पाककृती स्पर्धा क्र 1: पदार्थ एक रेसिपी अनेक-अमेरिकेत 12 वाजेच्याआधी बटाटीय रुमाल

Submitted by mi_anu on 26 September, 2026 - 02:49
Potato

"आज का बनवतेयस?आज 26 तारीख आहे.स्पर्धा 25 तारखेपर्यंत होती."
"आज शनिवार आहे आणि मला वेळ आज आहे.अमेरिकेत कुठेतरी कॅलिफोर्निया वगैरे मध्ये अजून रात्रीचे 12 वाजले नसतील आणि 25 तारीख चालू असेल."
"आणि एन्ट्री नाही स्वीकारली तर?"
"जिंकणे हा मूळ उद्देश नाही.आपण रोजच्या स्वयंपाकातून निघून असं वेगळं काही करू शकतो का या स्वयंतपासणीची संधी हे मुख्य उद्दीष्ट आहे.स्पर्धा मुदतीच्या आत पदार्थ बनणे हे साधन आहे, साध्य नव्हे."
(आता मनात इतके बापटिस्ट फंडे टाकून झाल्यावर मूळ कृतीकडे वळूया.)
फोटो कदाचित चांगले येणार नाहीत.पण हा बटाटा आहे.बटाटा कोणाला आवडत नाही?त्यामुळे तो कोणत्याही रुपात असला तरी मिटक्या मारत खा.
IMG_20260926_132959.jpg

१. घाईकृतीपुष्प क्र १: रोस्ट बेबी बटाटे
या कृतीला 4 महत्वाचे घटक-संयम, कोणावर तरी काढायचा असलेला राग, बेबी बटाटे आणि मिरपूड मीठ चिली पावडर.
बेबी बटाटे धुवून पुसून वाळू द्यावे. आता ऑफिसात, ट्रॅफिक मध्ये साठून असलेला सर्व राग एकत्र करावा आणि आपण कोण तो दामर टेड बंदी राघवन असल्याच्या आवेशात बटाट्याना काट्याने भोसकावे.याने लवकर भाजले जातात.कोणताही बटाटा जास्त भोसकून मध्ये 2 भागात तुटला नाही पाहिजे.फाऊल होते.
आता कढईत अगदी 1/3 चमचा तेल(हे फक्त मीठ मसाला चिकटण्या पुरते) टाकून बेबी बटाटे, मीठ,मिरपूड,चिली पावडर नीट मिसळून सगळे सारखे मध्यम आचेवर हलवत राहावे.बटाट्याना वरून सुरकुत्या पडल्या पाहिजेत.शिजले की नाही ते टेडबंडीबुरखा परत चढवून काट्याने भोसकून परीक्षा करून पाहा. शिजले की मस्त बाऊलमध्ये घेऊन त्याच भोसकलेल्या काट्याने गरम गरम खा.यात चिली पावडरच हवी.कांदा लसूण मसाला(klm) टाकल्यास फाऊल धरले जाईल.
IMG_20260926_133015.jpg

घाईकृतीपुष्प क्र 2: बटाटे दही भरीत
उकडलेले बटाटे गार झाल्यावर सोलून तुकडे करून त्यात दही,मीठ घालावे.मिसळून घ्यावे.अगदी छोटा 1 चमचा तूप हिंग जिरे हिरवी मिरची फोडणी घालून मिसळून चवीने खावे.वर कोथिंबीर फोटोसाठी घातली आहे.पण ती न घातल्यास ही उत्तम उपास डिश आहे.
IMG_20260926_133021.jpg

घाईकृतीपुष्प क्र 3: बटाटे काचऱ्या
बटाट्याचे पातळ काप करावे.सालं काढली नाहीत तरी चालेल.काप पातळ आहेत.सालं तोंडात येणार नाहीत.
उगीच भांड्यांचा पसारा न मांडता रोस्ट बेबी बटाटे केलेल्या कढईत 1 चमचा तेल घालून तापले की मोहरी आणि चिमूट हिंग हळद घालावे.
बारीक चिरलेले काप नीट मिसळून मंद आचेवर हलवत राहावे.
थोडे शिजत आले की मीठ आणि कांदा लसूण मसाला घालून नीट मिसळावे आणि झाकण घालून नीट शिजू द्यावे.
काढून बाऊल मध्ये काढावे.
IMG_20260926_133009.jpg

घाईकृतीपुष्प क्र 4: बटाटे मटार चटई
या रेसिपीचा महत्वाचा घटक: स्वतःवर असलेला फाजील आत्मविश्वास.
चटईला इंटिग्रिटी यायला थोडा कार्ब पीठ कंटेंट हवा.पण हा कंटेंट खाताना कच्चा नाही लागला पाहिजे.त्यामुळे दुसऱ्या कोणीतरी दुकानात भाजलेला पाव वापरावा.
पावाचे 4-5 तुकडे करून आधीच्या कृतीत कचऱ्या केलेल्या कढईतून काचऱ्या काढून खमंग भाजावे.एकदम कुडकुडीत सोनेरी रंग यायला हवा.भाजून गार झाले की मिक्सरमधून काढावे.हा आपला इंटिग्रिटी एजंट.
मटार कोरडी पाणी न घालता, बटाटा पाणी न घालता कुकरला शिजवून वेगवेगळे कुस्करावे.यात आलं लसूण मिरची(मटार मध्ये कोथिंबीर पण) मीठ घालून आणि ब्रेड चा चुरा घालून नीट मळावे.आणि लांब चटई साठी वळून दोऱ्या कराव्या.
आता मागच्या वर्षी वरणभात स्पर्धेत मायक्रोव्हेव मध्ये चिकटलेल्या, खरवडाव्या लागलेल्या बाद पापड चटई चा ptsd लक्षात घेऊन काळजीपूर्वक चटई विणावी आणि जास्त न खेळता त्याला किंचित तेल लावून डिशमध्ये पेपर ठेवून मायक्रोवेव्ह मध्ये 5 मिनिट मायक्रोव्हेव करावे.मग ज्या बेक पेपर वर ठेवले तो अलगद ताटात उलटावा.भाजलेले तांदूळ पिठी वापरल्यास अजून पातळ तलम चटई बनवता येईल.हे बटाटा मटार भाजका पाव असल्याने चवीला छान लागतेच.तयार चटई प्लेटमध्ये खोबरे कोथिंबीर घालून सजवून फोटो काढावा.
IMG_20260926_133003.jpg

हे सर्व कुटुंबाला ऑफर करावे.बटाटा असल्याने ते आजूबाजूला घिरट्या घालत असतीलच.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुमाल आयडिया भारी आहे Proud
धागा बारा नंतर सुद्धा काढता येतो. जेव्हा मतदानाला संयोजक एन्ट्री गोळा करतात त्याच्या आधी काढला की झाले. पण रिस्क कश्याला घ्या..

बाई दवे, आधी मला शीर्षकात १२ बघून वाटले की एका पदार्थाचे बारा पदार्थ केलेत की काय Happy

अतिशय औट ऑफ रुमाल आयडिया...
जादूगार रुमालातून ससा, कबुतर असे काय काय काढतात.
तू रुमालातून रेसिपी काढणार..
मायबोलीचा जादूगार असा किताब तिला द्यावा अशी मी शिफारस करते Happy

भारी आहे पाकृ,
सुरूवातीचा युक्तीवाद आवडला.

मेहनत किती लागतेय राव, खायला हो!

धन्यवाद मंडळी
चटई किंवा भुईचक्र किंवा रोल बटाटा मटार चा बनवायचा विचार होता.पण भाजलेलं बेसन किंवा पिठी मिसळणं, किंवा तळणं वगैरे बटाट्याच्या पापात अजून वाढ करणं वाटलं.म्हणून किंचित कबाब लूक ची जाड चटई ब्रेड क्रंब घालून विणली.याचे अजून पॉलिश व्हर्जन बेक करून होऊ शकेल.असे चटई ब्रेड बनवण्याचे व्हिडीओ भरपूर पाहिले आहेत.

कोणाला ब्रेड मटार किंवा ब्रेड पालक बीट भुईचक्र कल्पना पुढे न्यायची असल्यास बघा.

ये ब्बात! बैजवार फोटू आवडले!
भुईचक्र म्हणजे पूर्ण पेशन्सचं काम, आणि फुल्ली लोडेड... पण कल्पना आवडली!

वा !

बढिया काम झालेय हे.

सबकुछ बटाटा वापरला आहे, मग चव चांगलीच असणार. रोस्ट बेबी बटाटे तर फोटोतूनच “सरकार, मला उचला” म्हणत आहेत 🤤

BTW, Potatoes are grossly under appreciated असे आमचे मत. गुणी, जिव्हासेवातत्पर, नेहेमी मदतीला धावत येणाऱ्या बटाट्यांना हवे तितके श्रेय देण्यात येत नाही, उलट डाएट वगैरे वाले मुद्दाम हिणवतात.

बटाट्याना उकळत्या पाण्यात ढकलणे, (तुम्ही केले तसे) काट्याने भोसकणे, उकळत्या तेलात परतणे, त्याची खांडोळी करणे, चाकू -सुऱ्यांनी त्याचे अंगांग गोंदवणे …. सगळे “नाइटमेयर्स ऑफ बटाटाज् लाईफ” उत्तम चवीचे प्रकार प्रसवतात की नाही ?

के मैं झूठ बोलियां ?

कसलं रुचकर दिसतंय सर्व, मटकावून टाकावं असं वाटतंय. फार रुचकर लिहिलं आहेस, केलंही आहेस. फोटोही मस्त.

सगळ्याच पाकृ लाजवाब. Happy
दही भर्रीत आणि चटई दिसायला सुंदर दिसताहेत. करून बघायला हवं.
लिहीलंय मस्त एकदम Lol

खास अनु टच पाककृती आणि लिखाण.
टेड बंडी, रामन राघवनचेही पुण्यस्मरण झाले त्या निमित्ताने.

रोस्ट बेबी पोटॅटो एकदा असेही करून पाहीन.
रच्याकने उपास नसल्यास पाककृती २ मध्ये किंचित काश्मिरी तिखट तुपात पोळून घातल्यास नजारा अजून चांगला दिसतो.
एकदा फराळासाठी हौशीहौशीने चटईचे कानवले करून पाहिल्यावर चटई प्रकाराचा धसका घेतला आहे.

तुम्ही सगळे फार हौशी आहात, आणि उपासाचे नियम एकदम कडकपणे पाळता अशी शंका यायला वाव आहे. आमच्याकडे दिवसभराच्या मोठ्या एकादशीटाईप उपासाला कोथिंबीर घालून खोबर्‍याची चटणी, काकडीची दह्यातली कोशिंबीर आणि लाल भोपळा घालून भगर नसेल तर फाऊल असतो (कोथिंबीर आणि काकडी बरेच ठिकाणी चालत नाही, भोपळा चालतो फक्त). आणि खिचडीत किंचित लाल तिखट नसेल तर आठवण करून दिली जाते. आणि मुख्य म्हणजे हे सगळं नियम वगैरे खुंटीवर टांगून घडत असावं, कारण बालकलाकार आठवण करतात, मोठे लोक समोर जे येईल ते आनंदाने खातात.
असो.

लाल तिखट, कोथिंबीर उपासाला?आमच्या स्वर्गीय मातोश्री आणि स्वर्गीय सासूबाई असत्या तर त्यांनी पुढची 2 वर्षं टोमण्यांनी भोसकलं असतं.(त्या दोघी नसल्याने मी गुपचूप कॉमन मिसळण डब्यातलं मीठ उपासाला वापरते.नाहीतर उपास मीठ वेगळ्या डब्यातलं वापरावं असं शास्त्र आहे.पण आम्ही कँटीन मध्ये सँडविच ची भोपळी मिरची कापून फक्त सूरी धुवून चोपिंग बोर्ड न धुता त्याच बोर्ड वर कापलेली फळं उपास फ्रुट डिश म्हणून खाणारे शूरवीर.हळदीच्या शेजारी असलेलं न मळलेलं मीठ हा सौम्य व्हायोलेशन मामला Happy )
पहिल्याच हरतालिकेला साबुदाणा बटाटा पॅटिस पूर्ण कुटुंबासाठी केल्याबद्दल मला बरेच टोमणे ऐकावे लागले आहेत.(आता मी फळं आणि खूप भूक लागली तर 'घरी न शिजवलेले बटाटा चिप्स सर्वात लहान पाकीट' खाते Happy ) आपल्या पुराणाने हरतालिकेला शिजलेले अन्न खाणाऱ्या लोकांना भरपूर धमक्या देऊन ठेवल्या आहेत.

आपल्या पुराणाने हरतालिकेला शिजलेले अन्न खाणाऱ्या लोकांना भरपूर धमक्या देऊन ठेवल्या आहेत.>>> मी लग्न होईपर्यंत नुसत्या फळांवर केली हरताळका. लग्न ठरल्यावर जी हरताळका होती तेव्हा मी तापाने आजारी होते, अँटीबायोटिक्स होती म्हणून उपास नाही केला. पुढच्या वेळपासून सासूबाईंनीच विचारलं खिचडी खाशील ना म्हणून. त्या असे काही कडक उपास करत नाहीत, मला कर म्हणत नाहीत.