असे म्हणतात कि पोटाचा प्रश्न सुटला कि सुटलेल्या पोटाचा प्रश्न सुरु होतो.
तेंव्हा आपल्या पोटाचा घेर किती असावा हे अगोदर लिहिलेले आहे. भारतीय वंशाच्या लोकांसाठी कमरेचा जास्तीत जास्त घेर हा पुरुषांसाठी ३५ इंच आणी स्त्रियांसाठी ३१. ५ इंच हा आहे.हा घेर आपण जेथे प्यांट घालतो त्या कमरेच्या हाडाच्या जरासा वर मोजला पाहिजे आणी हा पोटाचा सर्वात (पुढे येणारा) पुरोगामी भाग यावर मोजला पाहिजे. यापेक्षा जास्त घेर असणार्यांना मधुमेह आणी हृदयविकार याचा जास्त धोका संभवतो.
जाता जाता -- पूर्वी लोक बर्याच दिवसांनी भेटले कि "उरा उरी" भेटत असत
आता "उदरा उदरी" भेटतात.
आता एक दुसरे महत्त्वाचे परिमाण म्हणजे कंबर आणि पार्श्वभाग याचे गुणोत्तर (WAIST TO HIP RATIO).
यात आपण कंबरेचा घेर वर म्हटल्याप्रमाणे मोजतो आणी पार्श्वाभागाचा घेर सर्वात जास्त जेथे आहे तेथे मोजला जातो.
हे गुणोत्तर पुरुषांसाठी जास्तीत जास्त १.० असावे
आणी स्त्रियांसाठी ०.९ असावे.
स्त्रियांसाठी -- ३६:२४:३६ हि आदर्श कमनीय आकृती समजली जाते. यामध्ये हे गुणोत्तर ०. ६६ असते हे लक्षात घ्या
म्हणजे आपला पार्श्व भाग जर ३६ असेल तर आपली कंबर ३२. ४ किंवा कमी असणे आवश्यक आहे.
२४ म्हणजे किती कमी ते लक्षात घ्या. संस्कृत साहित्यात सिंहकटी किंवा कृशोदरी हि वर्णने येतात.
उष्मागतीकीच्या प्रथम सिद्धांता प्रमाणे ( FIRST LAW OF THERMODYNAMICS) प्रमाणे उर्जा हि निर्माण करता येत नाही किंवा नष्ट हि करता येत नाही. तिचे फक्त स्वरूप पालटते. आईन्स्टाइन च्या सिद्धांताप्रमाणे वस्तुमान आणी उर्जा यांचे एकामेकांत रुपांतर करता येते.
याचा अर्थ काय आहे. हवा खाऊन किंवा काहीही न खाता आपले वजन वाढणे शक्य नाही.
आपल्या बँकेत आपला पगार किती येतो आणी आपण खर्च किती करतो यावर ( आय आणी व्यय याच्या विनिमयानुसार) बँकेत शिल्लक किती राहील हे ठरते. तसेच आपण किती खातो आणी किती उर्जा खर्च करतो यावर आपल्या शरीराचे वजन अवलंबून असते हा साधा विचार आहे.
याचा अर्थ असा कि आपले वजन जर जास्त असेल तर आपण जास्त खात आहात किंवा आपला व्यायाम पुरेसा होत नाही किंवा बहुतकरून दोन्ही.
एक मुलभूत प्रश्न असा आहे कि वजन कमी का करायचे? का एवढे कष्ट करायचे? उपाशी राहायचे आणी व्यायामहि करायचा?
पहिली गोष्ट स्थूल माणसाना अगोदर म्हटल्याप्रमाणे केवळ हृदय विकार आणी मधुमेह्च होतात असे नाही तर पुरुषांच्या कर्करोगाने मृत्यू पावणाऱ्या लोकांच्या संख्येत १४ % लोक हे थेट लठ्ठपणामुळे कर्करोग होऊन मृत्यू पावतात आणी स्त्रियांमध्ये २० % कर्करोगाचे मृत्यू हे थेट स्थुलपणामुळे होणार्या कर्करोगाच्या संख्येत वाढ होण्यामुळे होतात.
नपुंसकता, इंद्रीयशैथिल्य आणी शीघ्रपतन हे आजार हि लठ्ठ पुरुषांत मोठ्या प्रमाणात आढळतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वयाच्या ३५-४० वर्षानंतर बरेच लोक इंद्रीयशैथिल्य आणी शीघ्रपतन हे वयामुळे होते किंवा कामाच्या तणावा मुळे होते असे समजून गप्प बसतात आणी निसर्गाने दिलेल्या एका अतिशय उच्च सुखास मुकतात. बर्याच वेळेस यामुळे नवरा बायकोत एक तर्हेचा मूक असा तणाव निर्माण होतो आणी त्यांच्या आपसातील नातेसंबंधावर परिणाम होतो.
स्त्रियांच्या पाळी मध्ये अनियमितता आणी वंध्यत्व याचे लठ्ठ पण हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. PCOS/ PCOD (POLYCYSTIC OVARIAN SYNDROME/DISEASE हे आजच्या काळात वंध्यत्वाचे एक क्रमांकाचे कारण आहे.
अतिरिक्त वजनामुळे स्त्रियांची काम वासना कमी होत नाही परंतु आपण आपल्या नवर्याला किळसवाण्या वाटत असू या विचाराने स्त्रिया सम्भोगापासून दूर राहण्याच्या प्रयत्नात असतात. शिवाय अतिवजनामुळे योनीमार्गाचा जंतुसंसर्ग जास्त झाल्याने संभोग वेदनादायक होतो या दोन्ही गोष्टींमुळे युगुलातील संबंध दुरावले जाऊ शकतात.
वाढत्या वजनामुळे माणसांची स्वतःबद्दलची प्रतिमा मलीन झालेली आढळते. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला आढळतो. आता अगदी अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे कि लठ्ठ माणसाना सरासरी १०-१५ % कमी पगाराच्या नोकर्या मिळतात.
लठ्ठपणा हा स्त्रियांवर केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक पातळीवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम घडवून आणतो. सुंदर दिसणे आणी सुंदर राहणे हा स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. सकाळी उठून चट्टेरी पट्टेरी चड्डी घालून विस्कटलेल्या केसांसह पुरुष पाव किंवा दूध आणायला जाताना सहज दिसतील पण केस न विन्चरता गबाळ्या पेहरावात कोणतीही स्त्री दिसणार नाही. लग्नात सुद्धा एखाद्या पार वाकलेल्या आजीबाई सुंदर साडी नेसून आलेल्या असतात पण त्यांच्या बरोबरचे आजोबा प्यांट आणी शर्टचा मेळ बसत नाही असे दिसतात.
एकदा स्त्री लठ्ठ होऊ लागली कि आपण आपल्या जोडीदाराला/ नवर्याला आकर्षक दिसतो कि नाही याची शंका तिच्या मनात सतत राहते. लठ्ठपणामुळे अगोदरचे बरेचसे आवडते वेश आणी पेहराव आपल्याला घालता येत नाहीत याची खंतहि वाटत राहते. आपण कधीतरी बारीक होऊ आणी मग आपल्याला ते पेहराव घालता येतील अशी आशा बाळगून त्यानी ते पेहराव जपून ठेवलेले असतात. आणी लठ्ठ पणा एका विशिष्ट पातळीच्या पलीकडे गेला कि निराश होऊन आणी न्युनगंडाने ती आहार व्यायाम यांच्याकडे दुर्लक्ष करू लागते आणी दुष्ट चक्रात सापडते.
वजन वाढल्यामुळे आपल्या फुप्फुसांवर सुद्धा ताण येतो आणी त्यामुळे धाप लागणे दम लागणे हे विकार जडतात. टोकाची परिस्थिती म्हणजे अतिलठ्ठ व्यक्ती झोपेत श्वासवरोध होऊन २०-३० वयालाच मृत्युमुखी पडतात.
अतिरिक्त वजनाचा दूरगामी परिणाम हा आपल्या स्नायू आणी सांध्यांवर होत असल्याने स्पॉण्डायलोसीस आणी गुडघेदुखी सारखे आजार आता मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. आणी गुडघ्याच्या सांधे बदलाच्या वाढत्या शस्त्रक्रिया हे याचेच द्योतक आहे.
वजन कमी करण्याचा फायदा दुर्दैवाने ताबडतोब दिसत नाही. स्त्रिया मैत्रिणीच्या लग्नासाठी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन फेशियल (आणी इतर प्रक्रिया) करून आल्या कि पुढचे पाच सात दिवस चेहरा चमकतो. असा दृश्य परिणाम वजन कमी करण्याच्या उपायांनी दोन चार दिवसातच काय दोन चार महिन्यात सुद्धा दिसत नाही. आजच्या तडक आणी तुरंत च्या युगात असे हळू हळू काम करणारे उपाय काय कामाचे.
लष्करात गोव्याला असताना एका माहितीतील अधिकार्याची अतिविशाल पत्नी माझ्याकडे आली माझ्या समोर तब्येतीत बसली आणी डॉक्टर वजन कमी कसं करायचं असे विचारू लागली. मी जवळ जवळ ४०मिनिटे तिला उपाय (या लेखमालेचे सार) सांगितले. तर ती मध्येच म्हणाली, "डॉक्टर, पण याच्यावर काही गोळी नाही का?"
मी माझे वैफल्य लपवून हसून म्हणालो. दुर्दैवाने नाही.
गोव्याच्या नौसेना मुख्यालयाच्या प्रमुख अधिकार्याची पत्नी पाठदुखीसाठी माझ्याकडे एकस रे काढायला आली होती. अस्थिरोग तज्ञाने तिला वजन कमी करायला सांगितले होते. त्यावर ती मला म्हणाली डॉक्टर, "पार्टीत इतके सगळे छान छान पदार्थ समोर येतात तर त्याला नाही कसं म्हणायचं आणी किती जणांना नाही म्हणायचं ?" मी ओशाळवाणे हसून म्हणालो, "बरोबर आहे"
अशी परिस्थिती बर्याच जणांची आहे खरं.
जाता जाता -- मला एक "अचाट आणी अफाट" कल्पना सुचली होती.
लग्नात आहेर घेण्याऐवजी जेवायच्या पदार्थांना रोख किंमत लावायची आणी ते पैसे सार्वजनिक कामाला दान दिले जातील अशी घोषण करायची ( उदा प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा किंवा टाटा कॅन्सरला देणगी दिली जाईल).असे केले तर लोक आपले खाणे "निम्म्याने" तरी कमी करतील शिवाय अशा सेवाभावी संस्थेला देणग्याही मिळतील. माझ्या मावसभावाने आपल्या ७५ वर्षाच्या वाढदिवसाच्या रोजी टाटा कॅन्सरला आणि हिंगणे येथील अनाथ महिलाश्रमाला देणगी देण्यासाठी एका स्वयंसेवकाला रीतसर पावतीपुस्तक घेऊन हॉलच्या बाहेर बसवले होते नई येणाऱ्या माणसाला तेथे ऐच्छिक देणगी देण्यासाठी आवाहन केले होते.
पण ती कल्पना अचाट अशासाठी आहे कारण ती अतिशय उपयुक्त असली तरी बहुसंख्य लोकांना ती अव्यवहार्य वाटणारी आहे आणि पचणारी नाही. कारण लोकापवाद -- एक तर लग्नाला बोलावलं आणि आमच्या खाण्याचा खर्च आम्हालाच करायला लावतात. त्यापेक्षा बोलवायलाच नको होते.
माझा मूळ मुद्दा शेवटी हाच आहे कि केवळ आलोच आहोत आणि समोर पदार्थ आहेत( आपल्याला कुठे पैसे भरायचे आहेत) तर पोट भरले असेल तरीही खाऊन घ्या हि वृत्ती घातक आहे. बहुसन्ख्य माणसांच्या प्लेट्स आवश्यकतेच्या दुप्पट तरी भरलेल्या दिसतात
आपण बटर पनीर, व्हेज माखनवाला, मलई युक्त मालपुवा खातो आणि कॅलरी जास्त झाल्या म्हणून डाएट कोक पितो.
चान्गला लेख
चान्गला लेख
शेवटच्या वाक्यात लेखमालेचे
शेवटच्या वाक्यात लेखमालेचे मर्म आहे.
चांगला लेख.
चांगला लेख.
8 दिवस थ्रोट इन्फेक्शन (ड्राय कफ) झाला होता, त्यावेळी जेवणही जेमतेम जायचे.त्या आठ दिवसात 1.5 वजन कमी झाले होते. म्हणजे खाण्यावर बरेच काही अवलंबून असते.
लेखमाला वाचतो आहे. लेखातील
लेखमाला वाचतो आहे. लेखातील माहितीचा व चर्चेचा उपयोग होईल याची खात्री आहे.
मागच्या दीड-दोन महिन्यांपासून मीही १. वजन नियंत्रणात आणणे, २. बांधेसूद शरीर बनविणे ह्या उद्दिष्टांवर सातत्याने काम करत आहे. अगदी थोडाफार फरक जाणवत आहे, "पी हळद नि हो गोरी" असं हे काम नाही याची जाणीव आहे.
एक शंका: अनेकदा, अमुक एका सिनेनटाने तमुक एका सिनेमासाठी २० किलो वजन वाढविले आणि नंतर कमी केले अशा बातम्या दिसतात. त्यात काही तथ्य असतं का? असं करणं खरोखरच शक्य आहे का?
अमुक एका सिनेनटाने तमुक एका
अमुक एका सिनेनटाने तमुक एका सिनेमासाठी २० किलो वजन वाढविले आणि नंतर कमी केले अशा बातम्या दिसतात. त्यात काही तथ्य असतं का? असं करणं खरोखरच शक्य आहे का?
असे असते आणि केलेही जाते याचे कारण त्यात अंतर्भूत असलेला प्रचंड पैसा.
त्यासाठी त्यांच्या मागे वैद्यकीय सल्लागार कायम उभे असतात.
Yes, Bhumi Pednekar gained significant weight, around 27-30 kg (60 lbs), for her debut film Dum Laga Ke Haisha (2015) to play an overweight character, then later lost it through a disciplined, healthy diet, inspiring many with her transformation
सामान्य माणसाने असे काही करू नये. कारण एकदम वजन वाढले तर तुमची त्वचा ताणली जाते आणि तसेच भसकन वजन कमी केले तरी हि ताणलेली त्वचा सहज परत आपल्या मूळ स्थितीत येत नाही. गरोदरपणात अशी ताणलेली त्वचा नंतर ढिली पडते आणि सुरकुत्या पडतात हे बऱ्याच स्त्रियांमध्ये दिसून येते विशेषतः गरोदरपणात ज्यांचे वजन अति वाढते त्यांच्या बाबतीत.
नट नट्या बहुतांशी विशी पंचविशीतील असतात. त्यामुळे असे वजन कमी केले तरी त्यांची त्वचा लवकर मूळ स्थितीत येते.
याउलट जसे वय वाढत जाते तसे वेगाने वजन कमी केले तर आपल्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर सुरकुत्या पडून माणूस लवकर वयस्कर दिसू लागतो. म्हणूनच डॉक्टर तुम्हाला "यो यो" डाएटिंग करू नका हे सांगतात.