बिट्टू तबाही - जलप्रदूषणाचा विनाश!

वरील चित्रात दिसत आहे ती एक छोटीशी नदी होती. तिचा लोकांनी कचरा टाकून नाला केला. कालांतराने नाला सुद्धा कचऱ्याने तुंबून गेला.
मग एक वीस वर्षाचा पोरगा बिट्टू तबाही आपल्या मित्रांसह त्या प्रदूषित नदीत उतरला. ना हातमोजे, ना बूट, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोहता देखील येत नसताना त्याने स्वतःहून ती नदी स्वच्छ करण्यास सुरुवात केली. हे असले काही अचाट खूळ मुळात डोक्यात येते कुठून याचेच मला आश्चर्य वाटले.
२६ जानेवारी २०२६ रोजी, मध्य प्रदेशातील हा BSc विद्यार्थी सुरेंद्र सिंग चौधरी आपल्या मित्रांसह बियाओरा येथील अजनार नदीची स्वच्छता करू लागला. त्याने प्लास्टिक आणि इतर कचरा नदीतून बाहेर काढला. त्याने पूजेचा कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित करण्यास सुरुवात केली. तसेच, मित्रांसोबत पैसे जमा करून स्वच्छतेसाठी लागणारी साधने आणि कचरापेट्या खरेदी केल्या.
त्या घाणेरड्या पाण्याचा हातापायावर संसर्ग होऊ लागला, तसेच तिथे साप फिरताना दिसू लागले तसे एकेक करत त्याचे सारे मित्र या उपक्रमातून बाहेर पडले. अर्थात हे स्वाभाविकच होते. पण बिट्टू तबाही दटून राहिला.
तो रोज हे स्वच्छतेचे काम करायचा आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायचा. हळूहळू त्याचे हे काम ऑनलाइन हजारो लोकांपर्यंत पोहोचले. काही लोकांनी मात्र तो हे सर्व फक्त लाइक्स मिळवण्यासाठी करत आहे, असा आरोप केला. पण प्रत्यक्षात या कामासाठी त्याला सुमारे ३० हजार रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करावे लागले.
एकीकडे तो नदी साफ करत होता तेव्हा दुसरीकडे लोक सवयीने आपला कचरा तिथेच टाकत होते, ते देखील त्याच्यासमोरच. यावर उपाय म्हणून त्याने आपल्या खिशातून पैसे खर्च करून लोकांना निर्माल्य आणि इतर कचरा टाकण्यासाठी नदीकाठी वेगळे ड्रम पुरवले. तर ते ड्रम सुद्धा लोकांनी तोडून त्याच नदीत टाकलेले त्याला आढळले.
पण बरेचदा बदलाची सुरुवात तेव्हा होते, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या कोणीतरी सुरुवात करण्याची आणि इतरांच्या बदलण्याची वाट पाहणे थांबवते. बिट्टू तबाहीने तेच केले.
त्याचे काम पूर्ण झाल्यावर त्याने बिफोर आणि आफ्टर असा फोटो टाकला त्यावर लोकांनी "AI है भाई" अश्या कॉमेंट देण्यास सुरुवात केली. इतके त्याचे काम अदभुत होते. पण सुदैवाने या कामाचे आजवरचे सारे व्हिडिओ पुराव्यादाखल त्याच्याकडे होतेच.
तबाहीचा अर्थ “विनाश” असा होतो. बिट्टू तबाहीने जलप्रदूषणाचा विनाश केला होता.
त्याच्या या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेतली गेली.
लेखातील फोटो इंग्लिश क्रिकेटर केविन पीटरसन याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर केलेला आहे.
नेदरलँडच्या एका मोठ्या ओशियन क्लिनिंग कंपनीकडून त्याला जॉब ऑफर देखील आली आहे.
मध्यंतरी मी एक व्हिडिओ पाहिला होता. ज्यात आपल्या देशातील नद्यांची दुर्दशा दाखवली होती. आणि कॅप्शन होते की या नद्या त्या देशातील आहेत जिथे नदीला माता समजले जाते. वाईट वाटले. तरी हे चित्र काही बदलणार नाही म्हणत स्क्रॉल करून पुढील व्हिडिओवर गेलो होतो. पण एखादा बिट्टू जर एकहाती नदीच्या पात्राचा इतका कायापालट करू शकतो तर जनता आणि सरकार यांनी मनावर घेतले तर काय होईल हा विचार मनात आल्यावाचून राहवले नाही. भले आपण बिट्टू बनून नदीतला कचरा उचलायला त्यात उतरू शकत नसतो तरी दोन गोष्टी करू शकतो. एक म्हणजे स्वतः नदीच्या अस्वच्छतेचे कारण न बनणे. आणि त्यानंतर ज्यांनी नद्या स्वच्छ करणे अपेक्षित आहे त्यांच्याकडे ती मागणी लावून धरणे.
या संदर्भातील बिट्टू तबाहीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील आणि इतर काही व्हिडिओच्या लिंक खाली देत आहे. एखाद्यासाठी हा बिट्टू आणि त्याचे कार्य प्रेरणादायी ठरू शकते.
https://www.instagram.com/reel/Dc4TD9-I-4P/?stkn=MTR2M3A4b2ludzRxbw==
https://www.instagram.com/reel/DbIBGohNEvT/?stkn=MXgzNmk0dno5OXRjNw==
https://www.instagram.com/reel/Dc58hBAIw_x/?stkn=MTczYnh1MTB5N29qYw==
बिट्टूू्ची ओळ्ख छान करून
बिट्टूू्ची ओळ्ख छान करून दिली आहे,
सलाम !!!!
सलाम !!!!
बिट्टुचे सुंदर काम आणि त्या
बिट्टुचे सुंदर काम आणि त्या कामाची छान ओळख करून दिली आहे. धन्यवाद ऋन्मेष
फार मस्त बातमी दिलीत ऋन्मेष.
फार मस्त बातमी दिलीत ऋन्मेष. छान विधायक, सकारात्मक बातम्या देताय.
ही बातमी खरंच खूप भारी आहे.
ही बातमी खरंच खूप भारी आहे. अगदी जीवावर उदार होऊन बिट्टून काम केलंय. मला हा ख-या अर्थाने विष्णूचा कार्यकर्ता ( preserver of universe )वाटतो. सलाम. त्याचं नावही बिटृटू महान असं करावं.
जादव पायेंग एकटा जंगल वाढवतो. दुसरा नाव विसरलो एकटा टेकडी खणून रस्ता बनवतो. राहीबाई पोपेरे एकटी बीज संवर्धन करणे. अजून काही उदाहरणं आहेत.
ही सगळी उदाहरणं आलात तर सह, अन्यथा एकटा चलो रे. अशी माणसं खरंच एक वेगळा जिन घेऊन जन्माला येतात. म्हणून ती असामान्य असतात.
<<< दुसरा नाव विसरलो एकटा
<<< दुसरा नाव विसरलो एकटा टेकडी खणून रस्ता बनवतो >>> दशरथ मांझी… mountain man .. त्यांच्यावर चित्रपट सुद्धा होता. नवाझुद्दीन सिद्दीकीचा. मी तो पिच्चर सुद्धा पाहिला आहे. त्यामुळे मलाही ही बातमी वाचून तेच पहिला आठवले.
छान ओळख. भारी काम आहे हे!
छान ओळख. भारी काम आहे हे!
खूप प्रेरणादायी आहे सर्व.
खूप प्रेरणादायी आहे सर्व. बिट्टू ला यश मिळो.
असे बरेच लोक आहेत, जे एआय म्हणुन खिल्ली उडवतील, पण जर खरे आहे कळाले तर माफी मागून कौतुक करायला ही येणार नाहीत. इन्स्टा अशा भंपक लोकांनी भरलेय
>>>दशरथ मांझी… mountain man .
>>>दशरथ मांझी… mountain man .. >>>
ऋन्मेssष धन्यवाद