पाककृती स्पर्धा क्रमांक २ - दिसतं तसं नसतं - नमकीन पुरणपोळी - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 14 September, 2026 - 11:20

नमकीन पुरणपोळी

मायबोलीवरची पाक कृती स्पर्धा म्हणजे आमच्या सारख्या रिटायर झालेल्या लोकांसाठी पर्वणीच असते. प्रत्येक स्पर्धा म्हणजे बुद्धीला खाद्य, विचारांना चालना.

" दिसतं तसं नसतं " ही थीम ही ह्याला अपवाद नाही. स्पर्धा जाहीर झाल्यापासून काय करता येईल ह्या बाबत विचार सुरू झाले. चणा डाळी पासून तिखट आणि गोड दोन्ही प्रकारचे पदार्थ छान होतात त्यामुळे चणा डाळीपासूनच ट्विस्ट देऊन काहीतरी करायचं ठरवलं आणि शेवटी ही नमकीन पुरणपोळी करायचं निश्चित केलं.

नेहमीच्या गुळ घालून केलेल्या पुरणा ऐवजी मीठ मसाला घालून पुरण केले आणि त्याच्या नमकीन पुरणपोळ्या केल्या आहेत. तरी साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे

साहित्य
स्टफिंग साठी अर्धी कप चणाडाळ,
हिरवी मिरची, जिरं, आलं, लसूण, कोथिंबीर ( आपल्या आवडीनुसार ) आणि दोन चमचे नारळाचा चव हे सगळ वाटून.
थोडी हळद, मीठ, आमचूर पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा तेल.

कव्हर साठी
पाऊण कप कणिक ( चाळून घेतलेली) मीठ, तेल. पोळ्या लाटण्यासाठी तांदूळाची पिठी किंवा कणीक

कृती
कणिक पाण्यात घट्ट भिजवून ती पातेल्यात पाणी घालून मुरवत ठेवावी.
चणाडाळ धुवून एखाद तास भिजत घाला. नंतर त्यात अर्धा चमचा हळद आणि थोड तेल घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. शिजल्यावर पाणी असेल तर चाळणीवर घालून ते निथळू द्यावे.
नंतर एका पातेल्यात चमचाभर तेल घालून त्यात डाळ घाला. वर लिहिलेलं वाटणं आणि कोरडे मसाले घालून चांगलं परतून घ्या. थोडं मिश्रण चाखून बघा आणि चव ऍडजस्ट करा. मिश्रण पातेल्यापासून सुटू लागलं की गॅस बंद करा आणि गरम असतानाच पुरणासारखं ते चाळणीतून गाळून घ्या .
भिजवलेली कणीक पाण्यातून काढून त्यात छोटा चमचा तेल आणि थोडं मीठ घालून मळून घ्या.
आता पुरण पोळी सारखा उंडा भरून पोळी लाटा आणि मध्यम गॅसवर नीट भाजून घ्या. नमकीन पुरणपोळ्या तयार आहेत. एवढ्या साहित्यात मध्यम आकाराच्या सहा पुरणपोळ्या तयार झाल्या.

20260913_120107.jpg

तयार पोळी

20260913_130131.jpgअधिक टिपा
१) नारळ आणि तेल ह्यामुळे बायंडिंग छान आलं होतं सारणाला . अजिबात फुटत नव्हत्या लाटताना आणि सारण कोरडं कोरडं ही लागत नव्हत खाताना.
२) पोळ्या चवीला खूप छान लागत होत्या. अगदी हलक्या आणि तोंडात विरघळणाऱ्या अश्या झाल्या होत्या. करताना मला वाटलं नव्हतं एवढ्या छान होतील असं. असो.
३) गोड न खाणाऱ्यासाठी आणि हाय प्रोटीन डाएट घेणाऱ्यांसाठी साठी हा एक चांगला ऑप्शन आहे.
४) वाटण न घालता चवीप्रमाणे नुसते कोरडे मसाले घालून ही चांगल्या लागतील.
५) आवडत असेल तर तव्यावर तेल सोडावे भाजताना. मी खाली काढल्यावरच लावले आहे.
६) टोमॅटोची चटणी ही केली होती. टोमॅटो, कांदा लसूण, लाल मिरची, मीठ, जिरं , हे सगळं थोड्या तेलावर रोस्ट केलं आणि थंड झाल्यावर टोमॅटोची सालं काढून मिक्सर मध्ये जाडसर वाटलं. जोडीला दही आणि खाराची मिरची.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Presentation आणि detail वार पाक कृती खूप आवडली..थोडक्या साहित्यात अफाट सुंदर चव आणणे हे फक्त तुम्हीच.करू.शकता ममो ताई ..मस्त
करून बघणार

>>>>>>>>गोड न खाणाऱ्यासाठी आणि हाय प्रोटीन डाएट घेणाऱ्यांसाठी साठी हा एक चांगला ऑप्शन आहे.
होय.

पुपो फार सुरेख मऊसूत आणि मस्त दिसतायत.

जबरदस्त. एक नंबर.
मला गोड आवडत नाही त्यामुळे तर पुरणपोळी अजिबात आवडत नाही. आमच्याकडे almost वर्षभर सगळ्या सणांना आणि भरीस भर कधी काही पाहुण्यांसाठीदेखील पुरणपोळ्या होतात. पण मी कधी खात नाही. मान राखायला एक घास खातो. पण मला कटाची आमटी आणि भात भजी कुरडई प्रचंड आवडते. आणि त्यामुळे पुरणपोळी असली तर हे बाकीचे सगळे खायला मिळते.
पण आता नमकीन पुरणपोळी रेसिपी देऊन तुम्ही मोठा प्रश्न सोडवला.
ताट मस्तच दिसत आहे.

ऋतुराज सामो धन्यवाद.
ज्यांना गोड आवडत नाही किंवा जे गोड खाणं टाळतात त्यांच्या साठी बेस्ट ऑप्शन आहे हा.

भारी आहे पाककृती..!
सादरीकरण पण मस्तच..!

@ मनीमोहोर,

तुमचे हे पुरणपोळीचे savoury version लगेच करून बघण्याची - खाण्याची इच्छा होतीच, थोड़े फेरफार केले (भिजवलेल्या चणाडाळी ऐवजी भाजके बेसन पीठ वापरले, लसूण आणि नारळाचे दूध वगळले, बडीशेप add केली, बाकी सेम टू सेम) आणि जमले की !!

आता लवकरच एकदा proper चणाडाळ भिजवून त्याची नपु करून पहाण्यात येईल 👍

High protein रेसिपीसाठी तुमचे अनेक आभार आणि पुराव्यादाखल ही खरपूस भाजलेली नमकीन पुरणपोळी 👇

5efc0316-0446-48ee-8409-dbf2ec49e8d4.jpeg

सोबत दही घेतले होते (फोटोत नाही)

अनिंद्य, पाककृती स्पर्धेतील कृती तुम्ही करून पाहिलीत त्यासाठी मी निःशब्द आहे. खूप खूप छान वाटलं हे वाचून. ह्या फोटोमुळे खरी शोभा आली धाग्याला. मन:पुर्वक धन्यवाद.
हा शॉर्टकट ही छानच आहे. चणाडाळ भिजत घाला मग शिजवा मग गाळून घ्या सगळा व्याप वाचला.
बेसनपीठ भाजून त्यात मसाले वगैरे घालून पाणी घालून शिजवून घेऊन त्याचं सारण केलं का ?
फोटोत पोळी फारच सुंदर दिसते आहे.

हो, तिकडे शर्मिला यांची बेसनपोळ्यांची रेसिपी होती, ती आणि तुमची रेसिपी Mix-n-match केले.

यंदाच्या उत्सवात मुद्दाम करून बघण्यासारख्या बऱ्याच रेसिपीज आहेत. एक एक का नंबर आएगा Happy

BTW, एक भोचक सल्ला : “नमकीन” पुरणपोळी ऐवजी दुसरा कुठला मराठी शब्द कॉइन करता आला तर ? हा धडधडीत हिंदी आहे.

अर्थात चवीत फरक नाही पडणार काहीही नाव दिलं तर पण तेव्हढाच विरंगुळा 😀

शक्करपारे चे मराठीत “शंकरपाळे” कसं यूनीक आहे (भोलेनाथाचा संबंध असो नसो) पण तेच त्यांच्या savoury version ला हिंदीत “नमकपारे” असं specific nomenclature आहे तसं आपल्याकडे मराठीत नाही. की मलाच माहित नाही ?

खारी पुरणपोळी, तिखटमीठाची पुरणपोळी, दाल पराठा.

खारे शंकरपाळे इतके दिवस म्हणत आले, पण ते खरेतर खारे शक्करपाळे आहेत हा विरोधाभास आत्ता लक्षात आला. Happy

हो, तिकडे शर्मिला यांची बेसनपोळ्यांची रेसिपी होती, ती आणि तुमची रेसिपी Mix-n-match केले. >> अच्छा

यंदाच्या उत्सवात मुद्दाम करून बघण्यासारख्या बऱ्याच रेसिपीज आहेत. एक एक का नंबर आएगा Happy >> व्वा, छान आहे.

मला ही नमकीन शब्द डाचत होता पण दुसरा कुठला चांगला सुचला नाही त्यामुळे मग नमकीन च ठेवला.

Pages