. म्हणजे स्पर्धा कितपत संरक्षण देते हे लक्षात येईल.
इथे कायद्याचे उल्लंघन होत नाही. पण ग्राहकाला मिळणाऱ्या किंमतीवरील स्पर्धा कमी होते.
MRP ही सीलिंग प्राईस असताना बाजाराने तिलाच बेस बनवला.
यातून ग्राहक संरक्षणाची एक विचित्र उलट बाजू निर्माण होते. MRP पेक्षा जास्त किंमत आकारण्यावर कायदेशीर मर्यादा आहे, पण MRPपेक्षा किती कमी किंमतीत वस्तू विकली पाहिजे यावर अशी मर्यादा नाही.
म्हणून MRP ग्राहकाला जास्त पैसे देण्यापासून संरक्षण देते. पण नैतिक आधारभूत किंमतीची हमी देत नाही.
MRP ठरवतो कोण?
MRP सरकार प्रत्येक वस्तूसाठी ठरवत नाही. पॅकेज्ड वस्तूची MRP उत्पादक, पॅकर किंवा आयातदाराच्या स्तरावर ठरते.
MRP 100 रुपये छापली आहे म्हणजे त्या वस्तूची निर्मिती किंमत 100 रुपये आहे, असा त्याचा अर्थ नाही.
उत्पादन खर्च, वाहतूक, कर, वितरण, डीलर कमिशन, जाहिरात आणि इतर खर्चांचा विचार करून MRP ठरवली जाते. त्यामुळे एका वस्तूची प्रत्यक्ष निर्मिती किंमत आणि तिची MRP यांच्यामध्ये मोठे अंतर असू शकते.
याच ठिकाणी MRP व्यवस्थेचा एक मोठा प्रश्न उभा राहतो.
कायद्याने दुकानदाराला MRP पेक्षा जास्त आकारण्यास मनाई केली आहे. पण MRP स्वतः किती असावी यावर ग्राहकाला बाजारात फारशी माहिती नसते.
ग्राहकाला पॅकेटवर 100 रुपये दिसतात.
त्याला त्या वस्तूसाठी उत्पादकाला 50 रुपये खर्च आले की 80 रुपये, हे दिसत नाही.
MRP म्हणजे उत्पादनाची योग्य किंमत नाही हा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.
MRP म्हणजे वस्तूची न्याय्य किंमत, उत्पादन खर्च किंवा बाजारातील सर्वात कमी उपलब्ध किंमत नव्हे.
MRP म्हणजे कायद्याने मान्य केलेली कमाल किरकोळ विक्री किंमत.
म्हणून 100 रुपये MRP असलेल्या वस्तूला 100 रुपयांना विकणे कायदेशीर असू शकते, पण त्याचा अर्थ ती वस्तू 100 रुपयांचीच आहे असा होत नाही.
ग्राहक संघटनांकडे येणाऱ्या तक्रारींचे स्वरूप दोन वेगळ्या प्रकारचे दिसते.
पहिला प्रकार म्हणजे MRP पेक्षा जास्त पैसे घेणे.
दुसरा प्रकार म्हणजे MRPला जवळजवळ निश्चित किंमत मानून वस्तू विकणे.
पहिला प्रकार स्पष्ट कायदेशीर उल्लंघन असू शकतो. दुसरा प्रकार अनेकदा कायदेशीर चौकटीत राहूनही ग्राहकाच्या खिशावर परिणाम करणारा बाजारातील व्यवहार असतो.
MRP पेक्षा एक रुपया जास्त घेतला तरी गुन्हा
MRP पेक्षा अधिक रक्कम घेण्याच्या तक्रारी देशभर दिसतात. Citizen consumer and civic Action Group ने नोंदवलेल्या एका प्रकरणात तीन बिस्किटांच्या पाकिटांवर प्रत्येकी 12 रुपये MRP असताना ग्राहकाकडून प्रत्येकी 13 रुपये घेण्यात आले. ग्राहक मंचाने एकूण तीन रुपयांच्या अतिरिक्त आकारणीबरोबर नुकसानभरपाई आणि खर्च मिळून 7,003 रुपये देण्याचे आदेश दिले.
दुसऱ्या प्रकरणात Tata Gluco Plusसाठी MRPपेक्षा दोन रुपये अधिक आकारले गेले. CAGने स्पष्ट केले की रक्कम दोन रुपये असली तरी MRPपेक्षा अधिक आकारणी कायदेशीर ठरत नाही. लूट छोटी असली तरी ती कायदेशीर होत नाही.
वस्तू थंड ठेवण्याचे पैसे आणि इतर सबबी
ऑनलाइन ग्राहक तक्रारींमध्ये MRP पेक्षा अधिक पैसे घेण्याच्या अनेक तक्रारी आढळतात. काही तक्रारींमध्ये थंड पेयासाठी फ्रिजचे अतिरिक्त शुल्क, काही ठिकाणी बाटलीसाठी अतिरिक्त शुल्क, तर काही ठिकाणी “दुर्गम भाग आहे”, “वाहतूक महाग आहे”, “इथे माल मिळत नाही” अशा कारणांचा उल्लेख आहे.
अशा ऑनलाइन तक्रारी ग्राहकांनी केलेले आरोप आहेत. मात्र अशा तक्रारींच्या पुनरावृत्तीमुळे एक व्यवहारपद्धत अस्तित्वात असल्याचा मुद्दा उपस्थित होतो.
MRPचा मूळ उद्देश फसतो. वाहतूक महाग आहे म्हणून MRPपेक्षा अधिक किंमत आकारण्याची मुभा दिली तर MRPची कमाल मर्यादाच निरर्थक ठरेल.
मग MRPमध्ये वाहतुकीचा खर्च आधीच का धरला जातो? याचे उत्तर MRPच्या कायदेशीर व्याख्येतच आहे.
1990च्या नियमांनुसार maximum price मध्ये वाहतूक खर्च, डीलर कमिशन, जाहिरात, डिलिव्हरी, पॅकिंग आणि तत्सम खर्च (कर , जकात) समाविष्ट करता येतात.
याचा एक अर्थ असा की दुर्गम भागातील ग्राहकाचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेल्या MRP मध्ये वाहतुकीचा खर्च आधीपासून समाविष्ट केला जाऊ शकतो.
परंतु मग शहरातील ग्राहकाकडूनही त्याच MRPची वसुली होते.
जर एखाद्या वस्तूला पुण्यात पोहोचवण्याचा खर्च आणि लडाखमधील एखाद्या दुर्गम गावात पोहोचवण्याचा खर्च सारखा नसला, तरी दोन्ही ठिकाणी एकच MRP असू शकते.
ही व्यवस्था कायदेशीरदृष्ट्या दुर्दैवाने चुकीची नाही.
म्हणून आर्थिकदृष्ट्या तिचा परिणाम तपासण्यासारखा आहे.
म्हणून MRPपेक्षा कमी किंमत का मिळत नाही?
याचे उत्तर बाजारातील स्पर्धेत आहे.
जर एका दुकानात वस्तू 100 रुपयांना आणि दुसऱ्या दुकानात 90 रुपयांना मिळत असेल, तर ग्राहक स्वाभाविकपणे 90 रुपयांचे दुकान निवडेल.
जेव्हा बहुतेक दुकाने 100 रुपये हीच किंमत आकारतात, तेव्हा पॅकेटवरील MRP ग्राहकासाठी मानसिक किंमत (बेस किंमत) बनते.
अशा परिस्थितीत MRP ग्राहकाला कमाल किंमतीपासून संरक्षण देण्याऐवजी बाजारातील किंमतीचा बेस बनतो.
MRP स्कॅम ची दुसरी पद्धत
MRP पेक्षा अधिक पैसे घेणे ही सर्वात उघड पद्धत आहे. पण त्याहून सूक्ष्म पद्धत म्हणजे आधीच जास्त MRP छापणे.
समजा एखाद्या वस्तूची बाजारातील निर्मिती आणि वितरण व्यवस्था पाहता ती 60 रुपयांत सहज विकता येऊ शकते.
पॅकेटवर 100 रुपये MRP छापली जाते.
दुकानदार 100 रुपये घेतो.
तो MRP पेक्षा अधिक घेत नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी कायद्याचे उल्लंघन दिसत नाही.
ग्राहकाच्या दृष्टीने प्रश्न वेगळा आहे.
100 रुपये ही वस्तूची योग्य किंमत आहे असे त्याला वाटण्याचे कारण काय?
याच प्रश्नाचे उत्तर सध्याच्या MRP व्यवस्थेत ग्राहकाला मिळत नाही.
डिस्काउंटचा खेळ ( विशेषतः ऑनलाईन सेल्स व मेडीकल दुकाने)
याच कारणामुळे काही बाजारांमध्ये 100 रुपये MRP असलेली वस्तू 80 रुपये, 75 रुपये किंवा 70 रुपयांना विकल्याचे दाखवले जाते.
ग्राहकाला 20 किंवा 30 रुपयांची बचत झाल्याची भावना निर्माण होते.
पण त्या MRP ची सुरुवातच कशी झाली, हा प्रश्न विचारला तर चित्र बदलू शकते.
MRP ही बाजारातील किंमत नसून कमाल किंमत असल्यामुळे 20 टक्के सूट हा आकडा स्वतःमध्ये वस्तू स्वस्त आहे याचा पुरावा नाही.
ग्राहकाला खरा फायदा कळण्यासाठी त्याच वस्तूची वेगवेगळ्या विक्रेत्यांकडील किंमत, ऑनलाइन आणि ऑफलाइन दर, मोठ्या प्रमाणातील खरेदी किंमत आणि उत्पादकाचा दर यांची तुलना करावी लागते.
दुहेरी MRPचा प्रश्न
विशिष्ट ठिकाणी एकाच वस्तूसाठी वेगवेगळ्या MRP चा प्रश्नही अनेक वर्षे चर्चेत राहिला.
विशेषतः विमानतळ, चित्रपटगृहे आणि इतर नियंत्रित बाजारपेठांमध्ये पॅकेज्ड वस्तूंच्या किंमतीबाबत वाद झाले. 2017 मध्ये केंद्राने Legal Metrology Rules मध्ये बदल करून एकाच वस्तूसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या MRPच्या वापरावर निर्बंध आणण्याची दिशा स्पष्ट केली. जे चुकीचे होते.
म्हणजेच पूर्वी MRPचा भौगोलिक किंवा विक्रीच्या ठिकाणावर आधारित वेगळा वापर हा स्वतः एक वादाचा विषय होता.
कारण MRPचा मूलभूत विचारच कमाल किंमत असा असताना एका वस्तूसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कमाल किंमती असाव्यात का, हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो.
हॉटेल आणि रेस्टॉरंटचे प्रकरण वेगळे आहे
अपवाद
सर्व व्यवहारांमध्ये MRPचा नियम सारखा लागू होत नाही. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सेवा देताना पॅकेज्ड पाण्याच्या बाटलीवर छापलेल्या MRPपेक्षा अधिक रक्कम आकारण्यावर Legal Metrology कायद्याने बंदी घालता येत नाही, असे स्पष्ट केले.
न्यायालयाने अशा व्यवहाराकडे केवळ बाटलीची विक्री म्हणून न पाहता हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या एकत्रित सेवेचा भाग म्हणून पाहिले.
पण ग्राहकाच्या दृष्टीने बंदिस्त किंवा नियंत्रित ठिकाणी बाहेरची वस्तू आत आणण्यास मनाई असेल, पर्यायी स्वस्त वस्तू उपलब्ध नसेल आणि ग्राहकाला त्या ठिकाणीच खरेदी करावी लागत असेल, तर बाजारातील स्पर्धा जवळजवळ नाहीशी होते.
इथे ग्राहकाच्या निवडीचा प्रश्न मोठा ठरतो.
चित्रपटगृहांमध्ये बाहेरचे पाणी किंवा खाद्यपदार्थ नेण्यास मनाई आणि आत महागड्या वस्तू विकण्याच्या पद्धतीवर ग्राहकांच्या तक्रारी झाल्या आहेत. राज ठाकरेंनी एक आंदोलन छेडले होते. पुढे ते हवेत विरले.
एका न्यायालयीन प्रकरणात चित्रपटगृहातील पाण्याची बाटली बाहेर 20 रुपये असताना 50 रुपयांना विकली जात असल्याचा वाद नोंदला गेला. त्या प्रकरणात ग्राहकाला मोफत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध असावे, यावरही न्यायालयाने भर दिला.
MRP च्या नावाने होणारी लूट चार प्रकारची
आजच्या परिस्थितीकडे पाहिले तर MRPशी संबंधित ग्राहकांची समस्या साधारण चार प्रकारांत विभागता येते.
पहिली म्हणजे छापलेल्या MRPपेक्षा जास्त पैसे घेणे. ही स्पष्ट आणि थेट तक्रार आहे.
दुसरी म्हणजे MRPमध्येच मोठे मार्जिन ठेवणे. येथे कायद्याचे उल्लंघन सिद्ध करण्यासाठी केवळ MRP आणि उत्पादन खर्चातील फरक पुरेसा नाही, पण ग्राहकाला किंमत ठरवण्याची प्रक्रिया पारदर्शक नसते.
तिसरी म्हणजे MRPला बाजारातील अनिवार्य किंमत बनवणे. कायदा विक्रेत्याला MRP घेण्यास सांगत नसतानाही व्यवहारात तीच किंमत घेतली जाते.
चौथी म्हणजे ग्राहकाला पर्याय नसलेल्या ठिकाणी किंमतविषयक शक्तीचा फायदा घेणे. हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृह किंवा काही नियंत्रित विक्री केंद्रांमध्ये हा प्रश्न अधिक तीव्र होऊ शकतो.
मेडिकल शॉप्स, रूग्णालये ही जीव वाचवण्यासाठी आहेत. इथे मनमानी केली जाते. पण पुन्हा याच कायद्यान्वये तुम्ही लूट केली असे म्हणू शकत नाही. काही डॉक्टर्स तर आपल्या बुद्धीकौशल्याचा वापर करून तक्रार करणार्यांना सोमिवर निरूत्तर करत असतात.
कायद्याने लूट केली असे म्हणता येत नसले तरी कायदा चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ नये का? मुंढेंच्या कारवाईने जो इनिशिएटिव्ह घेतला आहे त्यामुळे या सर्वच एम आर पी स्कॅम बद्दल इन टोटॅलिटी बघितलं जावं.
लेखात पुनरावृत्ती झाली आहे. थोडं घाईत लिहीले आहे.
हा विषय गेली पंधरा वर्षे मनात आहे. याबद्दल अनेक रिपोर्टस वाचलेले आहेत. या सर्वांचा संदर्भ देणे शक्य होणार नाही. पण कॅगचा रिपोर्ट इथे देत आहे.
https://www.cag.org.in/blogs/maximum-retail-price-mrp-and-over-charging
तुम्ही स्वतः दुकानदार झालात
तुम्ही स्वतः दुकानदार झालात तर काय कराल?>> हे तर्कदोषाचे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही दुकानदाराला असा प्रश्न विचारला कि "तुम्ही ग्राहक झाला तर?" त्याचे जे उत्तर असेल तेच.
या तर्कदोषामागे एम आर पी काय आहे हे माहीत नसणे, दुकानदाराला एम आर पी मुळे वाढलेला नफा, ग्राहकाचा अधिकार आणि ज्याची लूट, शोषण होते त्यालाच शोषणाची बाजू समजावून घेण्यासाठी आग्रह करणे... जेणेकरून तुझी लूट कशी समर्थनीय आहे हे सांगण्याचा उफराटा विचार असे सर्व फॅक्टर्स इथे एकत्र आलेत. अन्यथा इग्नोरनीय प्रतिसाद.
हे व्हायला नको असेल तर लहान
हे व्हायला नको असेल तर लहान सहान दुकानदारांची गच्छंती आणि कॉरपोरेट मोठ्या चेन स्टोअर्सनी बाजारात मक्तेदारी निर्माण करणे हेच उत्तर आहे. हे बारके दुकानदार आपला फायदा कमी करुन ग्राहकाचा फायदा करत नाहीत, करणार नाहीत. कधीही करणार नाहीत.
डीमार्ट आणि रिलायन्स मार्ट इ. कॉरपोरेट्स उत्पादकाकडून बरोब्बर भाव पाडून घेतील. कारण असे मोठे दुकानदार एकदम घाऊक मध्ये खरेदी करत असल्याने त्यांना उत्पादकांना नाडून चांगलं वठणीवर ठेवता येईल. परत ग्राहकांना एमआरपीपेक्षा कमी किंमतीत माल विकून बनिया वाण्यांना बेदखल करुन ग्राहकांचा ओघ आपल्याकडे आणता येईल.
तेव्हा मात्र डीमार्ट आणि संघटित दुकानांना सरकार प्रोत्साहन देते आहे आणि एकल मॉम अॅंड पॉप शॉपची गळचेपी, स्पर्धेतून बाहेर वरुन दु:ख व्यक्त करू नका.
MRP ही पद्धत फक्त भारतात आहे.
MRP ही पद्धत फक्त भारतात आहे. देशभर एकच cost कशी असेल. MRP मुळे काही जणांना भुर्दंड पडतो दुसर्यांच्या फायद्यासाठी. MRP हा प्रकार मुख्यतः excise duty structure मुळे आला. आता excise duty नाही पण MRP राहिलाय
किरकोळ दुकानदार जगला पाहीजे.
किरकोळ दुकानदार जगला पाहीजे. सुपरचेन वाले आज बरे वाटले तरी काही वर्षांनी जिओ सारखं नाचवतील सर्वांना हे.
मध्यप्रदेशात गव्हाच्या शेतीची विशाल क्षेत्रं बिर्ला, टाटा आणि अंबानींनी विकत / भाड्याने घेतली होती/आहेत. शेतकर्यांपासून ते ग्राहकांपर्यंतची चेन मूठभरांच्या हातात जाणं function at() { [native code] }इशय धोकादायक आहे.
आज औषधांची चेन मूठभरांच्या हाती असल्याने मुंढेंनी उघड केलेले प्रकार माहीत झाले आहेत. १ रूपयापेक्षा कमी किंमत असलेली सिरींज ८०० रूपयांना , सलाईन पण २३ रूपयांचं सहाशे रूपयांना. हॉस्पिटलला ज्या किंमतीत मिळतं त्याच्या चारशे पट एम आर पी छापलेली असते.
सोपा उपाय आहे.
एम आर पी ही काय आहे याबद्दल जागृती करणे. इथे काही जणांचा समज आहे त्याप्रमाणे एम आर पी हीच विक्रीची खरी किंमत असून दुकानदार काही चुकीचे करत नाहीये हा समज खोडून काढणे. लोक एम आर पी वर सूट मागायला लागले कि दुकानदाराला द्यावीच लागेल. जो देणार नाही तो आपोआपच मागे पडेल.
आज लोकांच्या अज्ञानाचा फायदा दुकानदाराला होतोय.
कायद्यामागचा उद्देश कोर्टात दाद मागायला पुरेसा असतो.
MRP पूर्णतः काढून
<< एम आर पी हीच विक्रीची खरी किंमत असून दुकानदार काही चुकीचे करत नाहीये हा समज खोडून काढणे. >>
MRP पूर्णतः काढून टाकण्याबद्दल धागालेखकाचे काय मत आहे?
MRP पूर्णतः काढून
MRP पूर्णतः काढून टाकण्याबद्दल >>> या प्रश्नाचे प्रयोजन समजले नाही. का?
MRP ही विक्रीची सुयोग्य किंमत
MRP ही विक्रीची सुयोग्य किंमत नाही आणि त्यामुळे लूट होते, असे आपले म्हणणे आहे . म्हणून हा प्रश्न विचारला.
तुम्ही लेख वाचलेला नाही. तो
तुम्ही लेख वाचलेला नाही. तो एकदा पूर्ण वाचा. नंतर प्रश्न शिल्लक राहिले तर नक्की विचारा.
उबो +१
उबो +१ लेख पूर्ण वाचलेला आहे.
आणि लोकेशन स्पेसिफिक एमआरपी हा कालचा गोंधळ बरा होता लेव्हलचा प्रकार होईल. अशीही एमआरपीची सक्ती फक्त भारतीय उपखंडातील देशांत आहे. आता भारतीय समाज इतका अज्ञ राहिला असेल असं मलाही वाटत नाही. मग ती पूर्णपणे काढून का टाकू नये?
लेखकाला जे काही म्हणायचे आहे
लेखकाला जे काही म्हणायचे आहे असे लेख वाचून जाणवते ते (किमान हा धागा वाचणाऱ्या) सर्व सुज्ञांना माहित आहे. मग धागालेखक काय प्रतिपादन करू इच्छितो हे कळले नाही.
अरेच्चा ! हा राखीव भुंकणारा
अरेच्चा ! हा राखीव भुंकणारा आयडी बरेच दिवस भुंकायला आला नाही, पार विसरूनच गेलेलो.
आला पुन्हा. आल्या आल्या शिवीगाळ करूनच स्वागत केलं होतं.
मी अनु, स्वधर्म, राजु ७६ आपण
मी अनु, स्वधर्म, राजु ७६ आपण सर्वांनी समजून उमजून दिलेल्या प्रतिसादांबद्दल आपले आभार. अमोल कोळी यांचेही आभार.
हा विषय क्लिष्ट नाही. भारतात जकात कर रद्द व्हावा, करप्रणालीत सुसूत्रता यावी यासाठी चाललेल्या मोहीमांनंतर व्हॅट आला, एमआरपी आली आणि आता जीएसटी आली. हे वेगवेगळे उपाय झाले पण यात सुसूत्रता आहे का याची काही कल्पना नाही. जकातीच्या काळात वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या किंमती असणे हे कॉमन होतं.
दुर्गम आणि पर्यटनाच्या दृष्टीने महाग असलेल्या ठिकाणी किंमत किती असाव्यात याचा कायदा करताना चेगवेगळ्या शहरात असलेल्या किंमतींमुळे त्या छापणे अवघड होते. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. एमआरपी अॅक्ट मधे सुधारणा करून महागडी, दुर्गम क्षेत्रे यांचे एक शेड्युल बनवले तर या भागात एम आर पीने विकता येईल अशी सुधारणा करणे शक्य आहे. अन्य शहरांसाठी वेगळी किंमत छापणे अशक्य राहिलेले नाही.
याउप्पर जागृती हे सर्वात मस्त साधन आहे. अशा चांगल्या विषयात ड्युआयडी आणणे, हेका चालवणे हे उद्वेगजनक प्रकार आहेत. सूज्ञ हा शब्द खटकल्यामुले राखीव आयडी उतरवणे हा या आयडीचा असली स्वभाव दाखवतो. पहिल्या दिवसापासून अनुभव असल्याने लिहावे लागतेय. जर अशा आयड्यांचा बंदोबस्त झाला असता तर नसते लिहीले.
उपाशी बोका, लेखात पूर्णपणे अनेकदा पुनरावृत्तीचा धोका पत्करून एम आर पी ही लूट कशी आहे हे क्लिअर केलेले असताना दुकानदारांचा पुळका येऊन ते कसे कायद्याने वागत आहेत या भूमिकेत जाण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण धाग्याचा सूर असतो, ग्राहकाचे संरक्षण असते त्यासाठी असे लेख असतात. ते अस्थानी दाखवण्याचा खटाटोप खटकला. एम आर पी रद्द होण्याबद्दलचे विचार धाग्यातच आहेत. कायद्याच्या अपुरेपणाबाबत लिहीलेले आहेच ना? पण त्यामुळे हा कायदा बनवण्यामागे जो मूळ उद्देश आहे त्याला हरताळ फासला जाईल. पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण होईल.
मुंढेंनी हा विषय चव्हाट्यावर आणला आहे. तो फॉलो केला तर तुम्हाला बरीच उत्तरं मिळतील.
वाचला लेख, समस्या लक्षात आली.
वाचला लेख, समस्या लक्षात आली. याचे कारण ग्राहकांना एमआरपी म्हणजे नक्की काय हेच माहीत नसणे, ज्यांना माहीत आहे त्यांना दुकानदारांनीच कमी किमतीत वस्तू देण्यास नाकारणे, आणि जेथे बरेच दुकानदार आहेत त्यांनी संगनमताने किंमत कमी न करण्याचे ठरवणे, यातून ग्राहकांना एमआरपीइतकी किंमत देऊनच वस्तू घ्याव्या लागणे - इतपत समजले. लेखात समस्या नीट समजावली आहे. त्यावर तुमच्या कल्पनेत काही उपाय आहे का, किंवा या विषय ज्यांच्या करीयरचा भाग आहे त्यांनी काही उपाय सुचवले आहेत का, ही यापुढची उत्सुकता आहे. ग्राहक जागृती हाच त्यातल्या त्यात प्रॅक्टिकल उपाय वाटतो. आजूबाजूच्या सगळ्यांना माहीत झाले की मग स्थानिक दुकानदार सर्वांशी वैर घेऊन आडमुठेपणा करू शकणार नाही.
लहान विक्रेते जगले पाहिजेत याच्याशी सहमत. फ्री मार्केट मधे सुद्धा माझ्या माहितीनुसार विक्रेत्यांना संगनमताने किमती ठरवणे बेकायदा असते. याउलट जागरूक ग्राहकांनी आग्रह धरून किमती खालीवर करणे हेच फ्री मार्केट फोर्सेस थिअरीप्रमाणे आहे.
परत ग्राहकांना एमआरपीपेक्षा कमी किंमतीत माल विकून बनिया वाण्यांना बेदखल करुन ग्राहकांचा ओघ आपल्याकडे आणता येईल. >>> अमित, या क्षेत्रात असलेले मोठे उद्योगपतीही बनिया वाणीच आहेत! या समाजांमधे धंद्याच्या संधी शोधायची जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रेरणा आणि ट्रायबल नॉलेज आहे, जे त्यांना नवीन सोसायट्यांच्या जवळ लगेच एक दुकान उघडायला प्रेरित करते, तेच त्यांना या संधी वेळीच ओळखून असे उद्योग स्थापायलाही प्रेरित करते. मुंबईत पूर्वी जेव्हा मराठी लोक गिरण्यांत नोकर्या शोधत होते व चाळीत घरे, तेव्हा गुजराती लोक चाळी बांधत होते - हा फरक.
त्यामुळे लहान विक्रेते टिकायला हवेत पण विविध व्यवसाय म्हणजे एकेका समाजाची राखीव कुरणे झाली आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना ती सप्लाय चेन टिकू देत नाही - ते मात्र मोडून काढायला हवे.
कारण असे मोठे दुकानदार एकदम घाऊक मध्ये खरेदी करत असल्याने त्यांना उत्पादकांना नाडून चांगलं वठणीवर ठेवता येईल >> अमित, You are saying this like it's a good thing
नरेन, शेंडेनक्षत्र यांनीही
नरेन, शेंडेनक्षत्र यांनीही चांगले मुद्दे मांडले आहेत.
फारएण्ड धन्यवाद. अचूक समजून घेतला आहे मुद्दा.
उपाय जो प्रतिसादात सांगितला आहे तोच आहे. जागृती आणि कायद्यात सुधारणा. एम आर पी सोबत शेड्युलव्यतिरिक्त अन्य भागात विक्रीची किंंमत छापणे अशक्य नाही.
उपाशी बोका, तुमचे मत वेगळे असू शकते आणि त्याचा आदर ठेवायला हवा, पण तसाच तुम्हालाही तुमच्या विरोधी मताचा आदर वाटतो हे दिसायला हवे. माझी इच्छा काय आहे हे तुम्ही परस्पर ठरवू नये. वस्तुस्थिती काय आहे अजिबात समजून न घेता वादविवाद करण्यात काय हंशील? तीच गोष्ट पुन्हा पुन्हा समजावून सांगण्यात अर्थ नाही.
तेच बेफिकीर आणि उनके बहोतसे आयडी. अनेक आयडींनी एकच गोष्ट सांगितली म्हणजे ते बहुमत होते असे नाही. आणि बहुमत सिद्ध केले म्हणजे ते बरोबर असेही नाही. एकाच वेळी तीन तीन आयड्यांचे आकलन एकाच पद्धतीने गंडणे हा साधारण योग नाही. तुम्हाला बरे होण्यासाठी शुभेच्छा. दुर्दैवाने असे म्हणतो. या आधीही माबो या आयडीचे ऐकून तुम्ही मत मागे घेतले होते, तुम्हाला विसर पडला असेल कदाचित.
धागा आणि प्रतिसाद पुन्हा
धागा आणि प्रतिसाद पुन्हा वाचले. जी गोष्ट सगळ्यांना माहीत आहे, त्यात काय ग्राहक प्रबोधन करण्याचा प्रयत्न चालू आहे? धागा लेखकाला नक्की काय प्रॉब्लेम आहे हे कळले नाही.
तुम्ही म्हणता की MRP हीच आता "विक्रीची किंमत" झाली आहे, खरं तर वेगवेगळ्या ठिकाणासाठी वेगवेगळी किंमत छापून माल विकला पाहिजे.
१. मला सांगा, आपण समजू की जर पाण्याच्या बाटल्या बनवणाऱ्या कंपनीची १ च फॅक्टरी आहे, जी पुण्यात आहे. तुम्ही म्हणता तसे त्यांनी महाराष्ट्रासाठी ₹२० MRP छापली, केरळसाठी ₹२२ छापली आणि हिमाचल प्रदेशसाठी ₹२५ छापली. या सगळ्या प्रकारात operations, inventory management वगैरेसाठी उत्पादकाला किती त्रास होईल, याची कल्पना आहे का?
२. हिमाचल प्रदेशात अचानक टंचाई आल्याने तो केरळचा माल हि . प्र. मध्ये पाठवू शकणार नाही. हे नुकसान त्याने का सहन करावे? तिथे टंचाई तशीच राहिली तर ते चालेल का? (पाण्याची बाटली हे उदा. योग्य नाही, पण तशी केस समजून घ्या.)
३. समजा बाटलीवर MRP ₹२० ऐवजी ₹३० छापून महाराष्ट्रामध्ये ₹२०, केरळमध्ये ₹२२ आणि हिमाचल प्रदेशमध्ये ₹२५ ला विकली गेली तर तुम्हाला योग्य वाटेल का?
४. MRP प्रकार पूर्णपणे रद्द केला आणि त्या उत्पादनाची किंमत, इतर उत्पादकांबरोबरच्या competition नुसार आणि मार्केटमध्ये demand-supply नुसार ठरू दे, हा प्रकार तुम्हाला चालेल का?
५. पाण्याऐवजी शीतपेय समजू. MRP ₹३० छापून बाहेरच्या दुकानात ₹२० पण सिनेमागृहात ₹३० ला ते शीतपेय विकणे तुम्हाला योग्य वाटते का? ₹२८ ला चालेल का की तरीही लूट होत आहे, असे म्हणाल?
६. एखादी मोठी कंपनी बाजारात आली आणि त्यांनी below cost शीतपेये विकली ज्यामुळे इतरांचा धंदा पार बसला, तर ते तुम्हाला चालेल काय?
जीवनावश्यक वस्तूंची किंमत सरकार नियंत्रित करते आणि ते ग्राहक हितासाठी योग्य आहे. पण म्हणून सरसकट MRP चा उद्देश (post independence price control, prevent overcharging, uniform price, limits on price fixing, competition and transparency) लक्षात न घेता खडे फोडणे योग्य नाही. बरेचसे ग्राहक सूद्न्य असतात आणि कुठे स्वस्त माल मिळेल, ते बरोबर शोधून काढतात.
तुम्ही वेड घेऊन पेडगावला
तुम्ही वेड घेऊन पेडगावला जाण्याचा प्रयत्न करत असल्याने आता इथून पुढे तुमचे प्रतिसाद इग्नोर करतोय.
हरकत नाही. इतर लोक तरी माझा
हरकत नाही. इतर लोक माझा प्रतिसाद वाचून त्यावर विचार करतील.
समजा उलटं केलं तर? प्रत्येक
समजा उलटं केलं तर? प्रत्येक उत्पादनावर उत्पादकाची करांसहित घाऊक विक्री किंमत (फॅक्टरी होलसेल प्राईस) छापली तर? दुकानदारांना अर्थातच ती वस्तू कोणत्याही किमतीला विकण्याचे स्चातंत्र्य आहे. याचा फायदा असा होईल की ग्राहकाला मधली साखळी नक्की किती वाढीव किंमत (सगळ्यांचे मार्जिन) लावते ते समजेल. उत्पादन कुठे केले आहे त्याचा फॅक्टरी पत्ता प्रत्येक उत्पादनावर आत्ताही असतोच. म्हणजे एवरेस्टवर १०० रू ची वस्तू ५०० रु. ला मिळते हे पचेल पण पुण्यातच तयार झालेली १०० रु ची वस्तू पुण्यातच ५०० ला विकून ग्राहकाला चुना लावण्याचे प्रमाण तरी कमी होईल.
वरील पध्दतीचा अजून एक फार
वरील पध्दतीचा अजून एक फार मोठा फायदा होऊ शकेल. शेतकर्याला किती पैसे मिळतात हे ग्राहकांना कळू शकेल. गेली अनेक दशके सगळी रिस्क अंगावर घेणार्या शेतकर्याला काहीच फारसे न मिळता शून्य रिस्क घेणारे अडते, व्यापारी आणि किरकोळ दुकानदार गबर झालेले आहेत. ही मंड्ळी शेतकरी आणि ग्राहक दोघांना दोन्ही बाजूंनी अक्षरशः लुटत आहेत.
फा, ते थोडं सारकॅस्टीक होतं
फा, ते थोडं सारकॅस्टीक होतं आणि खरं ही होतंच. मोठा मासा छोट्या माशाला खातो, हाच जगाचा नियम आहे. आपण ग्राहक म्हणून आजचं ट्रॅन्झॅक्शनल भलं बघुन कॉरपोरेट वाण्यांकडून सामान आणावे, कारण त्यांचं खटलं मोठं असल्याने त्यांना आणखी मोठ्या प्रमाणात खरेदी किंमतीवर सवलत मिळते. सहसा छोटे दुकानदार, ज्याची किरकोळ विक्री तुलनेने कमी आहे असे, जरी खरेदी विक्री किंमतीत तफावत असली तरी तो सगळा फायदा स्वतःकडे ठेवेल कारण जागेचे भाडे, कामावरील मजुर, दुकानाचे अपकीप इ. खर्च तुलनेने कमी मालावर त्याला विभागाचे आहेत. तेच मोठे दुकानदार ज्यांची देशात अनेकोनेक दुकाने आहेत त्यांना खरेदी आणि खर्च दोघांचे लेव्हरेज जास्त असल्याने स्वस्तात माल देणे शक्य आहे, आणि भारताचा विचार केला तर या स्पर्धेत ते तुलनेने नवे आहे, परत त्यांचा खिसा खोल असल्याने ग्राहकांना आकर्षिक करायला ते आणखी सवलती देतील. परत मालाला उठाव असल्याने माल ताजा, एक्स्पायरी डेट न खोडलेला, अळ्या, किडे पाखडून पा़खडून विकलेला नसण्याची शक्यता अंमळ जास्त.
शेवटी आपण, दुकानदार किंवा ते उत्पादक जगावे म्हणून माल खरेदी करत नाही. ते उत्पादक मेले तर दुसरे येतील, नाही आले तर पुढचं पुढे. इतकंच काही वाटलं तर सरकार लेव्हल प्लेईंग फील्ड करायला काही करेल, किंवा नाही करणार. त्याची काळजी आपण डे -१ पासून करू नये. आपण आपले हीत पहावे.
उबोंच्या सर्व पोस्टना +१.
जाग्रुती नक्की करावी. शहरातील तुलनेने मध्यम गटातील लोकांना नसेल माहिती तर सांगावे. गरीबांमध्ये ती करण्याची ही बहुतेक गरज पडणार नाही, गरीब व्यक्तीला पैसे कसे वाचवावे हे आपण सांगायची गरज नाही. तीच व्यक्ती आपल्याला माहित नसलेल्या चार गोष्टी आपल्याला सांगेल.. पैशाच्या बाबतील दसपट हुषार असते गरीब व्यक्ती, आणि दुर्दैवाने त्यांच्या मेंदूची बहुतेक सायकल्स पैसे कसे वाचवावे यातच जात असतात.
एम आर पी ( कमाल विक्री किंमत
एम आर पी ( कमाल विक्री किंमत) लिहिलेली नसली तर काय होते याचे एक उदाहरण.
मी ऍमस्टरडॅम येथे गेलो होतो तिथे एक हॉट डॉग घेतला त्या बरोबर स्प्राईटच बाटली मागितली तर त्याने ५ युरो सांगितली. मी नको म्हटले. ५०० रुपयाला स्प्राईट पिणे पटत नव्हते.
त्यानंतर समोरच असलेल्या अल्बर्टहाईन या डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये गेलो तर तेथे तीच बाटली २ युरो ला होती ती सुद्धा थंड रेफ्रिजरेटर मध्येच होती. तेथे कोणत्याही उत्पादनावर किंमत लिहिलेली नसे.
You will be shocked to know how much Apple spends to make iPhone 15 Pro Max that it sells for Rs 1.6 lakh
The report reveals that the production cost of the iPhone 15 Pro Max is $502 or Rs 41,865
https://www.firstpost.com/tech/you-will-be-shocked-to-know-how-much-appl...
म्हणजेच उत्पादन खर्चाच्या चौपट अँपल आपले फोन विकतात.
माझ्या आठवणीत पार्ले ची बिस्किट पुडे यांची कमाल किरकोळ किंमत महाराष्ट्र गुजरात गोवा आणि मध्ये प्रदेश येथे x असेल तर यापेक्षा इतर भागात एक रुपयाने जास्त ( x अधिक १) असे छापलेले होते. ( उत्पादन मुंबईत असल्याने लांबच्या प्रदेशात किंमत जास्त ठेवलेली होती आणि तसे छापलेले होते).
काही वर्षांपूर्वी मी समोरच्या मारवाड्याकडे गेलो एक लिटर सूर्यफुलाचे तेल मागितले त्यावर किंमत छापलेली होती १२० रुपये. त्याने १२० रुपये द्या सांगितले मी त्याला म्हणालो डी मार्ट मध्ये हेच ७५ रुपयाला मिळते. त्यावर तो म्हणाला मी तुम्हाला ८० रुपयाला देतो. मी ८० रुपयाला घेऊन परत आलो. कारण डी मार्ट ला रिक्षाने जाऊन परत येणे परवडले असते अशी स्थिती होती.
जेंव्हा मोठे दुकानदार नव्हते तेंव्हा किरकोळ व्यापारी असा नफा कमावत असत.
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची किंमत किती असते आणि ग्राहकाला कितीला विकले जाते याचे सुद्धा काहीही गुणोत्तर नाही. ते थेट रोजच्या व्यापारात नाही त्यामुळे सामान्य माणसाला समजत नाही. नौदलात असताना सोनोग्राफी मशीन y २ k कंप्लायंट करण्यासाठी सिमेन्स कंपनीने साडे पाच लाखाचे कोटेशन दिले होते (२००० सालची गोष्ट) मी मशीनला १९०० सालात टाकले आणि आपला कारभार उरकला. कारण सोनोग्राफी च्या रिपोर्ट मध्ये तारीख (आठ नव्हे तर सहा आकड्यात) २१-१०-२६ अशीच येत असे. .
सिमेन्सच्या गोव्यातील विक्री अधिकाऱ्याने सांगतले सर तुम्ही आमचे साडे पाच लाखाचे नुकसान केले. मी त्याला म्हणालो हे सिमेन्सचे नुकसान असले तरी देशातील कर भरणाऱ्या नागरिकांचे नुकसान वाचले आहे.
आणि हीच युक्ती इतर लष्करी रुग्णालयात माझ्या मित्रांना सांगून साधारण ५५ लाख रुपये वाचले.
वैद्यकीय उपकरणे आणि औषधे यात सुद्धा एम आर पी काहींच्या काही लिहिलेली असते. दुर्दैवाने घाईच्या वेळेस रुग्णाच्या नातेवाईकांना दुसरीकडून उपकरणे किंवा औषधे आणणे शक्य नसते. बऱ्याच रुग्णालयात दुसरीकडून औषधे आणण्यास प्रतिबंध केला जातो याचे कारणहि त्यात असलेला भरपूर फायदा हेच आहे. अर्थात बाहेर मिळणारी औषधे किंवा उपकरणे यात त्या किरकोळ विक्रेत्याचा फायदा असतो( तो सुद्धा कमाल किरकोळ किमतीलाच विकतो). ग्राहकाला यातून फारसा फायदा होतच नाही.
यासाठी जेनेरिक औषधे हाहि एक उपाय आहे पण तोही तितका सोपा नाही. यावर मी एक लेख लिहिला होता https://www.maayboli.com/node/73302.
एकंदर हा विषय तुम्ही म्हणताय तितका साधा सोपा नाही
Pages